म्हाताऱ्या स्त्रियांची कहाणी ( मूळ पोलिश कवी: तादेऊश रुजेविच - मूळ पोलिश कविता: Opowiadanie o starych kobietach ओपोविआदानिए ओ स्तारंख कोबिएताख)

एक अत्यंत मोठा पोलिश कवी रुजेविच याची ही कविता मला कधीची भाषांतरित करायची होती. आज मुहूर्त लागला. हे भाषांतर संपूर्ण भाषांतर नसून किंचित रूपांतर देखील आहे. पोलिश-मराठी भाषांतरात काय समस्या येतात यावर स्वतंत्रपणे काहीतरी लिहिता येईल किंवा चर्चाही करता येईल, परंतु सद्यस्थितीत खासकरून भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही कविता मला समर्पक वाटली म्हणून शेअर करतो इतकेच. अजून काही दिवस भाषांतराचे वेगवेगळे खर्डे केल्यानंतर कदाचित फायनल असा मसुदा तयार होऊ शकेल. परंतु सध्या हेच भाषांतर देतो. रुजेविच हा स्वतः उद्धात भाग घेतलेला मनुष्य. युद्धानंतर देशामध्ये जास्त करून म्हाताऱ्या स्त्रियाच सगळीकडे होत्या; हीच स्थिती बऱ्या पैकी जर्मनीमध्ये देखील होती आणि म्हणून या कवितेमध्ये म्हाताऱ्या स्त्रियांचे प्रतिबिंब आहे. परंतु म्हाताऱ्या काय तरुण काय मला असं वाटतं की एकूणातच आपण सर्वांनी स्त्रियांना समजून घ्यायला हवं! मारामारी, युद्ध, टोळीयुद्ध या सर्व गोष्टींचा शेवटचा बिंदू म्हणजे स्त्रियांच्या वेदना आणि त्यांची अचाट जीवनशक्ती ! रुजेविच कदाचित लोकांनी इंग्रजीमध्ये वाचला असेल. हा फार मोठा नाटककार देखील आहे; याची नाटकं भाषांतरित करावीत असं वाटतं. असो ! सध्यातरी ही कविता देतो. सूचना आणि प्रतिक्रियांचे स्वागत.

म्हाताऱ्या स्त्रियांची कहाणी

( मूळ पोलिश कवी: तादेऊश रुजेविच - मूळपोलिश कविता: Opowiadanie o starych kobietach
ओपोविआदानिए ओ स्तारंख कोबिएताख)

मला म्हाताऱ्या स्त्रिया आवडतात
आवडतात मला कुरूप
वाईट्ट’ स्त्रिया ..आवडतात

त्यांच्यामुळेच या जगात जान आहे, चव आहे.
जुन्या शब्दांत - They are the salt of this Earth.

माणसाने निर्माण केलेल्या कचऱ्याची घृणा वाटत नाही त्यांना,
नाण्याच्या दुसऱ्या बाजू: प्रेम आणि श्रद्धा
यांना चांगल्याच ठाऊक असतात.

हुकूमशहा येतात ही , जातात ही
हुकूमशहा दुसऱ्यांना मूर्ख बनवतात
हुकूमशहांचे हातांवर माणसांच्या
रक्ताचे शिंतोडे असतात

म्हाताऱ्या बायका भल्या पहाटेच उठतात
मांस, ब्रेड, फळं वगैरे खरेदी करतात
स्वयंपाक करतात, आवराआवरी करतात
हाताची घडी घालून निमूटपणे रस्त्यांवर उभ्या असतात

म्हाताऱ्या बायका अमर असतात

हॅम्लेट जाळ्यावरच्या कसरती करत असतो,
दुष्ट आणि चमत्कारिक फाउस्ट आसपास असतो
रासकोलनिकोव त्याच्या कुऱ्हाडीने प्रहार करीत असतो
म्हाताऱ्या बायका अमर अविनाशी असतात
त्या क्षमाशील सौम्यतेने हसतात

परमात्म्याचा मृत्यू होतो
म्हाताऱ्या बायका नेहमीप्रमाणेच पहाटे पहाटे उठतात
वाईन, मासे आणि ब्रेड खरेदी करतात

संस्कृती लयास जाते
म्हाताऱ्या बायका पहाटे पहाटे उठतात
खिडक्या उघडतात
लख्ख घर आवरतात
माणसं मरतात
म्हाताऱ्या बायका प्रेतं धुतात
प्रेतं पुरतात
थडग्यांवर म्हाताऱ्या बायका फुलं लावतात

मला म्हाताऱ्या स्त्रिया आवडतात
आवडतात मला कुरूप
वाईट्ट’ स्त्रिया ..आवडतात

अनंत अविनाशी जीवन दिसत असतं त्यांना
त्यांच्यामुळेच या जगात जान आहे, चव आहे.
जुन्या शब्दांत - They are the salt of this Earth.
त्या म्हणजे खोडाच्या साली आहेत
प्राण्यांचे मौन डोळे आहेत त्या

भ्याडपणा आणि वीरता
क्षुद्रता आणि मोठेपणा
हे सर्व त्यांना सम्यकपणे
दररोजच्या दिवसाच्या नक्षीच्या
गवाक्षातून दिसत असतं

त्यांची मुलं अमेरिकेचा शोध लावतात
त्यांच्या मुलांना वीरमरण येतं
त्यांची मुलं अंतराळात जातात

म्हाताऱ्या बायका पहाटे पहाटे
शहरात जातात
दूध, ब्रेड, मांस वगैरे आणतात
चविष्ट सूप वगैरे बनवतात
खिडक्या उघडतात

अशा म्हाताऱ्या, कुरूप
वाईट्ट’ स्त्रियांना फक्त मूर्ख लोक हसतात

या स्त्रिया खूप सुंदर आहेत,
या स्त्रिया खूप भल्या आहेत.

म्हाताऱ्या बायका
म्हणजे आयुष्य आहेत
ओपन सीक्रेट आहेत
अखंडपणे पुढे जाणारा धागा आहेत

या म्हाताऱ्या बायका
म्हणजे मांजरीच्या ममी आहेत

या म्हाताऱ्या बायका
म्हणजे हळूहळू कोरडे होणारे स्रोत आहेत
सुरकुतलेली फळं आहेत
किंवा ढेरपोट्या बुद्ध आहेत

म्हाताऱ्या बायका मेल्या
की
डोळ्यांतून एक अश्रू येतो
आणि तरुण मुलीच्या ओठावरच्या
स्मितामध्ये मिसळून जातो!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

म्हाताऱ्या बायका मेल्या
की
डोळ्यांतून एक अश्रू येतो
आणि तरुण मुलीच्या ओठावरच्या
स्मितामध्ये मिसळून जातो!

किती सुंदर शेवट आहे. जीजीविषा. चिवटपणा. अप्रतिम कविता आहे.
रुपांतर आवडले.
जुन्या शब्दांत - They are the salt of this Earth. ..... इथे इंग्रजी खटकलं फक्त.
मी या ओळीचे भाषांतर कदाचित 'जीवनाचा कणा/श्वास' वगैरे केले असते ............................. क-दा-चि-त!!
.

अनंत अविनाशी जीवन दिसत असतं त्यांना
त्यांच्यामुळेच या जगात जान आहे, चव आहे.
जुन्या शब्दांत - They are the salt of this Earth.
त्या म्हणजे खोडाच्या साली आहेत
प्राण्यांचे मौन डोळे आहेत त्या

त्रिवार सत्य. अगदी मनातील भावना.

सुरकुतलेली फळं आहेत
किंवा ढेरपोट्या बुद्ध आहेत

हॅटस ऑफ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

याची नाटकं भाषांतरित करावीत असं वाटतं.

इर्शाद! आमेन. तथास्तु

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको