लेखकराव

एकदा एक लेखकराव जगणं समजून घ्यायला निघाला
मग झाला सज्ज हाती धरून लेखणी
खरडली गेली तगमग पानोपानी
वाचून पाहतो तर काय..
लिहीली गेली न संपणारी कथा…
नायक नायिका आणि त्यांचं आयुष्य..
विचारधारा तेवढी राहिली…
परंतु एकच अडचण वैचारिक भूमिका कोणती…
सामाजिक.. राजकिय.. आर्थिक..
मानसिक.. वैज्ञानिक.. अध्यात्मिक..
धार्मिक.. ऐतिहासिक.. सर्वकालिक..
मग लौकिकार्थाने सभोवतालं धुंडाळीत राहिला
सगळ्या विचारसरणीत गुरफटून गेला
मग सुरू झाले साक्षेपी आकलन..समीक्षण
मग केले अवलोकन.. सिंहावलोकन..
अखेरीस जन्मापासून ते आजवरचं सगळंच पडताळून पाहू लागला…
प्रत्येकवेळी समृद्ध होऊ लागला..
मग हर्षोऊल्हासित काल्पनिक लिहू लागला..
परत एके ठिकाणी अडखळला..
कृत्रिमपणे लिहितोय अस वाटून हिरमुसला…
नवीन शक्कल लढवून प्रत्यक्षातले प्रसंग वेगळ्या दृष्टिकोनातून हेरू लागला..
असं झालं तर .. तसं झालं तर.. जर.. तर.. ने सगळाच खेळखंडोबा झाला…
तोवर बराच काळ निघून गेला बऱ्याच घटना घडून गेल्या
क्षणभर वैतागला.. मग ठरवलं खुप वाचू..
अन् मग काय जे मिळेल ते वाचू लागला
हे चूक ते बरोबर असं स्वतःच ठरवू लागला..
स्वतःच्या मतांचा अविर्भाव घुमू लागला
बिनधोकपणे स्वतःचेच निर्णय देऊ लागला..
एकाएकी त्याला आपण विचारवंत झालोत असं वाटू लागले..
मग खडकन जाग यावी तसं भाराभार लिहू लागला…
स्वतःचीच रोखठोक भूमिका मांडू लागला…
शाश्वत जगात इवलाश्या अनुभवाचे गाठोडे उघडू लागला
जागतिक अस्मितांवर भाष्य करू लागला..
उथळ माथ्याने समाजात वावरू लागला पण….
आजूबाजूचे कोणीच लक्ष देईनासे झाले
कारण हा कोणत्याच विचारधारेचा पुरस्कर्ता नव्हता
मग एक एक विचारसारणी सूक्ष्मपणे पाहू लागला
सगळ्यांचेच राग रंग आजमावू लागला
प्रत्येकाचा तोकडेपणा नजरेत खटकू लागला..
एकेकाचे दंभ पाहून तिटकारा येऊ लागला
सांगोवांगी अभिव्यक्तीचे ढोंग पाहू लागला
मग एकेकाची पोकळ निष्ठा विष्ठेसमान वाटू लागली
सरतेशेवटी नाद सोडून माणूस म्हणून तार्किकपणे व्यक्त होऊ लागला
अशा तऱ्हेने लेखकराव होण्याच्या पलिकडे दृष्टिआड झाला…

------------------------------
भूषण वर्धेकर
४ ऑगस्ट २०१६
हडपसर, पुणे
-------------------------------

field_vote: 
0
No votes yet