पुस्तक परीक्षण - युगंधर

पुस्तक परीक्षण - युगंधर: शिवाजी सावंत (लेखक: निमिष सोनार, पुणे)

2018 साली युगंधर मी एक अतिशय महत्त्वाची कादंबरी वाचली. सलग नाही तरी थोडी थोडी रोज अशी वाचली. "युगंधर" ही शिवाजी सावंत यांची मी वाचलेली पहिलीच कादंबरी. महाभारत, कृष्ण, भगवदगीता आणि श्रीमदभागवत या विषयांवर मला अखंडपणे वाचायला, लिहायला, चर्चा करायला आणि अभ्यासपूर्ण चिंतन करायला आवडते. याच हेतूने युगंधरही वाचली.

ही कादंबरी जवळपास 1000 पानांचा एक ग्रंथच आहे. खरे तर या कादंबरीवर परीक्षण लिहिण्याइतका मी काही खूप मोठा वाचक आणि खूप मोठा लेखक पण नाही तरीसुद्धा वाचक-लेखक हे जसे एक नाते असते तसेच एकाच कादंबरीच्या अनेक वाचकांमध्ये सुद्धा एक अनोखे नाते निर्माण होते, त्या नात्यासाठी मी हे परीक्षण लिहितो आहे.

खरे तर कादंबरीचा आवाका एवढा मोठा आहे की त्यावरचे परीक्षण सुद्धा आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता असते, पण मी शक्यतो तो आवाका खूप मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

कादंबरी लिहितांना लेखकाने केलेले प्रचंड संशोधन आणि अभ्यास हे आपल्याला कादंबरी वाचतांना लक्षात येते. लेखकाचे शब्दांवर असलेले दैवी प्रभुत्व पदोपदी जाणवत राहाते. काही शब्द तर मराठीत लेखकाने स्वतः निर्माण केले आहेत.

जिज्ञासेपोटी भराभर पाने पलटवून वाचून काढणे आणि संपवणे अशा प्रकारची ही कादंबरी नाही. जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक एकेक शब्द, वाक्य, प्रसंग, घटना त्यांचे अर्थ वाचणे आणि त्यावर चिंतन करणे अशा पद्धतीने ही कादंबरी वाचायला हवी. मी तर वाचतांना आवडलेल्या वाक्यांवर आणि संदर्भांवर पेन्सिलीने खुणा केल्या तसेच महत्वाचा प्रसंग सुरू झाल्यानंतर पानाच्या वरच्या बाजूला त टायटले पेनाने लिहिले सुद्धा आहे, नाहीतर वाचून झाल्यावर एवढ्या 1000 पानांमध्ये एखादा विशिष्ट संदर्भ किंवा प्रसंग, घटना आपल्याला पुन्हा अभ्यासायची असेल तर शोधणे अशक्य होऊन जाईल.

यात लेखकाने मृत्युंजयचा फॉरमॅट वापरला आहे. म्हणजे कथानकातील महत्वाच्या व्यक्ती स्वतःच्या तोंडून आपल्याला कथा सांगत जातात. पण मृत्युंजय प्रमाणे युगंधर मध्ये सांगणाऱ्या व्यक्तीची एकदाही पुनरावृत्ती होत नाही. सर्वप्रथम अर्थातच कृष्ण, मग रुक्मिणी, दारूक (कृष्णाचा सारथी), द्रौपदी, अर्जुन, सात्यकी आणि शेवटी उद्धव (कृष्णचा सर्वात जवळचा सखा, अविवाहित, कृष्णाचा चुलतभाऊ म्हणजे वसुदेवाच्या भावाचा आणि कंसाच्या बहिणीचा मुलगा) असे व्यक्ती आपल्याला कथा सांगत जातात.

या नामावलीत कर्ण असू शकला असता पण नाही आहे, कारण लेखकाची आधीच कर्णावर स्वतंत्र मृत्युंजय कादंबरी असल्याने कर्णावर या कादंबरीत जास्त फोकस नाही.

कृष्णाच्या जीवनातील काही भाग, घटना, गोतावळा हा काही वेळेस प्रत्येक पात्राच्या तोंडून परत परत येत राहतो त्यामुळे कुणाला थोडा कंटाळा येऊ शकतो (पण मला आला नाही). ही कादंबरी वाचतांना तुमच्याकडे खूप सहनशक्ती हवी आणि ज्याला कृष्णाबद्दल जाणून घ्यायचे आहे त्याला ही कादंबरी वाचतांना कधीही कुठेही कंटाळा नक्की येणार नाही, हे नक्की!! हे परीक्षण लिहितांना मी कादंबरी समोर घेतलेली नाही, याची नोंद घ्यावी.

कादंबरीचे स्वरूप वर्णनात्मक आणि माहितीप्रद जास्त आहे, भावनात्मक कमी आहे. म्हणजे अशा अशा पद्धतीने असे असे घडत गेले हे फक्त आपल्यासमोर उलगडत जाते. महाभारत काळातील प्रसंग, व्यक्ती, वस्तू, खाण्याचे पदार्थ यांचे जसेच्या तसे आणि हुबेहूब वर्णन चपखल विशेषणं लावून करण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे. कणीदार दह्याच्या कवड्या आणि तो रुक्मिणीच्या हातचा ओदन! काही खाण्याचे पदार्थ कधीच पाहिले नसतांनाही तोंडाला पाणी सुटते ही लेखकाच्या शब्दांची कमाल! घटोत्कचाच्या केसाळ आणि ढेरीआलेल्या पोटाचे वर्णन करतांना लेखक त्याला पालथ्या मारलेल्या काळ्या कढईची उपमा देतो.

लेखकाने प्रस्तावनेतच स्पष्ट केले आहे की, त्याला कृष्णाच्या प्रतिमेला वर्षानुवर्षे चढवलेले चमत्काराचे आणि अतिमानवी कर्तृत्वाचे लेप काढून एक माणूस म्हणून कृष्ण कसा जगला हे दाखवायचे आहे. यात बऱ्याच प्रमाणात लेखक यशस्वी होतो. पण कृष्ण प्रतिमेतून त्याचे देवत्व आणि चमत्कार पूर्णपणे काढणं केवळ अशक्य असल्याने त्याला मानव म्हणूनच दाखवण्याच्या अट्टहासात काही प्रसंगांना लेखक पूर्ण न्याय देऊ शकला नाही असे मला वाटते.

"युगंधर" मध्ये कृष्ण गोकुळात राहातांना पासून ते कंसवधापर्यंत आपण लहानपणापासून ऐकत आलेले जवळपास सर्वच प्रसंग लेखनाने सरळ सरळ गाळून टाकलेत. कालिया मर्दन, यमलार्जुन उद्धार, विविध राक्षसांचा हल्ला, बालकृष्णाच्या मुखांत यशोदेला दिसलेले ब्रह्मांड, करंगळीवर तोललेला गोवर्धन पर्वत वगैरे असे अनेक प्रसंग यात अक्षरशः नाहीत. अगदी कृष्ण जन्माची कथासुद्धा पूर्णपणे वगळण्यात आली आहे!!

असे असले तरी, कंसवधानंतरचे प्रसंग आपली पकड घ्यायला लागतात आणि मग कादंबरी खरी रंगते. मग आपल्याला वाटायला लागते की बरे झाले ते बालपणीचे प्रसंग कापले कारण एरवी ते आपल्याला माहिती आहेतच आणि त्यामुळे कंसवधानंतरच्या अगणित आणि सर्वसामान्यांना माहीत नसलेल्या अनेक प्रसंगांना योग्य वेळ आणि जागा कादंबरीत मिळाली.

मात्र कृष्णाला एकानंगा नावाची बहीण असते तसेच त्याचे आठ काका (नंदाचे भाऊ), एक आजोबा (चित्रसेन) अशा अनेक नाविन्यपूर्ण आणि कधीही न ऐकलेल्या गोष्टी मात्र यात वाचायला मिळतात. राधेला सुद्धा लेखकाने थोडेसेच दाखवले आहे. कृष्णाच्या शरीराचा रंग नेमका कसा होता हे दाखवायला लेखकाने वापरलेली उपमा खूपच जबरदस्त!!

गोवर्धन पर्वताचा प्रसंग तसेच कालिया सापाला मारण्याचा प्रसंग ट्विस्ट करून (बदलून) वेगळाच दाखवण्याचा अभिनव प्रयत्न लेखकाने केला आहे खरं (तो कसा हे कादंबरीतच वाचा) पण त्यामुळे ही कादंबरी "अमिश त्रिपाठी" किंवा "अश्विन संघी" यांच्या "पौराणिक फिक्शन" या प्रकाराकडे वळते की काय असे अधून मधून वाटायला लागते. पण मग कादंबरीचा बाज मधूनच संपूर्णपणे ऐतिहासिक बनून जातो तर कधीकधी स्यमंतक मणी आणि अश्वत्थामाच्या कपाळावरचा मांसल मणी तसेच कृष्णाचे सुदर्शन चक्र हे भाग सत्य आणि कल्पना यांचे बेमालूमपणे मिश्रण बनून येतात. त्यामुळे पौराणिकतेऐवजी फँटसीचा टच कादंबरीला येतो.

कृष्णाला सुदर्शन चक्र परशुरामांकडून भेट म्हणून मिळते जसे एखाद्या सुपरहिरोला एखादी सुपर पावर मिळते तसे! सुदर्शन चक्राव्यतिरिक्त आणखी एकच सुपर पावर कृष्णाकडे असते ती म्हणजे त्याचा संभाषणचतुरपणा आणि त्याद्वारे समस्या सोडवण्याची वृत्ती!! एवढे असूनही कृष्णाला सुदर्शन चक्र मनाप्रमाणे केव्हाही वापरता येत नाही. त्याची कारणं वेळोवेळी पुस्तकात दिली आहेत. एकदा तर अश्वत्थामा कृष्णाला ते चक्र द्वारकेत अरबी समुद्रकिनारी (पश्चिम सागर) मागतो पण ते त्याच्याने उचलले जात नाही.

चमत्कार कृष्णापासून काढण्याच्या आणि त्याला मानव म्हणून प्रस्तुत करण्याच्या नादात द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस कृष्णाने नेमके मग द्रौपदीला वस्त्र कसे पुरवले हे लेखक या कादंबरीत कसे दाखवतो याची उत्सुकता होती. पण लेखकाने नेमक्या या महत्वाच्या बाबतीत मात्र थोडे संदिग्ध लेखन केले आहे आणि तो प्रसंग तुटक तुटक स्वरूपात वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडून आपल्याला ऐकवला आहे. बहुतेक त्याचा संपूर्ण अर्थ वाचकांनीच काढायचा आहे असा लेखकाचा मानस दिसतो. लेखकाला जो सलगपणे अर्थ अपेक्षित आहे मी तो असा काढला आहे: "शाल्व याचे द्वारकेवरचे आक्रमण परतून लावण्यासाठी कृष्ण युद्धात बिझी असतो, त्याच दरम्यान हस्तिनापुरात द्यूत खेळले जाते. मग एक क्षणी कृष्णाचे सुदर्शन चक्र काम आटोपल्यावर कृष्णाच्या बोटात परत न येता त्याच्या उत्तरियासोबत (उपरणे) समुद्रावरून हस्तिनापूरकडे आपोआप उडत जाते. त्या चक्राच्या तेजामुळे घाबरून दु:शासन वस्त्रहरण करायचे थांबवतो आणि त्या चक्रातून ते उत्तरीय द्रौपदीच्या अंगावर पडते आणि सगळे जण काही काळाकरता बेशुद्ध होतात!"

त्याच प्रमाणे लेखकाने महाभारतीय युद्धात जयद्रथ वधाच्या वेळेस कृष्णाने सूर्य झाकला नाही असे दाखवले आहे. (कारण तो मानव आहे ना!) त्याऐवजी त्यादिवशी सूर्यास्तापूर्वी थोड्या वेळाकरता खग्रास सूर्यग्रहण होते याचा फायदा कृष्ण हा "कौरवांनी अर्जुनापासून लपवलेल्या जयद्राथाला बाहेर आणण्यासाठी" करून घेतो असे दाखवले आहे. त्यासाठी आदल्या रात्री कृष्ण एका ज्योतिषाची मदत घेतो असे दाखवले आहे. (उद्या सूर्यग्रहण आहे असे तो ज्योतिषी सांगतो) पण मग असेच जर आहे तर, कौरवांकडे काय ज्योतिषी नव्हता की काय? त्यांचेकडेसुद्धा अनेक बुद्धीवान लोक होते त्यांनीसुद्धा आकाशातील ग्रहस्थितीचा अभ्यास केला असलाच पाहिजे. याचा खुलासा लेखक करू शकत नाही. आणि सूर्यास्तापूर्वी जयद्राथाला वधण्याची प्रतिज्ञा अर्जुन घेतो तेव्हा त्याला थोडीच सुर्यग्रहणाबद्दल माहिती असते?? म्हणजे त्या दिवशी केवळ योगायोगाने अर्जुन त्याची प्रतिज्ञा पूर्ण करू शकला असे मानायचे का?

मी हे जे प्रश्न उपस्थित करतोय ते लेखकाच्या चुका काढण्यासाठी नाही हे लक्षात घ्या. पण लेखकाने कृष्णाला मानव दाखण्यावचा जो अतिरेकी अट्टाहास केला आहे, ते दाखवतांना वाचकांना अपेक्षित असलेले काही गोष्टीचे स्पष्टीकरण लेखक काही वेळेस देत नाही. गीतेचा भाग सांगतांना सुद्धा असेच झाले आहे. कृष्णाचे विश्वरूप टाळले आहे. संजयला दिव्यदृष्टी मिळते हा भाग टाळून गुप्तचर त्याला युद्ध वार्ता सांगतात आणि मग तो धृतराष्ट्रला सांगतो असे दाखवले आहे.

जर श्रीकृष्ण एक मानव म्हणून दाखवला आहे तरीही मग कादंबरीत त्याला पुढे घडणाऱ्या काही घटना आधीच माहिती असल्यासारखे दाखवले आहे (आणि कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान असल्याने ते खरे तर योग्य आहे पण लेखकाला कादंबरीत तसा कृष्ण अपेक्षित नाही आहे).

म्हणूनच मग जन्मानंतर पाचव्याच दिवशी कृष्ण-रुक्मिणीच्या मुलाचे प्रद्युम्नचे अपहरण होते तेव्हा कृष्ण शांतपणे म्हणतो, "योग्य वेळेस येईल तो परत!" अर्थातच नंतर गुप्तचारांकरवी तो शोध मोहीम हाती घेतो पण प्रद्युम्न सापडत नाही. डायरेक्ट मग मोठा झाल्यावरच प्रद्युम्न द्वारकेत परत येतो (तोपर्यंत तो कुठे होता हे आपल्याला नंतर कळतेच!).

त्याचप्रमाणे द्वारका बांधतांना एकही लग्न झालेले नसतांना कृष्ण बरोबर मोजून आठच राणी महाल कसे काय बांधतो? तो जर सामान्य माणूस आहे तर त्याला कसे काय माहिती की यापुढे आपल्याला बरोबर आठच स्त्रियांशी लग्न करावे लागेल?? मग उरलेल्या 16100 राण्यांची (नरकासुराचा बंदीवासात असलेल्या कामरूप स्त्रिया) कथा पुढे येतेच! मात्र त्याच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या नावे कृष्ण द्वारकेतील महालात पायदंड्या (पायऱ्या) बांधत वाढवत जातो हा भाग मजेशीर आणि नाविन्यपूर्ण!! या आठ बायकांशी लग्नाचा प्रवास रुक्मिणीने वर्णन केला आहे.

कृष्णाला आणि रामाला आपण दाढी मिशी वाढलेल्या स्वरूपात कल्पना करू शकत नाही पण कृष्ण आजोबा झाल्यानंतर (प्रद्युम्नच्या मुलाचा) त्याला दाढी मिशी येणे साहजिक आहे असे लेखकाला वाटते कारण तो देव असला तरी मनुष्य रूपातील आहे! यादव वंश नाशाचा भाग योग्यपणे हाताळला गेला आहे पण येथे लेखकाने हे सांगणे टाळले आहे की "चुरा करून शापित मुसळ सांब समुद्रात फेकतो त्याचेच पुढे लोहदर्भ उगवतात!" मात्र लोहदर्भ उगवतात हे मात्र लेखकाला मान्य आहे ज्यामुळे पुढे यादव एकमेकांना ठार मारतात.

कृष्णाच्या जीवनात सांदीपनी आणि घोर अंगिरस हे दोन गुरू येतात. यापैकी घोर अंगिरस हे कालांतराने जैन धर्म स्वीकारतात ही माहिती आपल्याला कळते. तसेच कृष्ण एकदा गोकुळ सोडल्यानंतर पुन्हा तेथे जात नाही. उद्धवला तेथे पाठवत राहतो. पण द्वारका बांधल्यानंतर गुरू सांदीपनी आणि वासुदेव देवकी यांना द्वारकेत ठेऊन घेतो.

कृष्ण बलराम यांच्यातील वाद विवाद योग्य पद्धतीने समोर येतात. तसेच बलराम कौरवांकडे कसा आणि का झुकतो हेही आपल्याला कळते. तसेच सुदामा कृष्ण यांची भेट फक्त दोनदाच (शिक्षण घेतांना आणि पोहे आणतो तेव्हा) होत नाही तर नेहमी द्वारकेत होत राहते हे यातून मला प्रथमच कळले. तसेच द्रौपदी स्वयंवरसाठी कृष्ण सुद्धा स्पर्धक म्हणून आला होता, जर ब्राम्हणवेषधारी अर्जुन तेथे भाग घ्यायला नसता आला तर द्रौपदी कृष्णाची नववी पत्नी झाली असती हे कधीही ना ऐकलेले (मी) यात वाचायला मिळाले तसेच द्रौपदीच्या तोंडून तिच्या पाचही पतींचे स्वभाव वर्णन ऐकणे मजेशीर आणि रंजक वाटते.

काहीही असले तरी, कृष्णाच्या जीवनातील संपूर्ण घटनाक्रम आणि व्यक्ती, नाते, गोतावळा, स्थळे यांची इथ्यंभूत माहिती मिळवायची असेल तर युगंधर कादंबरीला पर्याय नाहीच!!

एकमेवाद्वितीय अशी युगंधर कादंबरी लिहिल्याबद्दल लेखकाचे शतशः आभार!!

- निमिष सोनार, पुणे

#nimishtics
#vachanastu
#yugandhar

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान. कादंबऱी वाचावीशी वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

युगंधर मला कांदबरी वाटलीच नाही, पीएचडीचा महाप्रचंड प्रबंध असावा ज्यावरून शेवटचा हात फिरायचा राहिला आहे असं वाटतं राहिलं, अगदी शेवटपर्यंत.

कदाचित मृत्युंजयच्या लेखकाने लिहीलय त्यामुळे माझ्या अपेक्षा त्याप्रमाणे होत्या पण कांदबरी म्हणून या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.

माहिती ठासून भरलेली आहे. नातीगोती, संदर्भ वाचून घोटाळल्यासारखे होते जे मृत्युंजय वाचताना होत नाही कदाचित कृष्णाचा आवाका जास्त मोठा असल्याने असेल पण एकूणच ह्या कादंबरीचे मनोरंजन मूल्य कमी वाटले. महाभारताचा जेथे विषय येतो तेथेही प्रसंग उत्कंठा वाढवत नाहीत. मृत्युंजय वाचताना त्यातला कृष्णाने कथन केलेला भाग इतक्या वेळा वाचूनही परत वाचावासा वाटतो.

आणखी एक खटकलेली गोष्ट म्हणजे युगंधर मध्ये कथनपद्धत मृत्युंजय प्रमाणे आहे पण युगंधर वाचताना या व्यक्तिरेखेपेक्षा दुसर्‍याने हा भाग सांगितलं असता तर आणखी चांगले झाले असते असे वाटत राहते. असे मलाच वाटते की आणखी कुणाला वाटले आहे? उद्धवाचा कथन भाग अतिशय कंटाळवाणा आहे.

महाभारतात बहुतांश घटनेत/प्रसंगात काहीनाकाही उत्सुकता वाढवणारे, चमत्कृतीजन्य, वैचित्र्य दाखवणारे आहे (अगदी भांडारकरांची महाभारताची चिकित्सक प्रत घेतली तरी, ज्यामध्ये व्यास महाभारत सांगताहेत आणि गणपतीबाप्पा लिहून घेतायत किंवा द्रौपदी वस्त्रहरण हे प्रसंग काढून टाकलेत), पण युगंधर यात कमालीचे कमी पडते.

अवांतर –
भैरप्पांचे पर्व वाचून, भैरप्पांचा या कांदबरीमागचा दृष्टीकोण माहीत असूनही पर्वने महाभारत कथेची सगळी मजाच घालवून टाकल्यासारखे वाटले होते, तसेच काहीसे युगांधर वाचून वाटले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप पूर्वी हे पुस्तक वाचले आहे.
त्या वेळी तरी मला ते चांगले वाटले होते.

यात श्रीकृष्ण फक्तं यशोदेचा कान्हा किंवा राधेचा कृष्ण असे चित्र न रंगवता, एक धुरंधर राजकारणी, पराक्रमी योद्धा अशाही स्वरूपात दिसतो हे विशेष.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
रूक जाना नहीं - तू कही हारके |
काटोंपे चलके मिलेंगे साये बहारके ||