दिवाळी ओवाळी

दिवाळी जवळ आली की आमच्या मुलांच्या टोळ्या तयार व्हायच्या. वसू बारसे पासून देवांना आणि तुळशीला, गायींना ओवाळण्यासाठी अंधार पडला की घरोघरी जाऊन गाणी म्हणत पाच दिवस ओवाळायची पध्दत होती आमच्या गावाला. शेवटच्या दिवशी ज्यांच्या घरी ओवाळलं त्यांच्या कडून सकाळी सकाळी पैसे घेत असू. नंतर सारखे वाटे करून आपापसात वाटून घेत असू. हे पैसे टिकल्या, लवंगी, चिमणी फटाके, भुईचक्कर, टिकल्यांचा पट्टा, शिट्टी विकत घेण्यास खर्च करायचो. कंजूस लोकांच्या घरी मुद्दाम खट्याळ गाणी म्हणायचो. व त्या घरच्या लोकांची जिरवायचो. तर ती गाणी अजूनही तोंडपाठ आहेत.

१) दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी.
गाई कुणाच्या? लक्ष्मणाच्या.
लक्ष्मण कुणाचा? आईबापाचा.
आईबाप कुणाचे? लक्ष्मणाचे.
दे माझी खोबऱ्याची वाटी
नाहीतर घालीन तुझ्या वाघाच्या पाठीत काठी.

२) लांडा साप डोंगरी गेला वो डोंगरी गेला
लांड्या सापानं काडी आनली
काडी मी गाईला दिली
गाईनं मला दुदू दिलं
दुदू मी मोराला पाजलं
मोरानं मला पंखा दिला
पंखा मी देवाला वाहीला
देवानं मला घोडा दिला
घोडा मी चिचंला टांगला
चिचंनी मला बोटूक दिलं
बोटूक मी उखळाला दिलं
उखळानं मला भुगरा दिला
भुगरा मी नदीला दिला
नदीनं मला मासा दिला
मासा मी कुंभाराला दिला
कुंभारानं मला मडकं दिलं
मडकं मी तुळशीला वाहिलं
चिमणीनं खडा मारला फुटून गेलं
( हे गाणं चढत्या सुरात रंगत असे)

३) चिन चिन घाटी गाईच्या पोटी
नव्वद नाडा गुतला गाडा
अदंकारे बुडुक मदंकारे बुडुक
सावळेरामाची कपिली गाय
अर्धा डोंगर चरुन येई
चरचरीत पापडी
तिथं बनवली झोपडी
झोपडीत होता कोल्हा
कोल्ह्यानं मारली खेकडी
गाय बोलवली पोतोळी
पोतोळीचे शेंडेपांडे
आपण दोघे रेशीमगोंडे
रेशीमगोंड्याच्या सावल्या
अशा ठिकाणी मावल्या
पिपाणीला तीन नळ्या
मोघाड्याला चार नळ्या
हानीन बुक्की फोडीन कवाड
जाऊद्या भैरूचं खिल्लार

अजून बरीच आहेत नंतर टंकतो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet