फर्जंद: थरारक युद्धपट!

१९ जून २०१८ ला मी "फर्जंद" हा मराठी सिनेमा बघितला. तिसरा आठवडा सुरु असूनसुद्धा हाऊसफुल होता. स्टोरी (कथा), स्क्रीनप्ले (पटकथा), लिरिक्स (गीत लेखन)आणि डायलॉग (संवाद)अशा चार गोष्टी आणि त्यासुद्धा पहिल्याच चित्रपटात दिग्पाल लांजेकर याने समर्थपणे हाताळल्या आहेत.
अमितराजचे संगीत आणि केदार दिवेकरचे पार्श्वसंगीत (बॅगराउंड म्युझिक) दोन्ही छान आणि समर्पक आहेत. त्यात नाविन्य आहे त्यामुळे ऐकायला छान रीफ्रेशिंग (ताजेतवाने) वाटतं. दोन गाणी मस्त आहेत: शिवबा आमचा मल्हारी आणि अंबे जगदंबे.

कथा थोडक्यात अशी आहे की, सिंहगड जिंकला जातो आणि शिवराज्याभिषेक जवळ येऊन ठेपला असतो. मात्र पन्हाळा किल्ला बेशक खानच्या (समीर धर्माधिकारी) अजूनही ताब्यात असतो. बेशकचा भाऊ असतो - कामद खान! बेशक कडून नागरिकांवर आणि स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारांच्या बातम्यांनी शिवाजी महाराज (चिन्मय मांडलेकर) अस्वस्थ होतात. नेताजी पालकर उशिरा आल्याने पूर्वी पन्हाळा हातातून निसटलेला असतो, असे शिवाजी म्हणतात. मग त्यांना पन्हाळा जिंकल्याशिवाय राज्याभिषेकात अर्थ नाही असे वाटू लागते आणि जिजाऊ (मृणाल कुलकर्णी) तसेच अनाजी पंत (राहुल मेहेंदळे) बहिर्जी नाईक (प्रसाद ओक) यांचेशी विचार विनिमय करून ते पन्हाळा जिंकण्यासाठी कोंडाजी फर्झंद याला (अंकित मोहन) बोलावणे धाडतात. शिवाजींच्या मते तो शूर वाघ आहे! तो नंतर त्याच्या मर्जीतल्या फक्त साठ मावळ्यांना एकत्र करून (गुणाजी, गुंडोजी, मर्त्या रामोशी वगैरे) पन्हाळा जिंकून दाखवतो. त्याने प्रत्येकाला एकत्र करण्याचे प्रसंग थोडे थोडे "फास्ट अँड फ्युरीयस" च्या डोमिनिक टोरेटो आणि टीमची आठवण येते. बहिर्जी नाईक ठिकठीकाणी जाऊन वेषांतर करून शिवाजी महाराजांसाठी गुप्तहेरगिरी करत असतात. तसेच आस्तादने गुंडोजी छान रंगवला आहे.

चित्रपटासाठी खर्च खूप केला आहे पण साठ जण गड चढतांना मात्र नीट दाखवलेच नाही आहेत, जे (माझ्यासारख्या) प्रेक्षकांना अपेक्षित होते (क्लिफ हँगर चित्रपटासारखे थोडेसे!). मोहिमेची तालीम करतांना थोडे उभट चढ चढतांना दाखवतात पण जेव्हा खरोखर मोहीम सुरु होते तेव्हा मात्र निराशा होते. थोडक्यात गड चढण्याचे विशेष असे प्रसंग नाहीतच! एवढी एक गोष्ट सोडली तर सगळं चांगलं आहे.
काही प्रसंग बघताना "लगान" ची आठवण होते आणि शेवटची फर्जन्दची अति-थरारक टॉपलेस फाईट बघतांना "गजनी" मधल्या आमीरच्या (टॉपलेस) आणि पोलिसाच्या फाईटची आठवण होते. युद्ध, द्वंद्व, मारामाऱ्या, शस्त्रास्त्रे, हाणामारी यात हा चित्रपट हॉलिवूडच्या तोडीचा झाला आहे. हाणामारी चे सीन अक्षरशः धुमाकूळ घालतात! चित्रपटाचा शेवटचा अर्धा तास भयंकर थरारक आणि श्वास रोखून बघायला लावणारा आहे. प्रशांत नाईक या अॅक्शन डायरेक्टरची कमाल म्हणायला हवी!

अंकित मोहन (स्टार प्लस महाभारतातील अश्वत्थामा) अमराठी असून सुद्धा त्याने ग्रामीण मराठी डायलॉग उत्तम म्हटले आहेत आणि विशेष म्हणजे सिल्वेस्टर स्टॅलोन, आर्नोल्ड श्वार्झनेगर, रेम्बो, विन डीझेल, दारासिंग, सनी देओल, सलमान, ह्रितिक, अजय देवगण वगैरे सगळे जण लाजून लाजून चूर होतील आणि तोंडात बोटे घालतील असे द्वंद्व आणि अॅक्शन सीन त्याने दिले आहेत. प्रसाद ओकचा सोंगाड्या आणि त्याचे किसना (निखील राउत) सोबतचे शेवटचे प्रसंग तसेच केसर (मृण्मयी देशपांडे) हे दमदार आणि उत्स्फूर्त अभिनयामुळे चांगलेच लक्षात राहतात. समीर (बेशक) आणि शिवाजी (चिन्मय) यांचा अभिनय उत्तम. समीर तर डोळ्यांनीच घाबरवतो. केसर कामद खानला मारते, बहिर्जीला सोडवते. तिने पण एका छोट्याश्या फाईट सीन मध्ये जान आणली आहे. तसेच अधून मधून चित्रपटात चपखलपणे विनोदाची पेरणी केली आहे. विशेषत: भिकाजी चांभार याला पकडून आणतात तो प्रसंग!

जिजाऊ यांचेकडे काही छान डायलॉग आलेले आहेत:
"गजरा हा देव आणि कलावंतीण डोके येथे ठेवल्यास त्याचे नशीब बदलते. जागा बदलली की नशीब बदलते पण दृष्टीकोन (आणि जागा) बदलली की नशीब पालटते सुध्दा!"
"स्त्री मराठ्यांच्या देव्हाऱ्यातली देवता आहे!"
"काळ आडवा आला तरी त्याला उभा फाडायची ताकद आहे आमच्या लेकरात!"

तसेच इतर काही डायलॉग छान आहेत जसे:
"आपण सावध असल की शत्रू आपले काही करू शकत नाही!"
"आमच्या रक्ता रक्तात शिवाजी हाये. जिथं सांडल तिथं हजार शिवाजी जनमतील!"

इंग्रजी सब टायटल मुळे काही गोष्टी मला कळल्या जसे:
सूरमा म्हणजे brave warrier!
उध उध म्हणजे Arise! जागृत हो! (उध उध अंबाबाई)

मराठीत अशा प्रकारचा युद्धपट/थरारपट प्रथमच आला आहे आणि त्याचे प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन स्वागत करायलाच हवे!!
- निमिष सोनार, पुणे

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet