मृत्यु दर्शन

आपल्यापैकी बर्‍याच जणांना, आयुष्यात कधीतरी, जवळून मृत्यु दर्शन झाले असेल. मलाही ते बर्‍याच वेळा झाले आहे. निव्वळ, दोरी बळकट, म्हणून त्या प्रसंगांतून सहीसलामत सुटलो आहे. त्यातील पांच ठळक घटना, अगदी नुकत्या घडलेल्या गोष्टीप्रमाणे लख्ख आठवतात.

लहान असतानाची गोष्ट आहे. आमच्या घरापासून मालाडजवळचा मार्वे किनारा, २-३ किलोमीटरवर होता. एका संध्याकाळी, आम्ही आणि शेजारचे एक कुटुंब, तिथे पायीच जायला निघालो. मार्वे रोडला लागल्यावर, थोड्याच वेळांत, मागच्या बस स्टॉपवर एक बस येताना दिसली. आई आणि शेजारच्या बाईंना चालायचे नव्हते, म्हणून माझ्या वडिलांना सांगून त्या बसपर्यंत धावत गेल्या. त्या गेल्या बघितल्यावर, मलाही जावेसे वाटले. वडील म्हणाले, "पळ लवकर आणि गाठ त्यांना."

पडत्या फळाची आज्ञा घेऊन, मी ही धावत सुटलो. त्यावेळेस, मालाड मुंबईबाहेर होते. तिथे खाजगी बसेस असायच्या. त्या पिवळ्या रंगाच्या, नाक फेंदारलेल्या बसेसना, कधी मागे दरवाजा असायचा वा कधी ड्रायव्हरच्या समोरच्या बाजूला पुढे! मी बसशी पोचेपर्यंत, शेजारच्या बाई आंत चढल्या होत्या आणि आई चुकून मागच्या बाजूला गेली होती. बस थांबलेलीच होती. अचानक, पाय अडखळून मी बसच्या पुढे, डावीकडच्या चाकाला लागून पडलो. ड्रायव्हरला मी दिसणे शक्य नव्हते. भीतीने घाबरल्यामुळे, मला उठताही येत नव्हते. मी ओरडायचे वा रडायचेही विसरलो. तेवढ्यांत आई पुढच्या दरवाजाशी आली आणि तिने मला बघितले. क्षणार्धात, तिने मला उचलले आणि बसमधे प्रवेश केला. आंत बसल्यावर, माझ्यापेक्षा आईच जास्त घाबरली होती. ती फक्त मला कवटाळून रडत होती.

पुढे, राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेत शिकायला असताना, काही दिवस मामांच्या घरी, पुण्याला रहात होतो. तिथून जवळच, एस. पी. चा तरणतलाव असल्याने, मी रोज पोहायला जायचो. नेहमीच्या राऊंडस मारुन झाल्या की थोडावेळ, खोल पाण्याच्या भागात उड्या मारुन, काठाला डुंबत असे. एक दिवस, काठाच्या पन्हळीला धरुन असताना, अचानक, समोरच्या बाजूने एका मुलाने उडी मारलेली बघितली. वर आल्यावर त्याला पोहता येत नव्हते. तो गटांगळ्या खाऊ लागला. कुणाचे लक्ष जाण्यापूर्वीच मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला मागून धरण्याचा प्रयत्न केला. पण, तो अचानक गोल फिरला आणि त्याने मला गळामिठीच मारली. (कारणाशिवाय, तेंव्हा कोणी उगाचच गळामिठी मारत नसत.) ती सोडवायच्या प्रयत्नांत. आम्ही दोघेही तळाला गेलो. मला तर, तोपर्यंतच्या सगळ्या जीवनाचा चित्रपटच दिसला. तळाला पाय टेकताक्षणी, मी पायाने जोरदार उशी घेतली आणि सगळी ताकद लावून ती मगरमिठी सोडवली. त्याक्षणी, मनांत हाच विचार आला की, आता या मुलाचे काही होवो, आपण वाचलंच पाहिजे. सुदैवाने आम्ही दोघेही वर आलो आणि त्या मुलाला कोणीतरी हात दिला. मी मुक्काट्याने घरी आलो. मामांना काही सांगितले नाही, नाहीतर माझे पोहणे बंद झाले असते.

पुण्याला असतानाच, स्कूटरवरुन मुंबईला जाण्याची खुमखुमी फार होती. बर्‍याच वेळा, एकट्यानेच जुन्या मुंबई-पुणे रत्याने प्रवास करायचो. असंच एकदा, सकाळी लवकर पुण्याहून निघालो. लॅम्ब्रेटा स्कूटर होती. कारण व्हेस्पाचा नंबर लागायला, त्याकाळी दहा वर्षे लागायची! घाट सुरु झाल्यावर अगदी सांभाळून चालवत होतो. नुकताच, पुढे एक दुधाचा टँकर गेला असावा, कारण तो दूध सांडत गेला होता.(तेंव्हा दूध रस्त्यावर ओतण्याची पद्धत नव्हती.) शक्यतो त्या ओघळाला चुकवत होतो. पण एकाक्षणी स्कूटर घसरती आहे असे वाटून ब्रेक जरा जास्त दाबला. आणि दुसर्‍याच क्षणी, स्कूटर १८० डिग्रीच्या कोनात फिरुन, तिचे तोंड पुण्याच्या दिशेने झाले. निव्वळ, माझ्या उंचीमुळे, माझे पाय टेकत असल्याने स्कूटर पडली नाही. स्पीड फारसा नव्हता आणि वेळ आली नव्हती.

नोकरीच्या काळात, एका छोट्या कंपनीत 'शोध आणि विस्तार' विभागाचा मुख्य होतो. कंपनीच्या दोन बिल्डिंग्ज् होत्या. दोन्हींत, पहिल्या मजल्यावर काम चालू असायचे. दिवसभरांत, माझ्या दोन्ही ठिकाणी, बर्‍याच फेर्‍या व्हायच्या. एकेक पायर्‍या गाळत, धावत जिना चढण्याची संवय झाली होती. सकाळीच एका ठिकाणचे काम सुरु करुन मी दुसर्‍या बिल्डिंगकडे निघालो. मधे थोडे अंतर होते. दुसर्‍या बिल्डिंगशी आल्यावर , कामाच्या विचारांत गुंतलो होतो. पायर्‍या चढायला सुरवात केली त्याक्षणी, माझ्या पायापुढे काही हालचाल जाणवली. खाली पाहिले तर, माझ्या पुढे एक ७-८ फुटांचा पिवळा धम्मक सर्पराज जिना चढत होता. माझा पाय हवेतच थबकला. मागच्या मागे, उलट्या पायर्‍या उतरुन खाली आलो आणि तिथल्याच एका कामगाराला हांक मारली. तोपर्यंत, साप अर्थ्या जिन्यातल्या लँडिंगवर पोचला होता. जिना सरळच होता. कामगार तिथलाच गांववाला असल्याने, त्याने सहजपणे त्या सापाला मारले. शेपटीला धरुन त्याने तो खाली आणला तेंव्हा तो काळा पडला होता, पिवळ्या रंगाचा मागमूसही नव्हता. जनावर विषारी असल्याचे त्यानेच सांगितले. 'काढता पाय घेणे' चा अर्थ त्यादिवशी बरोबर समजला.

सुट्टीच्या दिवसांत, सहकुटुंब राजस्थानात फिरायला गेलो होतो. त्याच वेळेला अडवानींना रथयात्रा काढण्याची बुद्धी झाल्यामुळे, आम्ही फक्त, उदयपूरच पाहू शकलो. जयपूरला आल्यावर, दंगली सुरु झाल्याने, हॉटेलातच दोन दिवस काढावे लागले. कारण मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, वॉल्ड सिटीत गेलात तर जिवंत परत येणार नाही, अशी परिस्थिती होती. परतीचे रेल्वे तिकीट जयपूरहूनच होते. गाडीच्या वेळेच्या बर्‍याच आधी आम्ही स्टेशन गांठले. गाडी प्लॅटफॉर्मला लागेपर्यंत, बाकी सगळे बाकांवर बसले होते. तिथे प्लॅटफॉर्म इतके बुटके होते, की सहजच रुळांत उतरता येत होते. समोर एक शंटिंग चालले होते, ते पहायला मी दोन रुळ ओलांडून पुढे गेलो. त्याच्या पुढचे ट्रॅक्स यार्डातले असल्याने गाडी येण्याची भीति नव्हती. त्यांतल्या एका ट्रॅकवर उभा राहून मी लांबचे शंटिंग पहात होतो. अचानक, मला माझ्या डावीकडे हालचाल जाणवली. डावीकडे पाहिले असता, एक, मागे फुली मारलेला डबा, माझ्याच दिशेने, आवाज न करता येत होता आणि माझ्यापासून केवळ ५-७ फुटांवर पोचला होता. मी टुणकन मागे उडी मारली. इंजिनने ढकलून दिलेले ते दोन डबे उजवीकडे घरंगळत गेले आणि काही अंतरावर थांबले. माझे हृदयसुद्धा थोडे सेकंद थांबले असावे. मी निमुटपणे परत फलाटावर गेलो आणि काही झालेच नाही असे दाखवून, बाकीच्यांच्या गप्पांत मिसळलो.

या व्यतिरिक्त, लोकलच्या दारांत उभं राहून प्रवास करणे, विजेचे किरकोळ झटके बसणे, डोंबिवलीला असताना, संपूर्ण बिल्डिंगलाच शॉक बसायला लागणे, हे आणि असे, अनेक किरकोळ अनुभव आहेत, पण ते खचितच, जीवघेणे नाहीत.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

बाप रे !! विशेषतः पहिल्या , दुसऱ्या आणि तिसऱ्या किश्श्यात !!!
या सगळ्या अनुभवात तुम्हाला क्षणिक का होई ना भीती अनुभवायला मिळाली का ?
माझा एकंच अणभव आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तोपर्यंतच्या सगळ्या जीवनाचा चित्रपटच दिसला

म्हणजे शुन्य सेकंदात, काही ठळक केलेल्या चुकांचा ब्राइट स्क्रिन चित्रपट का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

काही ठळक केलेल्या चुकांचा ब्राइट स्क्रिन चित्रपट का?

काही कशाला ? आयुष्यभर नुसत्या चुकाच केल्यात मी, असे आताशा फिलिंग आलंय!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

"Cowards die many times before their deaths.
The valiant never taste of death but once."

(मी नाही. शेक्सपियरचा ज्यूलियस सीझर असे म्हणून गेलाय म्हणतात. (चूभूद्याघ्या.))

- (डरपोक) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+1

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय बुडणारा मनुष्य आपल्याला घेउन बुडतो. असे ऐकले आहे. मुद्दाम नाही तर जीवाच्या आकांताने तो आपल्याला गळामीठि मारतो - ऐकलेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

वाचतोय. फारच प्रसंग आलेत. मला एकदाच आलाय. ट्रेकिंग दु:साहस!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कणाकणाने जीव घेणाऱ्या, आजारातून फक्त नवऱ्याच्या मदतीने बाहेर पडले होते. तेव्हा खरच गंडांतर होते. मेलेही असते. पण त्या काळात माणूसकीच्या आणि ईश्वराच्या सर्वाधिक जवळ होते, असे स्मरते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

तुम्हाला आलेले अनुभव म्हणजे, काळ आला होता पण वेळ आली नव्हती असच म्हणायला पाहिजे.

मला अगदी मृत्यु दर्शन घडले असे नाही म्हणता येणार , पण दोन तीन वेळा नशीबाने वाचले इतकच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
रूक जाना नहीं - तू कही हारके |
काटोंपे चलके मिलेंगे साये बहारके ||

आंबेनळी घाटातल्या भीषण अपघातातून सुदैवाने वाचलेल्या एका व्यक्तीचं उदाहरण आजच वाचलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0