सांभाळ

त्या प्रसंगाला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. पण आजही ते चित्र जसच्या तसं डोळयांसमोर येत राहतं माझ्या!

त्या शनिवारच्या सकाळी मी एका छोटया गावात होते. सकाळचे जेमतेम अकरा - साडेअकरा वाजले होते, पण सूर्य डोक्यावर अक्षरश: तळपत होता. बस स्थानकावर मला उतरवून घ्यायला जे स्थानिक कार्यकर्ते आले होते, त्यांच्यापैकी एकाच या शाळेत काम होत. मला कोणाला भेटायच नव्हत शाळेत; म्हणून शाळेच्या आवारात थांबवलेल्या चारचाकीत मी नुसतीच बसून होते.

डाव्या हाताला दिसत असलेली शाळेची इमारत देखणी होती. शाळेसमोर भव्य पटांगण होत - त्या खुल्या मैदानामुळे त्या इमारतीला एक प्रकारचा उठाव आला होता. त्या मोठया मैदानातून अनेक मुलं-मुली जा-ये करत होती. ते बहुतेक सगळे घरी चालले होते शाळा संपवून. त्याचवेळी मैदानाच्या एका बाजूने, माझ्या गाडीजवळून जाणा-या दोन लहान मुलांनी माझ लक्ष वेधून घेतलं.

ती मुलगी साधारणपणे सात-आठ वर्षांची असेल. पांढरा ब्लाऊझ आणि निळा स्कर्ट असा गणवेश तिच्या अंगावर होता. केस छोटेच होते तिचे पण त्याची तिने ऐटदार शेपटी बांधली होती (पोनी टेल). तिच्या पाठीवर दप्तर होतं. तिच्या डाव्या खांद्यावर आणखी एक दप्तर लटकलेलं होतं - ते बहुधा त्या मुलाचं होतं. हा चार-पाच वर्षांचा मुलगा तिचा धाकटा भाऊ असावा अशी मी अटकळ बांधली. तिच्या उजव्या खांद्यावर आणखी एक कापडी पिशवी होती - त्यात एखादी वजनदार वस्तू असावी असं मला वाटलं. छोटा भाऊ हसत हसत बहिणीला काहीतरी सांगत होता. त्याचे कुरळे केस कपाळावर आले होते - त्यासोबत त्याचे चमकते डोळे हा पोरगा खटयाळ आहे अस सांगत होते. धाकटया भावाला शाळेतून नीट घरी घेऊन येण्याची जबाबदारी आज त्या ताईकडे (तीही छोटीच होती म्हणा!) दिसत होती तर!

छोटयाच्या मनात अर्थातच वेगळे बेत होते. ताईला आपण सहज गुंडाळू शकू याची त्याला अनुभवातून आलेली खात्री असणार. त्यामुळे आज शाळेतून घरी जाताना पाहिजे ते करायला आपण मोकळे आहोत असा त्याचा अविर्भाव दिसत होता. ताई जास्त रागावू शकणार नाही हे त्याला माहिती होतं त्यामुळे तो जरा जास्तच खोडकर मूडमध्ये दिसत होता. ताईचा हात सोडून; त्याने घरचा रस्ता सोडून इकडेतिकडे धावायला सुरुवात केली. ताई त्याला हाक मारत होती, स्वत:चा हात पुढे करून त्याला बोट पकडायला सांगत होती. तिच्या हाकांकडे साफ दुर्लक्ष करत छोटा जोरात धावत होता - ताईपासून लांब. मग ती ताई त्या तीनही पिशव्यांचे ओझे सांभाळत भावाच्या मागे धावायला लागली. छोटा मधेच पळायच थांबवून 'आपण याला पकडूच एका क्षणात' अशी आशा ताईच्या मनात जागवत होता. ताई हाताच्या अंतरावर आली की छोटा परत जीव खाऊन पळत होता. छोटयाचे हात मोकळे होते, दप्तर ताईच्या गळ्यात अडकवून तो मोकळा झाला होता, त्यामुळे तो मस्त पळत होता. 'पकड बघू मला आता' असं ताईला तो चिडवतही होता. त्याला मस्त मजा येत होती असं पळायला आणि ताईला चिडवायला.

सुरुवातीला ताईही हसत होती, तिलाही मजा वाटत होती बहुतेक. पण दोन तीनदा असं झाल्यावर मात्र ती रडकुंडीला आली. छोटयाला आपण इतक्या तीन पिशव्यांच्या ओझ्यासह पकडू शकणार नाही याची तिला जाणीव झाली बहुतेक. मैदान चारी दिशांनी मोकळच असल्याने छोटा कोणत्याही दिशेने पळत होता आणि मागच्या दहा मिनिटांत ते अजिबात पुढे सरकले नव्हते - गोल गोल त्याच ठिकाणी फिरत होते ते. चौथ्यावेळी जवळजवळ हातात आलेला छोटा निसटून लांब पळाल्यावर मात्र ताईचा धीर खचला. ती खाली बसली. तिच्या दोन्ही खांद्यावरच्या पिशव्या जमिनीवर पडल्या. ती मान खाली घालून हुंदके द्यायला लागली. तिच शरीर थरथर कापत होतं - अपमानाने की अपयशाने ते कळायला मला काही मार्ग नव्हता. गुढग्यांत आपला चेहरा लपवून ती रडत होती. ती अगदी असहाय्य वाटली मला त्या क्षणी.

आपण मदत करावी त्या ताईला की मधे पडू नये अशा दुविधेत सापडले मी तेव्हा. मी एकदम नवखी असल्याने मी मधे पडले तर त्या मुलांना माझी भिती वाटू शकते हेही होतच, ते मला टाळायच होत. दोन मिनिटं वाट पाहू, बघू पुढ काय होतय ते असा विचार करून मी गाडीत तशीच शांत बसून राहिले. आपल्याकडे कोणाच लक्ष आहे हे त्या दोघांच्या गावीही नव्हत.

दरम्यान छोटा पळत पळत थोडा दूर गेला होता. मागे वळून पहात 'पकड मला, पकड' अस हसत तो ओरडत होता. त्याला आधी त्याच्या नजरेच्या टप्प्यात ताई दिसलीच नाही. त्याच ओरडणं थांबल, चेह-यावरच हसू मावळलं. साशंकपणे त्याने भोवताली पाहिलं - मग त्याला थोडी दूर जमिनीवर फतकल मारून बसलेली त्याची ताई दिसली. एक क्षणभर त्याला काही समजलं नाही. त्याने इकडेतिकडे पाहिलं - कशासाठी ते मला कळलं नाही. त्याचे डोळे विस्फारले. क्षणभर तो तसाच उभा राहिला - अगदी शांतपणे.

मग तो दात ओठ खात अगदी जीवाच्या आकांताने धावत सुटला. पण यावेळी तो ताईपासून लांब पळत नव्हता तर ताईकडेच चालला होता. तो ताईच्या अगदी जवळ आला; पण ताई तर अजून मान खाली घालून रडतच होती. छोटयाने मागून ताईच्या गळयात हात टाकले, त्याने ताईचा चेहरा वर करून तिच्या गालाचा पापा घेतला, त्याने तिच्या पाठीवर हात फिरवला आणि ताईचे दोन्ही हात पकडून तो ताईला उठवायला लागला. मधेच थांबून त्याने ताईचा चेहरा पुन्हा वर केला, तिच्या गालावरचे पाणी त्याने स्वतःच्या हातांनी पुसून टाकले. ताईला छोटयाची ही एक युक्ती वाटली. आपण उभे राहिलो की छोटा पुन्हा लांब पळेल अशी तिला बहुतेक भिती वाटत होती, त्यामुळे आता ती उठायला तयार नव्हती.

एक हात ताईच्या हातात तसाच ठेवून दुस-या हाताने छोटयाने एक पिशवी जवळ ओढली. त्यातून पाण्याची बाटली काढून त्याने ताईला पाणी प्यायला दिलं. मग ताईही हसायला लागली. आता छोटयाने हात थोडा ओढला तिचा आणि ती उठून उभी राहिली. छोटयाने आपल दप्तर आपल्या पाठीवर लटकवल, ताईच्या खांद्यावर दुसरी पिशवी लटकवायला तिला मदत केली. मग छोटयाने आपला हात पुढे केला, तो ताईने पकडला ... आणि ते दोघेही त्यांच्या घराच्या दिशेने चालायला लागले.

ब-याच अंतरापर्यंत मला ते दोघे दिसत होते. दोघं बोलत होते, हसत होते. दोघंही मजेत चालले होते. आधी फक्त ताई छोटयाला जपत होती; आता मात्र छोटाही ताईची काळजी घेत होता. त्यांच नातं तेच होत, फक्त नात्यातली भूमिका मात्र बदलली होती. सांभाळ दोघंही एकमेकांचा करत होते.

**
पूर्वप्रसिद्धी: http://abdashabda.blogspot.in/2012/03/blog-post_10.html

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

Smile
प्रिय नात्याची उकल अश्याच हळूवार प्रसंगातून होते.. ती तितक्याच जिवंतपणे उभी केली आहे.
मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सविता ~

या हळव्या सुंदर लेखावर मी अन्यत्र प्रतिक्रिया दिली होतीच पण इथे या निमित्ताने पुन्हा त्या दोन निष्पाप जीवांचा शब्दरुपी सहवास मिळाल्याचा आनंद आगळाच.

"आणि ते दोघेही त्यांच्या घराच्या दिशेने चालायला लागले......"
आज या वाक्याने मला प्रकर्षाने आठवला तो सत्यजित रे यांचा जगप्रसिद्ध 'पाथेर पांचाली". यातही एक ताई आणि तिचा असाच एक छोटा भाऊ. शेतातून, झर्‍यातून हिंडत, दंगा घालीत आहेत, ऊस खा, तुरे ओरबाडत जा, पाठशिवणीची खेळ कर....दोघेच तिसरा कुणी नाही....पण असेही नाही, बहिण अचानक छोट्याला चूप करते आणि कान टवकारून दुरून येणार्‍या एका नित्याच्या ओळखीच्या आवाजाची वाट पाहते....हा तिसरा सवंगडी असतो....त्या शेताच्या बाजूने जाणारी रेल्वेलाईन....आणि त्याना काळाकुट्ट धूर भसभसा सोडत जाणारी ती आगगाडी फार भावत असते.....आता त्या आवाजाच्या अनुरोधाने या बहीणभावांची शर्यत.

तुमच्या नजरेने टिपलेले बहीणभाऊ रे यांच्याबरोबरीतीलच आहेत....शिवाय चित्रशैलीही अगदी नेमकी तशीच.

सुरेखच.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिव्हाळ्याचं नातं मस्त शब्दबद्ध केलंत तुम्ही. एकदम सरळ साधी पण भिडणारी लेखनशैली आहे तुमची Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमक्या शब्दात जिव्हाळ्याच्या नात्याचं वर्णन केलत
लेखन आवडल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

हाहाहा. मस्त. आठवणी जागवणारं.

मी पाहिलेलं/अनुभवलेलं व्हर्जन थोडं वेगळं, लहानगा मोठ्या ताई/दादाला पळवून सतावून सोडतो, मग मोठी ताई/दादा हुशारीने लहानग्याच्या लक्षात येणार नाही अशाप्रकारे झाडामागे/खांबामागे लपते/लपतो, एकदम गायब झालेली ताई/दादा पाहून लहानगा घाबरतो, हाका मारत मारत ती/तो होता त्या जागी जातो, काही क्षण त्या घालमेलीत गेल्यावर ताई/दादा मागुन येउन लहानग्याला पटकन पकडतात, लहानगा फसवणूकीची जाणिव झाल्याने रागावतो व ताई/दादा ला मारायला लागतो, हुशार ताई/दादा लहानग्याला प्रेमाने जवळ घेतात आणि समजावतात, अर्थात लहानगा थोड्यावेळाने झाला प्रसंग विसरुन जातो आणि ते मार्गस्थ होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार ऋषिकेश, अशोक पाटील, क्षिप्रा, श्रावण मोडक, जाई आणि मी.
अशोक पाटील, तो प्रसंग एकदम आठवलाच मला तुम्ही सांगितलेला.
मी, तुम्ही सांगितलेला अनुभवही अनेकदा घेतलेला असतो आपण .. चांगली आठवण सांगितलीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आतिवासताई, तुम्ही खूपच सुंदर आणि मनाला भिडणारं लिहिता. थोडं जास्तच भावूक वाटेल पण वाचता-वाचता डोळे कसे भरून आले तेच कळलं नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

छान.

"ब-याच अंतरापर्यंत मला ते दोघे दिसत होते." हे शेवटचे वाक्य असते तर आणखी छान झाले असते. त्यापुढची वाक्ये टाळली असती, तर त्यातील भाव नाहीतरी वाचकाच्या मनात आपोआप अंकुरले असते. पण इतक्या नाजुक कथेवर नैतिक बोधाचा घण मारला, त्यामुळे पूर्ण कथानक सपाट होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे लेखन आवडले अशी प्रतिक्रिया आहेच, पण तुमचे लेखन नेहमीच आवडते अशीही प्रतिक्रिया आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

स्मिता, सन्जोप राव आभार.

धनंजय, तुमचेही आभार.

मी लिहिलेली 'कथा' नसून 'अनुभव' आहे. आता अनुभवालाही काही कथावस्तू असते असं मानायच का? - याबाबत मला माहिती नाही. कारण 'कथे'कडून एक वाचक या नात्याने माझ्या अपेक्षा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या असतात हा माझा स्वतःचा (वाचक म्हणून) अनुभव. त्यामुळे (माझ्या अज्ञानामुळे, गोंधळामुळे) याबद्दल ठाम काही बोलणं अवघड आहे मला.

'नैतिक बोध', 'सपाट' हे शब्द तुमच्या वाचक म्हणून असलेल्या अपेक्षा या लेखनातून पूर्ण झाल्या नाहीत असे दाखवतात. तुमच्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल आभार. त्यापलिकडे मी काही करू शकते असे दिसत नाही. आता उगीच 'पुढच्या वेळी सुधारणा करेन' असलं लिहिणं ही दांभिकता ठरेल - कारण ती मी करेनच अशी खात्री नाही; ती आपोआप झाल्यास त्याची कारणे अनेक असतील.

लेखकाने लिहावं आणि पुढच सगळं वाचकांवर सोडावं असं माझ मत आहे. आपल्याच लेखनाच स्पष्टीकरण द्यायची वेळ आली, म्हणजे लेख निदान त्या वाचकासाठी फसलेला आहे हे मला कळतं. ते मान्य करण्याविना गत्यंतर नसत!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"...आपल्याच लेखनाच स्पष्टीकरण द्यायची वेळ आली, म्हणजे लेख निदान त्या वाचकासाठी फसलेला आहे हे मला कळतं. ते मान्य करण्याविना गत्यंतर नसत!!..."

~ ही प्रामाणिक कबुली फार आवडली. लेखकाचे काम वा कर्तव्य म्हणजे त्याला आलेला अनुभव मगदुराप्रमाणे शब्दबद्ध करणे आणि तो वाचकांसमोर ठेवणे. त्याचे "डिसेक्शन" मग तो वाचक आपल्या क्षमतेनुसार करीत राहतो. पूर्वी अमुक एका लेखकाची कथा वाचली आणि ती फसली आहे असे [मला] वाटले तर माझी भावना त्या लेखकापर्यंत त्वरीत पोचविण्याचा कोणताही मार्ग नव्हता, जो आज आपण एका सेकंदात या माध्यमाद्वारे करू शकतो. श्री.धनंजय यांच्यासारखे सक्षम वाचक ते करतातही.

श्री.दा.पानवलकर यांची 'कमाई' कथा वाचून त्यातील अनुभव वर्णनामुळे मी थक्क झालो होतो. कोलारकरांच्या त्या वर्षाच्या 'सर्वोत्कृष्ट मराठी कथा' मध्ये कमाईचा उल्लेख होता. पण पुढे "माझं नाव धैर्यधर" वाचताना काहीतरी हुकले आहे अशी हुरहूर वाटली....कथानक उबवले गेले आहे असेच वाटत राहिले [कदाचित दिवाळी अंकासाठी संपादकाचा रेटाही कारणीभूत ठरला असेल]; पण हे पानवलकरांना पत्र पाठवून कळवावे असे मनात आले आणि त्यांचा पत्ता शोधून काढेपर्यंत ['प्रकाशन डायरी' मध्ये पत्ते असत] ती नापसंतीची उर्मी विरून गेली.

पण हल्ली अशी प्रतिक्रिया देणे सुलभ झाल्याने उलटपक्षी लेखकाला आपल्या लिखाणातून वाचकाला नेमकी कोणती अपेक्षा आहे हे [तात्काळ] समजू शकत असल्याने, अशा टीकेचे स्वागत करणे लेखकासाठीच उपयुक्त होते.....जे तुमच्यासाठी होईल असे तुमची प्रतिक्रियाच सांगते.

अशोक पाटील

["पाथेर पांचाली" चा उल्लेख आवडल्याचे कळविल्याबद्दल धन्यवाद.....अशीच बहीण-भावाच्या निर्व्याज नात्याची जी.एं.ची 'तुती' आहे, तीही तुम्हाला भावेल.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुभव सांगताना त्याचे कथानक आपोआप होते. (उदाहरणार्थ अनुभवात त्या दिवशी उकाडा होता की थंडी होती, पार्श्वभूमीत आणखी काय आवाज होते, हे सगळे येते. मात्र या सगळ्या संवेदनांची काही नेटकी व्यवस्था लावता येत नाही. पण तुम्हाला त्या १०-२० मिनिटांत ज्या काही अगणित संवेदना झाल्या, त्यांच्यापैकी काही गोष्टीच निवडून येते सांगितल्या आहेत. हे चांगलेच आहे. ज्या गोष्टी निवडल्या त्यांची काहीतरी सुसूत्र व्यवस्था लावता येते. हे जे काय सूत्र आहे, तेच लेखनाचे "कथानक". "कथानक" म्हटले, म्हणजे तुमच्या अनुभवाला खोटे म्हटले, असा तुमचा गैरसमज झालेला आहे. तसे नव्हे. खर्‍याखुर्‍या अनुभवकथनाला सुसूत्रता असणे, म्हणजे काही खोटेपणा नव्हे.)

जे काय लिहिले असावे, ते अनुभवाशी प्रामाणिक असावे, तसेच सुसूत्रही असावे, आणि वाचकाच्या मनातही तुमच्या मनात जे चांगले विचार स्फुरले ते जणू काही स्वतंत्रपणे स्फुरल्यासारखे भासावे, ही अपेक्षा आहे.

फक्त शेवटच्या दोन-तीन वाक्यांबाबत नावड व्यक्त केली आहे. बाकी छानच आहे. दोन लहान मुलांच्या बागडण्याचे जे काय वर्णन केले आहे, (शेवटची दोन-तीन वाक्ये सोडून) त्यातून बहीण-भावांमधला काहीतरी हृद्य आणि खेळकर संबंध आपोआप समजतो. शेवटच्या दोन-तीन वाक्यांत मग "बरे का मुलांनो (आणि बालपण विसरलेल्या मोठ्यांनो)... बहीण भावांनी असेच एकमेकांना समजून-सांभाळ करत खेळीमेळीने वागायचे असते." असा उपदेश दिल्यासारखे केलेले आहे. आधी इतका प्रामाणिक अनुभव (त्यातील सुसूत्र घटना) सांगितल्या, त्या मुलांबाबत माझ्या मनात तुम्हाला वातल्या त्याच भावना स्फुरल्या आहेत, आणि शेवटी त्या सगळ्यावर या बटबटीत सल्ल्याने पाणी फेरले. (सल्ला चुकलेला आहे, असे म्हणायचे नाही. बटबटीत आहे, इतकेच म्हणायचे आहे.) "Don't tell me what to feel. Show me how to feel." सध्या वाचत असलेल्या पुस्तकातील एक वाक्य आहे.

पहिल्या वाक्यापासून शेवटच्या तीन वाक्यांपर्यंतचे अनुभवकथन वेगळे आहे (चांगले आहे, It showed me how you felt, so I felt it too...), आणि शेवटची दोन-तीन वाक्ये वेगळी आहेत (वाचकाला जे अनुभवकथनातून पटले आहे, तेच पुन्हा सल्ल्यासारखे सांगितले You told me what to feel, which was advice, and it took away my ability to experience), हा फरक तुम्हाला पटलेला नाही. असो. तुम्हाला योग्य वाटते तसेच लेखन करणे प्रामाणिक आहे.

जर प्रत्येक अनुभवकथनाच्या शेवटी "असे भावा-बहिणींनी एकमेकांचा सांभाळ करणे किती छान" किंवा "या बाईला अडाणी समजले होते, पण तिनेच मला ज्ञान शिकवले" अशी अति-स्पष्टीकरण करणारी वाक्ये (यांना मी "नैतिक बोध" म्हटले आहे), अशी वाक्ये शेवटी लिहिणे जर तुम्हाला अपरिहार्य वाटत असेल, तर लिहा... ९०% परिणामकारक लिहिलेला अनुभव वाचण्याबरोबर ती शेवटची वाक्ये वाचवीच लागणार असतील तर वाचेन मी - मला काय गत्यंतर आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजय,
वाचक आणि लेखक दोघांनाही गत्यंतर नसणं - ही माझ्या मते फारच दयनीय स्थिती होईल नेहमीच झाली तर! त्यातून काय मार्ग निघतो ते बघायला पाहिजे.

एक फक्त सांगायच आहे. I did not tell you (reader) what to feel. I told you what I felt and I believe that readers may or may not feel the same. I am open to that.

तुम्ही अनुभवाला 'खोटे' म्ह्टले असा माझा गैरसमज झालेला नाही. त्यामुळे मुद्दा असा आहे की कथेतून लेखकाच्या पात्रांचा दृष्टिकोन व्यक्त होत असतो - जो कधी कधी लेखन करणा-या व्यक्तीच्या स्वभावाच्या अगदी विपरीत असू शकतो. अन्यथा सज्जन व्यक्तींना दुर्जन पात्र (किंवा दुर्जन व्यक्तींना सज्जन पात्र रंगवणे) शक्य झाले नसते. इथे सज्जन-दुर्जन हे अगदी ढोबळपणे वापरलेले शब्द आहेत कारण आपण सगळे हे दोन्हीही असतो आपल्या सोयीने. पण कधीही खून केला नसला तरी मी खुनी पात्र रंगवू शकते - अशा अर्थाने हा मुद्दा आहे.

अनुभव हे त्या त्या व्यक्तीचा दृष्टिकोन घेऊनच व्यक्त होतात. मी हा अनुभव काही वर्षांपूर्वी असाच लिहिला असता किंवा आणखी काही वर्षांनी नेमका असाच लिहीन अशी शक्यता माझ्या मते जवळजवळ शून्य. मी बदलते आणि माझा सभोवतालच्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता नेहमीच राहते. त्यामुळे या अनुभवाचा 'मी' हा एक अविभाज्य हिस्सा आहे - मला काय वाटलं ते सांगणं माझ्यासाठी आवश्यक असत - वाचकांना ते अनावश्यक वाटेल हे गृहित आहेच त्यात. हा अनुभव समजा कोणाचाच नसता तर? - काय झाल असतं हाही एक विचार आत्ता माझ्या मनात आला.

कदाचित तुम्ही म्हणता तो 'नैतिक बोधाचा घण मारणं' किंवा 'बटबटीत सल्ला देणं' हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असेल आणि त्यामुळे तो तुम्हाला वैताग यावा इतक्या पुन्हपुन्हा येणारच. त्याबद्दल मला माफ करा. लिखाणातून तो वेगळा काढण हुषारीच ठरेल पण प्रामाणिक ठरणार नाही माझ्यासाठी. I need to express as I am and as I feel. I like to live with myself Smile

तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने 'मी का लिहिते' यावर थोडा खोलात जाऊन विचार करायची संधी मला मिळाली. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"त्यामुळे या अनुभवाचा 'मी' हा एक अविभाज्य हिस्सा आहे - मला काय वाटलं ते सांगणं माझ्यासाठी आवश्यक असत - वाचकांना ते अनावश्यक वाटेल हे गृहित आहेच त्यात."

~ सविता - वाचकांना आवश्यक वाटणे किंवा अनावश्यक वाटेल असे गृहितक मांडून लेखक लिखाण करीत राहिला तर ते शुद्ध लिखाण न ठरता ती एक कारागिरी ठरेल [उदा.मंगेश पाडगांवकराच्या 'पापड कविता']. तुमच्यातील लेखकाला जी अनुभवसंपन्न अशी उर्मी आहे तिच्यावर तुमच्याकडूनच संस्कार जरी आवश्यक असले तरी ते हवेतच असा जर कुणी आग्रह धरत असेल तर तो तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिक्षेप ठरेल. लेखनाच्याबाबतीत थोडा विचार केला की ध्यानात येईल की व्यक्ती ज्या तीन नात्यांनी इथे जगत असते [निसर्ग, समाज आणि तिसरा स्वतःशी] पैकी निसर्गाशी जे नाते आहे ते मूलभूत महत्वाचे. या नैसर्गिकपणाचाच परिपाक साहजिकच त्याच्या लिखाणात येणे गरजेचे मानले गेले आहे. कुणी जर 'समाज' नजरेसमोर ठेवून - म्हणजे समाजाची "माझ्या लिखाणावर काय रिअ‍ॅक्शन होईल...." इ.इ. - लिखाण करतो म्हणू लागला तर तो स्वतःला खुजा समजत राहील. 'स्वतःशी' लिहिणारा आपले लिखाण प्रसिद्धीमाध्यमातून समोर आणीत नाही. त्याच्यापुरतेच ते मर्यादित असते आणि नष्टही त्याच्यासमवेतच होत जाते. असे कित्येक लोक मला माहीत आहेत की डायरीत पानेच्यापाने लिहून नंतर ते फाडून टाकतात. त्याचे वैषम्य त्याना वाटत नाही, पण लिखाणाची उर्मी त्याना स्वस्थ बसवू देत नाही.

नोकरीतील फिरतीच्या अनुभवामुळे म्हणा वा तुमच्या व्यक्तिमत्वात एकूणच समाजस्पंदने टिपण्याची जी प्रशंसनीय अशी हातोटी आहे, त्यामुळे म्हणा, तुम्हाला जीवनतृष्णेची जाणीव झाली आहे. तुमच्यातील लेखक त्या तृष्णेला नैसर्गिक अंश मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहे. समाजवैविध्यतेविषयीही आस्था आहे हे वरील लेखात प्रतीत होतेच. राहताराहिला प्रश्न धाटणीचा, तो तर वाचकसापेक्ष असतो. मला आवडलेले फळ मी जसेच्या तसे खाईन, तर दुसरा त्यावर योग्य ती औषधफवारणी केली असती तर ते आणखीन् चवदार झाले असते असे म्हणेल. थोडक्यात दोघांनाही ते फळ हवे आहेच.

वर तुम्ही 'मी का लिहिते' यावर खोलवर जाऊन विचार करण्याची संधी मिळाली असे म्हणता.....ते छानच आहे, पण त्यामागे 'इतरांना आवडेल असेच मी लिहित जाईन' अशी अवस्था तुमच्यात येऊ नये हीच सदिच्छा !

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची सदिच्छा लक्षात ठेवेन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या भारदस्त वाड्याच्या पहिल्या मोठ्या खोलीत आपण बसलो आहोत. दहा-बारा जण खोलीत आहेत. त्यातले तिघे बोलताहेत, बाकीचे ऐकताहेत. चहाची फेरी होत असते. समोर ताटात चिवडा वा तत्सम काही वरकड खाणं ठेवलेलं असतं. त्यावरही हळूवार हात जात असतो. तिघांच्या बोलण्यातून समजूतदारपणा दिसतो, संयम दिसतो, आणि एकूण चर्चा कशी करावी याचे चार धडेही मिळत असतात...
चालू द्या!
आता लगेच 'ऐसीअक्षरे' म्हणजे भारदस्त वाडा हे मान्य केल्याबद्दल आभार किंवा कुजक्या कमेंट्स नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण आवडलं. आतिवास यांचा 'मला काय वाटलं ते सांगणं माझ्यासाठी आवश्यक असत - वाचकांना ते अनावश्यक वाटेल हे गृहित आहेच त्यात' हा मुद्दा वैध आहे अन् धनंजयची "Don't tell me what to feel. Show me how to feel." ही अपेक्षादेखील योग्यच आहे. माझा कलदेखील शेवटच्या काही वाक्यांच्या अनावश्यकतेच्या दिशेनं गेला. त्याचं कारण म्हणजे या आणि अशा वाक्यांमधून मला ते आधीच कळलेलं होतं:

धाकटया भावाला शाळेतून नीट घरी घेऊन येण्याची जबाबदारी आज त्या ताईकडे (तीही छोटीच होती म्हणा!) दिसत होती
छोटयाचे हात मोकळे होते, दप्तर ताईच्या गळ्यात अडकवून तो मोकळा झाला होता, त्यामुळे तो मस्त पळत होता.
छोटयाने आपल दप्तर आपल्या पाठीवर लटकवल, ताईच्या खांद्यावर दुसरी पिशवी लटकवायला तिला मदत केली. मग छोटयाने आपला हात पुढे केला, तो ताईने पकडला.

थोडक्यात, लिखाणात अनुभवाचं केवळ वस्तुनिष्ठ वर्णन नाही आहे, तर लेखिकेला जे वाटलं होतं ते आपसूकच आणि सुरुवातीपासूनच लिखाणात उतरलेलं आहे. त्यामुळे शेवटच्या वाक्यांची मला एक वाचक या नात्यानं गरज भासली नाही. तरीही ती तिथं असावीत का? मला वाटतं की हा प्रश्न काही प्रमाणात 'वाचकाकडून प्रगल्भतेची अपेक्षा किती करावी' अशा, म्हणजे वेगळ्या दिशेला जातो. मराठीतलं लहान मुलांसाठी लिहिलेलं साहित्य (यात निव्वळ गोष्टीच नाहीत तर अगदी विविध विषयांची पाठ्यपुस्तकंसुद्धा आली) वाचताना मला पुष्कळदा असं जाणवतं की यात मुलांना आपला आपण विचार करण्याची सवय लावलीच जात नाही आहे. सगळं अगदी सुस्पष्ट आखून दिलेलं आहे. आणि मग त्या आखून दिलेल्या ठळक रेषेवर चालता चालता मुलं खरे आयुष्याचे धडे घेण्याऐवजी (जे शिक्षणाचं खरं ध्येय असावं असं मला वाटतं) घोकंपट्टी करायला शिकतात. आखीव रेषेला सोडून आपण आपला मार्ग शोधायचा असतो हेच मग ती विसरतात. मला हे धोक्याचं वाटतं. म्हणून कोणत्याही लिखाणातला काही भाग अध्याहृत ठेवलेला मला अधिक सुखावतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मराठीतलं लहान मुलांसाठी लिहिलेलं साहित्य (यात निव्वळ गोष्टीच नाहीत तर अगदी विविध विषयांची पाठ्यपुस्तकंसुद्धा आली) वाचताना मला पुष्कळदा असं जाणवतं की यात मुलांना आपला आपण विचार करण्याची सवय लावलीच जात नाही आहे. सगळं अगदी सुस्पष्ट आखून दिलेलं आहे. आणि मग त्या आखून दिलेल्या ठळक रेषेवर चालता चालता मुलं खरे आयुष्याचे धडे घेण्याऐवजी (जे शिक्षणाचं खरं ध्येय असावं असं मला वाटतं) घोकंपट्टी करायला शिकतात. आखीव रेषेला सोडून आपण आपला मार्ग शोधायचा असतो हेच मग ती विसरतात. मला हे धोक्याचं वाटतं. म्हणून कोणत्याही लिखाणातला काही भाग अध्याहृत ठेवलेला मला अधिक सुखावतो.

प्रतिसाद आवडला.

अगदी सहमत. मराठीच नव्हे तर अन्य भाषेतही बहुसंख्य पुस्तके ही डिस्ने टाईप्स, अत्यंत सुलभ, डम्ब डाउन केलेली असतात. यावर विचार करता मुळ शिक्षण जेव्हा सुरु झाले लिबरल आर्ट्स व व्यावसायीक/तंत्र शिक्षण. यात आता लिबरल आर्टस मागे पडून पोटासाठी , कमवायला कोणते उत्तम तसे स्टेप बाय स्टेप / फॉर डमीज शिकवा व पोरांना बाजारपेठेत आणा हा प्रवास घडत असल्याने हे असे आखुन दिलेले प्रकार आयुष्यात जास्त बघायला मिळत आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाच (के.जी २) व आठ वर्षाच्या (इयत्ता दुसरी/तिसरी) मुलांना शाळेतून घ्यायला कोणी येत नाही? ह्या वस्तुस्थिती/ माझ्या शहरी संवेदनशीलते पुढे मला इतर काही सुचत नाही आहे.

वरती अनेक लोकांनी तुमच्या लेखनशैलीचे, तरलतेचे, संवेदनशीलतेचे, नात्याच्या उकलेचे, जिव्हाळ्याचे, वादपरिसंवादाचे, वाड्याचे, चहा-चिवड्याचे कौतुक केले असल्याने मी त्यात आधीक काय वेगळे लिहू.

धनंजयशी सहमत. तुमच्या अन्य कथांच्या तुलनेत ही काही फारशी आवडली नाही. खर सांगू तर ब्लॉग्/फेसबुक्/फोरम वर लिहायला मस्त मटेरीयल कुठे मिळेल/ आज काय टाकू ब्लॉगवर असा बहुतेक लेखकांचा मेंदु सतत विचार करत असावा विशेषता नियमीत लेखन करणार्‍यांचा. त्यात ती दोन पोर दिसल्यावर हा असे काही लिहता येईल पुढचे घडवले गेले असेही वाटले.

असो पुलेशु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार चितातुर जंतू आणि सहज आपल्या प्रतिसादाबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादी कलाकृती समोर आली की काय करावे? ती (बोरकरांनी थोड्या अश्लीलपणाने म्हटल्यासारखी) कपडे काढून भोगावी. बरे, भोगली. मग? मग नंतर जनसामान्यांनी 'मजा आली, चला आता झोपूया, उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, गुड नाईट.' म्हणून कूस वळवून झोपी जावे. जे जनसामान्य नाहीत आणि जे रसिक चिकित्सक समीक्षक वगैरे आहेत त्यांनी काय करावे? त्यांनी एक विचारवंत सिग्रेट पेटवावी आणि 'तसा अनुभव बरा होता, पण .... 'म्हणून फणस सोलावा तशी ती कलाकृती सोलायला घ्यावी. आणि अर्थातच गरे टाकून द्यावेत आणि गदळ चिवडत बसावे. म्हणजे एकूण मिळालेला आनंद पटकुरासारखा पसरायचा, त्यावर एक वैचारिक पद्मासन घालून बसायचे आणि 'हां, आता आणा सुर्‍या आणि कात्र्या...' असे म्हणून त्या कलाकृतीचे विच्छेदन करायला घ्यावे. कुठल्या शब्दांची छाया किती टक्क्यांनी गडद झाली असती तर त्या कलाकृतीला तिच्यावर असलेल्या मॉमच्या सावलीतून बाहेर पडता आले असते, कुठल्या वाक्यावरचा ताण कुठल्या वाक्याने वाढतो किंवा कमी होतो, एकूण कलाकृतीने गाठलेली उंची (किंवा खोली) त्या कलाकृतीच्या कोणत्या अंगाने झेपावते किंवा खचते या चर्चेत रंगून जावे. यात मूळ कलाकृतीने मिळालेला आनंद त्या पटकुरासारखाच दाबला जातो आहे याकडे दुर्लक्ष करावे.. असो, ज्याची त्याची निवड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

सन्जोप राव, आभार. प्रत्येक वाचकाची आवड-निवड वेगळी असणार हे एकदम कबूल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. प्रसंगाचं वर्णन अगदी जिवंत, चित्रदर्शी वर्णन झालं आहे.

पहिल्या वाचनात मला शेवटची वाक्यं खटकली नाहीत, मात्र चिं.जं.नी म्हटल्याप्रमाणे - आतिवास यांचा 'मला काय वाटलं ते सांगणं माझ्यासाठी आवश्यक असत - वाचकांना ते अनावश्यक वाटेल हे गृहित आहेच त्यात' हा मुद्दा वैध आहे अन् धनंजयची "Don't tell me what to feel. Show me how to feel." ही अपेक्षा - हे दोन्ही दृष्टिकोन 'टू इच हिज ओन' प्रमाणे पटतात.

थोडे अवांतर - व्हाय फिनिश बुक्स? हा अलीकडेच वाचलेला लेख या चर्चेसंदर्भात आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदन, आभार. तुम्ही दिलेला दुवा खूप रोचक आहे. "The Adventures of Huckleberry Finn" या पुस्तकाच्या संदर्भात Mark Twain वर झालेली टीका - त्या पुस्तकाचा शेवट कसा आहे (अर्थातच अपेक्षाभंग करणारा) याबद्दल - मला या निमित्ताने (म्हणजे तुम्ही दिलेल्या दुव्याच्या निमित्ताने) आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाने गुंतवून ठेवले. छान शब्दबद्ध केला आहे अनुभव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगती...

आभार सारीका आणि प्रगती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बालपणीच्या काही आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. अनुभव मनाला अगदी स्पर्शून गेला. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

आभार अदिति.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुभव छान शब्दबध्द केला आहेत,
स्वाती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0