Cold Blooded - १

रात्रीचा एक वाजून गेला होता....

रात्रीच्या अंधारात एक कार एनएच ३ वरुन संथगतीने जात होती. एका बाजूला डोंगराचा कडा, दुसरीकडे खोल दरी, अरुंद आणि वळणा-वळणाचा रस्ता आणि रात्रीची वेळ असल्यामुळे नॅशनल हायवे असूनही वाहतूक अगदी तुरळकच वाहतूक सुरु होती. परंतु ती कार मात्रं गस्तं घातल्यासारखी त्या परिसरातून फिरत होती. गेल्या अर्ध्या - पाऊण तासात ७ - ८ किमीच्या पट्ट्यात त्या कारच्या दोन चकरा झाल्या होत्या. हायवेवरुन १० - १२ मिनिटं एका दिशेने जावं आणि मग उलट दिशेला वळून पुन्हा मागे यावं असा प्रकार सुरु होता. कारचा ड्रायव्हर रस्ता तरी विसरला असावा किंवा कोणत्या तरी गोष्टीचा शोध घेत असावा अशी कोणाचीही समजूत झाली असती.

सुमारे तीन ते चार खेपा मारल्यावर एका वळणाच्या आडोशाला कड्याला जवळजवळ खेटूनच कार उभी राहिली. कारच्या ड्रायव्हरने हेडलाईट आणि कारचं इंजिन बंद केलं आणि काही मिनिटं तो तसाच गुडूप अंधारात बसून राहिला. हायवे अगदी सुनसान असल्याची खात्री झाल्यावर तो खाली उतरला. आजूबाजूला कोणीही नाही याची खात्री झाल्यावर त्याने कारचं मागचं दार उघडलं आणि आत नजर टाकली. एव्हाना त्याचे डोळ अंधाराला चांगलेच सरावले होते. कारच्या मागच्या सीटवर आडव्य झालेल्या मानवी शरीराची बाह्याकृती त्याला स्पष्टं दिसत होती. अंधारात चाचपडत त्याने त्या आकृतीचे दोन्ही हात शोधून काढले, पण हाताला स्पर्श होताच एकदम चटका बसावा तसा त्याने हात मागे घेतला! खरंतर तो स्पर्श त्याला अपेक्षितच होता, पण तरीही क्षणभर त्याचा श्वास जड झाला होता!

त्या आकृतीचे हात अगदी थंडगार पडले होते!
कारच्या मागच्य सीटवर एक मृतदेह होता!
तो देखिल फारतर पंचवीशीच्या एका तरुणीचा!

मनाशी हिम्मत करुन पुन्हा त्याने मृतदेहाचे दोन्ही हात धरले आणि तो मृतदेह बाहेर ओढायला सुरवात करणार तोच....
वळणावरुन येत असलेल्या ट्रकचा आवाज त्याच्या कानी आला!
क्षणार्धात त्याने मागचं दार बंद केलं आणि दुसर्‍या क्षणी ड्रायव्हर साईडचं दार खेचून तो ड्रायव्हींग सीटवर बसला....
कारचं इग्निशन बंद न केल्याबद्दल त्या क्षणीही त्याने मनोमन स्वत:ची पाठ थोपटली!
फर्स्ट गिअर टाकून तो तिथून निघण्याच्या तयारीत होता, पण त्याच्या नशिबाने तशी वेळच आली नाही!
त्याच्या कारची दखलही न घेता ती लक्झरी बस पुढे निघून गेली!

त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला पण लगेच खाली उतरण्याची घाई केली नाही. पाच मिनिटांनी तो पुन्हा खाली उतरला आणि कारचं मागचं दार उघडून त्याने त्या तरुणीचा मृतदेह बाहेर काढला! अर्थात तिचा मृतदेह सरळ उभा राहणं शक्यंच नव्हतं त्यामुळे तिच्या कमरेभोवती हात टाकून आधार देत त्याने तो कसाबसा उभा केला आणि तिचा एक हात आपल्या खांद्यावर घेतला. मृतदेहाच्या स्पर्शाने आणि इतक्या निकटच्या सान्निध्याने त्याच्या अंगावर काटा आला होता, पण त्याचा इलाज नव्हता! एखादं प्रेमी जोडपं हायवेवरच्या एकांतात फिरत आहे अशीच दुरुन पाहणार्‍याची समजूत झाली असती. त्याने कारमधून तिचा मृतदेह बाहेर काढतानाच त्याच्या शेजारच्या सीटवर असलेली व्यक्ती ड्रायव्हींग सीटवर सरकली होती.

"संभलकर!" आवाजावरुन ती एक स्त्री आहे हे सहज कळत होतं.

"मी परत येईपर्यंत हायवेवरच राऊंड मारत राहा! मी आलो की टॉर्चने सिग्नल देईन!"

मृतदेहाला आधार देत त्याने हायवे क्रॉस केला आणि बारीक टॉर्चच्या प्रकाशात दरीचा उतार उतरण्यास सुरवात केली. आदल्या दिवशी भर दुपारी तो या जागेवर आला होता तेव्हा खाली उतरण्यास त्याला काहीच त्रास झाला नव्हता, पण रात्रीच्या अंधारात आणि ते देखील एका मृतदेहाचा संपूर्ण भार अंगावर घेत उतरणं सोपं नव्हतं! त्याच्याजवळ चांगला पॉवरफुल टॉर्च होता, पण हायवेवरुन जाणार्‍या एखाद्या गाडीतल्या लोकांचं टॉर्चच्या प्रखर प्रकाशाकडे लक्षं जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती! त्यामुळे तो टॉर्च न वापरता अगदी थोडासा प्रकाश देणार्‍या लहानशा टॉर्चचा उजेडात उतरण्याखेरीज पर्याय नव्हता! त्या अर्धवट प्रकाशात झाडीझुडुपातून उतरताना किमान दोन ते तीन वेळा तो पाय घसरुन खाली आपटला होता. एकदा तर त्या तरुणीचा मृतदेह त्याच्यावर पडल्याने त्याची सगळी हाडं सडकून निघाली होती. मृत तरुणीला त्याने शिव्यांची लाखोली वाहीली होती!

सुमारे वीस - पंचवीस मिनिटांनी ठेचकाळत, धडपडत तो त्या मृतदेहासह त्या विशिष्ट जागी पोहोचला! सुटकेचा नि:श्वास टाकत बारीक टॉर्चच्या प्रकाशात त्याने आसपासचा परिसर नीट तपासून पाहिला. आदल्या दिवशी दिवसाच्या प्रकाशात अगदी निरुपद्रवी भासणारे तिथले दगड रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात अक्राळविक्राळ आणि भयानक भीतीदायक दिसत होते! तिथे काही धोका नाही याची खात्री पटल्यावर त्याने तो मृतदेह ओढत त्या दगडांमध्ये आणून टाकला. परत फिरण्यापूर्वी त्या दुर्दैवी तरुणीच्या जीन्सचे खिसे तपासून पाहण्यास तो विसरला नाही! तिची ओळख पटेल असा एकही कागद किंवा एकही वस्तू मागे राहिलेली नाही याची खात्री होताच तो त्या दगडांमधून बाहेर पडला आणि टॉर्चच्या उजेडात त्याने चढ चढण्यास सुरवात केली.

सुमारे दहा-बारा मिनिटातच तो हायवेवर पोहोचला आणि रस्ता क्रॉस करुन त्याने आपली कार पार्क केली होती ती जागा गाठली. त्याला फार वेळ वाट पाहवी लागली नाही. पाच - दहा मिनिटांतच अगदी हळूहळू येणारी कार पाहताच त्याने हातातल्या टॉर्चने तिला इशारा केला. यू टर्न मारुन कार त्याच्या समोर उभी राहिली. तो कारमध्ये बसताच कार हायवेवरुन धावू लागली.

"सगळं व्यवस्थित झालं?" रस्त्यावरची नजर न हटवता सफाईदारपणे टर्न घेत तिने विचारलं.

"हो! आता सरळ हॉटेलवर चल ! कोणाला काही समजण्यापूर्वी आपल्याला इथून निघावं लागेल!"

"हॉटेलवाल्यांनी तिच्याबद्दल विचारलं तर?"

"तिला अचानक दिल्लीला जावं लागलं! दुसरा काही इलाज नाही म्हणून आपण तिला एअरपोर्टवर सोडून आलो!"

********

स्कायलार्क एंटरप्रायझेसचे सर्वेसर्वा महेंद्रप्रताप द्विवेदी मेकर्स टॉवर इथल्या आपल्या आलीशान ऑफीसमध्ये एका फाईलमध्ये डोकं खुपसून बसले होते. द्विवेदी सुमारे पंचावन्न वर्षांचे असावेत. त्यांचं व्यक्तीमत्वं अत्यंत प्रभावी होतं. प्रथमदर्शनीच त्यांची समोरच्यावर छाप पडत असे. त्यांचा दुसरा प्लसपॉईंट होता तो म्हणजे एक किंव जास्तीत जास्तं दोन भेटीत समोरच्या माणसाला ओळखण्याची कला त्यांना साधलेली होती! गेल्या पंचवीस - तीस वर्षांत त्यांची अफाट मेहनत आणि व्यावसायिक कौशल्य याचा परिणाम म्हणून स्कायलार्क इम्पोर्ट - एक्सपोर्टच्या क्षेत्रातली एक अग्रगण्य कंपनी म्हणून प्रस्थापित झालेली होती.

द्विवेदी फाईलमध्ये गर्क झालेले असतानाच त्यांच्या टेबलवरचा फोन वाजला. क्षणभर त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. अत्यंत इमर्जन्सी असल्याशिवाय तासभर आपल्याला डिस्टर्ब करु नये असं त्यांनी आपल्या सेक्रेटरीला बजावलेलं होतं, पण जेमतेम पंधरा-वीस मिनिटांतच त्यांचा फोन वाजला होता!

"हॅलो! व्हॉट इज द मॅटर जेनी?" द्विवेदींनी त्रासिक सुरात प्रश्नं केला.

"सर, दिल्लीहून मि. जवाहर कौल यांचा कॉल आला आहे! तुम्ही बिझी आहात असं मी त्यांना सांगितलं सर, पण त्यांनी ऐकलं नाही! त्यांना अत्यंत अर्जंटली तुमच्याशीच पर्सनली बोलायचं आहे आणि तुमच्यादृष्टीने ते फार महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं म्हणून...."

"काय नाव म्हणालीस?" द्विवेदींनी पुन्हा खात्री करुन घेण्यासाठी विचारलं.

"मि. जवाहर कौल! ही इज वेटींग ऑन द अदर लाईन सर! शुड आय टेल हिम टू कॉल....."

"कनेक्ट हिम अ‍ॅन्ड यू कॅन हँग अप! नो नीड टू टेक एनी नोट्स फॉर धिस!"

"शुअर सर!"

द्विवेदींनी फोन खाली ठेवला तेव्हा ते कमालीचे गंभीर झाले होते!
जवाहर कौल....
त्यांच्या मस्तकात संतापाची तिडीक निर्माण करण्यास ते नावच पुरेसं होतं!
पण.....
इतक्या वर्षांनी जवाहर कौलने आपल्याला फोन का केला असावा?

काही सेकंदातच द्विवेदींच्या टेबलवरचा दुसरा फोन वाजला.

"हॅलो!"

"सर मि. कौल इज ऑन लाईन!"

"थँक्स जेनी! यू कॅन ड्रॉप ऑफ नाऊ!"

जेनीने आपल्या डेस्कवरचा कॉल कट् केल्याचा आवाज द्विवेदींच्या कानात शिरला.

"महेंदरबाबू, मी जवाहर कौल बोलतोय! तुम्ही ओळखलं असेलच!"

"जवाहर कौल!" द्विवेदींच्या स्वरातला संताप लपत नव्हता, "व्यवस्थित ओळखतो तुला मी जवाहर! तुझ्यामुळे मला जे काही भोगावं लागलं आहे त्याचा मला या जन्मी तरी विसर पडणार नाही! तुला जे काही बकायचं आहे ते लवकर बक! मला जास्तं वेळ नाही!"

"महेंदरबाबू, मेघना मरण पावली! आज आठ दिवस झाले!"

मेघना! द्विवेदींच्या नजरेसमोर क्षणभरच तिचा चेहरा तरळला. मेघना द्विवेदींची पत्नी होती! याच जवाहर कौलने तिला आपल्या नादी लावून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले होते! एक दिवस त्यांचं घर सोडून ती त्याचा हात पकडून बिनदिक्कत निघून गेली होती! त्याची परिणीती त्यांचा डिव्होर्स होण्यात झाली होती!

"मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे?" द्विवेदींनी तीक्ष्ण सुरात विचारलं, "ज्या दिवशी तुझ्या नादी लागून तिने माझं घर सोडलं होतं, त्याच दिवशी माझ्या दृष्टीने ती मेलेली होती! एवढंच कळवण्यासाठी फोन केला असलास तर, नाऊ गेट लॉस्ट अ‍ॅन्ड डोन्ट एव्हर बॉदर मी अगेन!"

"एवढी घाई चांगली नाही महेंदरबाबू!" जवाहर थंडपणे म्हणाला, "मेघना तर आता गेलीच, पण तिच्या अशा अचानक मृत्यूमुळे माझ्यावर एक रिस्पॉन्सिबिलीटी येऊन पडली! आता तसं म्हटलं तर मी ती व्यवस्थित निभावू शकेन, पण माझ्यापेक्षा तुम्ही ती रिस्पॉन्सिबिलीटी घ्यावी असं मला प्रामाणिकपणे वाटलं म्हणून...."

"तुला जे काही बोलायचं ते लवकर बोल, फालतू पाल्हाळ नको! कसली रिस्पॉन्सिबिलीटी? आणि मी का घ्यावी?"

"महेंदरबाबू, इतका राग चांगला नाही! अती रागामुळे माणसाचं ब्लडप्रेशर वाढतं! आणि तुम्हाला काही झालं तर मला जे बोलायचं आहे ते मी कोणाशी बोलू शकणार? तेव्हा...."

"शट अप! जे काही बोलायचं ते पटकन बोल अदरवाईज मी फोन ठेवतो आहे!"

"रोशनी आठवते का तुम्हाला महेंदरबाबू?"

रोशनी!
द्विवेदींच्या मनात एकदम खळबळ उडाली....

रोशनी त्यांची एकुलती एक मुलगी! जवाहरच्या नादी लागून मेघना घर सोडून गेली तेव्हा रोशनी जेमतेम दीड वर्षांची होती! डिव्होर्स झाल्यावर रोशनीची कस्टडी मेघनाला देण्यात आली होती आणि जवाहरच्याच कट-कारस्थानांमुळे तिला भेटण्यासही कोर्टाने द्विवेदींना मनाई केली होती! गेल्या वीस वर्षांत रोशनी कुठे आहे याबद्दल त्यांना काहीही कल्पना नव्हती!

"रोशनी? रोशनी कुठे आहे? कशी आहे?" द्विवेदींनी आवाज शक्यं तितका शांत ठेवण्याचा प्रयत्नं करत विचारलं.

"सबूर! इतकी घाई काय आहे महेंदरबाबू? रोशनी अगदी ठीक आहे! तिच्यासंदर्भातच तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं!"

"काय बोलायचं आहे तुला? आणि माझी मुलगी कुठे आहे?"

"असं पहा महेंदरबाबू, मेघना तर आता गेली! रोशनी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे! तिचं एज्युकेशन पूर्ण झालं की तिने पुढे काय करावं हा सर्वस्वी तिचा प्रश्नं आहे! गेली वीस - बावीस वर्ष मी रोशनीची पूर्ण जबाबदारी घेतली होती, पण यापुढे मला ते जमेल असं वाटत नाही! तेव्हा यापुढे तुम्ही तिला मुंबईला तुमच्या घरी घेऊन जावं आणि मला मोकळं करावं असं मला वाटतं! कितीही झालं तरी ती शेवटी तुमचीच मुलगी आहे!"

द्विवेदींनी दीर्घ नि:श्वास सोडला. अखेर इतक्या वर्षांनी का होईना, पण त्यांची रोशनीशी भेट होणार होती!

"रोशनी कुठे आहे? मला तिचा अ‍ॅड्रेस दे! मी तिला मुंबईला घेऊन येईन!" द्विवेदी अधीरतेने म्हणाले.

"एवढी काय घाई आहे महेंदरबाबू? मान्यं आहे तुम्हाला रोशनीला भेटायची घाई झाली आहे! तुम्हाला रोशनीचा पत्ता हवा आहे ना? मी देईन! पण त्या बदल्यात तुम्ही मला काय देऊ शकता?"

"तुला काय हवंय?" द्विवेदींनी आश्चर्याने विचारलं.

"महेंदरबाबू, तुमची बायको आणि मुलगी मी वीस - बावीस वर्ष सांभाळली...."

"त्याची किंमत तू पुरेपूर वसूल केली आहेस जवाहर! आणि मेघना आणि रोशनीचा खर्च म्हणशील तर दर महिन्याला मेघनाला माझ्याकडून पोटगी मिळत होती!"

"महेंदरबाबू, तुमच्याकडून मिळणारी पोटगी त्या दोघींना पुरत असेल असं तुम्हाला वाटतं तरी कसं? मेघनाचे राजेशाही शौक आणि रोशनीचं शिक्षण आणि हॉस्टेलची फी यासाठी ते पैसे पुरे पडणं शक्यं तरी होतं का? शिवाय मेघना कॅन्सरने गेली. तिच्या ट्रिटमेंटसाठी जो काही खर्च आला तो मी केला, तेव्हा हा सगळा हिशोब आपण आधी पूर्ण करावा असं....."

"किती पैसे हवेत तुला?"

"असं बघा, वीस - बावीस वर्षांपासून मेघना - रोशनीला सांभाळणं, मेघनाचे सगळे नखरे, रोशनीचं शिक्षण आणि मेघनाचं आजारपण याचा सगळा हिशोब केला तर मला तुमच्याकडून किमान सत्तर लाख येणं आहे! परंतु मी तुम्हाला थोडासा डिस्काऊंट देतो! मला एकरकमी साठ लाख द्या आणि रोशनीच्या जबाबदारीतून मोकळं करा! साठ लाख माझ्या अकाऊंटला जमा झाले की मी तुम्हाला रोशनीचा पत्ता देईन! त्यानंतर मी पुन्हा कधीही तुम्हाला त्रास देणार नाही!"

"आणि मी तुला पैसे दिले नाहीत तर?"

"तुमची मर्जी! तुम्ही पैसे दिले नाहीत तर मी ते रोशनीकडून वसूल करुन घेईन एवढं लक्षात ठेवा! आणि व्याजासकट सगळे पैसे वसूल केल्याखेरीज मी तिला सोडणार नाही! आता दिल्लीसारख्या ठिकाणी एवढे पैसे फेडण्यासाठी एखाद्या तरुण मुलीला काय करावं लागेल हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही! तेव्हा काय करायचं हा चॉईस मी तुमच्यावर सोडतो आहे!"

"शटअप यू बास्टर्ड!" द्विवेदी संतापाने गरजले, "शेवटी तू तुझं खरं स्वरुप दाखवलंसच! अर्थात तुझ्यासारख्या हलकट आणि नीच माणसाकडून मला दुसरी काही अपेक्षा नव्हतीच! तुला पैसे पाहिजेत ना? ठीक आहे! पण रोशनीच्या केसाला जरी धक्का लागला तर मी तुला कायमची अद्दल घडवीन एवढं मात्रं लक्षात ठेव! बोल तुला कधी आणि कुठे पैसे द्यायचेत ते?"

"महेंदरबाबू, आज मार्चची ५ तारीख आहे. असं करा, आणखीन पंधरा - वीस दिवसांनी तुम्ही दिल्लीला या आणि तुमच्या हाताने मला साठ लाखाचा चेक किंवा डीडी द्या! तो कॅश झाला की रोशनीचा पत्ता तुम्हाला मिळेल! मी पुढच्या आठवड्यात पुन्हा तुम्हाला फोन करेन! आणि एक लक्षात ठेवा महेंदरबाबू, मला फसवण्याचा किंवा पोलीसांकडे जाण्याचा प्रयत्नंही केलात तर रोशनी....."

छद्मीपणे हसत जवाहरने फोन कट् केला!

********

"मंडी पोलीस स्टेशन...."

"साब...."

"अ‍ॅक्सिडेंट? कहां?"

"....."

"ठीक है! आम्ही येतो...."

सब् इन्स्पे. देवप्रकाशनी फोन ठेवला आणि आपले वरिष्ठ अधिकारी इन्स्पे. खत्रींचं ऑफीस गाठलं.

"सरजी, हाववेवर एक अ‍ॅक्सिडेंट झाल्याची खबर आली आहे! मी पाहून येतो!"

खत्रींनी काही न बोलता होकारार्थी मान हलवली. देवप्रकाश आपल्याबरोबर चार कॉन्स्टेबलना घेवून हायवेच्या मार्गाला लागले. सुमारे तास - दीड तासाने खत्रींच्या टेबलवरचा फोन वाजला.

"हॅलो....."

"सरजी, मै देवप्रकाश....."

"क्या?....." देवप्रकाशनी फोनवर सांगितलेली बातमी ऐकून खत्री उडालेच!

हायवेवर झालेल्या अपघाताची चौकशी करताना एक वेगळीच भानगड समोर आली होती!

हायवेला लागून असलेल्या दरीच्या उतारावर एका घळीत एक मानवी सांगाडा पडलेला आढळून आला होता!

********

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचतो आहे. पुढचे भाग लवकर येऊदेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.