मारवा

कालचीच असावी तशी आठवते ती गोष्ट
फाटकाबाहेर तुझी वाट पहाताना
थकली नव्हती रविवारची आळसावलेली सकाळ
आणि तू आलीस, सावळी-सुंदर,
किरणांचं पाणी प्यालेले ओले केस घेऊन, सुगंधी..
पाकळ्यांवर दवं सावरणाऱ्या शेलाट्या
निशिगंधासारखी.

आणि दिसलीस फलाटावर वाट पहाताना
त्या घुसमट गर्दीतही तुझं हसू तेवत होतंच
तेच आठवतं अजून तुला आठवताना..
पण तुला जाणवले का माझे हात
हासत 'दे टाळी!' म्हणताना कधी?
जेंव्हा हिंडलो निवांत फुटपाथवर पुस्तकं धुंडाळत

असू देत कितीही फसवं आता
पण काही घडलं नसतं का निराळं?
जेंव्हा तू बोलत होतीस भरभरून
जाणाऱ्या क्षणांना थांबवणाऱ्या स्वप्नांबद्दल..
आणि प्रवास थांबूच नये वाटलं होतं
मूक पाषाणशिळांच्या देशातुन जाताना!

जगत शिकताना, झोकून देताना, चुकचुकताना
वळून येतं आभाळ आत कुठेतरी खोलवर
पारा उडालेल्या स्मृतींच्या आरशात जेंव्हा
बघतो तुला अस्पष्ट, धूसर.
जाईल का कधी हा सल तुला न पाहण्याचा?

आहेस तिथे अजून तू उभी
गरब्याच्या रिंगणात मला बोलावू पहाणारी
जरी लय निराळी भुलवते माझ्या पावलांना
आणि रिंगण माझं माझ्यातलं सुटत नाही

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडली. खूप सुंदर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0