टाळ्या

मच्या एव्हिएशनच्या फील्ड मध्येच एक रुबाब आहे बॉस!
कोणाला ते ताठ चालणारे युनिफॉर्ममधले पायलट आठवतील,
कोणाला तो टॉप गनमधला रे-बॅन लावलेला चिकणा टॉम क्रूझ आठवेल,
कोणाला दुसऱ्या महायुद्धातली B-52 बॉम्बर्स आठवतील...
पण मला सांगू काय आवडतं?

तो फ्लाईन्गचा नशा, ती डोक्यातली हलकीशी गरगर,
तें गुईईईईं करून खाली येणं आणि झप्पकन वर जाणं,
ते डौलात फिगर ऑफ एट काढणं...
खाली खेचणाऱ्या ग्रॅव्हीटीला एफ ओ देत उंच उंच जाताना हवेत पंखांनी रेखलेल्या त्या रेषा!

एकदा तर मृत्यूच्या लवलवत्या जिभेला हूल देत मी सरळ सूर्याच्या दिशेनेच सूर मारलेला...
समोरून येणारी तिरीप, खाली चमचमणारं पाणी आणि पाठी शत्रू...
भीती आणि डेअरींगचं अजब डुचमळतं कॉकटेल रिचवून, खदाखदा हसत, आकाशातच दोन डौलदार कोलांट्या मारून सुर्र्कन निघून जायचं.

आणि असं जीवाशी खेळून आमच्या खुफिया अडनिड्या तळावर आलं रे आलं की थोडी विश्रांती घेऊन परत सज्ज होतो आम्ही.
राऊण्ड टू ला.

पण आता मघाचा सूर्य अलवार झालेला असतो.
गाडीवर चाखलेल्या गुलाबी फालुद्यासारख्या रंगाचा.
सावल्या लांब व्हायला लागलेल्या...
अंधार हळूहळू वाढत जातो आणि आमचं मिशन पुन्हा चालू होतं...
नव्या दुप्पट जोमानं...
अंगात भिनलेलं सगळं ट्रेनिंग एकवटून टार्गेट शोधायचं
आणि सुमडीत काम वाजवून न पकडले जाता पळून यायचं
काय नशा काय आनंद असतो राजे हो... सेक्सपेक्षाही भारी.

सेक्सवरून आठवलं...
एक कबूल करू का?
फ्लाय करताना पण 'केलंय' मी ;).
एकमेकांवर गच्च स्वार होत सुखाच्या तळाशी जात उंच उंच उडायचं.
म्हणजे डबल नशा... काय म्हणतात तो तुमचा "माईल हाय क्लब".

तुम्हाला वाटलं असेल की काय हा हुच्च् निर्लज्जपणा...
पण खरं सांगू का हेच लाईफ आहे.
आयुष्य जितकं छोटं तितका तुम्ही प्रत्येक दिवस रसरसून जगता.

आमच्यासारखे आम्हीच...
आम्ही कामोत्सुक अनंगरंगी,
आम्ही दर्दी पिणारे,
आम्ही सैनिक,
आम्ही कलाकार...
आणि या सगळ्याला पुरून वर उडणारे, आयुष्याची भंगुरता पुरती कळून चुकलेले तत्वज्ञसुद्धा.

मला तर पक्कं माहितीय की मी त्या चंदेरी फुलबाजीसारखं झरझर लखलखणार आणि विझून जाणार.
सरसर तुटणाऱ्या ताऱ्यासारखं आनंदानं विलीन होणार शून्य काळोखात.
माझ्या मृत्यूला टाळ्या मात्र वाजत राहतील... एक- दोन अनंत टाळ्या.
तसंही इथं जगायचंय कोणाला वर्षानुवर्षं...

कॉलरा किंवा मलेरिया किंवा पिवळा ताप किंवा असाच काहीतरी इरिटेटिंग रोग घेऊन हॉस्पिटलात खितपत मरणाऱ्यातले आम्ही नव्हे राजे हो!

मला एक्झॅक्टली माहितीय मी कसं मरणार ते,
उडताना डाव्या पंखात बिघाड होईल किंवा
शत्रूच्या हल्ल्याने उजव्या पंखातून ठिणग्या उसळतील ...
जळकट वास पसरेल,
मीच लडबडेन माझ्या चिकट रक्तात आणि उंचावरून खोल खोल खाली कोसळेन मी,
'रोआल्ड डाल'च्या एखाद्या गोष्टीतल्या पायलटसारखं.

पण इतक्यात तरी नाही, अजूनतरी नशीब साथ देतंय.
मागल्या आठवड्याचीच गोष्ट...

तिन्हीसांजेची वेळ त्यात हलका पाऊस पडून गेलेला,
त्यामुळे व्हिजिबिलिटीचे ३६ झालेले.
मधूनच वीज कडकडतेय.
अख्ख्या वातावरणात हाय टेन्शन वायरसारखा तंगवा.
अशा विचित्र वेळी आमची सगळी टीमच थोडी हिस्टेरिकल होते.
अजय अतुलची गाणी ऐकल्यावर येतो तशा मरू किंवा मारूच्या उन्मादी अवस्थेत,
त्यात बराच काळ ऍक्शन नसल्याने सगळी टीम लिटरलली वखवखलेली...

आम्ही उडत होतो, बऱ्याच खालून...
सगळे डिटेक्टर्स चुकवत.
सा SSS वध!
कारण पकडलं की मेलो स्ट्रेट.
युद्धबंदी-फंदी काय ठेवत नायत ती हलकट माणसं.

तर...

मी टार्गेट बघितलं.
सुर्र्कन डावीकडे वळून लँड केलं.
काम वाजवलं.
गरज नसताना माझी संगिन कचाकचा आणखी २-३ दा खुपसली त्याच्यात.
(आम्हीही असा आसुरी आनंद लुटतो कधीकधी.)
आता खुशीत तळावर परतायला निघणार...
इतक्यात व्हू SSS श करून आवाज आला डाव्या पंखाखाली.
आणि काही कळायच्या आधीच आमची स्वारी गरगरायला लागली.
कन्ट्रोल गेलाच होता ऑलमोस्ट
पण मी जीव खाऊन उसळी मारली आणि वाऱ्याच्या एका सूक्ष्म थर्मल करंटवर झोकून दिलं.
शत्रू जीव खाऊन पाठी लागला होता.
माझा चेंदामेंदा केल्याशिवाय काय सोडत नाय तो आता.

मलाही कुठेतरी वर्मी लागलं होतं.
निस्त्राण पाय कापसाचे झाले होते.
पण एअरोडायनॅमिक्स माझ्या बाजूने होतं.
मी धडपडत सुरक्षित अंतरावर क्रॅश करून लॅन्ड होणार इतक्यात फाड करून मोठ्ठा आवाज झाला.
वाऱ्याचा मोठ्ठा झोत आणि शॉकवेव्ह्ज सगळ्या दिशेनी माझ्याकडे चालून आल्या.
आता पुढच्या क्षणी माझ्या चिंधड्या होणार...
इतक्यात मला जाणवलं की मी एका निर्वात पोकळीत आहे.
वेळ काळ आवाज प्रकाश सगळं थांबल्यासारखं झालं.
स्टॅनली क्यूब्रिकच्या एखाद्या पिक्चरमधल्या एलियन यानासारखी पोकळी होती ती.
सगळी गाबाचोदी सोडून शांत निर्विकार होत तिथेच संपून जावं,
किंवा माणसाच्या लहान गर्भासारखं गुरगटून रहावं त्या पोकळीत अनंत काळ.

इतक्यात ती पोकळी उघडली आणि माझा फ्री फॉल चालू झाला...
खाली खाली...
कोसळता कोसळता माझी शुद्ध हरपली.
पण त्याच्या आधी मी सुरक्षित ठिकाणी लॅन्ड व्हायची काळजी घेतलीच.
रक्तात भिनवलेलं ट्रेनिंग असं मोक्याच्या वेळी कामी आलं.

काही दिवसांनी मला बरं झाल्यावर कळलं की माझी बाकी टीम वाचू शकली नाही.
माझ्या मागे लागलेल्या शत्रूला डिस्ट्रॅक्ट करताना बाकीच्या सगळ्यांना वीरगती मिळाली.
मी सोडून कोणीच परत आलं नाही.

परमेश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो.

मी दोन दिवस आराम केला.
थोड्या दुरुस्त्या केल्या.
जखमा भरू दिल्या.
आणि धरम पाजीसारखी पुन्हा डरकाळी फोडली,
"...मै तुम्हारा खून पी..."

आणि खरं तर बदला वगैरे काय माझ्या डोक्यात नाहीये...
मला फक्त सडकून भूक लागलीय.

हो म्हणजे ऍनाफेलिस डासाची मादी असणं सोपं नाहीच.

- निखिल क्षीरसागर याच्या 'क्लॅप क्लॅप' या इंग्रजी कथेचं स्वैर रूपांतर
मूळ कथेची लिंक: Clap Clap

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडलं. बेधुंद जगणं शिकवणारं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

आभार Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो म्हणजे ऍनाफेलिस डासाची मादी असणं सोपं नाहीच.

हाण्ण!!! मस्तच.
.
प्रतिसाद मुद्दाम झाकला आहे कारण बरेचदा वाचक आधी प्रतिक्रिया वाचून, मग लेख वाचतात. त्यांच्याकरता गौप्यस्फोट नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

Thanks शुचि Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या मृत्यूला टाळ्या मात्र वाजत राहतील... एक- दोन अनंत टाळ्या.

BiggrinBiggrinBiggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको