भीमाशंकरच्या लाकूडचोरीची गोष्ट

तर ते दिवस होते पेटलेले . निसर्गप्रेम , निसर्गसंवर्धन , निसर्गरक्षण वगैरे .
तर झाले असे कि आम्ही तीन चार मित्र नेहमीप्रमाणे भीमाशंकरला गेलो होतो. दिवस उन्हाळ्याचे . अजेंडा होता की पक्षी नेहमीचेच झाले , यावेळी जरा या जंगलातील प्राणी बघुयात. रात्री. भीमाशंकरमधील एक आटत आलेले तळे ही जागा ठरली. साधारणपणे त्याच्या कडेच्या एका कोपऱ्यात काळ्या स्लीपिंग बॅग्समध्ये रीतसर लपून , दबा वगैरे धरून आम्ही संध्याकाळी बसलो . ( सर्वसाधारणपणे प्राणी पाण्यावर संधिप्रकाश आल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत एकापाठोपाठ पाणी पिण्याकरिता येतात , अशी माहिती होती )
बघता बघता रात्रीचे अकरा वाजले. काहीही पाण्यावर आले नाही ( पुढच्या उन्हाळ्यात हाच प्रयोग केला,लपून बसण्याची जागा बदलून , तेव्हा ज्ञानप्राप्ती झाली कि आदल्यावर्षी आपण प्राणी येण्याच्या बरोब्बर वाटेवर लपून वगैरे बसलो होतो. म्हणजे त्यादिवशी प्राणी आमचा पार्श्वभाग बघून वाईट वाईट शिव्या देत परत गेले असणार )
मग वैतागून रस्त्यावरच्या कट्ट्यावर टाईमपास गप्पा हाणत बसलेले असताना एकदम किर्रर्र वगैरे शांततेचा भंग वगैरे होऊन एका ट्र्कचा आवाज आला . ( तत्कालीन भीमाशंकरात संध्याकाळनंतर फक्त आली तर एक यष्टी येत असे . बाकी कुठलेही वाहन नाही. ) त्यामुळे पर्यावरणरक्षक कार्यकर्ते भूमिकेत जाऊन आम्ही सगळे एकदम शेरलॉकसजग झालो आणि त्या आवाजाच्या दिशेने हळूहळू जाऊ लागलो . ट्रक टेकडीवरच्या फारेश्ट बंगल्याच्या दिशेने गेला . ट्रक गच्च भरलेला, लाकडांनी, ओल्या.पाठलाग वगैरे करत तिथे पोचल्यावर ट्र्क डायवर व बंगल्यातील एक कर्मचारी यांची कुजबुज ऐकली आणि ती संशयास्पद आहे असा निष्कर्ष काढून ट्र्कचा नंबर लिहून घेतला आणि काय हे ?भीमाशंकरच्या प्रीस्टाईन जंगलात थेट फारेश्टच्या कर्मचाऱ्यांच्या सहमतीने जंगलतोड ? छ्या !! हे थांबायलाच हवे अशा फ्रस्ट्रेटेड पेटल्यावस्थेत मोरमाऱ्याच्या झोपडीतील बाकड्यावर येऊन पडी टाकली.

सकाळी यष्टी धरून पुण्याला आलो . आणि पुण्यातील जुने जाणते कार्यकर्ते /प्रा यांच्याकडे जाऊन " हे बघितलंय , आता काय करायचं ते सांगा " असा खडा सवाल टाकून राहिलो . ते फारच जुने आणि जाणते* असल्याने त्यांनी " अरे असं नाही , हे काम शिस्तीत करायचं असतं" वगैरे प्रबोधन केलं आणि तक्रार दाखल करायला फारेश्ट डिपार्टमेंटच्या सायबाला फोन लावून त्यांच्याकडे आम्हाला धाडून दिलं .
फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सायबाने सरकारी पद्धतीने आम्हाला घोळवून ( खाजगी जमिनीवरील जंगलतोड असेल तर सरकार काहीही करू शकत नाही रे मुलांनो वगैरे ) तक्रार दाखल करून घेतली . पुढे काहीही होणार नाही अशी निराशाजनक खात्री बरोबर घेऊन आम्ही बाहेर पडलो .

अन दुसऱ्या दिवशी अहो आश्चर्यम !! समदी ष्टुरी महाराष्ट्र टाईम्सात आमच्या नावासकट छापून आली. हा कट फॉरेस्ट च्या सायबाचा की आमच्या जुन्या जाणत्या प्रांचा याचा शोध काही लागला नाही . घरच्या लोकांना मात्र , ' आपला दिवटा नुसताच कुठेतरी बोंबलत हिंडत नसून पेप्रात छापून येण्याइतपत काहीतरी लोकोत्तर कार्य करत असावा ' असा संशय येऊ लागला .
पुढच्या आठवड्यात फॉरेस्टचा साहेब म्हणतोय ते खरेच काय, हे बघण्यासाठी आमच्यातील एकजण भीमाशंकरच्या कोकण साईडला गेला आणि परत आल्यावर ' आपण बघितले ते काहीच नाही , निस्ते ढीग लागलेत लाकडाचे सगळीकडे ' असा रपट घेऊन आला . हे अजून भयानक होतं . तर असो . पुढच्या घटना या फक्त फ्रस्ट्रेशन वाढवणाऱ्या होत्या आणि काळाच्या ओघात हे लक्षात आलं आपली कार्यकर्तेगिरी ही अत्यंत नाईव्ह आहे आणि त्याने शाट्ट काहीही फरक पडत नाही . कशालाही , कुणालाही .
एकदम मोठेच झालो म्हणाना . ( च्यायला !!) एवढेच . असो.

निवेदन : ही ष्टुरी लाईट मूड मधे लिहिलेली आहे . बरेच तपशील गाळून . लाईट मूड अशाकरिता की आमची बाळबोध पद्धतीने केलेली ( अजूनेक ) कार्यकर्ते गिरी वाया कशी गेली हा लाईट पार्ट आहे . यानंतर आमच्या जुन्या जाणत्या प्रांनी कुणा एका राजकीय नेत्याकरीता कुठलीही गरज नसताना भर जंगलातून काढलेल्या प्रस्तावित भीमाशंकर मुंबई रस्ता शिस्तबद्ध पद्धतीने , डेटा गोळा करून , शास्त्रीय अर्ग्युमेंट्स करून कोर्टाकडून थांबवला , तो आमच्याकरिता ' करावे कसे नेटके ' हा वस्तुपाठ होता .
मूळ मुद्दा प्रचंड गंभीर आहेच . गुजराथच्या दक्षिणेला चालू होऊन पार केरळ पर्यंत गेलेला पश्चिम घाट , त्यावरील जंगल त्यातील प्राणी, वनस्पती , पक्षी व इतर सजीव हा अत्यंत संवेदनशील असा एक जेमतेम चार आठ किलोमीटर रुंद आणि हजारहुन जास्त किलोमीटर लांब असा पट्टा . त्यातील जेनेटिक पूल व इको सेन्सेटीव्हिटी, त्यातील समृद्धी ही कमालीची महत्वाची आहे .त्याचे सलग असणे हे अतिशय महत्वाचे आहे . का ? हा फार मोठा आणि वेगळा विषय . दुर्दैवाने याबद्दल आता फारसे बोलले जातही नाही . ( त्याने त्याचे महत्व अजूनच जाणवते ) अँबी व्हॅली , लव्हासा सारखे बलात्कारी प्रकल्प. विकास आणि थोड्या प्रमाणात पर्यटन याच्या शॉर्टसाईटेड पॉलिसीज याबद्दल लिहावे तितके कमी . इथे लिहीत नाही , फार मोठा विषय असल्याने . म्याटर सिरीयस आहे .

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उत्तम लेखन.

पण हे बाबूजींप्रमाणे प्रत्येक मैफिलीत "आज घसा बरोबर नाहीये, आवाज लागत नाहीये" म्हणणं बंद करा.

सारखं "हे लिहीत नाही, ते सोडून देतो, हा मोठा विषय आहे, तो वेगळाच विषय आहे, का लिहितोय मी हे" , वगैरे सोडा आणि पुढे लिहा.

 • ‌मार्मिक4
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण ज्यांच्याकडे बोंबलायला जावं तोही यात हात धुवून घेत असतो ( विरोधी असल्यास भांडवल करणे) अशा काही प्रकरणात. कुठे वाळू,कुठे खडी,कुठे जंगलसंपत्ती, कुठे मासे असा डल्ला मारला जात असतोच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय आवडला.

गुजराथच्या दक्षिणेला चालू होऊन पार केरळ पर्यंत गेलेला पश्चिम घाट , त्यावरील जंगल त्यातील प्राणी, वनस्पती , पक्षी व इतर सजीव हा अत्यंत संवेदनशील असा एक जेमतेम चार आठ किलोमीटर रुंद आणि हजारहुन जास्त किलोमीटर लांब असा पट्टा . त्यातील जेनेटिक पूल व इको सेन्सेटीव्हिटी, त्यातील समृद्धी ही कमालीची महत्वाची आहे .त्याचे सलग असणे हे अतिशय महत्वाचे आहे

पण लक्षात कोण घेतो! Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लिहिले आहे.

(पण तरीही, मूळ स्वभाव जाईना, म्हणून..‌.)

तर ते दिवस होते पेटलेले . निसर्गप्रेम , निसर्गसंवर्धन , निसर्गरक्षण वगैरे.

पेटवून निसर्गाचे रक्षण कसे काय होते ब्वॉ?

(विशेष काही नाही, परंतु प्रथमग्रासे, सलामीलाच हे वदतो व्याघाताचे मौक्तिक लाभल्याने अंमळ गंमत वाटली, इतकेच.)

... आणि, पेटवल्याने जर निसर्गरक्षण होत असेल, तर त्याच उफराट्या लॉजिकने, लाकूडतोड केल्याने निसर्गसंवर्धन होते, असे जर त्या लाकूडचोरास वाटले असेल, तर त्यात त्या बिचाऱ्याचा काय दोष?

(तरी बरे, त्याच्या ट्रकमधली लाकडे ओली होती. पेटली नसती.)

असो. फारा वर्षांपूर्वी, अर्ली नाइंटीज़मध्ये, आम्हीही तत्कालीन कार्यालयीन हौशी सहकर्मींबरोबर भीमाशंकरास गेलो होतो, ते आठवले. बोले तो, आता आठवत काहीही नाही. आठवते, ते फक्त अगदी पायासमोर कडा असला, तर तोही दिसणार नाही, इतके दाट धुके. बाकीच्या आठवणी त्या धुक्मनावस्थेत (श्रेयअव्हेर: पु.ल.) विरून गेलेल्या आहेत. आणखी धूसरसे आठवतात, ते त्या तसल्या धुक्कड्यापाशी (याचे श्रेय मात्र आम्हालाच, बरे का!) टपरीवर (खरे तर कोणा स्थानिकाच्या घराबाहेर) बसून खाल्लेले चहा आणि पोहे. झालेच तर, भीमेचा उगम जेथे होतो, तेथे करंगळीभर पात्रातून (पात्रच म्हणतात ना त्याला?) केलेली पायपीट. आणि चिंचोळी डोंगरवाट रानरेड्याने अडवून धरली होती, तेव्हा फाटलेली पार्श्वभूमी. (मात्र, या आठवणी अंधुक असल्याकारणाने, तपशिलांची चूभूद्याघ्या.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. मी पेटलेला होतो. आणि त्याचा काहीही उपयोग नव्हता (, पण हे कळायला अजून काही वर्षे गेली. चालायचेच.)
२. तुम्ही केलेल्या वर्णनावरून तुम्ही पावसाळ्यात नव्हे तर थंडीच्या दिवसात तिथे गेले असणार. पावसाळ्यात भीमेची करंगळी नसते . चांगला मोठा प्रवाह असतो ( किंवा हाच्च तो भीमेचा उगम असे दाखवून कुणी स्थानिकाने तुम्हाला xx बनवले )
३. रानरेडा नसणार,तुमची वाट अडवणारा. कुणी स्थानिकाचा पाळलेला असणार. भीमाशंकरात रानरेडे नसावेत . किंवा ज्याला चुकीने बायसन म्हणतात जी खरा गौर असतो, म्हणजे गवा तो माझ्या माहितीत भीमाशंकरात नसावा ( त्याकरिता सातारा व त्याच्या दक्षिणेचा भाग पकडायला हवा)
सवयीने मार्मिक दिला आहे. जुनी खोड, जात नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किती सुंदर लिहीलय अबा. अहो तुम्ही लिहीत का नाही असं. अतिशय मनोरंजक आहे. विशेषत:

तर ते दिवस होते पेटलेले . निसर्गप्रेम , निसर्गसंवर्धन , निसर्गरक्षण वगैरे .

ही सुरुवात कै च्या कै सुंदर आहे. किस्सा फार आवडला.

घरच्या लोकांना मात्र , ' आपला दिवटा नुसताच कुठेतरी बोंबलत हिंडत नसून पेप्रात छापून येण्याइतपत काहीतरी लोकोत्तर कार्य करत असावा ' असा संशय येऊ लागला .

कसली हसले. फारच मस्त.

प्राणी येण्याच्या बरोब्बर वाटेवर लपून वगैरे बसलो होतो. म्हणजे त्यादिवशी प्राणी आमचा पार्श्वभाग बघून वाईट वाईट शिव्या देत परत गेले असणार )

हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

अतिसुंदर लेखन. आवडले एकदम. कधी कधी असे काहीतरी करावेसे वाटते पण मग नंतर त्यापायी मार खावा लागल्याची, प्रसंगी जीव गमावल्याची उदाहरणे पाहिली की ममव जागृत होतो. Sad

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या वयात ही भीती वाटत नाही
कौटुंबिक जबाबदारीचे ओझे नसणे आणि मुख्य म्हणजे काय होऊ शकतं यांच्याबद्दल कल्पना नसणे, अति आत्मविश्वास/बेफाम , बेदरकार वृत्ती आणि आपण करतोय ते 'कार्य' अत्यंत उदात्त आहे अशी भावना बाळगणे या सगळ्याचं मिश्रण होऊन एक मोकाट बिनधास्तपणा येत असावा त्यावयात.

आवर घालू नये याला... मस्त असतंय ते....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. इतर गोष्टींप्रमाणेच मूळ स्वभाव हाही एक महत्त्वाचा पैलू आहे यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हेही खरेच म्हणा...माझी कमेंट ही जनरल होती हेवेसानल...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण कोडगे झालेले नसतो आणि कुणाचा फुकटचा सल्ला मानून गप्प बसत नसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0