माझा गोड बालवाडी शिक्षक

bahurupi p l deshpande

मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या, घरी टेपरेकॉर्डर, टीव्ही असणाऱ्या आणि लायब्ररीसाठी पैसे मागितले तर लगेच मिळणाऱ्या अनेक लोकांच्या आयुष्यात हा माणूस जशा प्रकारे आला त्याचप्रकारे माझ्याही आयुष्यात आला. त्याने माझं वाचनविश्व समृद्ध करून टाकलं.

त्याने लिहिलेल्या 'नवे गोकुळ'मधली “आणि इतर बालगोपाळ” या सदरात मोडणारी भूमिका करून झाल्यावर त्याच्याच 'वयं मोठं खोटं'मध्ये दूधवाल्याची तीन-चार संवाद असलेली भूमिका (मला आपलं उगाच वाटलं होतं की पात्रपरिचय करून देताना “आणि दूधवाल्याच्या प्रमुख भूमिकेत आनंद मोरे” अशा धर्तीवर माझं नाव पुकारतील, पण पात्रपरिचय करून देणाऱ्या शिक्षकांचं नाटकाबद्दलचं आकलन माझ्यापेक्षा अधिक सुस्पष्ट होतं त्यामुळे तसं काही होऊ शकलं नाही) केली होती तेव्हा याच्याबद्दल काही माहीत असावं इतकं वय नव्हतं आणि वाचनही नव्हतं. नंतर वाचन सुरू केलं तेव्हा कळलं की मराठी बालरंगभूमीची आपण जी काही अत्यल्प सेवा केली आहे तीदेखील याच्यामुळेच.

प्राथमिक शाळेत असताना मी केलेली रंगभूमीची सेवा पाहून रंगदेवता तृप्त झाली की नाही ते माहिती नाही पण ‘आपला प्रवेश संपला तरी स्टेजवरून न जाणारा दूधवाला’ हा माझा लौकिक मात्र शाळेच्या सर्व कलाशिक्षकांपर्यंत पोहोचला. त्यामुळे पुढे मी नाट्यदेवतेची आराधना करायचं सोडून प्रेक्षकांत बसून मराठी रंगभूमीची निष्काम सेवा करू लागलो.

अभिनयाचं भूत उतरल्यावर जेव्हा पुस्तकांकडे माझी दृष्टी वळली तेव्हा याच्या प्रवासवर्णनांनी, व्यक्तिचित्रणांनी, सहज आणि निर्विष विनोदांनी आणि काल्पनिक आत्मचरित्रांनी माझ्या शाळकरी वयात मोठी बहार उडवून दिली. पुस्तकांची गंमत वाढत असताना, प्रत्येक पुस्तकाच्या मलपृष्ठावर दिसणारा हा बाबा आठवड्यातून एकदा टीव्हीवर अवतरू लागला. मग 'अलूरकर म्युझिक हाऊस'तर्फे त्याच्या पुस्तकांच्या त्यानेच केलेल्या अभिवाचनाच्या कॅसेट्स निघू लागल्या आणि त्याच्या शब्दांना ध्वनीरूप मिळालं. आता त्याची पुस्तकं मुखोद्गत होणं सहजशक्य होतं आणि त्या जोरावर वर्गातील सुबक ठेंगणींसमोर भाव खाणंही सोपं होतं.

हे चालू असताना आठवीत की नववीत असताना एक धडा आला. ‘हे जग मी सुंदर करून जाईन’. अगदी चवीपुरता नर्मविनोद असलेला धडा म्हणजे एका शाळेतील गॅदरिंगपुढे केलेलं भाषण होतं. धडा मोठा होता पण इतका मोठा असूनही कुठेही कंटाळवाणा वाटत नव्हता. त्यातलं ‘जाताना मी माझ्या अस्तित्वाचे ठळक कुरूप ठसे सोडून न जाता हलक्या सुंदर खुणा सोडून जाईन’ अशा अर्थाचं वाक्य मनात चटकन खोलवर रुजलं. नंतर जेव्हा परीक्षेसाठी या धड्याचा अभ्यास केला तेव्हा कळलं की हे भाषण याच मिश्किल आजोबांनी केलेलं होतं. त्यानंतर मग केवळ टीव्ही किंवा कॅसेटवर मिळणारी त्याची पुस्तकं न वाचता त्याने लिहिलेला शब्द न् शब्द वाचायची ओढ लागली.

'जाल्मिकीचे लोकरामायण' असो किंवा मग खिल्लीमधला ‘आम्ही सूक्ष्मात जातो’ असो किंवा ‘अंतुले साहेब तुम्हारा चुक्याच’ असो किंवा मग 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' असो किंवा मग स्त्रीजातीवर चिडलेल्या आपल्या एका तरुण नातेवाईकाला सांगितलेला आयुष्याचा अर्थ असो किंवा मग 'मार्मिक'च्या समारंभाला उपस्थित न राहता आल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना पाठवलेल्या शुभेच्छा पत्रातील ‘टीका कशी वस्तऱ्यासारखी असावी. ज्याची केली त्याची गुळगुळीत व्हावी आणि वर त्यानेच वस्तरा चालवणाऱ्याचं कौतुक करावं’ अशी वाक्यं असो किंवा मग 'रसिकहो', 'श्रोतेहो', 'मित्रहो' असे भाषणसंग्रह असोत; हा माणूस कमालीच्या सफाईने माझ्या मनाचा ताबा घेत चालला होता.

मुकुंद टांकसाळेंनी त्याच्यावर लिहिलेल्या एका लेखात म्हटलं आहे की ‘या माणसाने आमचं सांस्कृतिक विश्व घडवलं. काय चांगलं आहे आहे ते त्याने आम्हाला मोठ्या हौसेने दाखवलं’ हे निदान माझ्या बाबतीत तरी निखळ सत्य आहे. त्याने सांगितलं म्हणून मी बालगंधर्व, कुमार गंधर्व, भीमसेन ऐकू लागलो. त्याने सांगितलं म्हणून मला रवींद्रनाथांची थोरवी कळली, त्याने सांगितलं म्हणून मी वस्त्रहरणमधील शिव्यांची लाखोली मनमुराद हसत ऐकली, रामनगरी, कोसला, आणि कित्येक विद्रोही साहित्य आणि अनेक कवी व कविता माझ्या आयुष्यात केवळ या माणसामुळेच येऊ शकले.

मग एक काळ असा आला की या माणसाचं मला अजीर्ण होतंय की काय असं वाटू लागलं. हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन अँड द सी’चं याने केलेलं भाषांतर वाचून 'हाच का तो माझा लाडका शब्दप्रभू?' म्हणून प्रश्न पडू लागला. 'रसिकहो', 'मित्रहो' आणि 'श्रोतेहो' या तिन्ही पुस्तकांतील भाषणांत साचेबद्धपणा आहे असं वाटू लागलं. 'वंगचित्रे'मधील कम्युनिस्ट विचारधारेबाबतची अस्पष्ट मतं वाचून माझ्या लाडक्या लेखकाच्या अर्थशास्त्राच्या ज्ञानाविषयी मनात शंका उत्पन्न झाली. अनेकांनी याच्यावर केलेली टीका थोडीफार पटू लागली. 'गुण गाईन आवडी'चा त्याचा ध्यास खुपू लागला. त्यामुळे याच्या पुस्तकांपासून थोडा दूर राहू लागलो.

फार काळ दूर राहिल्यानंतर कदाचित या दुराव्यातील शुष्कता ओसरली. आणि पुन्हा कधीतरी याची पुस्तकं हातात घेऊ लागलो. यूट्यूबवरील याचे अभिवाचनाचे प्रयोग प्रवासात ऐकू लागलो. लहानपणी ज्या ज्या विनोदांवर हसू येत होतं त्याच जागांवर आयुष्याचे चटके खाऊन झाल्यावर पुन्हा तितक्याच जोरात आणि कदाचित अनुभवसिद्ध असल्याने अजून जास्त परिपक्वपणे फुलणारं हसू जाणवून याचं नाणं अस्सल आहे हे मान्य करून टाकलं. आता भक्ती नव्हती पण प्रेम मात्र वाढू लागलं होतं आणि त्या आपण या प्रेमात आहोत याचाही आनंद होत होता. Ratatouille चित्रपटातील क्रिटिक अँटोन इगोचं जेव्हा मतपरिवर्तन होतं तेव्हा त्याने म्हटलेल्या लांब स्वगतातील The new needs friends या वाक्यात माझ्या लाडक्या लेखकाच्या 'गुण गाईन आवडी'च्या आग्रहाचा अर्थ दिसू लागला.

मग कधी कधी थोडं लिखाण करू लागलो. आणि जाणवलं की हा माणूस माझ्यासाठी बालवाडीच्या शिक्षिकेसारखा आहे. तिनेच पहिली धुळाक्षरं गिरवून घेतली असतात. तिनेच अक्षरओळख करून दिलेली असते. नंतर आपण मोठमोठी पुस्तकं वाचतो, अभ्यास करतो, त्यासाठी नवनवीन शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतात. पण मूळ अक्षराभ्यास करवून घेणाऱ्या बालवाडी शिक्षिकेमुळे आपण पुढची इमारत बांधू शकतो.

कुणासाठी भाई, कुणासाठी बहुरूपी, कुणासाठी आजोबा, कुणासाठी महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेला हा लेखक माझ्यासाठी मात्र बालवाडीत अक्षरांची तोंडओळख करून देणाऱ्या, शाळेची गोडी लावणाऱ्या शिक्षिकेसारखा आहे अशी माझ्या मनाशी खूणगाठ बांधून ठेवली होती.

आज सकाळी चालायला गेलो होतो. कानात कायद्याबद्दलची एक डॉक्युमेंटरी चालू होती. चालणं संपलं. पाणी पीत होतो. फोन खिशात होता. डॉक्युमेंटरी संपली. आणि सकाळच्या रम्य वातावरणात सूर्य उगवत असताना यूट्युबने नवीन काहीतरी चालू केलं. माझ्या या पुरूषोत्तम बालवाडी शिक्षिकेने साठ वर्ष पूर्ण केली होती तेव्हा दूरदर्शनने एक डॉक्युमेंटरी बनवलेली होती. त्याच्याच आवाजात. त्याचा आवाज कानी पडला आणि चालण्याचे श्रम विसरलो. डॉक्युमेंटरी ऐकत घरी आलो. आणि जाणवलं हा मनुष्य केवळ माझी बालवाडी शिक्षिका नसून जर माझं आयुष्य एक गाणं असेल तर त्या गाण्याला मी सुरुवात करायच्या आधी मला सूर देणारा आणि नंतर स्वतःचं अस्तित्व जाणवू न देता सातत्याने तो सूर चालू ठेवणारा तानपुरा आहे. हा नसता तर माझ्यातल्या अपूर्णत्वामुळे अनेकदा कणसूर होणारं माझं गाणं नक्कीच बेसूर झालं असतं.

त्याच्या जन्मशताब्दीच्या वर्षात मला माझ्या गाण्यातील तानपुरा कोणता ते जाणवलं म्हणून यूट्युबचे आणि माझ्याच नावाच्या त्या अनोळखी अपलोडरचे धन्यवाद.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

फार सुरेख लिहीले आहेत मोरे. आवडले. ती डॉक्युमेंट्री ऐकत आहे.

सहज आणि निर्विष विनोदांनी

वाह!!
हा शुक्रवार प्रसन्न जाणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

फार काळ दूर राहिल्यानंतर कदाचित या दुराव्यातील शुष्कता ओसरली. आणि पुन्हा कधीतरी याची पुस्तकं हातात घेऊ लागलो. यूट्यूबवरील याचे अभिवाचनाचे प्रयोग प्रवासात ऐकू लागलो. लहानपणी ज्या ज्या विनोदांवर हसू येत होतं त्याच जागांवर आयुष्याचे चटके खाऊन झाल्यावर पुन्हा तितक्याच जोरात आणि कदाचित अनुभवसिद्ध असल्याने अजून जास्त परिपक्वपणे फुलणारं हसू जाणवून याचं नाणं अस्सल आहे हे मान्य करून टाकलं. आता भक्ती नव्हती पण प्रेम मात्र वाढू लागलं होतं आणि त्या आपण या प्रेमात आहोत याचाही आनंद होत होता

आणि हे!

मला जवळपास सत्याण्णवटक्के असंच म्हणायचं आहे. ते तुम्ही एकदम सॉलिड शब्दबद्ध केल्याबद्दल थ्यांक्स!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झक्कास, अफाट, भारी लिहीलेलं आहे! लेख अतिशय आवडला. पुलं कालातीत आहेत.
आजकालच्या 'वोक' जगाच्या परिमाणांमध्ये त्यांची अभिव्यक्ती मोजणं हे अन्यायकारकच नाही तर रुक्षही आहे. पुलं खरंच काय होते, ह्याची आठवण करून देणारा लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||