जंगलगोष्ट - २

जंगलगोष्ट - २

जंगलात सगळं कसं आलबेल चालू आहे असं ढोल पिटवून सांगत असताना काही लांडग्यांनी धक्कातंत्र वापरायला सुरूवात केली. लागलीच रिकामचोट कोल्ह्यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळत कोल्हेकुई सुरू केली. अमानुष आणि क्रूर घटनेचे निमित्त साधून भव्य दिव्य मोर्च्यांचे दिमाखदार सोहळे पार पाडले जाऊ लागले. व्यवस्थापन कौशल्य पणाला लावून काही होतकरू कार्यकर्ते रात्रंदिवस राबत होते. भविष्यात कुठेतरी राजकिय संधी मिळेल हिच एकमेव ईच्छा मनाशी बाळगून अहोरात्र काम चालू होते.
मात्र काही धुरंधर लांडगे हाती सत्तेचा कारभारच नसल्याने बैचेन झाले होते. रिकामा वेळ असल्याने रसद पुरवण्याचे काम छुप्यागतीने चालूच होते. कावेबाज लांडगे आपल्या पूर्वाश्रमीचे घोटाळे आणि त्यावरील कारवाई कशापद्धतीने झाकोळली जाईल याच्या योजना आखत होते. पोसलेल्या कार्यकर्त्यांना जातीचे तिलक लावून मुलूखमैदानात धाडत होते. गरीब बिचारे असंख्य प्राणी जंगलाच्या कानाकोपऱ्यातून येत होते काही आणले जात होते. शिकाऊ युवा नेत्यांना कोणते मुद्दे रेटायचे आणि कसे बोलायचे याचे कसून शिक्षण दिले जात होते. भावनिक साद घालून अनेक प्राण्यांना सामील करून घेतले जात होते. कित्येकांचा आक्रोश तर वाखाणण्याजोगा होता. पण नेमका मोर्चा कशासाठी हा भ्रम मनोमनी येत होता. आपण प्रतिक्रिया देतोय की प्रतिसाद देतोय हेच उमगत नव्हतं. धुरंधर प्रकांडपंडीत फारच बारकाईने निरखून पाहत होते. जंगलातील सत्ता कशी काबीज करता येईल किंवा सत्तेतल्या मंडळींना ताब्यात कसं ठेवता येईल याची रणनीती आखली जात होती. एकूणच सत्तांतर झाल्यामुळे ज्यांची दुकानदारी आणि मक्तेदारी संपुष्टात आली होती ते प्राणीमात्र यंदा ईरेला पेटून ऊठले होते. कारण एकच आधी केलेली गुंतवणूक भरून काढायची असेल तर सत्तेत आपलेच प्राणी पाहिजेत. कष्टकरी प्राणी आणि पक्षी मात्र रोज सुर्योदयाला बाहेर झेपावून सायंकाळी परतून घरटं आणि पिल्लासाठी थकून भागून मुकाटपणे जगण्याचे रतीब टाकत होते.
(क्रमशः)
-------------------------
© भूषण वर्धेकर
-------------------------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet