तुमचे तेंडुलकर आमचे गोखले

Vikram Gokhale

लोकशाहीची गळचेपी होते आहे असं म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे अशा अर्थाचं वक्तव्य विक्रम गोखलेंनी केल्याची बातमी वाचली. तीव्र भाषा असल्याने यावर समाजमाध्यमांवर प्रतिसादांचा महापूर लोटणं स्वाभाविक होतं. त्याप्रमाणे तो लोटलाही. त्यात माझ्या एका तरुण मित्राने 'तुमचे तेंडुलकर आमचे गोखले', अशा अर्थाची एक पोस्ट टाकली आणि माझ्या तरुणपणी (म्हणजे आजच्यापेक्षा मी पंधरा वीस वर्षं लहान असताना) एका इंटरव्ह्यूत मला विचारला गेलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाने आजतागायत मला केलेली साथ आठवली.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्या प्रश्नाचं माझं मलाच वेगवेगळं उत्तर मिळत गेलं आणि प्रत्येक वेळी मला मिळालेलं उत्तर माझ्या मते आधीच्या उत्तराची सुधारित आवृत्ती होती. वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्यात प्रत्येक वेळी मला त्या उत्तरांचा फायदा झाला, वैचारिक गोंधळ कमी झाला आणि काय योग्य काय अयोग्य? याचा निवाडा करणं सोपं गेलं. वेगवेगळ्या अनुभवांमुळे समज जसजशी वाढत गेली तसतशी गतायुष्यातील चुकीच्या निर्णयांतील चुकाही समजू शकलो आणि त्या पुन्हा होणार नाहीत याची बऱ्यापैकी काळजी घेऊ शकलो. (इथे जर कुणी 'अजून काही तुझी समज वाढलेली दिसत नाही', असा आक्षेप घेतला तर तो मला खोडता येईलच याची खात्री नाही त्यामुळे त्याने पुढे वाचलं नाही तरी चालेल.)

प्रश्न होता :'where do you think your authority comes from?'

जेव्हा तो प्रश्न इंटरव्ह्यूत विचारला गेला तेव्हा मी पंचविशीच्या आसपास होतो. घरच्यांचा माफक विरोध शांत करत आंतरजातीय, आंतरराज्य आणि आंतरभाषिक विवाह करून आयुष्य स्थिर करू पाहत होतो. चार वर्षांच्या कोर्टशिपनंतर प्रेयसी जेव्हा बायको होते तेव्हा तिच्यात होणारे बदल अनुभवत होतो. नवीन घर घेतलं होतं. लग्न पहावं करून आणि घर पहावं बांधून हे आयुष्यातले महत्त्वाचे दोन्ही निर्णय स्वतःच्या हिमतीवर घेतल्याने मी उत्तर दिलं, 'योग्य विचार करण्याच्या माझ्या क्षमतेतून मला आयुष्यात कुठलीही गोष्ट करण्याचे आणि इतरांकडून करून घेण्याचे अधिकार मिळतात.'

उत्तर दिलं खरं पण माझा मीच समाधानी नव्हतो. त्यामुळे तो प्रश्न डोक्यात रुंजी घालत राहिला. अजूनही घालतो.

एक दिवस जाणवलं की जर चार वर्षांच्या कोर्टशिपनंतर प्रेयसी जेव्हा बायको होते तेव्हा तिच्यात बदल होतात हे प्रियकराला वाटू शकतं तर तसे बदल नवरा बनल्यावर प्रियकरात झाले आहेत असं बायकोलाही वाटू शकतंच की. आणि मला माझ्या इंटरव्ह्यूतल्या उत्तरातला फोलपणा जाणवला.

जेव्हा मला वाटतं माझा विचार योग्य आणि समोरच्यालाही तसंच वाटतं, तोपर्यंत ठीक. पण जेव्हा मला वाटतं माझा विचार योग्य पण समोरच्याला दुसरा विचार सुचतो आणि त्याला स्वतःचा विचार योग्य वाटतो तेव्हा माझा विचार समोरच्यावर लादण्याचा मला काय अधिकार? आणि समजा जर मी लादण्याचा असा माझा अधिकार मान्य केला तर तो अधिकार समोरच्यालाही आहे हे मला मान्य करावं लागेल. मग कुणाचं मत ग्राह्य धरायचं हा प्रश्न उभा राहील. मग परंपरेमुळे, आर्थिक किंवा सामाजिक किंवा शारिरीक ताकदीमुळे जो बलवान असेल तो विचार लादण्याचा आपला अधिकार जास्त समर्थपणे वापरेल आणि दुसऱ्याची गळचेपी होईल.

आपण गळचेपी करणं शक्य तितकं टाळायचं असा माझा आग्रह असल्याने मी माझं पहिलं उत्तर टाकलं आणि नवीन उत्तराच्या शोधाला लागलो. प्रश्न तोच : 'where do you think your authority comes from?'

मी आता तिशी ओलांडली होती. दोन मुलांचा बाप झालो होतो. स्वतःच्या व्यवसायात थोडा स्थिर झालो होतो. मुलांच्या मागण्यांमुळे कधीकधी स्वतःच्या मागण्यांना मुरड घालू लागलो होतो.

त्याचवेळी वयाने माझ्यापेक्षा किंचित लहान असलेला अतिशय लाडका नातेवाईक स्वतःच्या व्यवसायात अडकल्याने माझ्याजवळ आला. त्याला मदत करण्यात मला आनंद वाटू लागला. त्याच्यासाठी, त्याला तोट्यातून आणि कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी माझ्या लहानसहान सुखासीन इच्छांचा त्याग करणं मला आनंददायी वाटू लागलं. मी स्वतःला त्यागमूर्ती समजू लागलो. न केलेले किंवा थोडेफार केलेले त्यागही मला मोठे भासू लागले. जिवलग नातेवाईक बिचारा अडकला असल्याने माझे सगळे विचार ऐकत होता. अमलातही आणत होता. त्याच्यावर माझे विचार मी लादतो आहे असं मला स्वप्नातही वाटत नव्हतं त्यामुळे गळचेपी वगैरेचा प्रश्नच उद्भवत नव्हता.

यथावकाश माझा जिवलग ऋणमुक्त झाला. त्याचा मार्ग त्याला सापडला. आता त्याला माझे जे विचार पटत नव्हते ते तो सांगू लागला. आणि माझ्या अधिकारांच्या भरधाव निघालेल्या गाडीला धक्के बसू लागले. मी तुझ्यासाठी त्याग केला आहे त्यामुळे तुझ्यावर मला अधिकार आहे. आणि तुला माझे विचार अमलात आणावे लागतील अशी माझी त्याच्याकडे मागणी होती. आणि माझ्या या मागणीसाठी एक प्रचंड तत्त्वज्ञान माझ्याकडे तयार होतं. त्यागाचं तत्त्वज्ञान.

आईवडिलांना मुलांवर अधिकार का असतो? कारण ते मुलांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून स्वसुखाचा त्याग करतात. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुरुंगवास भोगलेल्यांना किंवा देशासाठी प्राण गमावणाऱ्या सैनिकांना इतर नागरिकांवर अधिकार का असतो? कारण त्यांनी इतरांसाठी स्वसुखाचा त्याग केलेला असतो. गांधीजींचा त्याग मोठा म्हणून त्यांचा अधिकार मोठा. इथपर्यंत मी पोचलो होतो आणि त्यागाच्या इंधनावर पळणाऱ्या माझ्या अधिकारांच्या गाडीतलं इंधन संपत आलं.

त्याग केला आहे हे केवळ त्याग करणाऱ्याला वाटून चालत नाही तर ज्याच्यासाठी तो त्याग केला आहे त्यालाही त्या त्यागाचं मोल जाणवलं पाहिजे तरंच त्याग करणाऱ्याला अधिकार मिळतात. ज्याच्यासाठी त्याग केला त्याला जर त्या त्यागाचं मोल नसेल किंवा कमी वाटत असेल तर त्यागमूर्तीला मिळणारे अधिकार अनिर्बंध किंवा अमर्याद नसून त्यांची व्याप्ती किंवा मर्यादा ज्यांच्यासाठी तो त्याग केला त्यांच्या मनातील त्यागाच्या मूल्यावर अवलंबून असते. जितकं ते मूल्य जास्त तितकी अधिकारांची व्याप्ती जास्त. जेव्हा हे कळलं तेव्हा अनेकांना मान्य असणारा गांधीबाबा काहींना का मान्य नाही? किंवा एका गटाला मान्य असणारे सावरकर, आंबेडकर, टिळक इतर गटांना का मान्य नाहीत त्याचं उत्तर मिळालं.

जिवलगाच्या आयुष्यावर मीच ठरवलेल्या त्यागातून उद्भवलेल्या माझ्या अधिकारांचा विळखा मग सैल पडला. 'where do you think your authority comes from?' चं उत्तर 'मी केलेल्या त्यागातून' हे काही सार्वकालिक नाही आणि ते अमर्याद अधिकार देऊ शकत नाही हे जाणवलं आणि मी तिसरं उत्तर शोधण्याच्या मागे लागलो.

आता मी चाळिशीजवळ पोहोचू लागलो होतो. योग्य विचार करण्याची क्षमता, इतरांसाठी त्यांच्या नकळत किंवा त्यांनी न मागितलेले त्याग आपल्याला इतरांवर अमर्याद अधिकार देत नाहीत हे कळून चुकलं होतं. पण मग दोन व्यक्तींना एकाच गोष्टीबाबत दोन वेगवेगळे विचार सुचले असतील तर कुणाचा विचार मान्य करायचा आणि का? याचं उत्तर मिळत नव्हतं.

आणि एक दिवस डोक्यात एकदम लख्खकन प्रकाश पडला. उत्तर का मिळत नव्हतं त्याचं उत्तर सापडलं. माझा प्रयत्न होता की अधिकार मिळण्याचं जे कारण मी शोधीन त्यामुळे मिळणारे अधिकार सार्वकालिक असावेत आणि पुन्हा पुन्हा अधिकार मिळवण्याची कटकट येऊ नये. अधिकार एकदा मिळावेत आणि नंतर ते कायमचे वापरता यावेत हे माझं गृहितक सगळा घोटाळा करत होतं.

एकाला आपले विचार इतरांकडून राबवून घेण्याचा अधिकार मिळणं शक्य आहे पण तो क्षणिक असतो कायमचा नसतो हे गृहीतक वापरलं तर मात्र माझा प्रश्न सुटू शकतो हे जाणवलं.

'where do you think your authority comes from?' या प्रश्नाचं आता जे उत्तर मिळालं आहे ते शेवटचं आहे असं मी म्हणत नाही. कदाचित अजून आयुष्य बघितलं तर अजून सुयोग्य उत्तर मिळेल हे मला मान्य आहे. पण आता तरी मला असं वाटतं की इतरांचे विचार आपल्यापेक्षा वेगळे असताना आपला विचार इतरांकडून राबवून घेण्याचा अधिकार आपल्याला तेव्हाच मिळतो जेव्हा आपण इतरांपेक्षा जास्त घटकांचा आणि कारण-परिणामांच्या साखळीचा वेध घेऊ शकतो. अर्थात आपण असं केलं आहे हे इतरांना झटकन मान्य होणार नाही. त्यामुळे त्यांना ते समजावून सांगण्यासाठी अंगी सहनशीलता लागेल, समोरच्याचा आणि त्याच्या मताचा आदर करावा लागेल. इतकं करून जर आपण समोरच्याला पटवू शकलो तरीही मिळणारा अधिकार क्षणिक असेल. कारण तोवर जर इतर कुणी अधिक सखोल आणि दूरगामी विचार केला तर आपल्याकडे आलेला अधिकार त्याच्याकडे जाईल. जर कुणीच तसं केलं नाही तर अधिकार आपल्याकडेच राहील हे जितकं खरं, तितकंच निर्णयाच्या बऱ्यावाईट परिणामांची जबाबदारी आपल्यावरच असेल हेही तितकंच खरं. अधिकार मिळतो तो समयोचित आणि समर्पक असण्यातून. वयामुळे, पैशामुळे, स्थानामुळे, त्यागामुळे अधिकार मिळत नाहीत. आणि मिळालेला अधिकार कायमस्वरूपी टिकत नाही. समयोचित राहून तो टिकवावा लागतो.

प्रत्यक्ष आयुष्यात सगळेजण हे आचरणात आणतील याची आज तरी शक्यता अतिशय कमी आहे. पण अधिकारांचा जन्म आणि त्यांचं वहन याप्रकारे होऊ देणारं नातं, व्यवस्था किंवा समाज अधिक प्रगल्भ असेल आणि त्याच्याकडून घोडचुका होण्याची शक्यता कमी असेल असं मला वाटतं.

आता या सगळ्याचा विक्रम गोखलेंच्या वक्तव्याशी काय संबंध? तर तो संबंध माझ्या मित्राने केलेल्या पोस्टमुळे आहे. त्याची पोस्ट गेल्या काही वर्षांत फेसबुकवर लोकप्रिय झालेल्या 'तेव्हा कुठे गेला राधासुता तुझा धर्म?' किंवा 'त्यांना का नाही बोललात?' या वाक्यांसारखी आहे. ही दोन्ही वाक्य अधिकारांच्या जन्माचा वेगळाच सिध्दांत वापरतात.

कारण इथे मागितले जाणारे अधिकार मी ज्या अधिकारांबद्दल बोलतोय ते नसून पूर्णपणे वेगळे आहेत. एकच अडचण सोडवण्याच्या दोन वेगवेगळ्या विचारांतून एक पर्याय कसा निवडायचा? कुठल्या विचाराला इतर विचारांवर अधिकार मिळावा? आणि का? हे माझे प्रश्न होते आणि आहेत. एखाद्याने आधी एक चूक केली म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी अधिकार कसे तयार होतात हा मुद्दा माझ्या पध्दतीतल्या तिन्ही उत्तरांच्या आधारे सोडवणं चूक आहे.

'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?' हे वाक्य खरोखरच महाभारतात बोललं गेलं असेल तरीही ते वैयक्तिक अन्यायाचा बदला घेण्यासाठी वापरलेलं आहे. मी अधर्माचरण करतो आहे याची त्यात कबुली आहे आणि हे अधर्माचरण केवळ तुझ्यापुरतं करतो आहे याचीही त्यात जाणीव आहे. बदला घेण्यासाठी आपण धर्मच्युत होतो आहोत हे अयोग्य आहे हे त्यात अध्याहृत आहे.

लोकशाहीत जेव्हा सत्ताधारी पक्ष बदलतो तेव्हा सध्याच्या सत्ताधारी पक्षाने पूर्वीच्या सत्ताधारी पक्षाचा किंवा सध्याच्या सत्तासमर्थकांनी पूर्वीच्या सत्तासमर्थकांचा बदला घ्यायचं ठरवलं तर ते संपूर्णतया चूक आहे. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी चुका केल्या, त्यांच्या समर्थकांनी चुका केल्या म्हणून तर सत्ताबदल झाला. याचा अर्थ असा की जनतेला त्या चुका नकोशा आहेत. त्याच चुका आता तुम्ही कशा प्रकारे करून दाखवाल, यासाठी तुम्हाला वेगळी संधी दिलेली नाही.

एकाने चुका केल्या, सत्तेचा गैरवापर केला, म्हणून त्याच किंवा त्याहून अधिक मोठ्या चुका करण्याचा अधिकार दुसऱ्याला मिळतो ही तार्किक चूक आहे. हा तर्कदोष तर आहेच, पण तो समाजासाठी अतिशय घातक आहे.

अधिकार चुका करण्यासाठी मिळत नसतात. ते चुका सुधारण्यासाठी मिळत असतात. तुमचा दाऊद तर आमचा गवळी, तुमचे खान तर आमचा हृतिक. ही जशी हास्यास्पद आणि चिंताजनक विधानं होती, तशीच तुमचे तेंडुलकर तर आमचे गोखले हेही विधान हास्यास्पद आणि भविष्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

अधिकार मिळतात ते काम करायला. चुका करायला कुणालाच अधिकार मिळत नाहीत. चुका होतात. त्यांची जबाबदारी घ्यायची असते आणि त्या पुन्हा होणार नाहीत याची खबरदारीदेखील. इतरांच्या चुकांतून आपल्यालाही त्याच चुका करण्याचा अधिकार मिळवणं म्हणजे शेखचिल्ली मानसिकता आहे. त्यातून केवळ ज्या फांदीवर आपण बसलो आहोत ती तुटेल आणि आपला कपाळमोक्ष होईल.

जर सध्या चालू आहे ते महाभारत असेल, आणि प्रत्येकाला आपली बाजू पांडवांची वाटत असेल, तरी भगवंतांना मात्र दोन्ही बाजूला कौरव आहेत असंच दिसत असेल. जोपर्यंत आपण 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म' चा खेळ खेळत राहू तोपर्यंत अठराव्या अध्यायातील 'यत्र योगेश्वरः कृष्णो'चा श्लोक भगवंत म्हणणार नाहीत याची मला खात्री आहे.

टीप : where do you think your authority comes from? हा प्रश्न जर इंटरव्ह्यूत आला आणि इंटरव्ह्यू मॅनेजरच्या जागेसाठी असेल तर I think my authority comes from the system असं उत्तर द्यावं. आणि जर तो सीईओच्या जागेसाठी असेल तर रेडिमेड उत्तरं लागू होत नसून स्वतःचं डोकं वापरणं आवश्यक आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला. तुम्ही केलेले विचारमंथन आणि त्याची प्रक्रिया समजावून सांगण्याची पध्द्तही आवडली.
वैयक्तिक आयुष्यांत जे अनुभव आले त्यावरुन, कोणावरही अधिकार गाजवण्याचे मी सोडून दिले आहे. एखादा आप्त चुकत असेल, तर त्याला एकदाच त्याच्या संभाव्य परिणामांची जाणीव करुन द्यावी, त्यासाठी मागे लागू नये, हे अनुभवानेच शिकलो. मागितल्याशिवाय सल्ला देऊ नये, हे तर परक्यांच्या बाबतीत कटाक्षाने पाळावे, हे आई वडिलांकडून शिकलो.
सार्वजनिक जीवनांतही तुम्ही म्हणता ते अगदी मान्य आहे. पण सध्याच्या आवेशयुक्त काळांत, ते किती लोक समजू शकतील हाच खरा प्रश्न आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

विचारप्रक्रिया आवडली. राजकारणाबद्दलचा संदर्भ तितकासा कळला नाही. पण हे कळले की ' अमक्याने गाय मारली म्हणुन आपल्याला त्याचे वासरु मारण्याचा अधिकार मिळत नाही.'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परब्रह्म हे भक्तांसाठी| उभे ठाकले भीमेकाठी||
उभा राहिला भाव सावयव| जणू की पुंडलीकाचा||
हा नाम्याची खीर चाखतो| चोखोबाची गुरे राखतो||
पुरंदराचा हा परमात्मा| वाणी दामाजीचा! कानडा राजा पंढरीचा||

आवडला.
(शेवटची टीपही उपयोगी)!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अधिकार मिळतात ते काम करायला. चुका करायला कुणालाच अधिकार मिळत नाहीत. चुका होतात. त्यांची जबाबदारी घ्यायची असते आणि त्या पुन्हा होणार नाहीत याची खबरदारीदेखील.

अगदी खरे.

शिक्षण क्षेत्रात किंवा एकूणच सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांत अधिकार राबवताना केवळ आहे ती व्यवस्था सुरळित चालावी एवढ्यासाठीही भरपूर खपावे लागते. अशा वेळी अधिकार नैतिक वर्तणुकीतून प्रस्थापित करता येतो. आपण स्वतः कामात कुचराई न करणे ही आपली वृत्ती दुसऱ्यांना काही सांगण्याचा नैतिक अधिकार देते, पण करवून घ्यायचे काम किती व कसे होईल हे समोरच्याची मूल्यव्यवस्था कशी आहे यावर ठरते. हक्काच्या बाबतीत जागरुक, कर्तव्य टाळणे आणि नियमांच्या चौकटीत राहून टाळणे ही वृत्ती जिकडेतिकडे पाहायला मिळते. चांगली कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी काय करता येईल हे मला न सुटलेले कोडे आहे. अर्थात माझे त्याबाबतीत कोणतेच प्रशिक्षण झालेले नाही. स्वतःचा भावनांक वाढवण्याचा प्रयत्न करणे तसेच दुसऱ्याला कामाची निकड पटवून देणे आणि जबाबदारीची जाणीव करून देणे ही कसरत करत राहावी लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लेख!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अधिकार चुका करण्यासाठी मिळत नसतात. ते चुका सुधारण्यासाठी मिळत असतात
.
कदाचित हा लेख या विचारमंथनाला पुष्टी देणारा असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अधिकार मिळतो तो समयोचित आणि समर्पक असण्यातून. वयामुळे, पैशामुळे, स्थानामुळे, त्यागामुळे अधिकार मिळत नाहीत. आणि मिळालेला अधिकार कायमस्वरूपी टिकत नाही. समयोचित राहून तो टिकवावा लागतो.

हे अगदी बरोबर वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
थोडा है , थोडे की जरूरत है |
जिंदगी फिर भी यहॉ खूबसूरत हैं ||

टीप : where do you think your authority comes from? हा प्रश्न जर इंटरव्ह्यूत आला

आनंदराव, 'आपल्या' धंद्यात "from knowledge and experience" हे योग्य उत्तर आहे.

मी समोरच्याला एखादी गोष्ट करायला सांगतो ती माझ्या ज्ञान+अनुभव यांच्या बळावर. त्यातून त्यांना मला फाट्यावरच मारायचं असेल तर मी म्हणतो मार बाबा. युवर्स इज रेड. नंतर बोंबलत यायचं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.