आठवणीतील गीत रामायण...

1983 साल आठवणीत घर करुन आहे कारण त्यावर्षी क्रिकेटचा वर्ल्ड कप कपिलच्या चमू ने जिंकला होता.

ते उन्हाळ्याचे दिवस होते.

दुसरं कारण जास्त महत्वाचं कारण या दिवसांमधेच मी गीत रामायणाचं पारायण केलं.

माझ्या चुलत भावाचं इलेक्ट्रिकचं दुकान होतं. साउंडबाक्स, ढीग भर कैसेट्स. त्याच्या कडे गीत रामायणाचा 10 की 12 भागांचा सेट होता. मला तो सेट दिसला तर मी त्याचा मागे लागलो की मी घेऊन जातो हा सेट, मला ऐकायचंय गीत रामायण.

कारण ‘पराधीन आहे जगती’ हे गीत माझे दादा (वडील, आम्ही त्यांना दादा म्हणत असूं) म्हणायचे. ते या गीताचे दोन-तीन कडवेच गायचे. त्यांचं दुसरं आवडतं गाणं होतं ‘सुध बिसर गई आज अपने गुनन की, आई गई बात बीते दिनन की.’ लग्न कार्यात गाण्याची घरगुती मैफल सजली की त्यांना या गीताची हमखास फर्माइश व्हायची.

दुसरं कारण रामनवमीच्या दिवशी दुपारी नागपुर नभोवाणी केंद्रावरुन मािणक वर्मांचं गाणं-विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, तसंच सुधीर फडकेंचं राम जन्मला ग सखे राम जन्मला ही दोन गीते हमखास वाजत असत. ते मैट्रिकचं वर्ष होतं. गीत रामायणातील बरीचशी गाणी तुटक-तुटक ऐकली होती. ते काव्य आवडलं होतं. मराठीत अख्खं रामायण आहे, हे माहीत झाल्यानंतर इतर भाषिकांना याविषयी सांगताना हुरूप यायचा.

तर दादा म्हणाला घेऊन जा. आता आली पंचाइत. घरी टेप रेकार्डर नव्हता. दादांसोबत आफिस मधे नाथन अंकल होते. त्यांच्या कडे टेप रेकार्डर (पैनासोनिकचा) होता. मी त्यांना विचारलं, ते म्हणाले घेऊन जा. मग काय विचारता कैसेट्सचा तो सेट आणि टेप रेकार्डर, घरी आणला.

आणि गीत रामायण ऐकलं.

बरीचशी गाणी तोंडपाठ झाली.

दशरथा घे हे पायसदान (ऐकताना कृतार्थ दिसती तुझी लोचनें) म्हणत बाबूजींची नक्कल करतांना मजा यायची.

शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम. (आता मोबाइल आल्यावर एकदा आपल्या घोगरया आवाजात हे गाणं रेकार्ड देखील केलं की बघूंया कानांत इतकं साठलंय हे गाणं, गळ्यातून निघतं का.)

रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले. (याचं शेवटचं कडवं पुन्हा पुन्हा म्हणायची इच्छा व्हायची)

कोण तू कुठला राजकुमार,

तोडिता फुले मी सहज पाहिला जाता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा.

ही गीते आजदेखील ठळकपणे आठवतात.

गीत रामायण सुधीर फडकेंच्या आवाजात, आपल्या घरी असायला भाग्य हवं की. मला मिळालं.

मधल्या काळांत इंदौरहून एक कलाकार आमच्या इथे महाराष्ट्र मंडळात (पंचवीस वर्षांपूर्वी) गीत रामायण गाऊन गेले होते. ते देखील मनाला भावलं. आणि कसं त्यांच्या कंजूसपणा बद्दल राग देखील आला. आता कसला कंजूसपणा. तर मी सुधीर फडकेंच्या गीत रामायणामधे 56 गीते ऐकली. त्यांनी 15-16 गाणीच म्हटली. तेव्हां इतकी समज नव्हती की तीन साडे तीन तासांत हेच शक्य होतं.

गीत रामायणाची श्रवणभक्ति करतांना दिवस कसे छान जात होते. आणि या श्रवणभक्तिनेच अनपेक्षितपणे एक छान आठवण दिली. ते काय म्हणतात ना लाइफ टाइम एक्सपीरियंस.

एके वर्षी महाराष्ट्र मंडळाच्या गणपती उत्सवात माझी काकू सौ. सुषमा तेलंग, यांनी गीत रामायणाचा कार्यक्रम बसवला. त्याच्या तालमी काकूंच्या घरी व्हायच्या. तो पर्यंत माझ्याकडे मोट्‌ठा टेपरेकार्डर आलेला होता. तर ती तालीम सुरू होऊन एक-दोन दिवसानंतर मी काही तरी कामानं काकू कडे गेलो होतो. तर तिथे गाण्याची प्रेक्टिस सुरू होती. विचारलं तर कळलं की गणपतीत गीत रामायण सादर करायचंय, त्याची तयारी चाललीय. काकूला माहीत होतं की गीत रामायण म्हणजे रवीचा वीक पाइंट. तिने मला विचारलं तू पण ये की तालमीला.! अनपेक्षित पणे आलेल्या प्रश्नामुळे मी थोडासा गोंधळलो. म्हटलं मी काय करीन.तर काकू म्हणाली तालमीत बसायचं. त्या दिवशी मी थांबलो. त्या मंडळींनी काकू जवळ असलेल्या गीत रामायणाच्या पुस्तकातून गीते उतरवून घेतली होती. आणि ते गायची प्रेक्टिस सुरू होती. तयारी छान होती. तालीम संपल्यावर काकूनी विचारलं काय रवी, कशी आहे आपली तयारी. मी सांगितलं छान. पण मला वाटतंय की या आपल्या मंडळींनी सुधीर फडकेंची ही गीते ऐकलेली नाहीत. ती जर का ऐकली तर आपला कार्यक्रम आणखीन छान होईल.

ती म्हणाली घरी बाबूजींची एलपी रेकार्ड आहेत रे, पण रेकार्ड प्लेयर खराब आहे. मी म्हणालो माझ्या जवळ टेप आहे. आणि कैसेट्स पण. तिचा चेहरा खुलला. ती म्हणाली. व्वा, जमलं की. (काकू शिक्षिका असून रिटायर्ड झाली होती. तिनेच मला मराठी वाचनाची गोडी लावली.) दुसरया दिवसापासून मी आपला टेप रेकार्डर घेऊन काकू कडे. ती गीते कैसेट फारवर्ड करुन, ती कैसेट त्या मंडळींना देऊन ऐकवली. आणि मी तालमींना नियमितपणे जाऊ लागलो.

माझ्या श्रवणभक्ति मुळे मला त्या मंडळींचे काही उच्चार खटकायचे. मग मी त्यांना माझ्या घोगरया आवाजात ती जागा अशी नाही अशी आहे, असं सांगायचो. (खूपच हुशार दिसतोय लेका, अशातला भाग नाही. परफारमेंस परफेक्ट व्हावा इतकाच उद्देश्य होता.) मी फक्त कोपरे शार्प केले, असं म्हणां हवं तर.

आता बघा, ते ‘तोडिता फुले मी सहज पाहिला जाता मज आणुनि द्या तो हरिण अयोध्यानाथा.’ गीत म्हणतांना आवाज पुरूषी आहे म्हणून समजतं की ते बाबूजी आहेत.

पण बायकांचा लडिवाळपणा, आर्जव.त्यांत ठासून भरलाय. ‘झळकती तयाचा रत्ने श्रृंगावरती.’ या पहिल्या कडव्या पासूनच बाबूजी थेट आपल्या मनाचा ठाव घेतात.

झळकती तयाचा रत्ने श्रृंगावरती
नव मोहफुलांसम सुवर्ण अंगावरती
हे नयन भाळले त्याच्या रंगावरती
ते इंद्रचापसे पुच्छ भासले उडतां.

नंतरचं हे कडवं तर कहर आहे.

चालताे जलद गती मान मुरडितो मंद
डोळयांत काहीसा भाव विलक्षण धुंद
लागला मृगाचा मला नाथ हो छंद
वेडीच जाहिले तृणांतरि त्या बघतां.

किती लडिवाळपणा, चक्क रामराया समाेर.

किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू
त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू
मज साठी मोडिले आपण शांकर धनु.
जा, करा त्वरा, मी पृष्ठी बांधिते भाता.

मारुन बाण त्या अचुक जरी माराल
काढून भावजी घेतिल त्याची खाल
त्या मृगासनी प्रभु, इंद्र जसे शोभाल.
तो पहा, दिसे दूर तो टेकडी चढतां.

माय गाड. काय अफलातून आवाज लागलाय. बाबूजींचा.

आणि कसंय ना, पक्के कान असलेला माणूस तीच अपेक्षा करेल. नक्कल नाही तरी वाटलं तर पाहिजे ना की सीता माई रामरायांना म्हणत आहेत की माझ्या साठी तो हरिण पकडून आणा की.

हे गीत जिने सादर केलं तिला पुन्हां पुन्हां ऐकायला लावलं आणि सांगितलं की हा भाव आला पाहिजे गाण्यांत, तरच जमेल गाणं. ती भातखंडेची स्टुडेंट होती, तबलची देखील. आणि मी तिला गाण्यातील भाव कसा हवा हे सांगत होतो.

दुसरं गाणं होतं ‘रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले.’ यातील शेवटचं कडवं कसं हाई पिच मधे आहे.

पतितपावना श्री रघुराजा
काय बांधु मी तुमची पूजा
पुनर्जात हे जीवन अवघे
पायावर वाहिले
आज मी शापमुक्त जाहिले.

ज्यां काकूंनी हे गीत म्हटलं, ‘त्यांत पतितपावना.’ ची किक येत नव्हती. कारण त्या पतीत पावना श्री रघुराजा गात होत्या.त्यांना सांगितलं एकदा हे गाणं पुन्हां ऐका. गाणं टेपवर ऐकवलं त्यांना आणि सांगितलं की पतीत पावना... असं वेगळं नाहीये. ते सलग म्हणां पतितपावना. त्यांनी गाऊन बघितलं आणि शाबासकी ची थाप देत म्हणाल्या काय रवी, किती बारीक लक्ष असतं रे तुझं गाण्याकडे.

काकूंनी फक्त एकच गाणं म्हटलं ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा.’

तिने संथ लयीत जो स्वर लावला होता तबलचीला इतकं संथ तबला वाजवणं जमलं नाही. म्हणून तिने फक्त हारमाेनियमच्या साथीने ‘पराधीन आहे जगती’ अप्रतिम सादर केलं. त्या लहानशा हाल मधे माइक वर घुमणारा तो तिचा आवाज. बाबूजींचा पराधीन आहे बरेचदा ऐकलाय, पण फक्त हारमोनियमच्या सोबतीनं हे गीत इतकं छान म्हणता येतं, याचा अनुभव पहिल्यांदाच आला.

गंमत कशी मी शेवटच्या रांगेतला श्रोता.ज्या दिवशी कार्यक्रम झाला मी हालच्या बाहेरुन कार्यक्रम ऐकला. शेवटी काकूनी आभार प्रदर्शन केलं. माझा उल्लेख करुन ती म्हणाली आमच्या या कार्यक्रमाच्या तालमीत रवी ने खूप मोलाची साथ दिली. त्याने ही मूळ गीते आम्हाला कैसेट वर उपलब्ध करुन दिली.

कार्यक्रमात काहीहि सहभाग नसतांना स्टेज वरुन कार्यक्रमाचा संचालक आपली प्रशंसा करतोय, हा लाइफटाइम एचीवमेंट आहे की नाही.

मंडळी, गीत रामायणाच्या श्रवणभक्ति मुळे मला ही संधि मिळाली.
-------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान लिहिलं हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! खूप सुंदर लिहीली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0