अंदमान-३ (हॅवलॉक आयलंड : राधानगर बीच)

अंदमान – १ अंदमान – २

आज सकाळी साडेआठ वाजता पोर्ट ब्लेअरवरून हॅवलॉकला जाण्याकरता निघायचं होतं. सहाच्या दरम्यान उठलो आणि हॉटेलच्या शेजारीच असलेल्या टपरीवर चहा घेतला. हॉटेलमध्ये चहा एकतर अगदीच बेचव होता आणि कधीचा करून ठेवलेला असायचा देव जाणे. खळखळ उकळणाऱ्या वाफाळत्या चहाची गंमत त्यात नव्हती. नशिबानं ही टपरी हॉटेलला अगदीच लागून होती. दोन दिवसांत तीनचार वेळा येणं झाल्यामुळे एव्हाना टपरीवाल्या काकूही आता थोड्याफार ओळखीच्या झालेल्या. गेल्या गेल्या त्यांनी ओळखीचं स्मित केलं आणि दोन चहाचे ग्लास हातात दिले. साडेसहा वाजता रस्त्यावर तशी बऱ्यापैकी वर्दळ होती. चहा पिता पिता गेल्या दोन दिवसांचा आढावा घेतला. दोन दिवस समुद्राच्या इतक्या जवळ जाऊनही पाण्यात उतरलो नव्हतो. त्यामुळे आज समुद्रात खेळल्याशिवाय झोपायचं नाही असं एकमताने ठरलं. नाश्ता तयार व्हायला अजून वेळ असल्यानं ब्रेड-बटर पार्सल घेतलं आणि चेक-आउट केलं.
पोर्ट ब्लेअरच्या जेट्टीवरुन मॅक्रूज़ या कंपनीचं जहाज सुटणार होतं. पोर्ट ब्लेअरचं शिपिंग टर्मिनल अगदी एखाद्या छोट्या विमानतळासारखंच आहे. सुरक्षाचाचणी, चेक-इन वगैरे सगळे सोपस्कार अगदी विमानाप्रमाणेच होते. सगळं पार पाडून गेटजवळ आलो तर अक्खा लाउंज लोकांनी खचाखच भरलेला. बरेच जण ग्रुपटूरमधून आलेले. केसरी, वीणावर्ल्डचे टी-शर्ट, टोप्या घातलेलीही बरीच मंडळी दिसली. आजुबाजुला सतत मराठी शब्द कानावर पड़त होते. खरंतर इतक्या दूरवरपण इतके मराठी लोक पाहून उगाचंच अवघडल्यासारखं व्हायला लागलं. यामध्ये कोणीतरी ओळखीचं भेटतंय की काय अशी धास्ती वाटायला लागली. नंतर संपूर्ण सहलीत आम्ही मराठी माणसांना टाळण्याचा पुरेपुर (यशस्वी) प्रयत्न केला.

जहाजात आतमध्ये शिरताच एकदम भारी वाटायला लागलं. बुक करताना आम्हाला अगदीच साधी बोट वगैरे असेल असं वाटलेलं पण हे मात्र आतून खुपच भारी निघालं. बैठक व्यवस्था विमानासारखीच होती. आत अटेंडंट होते, छोटंसं कँटीन होतं, संगीत लावलेलं. थोडक्यात दिड तासांचा प्रवास अगदी आरामशीर झाला.

हॅवलॉकवर उतरल्या उतरल्या आमच्या नावाचा बोर्ड घेउन उभारलेल्या रणजीतने आमचं स्वागत केलं आणि गाडी आणायला पार्किंग मध्ये गेला. कालपर्यंत ढगाळ असलेलं वातावरण आता पूर्ण बदललेलं. उन्हानं डोळ्याला प्रचंड त्रास होत होता. सॅकमधून गॉगल काढतोय तोवर रणजीत गाडी घेऊन आला. जेट्टीवरून हॉटेलवर जाईपर्यंत त्याने दिवसभराची रूपरेषा सांगितली. स्कुबा डायव्हिंग करण्यात रस आहे का असं विचारलं. अर्थात दिल्लीवरून येतानाच तसं ठरवलं असल्यामुळे आम्ही तात्काळ होकार दिला. स्कुबा डायविंग साठी सगळ्यात चांगली वेळ म्हणजे एकदम सकाळी लवकर सहा वाजताची. कारण जसजसा उशीर होईल तसे मासे समुद्रात गुडूप होतात आणि दिसत नाहीत. आता साडेदहा तर इथेच वाजलेले त्यामुळे आज तर करणं शक्य नव्हतं. अजिबात वेळ न दवडता दुसऱ्या दिवशी सकाळी सहाची वेळ ठरवून टाकली. रेसोर्टवर आलो आणि चेक-इन केलं. दोन तास विश्रांती घ्या आणि मग दीड वाजता निघु म्हणत रणजीत निघून गेला. आज केवळ राधानगर बीचला भेट होती. विश्रांती घ्या असं म्हणाला खरं पण कसलं काय. एका जागेवर अजिबात स्वस्थ बसवेना. अजून तसा वेळ हातात असल्यानं रेसोर्ट फिरून घेतलं, आसपास फेरफटका मारल्या. जागोजागी बाईक भाड्याने मिळणारी दुकानं होती. अनेक जण गाडीवरून फिरताना दिसत होते. मनातल्या मनात उद्या दुपारनंतरचा वेळ बाईकवर हुंदडण्यासाठी राखून ठेवला. रेसोर्ट अगदी बीचसमोरच असल्यानं तिथेच बीचवर तासभर निवांत बसून राहिलो. पाण्यात जायची इच्छा होत होती पण ओहोटीची वेळ असावी बहुतेक. पाणी खूपंच आत गेलेलं. लाटाही नव्हत्या. दुपारी एक-दोन नंतर भरती सुरु होईल अशी माहिती मिळाली.
आल्यापासून आतापर्यंत तीन बीच बघितलेले पण कुठेच फेसाळणाऱ्या लाटा नव्हत्या दिसल्या. समुद्राची गाज नव्हती. अगदी संथ पाणी. इतक्या सौंदर्यात रौद्र्तेची कमतरता भासत होती. आता त्यामागचं भौगोलिक कारण वगैरे असेल कदाचित पण मन मानेना. असो. रेसोर्टमध्येच थोडंसं खाऊन घेतलं. दिल्लीहून निघण्याअगोदरपासून पल्लवीला गॉगल आणि टोपी घे म्हणून सांगत होतो. पण तेव्हा मला त्याची गरज नाही म्हणत मला निरुत्तर करणाऱ्या बायकोने हॅवलॉकमध्ये गेल्यावर मात्र मला दोन्ही पाहिजे म्हणून लकडा लावला. तेवढ्या सगळ्या गडबडीत थोडा वाद घालत आणि माझा सल्ला योग्य होता हे तिच्या तोंडातून दोनवेळा वदवून घेत तीही खरेदी उरकून घेतली.
वेळेच्या बाबतीत मात्र अंदमानात सगळेच एकदम काटेकोर होते. बरोबर दीड वाजता रणजीत हजर. गाडीत बसताच त्यानं राधानगर बीचविषयी सांगायला सुरुवात केली. काही गोष्टी आधीच वाचल्या असल्यानं माहिती होत्या. मी मात्र इतका वेळ सतावणारा राधानगर बीचवर लाटा मिळतील का हा कळीचा प्रश्न विचारून घेतला. उत्तर सकारात्मक आल्यामुळं निर्धास्त झालो. हा बीच सूर्यास्तदर्शनासाठीही प्रसिद्ध आहे.
वीस मिनिटांत बीचवर पोचलो आणि सगळ्या शंका लाटांसोबत वाहून गेल्या. प्रशस्त किनारा, पांढरीशुभ्र मऊ रेती, निळं पाणी आणि फेसाळत अंगावर येणाऱ्या लाटा. कशीबशी लॉकरमध्ये सॅक टाकली आणि दोघेही अक्षरशः पळत सुटलो. दोन तास मनसोक्त भिजलो, खेळलो. कितीतरी दिवसांनी समुद्राची भेट होत होती. कितीही डुंबलो तरी मन भरेना. साडेचारच्या सुमारास सूर्यास्त होणार होता त्याची वाट पाहत बसलो. पण दुर्दैव! सूर्याने अस्ताला जातानाच नेमकी हुलकावणी दिली. ढगांनी नेमकी क्षितिजावर गर्दी केली आणि आमचा सूर्यास्त हुकला आणि इतका वेळ मिसिंग असलेली आजच्या दिवशीची तेवढी एक चुटपूट मनाला लागली. गाडीतून येता येता रणजीतसोबत थोड्या गप्पा मारल्या. पोर्ट ब्लेअरचा मधु हा तमिळ तर रणजीत बंगाली होता. १९७१ च्या युद्धाअगोदर त्याचं कुटुंब आताच्या बांगलादेशात राहायचं. युद्धाआधी काही वर्षं त्याच्या आजोबांनी अंदमानात स्थलांतर केलं आणि सरकारतर्फे त्यांना हॅवलॉकमध्ये जागा मिळाली. पोर्ट ब्लेअर आणि आसपासच्या भागांत जास्तीकरून तमिळ लोकांची तर हॅवलॉक आणि नील बेटांवर बंगाली लोकांची वस्ती आहे हे त्याच्याकडून कळालं. बेटांवरच्या लोकांसाठी सरकारने अनेक सवलती दिलेल्या आहेत. तसं बघायला गेलं तर मुख्य भूमीपासून इतकं दूर कोणत्याही अत्याधुनिक सोयी-सुविधा नसताना कायमस्वरूपी राहणं इतकं सोपं नाही. साधी गाडी खराब झाली तरी पोर्ट ब्लेअर वरून मेकॅनिक बोलवून आणावा लागतो. पण तरीही एकंदर त्याच्या बोलण्यात कुठेही तक्रारीचा सूर नव्हता. उलट सगळं छान मिळतंय मस्त चाललंय असंच तो म्हणत होता.
बोलता बोलता आमचं रेसोर्ट आलं. उद्या पहाटे साडेपाच वाजता स्कुबा डायव्हिंगसाठी तयार राहा असं सांगून रणजीत निघून गेला. आता प्रश्न होता तो रात्रीच्या जेवणाचा. इंटरनेटवर आणि आमच्या ट्रॅव्हल एजंटकडून अंजू कोको या रेस्टोरंटचं नाव ऐकलेलं होतं तिकडेच जायचं ठरवलं. जितकं कौतुक ऐकून होतो ते वायफळ नव्हतं हे आत शिरल्या शिरल्याच कळालं. बघताच मन फ्रेश होईल असं वातावरण होतं. ऐसपैस जागा होती. आज कोलंबी खायची हुक्की आल्याने मी कोलंबी थाळी मागवली आणि पल्लवी शाकाहारी, त्यामुळे वेज थाळी होतीच. पहिला घास तोंडात घेतला आणि आहाहा काय ती चव!! इतकं रुचकर जेवण इकडे आल्यावर मिळेल असं अजिबात वाटलं नव्हतं. ग्रेव्हीची चव तर अशी की अजूनही जिभेवर रेंगाळतेय. हिच्या चेहऱ्यावरून एकंदरीत व्हेज जेवणही चांगलं असावं असा अंदाज बांधला. पण कोलंबी मात्र खरोखर लाजवाब होती. उद्याही इकडेच यायचं असं ठरवून निघालो आणि पुन्हा रेसोर्टवरच्या बीचवर येऊन चांदण्यात बसून राहिलो. शांत वेळ होती ती पण मनात खोलवर रुतलेले विचार ढवळून वर काढण्याचं सामर्थ्यही याचं शांततेत असतं. कितीतरी वेळ वेगवेगळ्या विचारांत गढून गेलेलो आणि तसेच बसून राहिलेलो आम्ही. उद्या पहाटे डायव्हिंग करायचं होतं. जमेल की नाही याबद्दल पण शंका येत होत्या. पण काहीही झालं तरी घाबरून माघारी फिरायचं नाही असा निश्चय केला आणि झोपलो.
अवांतर :
• हॅवलॉकमध्ये अंजू कोको सोडून समथिंग डिफरंट आणि फुल मून कॅफे अशी दोन रेस्टोरंट प्रसिद्ध आहेत असं ऐकलं पण बाकी दोन ठिकाणी जायला आम्हाला जमलं नाही.
• पोर्ट ब्लेअरला बऱ्याच ठिकाणी डेबिट/क्रेडीट कार्ड स्वीकारत होते पण इथे मात्र काही अपवाद वगळता कुठेच कार्ड चाललं नाही. सोबत पैसे होते पण अडीनडीला गाठीशी असावेत म्हणून शक्यतो कार्ड घेतायत का हे पाहत होतो. जिथे चालत होतं तिथेही नेटवर्कची समस्या असल्यामुळे चालेल याची शाश्वती नव्हती. हॅवलॉकमध्ये एटीएमसुद्द्धा नाहीत असं सांगून आमच्या एजंटने आम्हाला भीती घातलेली. पण प्रत्यक्षात मात्र तीन-चार एटीएम दिसली.
• इथे जमीन विकत घेता येते का असं सहज रणजीतला विचारलं तर असं कळलं की जे लोक स्थलांतर करून आले सरकारने त्यांच्या नावावर जमिनी केल्या. पण त्या सोडून बाकी सर्व जमीन सरकारी मालकीची आहे. जर जागा विकत घ्यायची असेल तर स्थानिक व्यक्तीच्या मालकीची असणारी जागा जर त्याने विकायची ठरवली तर घेता येते. पण प्रचंड भाव असल्यानं त्याची किंमत गुंठ्याला पाच कोटींच्या आसपास जाते. हा आकडा ऐकताच माझी बोलती बंद झाली.

जहाज :
जहाज

रेसोर्टसमोरचा बीच :
रेसोर्ट
राधानगर :

राधानगर

राधानगर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मजा आहे.
फोटोला पब्लिक शेअरिंग बरोबर झालेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चाचणी

ही प्रतिमा दिसत्ये का? दिसत असेल तर, धाग्यातले फोटो न दिसण्याची अडचण परवानगी, पब्लिक शेअरींगची नसून चुकीचा दुवा असण्यामुळे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाही दिसत.
ctrlq.org/google/photos
या साइटवर योग्य दुवा मिळतो किंवा काही चुकलं असलं तर ट्राइ अनदर लिंक हा मेसिज येतो. मी काल तपासलेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधानगर सारख्या सुंदर बीचचे फोटो नसतील तर मजा नाही. त्यामुळे वर्णन छान असले तरी आवडले असे म्हणवणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो टाकलेत , बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम असावा, आता दिसेना झालेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@अभिजीत, लेख टाकालाय त्याप्रमाणे करून नवीनच दोनचार फोटो टेस्ट करा. ते झाल्यास वरचे फोटो पुन्हा द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0