ऋणनिर्देश : खुप भयानक आहे.
ऋणनिर्देश : खुप भयानक आहे.
आपण एका भयंकराच्या दारात उभे आहोत - ऐसीचा आणखी एक दिवाळी अंक येऊ घातला आहे. नेमानुसार त्यातही भयभीषण लेखन आहे. मूळ मराठी लोकांनी केलेलं लेखन कमी (बोजड) वाटतं म्हणून की काय, ह्या वर्षी इंग्लिश-हिंदीतून भाषांतरित केलेले लेखही आहेत. संबंधित आवाहनाला प्रतिसाद देऊन भाषांतराचं काम करणाऱ्या अवंती, आदूबाळ, ए ए वाघमारे, आरती रानडे, उज्ज्वला, नंदन, सोफिया, मुक्तसुनीत, चिंतातुर जंतू ह्यांचे आभार.
लेखांचं मुद्रितशोधन अमुक, मिहिर, मृण्मयी, आदूबाळ, चिंतातुर जंतू, राजेश घासकडवी, अमोघ प्रभुदेसाई ह्यांनी केलं. जडजड मराठी शब्द, किचकट वाक्यरचना आणि खुपसारीविरामचिन्हं वापरण्याबद्दल ह्या लोकांना जबाबदार मानावं.
दुवे न उघडणं, चित्रं वेडीवाकडी लागणं, तांत्रिक त्रुटींची जबाबदारी ३_१४ विक्षिप्त अदितीची आहे.
दिवाळी अंकाचं शीर्षक, मुखपृष्ठ आणि आतली व्हिज्युअल्स संदीप देशपांडेनं केली आहेत. मुखपृष्ठासाठी तांत्रिक मदत करण्याबद्दल साकेत कानेटकरचे आभार.
सगळ्यात मुख्य - अनेक लेख मिळवण्याचं आणि अंकाला दिशा देण्याचं काम रोचना आणि शैलेन ह्यांनी केलं.
दिवाळी अंकाचं सूप वाजल्यानंतरही काम असतं. अबापट ते काम लपूनछपून करतात.
दिवाळी अंकाच्या कामातून दरवर्षी काही तरी नवीन मिळतं. 'ऐसी'वर समूहाच्या शहाणपणावर विश्वास ठेवला जातो. योगदान देणारा समूह जेवढा मोठा तेवढा शहाणपणा आणि शिक्षण जास्त. ह्या समूहात नव्या लोकांचं नेहमीच स्वागत होईल.
बघताय काय सामील व्हा.
अंक निदान वाचाल तरी! वाचलाच आहात तर समाजमाध्यमांवर जरा जाहिरातही करा... कसं?
ह्यावर प्रतिक्रियांसाठी काही पर्याय पुढीलप्रमाणे -
१. I m agree
२. +१
३. आवडलं असेल तर शेअर करा
४. बघतोस काय रागानं, लाईक केलंय वाघानं
अंकाच्या मुखपृष्ठाचा दुवा.