न्यूटन - अस्वस्थ करणारी धमाल

लोकसभेच्या निवडणुका अर्थात लोकशाहीचा वसंतोत्सव हे आख्यान दिसातासाने रंगू लागले आहे. कोण देशप्रेमी, कोण देशद्रोही, कोण शूरवीर, कोण पळपुटे, कोण भ्रष्ट, कोण दुष्ट, कोण सुष्ट, कोणी कुठे जावे नि जाऊ नये, चौबाजूंनी नुसती कारंजी उडताहेत.
भारतात होणाऱ्या कुठच्याही निवडणुकांत मतदानाची टक्केवारी जाहीर केली जाते आणि तत्परतेने दुर्लक्षितही. शहरी भागात, ग्रामीण भागात, निमशहरी भागात, नक्षलग्रस्त भागात किती मतदान झाले यावरून काही मंडळी काही निष्कर्ष काढतात आणि त्या निष्कर्षांकडेही यथायोग्य दुर्लक्ष केले जाते.
आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांत २०१४ सालची ६६.४०% ही सगळ्यात जास्त. १९५२ सालची ४५.७०% ही टक्केवारी वगळता इतर सर्व निवडणुकांत ती सातत्याने ५५%च्या वर राहिली आहे.
तर या अवाढव्य देशात निवडणुका (ज्यात ५५% ते ६६% मतदार मतदान करतात) घेण्याचे कर्तव्य पार पाडणारा निवडणूक आयोग नक्की काय नि कसे काम करतो? प्रत्यक्ष कोण मंडळी हे घडवून आणतात? त्यांची त्यामागची प्रेरणा काय?
यांची काहीशी उत्तरे देणारा 'न्यूटन' हा कृष्णविनोदी चित्रपट गुंगवून ठेवतोच, पण मधून अधून विखारी बोचकारेही काढतो. अर्थात ज्यांना बोचकारून घ्यायची इच्छा आहे अशाच लोकांना. बाकीची मंडळी "उग्गाच तिच्यायला डोक्याला शॉट" असे म्हणून खानावळीकडे चालू पडतात.
न्यूटनचे खरे नाव नूतन. उगाच हौस म्हणून स्वतःला 'न्यूटन' म्हणवून घेतो. हा एक सरकारी कर्मचारी. प्रामाणिकपणे सरकारी नोकर म्हणून असलेले आपले कर्तव्य पार पाडण्याचा सदैव आटोकाट प्रयत्न करीत असलेला.
एका निवडणुकीत त्याची 'प्रिसायडिंग इलेक्शन ऑफिसर' म्हणून दंडकारण्य या छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भागात नेमणूक होते. सोबत संरक्षणासाठी 'सी आर पी एफ'चे जवान आणि त्यांचा असिस्टंट कमांडंट आत्मा सिंग. भारतातल्या वेगवेगळ्या भागात घेतल्या जाणाऱ्या निवडणुका या विषयात लोणच्यासारखा मुरलेला. वयाने न्यूटनपेक्षा मोठा, सगळे काही 'नीट आणि व्यवस्थित' करण्याच्या न्यूटनच्या हट्टाला जमेल तेवढा मान देणारा.
सोबत बाकीची बाबूमंडळी. कमीअधिक अनुभवी. एक आदिवासी स्त्री कार्यकर्ती मदतीसाठी.
न्यूटनला जग वगैरे अजिबात बदलायचे नाही. त्याला फक्त आपले 'कर्तव्य' पार पाडायचे आहे.
नक्षलवादी भाग. हिंसाचार डोहातल्या मगरीसारखा कुठेही डोके वर काढू शकतो. काढतोही. पण तो हिंसाचार असतो की बनाव?
मतदानाची टक्केवारी १०० टक्के असावी यासाठी धडपड करणारा न्यूटन. निवडणुका म्हणजे काय, निवडलेले महंत पुढे काय करतील, या आणि अशा प्रश्नांची उत्तरे निरक्षर खेडुतांना देण्याची जबाबदारी त्याची आहे की नाही?
सी आर पी एफ चा आत्मा सिंगच्याही वरचा साहेब आणि परदेशी वृत्तवाहिनीची श्वेतवर्णीय निवेदिका यांना नक्की काय बघायचे असते नि नक्की काय दिसते?
आत्मा सिंग भ्रष्ट आहे, आळशी आहे, की अगतिक आहे?
या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रत्यक्ष चित्रपट बघणे हा सर्वोत्तम उपाय.
हा चित्रपट नवीन आणि/वा धक्कादायक असे काहीच सांगत नाही. पण कधीकधी संयत स्वरात सांगितलेली नेहमीची कहाणीही आक्रस्ताळ्या गोंगाटावर मात करून जाते!

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चांगला वाटतोय विषय. नेहमीचा लव,मारामारी नाचगाणी नसल्यास फारच थोडे प्रेक्षक फिरकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर चित्रपट आहे. मला आवडला. आत्मा सिंग चे संवाद मस्त आहेत. "देखो कैसे भूखे शेर की तरह वोट देने के लिए खडे हो गये" वगैरे ड्राय ह्यूमर जबरी आहे.

एका बाजूला सगळे काटेकोर नियमाप्रमाणे करायला जाणारा, वास्तवाची फारशी कल्पना नसलेला आणि कसलीही प्रॅक्टिकल तडजोड सुद्धा करायला तयार नसलेला, कोणतीही व्यवस्था राबवायला अनेक लोकांशी जुळवून घ्यावे लागते याची नवखेपणामुळे अजिबात कल्पना नसलेला न्यूटन, तर दुसऱ्या बाजूला अशा असंख्य तडजोडी करत करत मूळ उद्देशच विसरलेला आत्मा सिंग यांच्यातील विरोध फार सुंदर दाखवला आहे. सर्कारी प्रोसेस मधला एक दिवस - अशा दृष्टीने सुद्धा पाहताना लोकांचे वागणे वगैरे बघायला इण्टरेस्टिंग आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न्यूटन पाहिल्यानंतर मी राजकुमार रावचे चित्रपट शोधून पाहायच्या भानगडीत पडलो इतका तो आवडला. मात्र तुम्ही हा लेख हूल दिल्यासारखा उरकलाय. मला चित्रपट केवळ निवडणूक संदर्भात आहे असे वाटले नाही. न्यूटनचा एकंदर प्रवास (सुरुवातीचा मुलगी पाहण्याचा प्रसंग, नंतर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) वगैरेही महत्त्वाचे वाटले. संजय मिश्राने त्याच्या छोट्या रोलमध्ये मस्त काम केलंय. संजय मिश्राचा डायलॉग "न्यूटन तुम्हारा प्रॉब्लेम है की तुम्हे ऑनेस्ट होने का घमंड है" हा चित्रपटाचा आत्मा आहे असे मला वाटले. फारएण्ड यांनीही वरच्या प्रतिसादात चित्रपटाचं थोडक्यात सुंदर वर्णन केलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न्यूटन पाहिला असेल तर बरेली की बर्फी अवश्य पाहा. राजकुमार राव + आयुष्मान खुराणा = फुल टू धमाल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न्यूटनमधला लक्शात् राहिलेला संवाद:

"...क्या आप भी निराशावादी है?"
"मै तो आदिवासी हू।"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||