सेक्रेड गेम्स: ठो-कळे

भारतीय woke लोकांसाठी कंटेंटचं इतकं दुर्भिक्ष्य आहे, की अक्षरश: कोणतीही नवीन कलाकृती मस्त खपून जाते. त्या कलाकृतीला खरोखर चांगलं निर्मितीमूल्य, दर्जेदार लेखन/दिग्दर्शन मिळालं की ती प्रेक्षकांच्या मनात अढळपद मिळवते. ह्यामुळे इतर म्हणाव्या तर बारीक, म्हणाव्या तर गंभीर चुकांकडे सरसकट दुर्लक्ष होतं.
(पुढील लेखात पांढऱ्या ठशांत 'रसभंग' आहेत.)
नेटफ्लिक्सची सेक्रेड गेम्स ही आजकाल अतिशय चर्चेत असलेली भारतीय मालिका. मालिका त्रैभाषिक आहे. मुख्य पात्रांतले संवाद हिंदी/इंग्रजीत असले तरीही कथा मुंबई पोलिसांभोवती फिरणारी असल्यामुळे मराठीचा वापर इंग्रजीपेक्षा जास्त आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने ह्या दिग्दर्शकांची कामगिरी खरंच दर्जेदार आहे. मूळ कथा, लेखक विक्रम चंद्रा ह्यांची आहे. समांतर कथानके अत्यंत वास्तवदर्शी आणि आशयघन आहेत.

मुंबईत एका इमारतीच्या खालून आपल्याला दिसतं, की एक पांढराशुभ्र कुत्रा खाली पडत आहे. तो पडतो. रक्ताच्या थारोळ्यात त्याचं शव दिसतं. बाजूला उभ्या शाळकरी मुलांचा थरकाप उडतो, आणि प्रेक्षकाला कथानकाची एक झलक दिसते. त्यानंतर एन्ट्री होते नवाझुद्दीन सिद्दीकीची. ह्याचं नाव असतं गणेश गायतोंडे. ह्याचे वडील भिक्षुक असतात. साधारण दहा मिनीटांत गणेशचं बालपण, हिंदुत्व, ब्राह्मण्य, निरागसता इ. आटपते. तो अर्थातच मुंबईला जातो. इथे येऊन, हा इसम बरेच उद्योग करतो. कथानकाच्या सुरुवातीच्या दिवशी इन्स्पेक्टर सरताज सिंग (सैफ अली खान) ह्याला फोन करतो. सरताज स्वत:च्या वडिलांचं नाव गणेशकडून ऐकल्यावर गंभीर होतो आणि फोनचं लोकेशन शोधून काढतो, आणि गायतोंडेच्या बंकरसदृश खोलीमध्ये शिरतो. इथे गणेश, 'मी अश्वत्थामा आहे, आणि २० दिवसांत मुंबईला वाचवायचं असेल तर वाचव' असं म्हणून सरताजसमोर आत्महत्या करतो.
सरताज हा एका प्रकरणात खोटी साक्ष न दिल्यामुळे वरिष्ठांच्या दबावाखाली पिचलेला असतो. त्याला अतिमहत्त्वाची केस मिळते, आणि हे हलाहल रिचवून तो स्वत:ची कारकीर्द मुंबई वाचवण्यासाठी सिद्ध होतो.

मग एन्ट्री होते रॉ अधिकारी अंजली माथुरची. राधिका आपटे ह्या व्यक्तीस आर्ट्स-डिग्री-कॉलेजवयीन woke मुलीचं व्यक्तिमत्त्व सोडून बाकी काही साकारता येतं असं वाटत नाही. मालिकेत अनेक पात्रे आहेत. जितेंद्र जोशीने हवालदार काटेकर जीव ओतून साकारला आहे. प्रत्येक बारीकसारीक चेहऱ्यावरचे आविर्भाव त्याने ताकदीने पेश केलेले आहेत. मुळात मराठी असल्यामुळे मराठीचा लहेजा त्याच्या संवादांत उतरलेला आहे.
ह्यानंतर गृहमंत्री बिपीन भोसले (गिरीश कुलकर्णी), डीसीपी पारुलकर (नीरज काबी), झोया मिर्झा (एल्नाझ नरौझी) दीपक 'बंटी' शिंदे (जतिन सर्ना) इत्यादी पात्रे येतात. मुळात वेबसिरीज असल्यामुळे प्रत्येक भागाची रुपरेषा सांगण्यात कथानकाचाच रसभंग होऊ शकतो. कथा इतकी वास्तवदर्शी करायचीच होती, तर मराठीचा लहेजाही पात्रांकडून घोळवून घ्यायला हवा होता. अमराठी पात्रांकडे अत्यंत कमी मराठी संवाद आहेत. पारुलकराचं मराठी कानांना चरे पाडतं. लहान गणेश गायतोंडे साकारणाऱ्या सनी पवारच्या एकमेव वाक्यातही. ह्या सर्व पार्श्वभूमीवर काटेकरची (खरंतर जितेंद्र जोशीची अत्यंत अस्खलित असलेली, पण भूमिकेसाठी बेतलेली) मुंबई-मराठी, मुंबई-हिंदी अत्यंत दर्जेदार आहे. काटेकर आणि सरताजच्या भाषा शिवराळ आहेत, तरीही काटेकर अगदी 'इथला'च वाटतो.

अंजली माथुर हा प्रकार डोळ्यांना त्रासदायक आहे. रॉची अधिकारी ती अगदीच वाटत नाही. एखाद्या महाविद्यालयातील स्टुडंट्स युनिअनची प्रमुख इ. वाटते. तिचा अभिनय अत्यंत ठोकळ्यासारखा झालेला आहे. तिच्या चालण्याबोलण्यात उसना आणलेला आत्मविश्वास भासतो. सरताजचंही तेच. सैफचा 'दिल चाहता है' पासूनचा 'कूल' ॲक्सेंट अजूनही गेलेला नाही. तरीही त्याने बऱ्यापैकी जीव ओतून काम केलेलं आहे. पण शेवटी, त्याला बऱ्याच चित्रपटांतून पाहिलेलं असल्यामुळे इथेही तो ठोकळाच भासतो. नवाझुद्दिन सिद्दीकीचा अभिनय तसाच ठोकळेबाज. शिवाय त्याचा स्वत:चा अत्यंत जड उत्तर प्रदेशी लहेजा त्याला सोडता आला नाही. त्याचे 'अस्वत्थामा', 'बालब्रम्मचारी' इ. उच्चार वडील भिक्षुक असलेल्या ब्राह्मण इसमाचे असतील, हे पटत नाही. मुळात नवाजुद्दिन सिद्दीकीने नवाजुद्दीन सिद्दीकीच साकारलेला आहे इतकंच त्याच्या भूमिकेचं सार आहे.

बंटी आणि बिपन भोसले हे प्रकार उत्तम आहेत. गिरीश कुलकर्णीने टिपीकल मराठी मंत्री उत्तम साकारलेला आहे. त्याचा लहेजा, अभिनय, रुबाब, भिती अतिशय उत्तम. बंटीचं मराठी सदोष असलं तरी ते खपून जातं, कानाला चरे पाडत नाही. जतिन सर्नाने 'म्याटर' करणारा मराठी मुलगा मस्त साकारलेला आहे. ल्यूक केनीचा माल्कमही भाव खाऊन जातो. संगीत आणि टायटल सिक्वेन्स बराच 'गेम ऑफ थ्रोनी' आहे.

कथेबद्दलचा एक मुद्दा म्हणजे टिपीकल हिंदूंच्या (पदोपदी दुखावल्या जाणाऱ्या) भावना दुखावणारी आहे. हिंदू हॉटेलातल्या जेवणात चिकन टाकणे, बंटीने मशिदीबाहेरच्या भिक्षुकांना पान थुंकलेला शिधा देणे, नंतर निरपराध मुसलमानांना ठार करण्याचे आदेश गणेशने देणे, मुसलमान युवकांची होणारी परवड, इ. दाखवून मुद्दाम हिंदूंना डिवचून फूटेज गोळा करण्याचा इरादाही असण्याची शक्यता आहे. टिपीकल हिंदुत्ववादी भाष्य म्हणजे: "असं 'त्यांच्या'बाबतीत होताना दाखवलं असतं तर..." करता यायला बर्राच वाव ठेवलेला आहे.

निष्कर्ष म्हणजे, कथा आणि हिंसा आवडत असेल तर जरुर पहावी. प्रत्येक भागात सरासरी तीन मुडदे पडतात. आठ भागांची मालिका असल्याने एका 'ठ्ठो!' नंतर त्यामागचा संदर्भच कळायचा राहून जातो, किंवा कळेपर्यंत प्रेक्षक तो विसरलेला असतो. ठो आणि कळणे ह्या दोन्ही भागांतले दुवे ठोकळ्याठोकळ्याने, अनेक समांतर कथानकांनी जोडलेले आहेत. ही कथानके आणि त्यायोगाने पूर्ण कथा मात्र वेगाने घडणाऱ्या अनेक गोष्टींमुळे अतिशय रंगीत आणि आकर्षक, वेगवान झालेली आहे, आणि परिणामत: अख्खी मालिका एक रुबिकचा ठोकळा बनलेली आहे. आवडणाऱ्यांना अत्यंत आवडेल, न आवडणाऱ्यांना सरळ किळस येईल.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

योग्य समिक्षा. नेटफ्लिक्सवर आहे म्हणून उगाचच आम्ही लै भारी टाईप च्या लोकांणी केलेला हाईप यापल्याड मूल्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सैफ अली खानच मला ठोकळा वाटतो. विशेषतः गिरीश कुलकर्णी आणि त्याच्या पात्राचा भूतकाळ आला की.

मी जिथे कंटाळून सोडून दिलं तिथवर राधिका आपटेला फार संधीच नव्हती. मनातून उबगलेली पण संधीची वाट बघत असणारी विसंगत व्यक्ती म्हणून ती ठीक वाटली.

पारुलकर हे आडनाव ऐकूनच मजा वाटली. पात्रांना नाही मराठी बोलता आलं तरी ठीक. नाही तर मराठी आहे म्हणून विक्रम गोखले सहन करावा लागेल. पण निदान माणसांची नावं बोंबलणार नाहीत हे पाहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कुलकुल बनियनच्या जाहिरातीत नाचत जातो तो सैफ ?
बाकी श्टोऱ्या राइटर दुबईकडच्या निर्मात्यांचे मीठ खाऊन जागतात अशी वदंता आहे. माती खाल्याशिवाय वाव नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सेक्रेड गेम्सवर माझी निरीक्षणं लिहीन म्हणतो, म्हणून एक वाक्यात उत्तर.
----------------------------
१. मूळ पुस्तक वाचलं नाही.

२. नवाज अजिबात मराठी वाटत नाही. मुंबैत वाढलेला मराठी माणूस जसं बोलेल तसलं हिंदी तो बोलत नाही. असो. शिवाय मुंबईच्या गुन्हेगारीबद्दल आधीच इतकं काही वाचलं आणि पाहिलं आहे की गायतोंडेचा फ्लॅशबॅक भयानक बोअर झाला. पण नेटफ्लिक्सला चित्रपट जगभर दाखवायचा असल्याने + मूळ पुस्तकात हे सगळं आलं असेल म्हणून घातलं असावं. त्यात काहीच नाविन्य वाटलं नाही.
गायतोंडे आणि त्याच्या बाहेरख्यालीपणाचे प्रसंग किळसवाणे आहेत, ते तसेच जाणीवपूर्वक चित्रित केले असतील अशी अपेक्षा. नाहीतर चुकून किळसवाणे झालेले सेक्स सीन्स हा अत्युचुत्येपणा.

३. सैफचा इन्स्पेक्टर आणि काटेकर खरे हिरो आहेत आणि निदान मला तरी ह्या क्यारेक्टर्सबद्दल आपुलकी वाटली. काटेकर मेला तेव्हा वाईटही वाटलं. राधिका आपटेचं क्यारेक्टर मेलं तेव्हा आनंद जाहला.

४. सिरीजचा दुसरा भाग जास्त वेगवान आणि पकड घेणारा असेल अशी आशा आहे.

५. सिरीजचा तिसरा भाग नसेल अशी प्रामाणिक इच्छा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदीच सामान्य मालिका आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

होपलेस मालिका. मुद्दाम काहीतरी बिभत्स दाखवायचेच असा चंग बांधून काढलेली ओवररेटेड मालिका वाटली.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


जितेंद्र जोशीने हवालदार काटेकर जीव ओतून साकारला आहे. प्रत्येक बारीकसारीक चेहऱ्यावरचे आविर्भाव त्याने ताकदीने पेश केलेले आहेत. मुळात मराठी असल्यामुळे मराठीचा लहेजा त्याच्या संवादांत उतरलेला आहे.

जितेंद्र जोशी हा मारवाडी आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाव रोटी खायेंगे चायवालेको को....

मी सुमीत राघवन ह्यालाही 'मूळचा मराठी' म्हणतो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||