2018 बुद्धिबळ विश्व विजेतेपद स्पर्धा
विश्वविजेतेपदासाठीची स्पर्धा लंडनमध्ये सुरू झालेली आहे. त्यानिमित्ताने हा धागा. कार्लसेन विरुद्ध फाबियानो कारुआना.
प्रत्येक डावासाठी स्वतंत्र धागा काढण्यापेक्षा, एकाच धाग्यात सर्व डावांविषयी एकापाठोपाठ माहिती देण्याचं ठरवलेलं आहे. तसंच खेळाच्या नुसत्या मूव्ह्ज मांडण्यापेक्षा, माझ्या काही आवडत्या समालोचकांनी तयार केलेले व्हीडियो सादर करणार आहे. त्याचा फायदा असा की ही खेळी का केली, या खेळीऐवजी दुसरी केली असती तर काय झालं असतं, सामान्यांना उघड चांगल्या वाटणार्या खेळ्यांचे काय तोटे आहेत वगैरेंबाबत ते बर्यापैकी खोलात जाऊन उत्तरं देतात.
डाव क्र. 1
पहिल्या डावात काळ्या सोंगट्या घेऊन कार्लसेनने पहिल्या पंधरावीस खेळींनंतर डावावर पकड जमवली होती. मात्र नेमक्या वेळी पुरेशी आक्रमक खेळी न करता आल्यामुळे कारुआनाला डाव सावरता आला. आणि डाव बरोबरीत सुटला.
दुसर्या डावातही काळ्या सोंगट्यांचीच, यावेळी कारुआनाची, किंचित सरशी होत होती. मात्र हाही डाव बरोबरीत सुटला. आता दोघांची 1-1 अशी बरोबरी झालेली आहे. अजून दहा डाव बाकी आहेत.
प्रतिक्रिया
छान!
छान!
कार्लसन वि वि आनंद यांची सर्व_ संचारी की कुणी इथे खेळी दिलेल्या नंतर काही दोनतीन वर्षं लेख आले नाहीत. हत्तीचा मामा वगैरे हत्तींना सांगितलं की काही धागा काढा तर हुं पलीकडे काही नाही, फक्त खफवर धुरळा उडवतात.
तर आता हा लेख आला. स्वागत. विडिओ / लिंका लेख आटोपता ठेवतील. खेळाडुंची इतर माहितीपर लेख सापडल्यासही लिंक हवी.
गाजलेल्या खेळाडुंचे खेळ नंतर का ढिले पडतात? पुस्तकी चाली न करणारे यांना हरवतात का?
प्रत्येक डावासाठी एक ते दोन
प्रत्येक डावासाठी एक ते दोन व्हीडियो देण्याचा विचार आहे. वाचक प्रतिसादातूनही दुवे देत आहेतच.
गाजलेल्या धावपटूंचा वेग पुढे मंदावतो तसंच बुद्धिबळातही होतं. 'पुस्तकी' चालींचं पुस्तकही बदलत राहातं. पण बहुतेक वेळा माहिती कमी पडण्यापेक्षा उत्तम मूव्ह शोधण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो, त्याने फरक पडतो. मग खूप वेळा घड्याळात वेळ कमी शिल्लक असण्याने चुका होऊ शकतात.
आभार!
डॅनिएल किन्गची यूट्यूबवाहिनीही उत्तम आहे. शिवाय ह्या वेळी डावांनंतरच्या प्रश्नोत्तरांचं संचालनही नेहमीच्या अनास्तासिया कार्लोविचऐवजी त्याच्याकडे आहे. त्यामुळेही विश्लेषणात अधिकची भर.
डाव १ - विश्लेषण. २५ मि.
डाव २ - फक्त महत्त्वाचे क्षण. ४ मिनिटांचं हे छोटं, नवीन प्रकारचं सादरीकरणही मस्त आहे.
हर्लेसन ब्लंडर - मस्त.
हर्लेसन ब्लंडर - मस्त.
चार मिनिटवालाही पाहिला.
अरे वा. मस्तच.
अरे वा. मस्तच.
या धाग्यावर मी येणार.
११ नोव्हेंबरचा दुसरा डाव
मॅग्नस कार्लसन आणि कॅरूआना मधील ११ नोव्हेंबरचा दुसरा डाव https://chess-db.com/public/game.jsp?id=1503014.2020009.24109056.30293 वर बघायला मिळेल.
पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळणार्याने पहिल्या मूव्हमध्ये वजीरासमोरील प्यादे दोन घरे पुढे नेणे आणि दुसऱ्या मुव्हमध्ये राजाच्या बाजूचा घोडा पांढऱ्या घरातील उंटासमोर दोन घरे नेऊन ठेवणे (एन.पी.के ३ असेही म्हणतात त्याला) याला Knights Variation, Indian Game म्हणतात. कार्लसनने सुमारे ७% गेम्समध्ये या पध्दतीने सुरवात केली होती असे त्या वेबसाईटवर म्हटले आहे.
या डावात २७ ते २९ या मूव्ह दरम्यान कॅरूआनाने थोडी चूक केली असती तर कार्लसनची पकड डावावर आली असती. पण कॅरूआना त्याला फसला नाही. कार्लसनने पुढे गेलेली प्यादी गमावल्यानंतर कॅरूआनाच्या हातात खेळाची सुत्रे गेली. उगीच मधूनमधून कॅरूआनाच्या राजाला चेक देणे सोडून त्याला फार करता आले नाही. कॅरूआनाने हा ड्रॉ मान्य का केला हे समजले नाही. त्याच्याकडे एक प्यादे जास्त होते आणि प्याद्यांची पोझिशनही चांगली होती पुढच्या प्याद्याला मागचे सपोर्ट करू शकत होते. कॅरूआनाची बाजू शेवटी काकणभर वरचढ होती. तरीही त्याने ड्रॉ का मान्य केला काय माहित.
पुढच्या डावांविषयी पण लिहेनच.
जुनी पद्धत
सरळ Nf3 म्हणा की राव!
आणि तुमचं जुनंही नोटेशन चुकलेलं आहे: ते एन के बी ३ पाहिजे. हा पुरावा. दुसरी खेळी पहा.
आणि ह्याप्रकारे लिहीण्याऐवजी डावातील त्या त्या खेळींनंतरची स्थिती इथे चित्ररुपाने डकवलीत तर जास्त बरं होईल.
परत, इंडीअन गेममध्ये काळ्याने पहिली खेळी Nf6 करणं गरजेचं आहे. ओपनींगची नावं ही दोन्ही बाजूंच्या खेळींवर अवलंबून असतात ह्याची नोंद घेणे.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
अगॅडमेटरचं च्यानेल मीही फॉलो
अगॅडमेटरचं च्यानेल मीही फॉलो करतो. मस्तं चॅनेल आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
वीस खेळींनंतर तिसरा डावही
वीस खेळींनंतर तिसरा डावही बरोबरीच्या दिशेने चालू आहे असं समालोचकांचं मत आहे. दोघांकडे वजीर, घोडा, उंट आणि सहा प्यादी शिल्लक आहेत. खेळात काही झणझणीत खेळी दिसत नाहीत. तुल्यबळ रस्सीखेच चालू आहे.
पुन्हा एकदा बरोबरी. डाव क्र
पुन्हा एकदा बरोबरी. डाव क्र 3चा दुवा धाग्यात दिलेला आहे.
पहिला डाव
chess-db.com वर पहिला डाव बघितला. दोन तुल्यबळ महारथींमध्ये झुंज चालू होती आणि कोणत्याही एका बाजूला वर्चस्व आणता आले नाही हे कळते. ४६ ते ४८ या मूव्ह दरम्यान कॅरूअण्णांचे पुढे गेलेले प्यादे कार्लसनच्या गळ्यातले हाडूक बनणार असे वाटत होते. तिथे वेळ कमी पडून किंवा विचलित होऊन कार्लसनची चूक झाली असती तर तिथेच डाव त्याच्या हातून निसटला असता. अशा डावांमध्ये एक लहानशी चूकही घातक ठरते. शेवटी डाव चांगला ११५ मूव्ह चालला.शेवटी दोघांचाही एक हत्ती, कार्लसनची दोन प्यादी तर कॅरूअण्णांचे एक प्यादे राहिले होते. पण एक जास्त प्यादे असल्याचा कार्लसनला म्हणावा तसा फायदा घेता येणाऱ्यातला नव्हता. त्यामुळे शेवटी डाव बरोबरीत संपला.
आनंदच्या खेळांत वजीर बाद
आनंदच्या खेळांत वजीर बाद केल्याने आनंदचे खेळ संपले. कार्लसन हा एक हत्ती,तीनचार प्यादी ठेवून खेळतो का?
चौथा डाव सुरू झालेला आहे.
चौथा डाव सुरू झालेला आहे. पहिल्या वीसबावीस खेळींनंतर कोणीच स्पष्टपणे पुढे नाही. कारुआना या डावात काहीतरी चमक दाखवू शकेल अशी मला (उगीचच) आशा आहे. आनंदला हरवल्यापासून मी कार्लसेनच्या विरोधात आहे. 2000 सालच्या ऒस्ट्रेलियाची क्रिकेट टीम हरली की जसं मनापासून बरं वाटायचं... तसं काहीसं.
आनंदला हरवल्यापासून मी
आनंदला हरवल्यापासून मी कार्लसेनचा फॅन आहे.
म्हणजे असं की बिनावजिर डाव खेळायची आनंदने प्रॅक्टीस करायला हवी.
-----
तिसरा डाव - उंट उरले की ड्रॅा नक्की असतो. म्हणजे एकदा का एखादा विजय झाला की मग उरलेले ड्रा करायचे तर उंटच ठेवायचे?
तिसरा डाव
आजच तिसरा डाव बघितला. अशा महारथींमधील डाव बघणे म्हणजे दोघांपैकी कोण कुठली चूक करत आहे याची वाट बघणे.दोघांनीही चूक केली नाही तर डाव निरस होतो. तिसरा डाव पण बराचसा वेळ तसाच होता. ४५-४६ व्या मूव्हला कॅरूअण्णांकडे एक घोडा आणि दोन मोकळी प्यादी होती तर कार्लसनकडे काळा उंट होता.कार्लसनचे एक प्यादे पुढे गेले होते पण त्याच्याकडे एकच उंट असल्यामुळे त्याची बाजू थोडी पडती होती. जर कॅरूअण्णांच्या राजाने पांढऱ्या घरात जाऊन त्या पुढे गेलेल्या प्याद्याला कनफ्रंट केले असते तर कार्लसनला काही करता आले नसते. त्यामुळे त्या परिस्थितीत हा डाव कार्लसनला जिंकता येणे शक्य नव्हते. पण नेमक्या त्या वेळी म्हणजे ४८ व्या मूव्हला कॅरूअण्णांनी घोड्याची हाराकिरी का केली ते कळले नाही. एखाद्याला लग्नात अहेर द्यावा त्याप्रकारे कार्लसनला तो घोडा कॅरूअण्णांनी बहाल करून टाकला. तसे करण्यामागचे कारण समजले नाही.एक तर कार्लसनचा काळा उंट कॅरूअण्णांच्या काळ्या घरात अडकलेल्या प्याद्याला खाऊ शकत होता. आणि घोडा कार्लसनला खायला दिला तर कॅरूअण्णांचे प्यादे कार्लसनचे प्यादे खाऊन पुढे गेले असते तरी वजीर बनवायला आणखी तीन मूव्ह लागल्या असत्या आणि त्या पुढे गेलेल्या प्याद्याला सपोर्ट द्यायला कॅरूअण्णांच्या राजापेक्षा त्या प्याद्याला खायला कार्लसनचा राजा आणि काळा उंट पुढे होते. कॅरूअण्णांनी घोड्याची हाराकिरी केल्यावर कार्लसनची बाजू वरचढ झाली. तरीही नंतर कार्लसनने ड्रॉ का मान्य केला हे लक्षात आले नाही. बहुतेक ३-४ तास डाव झाल्यावर फटिग येऊन तसे करत असावेत. आपल्याला घरी बसून त्यांचे डाव बघणे नेहमीच सोपे असते.
पहिल्या तीन डावात कार्लसनचा खेळ थोडा फिकट वाटला. कार्लसन त्याच्या नावलौकिकापेक्षा थोडा कमी पडत आहे या डावांमध्ये.
घोडा देऊन टाकणं ही खेळ
घोडा देऊन टाकणं ही खेळ बरोबरीत सोडवण्याची मागणी होती. राजा, एक प्यादं व उंट विरुद्ध राजा अशा खेळात जर तुमचं प्यादं ज्या घरात वजीर होऊ घातलं आहे त्याच्या विरुद्ध रंगाचा उंट असेल, तर तिथे पोचलेल्या विरुद्ध राजाला हुसकून वजीर बनवणं अशक्य असतं. ती theoretically draw असते.
हत्ती जोमात. छान.
हत्ती जोमात.
छान.
चौथा डाव
चौथा डाव बघितला. तिसऱ्या डावाप्रमाणेच तुल्यबळांमधील सामना होता आणि कोणीच चूक न केल्याने बरोबरीत चालला आणि शेवटी बरोबरीतच सुटला. कार्लसन पांढऱ्या सोंगट्या घेऊन तर कॅरूअण्णा काळ्या सोंगट्या घेऊन खेळत होते. शेवटी दोघांकडेही दोन हत्ती, एक काळा उंट आणि पाच प्यादी राहिली होती. दोघांकडेही पाच प्यादी असली तरी कार्लसनची प्याद्यांची प्लेसमेन्ट जास्त चांगली होती कारण पाच पैकी चार प्यादी एका पाठोपाठच्या कॉलममध्ये होती. त्यामुळे पुढच्या प्याद्याला मागच्यांनी सपोर्ट करून साखळी तयार करता आली असती.
कॅरूअण्णांनी आपले मोहरे पांढऱ्या घरात ठेऊन कार्लसनच्या काळ्या उंटाचा उपद्रव होणार नाही याची काळजी घेतली होती. वजिरा-वजिरीसारखी हत्ता-हत्ती करूनही बी-४ मधील कार्लसनचे प्यादे कॅरूअण्णा खाऊ शकत होते. बी-५ मधील प्याद्याला उंट/हत्ती/राजाने सपोर्ट देऊन पुढे रेटायची संधी त्यांच्याकडे होती. त्यातून नवा वजिर नक्कीच झाला नसता पण उंट/हत्तीसारखा कार्लसनचा मोहरा खायची संधी त्यांना मिळाली असती. तसेच वर म्हटल्याप्रमाणे कार्लसनला प्याद्यांची साखळी करून चारपैकी एखाद्याचा वजिर करायची संधी होती. म्हणजे दोघांनाही विजयाची संधी होती पण दोघांनीही प्रयत्न केले नाहीत. हा पण ड्रॉ दोघांनी मान्य का केला समजले नाही. दोघेही तुल्यबळ होते मग विजयासाठी प्रयत्न का केला नसेल कोणीही? की स्टेक्स बरेच जास्त असल्यामुळे सुरक्षित खेळ खेळले दोघेही?
पहिल्या चार डावांमध्ये म्हणावी तशी मजा अजून आली नाही.
मग विजयासाठी प्रयत्न का केला
मग विजयासाठी प्रयत्न का केला नसेल कोणीही?
हुं;
पाचवा डाव सुरू झालेला आहे.
पाचवा डाव सुरू झालेला आहे. कारुआनाच्या पांढर्या सोंगट्या आहेत. त्याने आज आक्रमक सुरुवात केलेली आहे आणि मॆग्नसनेही मारामारीची तयारी दाखवली आहे. पहिल्या पंधरा खेळींनंतरतरी हा डाव नीरस होणार नाही असं वाटतंय.
प्रश्नोत्तरे
यंदाच्या पत्रकार परिषदांतले प्रश्न आणि शेरे नेहमीच्या मानाने फारच मोकळेढाकळे नि बुद्धीबळाशी कमी निगडीत आहेत. तरी कधी नव्हे तो मॅग्नस फार मोकळेपणी मनोरंजक आणि सुरस उत्तरं देतो आहे.
पाचवा डाव बरोबरीत सुटल्यानंतरची प्रश्नोत्तरे (फितीत ६:३० मिनिटांपासून पुढे).
पाचवा डाव
पाचवा डाव बघितला. या डावात कॅरूअण्णा पांढऱ्या सोंगट्या घेऊन तर कार्लसन काळ्या सोंगट्या घेऊन खेळत होता. पहिल्या चार डावात दोघांनीही डिफेन्सिव्ह खेळ खेळला पण या डावात सुरवातीपासूनच थोडी जास्त मारामारी झाली. खेळाच्या उत्तरार्धात कार्लसनचा राजा पटावर भटकत होता. असे नेहमी बघायला मिळत नाही म्हणून आश्चर्य वाटले. दोघांनीही कॅसलिंग केले होते.आणि यावेळीही दोघांपैकी कोणीही विजयासाठी प्रयत्न केले असे वाटले नाही आणि सामना बरोबरीत सोडवायचे मान्य केले.
हा पण डाव तितका रंगला नाही असे वाटले. कधीकधी वाटते की चेसचे डाव अशा महारथींपेक्षा आपल्यासारख्यांमध्ये जास्त रंगतात. कारण दोघांनाही सगळे बारकावे माहित असले तर दुसऱ्याला कुठलीतरी बुचकळ्यात टाकणारी खेळी करता येणे शक्य नाही कारण दुसरा बुचकळ्यात मुळात पडणारच नाही इतकी बारकाव्यांची माहिती दोघांनाही असते. त्याउलट आपल्यासारखे सामान्य लोक खेळायला लागले तर दोन पैकी एखादा तरी गंडतो. वजिर आणि उंट/घोडा किंवा हत्ती आणि घोड्यासमोरील प्यादी वापरून प्रतिस्पर्ध्याचे कॅसलिंग फोडायला मला खूप मजा येते. पण असे काही प्रतिस्पर्धी करणार याची चाहूल आधीच लागली तर असे मोठे लोक आधीच काळजी घेऊन अशी फोडाफोडी होणार नाही याची व्यवस्था करतील आणि त्यातली मजाच जाते.
या पहिल्या पाच डावांमध्ये तितकी मजा आली नाही. यापेक्षा कारपॉव्ह-कॅस्परॉव्ह किंवा आनंद-कॅस्परॉव्ह यांच्यातील सामने थोडे जास्त रंगतदार होत असत.
सहावा डाव सुरू झालेला आहे.
सहावा डाव सुरू झालेला आहे. पहिल्या काही खेळी दोघांकडून आक्रमक झाल्या. आत्ता सुमारे पंचवीस खेळींनंतर डाव बरोबरीत आहे. पण एकच कंटाळवाणी रस्सीखेच होण्याऐवजी अनेक दिशांनी बलं लागत आहेत. हाडाव बरोबरीत सुटला तरी जास्त मनोरंजक ठरेल अशी आशा वाटते आहे.
आता सर, डावांची विडिओ लिंक
आता सर, डावांची विडिओ लिंक टाका. धागा लवकर लोड होत नाहीये विडिओ प्लेअरसमुळे.
सहावा डाव
सहावा डाव बघितला. या डावात कार्लसन पांढऱ्या सोंगट्या घेऊन तर कॅरूअण्णा काळ्या सोंगट्या घेऊन खेळत होते. पहिल्या पाच डावांत आणि या डावात एक मोठा फरक म्हणजे कार्लसनने सुरवात बऱ्यापैकी आक्रमकपणे केली. कार्लसन यावेळी जोखीम घेऊन खेळायच्या इराद्याने मैदानात उतरला होता असे वाटले. कार्लसनने दोन प्यादी जास्त ठेवायच्या बदल्यात घोडा बळी द्यायचा जुगार खेळला. प्यादे शेवटपर्यंत रेटून नंतर वजीर बनवायचा प्रयत्न असावा. इथपर्यंत सगळे ठिक चालू होते पण नंतर ऐनवेळी कार्लसनने चूक केली असे वाटले. ५८ व्या मूव्हमध्ये दोन पैकी एक प्यादे त्याने कॅरूअण्णांच्या उंटाला नेवैद्य म्हणून दिले. कॅरूअण्णांचा काळा आणि कार्लसनचा पांढरा उंट होता. अशावेळी प्यादे पांढऱ्या घरात ठेऊन त्या प्याद्याने पांढऱ्या उंटाला सपोर्ट दिला असता तर कॅरूअण्णांचा काळा उंट तिथे निष्प्रभ ठरला असता. नेमक्या त्याच वेळी सपोर्ट नसताना प्यादे काळ्या घरात पुढे नेऊन कॅरूअण्णांच्या उंटाला ते का खायला दिले समजले नाही. नंतर ६० ते ६७-६८ या मूव्हमध्ये कार्लसनचा पांढरा उंट एमलेसली भटकत होता असे वाटले. पांढऱ्या घरात असलेल्या प्याद्याला सपोर्ट पण दिला नाही की कॅरूअण्णांच्या घोड्यावर हल्ला करायचा प्रयत्नही त्या उंटाकरवी झाला नाही. तरी पांढरा उंट उगीच भटकत होता असे वाटले. शेवटी कार्लसनचे एक प्यादे मागे होते आणि राजा ३-४ घरे पुढे होता. राजा पुढे नेऊन कॅरूअण्णांचे प्यादे खाता येणे कार्लसनला शक्य नव्हते. एकतर ते प्यादे होते काळ्या घरात म्हणजे कार्लसनच्या पांढरा उंट काही करू शकत नव्हता. त्या प्याद्याला कॅरूअण्णांचा काळा उंट किंवा राजाने सपोर्ट दिला असता तर ते प्यादे खाता येणाऱ्यातले नव्हते. मग राजाच्या आणि पांढऱ्या उंटाच्या सपोर्टने आपले प्यादे पुढे रेटायचा प्रयत्नही झालेला दिसला नाही आणि राजा उगीच ३-४ घरे पुढे होता असे वाटले. शेवटी हा डाव पण ड्रॉ झाला. आता सातवा डाव भारतातल्या वेळेप्रमाणे सोमवारी होईल.
हे मोठे लोक नक्की कोणता विचार करून खेळतात हे समजत नाही. म्हणा ते समजले असते तर मी इथे सामन्यांवर का लिहित राहिलो असतो? मीच चॅम्पिअनशीप खेळायला गेलो नसतो का?
५८ व्या मूव्हमध्ये दोन पैकी
५८ व्या मूव्हमध्ये दोन पैकी एक प्यादे त्याने कॅरूअण्णांच्या उंटाला नेवैद्य म्हणून दिले. कॅरूअण्णांचा काळा आणि कार्लसनचा पांढरा उंट होता. अशावेळी प्यादे पांढऱ्या घरात ठेऊन त्या प्याद्याने पांढऱ्या उंटाला सपोर्ट दिला असता तर कॅरूअण्णांचा काळा उंट तिथे निष्प्रभ ठरला असता. नेमक्या त्याच वेळी सपोर्ट नसताना प्यादे काळ्या घरात पुढे नेऊन कॅरूअण्णांच्या उंटाला ते का खायला दिले समजले नाही.
ते प्यादं खायला देण्यामागचा उद्देश कारुआनाच्या उंटाची दिशाभूल करणं हा होता. कारण त्यानंतर साठाव्या मूव्हला कार्लसनने आपला राजा g6 ला जेव्हा नेला तेव्हा त्याचं एक प्यादं h4 वर होतं. जर उंटाची दिशाभूल केली नसती (आणि तो e1 वरच राहू दिला असता) तर h4 वरचं प्यादं उंटाच्या घशात गेलं असतं. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:
पण कुठल्या अर्ध्याचा त्याग करायचा यातच पांडित्याची कसोटी लागते.
- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)
तरीही...
प्याद्याच्या मार्गात दोन काळे चौकोन होते. शिवाय दोन एफ फाईलमधील प्याद्यांमुळे कार्लसनचा पांढरा उंट निष्प्रभ होता. त्यामुळे ते 'डिफ्लेक्षन' फारसं बरोबर होतं असं दिसत नाही. शिवाय कॅरुआनाच्या Bg5 खेळीनंतर पांढऱ्याला काहीही मार्ग नव्हता. दोन्ही खेळाडूंनी केलेल्या प्रत्येक खेळीमागे कमीत कमी ४० पुढच्या खेळींचं गणित केलेलं होतं, जे साधारण खेळाडूस पाहणं अतिकठीण आहे. https://youtu.be/XVowybk-GmE?t=2200 हा व्हिडू पहावा.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
आता संगणकाला इमोशनल सेन्सही
आता संगणकाला इमोशनल सेन्सही द्यायला हवा एआइमध्ये.
सातवा डाव जरा जीवंत वाटतो आहे
सातवा डाव जरा जीवंत वाटतो आहे. दोघांनीही पटावर क्लिष्टता निर्माण केलेली आहे. सुमारे वीस मूव्ह्जनंतर पटावर सगळे मोहरे शिल्लक आहेत. हा डाव इंटरेस्टिंग होईल असं दिसतंय. काहीतरी निर्णय लागेल अशी आशा करायची का?
सातवा डाव
सातवा डाव बघितला. या डावात कार्लसन पांढऱ्या सोंगट्या घेऊन तर कॅरूअण्णा काळ्या सोंगट्या घेऊन खेळत होते. हा डाव पण तुल्यबळांमधील साजेसा डाव होता. सुरवातीला हा डाव कंटाळवाणा होणार नाही असे वाटले पण शेवटी व्हायचे तेच झाले. दोन्ही हत्ती २५ व्या मूव्हच्या आसपास पटावरून गेले. नंतर वजिरावजिरी झाली. शेवटी कॅरूअण्णांचा पांढरा उंट तर कार्लसनचा एक घोडा शिल्लक राहिला. दोघांकडेही सहा प्यादी शिल्लक राहिली होती. प्याद्यांच्या प्लेसमेन्टमध्ये दोघांनाही काही प्रमाणात अनुकूलता होती. कार्लसनची सहापैकी पाच प्यादी काळ्या घरात होती त्यामुळे कॅरूअण्णांच्या पांढऱ्या उंटाचा उपद्रव त्यांना होणाऱ्यातला नव्हता. इतकेच नाही तर त्यांची साखळी पण झाली होती. तर कॅरूअण्णांच्या प्याद्यांपैकी तीन एकापाठोपाठ दुसऱ्या तर आणखी दोन शेजारच्या कॉलममध्ये होती. तरीही कार्लसनच्या प्याद्यांची आधीच साखळी तयार झाल्यामुळे आणि कॅरूअण्णांच्या पांढऱ्या उंटाच्या उपद्रवापासून प्यादी दूर ठेवल्याने कार्लसनची बाजू थोडी सरस होती असे वाटले. खेळाच्या शेवटी कॅरूअण्णांच्या पांढऱ्या उंटाने कार्लसनचे पांढऱ्या घरातील एकमेव प्यादे खायचा प्रयत्न झाला. त्या प्याद्याला सपोर्ट द्यायला पुढे गेलेला राजा कार्लसनने मागे आणला. परत त्याच मूव्हची पुनरावृत्ती होणार म्हणून दोघांनी ड्रॉ मान्य केला. समजा कार्लसनने ते प्यादे दिले असते तरी त्याची प्याद्यांची प्लेसमेन्ट कॅरूअण्णांच्या प्याद्यांपेक्षा थोडी जास्त चांगली होती आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे एक घोडा शिल्लक होता त्यामुळे पांढऱ्याच किंवा काळ्याच घरांवर हल्ला करता येईल ही मर्यादा त्याच्यावर नव्हती. तरीही यावेळी पण कार्लसनने विजयासाठी प्रयत्न केले असे वाटले नाही.
फारच डिफेन्सिव्ह खेळ चालू आहे या चॅम्पिअन्शिपमध्ये. दोघेही जिंकण्यासाठी नाही तर पराभव टाळण्यासाठी खेळत आहेत असे वाटत आहे. असे डाव आपल्यासारख्याला बघायला कंटाळवाणे होतात.
धाग्यातले अगोदरचे विडिओ बदलून
धाग्यातले अगोदरचे विडिओ बदलून लिंकस ठेवा.
आठ डावांनतर चारचार गुण झाल्यास दोघांना विभागून विश्वविजेता घोषित करण्याचा नियम ताबडतोब लागू करा सर्व पुढील स्पर्धांना.
च्यायला उगाच वेळ घालवत आहेत आमचा.
कार्लसनच्या पॉवर कमी होत आहेत
कार्लसनच्या पॉवर कमी होत आहेत असं स्वत: कार्लसनला वाटत आहे. गेल्या मॅचनंतर दोन्ही खेळाडुंना त्यांचा आवडता खेळाडु कोण हे विचारलं गेलं तेव्हा कार्लनने "चार-पाच वर्षापूर्वीचा मी" असं उत्तर दिलं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आठवा डाव
आठवा डाव बघितला. कॅरूअण्णांसाठी हा डाव म्हणजे हुकलेली संधी होती. जर कॅरूअण्णा आयुष्यभर कोणत्या एका डावातील हुकलेल्या संधीचा विचार करतील तर तो हा डाव असेल असे वाचले.
या डावात कॅरूअण्णा पांढऱ्या सोंगट्या घेऊन तर कार्लसन काळ्या सोंगट्या घेऊन खेळत होता. दोघांनीही कॅसलिंग केले होते पण कार्लसनच्या राजा आणि कॅसलिंग केलेला हत्ती यांच्यासमोरची प्यादी हलल्यामुळे त्याची ती बाजू कमकुवत झाली होती. कॅरूंनी काळा उंट सी-३ या महत्वाच्या घरात नेऊन ठेवला पण होता.जर या उंटाच्या पल्ल्यात वजीर आणता आला असता तर अती उत्तम पण हत्ती जरी आणता आला असता तरी कार्लसनला ते जड जाऊ शकले असते. पण या संधीचा फायदा त्यांना उचलता आला नाही.
शेवटी कॅरूअण्णांचे एक प्यादे सहा घरे पुढे गेले होते. त्याला हत्तीचा सपोर्ट होता.आणि काळा उंट एक घर पुढे आणून त्या प्याद्याचा काळ्या उंटाला सपोर्ट मिळाला असता तर तो कार्लसनसाठी जड जाणारा प्रकार होऊ शकला असता.कारण कार्लसनचा उंट पांढरा असल्यामुळे इथे काहीच करू शकला नसता. पण त्याचवेळी कार्लसनचा हत्ती बी-२ घरातील कॅरूंचे प्यादे खाऊ शकत होता. तेव्हा कॅरूंचा मार्गही एकदम सोपा नव्हताच. तसेच कॅरूंनी काळा उंट ई-७ मध्ये नेऊन कार्लसनच्या राजाला चेक दिला असता तरी कार्लसनचे बी-७ मधील प्यादे खाता येणे शक्य नव्हते कारण कॅरूंच्या हत्तीला त्या प्याद्याचा ॲक्सेस सहजासहजी मिळाला नसता. या स्टेजला ड्रॉ मान्य करण्याशिवाय दोघांकडेही अधिक चांगला पर्याय नव्हता असे मला वाटते. जर ड्रॉ मान्य केला नसता तर खेळ कुठच्याही दिशेला गेला असता.
पहिल्या आठ डावात ४-४ अशी बरोबरी झाली आहे.
नववा डाव
नववा डाव बघितला. हा डावही तुल्यबळांमधील होता. दोघांपैकी कोणीही चूक न केल्यामुळे बराचसा काळ कोणाचीच बाजू वरचढ राहिली नाही. शेवटी दोघांकडे दोन प्यादी आणि एकेक उंट राहिला होता. कार्लसन पांढऱ्या सोंगट्या घेऊन तर कॅरू काळ्या सोंगट्या घेऊन खेळत होते. शेवटी कार्लसनचा पांढरा उंट तर कॅरूंचा काळा उंट शिल्लक राहिला होता. कार्लसनचे एक प्यादे बरेच पुढे गेले होते. कार्लसनच्या राजाने त्या प्याद्याला सपोर्ट देऊन कॅरूंच्या काळ्या उंटाच्या हल्ल्याच्या टप्प्यात ते आणून तो उंट खायची संधी कार्लसनकडे होती. कार्लसनने तसे केले असते तर सी-७ मधील कॅरूंचे प्यादे पुढे दामटायला संधी मिळाली असती म्हणून बहुतेक कार्लसनने तो आक्रमक खेळ केला नाही. तरीही कार्लसनकडे गमाविण्यासारखे फार नव्हते. कारण कॅरूंनी कितीही ते प्यादे पुढे दामटले असते तरी त्यांना राजाकरवी कार्लसनचे एक प्यादे खावे लागले असते आणि त्यात दोन मूव्ह नक्कीच गेल्या असत्या. दरम्यानच्या काळात राजाने किंवा उंटाने कॅरूंचे पुढे जाणारे प्यादे खायला कार्लसनला संधी मिळाली असती. महत्वाचे म्हणजे कॅरूंचे दुसरे प्यादे पांढऱ्या घरात जाऊन वजीर बनला असता आणि कार्लसनकडे पांढरा उंट होता. त्यामुळे कॅरूंना प्याद्याचा वजीर बनवता येणे शक्य नव्हते.
तेव्हा हा डाव ड्रॉच होणार होता. पण तरीही कार्लसनने कॅरू कोणती चूक करतात का हे बघायला हवे होते. काहीही झाले तरी कार्लसन हा डाव गमावणार नव्हता मग जर कॅरूंनी चूक केली असती तर आयती संधी कार्लसनला मिळाली असती असे मला वाटते.
आधी असलेला ॲडव्हान्टेज वाया दवडला याची हळहळ कार्लसनला वाटेल असे या डावाविषयी वाचले. आतापर्यंत ९ डाव झाले आणि सगळे ड्रॉ झाले आहेत. आतापर्यंत दोघांनाही साडेचार पॉईंट मिळाले आहेत.
दहावा डाव
दहाव्या डाव्यात कॅरू पांढऱ्या सोंगट्या घेऊन तर कार्लसन काळ्या सोंगट्या घेऊन खेळत होता. हा पण डाव ड्रॉ झाला पण आधीच्या नऊ डावांपेक्षा हा डाव बघायला मजा आली. आधीच्या डावात दोघेही डिफेन्सिव्ह आणि पराभव टाळायला खेळत होते पण यावेळी मात्र आक्रमक खेळ बघायला मिळाला. कार्लसनने तीन प्याद्यांची साखळी बनवली होती पण कॅरूंनी ती फोडली.
या धाग्यावर इतर कोणीच का येत नाही? धागालेखकही गायब आहेत. त्यामुळे या डावावर इतकेच लिहितो.
मी वाचतोय
काही मजा नाही ह्यावेळेस. तो कार्ल्सन फक्त कारुअना च्या चुकीची वाट बघतोय झाले.
तो चुकला न हा जिंकला अन झाला जगज्जेता. त्या आनंदसोबत ह्याने असेच केले. अगदी प्याद्यापर्यंत डाव घेउन जातो. आता कारुअना तेच करतोय त्याच्यासोबत तर जड चाल्लेय त्याला. वर म्हणतोय की पाच वर्षापुर्वीचा मी मला जास्त आवडतो म्हणुन. ते सगळ्या सोंगट्या पटावर असतांना शह देण्याची मजा परत यायला पाहिजे.
अकरावा डाव
अकरावा डाव पण ड्रॉ झाला आहे.
छ्छे
हात्तीच्या... मग निर्णायक डाव कधी? का साटंलोटं?
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
दहावा डाव थोडा एक्साइटिंग
दहावा डाव थोडा एक्साइटिंग झाला. अकरावा मात्र कंटाळवाणा झाला.
लवकरच लेख अपडेट करतो. फक्त लिंका टाकू की व्हीडियो एंबेड करू?
फक्त दुवे द्या
फक्त दुवे द्या अन्यथा फोनवर पाहताना धागा अवतरायला फार वेळ लागतो. आधी रोवलेल्या (पक्षी: एम्बेड केलेल्या ;-)) फितीही काढून त्यांचे फक्त दुवे दिलेत तर फार बरं.
धागा अद्ययावत केलेला आहे.
धागा अद्ययावत केलेला आहे.
बाराव्या डावात 30 खेळींनंतर
बाराव्या डावात 30 खेळींनंतर कार्लसेनचं पारडं जड वाटतं आहे. असं लिहून फोनवर दहा मिनिटं बोललो, तर 31 व्या खेळीनंतर त्यांनी डाव बरोबरीत सोडून दिला.
बारावा डाव
बारावा डाव बघितला. हा डाव पण बरोबरीत सुटला. या डावात कॅरू पांढऱ्या सोंगट्या घेऊन तर कार्लसन काळ्या सोंगट्या घेऊन खेळत होता. पहिल्या काही डावांमध्ये सुरवात रटाळ झाली होती.पण यावेळी सुरवातीला थोडी ॲक्शन दिसली.
११ ते १४ या मूव्हमध्ये कॅरूंचा वजिर आणि कार्लसनचा काळा उंट यांच्यात त्याच मूव्ह परत झाल्या. पुढे २५ ते ३० व्या मूव्हच्या दरम्यान कार्लसनने प्याद्यांची चांगली साखळी बनवली होती. तसेच कार्लसनने कॅरूंचे कॅसलिंग फोडायच्या उद्देशाने हत्तीसमोरील प्यादे बरेच पुढे नेले होते. कार्लसनला ते प्यादे आणखी एक घर पुढे रेटता आले असते तर कॅरूंना बाजू सांभाळायला कसरत करावी लागली असती. कारण ए-३ मध्ये गेलेले प्यादे कॅरूंनी आपल्या प्याद्याने खाल्ले असते तर राजाला कव्हर करायला त्यांचा नुसता वजिर असता आणि त्यामुळे तो वजिर बराच धोकादायक स्थितीत असता. त्यामुळे ते प्यादे खायला स्कोप नव्हता. तर कॅरूंना आपले राजासमोरचे प्यादे बी-३ मध्ये नेणे भाग पडले असते.अशावेळी आपला काळा उंट कॅरूंच्या राजासमोर नेऊन त्याला प्याद्याने सपोर्ट मिळाला असता तर कॅरूंना आपला एक हत्ती तरी गमावावा लागला असता किंवा कार्लसनच्या काळ्या उंटामुळे राजा जखडलेला ठेवावा लागला असता.
शेवटी ३१ व्या मूव्हमध्ये दोघांनी डाव बरोबरीत सोडवायचे मान्य केले. या डावातही कार्लसनने विजयासाठी प्रयत्न केल्याचे वाटले नाही. प्रत्येकवेळी पराभव टाळायच्या उद्देशाने खेळ झाला की तो खेळ बघायला आपल्यासारख्यांना मजा येत नाही.
लब्बाड.
लब्बाड.
आयोजकांचं_ खेळाडुंचं फिक्सिंग आहे का पंधरा डाव खेळवण्याचं?
बारावा डा कार्ल्या काळ्या सोंगट्यांवर जिंकेल असं वाटताना त्यानेच बरोबरीसाठी हात का पुढे केला?
शेवटच्या डावात रिस्क नाही
शेवटच्या डावात रिस्क नाही घेणार कोणीच. आता कमी वेळाच्या मॅचेस असतील. कार्लसन त्या प्रकारच्या चेसमध्ये सध्या नंबर १ वर आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कार्लसनने आपले विजेतेपद राखले
कार्लसनने आपले विजेतेपद राखले.
>>कार्लसन त्या प्रकारच्या
>>कार्लसन त्या प्रकारच्या चेसमध्ये सध्या नंबर १ वर आहे.>> खरय. मजा आली.