टेस्ला आणि इलॉन मस्क - भाग 3.

विसाव्या शतकातली वाटचाल

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकन आणि युरोपीय रस्त्यांवर बिनघोड्यांच्या गाड्या धावायला सुरुवात झाली होती. आणि त्यावेळी गाड्या तेलावर चालवायच्या की इलेक्ट्रिसिटीवर चालवायच्या हा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नव्हता. बहुतांश इंजिनं तेलावर चालणारी होती. पण एडिसनसारख्या संशोधकांनी आपल्या इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या गाड्यांची जाहिरात केलेली होती. 1900 साली अमेरिकेत चालणाऱ्या गाड्यांपैकी 28 टक्के गाड्या इलेक्ट्रिक होत्या. एकदा चार्ज केल्यावर सुमारे 100 किलोमीटर जाणाऱ्या गाड्या अतिश्रीमंतांसाठी उपलब्ध होत्या. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी त्यांच्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सबरोबर वॉशिंग्टन डीसी भागात इलेक्ट्रिक गाड्यांनी प्रवास केल्याबद्दल विकीपीडियात उल्लेख आहे.

पण त्यानंतर पुढच्या काही दशकांत ज्या घटना घडल्या त्यामुळे इलेक्ट्रिक इंजिनाच्या गाड्या मागे पडल्या. एक म्हणजे रस्त्यांचं जाळं सुधारल्यामुळे एकदा पेट्रोल भरलं किंवा चार्ज केली की गाडी किती अंतर जाऊ शकते हे महत्त्वाचं ठरायला लागलं. या बाबतीत आंतर्ज्वलन ( internal combustion) इंजिनाच्या गाड्या सरस ठरायला लागल्या. त्यात टेक्ससमध्ये तेल सापडल्यावर तेलाच्या किमती घसरल्या. आणि तेलावर चालणाऱ्या गाड्या स्वस्त पडायला लागल्या. त्यात इंजिन स्टार्टरच्या शोधामुळे गाडी सुरू करण्यासाठी जी प्रचंड मोठी चावी मारायला लागायची तिची गरज पडेनाशी झाली. जुन्या काळच्या तेलावरच्या गाड्यांचा आवाज प्रचंड व्हायचा. तो आवाज कमी करणाऱ्या मफलर्सच्या शोधामुळेही त्या गाड्यांची किंमत वधारली. 1913 ला फोर्ड कंपनीने आपली मॉडेल टी गाडी बनवायला सुरुवात केली. गाडी बनवण्यासाठी लागणारी प्रक्रिया अतिशय सोपी केली. त्यासाठी कामगारांना दुप्पट पगार देऊ केला, आणि त्यांनाही गाड्या परवडतील इतक्या स्वस्त गाड्या तयार करायला सुरुवात केली. फोर्ड कंपनीच्या गाड्या आंतर्ज्वलन इंजिनावर आधारित होत्या. पेट्रोल भरणं सोपं, इलेक्ट्रिक चार्ज भरणं कठीण. एकदा पेट्रोल भरलं की गाडी दीडदोनशे मैल जाऊ शकते, पण चार्ज भरून जेमतेम शंभर मैल. त्यातही पेट्रोल स्वस्त इलेक्ट्रिसिटी महाग. या सगळ्यामुळे इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या गाड्या मागे पडल्या. त्यात 1930 साली जनरल मोटर्सच्या पुढाकारात आणि स्टॅंडर्ड ऑइल कंपनीच्या सहकार्याने एक नवीन कंपनी स्थापन करून तिने देशभरच्या ट्रॅम कंपन्या विकत घेतल्या. त्या व्यवस्थितपणे मोडून काढून त्यांच्या जागी जनरल मोटर्सच्या बस वापरायला सुरुवात केली.

त्यानंतर 1950 च्या दशकात अमेरिकन सरकारचं धोरणही महाप्रचंड रस्तेबांधणीकडे वळलं. दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास ताजा असल्यामुळे रणगाड्यांचा ताफा एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येण्याजोगे महारस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतुकीचं प्रारूप डावलून कारवर आधारित वैयक्तिक प्रवासाचं प्रारूप स्वीकारलं गेलं. या निर्णयामागे अर्थातच बड्या तीन कंपन्यांचं - जीएम, फोर्ड, क्रायस्लर - लॉबिइंग कारणीभूत आहे असं मानलं जातं.

त्याकाळपासून ते आजतागायत अमेरिकन संस्कृतीवर 'कार' या संकल्पनेचं वर्चस्व राहिलेलं आहे. महायुद्धानंतरच्या दशकात अमेरिकेत आर्थिक वाढ प्रचंड जोरात झाली. इतर महासत्तांना - इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, रशिया - युद्धाचा प्रचंड फटका बसला होता. अमेरिकेने काही सैनिक गमावले, पण त्यांच्या देशाला व तिथल्या उद्योगांना फारशी तोशीस पडलेली नव्हती. किंबहुना युद्धात सरकारने केलेल्या गुंतवणुकीमुळे तेजीच होती. या युद्धग्रस्त सत्तांना उत्पादनं पुरवायला अमेरिका हा एकच देश समृद्ध आणि सबल होता. त्यामुळे अर्थातच त्यांच्या मालाला मागणी होती, आणि त्यातून आलेली सुबत्ता बऱ्याच जनतेपर्यंत पोचली. शहरात काम आणि उपनगरांत बगीचा असलेलं घर हे अमेरिकन स्वप्न अनेकांसाठी प्राप्य झालं. आणि शहर ते उपनगर प्रवासाची गरज कार आणि रस्त्यांनी भागवली.

या भरभराटीमध्ये सत्तरच्या दशकात अडथळा आला. टेक्ससमध्ये सापडलेलं तेल संपण्याची लक्षणं दिसायला लागली. मात्र अमेरिकन गाड्यांची आणि त्यांच्या मालकांची तेलाची मागणी वाढतच होती. घरचं संपलं तर बाहेरून मागवा, आपल्याकडे आहे पैसा, ही भूमिका होती. पण सत्तरच्या दशकात मध्यपूर्वेतल्या तेल पुरवठा करणाऱ्या देशांनी आपली ओपेक ही संस्था स्थापन करून कोणी कोणाला किती भावाने तेल विकायचं यावर मर्यादा आणल्या. थोडक्यात 'आमच्याकडे तेल आहे, तुम्हाला गरज आहे, तेव्हा आम्ही सगळे तेलवाले देश मिळून तुम्हाला किती भावाने द्यायचं हे ठरवू' असं त्यांनी म्हटलं. आणि तेलाच्या प्रत्येक बॅरलमागे मोठ्या प्रमाणात नफा वसूल करायला सुरुवात केली. त्याच सुमाराला जगभराच्या आर्थिक वातावरणात 'स्टॅग्ल्फेशन' निर्माण झालेलं होतं. आर्थिक व्यवस्थेत तुमची इकॉनॉमी जोराने वाढत असेल तर भरपूर नोकऱ्या, सगळ्यांना पैसा आणि किमतींत वाढ - इन्फ्लेशन होणार. याउलट इकॉनॉमी जर घटत असेल तर मालाला उचल नाही, त्यामुळे कंपन्या तोट्यात, त्यामुळे कमी नोकऱ्या, मोठ्या प्रमाणावर बेकारी. ही दोन वेगवेगळी चित्रं आलटून पालटून दिसतात. दोन्हींचे फायदे आणि तोटे असतात. मात्र सत्तरीच्या दशकात या दोन्हीचे तोटेच फक्त दिसत होते. मोठ्या प्रमाणावर किंमतवाढ आणि नोकऱ्यांमध्ये घट हे एकत्र आलेलं होतं. त्याजोडीला आलेल्या तेलाच्या किमतीतल्या वाढीमुळे अमेरिकन सरकारने आपला तेलावरचं अवलंबन कमी करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. त्यातून पुढच्या काही दशकांत प्रत्येक कंपनीने अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आपल्या गाड्यांची सरासरी एफिशियन्सी किंवा माइल्स पर गॅलन किती असावेत यावर बंधनं घातली गेली. सत्तरीच्या दशकांत विकल्या जाणाऱ्या गाड्या या गॅलनला 12-15 मैल (लीटरला 5-7 किमी) द्यायच्या. आताच्या गाड्या सर्रास त्याच्या दुप्पट मायलेज देतात.

नव्वदीच्या दशकात पुन्हा एकदा अमेरिकेत सुबत्तेचा पूर आला. सेमिकंडक्टर आणि त्यातून येणारी मोबाइल/इंटरनेट क्रांती त्याच्या मुळाशी होती. त्याच सुमाराला पेट्रोलच्या किमतीही प्रचंड उतरलेल्या होत्या. त्यामुळे लोकांनी पुन्हा 'गॅस गझलर्स' किंवा पेट्रोल पिणाऱ्या महाकाय एसयुव्ही घ्यायला सुरुवात केली. इंधनाची बचत करण्यापेक्षा आपल्या गाडीचा आकार, एकंदरीत ऐसपैसपणा आणि आराम स्वीकारण्याकडे लोकांचा कल होता. 2001 आणि 2008 साली आलेल्या आर्थिक मंदीमुळे यात प्रचंड फरक पडला.

यादरम्यान इलेक्ट्रिक इंजिनांचं काय चालू होतं? थोडक्यात उत्तर असं की फारशी प्रगती नव्हती. एका चार्जवर किती मैल जाऊ शकते, चार्ज करायला किती वेळ लागतो, आणि जर लांबचा प्रवास करायचा असेल तर वाटेत चार्ज करण्याची सोय काय - या प्रश्नांना पुरेसं चांगलं उत्तर नव्हतं. बॅटऱ्या जड असायच्या, त्यामुळे जास्त मैल जाणारी गाडी तयार करायची तर ती जास्त जड होणार - त्यामुळे ती कमी मैल जाणार. तसंच ती चार्ज करायला आपल्या घरची वीज पुरेल का, हीदेखील मर्यादा होती. त्यामुळे जेमतेम शंभर-सव्वाशे मैल जाऊ शकणाऱ्या गाड्या तयार होत्या. मात्र सामान्य माणसासाठी त्या फारशा उपयुक्त नव्हत्या. शहरांच्या बसेससाठी किंवा काही डिलिव्हरी कंपन्यांच्या फ्लीटसाठी वगैरेच हा पर्याय उपयुक्त होता. काही शहरांनी, राज्यांनी हा उपाय अवलंबलाही. पण एकंदरीत वाहतुकीच्या दृष्टीने हा केवळ एक दशांश, शतांश टक्क्यांचा मामला होता.

मात्र विसाव्या शतकाच्या शेवटाला आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातील गोष्टी बदलायला लागल्या. एकतर 2001 साली अमेरिकेवर हल्ला झाला, आणि त्याच सुमाराला मार्केट कोसळून मंदी आली. त्याच सुमाराला तेलाच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या. आणि पर्यावरणाबाबतचा विचार 'निव्वळ प्रदूषण' पासून बदलून 'कार्बन डायॉक्साइडपोटी होणारं ग्लोबल वॉर्मिंग' इथपर्यंत आलेला होता. यातून टेस्लाने इलेक्ट्रिक गाड्या तयार करण्यासाठी परिस्थिती कशी निर्माण झाली, त्यातून काय निष्पन्न झालं हे पुढच्या भागात पाहू.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

बॅट्ऱ्यांची डेन्सटी किती आहे? शंभर किमी जाणारी पावर साठवणारी बॅट्री किती जड आणि मोठी आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बॆटरीबाबत एक स्वतंत्र लेख येईलच, पण थोडक्यात उत्तर देतो. टेस्लाच्या गाड्यांमध्ये सध्या ज्या लिथियम आयन बॆटरी वापरल्या जातात त्यांचं वजन सुमारे 300 ते 500 किलोच्या आसपास असतं. मध्यम आकाराची गाडी त्यावर साधारण 200 ते 300 मैल जाते. साधारण हिशोब किलोला दोन किलोमीटर. जसजशी तांत्रिक प्रगती होत जाईल तसतसे हे आकडे सुधारतील, पढच्या पाचेक वर्षांत सुमारे दीडपट ते दुप्पट. तसंच किंमतही पुढच्या काही वर्षांत साधारण निम्मी होईल असा अंदाज आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इन्व्हर्टरमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेड ॲसिड बॅटऱ्या साधारण १५० ॲम्पिअर-अवर क्षमतेच्या असतात. त्याउलट स्मार्टफोनमध्ये हल्ली सर्रास ४ ॲम्पिअर अवर क्षमतेच्या बॅटऱ्या असतात. लेड ॲसिड बॅटरीची क्षमता स्मार्टफोन बॅटरीच्या केवळ ३७.५ पट असते पण आकार मात्र खूपच जास्त असतो.

पण लेड ॲसिड बॅटरी २० ॲम्पिअरचा करंट सहज देऊ शकते. तशी स्मार्टफोनमधली लिथिअम बॅटरी देऊ शकत नाही. परंतु बऱ्याच लिथिअम बॅटऱ्या समांतर जोडून हा प्रश्न सोडवता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

संक्ल्पना म्हणून योग्य आहे पण प्रत्यक्षात एवढं सोपं नाही ते. दोन्ही ठिकाणाच्या ड्यूटी सायकल्स आणि बॅटरीकडून असणऱ्या अपेक्षा वेगळ्या आहेत. त्यात पुन: चार्जिंग-डिस्चार्जिंग करंट्स, बॅटरीचं तापमान वगैरे ढीगभर गोष्टी बघाव्या लागतात. पूर्ण बॅटरीची लाईफ सायकल बघावी लागते. तुम्ही टेस्लाच्या बॅटरीची कूलिंग सिस्टीम बघा. इंजिनाला लागत नाही एवढं कूलिंग बॅटरी पॅकला लागतं. कारण इंजिनाचं तापमान वाढलं तर फार फार तर इंजिन सीझ होऊन बंद पडतं. बॅटरीचं तापमान एका मर्यादेबाहेर गेलं तर बॅटरीचा स्फोट होऊ शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम लेख. पार्श्वभूमी मस्त मांडलेली आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. खास घासकडवी टच अर्थात आकडेवारी तिचा विशेष इंतजार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जगातला पहिला इलेक्ट्रिफाइड रस्ता
हे मला आज w.a.वर प्राप्त झालं. पण बातमीची तारीख 12 एप्रिल 2018 दिसतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

URL डकलीच नाही ! मी नेटवर शोधून टाकली होती. (insert keli hoti)
https://www.theguardian.com/environment/2018/apr/12/worlds-first-electri...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त लेखमाला गुरुजी,
येऊ द्या जोरात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्कबद्दल फारसं बरं मत नाही. परंतु लेखमाला चांगली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखमाला आवडते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0