Skip to main content

कोलकात्यातले निर्वासित - भाग १

संकल्पना

कोलकात्यामधले निर्वासित - भाग १

मूळ लेखक - मानस रे

भाषांतर - ३_१४ विक्षिप्त अदिती

आई
मोठा प्रवास करून आलेली, आई.

प्रस्तावना -

वसाहतवादाला झालेल्या विरोधाच्या इतिहासात भारताची गोष्ट वेगळी आहे - ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रदीर्घ काळ चालवलेली राष्ट्रवादी चळवळ सोपी नव्हती. शेवटी १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या मातृभूमीतून बाहेर हाकलले गेले. माणसं विस्थापित होण्याचा सगळ्यात मोठा प्रसंग आला, आणि त्यात ज्या शहरावर अचानक आणि मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला, ते कोलकाता.

धार्मिक आधारावर देश दोन बाजूंनी विभागला गेला; त्यातून पाकिस्तान हे नवं राष्ट्रराज्य (nation state) तयार झालं. पश्चिम पाकिस्तानातून हिंदू आणि शीख, आणि भारतीय पंजाबातून मुसलमान जवळजवळ संपूर्णपणे दुसऱ्या बाजूला गेले. ही अदलाबदल अतिशय निर्घृण होती, तरीही एकदाच झाली. मात्र पूर्वेकडे अशी अदलाबदल १९४६पासून पुढे अनेक दशकं होत राहिली. एका सरकारी अहवालानुसार १९८१पर्यंत ८० लाख हिंदू पूर्व पाकिस्तानातून (पुढे बांग्लादेश) भारतात आले. त्यांतले अर्धे लोक कोलकाता, त्याच्या उत्तर-दक्षिणेच्या चोबीस परगणा आणि नाडीया जिल्ह्यांत स्थायिक झाले. त्या भागातले मुसलमानही पूर्व पाकिस्तानात गेले (बहुतेक हिंदूंएवढी संख्या नाही), त्यातही हिंसा झालीच.

कोलकात्यामधल्या निर्वासितांचा एकसंध समूह नव्हता. फाळणीच्या आगेमागे लगेच आलेल्या हिंदूंमध्ये साठ टक्के लोक उच्चवर्णीय होते. त्यांतही मोठ्या प्रमाणावर भद्रलोक (उच्चारी भॉद्रोलोक) होते; शिकलेले आणि थोड्याबहुत प्रमाणात शहरीकरण झालेले, पांढरपेशे. कारूनारू आणि इतर जातीजमातींच्या विस्थापितांची बहुसंख्या मागाहून झाली.

सुरुवातीला आलेले विस्थापित कोलकाता आणि आसपासच्या भागांत स्थिरावले. राहण्यासाठी आधीच गजबजलेला भाग काहींनी निवडला; पैसा आणि ओळखदेख नसलेले अनेक सरकारी विस्थापित-छावण्यांमध्ये भरडले; पण सरकारी मदतीशिवाय मोठ्या प्रमाणावर लोकांनी स्वतःची सोय लावली. त्यातून तयार झालेल्या अनधिकृत वसाहती पुढे विस्थापितांचं अस्तित्व ओळखण्याची निशाणी ठरल्या.

(विपरीत परिस्थितीतही) उद्यमशील वृत्ती दाखवण्याबद्दल सरकार त्यांच्या बाजूनं होतं, पण दुसऱ्या बाजूनं सरकारचा ह्याला विरोधही होता. कारण ह्या वसाहती सरकारी जमिनीवर होत्या. खाजगी जमिनींवर ह्या वस्त्या असल्या तर सरकारी विरोध आणखी तीव्र होता. निर्वासितांनी सरकारी दबावापुढे मान तुकवली नाही आणि एकीकडे सरकारशी बोलणंही सुरू ठेवलं. १९५२मध्ये ११९ वसाहती होत्या, त्या वाढून आता २०००च्या वर झाल्या; संपूर्ण राज्यभर पसरल्या. एकेकाळचा ग्रामीण भाग पुढे कोलकात्याची उपनगरं बनला; आजूबाजूच्या परगण्यांमध्ये कोलकाता पसरलं.

नेताजी नगराचा नकाशा
नेताजी नगर, 'मुख्य रस्ता' म्हणजे नेताजी सुभाषचंद्र रस्ता

डाव्यांनी खूप आधीपासूनच निर्वासितांकडे सरकारनं केलेल्या दुर्लक्षाचा फायदा उठवायला सुरुवात केली. निर्वासितांमधून सीपीआय (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया)ला कार्यकर्ते आणि प्रसिद्ध नेतृत्वही पुढे आलं. त्यातून फुटलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं संसदेत डाव्यांचंही नेतृत्व केलं. दोन दशकांच्या काँग्रेस सरकारनं लोकांची निराशा केली; त्याची शकलं होऊन १९६७मध्ये काँग्रेसचा निवडणुकांत पराभव झाला. पक्षानं स्वातंत्र्यसैनिकांची फळी बाजूला करून तरुण तुर्क आणले. त्यांनी स्थानिक दादांना हाताशी धरून डाव्यांचा पराभव करण्याचा घाट घातला.

मधल्या काळात नक्षलबाड़ी जिल्ह्यात कुळानं शेती करणाऱ्या लोकांत असंतोष पसरला. तो कोलकात्यात, विशेषतः निर्वासित लोकांतही पसरला. १९६९ ते १९७३ ह्या काळात कोलकाता शहरात हिंसा, मागेपुढे न बघता झालेल्या हत्यांचं लोण पसरलं. मानभावी, आदर्शवादी, टोकाच्या डाव्या नक्षलांनी काँग्रेसचं समर्थन असलेल्या व्यावसायिक गुंडांना हिंसेत तोडीस तोड टक्कर दिली. ह्या मारामाऱ्या प्लॅन करून केल्या जात नव्हत्या. मार्क्सवाद्यांनी दोन्ही गटांना तोंड दिलं. प्रसंगी एका गटाचं समर्थन घेऊन दुसऱ्यांना अडवलं. त्या काळात कोलकात्यात दिवसाला सरासरी पन्नास खून होत होते.

१९७५ साली इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली तोवर कोलकात्यातून अतिरेकी डाव्यांची नामोनिशाणी पुसली होती; त्यांना मारलं तरी होतं किंवा तुरुंगात टाकलं होतं. १९७७मध्ये पुन्हा निवडणुका आल्या तेव्हा आणीबाणी-विरोधी लाटेत मार्क्सवादी डावी आघाडी करून पुन्हा सत्तेत आले. डावी आघाडी विक्रमी काळासाठी सत्ताधारी होती. निर्वासितांची परिस्थिती तोवर सुधारली होती. मध्यमवर्गीयांच्या झोपड्यांचं रुपांतर बऱ्या दिसणाऱ्या घरांत झालं होतं.

एवढ्या कालखंडानंतर आता निर्वासितांमध्ये सत्ताधारी-सरकारी नोकरदार आहेत, तसेच भिकाऱ्यांसारखी कामं करणारे, कचरा वेचणारेही आहेत. शिकलेले भद्रलोक निर्वासित आता रुपडं बदलून मध्यमवर्गीय झाले आहेत. गरीब निर्वासित अजूनही मोठ्या प्रमाणावर झोपडीवजा घरांमध्ये राहत आहेत. लोकशाहीनं त्यांनाही मतदानाचा अधिकार दिला आहे, भद्रलोकांना ते रुचत नाही पण ते फार विरोधही करत नाहीत. घरदार सोडून देण्याचा राग फारच क्वचित मुसलमान-विरोधी रूप धारण करतो. हिंदू राष्ट्रवादाच्या एकछत्री सत्तेखाली कधी हा राग उघड द्वेष म्हणून दिसतो, कधी हिंदू-मुसलमान ऐक्याची पेट्रनायझिंग कँपेन दिसतात.

ह्या प्रदीर्घ लेखात निर्वासितांच्या एका वसाहतीची गोष्ट आहे. सामाजिक आणि राजकीय प्रगती गोष्टीरूपात मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

स्मरण आणि वस्तीबद्दल -

गोष्टी वगळता देशाचा इतिहास काय निराळा असतो. खूप गोष्टी. एकामागोमाग एक गोष्टी. राष्ट्राच्या बहुपदरी विणीसारख्या.
-- अलेक्झांडर क्लूज, १९८६

उजाडायचं होतं. खांब उभे करण्याचं काम बराच काळ सुरू होतं. आम्ही पोरं फार उत्सुकतेनं वाट बघत होतो. चारचौघांत विद्युतीकरणाबद्दल बारकी चर्चाही झाली - वीज कशी तयार होते, रोज दिवे कोण लावेल, वीजेचा आपल्या वस्तीवर काय परिणाम होईल. हळूहळू खांब चंदेरी रंगात रंगवले. मग एक दिवस कोणी तरी येऊन, खांबांवर काही आगापिछा न लागणारे आकडे टाकून गेलं. आम्हाला कोलकात्याच्या जवळ आल्यासारखं वाटलं.

एकदाचं उजाडलं. एका संध्याकाळी, फार वाट बघत होतो अशा संध्याकाळच्या क्षणी प्रकाश खांबांवरून समोर झेपावला. रस्त्यावरची दिवाबंदी. खडबडीत गल्ल्या, बांबूच्या कामट्यांची कुंपणं, टिणपाट आणि कौलांची घरं ह्या सगळ्यांना प्रकाशाच्या पहिल्या किरणाचा स्पर्श झाला.

आमच्या दुर्दैवानं, सगळीकडे उजेड होता पण आमच्याच घरासमोरचा दिवा बंद होता.

हे नक्की सीतानाथच्या गायींमुळे झालं असणार. आम्ही बघितलं होतं, त्याच्या गायींपैकी एक घराकडे जाताना त्या खांबाला धडका देत होती. मोठ्या पोरांचं एकमत झालं, हेच कारण असणार. म्हणे, दिव्याच्या आत एक बारीक तार असते, धडकांमुळे ती तुटली असणार. आम्ही माना हलवल्या. निखिलनं पुढाकार घेतला. तो बांबू घेऊन सीतानाथच्या घराकडे गेला. तो गायीला, आणि जमलं तर तिच्या मालकालाही मारणार.

कोणी औषधोपचार करताना बघितलेलं नसलं तरी सीताराम वैद्य असल्याचं आम्हांला माहीत होतं. तो खरं तर वस्तीचा गवळी होता. त्याचं त्याच्या गायींवर प्रेम होतं; त्यांच्या रक्षणासाठी तो आरडाओरडा करत असे; आणि एकदा एक गाय मेली तर तो फारच शोकाकुल झाला होता. एखाद्या गायीवर तो चिडला की तिची तुलना तो त्याच्या उनाड पोराशी, उत्तमशी करत असे.

पण सीतानाथ काही ऐरागैरा गवळी नव्हता. भागातल्या काँग्रेसी बिधुबाबूंच्या घरी भेटायला बोलावल्यावर तो टकाटक वाजणारे बूट, स्टार्च केलेला कुडता-पायजमा वगैरे घालून जात असे. उन्हाळ्यातल्या दुपारच्या किचाट हवेत, आमच्या सिमेंटच्या लाल जमिनीवर ठाण मांडून गप्पा मारताना त्याला नोआखलीच्या शाळेचं, ढाक्याच्या कॉलेजच्या दिवसांचं स्मरणरंजन करताना मी ऐकलं होतं. वादळापूर्वीच्या वाऱ्यानं आंबे लगडलेलं झाड आमच्या टिणपाटी छतावर जोरजोरात आदळायला लागलं की तो आम्ही जिथे खेळत असू आणि त्याच्या गायी चरत असत त्या मैदानाकडे आरामात येत असे.

आज निखिल सीतानाथला सोडणार नव्हता. मुठी झटकत, क्वचित बांबू हातात घेत, कधी वीटकूर घेऊन, सीतानाथच्या पूर्वजांचा उद्धार करत त्यानं सीतानाथच्या घरावर बरेच हल्ले चढवले. सीतानाथनं शौर्यानं त्याचे सगळे हल्ले परतवले. मजा बघायला आलेल्या लोकांना आता थोडी थडकी भरली, एवढा तो प्रकार वाढला होता. शेवटी मोठे लोक मध्ये पडले.

रात्र पडली, वस्ती थंड झाली, दिव्यांचा सुकोमल प्रकाश सगळ्या उच्चभ्रू भागांत पडला. आमचंच घर तेवढं अंधारात राहिलं.

मोठ्या पोरांनी अजूनही हे प्रकरण सोडून दिलेलं नव्हतं. रात्री उशिरा, आवाज न करता ते दगड घेऊन आंब्यावरून आमच्या घराच्या छतावर चढले. सीतानाथच्या गोठ्यावर दगडांचा पाऊस पडला. सुरुवातीला थोडा हंबरण्याचा आवाज आला. दगड बरसतच राहिले. आता सगळ्या बाजूंनी हंबरण्याचा आवाज येत होता. घबराट पसरून गायी पळायला लागल्या. पोरं झाडावरून उड्या मारून पसार झाली. सीतानाथ काठी घेऊन घरातून बाहेर आला. तो सरळ समोरच्या गल्लीतल्या निखिलच्या घरी गेला. हा कोण अगोचर असणार, हे त्याला माहीतच होतं.

पण ह्या सगळ्यांत निखिल कुठे होता? दुर्दैवानं तो संडासात होता! त्या काळात संडास घराच्या एका कोपऱ्यात झाडोऱ्यात असायचे. कल्ला ऐकून तो बाहेर आला. निखिलच्या मामासाठी हे फारच झालं होतं. त्यांनी निखिलला बेदम मारलं.

त्यानंतर शांत होऊन सीतानाथ घरी परत गेला. पण निखिल शांत झाला नाही. रात्रीच्या अंधारात तो ओरडत होता :
"मी हागत होतो. माझा ह्याच्याशी काहीही संबंध नाही, पण मला मारलंत तुम्ही. ते फक्त मी पोरका आहे म्हणून! मुसलमानांनी माझ्या आईवडिलांना कापून काढलं, आता तुम्ही मला मारताय! आणखी मारा, थांबता कशाला …."

निखिल आमच्या वस्तीत बराच उशिरा, साठीच्या दशकात आला होता. बराकपूरच्या कोणत्याशा अनाथालयातून त्याची रवानगी इथे झाली होती. आम्हांला त्याच्याबद्दल कुतूहल होतं. तो आमच्यांतला 'दादा' होता, फुटबॉल टीमचा म्होरक्या. त्याच्या किकमुळे फुटबॉल आकाशात, आमच्या मैदानाबाहेर जात असे. आम्हां बारक्या पोरांना त्याचा अभिमान वाटत असे. निखिलचं असं ओरडणं आम्हांला अनपेक्षित होतं. आम्हांला ते फार विचित्र वाटलं. आम्ही त्या दिव्याबद्दल विसरूनच गेलो.

***

ह्या लेखात दोन गोष्टी एकत्र येतात - निर्वासित मुलगा म्हणून माझं मोठं होणं, आणि खाचर-जमिनीवर वाढलेल्या वस्तीचा स्वातंत्र्योत्तर कोलकात्यात समावेश होणं. गेल्या पाच दशकांत निर्वासित लोक कसे स्थानिक झाले आणि त्यांच्या अस्मितांची जडणघडण कशी झाली हे ह्या कथनात, सूक्ष्म-इतिहास वापरून सांगितलं आहे. हा प्रवास तीन भागांत घडला - पन्नास आणि साठच्या दशकात वस्ती ('वसाहत') - कशी तयार होत गेली, सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धात राजकीय हिंसाचाराचा डोंब उसळला होता ('हिंसा'), आणि शेवटी सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात हळूहळू प्रगती दिसायला लागली आणि १९७७मध्ये डावं सरकार ('सरकार') आल्यावर प्रगतीला वेग आला.

***

वसाहत - १

भंगलेल्या बंगालमधली पहिली वसाहत - बिजयगढ - हा नेताजी नगरच्या आसपासच्या अनधिकृत वस्त्यांचा केंद्रबिदू होता. दुसऱ्या महायुद्धातला मिलिटरी कँप असल्यामुळे बिजयगढमध्ये काही पायाभूत सुविधा आधीपासून होत्या. तिथेच जवळ नेताजी नगर वसलं. माझा जन्म १९५४ साली नेताजी नगरमध्ये झाला. मी पाच-सहा वर्षांचा असताना नेताजी नगर दहा वर्षांचं झालं. प्रजासत्ताक दिन, २६ जानेवारी १९५० हा दिवस नेताजी नगरचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो.

समाजात पत असलेल्या काही पुरुषांच्या, बहुतेकसे शिक्षक आणि वकील, नेतृत्वाखाली एक कमिटी तयार केली गेली. कोलकाता आणि आसपासच्या, (आणि कमिटीच्या परिचित) निर्वासितांमध्ये बातमी पसरवली गेली की त्यांना जर पंधरा रुपये फी एकदा देणं परवडत असेल तर त्यांना नेताजी नगरमध्ये जागा मिळेल. तिथे राहण्यासाठी अट होती की नेमून दिलेल्या जागेत एक खोली (बहुतेकदा तीन झापांची) आणि चूल पाहिजे.

ती खाचराची जागा होती; तिथे दलदल, रानटी झुडपं आणि आडवीतिडवी, ओबडधोबड गटारं पसरली होती. पूर्व बंगालच्या वेगवेगळ्या भागांतून, वेगवेगळ्या ओळखींतून लोक तिथे आले होते; त्यामुळे त्या सगळ्यांत एक प्रकारची समानता मुळातच होती. त्यात शहरी, मध्यमवर्गीयांची बहुसंख्या होती. वस्तीच्या टोकाच्या दोन वॉर्डांत कष्टकरी - मासेमार, सुतार, झोपड्या बांधणारे, गवंडी, न्हावी, वगैरे - लोक होते. माझी अगदी सुरुवातीची आठवण म्हणजे गल्लोगल्ली भरलेली पोरं, मोठी कुटुंबं आणि भाडेकरूंनी तुडुंब झालेली घरं अशी आहे. मागे वळून पाहता आता गंमत वाटते की अशी विभाजनाची अस्फुट आणि एकत्रित प्रक्रिया तेव्हा किती नॉर्मल वाटत असे. कोलकात्यानं आम्हाला भीती घातली, तर आम्हीही तीच भीती त्यांच्यावर लादली. पुढे ह्या घरांतल्या स्त्रिया आमच्या घरी कामाला येत असत. आतल्या सीमारेखा स्थिरावल्यावर आम्ही आमच्या भागात सुखावलो.

जमीनमालकाचे गुंड संध्याकाळी उशिरा, कधी रात्री उशिराही येत असत. लहान पोरांचं अनौपचारिक जाळं ही बातमी आणत असे. बायका शंख फुंकत आणि पुरुष प्रतिकार करत. त्यात रक्तपात क्वचितच होत असे. ह्या काळात आणि पुढेही सरकारी खाक्या कुत्ता-जाने-चमडा-जाने असा होता; ब्रिटिश राज्यकाळात जे सुरू होतं, तेच पुढे सुरू राहिलं. पोलिसांशी हातापाई करण्यातून मुलग्यांची एक शाळा तयार झाली. साधारण वर्षभरानंतर मुलींचीही एक शाळा आली. नैतिक अधिष्ठानासाठी लोकांना ह्या शाळांची फार मदत वाटली. शाळांसोबत क्लब आणि नियमित नाटकंही आली. त्यांतल्या मुख्य क्लबाचे संबंध इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा)शी संबंध होते; हे सीपीआयचं सांस्कृतिक व्यासपीठ होतं. ह्यातून तयार होणाऱ्या समाजात बरीच प्रतलं होती. औपचारिक लोकशाही प्रोटोकॉल आणि डाव्या विचारसरणीच्या मांडीला मांडी लावून पारंपरिक रीतिरिवाज होते आणि त्यातून अशासारखी विभागणी आणखी गुंतागुंतीची झाली. हे विचार कधी एकत्र झाले, कधी एकमेकांसोबत गेले पण तरीही त्यांचं अस्तित्व स्वतंत्र राहिलं.

कॉलनी-कमिटी घरटी एका मतानं निवडून येत असे. (हे मत बहुतेकदा पुरुषच देत असत.) कमिटीची जबाबदारी म्हणजे शेजाऱ्यांचे जमिनीबद्दलचे तंटे सोडवणं, कच्चे रस्ते तयार करणं, डबकी साफ करणं आणि प्रसंगी वैद्यकीय सुविधा पुरवणं वगैरे. ह्या प्रक्रियेत कमिटीनं लोकांच्या आपसांतल्या संबंधांना आकार दिला. ह्याचा हेतू होता, सरकारसारखंच बंधनं आणि जबाबदाऱ्यांची व्यवस्थित वाटणी करणं. हळूहळू तिथे परस्परसंबंधांची, एकमेकांशी जोडलेल्या गोष्टींची व्यवस्था तयार झाली.

वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या वेगवेगळ्या कुटुंबांच्या विविध, अपूर्ण आणि गूढ कथांची देवाणघेवाण झाली; त्या बदलल्या आणि क्वचित त्यांवर शंकाही घेतल्या गेल्या. ह्या कथांमध्ये मुसलमान नेहमीच असत, पण ते कष्टाळू, मदत करणारे, आनंदी आणि परिघावरचे सर्वसामान्य लोक असत. हिंदू घरांतल्या व्यवहारांचा एक भाग म्हणून येत. त्यांच्या रूढी, प्रथांना काही स्थान नसे. मध्यमवर्गीय मुसलमानी पात्रंही ह्या कथांमध्ये नसत. माझ्या आजीच्या गोष्टी मला आठवतात.

"घरात काही देखभालीचं काम आलं की मी नेहमी मुसलमान कामगारांना बोलवायचे, हिंदूंना नाही. दिवसभर बरंच काम करून झाल्यावर मी त्यांना पोटभर खायला घालायचे. फणसाखालची जमीन साफ करून तिथे केळीची पानं पसरायला त्यांना सांगितलं होतं. मी जातीनं त्यांना खायला वाढलं. त्यांना त्याचा मनापासून आनंद होत असे. जेवणानंतर ते ती जमीन शेणानं सारवून देत आणि मी एकीकडे हौदात आंघोळ आटोपून घेई."

एकामागून एक गोष्टी येत, त्याला स्मरणरंजनाची झिलई असे, वर्तमानाचं स्मरणरंजन. सगळीकडे स्मरणरंजनाचं चित्र होतं. पाण्यातल्या जलपर्णीच्या शेजारचं डेरेदार हिजलचं झाड गावाकडच्या घरचं (देशेर बाड़ी) हिजलचं झाड होतं. गावाकडचं म्हणजे सीमेच्या पलीकडच्या गावाचं घर. योगायोगापेक्षाही त्या झाडाला अधिक अर्थ होता. त्यातून विस्थापन सुसह्य होत होतं.

मरणाचा शोक मोठ्यानं आणि समूहानं होत असे. "आजी, तुला शेवटी हवीत तशी वांग्याची भजी (बेगुन भाजा) मिळालीच नाहीत", म्हणत मृतदेहाशेजारी स्त्रिया विलाप करत असत. अगदी साठच्या दशकाच्या शेवटापर्यंत घरं बांबूची असत, कौलं शाकारलेली, किंवा पत्रे, अस्बेस्टॉस टाकलेली. आमचं घर पहिलं ज्यात विटा वापरल्या गेल्या - विटांच्या पातळ भिंतींवर पत्रा. आमचं म्हणजे श्रीमंताचं घर होतं - बारोलोकेर बाड़ी - विटांचं घर.

सगळीकडे भुताखेतांचं साम्राज्य होतं आणि त्यांच्या कथा चवीचवीनं चघळल्या जात. भुतं आणि कोल्हे. वसाहतीतल्या लोकांना भुतांपेक्षा कोल्ह्यांचं भय अधिक होतं, कोल्ह्यांचं अस्तित्व म्हणजे आधुनिकतेशी फसवणूक. 'आपण अजूनही त्याच अंधारात राहत आहोत', रहिवासी म्हणत. वीज येण्याच्या कितीतरी आधीच कोल्हे तिथून नाहीसे झाले.

एकदा एका शेजाऱ्यांच्या शनी पूजेच्या वेळेस एका भुतानं उच्छाद मांडला. पूजा नुकती सुरू झाली होती आणि शेजारच्या रिकाम्या सिनेमाच्या गोडाऊनमधून दगडांचा वर्षाव सुरू झाला. पुरुष त्या दिशेला धावले, बायकांनी आम्हां पोरांना घरांत पाकटवून थोपवलं. कोणी, काही सापडलं नाही. पूजा पुन्हा सुरू झाली आणि आणखी जास्त दगड पडायला लागले. पुरुष पुन्हा त्या गोडाऊनमध्ये जाऊन मोक्याच्या ठिकाणी थांबले. तरीही दगड येतच राहिले. पूजा आटोपती घ्यावी लागली.

ते सिनेमाचं गोडाऊन म्हणजे सगळ्या प्रकारच्या भुताखेतांचा राजवाडा होता. छोटनच्या घराभोवतीच्या ताडांच्या शेंड्यांवर त्याच्या आईनं भूत बघितल्याची कथा सगळ्यांना माहीत होती. ताडाची झाडं गोडाऊनच्या सभोवती होती. एक दिवस छोटन एका ताडावर चढला. त्याला काही तरी विचित्र गोष्ट दिसली आणि तो बेशुद्ध पडला. शुद्धीत आल्यावर तो म्हणायला लागला, "भूत आलंय, भूत आलंय." सगळे ताड दुसऱ्या दिवशी तोडले. महिन्याभरात ताडांची जागा छोटनच्या आवारात समाविष्ट झाली.

हमरस्ता इतर अनेक गोष्टींसोबत एक वेगळीच भाषा सुचवत असे - हा रस्ता आम्हाला नव्या भाषेच्या प्रदेशात नेईल जिथे स्थानिक भाषा बोलणं टॅबू ठरेल. आधी आमच्या घरची बोलीभाषा, जी पूर्व बंगालात - चत्तोग्राम, बारीशाल, नोआखली आणि ढाक्यात बोलली जात असे; दुसरी नेताजी नगरातली जिथे आम्ही पूर्व बंगाली होतो आणि ढाक्याच्या भाषेचा तिच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव होता, ती किंचित कृत्रिमता ल्यायलेली बोली; आणि तिसरी, कोलकात्याच्या मध्यवर्ती भागात ऑफिसला कामाला जाणाऱ्या लोकांची कोलकात्याची प्रमाणभाषा; ती ढाक्याच्या बोलीचा रस्ता खुला करून देत असे.

इंग्लिश शब्दांनी भाषेला चमक येत असे - अर्थवाहीपणासाठी वापरण्याजागी चमकोगिरीसाठी आम्ही ते शब्द वापरत असू. माझा मित्र कुंडू शब्द शिकला डिक्शनरी, आणि काहीसा मुद्दामच तो त्याचा उच्चार 'डिस्क के नारी' असा करायचा. एकदा मी श्यामलला सार्वजनिक बागेतून पानं तोडताना बघितलं. मी त्याला रोखलं. "पानं का नाही तोडायची? हे लंडन आहे का काय?" इंग्लिश भाषा असो वा लंडन आमच्यासाठी चरम उपमा कोलकाता होती, आणि अनोळखी, दूरच्या, आणि आवडत्या सगळ्या गोष्टी एकत्र येत. कोलकात्यानं आमचे संदर्भ तोडले होते, आम्ही कोलकात्याचे.

रोज संध्याकाळी पाचला, मावळत्या सूर्याला पाठ दाखवून दत्ता काकी आमच्याकडे येई. तिच्या वैधव्याचे पांढरे कपडे साबण नसल्यामुळे, गंजयुक्त पाण्यामुळे आणि सूर्यप्रकाशानं लालसर पिवळे दिसत. तिला हळूहळू येताना माझी आजी बघत असे, पण तिला बसायला जागा करत नसे. काकी यायची, घराच्या तीन पायऱ्या चढायची आणि आजीशेजारी स्टूल ओढून व्हरांड्यात बसायची.

तिचे बोलण्याचे विषय बरेच होते - सायटिका, कसलीही पडलेली नसलेला तिचा एकमेव वारस पुतण्या, तिच्या आणि आमच्या पूर्व बंगालमधल्या घरांच्या मधलं वांग्याचं शेत, आमच्या चार घरांतली सामायिक आंब्याची बाग, एकदा पकडलेला खूप मोठा मासा जो निसटून परत कुंडात गेला आणि पुन्हा सापडलाच नाही, आणि अशा बऱ्याच घटना, जागा, हरवलेले लोक. माझी आई त्या दोघींसाठी चहा करायची आणि मोठ्या काळ्या कपांत द्यायची. त्या भुरके मारत चहा प्यायच्या.

काकी सतत माझ्या आजीला खुश करण्याच्या प्रयत्नात असे, आणि तिच्या भावनांना प्रतिसाद देण्याची आजीला काही घाई नव्हती. काकीला मुलं नव्हती आणि आजीच्या मते त्यात तिच्या स्वार्थी स्वभावाचा थोडा हात होता. "लाडावलेल्या बायकांना मुलं होत नाहीत", आजी म्हणायची.

एकदा दुपारी घराच्या पायऱ्या चढताना काकीनं आईला हाक मारली. आईबरोबर आत गेली आणि पदराच्या टोकाला बांधलेली गाठ घाईघाईत सोडवली. त्यातून तीनशे रूपये काढले. तिचा सुरकुतलेला चेहरा गंभीर दिसत होता. पूर्व बंगालमध्ये तिनं तिची जी जागा सोडली त्याचा परतावा सरकारकडून आला होता.
"पण ह्यापेक्षा बरेच जास्त पैसे यायला हवे होते", आई तिला म्हणाली.
"तो चोर आहे", ती तिच्या पुतण्याबद्दल म्हणाली; पण तिला फार फरकही पडला नाही. तिनं तिच्या अंत्यविधीसाठी १०० रुपये बाजूला काढायला सांगितले. आणि उरलेल्या पैशांतून तिच्या रोजच्या दुपारच्या चहासोबत खाण्यासाठी तिची आवडती मिठाई मौचक आणायला सांगितली. शेवटी आईनं तिला होकार दिला.

"एका मौचकाचे किती?"
"चार आणे."
"एकूण किती दिवस पैसा पुरेल?" तिला फार आनंद झाला.
"खूप दिवस. आठशे दिवस." आई किंचित वैतागली.
"तू चिडलीस का?" काकी लहान मुलासारखी हसली.
"नाही… तुम्ही खा", आणि आई खोलीतून निघून गेली. तेव्हापासून काकीला रोजच्या चहाबरोबर मौचक द्यायला सुरुवात झाली.

काकी रोज पाचच्या मुहूर्ताला उगवायची. दोघी फार बोलत नसत. काकी बशी तोंडाजवळ न्यायची आणि दात नसलेल्या बोळक्या तोंडानं मिठाईच्या पोटातला, कॅरॅमल झालेला रस थोडाथोडा खायची. एकदा माझ्याशी नजरानजर झाल्यावर माझ्यासमोर बशी धरून म्हणाली, "तू खाणार थोडी मिठाई?"

मी आत पळालो आणि खिडक्यांवरून आलेले रंगाचे ओघळ बघायला लागलो. "अधाशी रांडेचा!" आजी पुटपुटत करवादली. "मुलासमोर का असे शब्द वापरायचे!" आईनं नापसंतीची मोहर उमटली. काकी काही न बोलता मौचक खात राहिली, पाणी प्यायली आणि मोठ्या कष्टानं जागची उठली.

"मी येते, छबी", नेहमीसारखी ती आईला म्हणाली आणि दरवाजा उघडला. रस्त्यावर काही पावलं चालल्यावर थांबली. मांडीवर हात टेकवल्यावर, पोक आलेलं तिचं शरीर थोडं थरारलं. "मी कोणाला काही म्हणत नाही. मीही उलट उत्तरं देऊ शकते", समोर बघतच ती बऱ्यापैकी मोठ्यानं पुटपुटली. "मी येते, ताई." तिचं पोक पुन्हा बाहेर आलं.

काकी पुरते आठशे दिवस जगली नाही. आजी तर त्याआधीच गेली.

बालपण म्हणजे डोकावण्याचा काळ होता. आजी दुपारी घोरायला लागली की तिच्या पायांमधून डोकावायचो. स्वयंपाकघरातल्या फडताळाच्या गंजलेल्या, मोडक्या लोखंडी जाळीतून लोणच्याच्या बरणीकडे डोकावून बघायचो. किंवा आमच्या प्राथमिक शाळेतल्या बांबूच्या कुंपणातून उलटा वाकून डोकावायचो. सगळं जग खाली डोकं वर पाय दिसायचं. आम्ही कधीकधी त्या कुंपणाच्या भोकांतून शक्य तितक्या लांब पळत जायचो. दुसऱ्या दिवशीची शाळा वीस तासांनी असायची.

घर
घराच्या आत : अंधाऱ्या नव्या जागांकडे नेणारी शिडी

इतर प्रकारची भोकंसुद्धा होती. मातीच्या भिंतींच्या बुडाशी चोरांनी केलेली भोकं होती. बंगालीत त्याला 'सिंध काटा' म्हणतात; मला ते 'सिंग काटा' ऐकू यायचं. (बंगालीत त्याचा अर्थ होतो शिंगानं खणणं.) माझ्या डोक्यात चोरांची प्रतिमा असायची, ती शिंगानं खणणारे लोक अशी. ते विचार आणखी पुढे जायचे, नेहमीप्रमाणे चोर पकडले गेले तर काय! पकडलेल्या चोरांना रात्रभर बदडण्याची एक भीषण परंपरा होती. सुरुवातीचा गलबला, स्थानिक पुरुष सगळ्या बाजूंनी चालत येणार, चोरांना घेरणार, सुरुवातीच्या चौकश्या, तात्पुरत्या बेड्या, हळूहळू मारायला सुरुवात आणि मग वयस्कर लोकांनी तरुणांच्या हातात सूत्रं दिल्यावर चोरांच्या तोंडात बोळे कोंबून दुष्टपणाचं प्रदर्शन भरवल्यासारखं त्यांना बदडून काढणं.

प्रदर्शनाच्या शेवटी, सकाळी चोरांना पोलिसांच्या हाती दिलं जात असे आणि त्यांचे दोन-चार दात गायब व्हायचे, डोळ्यांच्या खोबणीत डोळे कुठे तरी हरवायचे, शरीरं मलूल पडलेली असायची. आश्चर्यकारकरीत्या, त्यांची वाणी शाबूत असायची. पोलिस दिसल्यादिसल्या ते ओरडायला सुरुवात करायचे, "बघा, बघा, त्यांनी माझी काय अवस्था केली आहे..." चोरांतले बहुतेकसे पोलिस येईस्तोवर किंवा पोलिस स्टेशनात पोहोचेस्तोवर परलोकात पोहोचलेले असत. बाकीचे सगळे पुन्हा काही महिन्यांत जुन्या व्यवसायाकडे वळत असत.

पोलिसांची गाडी गेल्यावर सगळीकडे अवकळा पसरत असे. कपड्यांचे तुकडे, दोन-चार सुळे किंवा दाढा, आणि अर्थातच रक्ताचे डाग. कोणी तरी एखादी चप्पल शोधताना दिसे. एकदम कोणाला तरी आपल्या हातात केसांच्या बटा असल्याचं लक्षात येत असे आणि किळस येऊन तो घाईघाईनं घरी जाताना दिसे.

ही मारपीट एखाद्या तिठ्या-चौकात होत असे. त्या जागेबद्दल माझ्या मनात विचित्र कुतूहल उत्पन्न होत असे. मी तिथे परतपरत जात असे आणि माझ्या तोंडात त्याची गिळगिळीत, खारट चव राहत असे. मला हे कधीच समजलं नाही, की काही गोधड्या (ह्या चोऱ्या कायम हिवाळ्यात होत असत), टाल्कम पावडर, काही साड्या, विजारी, शर्टं, क्वचित ट्रान्झिस्टर आणि फारच क्वचित काही तरी सोन्याचा तुकडा ह्यासाठी हे लोक एवढी जोखीम, तेही मार पडण्याची, का घेतात! दुसऱ्या दिवशी चघळल्या जाणाऱ्या गोष्टीत मार खाणाऱ्या लोकांना जागा नसे, एखादी दिशा असे - त्या गटाराच्या दिशेनं आला, त्या डबक्याच्या बाजूनं आला, असं काहीसं लोक बोलत असत. स्त्रिया आणि वयस्कर लोक माझ्या आईकडे तक्रार करत असत, "ते डोळे बघणं फार भीतीदायक होतं, दीदी!" ते का हे मला कधीच समजलं नाही आणि न चुकता, त्या माणसाला चांगला धडा शिकवण्याची भाषा करत असत. स्थानिक तलावामध्ये उडी मारून एखाद्या पोराचा जीव वाचवणारा, भयंकर उकाड्यात रिक्षात उडी मारून हॉस्पिटलमध्ये का जात असे, हेही मला समजत नसे. कोणीही असुरक्षितता व्यक्त करत नसे, लोकांचा एकत्रित दुष्टपणा मार्क्सिस्ट शहाणपणाच्या पलीकडचा होता.

घर
आमचं घर

घरी हापशी बसवायला आलेल्या प्लंबरांपैकी रात्री आलेला माणूस धनेशदांना ओळखता आला - "तुम्ही अजून हे सोडून दिलं नाहीत? तु्म्हाला धडा शिकवायचा तरी कसा?" तिथेच शेजारी त्यांची तरुण बायको भातातलं उकळतं पाणी ओतत असे. दिनेशदा त्या नुकत्या खणलेल्या ढिगाऱ्यावर उभे राहून, आपल्या फावड्या दातांतून पिंक टाकत, बायकोकडे एक नजर टाकून धुसफुसत. त्यांना ऑफिसला जायला उशीर व्हायला नको!

पुढचे दोन-चार दिवस बाहेर जायची मला भीती वाटत असे. मी अंधारात बाहेर पडत नसे. त्या अमानुष मारपिटीमुळे मला कालियामर्दनाची आठवण होत असे, भीतिदायक पण आकर्षकही. चंद्रकोरीच्या अंधुक प्रकाश धोत्र्याच्या झुडपावर पडल्यावर, अंधारी रात्र पुस्तकातल्या भयकथेसारखी वाटत असे. त्यात जोडीला कोल्हेकुई आणि कुत्र्यांचं भुंकणं असायचंच. मी स्वतःलाच परका समजायला लागत असे.

ह्या सगळ्यात माझ्या आयुष्यात काही महत्त्वाची गोष्ट घडली. मी चौथीत होतो. माझा एक मामा आमच्याबरोबर राहायचा. त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला आंध्र प्रदेशात नोकरी लागली. पहिल्या महिन्यापासून त्यानं आईला पैसे पाठवायला सुरुवात केली, २० रुपये. त्याला वाटलं, मी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत जायला पाहिजे; कुठे ना कुठे सुरुवात व्हायला हवी. रात्रीच्या अंधारातले चोर आणि कंदील पूर्वीसारखेच होते, पण दिवस पूर्णपणे बदलले. खाकी कव्हरं घातलेली पुठ्ठ्याची पुस्तकं आली, शाळेतलं मारणं थांबलं, पाटी-पेन्सिलच्या जागी वही-पेन्सिल आल्या, ख्रिस्ताच्या गोष्टी आणि महिन्याच्या शेवटी प्रगतीपुस्तकही आलं.

मला मजाही वाटली पण भवतालापासून तुटल्यासारखंही वाटलं. कळपापासून तुटलेल्याचं पुन्हा नामकरण झालं. आता मला नवं टोपणनाव मिळालं. गोरटेल्या वर्णामुळे माझा मोठा भाऊ 'साहेब' होताच; माझं नाव पडलं 'हॉर्लिक्स!', जाहिरातीत म्हणायचे त्या हेलासकट.

इंग्लिश आमच्यासाठी फार झालं; आम्ही ते नाकारलं आणि स्वीकारलंही. 'काकरू, तुझ्या शाळेचं नाव काय?' सगळे हसायला तयार राहायचे. काकरू अजिबात निराशा करत नसे. 'कारो-पारो-मारो-शन' (तो स्थानिक कॉर्पोरेशनच्या शाळेत जात असे.) हसण्याचा धबधबा संपेस्तोवर माझा नंबर लागत असे; मला असाच कोणतासा बोचरा प्रश्न विचारत.

आमच्या साहेबी शाळेत औपचारिकतेशिवाय आणखी काहीही करणं शक्य नव्हतं. कोनाडे नाही, पळून जाणं नाही. बाहेर गवताचा मोठा तुकडा होता आणि त्याच्या कडेला फुलझाडं लावलेली होती. गव्हाळवर्णी आणि नाकीडोळी नीटस मधुश्री मला कधीमधी झोपाळ्यावर नेत असे. तिच्या फ्रॉकला खळीचा उग्र वास येत असे. आम्ही कधीकधी आकाशाला गवसणी घालत असू. मधुश्रीकडे छानसे, पांढरे स्पोर्टशूज होते; त्यांच्या नाड्या व्यवस्थित बांधलेल्या असत; तिचे पाय सुंदर, लांब होते; जिवणी बारीक होती आणि कुरळे केस होते. ती शांत असायची.

कधी दुपारी उशिरा मी मधुश्रीच्या मोठ्या घराकडे जात असे. तिकडे जाताना मला मनोहरदादूंचं गोळ्या-बिस्किटांचं, गोट्यांचं दुकान लागत असे; मजुमदारबाबूंचं रेशनचं दुकान होतं; वसाहतीची हापशी होती; कुंभारवाड्याचे चिखलाचे ढिगारे लागायचे; आजूबाजूच्या कुंडातली जांभळी लिली दिसत असे; आणि लास्करांच्या बंगल्याची बंद गेट्स दिसत. मधुश्रीच्या घराशी पोहोचलो की ती तिच्या भावाशी बॅडमिंटन खेळताना दिसे.

तिच्या मोठ्या, हवेशीर घरात मोठा पियानो होता आणि सगळीकडे संगीत कानावर पडत असे. सगळे शांत असत. तिचे वडील पेंगुळल्या डोळ्यांनी मंदावणाऱ्या उजेडाकडे टक लावून बघत असत. त्यांच्या तरुण वयात त्यांनी डॉन ब्रॅडमनला शून्यात स्टंप केलं होतं. मधुश्रीची आई मला कॅरमल कस्टर्ड खायला देत असे; भाऊ त्याचे स्टँप दाखवायचा आणि ती तिची गोष्टींची रंगीत पुस्तकं दाखवायची.

त्या सगळ्या मापातल्या थाटमाटात माझ्यावर असुरक्षिततेचं सावट येई. मला खात्री होती की एकदा तिचे वडील तारेतून बाहेर आले की ओरडायला सुरुवात करतील. माझ्या डोक्यात मोठे लोक मधुश्रीशी भांडत आहेत, असे विचार येत. मी माझ्या पालकांना सांगितलं की त्यांच्या दार्जिलिंगमध्ये चहाच्या बागा आहेत.

वर्षाच्या आतच मामा कोलकात्याला परतला, त्याचे डोळे आणि पाय सुजले होते. त्याला सरकारी हॉस्पिटलात दाखल केलं. डॉ. छेत्री अधूनमधून घरी येऊन जात. घरच्यांनी सगळी आशा सोडून दिली होती. तशातच एका सकाळी वडिलांना पहाटे जाग आली आणि पांढऱ्या उजेडात मामा दिसला. ते घाबरून मामाला हाका मारायला लागले, "खोकन, खोकन!" मामा गेला आणि मी पुन्हा स्थानिक शाळेत गेलो.

सेंट मेरीतून बाहेर पडल्यावर मी मधुश्रीकडे जाणं हळूहळू बंद केलं. तिच्या आठवणींनी माझ्या मनात खळबळ माजत नसे, पण त्या आठवणी पुसटही झाल्या नाहीत.

माझं तिथे जाणं अपवादात्मकच होतं. त्या दिवसांत स्थानिक शाळा आणि वसाहत एकमेकांत गुंतलेल्या होत्या. शेजारपाजारचा नीट अंदाज घ्यायचा तर शाळा बघायला हवी इतक्या. शिक्षणाचा रेटा खूप मोठा होता आणि सतत वेगवेगळे विषय शिकायला लागल्यामुळे आम्ही मुलगे वेगवेगळे आवेश आणत असू. शिक्षणामुळे आर्थिक स्थैर्य अर्थातच येत असे आणि त्यासोबत अनैतिकेशी झगडण्याचं बळही येत असे. आमच्या शेजारचे ज्योतिषबाबू सकाळी मंडईतून परत येताना, अंगणात शिरले की सवयीखातर मुलींच्या नावानं शंख करायला सुरुवात करत. "स्वप्ना वाचन कर, रत्ना वाचन कर. वाचत राहा. मोठ्यानं वाचा!", "वाचायचं का थांबवलात, काय झालं? थांबलात तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही!" अशासारखा आरडाओरडा रात्रीच्या अंधारात चालत असे. संध्याकाळी वस्ती फॅक्टरी बनत असे, जोरजोरात वाचून शिक्षणाची फॅक्टरी. वाचन वेगवेगळ्या घरांत वेगवेगळ्या पद्धतीनं चालत असे. शिक्षणामुळे आम्हांला कोलकात्यात भद्रलोक हे स्टेटस मिळायला मदत झाली. त्यावर आमचा हक्क होता आणि तो हिरावून घेतला गेला होता, असा आमचा समज होता. सर्वांत महत्त्वाचं, आमच्या वस्तीतल्या हलक्या लोकांपेक्षा आम्ही वेगळे असल्याचं दिसेल; त्या घरांतली काहीच मुलं शाळेत आमच्याशी स्पर्धा करत असत.

माझे वडील पश्चिम बंगालच्या मुख्याध्यापक संस्थेत कार्यरत होते. ही संस्था काँग्रेसशी संलग्न होती. संस्थेच्या कामामुळे त्यांना घरी यायला उशीर होत असे. ते घरी आल्यावर चुकून कधी मी जागा असेन तर ते मला कधीमधी संत्री देत आणि नेहमी जुन्या, इतर ठिकाणच्या गोष्टी सांगत. शौर्य आणि मानवतेच्या, अर्जुनाच्या लक्ष्यभेदाच्या, टायटॅनिकच्या, कासाब्लांकाच्या, न्यूटन, नेपोलियन, अशोकासारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या. ह्या पराक्रमाच्या गाथांमध्ये मला नेल्सनच्या गोष्टीबद्दल कायम शंका असायची. "वाच म्हणजे तुला समजेल", असं म्हणे नेल्सनची आजी त्याला नेहमी सांगायची. तिनंच त्याला वाढवलं होतं. आपल्याला जगाचं ज्ञान कुठून मिळालं ह्याबद्दल बाबाही मला हेच म्हणायचे. मला बहुतेकशा गोष्टी माहीत होत्या, त्यात काही नवीन नसायचं. पण दमल्यावर ऐकायचा आणि पुनःप्रत्ययाचा आनंद मला हवासा वाटायचा. माता मेरी आपल्या उच्चासनावरून खाली आली; फ्रेंच खेड्यातल्या घामाघूम झालेल्या त्या गरीब जगलरचा घाम तिनं पुसला; अशा गोष्टींतली आशा गुरफटून मी झोपत असे. अपरात्री दमलेल्या कुत्र्यांचं भुंकणं, लांबून येणारा कीर्तनाचा आवाज, अंथरुणात येणारा बारीकसा चंद्रप्रकाश ह्या सगळ्यांत तो जगलर माझ्या झोप-जागृतावस्थेच्या मध्येच येत असे. बाबांच्या गोष्टीसारखा तो नव्हता. तो आमच्या नबीसारखा होता; उंच, पोपट-नाकाचा, सावळा, विरळ दाढी, मृदू आवाज, आणि प्रेमळ डोळे. नबी कुठे राहायचा आम्हांला माहीत नव्हतं. तो घरोघरी जायचा, कपडे धुणं, नारळ सोलणं, अंगण झाडणं, अशी कामं करायचा. तो वस्तीचा गडी होता, दिवसा अवतरणारा. त्याची चालण्याची तऱ्हा गमतीशीर होती. चालताना त्याचे पाय किंचित डुलायचे. आणि तो नाकात, गेंगाणा बोलायचा; त्यामुळे टिंगल करण्यासाठी तो योग्य गिऱ्हाईक होता. "नबी, नाच कर ना!" तो जोरजोरात हात-पाय झाडून दाखवायचा, पण वर म्हणायचा, "घरी नाव सांगणारे तुमचं!" एक दिवस नबीच्या डोक्यावर परिणाम झाला. पूर्णपणे. लोक त्याला घेऊन गेले. त्यानंतर तो परत आला नाही; माता मेरीसुद्धा. अनातोली फ्रान्सची ती कथा मी कधीच वाचू शकलो नाही. कदाचित भोळ्याभाबड्या माणसाला छळल्याची शिक्षा असावी.

सकाळी मला भीती वाटायची. अर्धवट चेचलेलं, अर्धवट खाल्लेलं संत्रं माझ्या उशीखाली सापडायचं. "मला दिवसभर मोलकरणीसारखं राबावं लागतं; आणि त्यावर ही नाटकं!" चादर आणि अभ्रा काढून जमिनीवर आपटताना माझी आई ओरडायची. "तुला काय समजणार", बाबा गरीब हसू चेहऱ्यावर आणत, तोंडाला लागलेले दूध-कुरमुरे पुसत न्याहारी आटपायचे.

साठच्या दशकाच्या मध्यात, बऱाच काळ बाबांचा पगार शाळेकडून अनियमितपणे यायचा. शाळेच्या बंद फाटकासमोर बाबा आणि त्यांचे सहकर्मचारी उपोषणाला बसल्याचा फोटो वर्तमानपत्रात आल्यावर आमच्या कुटुंबाला प्रसिद्धी मिळाली. ताईनं तोवर बी.ए. पूर्ण केलं आणि निर्वासितांचा पाढा गिरवत सरकारी हाफिसात कनिष्ठ स्टेनोग्राफर म्हणून नोकरी मिळवली. घराच्या स्थैर्यासाठी लग्नासाठी स्थळं पाहणं जरा मागे पडलं. ज्या दिवशी ताईनं नोकरी सुरू केली त्या दिवशी ती आमच्या वस्तीतल्या बाकीच्या स्त्रियांसारखीच खळ लावून इस्त्री केलेली प्रिंटेड साडी नेसून, खांद्याला पर्स लावून निघाली. आईनं तिला क्षणभर थांबवलं - आईनं तिच्या कपाळावरून थुंकल्यासारखं करून तिची दृष्ट काढली. बाबा तिच्याबरोबर ऑफिसला गेले. इंग्रजांच्या अमदानीत बांधलेली, शहराच्या मध्यवर्ती भागात लांबडी लाल रंगाची इमारत होती. दोनेक तासांनी शहाळं घेऊन ते पुन्हा ऑफिसात परत गेले; ताईला लाज वाटली. बाकीच्या शिकलेल्या निर्वासित स्त्रियांसारखंच, कोलकात्याची बोलीभाषा ताईला व्यवस्थित अवगत होती. प्रश्न चारचौघांत मान मिळण्याचा होता - पुरुषांना जसा मान मिळत असे तसा स्त्रियांना नव्हता. लवकरच ताईनं ऑफिसात स्वतःची जागा निर्माण केली.

इंटरमिजिएट सायन्समध्ये दादाचं बरं सुरू नव्हतं. काही दिवस फुगेवाल्यांची चित्रं काढून आणि आत्महत्या करण्याबद्दल बोलून त्यानं घरी कोणालाही काहीही न सांगता, अचानक एयर फोर्समध्ये प्रवेश घेतला. त्यावरून थोडा गदारोळ माजला. काँग्रेसी मित्रांशी बोलून बाबांनी जाहीर केलं, "धोका पत्करला नाही तर काही मिळणार नाही." (चीनशी युद्ध हरल्यावर आता पाकिस्तानशी युद्धाची तयारी सुरू झाली होती.) सिगरेटला हात न लावण्याची दादानं आईसमोर शपथ घेतली; चंदन लावलेल्या पूजेतल्या फुलांच्या पाकळ्या आपल्या, रेक्झिनच्या नव्या सूटकेसमध्ये कोंबल्या आणि टॅक्सीनं रेल्वे स्टेशनकडे निघाला. टॅक्सी कोपऱ्यावर वळली तेव्हा आईला लक्षात आलं की ह्या गोंधळात त्याचा टिफिन घरीच राहिला. डावरीदा धावत टॅक्सीपर्यंत गेले; टिफिन दादाच्या हातात दिला आणि लगेच परत आले. आई आणि आजी पुन्हा त्यांच्या अखंड-भांडणाला लागल्या.

काही लोक दादाला स्टेशनपर्यंत सोडायला गेले होते; ते परत आले तरीही कुरबुरी सुरूच होत्या. काहीही कारणाशिवाय दोघी आपापला बचाव करत होत्या. बाबा आल्यावर भांडणाला निराळंच वळण लागलं. बाबा आणि आजीच्या भांडणाबद्दल मला काही वाटलं नाही; उलट मला थोडासा सुप्त आनंदच झाला.

त्या दिवशी आमच्या घरी लवाजमा आला होता. काका-मामा, चुलत-मामेभावंडं, सगळे आले होते. हळूहळू बारक्या कुरबुरीचं रूपांतर सामाजिक इतिहासात झालं. फाळणीनंतर आमच्या कुटुंबाचं काय झालं, ह्याचा हिशोब मांडला गेला. इथे येऊन, नेताजी नगरातल्या ह्या कळकट घरात भाड्यानं राहण्याचा निर्णय योग्य होता का? दादानं खुर्दा रोडचं जंक्शन पार केलं असेल आणि तो आणखी लांब गेला असेल.

ह्या प्रश्नानं मी थोडा दचकलो. नेताजी नगर वगळून इतर अनेक पर्याय होते ह्याची मला कल्पना नव्हती. आम्ही कायम 'देशेर बाडी'बद्दल (गावाकडचं घर) ऐकायचो, पण त्यातून उलट नेताजी नगर हेच आमचं घर होतं, हीच कल्पना दृढ होत गेली. घरच्या मोठ्या लोकांसारखं आम्हीही स्वतःला निर्वासित समजायचो, पण नेताजी नगर आमच्या रोमांरोमांत भिनलं होतं. बाबांचा भाचा, केशबचं आजीशी एकमत झालं; दीप्तीची मुलगी - "स्वोपूला विजयगडमध्ये वाढवणार नाही." त्यानं त्याचा शब्द पाळला. लवकरच ते मध्य कोलकात्यातल्या एका घरात भाड्यानं राहायला लागले. स्वोपूनं लवकरच नवं पान उलटलं.

आधुनिकता
पुन्हा एकदा नव्याला रस्ता करून देताना

दादा आणि ताईच्या पगारानं आम्हाला फक्त आर्थिक झळांपासून वाचवलं असं नाही, तर घरात आधुनिकताही आली. पुस्तकांच्या कपाटाला जी. सी. लाहांच्या दुकानातून आणलेला जाडा, रंगीत कागद लावला होता, छोट्या शोभेच्या गोष्टी मांडल्या होत्या. ताई एकदा बाँबे डाईंगची चादर आणि पडदे घेऊन आली. त्यावर देवळाच्या शिल्पांची छपाई होती. आईनं तिचं शिवणाचं यंत्र खोलीच्या मधोमध काढून पडदे शिवायला सुरुवात केली. तोंडानं शिवणाचा दोरा ओला करून सुईत दोरा ओवताना तिच्या डोक्यात विचार मात्र असायचा तो बाबांच्या धाकट्या काकांच्या, दक्षिण कोलकात्यातल्या घरातल्या फर्निचरचा.

पडदे जागेवर लागले, चादरी पलंगांवर पसरल्या.

ते फार काळ टिकलं नाही. त्यांवर अनन्वित अत्याचार झाले. दाढीच्या ब्लेडनं पडदे फाडले. आईनं पडद्यांचा अंत्यसंस्कार केला आणि उगाच त्याचं खापर बाबांवर फोडलं.

आईच्या संतापावर बाबा मंदस्मित करत राहिले. "हल्लीची पोरं अशीच असतात", ते म्हणाले. कम्युनिस्ट जसजसे प्रगती करतील तशी सगळी नैतिकता आणि न्याय लयाला जाईल. आईनं पुन्हा सिंगरचं मशीन खोलीच्या मधोमध ठेवलं. पडदे पुन्हा शिवले, घड्या घालून ट्रंकेत ठेवले आणि ताईच्या विरलेल्या, जुन्या साड्यांचे नवे पडदे बनवले.

एकदा दुपारी आईला सगळं दुपारचं जेवण उलटून पडलं. चादरीवर ताजी उलटी पसरली. ते सगळं कोनाच्या पानांत गुंडाळून खिडकीतून बाहेर फेकून दिलं. परेश नुकताच निसटला होता. आईनं सगळ्या देवांचा धावा करून त्याच्या मृत्यूची भीक मागितली. म्हणाली, "स्वतःला ब्राह्मण म्हणवतात. नोआखलीहून सगळे फालतू शूद्र ब्राह्मणांची वस्त्रं घालून आले आहेत."

पुढच्या भागाचा दुवा

विशेषांक प्रकार

सीताफळसिंग हत्ती Mon, 21/10/2019 - 16:55

त्या काळात कोलकात्यात दिवसाला सरासरी पन्नास खून होत होते.

भयानक.

लेख चांगला असावा असे वाटते पण खूप मोठा झाला आहे. मी एका बैठकीत इतके वाचू शकत नाही. जितका वाचला तितका आवडला. याचा युट्यूब व्हिडिओ करून इथे देता आला तर बरे.

अभ्या.. Tue, 22/10/2019 - 11:45

तेवढा शिडीचा फोटो ९० अंशात फिरवा. शिडीची तिरडी झालीय. ;)
(की तसाच आडवा अपेक्षित आहे?)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 22/10/2019 - 21:59

In reply to by अभ्या..

आभार. बदल केला आहे.

बंगाली जाणणाऱ्या मैत्रिणीनं काही बंगाली शब्दांचं मुद्रितशोधनही करून दिलं; उदाहरणार्थ मिठाईचं नाव मोऊचाक - मधाचं पोळं. तिचेही आभार.

बॅटमॅन Thu, 24/10/2019 - 02:22

अफाट लेख आहे. कोलकाता (पुन्हाएकदा) डोळ्यांसमोर उभे राहिले. छोट्या छोट्या प्रसंगांतून चित्र उभे करायची हातोटी निव्वळ विलक्षण आहे. आमचे कोलकाता यापेक्षा खूपच वेगळे असले तरी या निमित्ताने पुन्हा एकदा मनोमन तिकडे फिरून आलो. :)

चिमणराव Thu, 24/10/2019 - 07:50

कोलकात्यात, बंगालात भंपकपणा फार होता हे इतर लेखनातूनही कळलं. पण त्याचंही त्यांनी मार्केटिंग केलं.
बरेच अभद्र लोक समाजात असल्यावर मुठभर भद्रलोकांचे उदात्तीकरण आपोआपच होतं. ते काही तरी उदात्त विचार लेखनातून, चित्रांतून उतरवतात. जिकडे तिकडे दुसऱ्या राज्यातल्या रस्त्यांनाही त्यांची नावं लागतात.हे कोण माहीत नसलं तरी.

ऋषिकेश Wed, 30/10/2019 - 08:20

मूळ लेखन वाचलेलं नाही, मात्र अनुवाद चांगला झाला असावा. कुत्ता जाने वगैरे स्वैर रूपांतर खास.

आता लेखाबद्दल:
लेखन खरोखर महत्त्वाचं आहे. कॉलनी सभा (आपच्य प्रस्तावित मोहल्ला सभा) तेव्हा functioning होत्या हे रोचक आहे.

रोचना सोबत कलकत्ता बघता -समजून घेताना काही संदर्भ ललित लेखनामुळे अधिक तपशिलात समजले.

बाकी अनेक बंगाली पदार्थांची नावं यात आल्याने अधिकचे मार्क :)

आता पुढल्या भागाकडे वळतो.