भर दे झोली ..!!!!

भर दे झोली ..!!!!

परवाच बारावीची परीक्षा संपली आणि माझे दोन पुतणे माझ्यासोबत नाशिकहून मुंबईला आले . कधी एकदा पेपर टाकतो आणि मुंबई गाठतो ती त्यांची अवस्था दहावीची आणि आत्ता कालची सुद्धा. मागच्या वेळी पुरे आठ दिवस राहिले दोघे , यावेळी मात्र C E T चे जोखड असल्याने तीन दिवसात परत .

मला नेहमी वाटून जातं , कि हल्लीच्या न्युक्लीअर कुटुंबाच्या फायद्या तोट्याबद्दल हिरीरीने बोलणार्यांनी एवढे तरी करावे, एकेकट्या असणाऱ्या चुलत आते वगैरे भावंडांना तरी जमेल तेव्हा एकत्र येण्याची संधी द्यावी . आमची मुलं आणि ही आलेली मुलं जेव्हा धिंगाणा घालतात तेव्हा आम्हालाच लहान होऊन गेल्यासारखे वाटते . मुलं सतत फोन अथवा कोप्यूटर समोर बसतात हे म्हणणे तद्दन खोटे ठरवत ही मुलं पत्ते 'कुटतात ' , क्यारम , दमशेराज , नंतर समुद्र , मार्केट भटकणे , धुवाधार गप्पा , भिंती हलतील असे हसण्याचे धबधबे , शाब्दिक कोट्या आणि अर्थातच आचरट खाणे यात मुलं गुंतलेली पाहिली कि मन प्रसन्न होऊन जाते Smile या साऱ्या रमखाणात मी आणि नवरा सुद्धा इक्वली आचरट बनतो . म्हणूनच ही मुलं इथे यायला प्रचंड उत्सुक असतात .

एरव्ही अभ्यासाच्या क्रूर रहाटगाडग्यात पिचून निघालेली ही मुलं या दिवसात रात्री दोन तीन चारपर्यंत सुद्धा जागत गप्पा गोष्टी करून , रात्री दोनला म्यागी किंवा जिलब्या खातात , आणि सकाळी उठून पहावे तर एकमेकांच्या अंगावर कुठेही हात पाय टाकून मनमुराद झोपलेली दिसतात , मग उठणे दहा बारा पर्यंत सुद्धा खेचले जाते , मुलांना असे झोपलेले पाहिले कि मस्त मस्त वाटून जाते. हेच तर त्यांचा वाढीचे क्षण असतात . ही सुद्धा त्यांची गरज आहे .त्यांच्या त्या झोपलेल्या चेहर्यावर सुद्धा समाधानाच्या लहरी उमटून वाहत असतात . मी तर चक्क थांबून बघत राहते त्यांच्या या मस्त खुशमिजाज झोपण्याकडे सुद्धा .

आम्ही एक मात्र करतो एरव्ही त्यांचे व्रतस्थ आई बाबा जे काही सल्ले सूचना न थकता देतात , ते देणे टाळतो , शक्यतो लांब चेहऱ्याने टाकलेले लेक्चर टाईपचे बोलणे अहं...वर्ज्य ....." हवे ते करा "म्हणून आम्हीही सुटतो .मग समुद्रावर जाता ,ठसका लागेपर्यंत पाणीपुरी कोंबणे , तोंडं लाल पिवळी करत कपड्यावर डाग पाडत बर्फाचे गोळे खाणे , वाळूत लांब पाय करून आरामात गप्पा हाणत बसणे , आल्यागेल्यावर टीका टिप्पणी करणे , प्रसंगी त्याची नक्कल सुद्धा उतरवणे कधी बांद्र्याच्या किल्ल्यावर जाऊन बसणे तर कधी गेटवेला रपेट आणि काही ही करणे हे आमचे उद्योग असतात .

मुलं इथे समोर नाहीत म्हणून थोडं गंभीर होत सांगावसं वाटतं कि आपल्याला आजोळ होतं , आजी आजोबा मावशी मामा वगैरे , गाव होतं , झोपाळे झाडं , गुरं आणि खूप काही . इव्हेंट मेनेजर्स ना वगैरे पैसे न देता घरच्यांनी घरच्यांना सोबत घेत केलेले चार पाच सहा दिवसांचे सोहळे होते , म्हणूनच आपल्या मनाच्या परड्या त्या सुंदर आठवणींनी भरून वाहू शकताहेत , तर मग हे आपलेही कर्तव्य नव्हे काय कि आपण आपल्या मुलांना भाचवंड , पुतवंडांना उद्यासाठी आठवणी निर्माण करून ठेवणे !ही मुलं एकत्र आली कि काही वेगळेच समाधान वाटून जाते .हे भाऊ माझ्या मुलींची एका भावाच्या नात्याने जेव्हा काळजी घेतात तेव्हा मुलींना सख्खा भाऊ नाही याचा विसर पडतो . ( नाही नाही ...मुलगा नाही म्हणून मी सेंटीमेंटल वगैरे झाले नाहीये ) .
वाटतं , पुढच्या पाच सात वर्षात मुलं शिक्षणासाठी , पुढे व्यवसायानिमित्त कुठे कुठे गेलेली असतील , वर्षावर्षात भेटतील न भेटतील, पण त्याही परिस्थितीत आठवणीचा खचाखच खजिना तर आपण त्यांच्या थैल्यांमध्ये ठासून भरून ठेवू शकतो . आठवणींच्या याच धाग्यातील काही दोर पकडून ही मुलं एकमेकांना धरून राहू शकतील , कुठेही का असेनात ! आज आपण जसे आठवणींच्या अथांग डोहांमध्ये डुम्बण्याची मजा घेत असतो , त्यांच्या त्या मजेसाठीचे गोड्या पाण्याचे साठे आपणच भरून ठेवू शकतो .
बरं इथे पैसा प्रतिष्ठा , पोझिशन वगैरेचा दुरान्वयेही संबंध येत नाही . आणि मुलांच्या लेखी तर नाहीच नाही . फक्त एकत्र येणे , हुंदडणे हसणे , गाणे , आणि खा खा खाणे , या साऱ्यातून एकमेकांच्या जवळ येणे असते . आणि आपण आजचे आई बाबा , मामा काका मावशी यांनी हे जुळवून आणणे असते , यात फार मोठे भव्य दिव्य काहीच नसते पण तरीही त्याचे मोल फार अधिक असते , आल्बम बनतो त्यावेळी त्याचे मोल फक्त पैशाच्या रुपात असते , परंतु सरत्या काळासोबत पैसा कमी होत होत , त्या अल्बमचे भावनिक मूल्य वाढत जाते. आपण एकाच करायचे या आठवणींच्या आल्बममध्ये अधेमध्ये काही रंगीत पिसं , काही पानांच्या नक्षी , सुगंध सांडणारेसे काही हळूच पेरून ठेवायचे ...अगदी कोणालाही न सांगता .
उद्या ...अर्थातच काही वर्षांच्या 'उद्या '....जेव्हा मुलं तो अल्बम उघडतील आणि एक एक पीस हाती धरून बसतील , हळवी होत आठवणींमध्ये हिंदोळत राहतील , तेव्हा रुपेरी बटा सावरत आपण फक्त स्मित हास्य करत असू. मागच्या पिढीने आपल्यावर करून ठेवलेल्या कर्जाची ., कदाचित ही किंचितशी परतफेडच म्हणा ना !!!

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

खूप सुंदर लेख आहे. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! सुरेख! लेख आवडला!

अर्थातच काही वर्षांच्या 'उद्या '....जेव्हा मुलं तो अल्बम उघडतील आणि एक एक पीस हाती धरून बसतील , हळवी होत आठवणींमध्ये हिंदोळत राहतील , तेव्हा रुपेरी बटा सावरत आपण फक्त स्मित हास्य करत असू. मागच्या पिढीने आपल्यावर करून ठेवलेल्या कर्जाची ., कदाचित ही किंचितशी परतफेडच म्हणा ना !!!

हे तर खूप आवडलं.. 'आज' कीती वैट्ट आहे च्या रडगाणे गात बसून तर 'उद्या'चा 'काल' बिघडवत आहोत हे कित्येकदा कित्येकांच्या लक्षात येत नाही

बाकी, ऐसीअक्षरेवर स्वागत! Smile
येत रहा लिहित रहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थ्यान्क्स मित्रा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0