मी टू - बाई गं, तू एकटी नाहीस!

२००७ सालची गोष्ट आहे, मी स्टार न्यूजमध्ये (आताची एबीपी) काम करत होते. श्रीलंकेत होणा-या दक्षिण आशियायी देशांच्या माध्यम प्रतिनिधींच्या 'साफमा' या संघटनेच्या वार्षिक बैठकीसाठी मला आमंत्रित करण्यात आले. त्यावेळी मुंबईहून अजून एक पत्रकार येणार होते, पण काही कारणाने त्यांचे येणे रद्द झाले. मी श्रीलंकेला पोचले, त्यावेळी विमानतळावर कोणीही हजर नव्हते. बहुदा मुंबईहून कुणी येणार आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. कसेबसे राहण्याचे स्थळ शोधून काढले, बॅगा टाकल्या आणि शोधत शोधत 'साफमा'च्या गेटटुगेदरला जाऊन पोचले. यजमान देशातर्फे प्रतिनिधींच्या स्वागताचा कार्यक्रम होता. काही क्वायर सिंगर स्टेजवर आले आणि त्यांना फार सुंदर परफॉरमन्स दिला. अजून काही कार्यक्रम झाले, आणि नंतर एक गृहस्थ समोर आले आणि त्यांनी नाचायला सुरुवात केली. शेजारी बसलेल्या बाईंनी सांगितले की हे 'साफमा'चे अध्यक्ष इम्तियाज आलम. आलम साहेबांनी हजर असलेल्या प्रत्येक बाईला हात धरून समोर आणले आणि तिच्याबरोबर ते नाचू लागले. काही बायका नकोनको म्हणत होत्या पण हे साहेब ऐकायला तयार नव्हते. मुंबईहून आलेली मी एकटी पत्रकार. कुणाचीही ओळख नाही. नव्याने ओळख झालेल्या एका पाकिस्तानी महिला पत्रकारासोबत बसले होते. ती माहिती देत होती, नाचाला नाही म्हटले तर त्यांना आवडयाचे नाही. त्यांनी तिलाही नाचायला लावले आणि नंतर मोर्चा माझ्याकडे वळवला. माझ्या चेहऱ्याचा एक प्रॉब्लेम आहे, जे काही मनात असतं, ते चेहऱ्यावर दिसतं. त्यामुळे माझा चेहराच त्यांना नकार सांगून गेला. पण तरीही ते म्हणाले, प्रत्येकीने नाचायला हवं. मी म्हटलं, मला नाचायचं असेल तर मी नाचीन, पण मला हात लावलात तर खबरदार. ते गप्प बसून पुढे गेले. आणि दुसऱ्या बाईचा हात ओढून तिच्याबरोबर नाचायला लागले. आता हा प्रसंग वाचून काहीजण म्हणतील एका नाचाने काही बिघडणार नव्हते. शिवाय सार्वजनिक कार्यक्रम होता. पण माझ्या दृष्टीने माझी इच्छा महत्त्वाची होती. नकोशा पुरूषी स्पर्शांबद्दल माझे अॅंटिना नेहमी कार्यरत असतात. लहानपणी आलेल्या अनुभवांनी आयुष्यभराची जखम केली आहे. पण सक्षम झाल्यानंतर मात्र मी अतिसावध झाले. बायकांच्या अंगचटीला येणा-या इम्तियाज आलमचे वागणे काही चूक आहे, याची जाणीवच कोणाला नव्हती. पत्रकार म्हणून त्याचे नाव मोठे आहे. मग बायकांशी तो कसा वागतो हे दुय्यम महत्त्वाचे अशीच समाजाची भूमिका आहे.

असे प्रसंग अनेक जणींच्या आयुष्यात घडतात. त्यामुळे पुरुष असेच असतात, किंवा स्त्री म्हणजे असे छळ सहन करावे लागतातच असे समज तिच्या मनावर ठसतात. नकोशा स्पर्शांच्या पुढे जाऊन जर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असेल तरी झालेल्या अत्याचाराची वाच्यता करणे हाच गुन्हा आहे, लैंगिक छळ गुन्हा नाही असा आवेश समाजाचा असतो. ही चर्चा करण्याचे कारण म्हणजे गेले वर्षभर जगभरात आणि काही दिवस भारतात 'मी टू' किंवा 'मी सुद्धा' या चळवळीचे उठणारे पडसाद. समाजातल्या बड्या धेंडांनी केलेल्या लैंगिक अत्याचारांविरुद्ध दाद मागण्यासाठी अनेकजणी आज पुढे येत आहेत. अत्याचार झालेल्या घटनांनंतर त्या इतक्या वर्षांनी का रडगाणं गाताहेत, असा प्रतिप्रश्न काहीजण विचारत आहेत. या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर वरील प्रसंग लक्षात घेतले पाहिजेत. लैंगिक छळ हा तुझ्या नशीबाचे भोग आहेत, तुझ्याच वागणुकीत काही तरी चूक आहे, नाही तर असं कसं होईल आशा प्रकारचे ट्रेनिंग समाज तिला देत असतो. काहीजणी या अनुभवातून खमक्या बनतात. जे त्यांना त्रास द्यायला येतात त्यांचा चांगला समाचार घेतात. पण काहीजणी मात्र मनावर घाव झेलत जगतात. जवळच्या व्यक्तींची साथ नसेल तर त्या मनातल्या मनात कुढत राहतात.

गेल्या वर्षी १० ऑक्टोबरला 'न्यू यॉर्कर' मासिकात रॉनन फॅरो या पत्रकाराने हार्वी वाईनस्टीन या हॉलीवूडमधल्या बलाढ्य निर्मात्याने केलेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल एक मालिका चालवली. या मालिकेने हार्वीच्या अत्याचारांना बळी पडलेल्या अनेक बायका एकत्र आल्या. या आधी टाईम्स वर्तमानपत्राच्या दोन पत्रकार जोडी कॅंडर आणि मेगन टूहे यांनी हार्वीच्या विरोधात अनेक महिलांना बलात्कार आणि लैंगिक हिंसेचे आरोप केल्यासंदर्भात बातम्या दिल्या. २००६ साली तराना बर्क नावाच्या कार्यकर्तीने metoo ही संज्ञा सर्वात प्रथम वापरली. हार्वीच्या अत्याचारांच्या विरोधात अलिसा मिलानो या अभिनेत्रीने ट्वीटरवर एक आवाहन केले. ज्या ज्या महिलांना आयुष्यात कोणत्याही प्रकारे लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला असेल तर तिच्या ट्वीटला #metoo असे उत्तर द्या असे ते आवाहन होते. तिच्या ट्वीटला उत्तर म्हणून हजारो महिला आणि पुरूषांनी #metoo ट्वीट केले. काही तासांत 'मी टू' या शब्दांनी लैंगिक अत्याचाराच्या विरोधात एक चळवळ उभी केली. लैंगिक छळांना सहन करणारी तू एकटी नाहीस बाई, मी पण याच छळाचा सामना केला आहे, असं या चळवळीनं इतर स्त्रियांना सुचवलं, त्यांना एकत्र आणलं. ही चळवळ फक्त हॉलीवूडपुरती मर्यादित राहिली नाही. इतर क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलाही आपले अनुभवकथन करू लागल्या. कित्येक प्रकरणांमध्ये अत्याचाराच्या घटना होऊन बराच काळ निघून गेला होता, पण इतका काळ उलटल्यानंतरही त्यांच्या मनावरचे घाव भरले नव्हते. ज्यांच्यावर आरोप झाले होते, त्यांनी इतका काळ उलटलाय असे सांगत आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला पण तो फारच लंगडा ठरला. अत्याचार झाल्यानंतर वर्षानुवर्षे तो प्रसंग रोज जगणाऱ्या बायका पुढे येऊ लागल्यावर त्यांना इतरांनी पाठिंबा दिला.

मी टू

स्त्री घराबाहेर पडून पैसे कमावयला लागली, मोठ्या पदांवर काम करायला लागली म्हणजे ती सक्षम झाली असा समज कित्येकदा किती पोकळ ठरतो, याचे उदाहरण ही चळवळ ठरली. स्त्री खऱ्या अर्थाने सक्षम होण्यासाठी अजून किती संघर्ष करावा लागणार आहे याचा अंदाज या चळवळीमुळे आला. इतकेच नाही तर या चळवळीचे लोण भारतातही येऊन पोचले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत पुढे जायचे असेल तर एक तर आमच्या (लैंगिक ) मागण्यांना शरण जा, अत्याचार झाले तर गप्प बसा अशा तोऱ्यात असलेल्या काही जणांचं पितळ आता उघडं पडतंय. हार्वीविरुध्द आरोप करायला एक नाही तर अनेक महिला समोर आल्या, पुढे कोर्टात काय होईल ते होईल पण त्याच्या मुसक्या बांधायण्यात या बायका यशस्वी ठरल्यात. भारतात आरोपांना सुरुवात झाली आहे, पण नक्की कारवाई कशी होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. लैंगिक अत्याचाराच्या कहाण्या घेऊन पुढे येणाऱ्या महिला फक्त चित्रपटसृष्टीतल्या नाहीत. यात महिला पत्रकारांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. दरवेळेस होणारा छळ शारीरिक नसतो. शेरेबाजीच्या स्वरूपातही असतो. कोर्टाने विशाखा गाईडलाईन्स नेमून दिल्या आहेत. २०१३च्या कायद्यानुसार प्रत्येक कार्यालयात लैंगिक अत्याचारांच्या चौकशीसाठी एक समिती असणं आवश्यक आहे, पण हे नियम सर्रास डावलले जातात. एक से बढ़कर एक हिट सिनेमे बनवणारी कंपनी असो वा सगळ्यात तेज असल्याचा दावा करणारे मिडिया हाऊस, तक्रारदार महिलांना थातूरमातूर उत्तरं देऊन आरोपींना अभय देण्याचे धोरणच या कंपन्यांनी अवलंबले आहे. जर या चळवळीचा परिणाम म्हणून अशा प्रकारच्या तक्रारी गंभीरपणे घेतल्या गेल्या आणि त्याची रीतसर चौकशी झाली, तर फार मोठा फायदा करियरिस्ट मुलींना- महिलांना होईल.

field_vote: 
0
No votes yet

एकता कपूर निर्माती झाली, अधिकाधिक बायांनी मालक भुमिका घ्यायला हवी.
काही अवास्तव मागणी झाल्यास ठाम नकार देण्यास सुरुवात करावी.
१)मी नकार दिला तर काम मिळणार नाही,आणखी शंभरजणी मागे रांगेत उभ्या आहेत याचे दडपण असते त्याचा गैरफायदा घेतला जातो.
२)लग्न झालेल्या पुरुषाच्या संसारात घुसून पहिलीला बाहेर काढण्यासाठी कितीजणी तयार असतात! मराठी मालिकांचा हाच सध्याचा विषय आहे.
-
तुम्ही जसा ठाम नकार दिला नाचायला तसा धिटपणा दाखवावा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीटू चा मुख्य हेतु हा व्हिक्टिम ला तु एकटी नाहीस आम्हालाही अशाच प्रकारचा सामना करावा लागला. तू घाबरु नकोस आम्ही तुझ्या सोबत आहोत. हा दिलासा देण्यासाठी आहे. त्याचा उपयोग हा पुढे अन्य कारणासाठीही होउ लागला आहे.. ते योग्य की अयोग्य हे त्या त्या केसनुसार असावे.इथे प्रत्यक्ष अन्याय सहन करणार्‍यां स्त्रियांची संख्या ही गैरफायदा घेणार्‍यांपेक्षा कितीतरी जास्त आहे असा युक्तिवाद केला जातो. तो खरा देखील आहे. इथे खर तर मुद्दा समाजाच्या लैंगिक व्यवस्थापनेचा आहे. जो लैंगिक वर्तणुकीचे मानसशास्त्र व सामाजिक मानसशास्त्र इत्यादी विषयांशी निगडित आहे. पण त्या दृष्टीने चर्चा माध्यमात होताना दिसत नाही. आता बॅचरल ऑफ सेक्शुअल अ‍ॅडमिन्स्ट्रेशन व मास्टर ऑफ सेक्शुअल अ‍ॅडमिन्स्ट्रेशन अशा अभ्यासक्रमांची गरज आहे
स्त्रीत्वाचे भांडवल विरुद्ध पुरुषत्वाचे वर्चस्व हा लढा कायद्याच्या तांत्रिक पातळीवर चालूच राहील. मी पुर्वीच्या जन्मात गोपी होती व तू कृष्ण होता त्यावेळी तु माझ्याशी गैरवर्तन केले हे आता मला समजतय म्हणून मी तुझ्यावर आता केस टाकते असे सकृतदर्शनी विनोदी वाटणारे मुद्दे भविष्यात आले तर नवल नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

माझ्या नाकाशी तुमचं तलवार फिरवण्याचं स्वातंत्र्य संपतं; तसंच हात फिरवण्याचं स्वातंत्र्यही संपतं; नाकच नव्हे, इतरही कोणत्या अवयवांशी तुमचं स्वातंत्र्य संपतं; एवढा सोपा विषय आहे. यात स्त्री-पुरुष असा प्रश्न नाही. व्यक्तीला पर्सनल स्पेसचं स्वातंत्र्य असतं.

इथे भक्ती लिहिते तसं, कामाच्या संदर्भात अधिकाराच्या ठिकाणी आहात म्हणून तिच्या मर्जीविरोधात तिच्यासोबत नाच करता येणार नाही. काम निराळं आणि व्यक्तीचं खाजगीपणाचं स्वातंत्र्य निराळं. उच्चपदावर असल्यामुळे खालच्या पदावरच्या व्यक्तींच्या खाजगीपणावर आपसूक अधिकार मिळत नाही; तो त्या-त्या व्यक्तीकडून मिळवावा लागतो. जर असा अधिकार मिळाला नसेल तर, मराठीत त्याला संमती असा शब्द आहे, तर अंगचटीला येऊ नका.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खेळाडू मुलींच्या ट्रेनरकडूनही बऱ्याच अवाजवी गोष्टी केल्या जातात हे ऐकून आहे. टीम म्यानेजरच्या 'मर्जित' असल्यास विशेष सुविधा मिळतात. हॅाटेलच्या चांगल्या रुम्सवगैरे. सरकारी सुविधा पोहचवणे हे त्यांच्याच हातात असते त्याचा मोबदला उपटतात. 'वर' रेकमंडेशन गेल्यास निरनिराळ्या सवलती मिळतात. नाहीतर पाणी नसलेल्या टॅायलेटवाल्या जिप शाळेच्या खोल्यांत रवानगी. हे सगळे सिद्ध करणे तक्रार करणे गरीब खेळाडुंच्या आवाक्याबाहेरचे असते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी खरे आहे. अंगचटीला नाही तरी अगदी भरपूर वेळ छातीकडे एकटक पहाणे, काही गलिच्छ कमेन्टस आदिमधुन त्रास दिला जातो. काय विकृती आहे काही कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं की अनेक अधिकारपदावरच्या पुरुषांना या असल्या गोष्टी 'जॊब-पर्क्स' वाटतात. सत्ताधीशांना त्यांच्या पदाबरोबरच त्यांना किती लोकांवर किती प्रकारे सत्ता गाजवता येते यातून खरा आनंद मिळतो. मात्र सत्तेबरोबर, प्रसिद्धीबरोबरच जबाबदारीही येते. या दुधारी हत्याराची दुसरी धार तेज होते आहे हे पाहून बरं वाटतं आहे.

अनेक पुरुष याबद्दल तक्रार करतील. पण तसेही अनेक पुरुष हेल्मेटसक्तीलाही विरोध करताना दिसतात. काही दशकांपूर्वी सीटबेल्टलाही असल्या 'म्यानली' लोकांनी विरोध केला होता. आता चुपचाप वापरतात.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुकतंच वाचलं, मी टू आंदोलन सुरू झाल्यापासून वर्षभरात अमेरिकेत 425 हून अधिक पुरुषांची नावं वर आलेली आहेत. ही वर्तमानपत्रांमध्ये आलेली नावं. तितकी प्रसिद्धी न मिळालेली नावं धरली तर आकडा 800 च्या वर आहे. यातल्या शेकडोंना आपली नोकरी सोडावी लागली, माफी मागावी लागली.

हा लेख मुळापासूनच वाचण्याजोगा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0