राष्ट्रवाद : अस्सल आणि बेगडी - आशिष नंदी
राष्ट्रवाद : अस्सल आणि बेगडी
दोन उत्तरराष्ट्रवादद्योतक ताणांचा दुर्दैवी अंत
मूळ लेखक - आशिष नंदी
भाषांतर - उज्ज्वला
गोशवारा -
राष्ट्रवाद म्हणजे देशप्रेम नव्हे. राष्ट्रवाद ही एक विचारसरणी आहे. ती कोणत्याही विचारसरणीसारखी एखाद्यावर बिंबवली जाते. वसाहतवादकालीन आफ्रिकी-आशियाई लोकांच्या पाठुंगळी ती राष्ट्र या संकल्पनेच्या बरोबरीने आली. इतर प्राण्यांत जशी हद्दीची भावना असते, तशी देशप्रेम ही भावना आहे. हा फरक समजून न घेतल्याने एकीकडे आपले राष्ट्रपिता गांधीजी यांची पारंपरिक राष्ट्रवादावरील टीका आणि दुसरीकडे राष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोर यांचा राष्ट्रवादाला संपूर्ण नकार अशी विभागणी आपल्याला दिसते.
विनय लाल म्हणतात, भारतीयांना विक्रम मोडण्याचा नाद आहे. 'गिनीज बुक'कडे येणाऱ्या अर्जांतले साधारण एक दशांश अर्ज एकट्या भारतातून येतात. त्यांतल्या काहींचा समावेश होतोही. विक्रमही स्तिमित करणारे – २२ वर्षे रस्त्याच्या कडेला बसलेला मौनीबाबा काय, तांदळाच्या एका दाण्यावर १३१४ अक्षरे लिहिणारा सूक्ष्मलेखनिक काय, अफलातून! पण भारतीयांनी दावा न केलेला एक विलक्षण विक्रमही आहे, जो राष्ट्र या संकल्पनेच्या गेल्या ३५० वर्षांच्या इतिहासात - आणि राष्ट्र हे घटित असेपर्यंत - अबाधित राहील. रवींद्रनाथ टागोर (१८६१ – १९४१) यांना आपण राष्ट्रकवी म्हणतो. त्यांनी लिहिलेले 'जनगणमन' आपले राष्ट्रगीत आहे. त्यांचेच कवन बांगलादेशाचेही राष्ट्रगीत आहे. तिथे हल्ली मूलतत्त्ववाद डोके वर काढू लागला आहे. भारतविरोधी आणि हिंदूंविरोधी सूर लागत असतो. पण भारतीय हिंदू असलेल्या टागोरांनी लिहिलेल्या बांगलादेशच्या राष्ट्रगीताला कोणीही विरोध केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. एवढेच नाही; श्रीलंकेच्या राष्ट्रगीताचे शब्द टागोरांचे नसले, तरी चाल मात्र टागोरांनीच लावलेली आहे. श्रीलंकेचे लोकही नेहमी भारताशी प्रेमाने वागतात असे नाही, पण त्यांना भारतीय टागोरांच्या चालीविषयी आत्मीयता आहे.
टागोर हे एकमेव उदाहरण नाही. इतरही काही उदाहरणे आहेत; पण कमी नाट्यमय. महम्मद इक़्बाल यांचे 'सारे जहाँ से अच्छा' हे गीत घ्या. पाकिस्तानी राष्ट्रकवी आणि पाकिस्तान निर्मितीमागील प्रमुख अशा या व्यक्तीचे हे गीत भारतीय सैन्यदलाचे प्रमुख कवायत-गीत आहे. भूप्रदेशाच्या सीमा आणि राष्ट्रीय संस्कृती या संकल्पना दक्षिण आशियात जरा वेगळ्याच प्रकारे विकसित झालेल्या दिसतात.
१९१३ साली नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर टागोर संपूर्ण आशिया खंडाचे नायक बनले. ऐन वसाहतवादी कालखंडात कोणत्याही विषयाचे नोबेल मिळवणारे ते पहिले आशियाई ठरले. त्याला फारच महत्त्व आले. १९१६ साली जेव्हा युरोप पहिल्या जागतिक महायुद्धात होरपळत होते तेव्हा टागोर जपानला प्रथमच एका व्याख्यानमालेच्या निमित्ताने गेले. ओसाका बंदरात त्यांच्या स्वागताला हजारो जपानी लोटले. सुरुवातीला त्यांचे एखाद्या राजाप्रमाणे शाही स्वागत झाले. त्यांच्या प्रत्येक दिवसाचे वार्तांकन जपानी वृत्तपत्रांत पहिल्या पानावर झळके. दुर्दैवाने, टागोरांची काही व्याख्याने राष्ट्रवादावर होती. आता ती तेवढी बोचरी क्रांतिकारी वाटत नाहीत. त्यांतील काही मुद्दे परिचयाचे आहेत, तर काही अजूनही ताजे व प्रक्षोभक वाटतात. पण त्यातल्या कोणत्याच मुद्द्यामुळे टोकिओच्या उपसागराला आग लागणार नव्हती. मात्र त्या काळी जपानी लोक राष्ट्रवादाच्या एका हास्यास्पद आवृत्तीमध्ये गुरफटलेले होते. त्यांना टागोरांची राष्ट्रवादावरची टीका चांगलीच खटकली. टागोरांच्या भाषणांमध्ये राष्ट्रवादातून उद्भवलेले सैनिकीकरण व राजसत्ताकारण यांचा समाचार घेतलेला होताच; शिवाय जपानच्या नवीन राजकीय चेहऱ्याची व खुद्द राष्ट्रवाद या संकल्पनेची खिल्लीही उडवलेली होती. जपानसाठी असलेला धोका हा केवळ पाश्चिमात्य जगाच्या ढाच्याचे अनुकरण करणे एवढाच नाही, तर पाश्चिमात्य राष्ट्रवादाची प्रेरणाशक्ती आपलीशी करणे हा मुख्य धोका आहे असे टागोरांनी ठासून सांगितले. ओशाळपण आणि राग या भावनांतून मग जपानी वृत्तपत्रांनी आणि बुद्धिजीवींनी टागोरांच्या सभांचे वृत्तांकन करताना 'एका पराभूत संस्कृतीतील कवीचे वाहवत जाणारे विचार' अशी त्यांची संभावना केली. (पुढे १९२४मध्ये टागोर चीनला गेले असता तेथील काही जणांनी हेच केले.) जपानची नव्या राजाच्या अधिपत्याखालील वैभवी झळाळी आणि त्याला नवीन जागतिक सत्ताकेंद्र म्हणून मिळत असलेल्या प्रतिष्ठेची झूल पांघरलेल्या जपान्यांना टागोरांचे अस्तित्व बोचू लागले. टागोर जपानहून मायदेशी परतताना त्यांना सोडायला फक्त एकच जण आले, ते म्हणजे त्यांचे स्थानिक यजमान.
वसाहतकालीन भारतातही राष्ट्रवादाची संकल्पना रुचली नव्हती असे थोडेच लोक होते. कित्येकांना टागोरांचे वागणे अनाकलनीय वा अनपेक्षित वाटले नसले, तरी विक्षिप्त वाटले. त्यांनी आधीच प्रखर भारतीय-राष्ट्रवादी लोकांना राष्ट्रकारणी हिंसेच्या कल्पनेवर टीका करून दुखावले होते. टागोर आणखीही टोकाची भूमिका घेऊ शकतात हे त्यांना माहिती होते. 'गोरा' (१९०९), 'घॉरे बाइरे' (१९१६) आणि 'चार ऑध्याय' (१९३४) या त्यांच्या तीन कादंबऱ्यांतून त्यांनी प्रखर पुरुषी राष्ट्रवादावर हल्ला चढवला असे मानले जाई. टागोरांच्या टीकेने अनेकांच्या भावना दुखावल्या; मात्र टागोर भारताचे अनधिकृत, पण राष्ट्रीय कवी असल्याने ती टीका राजकीयदृष्ट्या योग्य मानून लोकांना सहन करावी लागली. त्यांनी देशभक्तीपर असंख्य गाणी लिहिली होती. त्या गाण्यांतून स्फूर्ती घेणारे अगणित स्वातंत्र्यसैनिक होते – अगदी गांधीजींपासून ते पोलिसांच्या लाठ्या आणि गोळ्या झेलणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच. तुरुंगातही स्वातंत्र्यसैनिकांना आत्मबल टिकवून ठेवण्यासाठी टागोरांच्या गाण्यांचा आधार होता.
१.
हे दिसते तेवढे विसंगत नाही. टागोरांनी स्वतःमधील दोन वृत्तींचा समेट त्यांच्या लिखाणातच कशा प्रकारे घडवला हे दोन प्रकारे दिसते. एक म्हणजे त्यांच्या बंगालीतील लिखाणात टागोरांनी देशप्रेम व्यक्त करणारे देशाभिमान, स्वदेशप्रेम, देशभक्ती, स्वदेशचेतना असे १२ ते १५ शब्द वापरले. पण त्यांतला एकही शब्द nationalism या शब्दाला समानार्थी किंवा त्याचे भाषांतर म्हणून वापरला नाही. जेव्हा त्यांना nationalism हा शब्द वापरायचा असे तेव्हा ते तोच शब्द बंगाली लिपीत लिहून इतर शब्दांहून त्याचे वेगळेपण अधोरेखित करत. टागोर देशभक्त होते पण नॅशनॅलिस्ट नव्हते. त्यांच्या मते स्थानिक भाषेतील देशभक्तीपर शब्दांत अभिप्रेत असलेली भौगोलिक सीमा ही राष्ट्र व राष्ट्रवाद या संकल्पनांत अभिप्रेत असलेल्या भौगोलिक सीमेपेक्षा वेगळी आहे. मला वाटते, की त्यांना देश ही संकल्पना घर या कल्पनेशी साम्य दाखवणारी, तर राष्ट्र ही संकल्पना कृत्रिम, देश या संकल्पनेकडे एक साधन म्हणून पाहणारी आणि त्याच्या पडझडीवर उभारलेल्या डोलार्यासारखी वाटे. खरोखर, नॅशनॅलिझम ही काही प्रमाणात मुळे उखडली गेल्याच्या किंवा बेघर झाल्याच्या भावनेची प्रतिक्रिया म्हणून आली होती.
टागोरांच्या कादंबऱ्यांतील नॅशनॅलिझम
टागोरांच्या आकलनातील राष्ट्रवाद हा त्याच्या मूळ, युरोपीय, एकोणिसाव्या शतकात पूर्णत्वाला गेलेल्या आवृत्तीनुसार आधुनिक राष्ट्र व राष्ट्रीयत्व ह्या संकल्पनांशी निगडित असा होता आणि तो कित्येक पत्रांतून व निबंधांमधून स्पष्टपणे व्यक्त झाला. पण या संकल्पनेच्या सामाजिक व नैतिक परिणामांचे अस्वस्थ करणारे चित्रण टागोरांच्या तीन कादंबऱ्यांत आढळते : 'गोरा', 'घॉरे बाइरे' आणि 'चार ऑध्याय'. यातील प्रत्येक कादंबरी ठळक राजकीय घटनेवर आधारित आहे. मात्र ते ठरवून तसे केले होते का याबद्दल शंका आहे. 'गोरा'मध्ये जगाच्या या भागात असलेल्या संस्कृतींनी मान्य केलेल्या धूसर स्व-अवकाशाला अमान्य करणारी ताकदवान मानसशास्त्रीय व्याख्या टागोर मांडतात. ते म्हणतात, की नॅशनॅलिझम ही कल्पना मुळातच अ-भारतीय किंवा भारतविरोधी आहे, भारतीय संस्कृतीचा अपमान आहे आणि तिच्या सांस्कृतिक बहुविधतेच्या तत्त्वावरच घाला आहे. 'घॉरे बाइरे' या गोष्टीत नॅशनॅलिझममुळे सामाजिक आयुष्य मोडून जाऊन त्यातून धार्मिक-वांशिक दंगलींचा राक्षस उधळताना दिसतो. त्याने 'घर' मोडते कारण भारतीय संस्कृतीतील सामाजिक व सांस्कृतिक आदानप्रदान, आणि अगत्य यांचे नैतिक अधिष्ठानच खरवडले जाते. 'चार ऑध्याय' हा आधुनिक औद्योगिकीकरण झालेल्या युगातील हिंसेच्या मुळाशी जाणारा असा कदाचित पहिलाच प्रयत्न होय. संघटित हिंसेचे बदलते रूप व त्याचा राष्ट्रवादाशी असलेला संबंध यावर हाना आरन्ड्ट, रॉबर्ट जे. लिफ्टन आणि झिगमुन्ट बाउमान यांनी पुढे केलेल्या लिखाणाची ही जणू नांदी होती. या तीनही कादंबऱ्यांकडे टागोरांचे घनिष्ठ मित्र ब्रह्मबांधव उपाध्याय (१८६१-१९०७) यांच्याशी टागोरांनी पुन:पुन्हा केलेला संवाद असेही पाहता येते. ब्रह्मबांधव उपाध्याय हे कॅथलिक धर्मज्ञान असलेले, पण वेदान्त कोळून प्यायलेले आणि आधुनिक हिंदू राष्ट्रवादाची मांडणी करणारे भारतातले पहिले अभ्यासक होते. तसे त्या कादंबऱ्यांत विवेकानंद, भगिनी निवेदिता आणि कदाचित रुडयार्ड किपलिंग यांच्या मतांवरूनही वादविवाद आहेत. टागोरांनी त्यांच्या पात्रांद्वारे त्यांच्या आणि उपाध्याय यांच्या मनातील भीती, आशा-आकांक्षा आणि दृष्टी, तसेच स्वभावांचे कंगोरे चितारले आहेत.
टागोरांच्या समन्वयवादाचे दुसरे स्वरूप त्यांच्या भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेच्या आकलनातून प्रकट होते. त्यांच्या (आणि आजच्या आपल्या) काळातील काहींच्या म्हणण्यानुसार वेद, उपनिषदे, आणि गीता ही भारतीय एकात्मतेची मुख्य अंगे किंवा पाया आहेत; परंतु टागोरांना तसे वाटत नसे. या बाबतीत राममोहन राय, विवेकानंद, अरविंद घोष आणि एकोणिसाव्या शतकातील इतर अनेक विचारवंतांशी त्यांचे मतभेद होते. वेद, उपनिषदे अभिजात आहेत, पण टागोरांच्या मते भारतीय एकात्मता मध्ययुगीन कवी आणि राजकीय व धार्मिक संतमंडळींच्या विचारांतून तयार झाली. अशा देशात नॅशनॅलिझमची युरोपीय संकल्पना अंगीकारणे म्हणजे स्वित्झर्लंडने आरमार उभारण्यासारखे आहे असे ते म्हणत.
अशी भूमिका घेणे हे टागोरांसाठी सोपे नसणार. ते ब्राह्मो समाजाचे होते आणि त्यांचे कुटुंब एकोणिसाव्या शतकातील हिंदू समाजातील कर्मठतेविरोधी चळवळीत भाग घेणारे होते. ब्राह्मो समाज सामाजिक पुनरुत्थानासाठी वेद, उपनिषदे या अपौरुषेय दैवी ग्रंथांचाच आधार घेऊन बालविवाह, सतीची चाल, अस्पृश्यता अशा प्रथांना विरोध करत असे, तसेच विधवाविवाहाला प्रोत्साहन देत असे. टागोरांच्या भूमिकेमुळे ते त्यांच्या स्वतःच्या मुळांना आणि स्वत्वालाच नाकारत होते. एकोणिसाव्या शतकातील हिंदू समाजातील पुनरुत्थानामागे ब्राह्मो समाज, आर्य समाज आणि रामकृष्ण मिशन या तीन महत्त्वाच्या चळवळी होत्या. भारतीय परंपरेतील विवेकवादी भूमिका वेद, उपनिषदे व गीता यांतच असून तिच्यापासून फारकत घेतल्याने हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा सुरु झाल्या व त्यांचा बिमोड या मूळ स्रोतांकडे वळल्याने होईल अशी त्यांची धारणा होती.
याउलट टागोरांच्या भूमिकेमुळे भारताच्या संस्कृतीकडे अनेक साधू, संत यांनी घडवलेले, धार्मिक कक्षा धूसर असलेले घटित या दृष्टिकोणातून पाहण्याची शक्यता निर्माण झाली. कबीर, नानक, बुल्लेशाह आणि लालन यांप्रमाणे टागोर एकाच वेळी अनेक धार्मिक परंपरा आपल्याशा करू शकत होते. भारताच्या एकसंधपणाच्या अशा प्रकारच्या मांडणीमुळे भारतीयत्व हे राष्ट्र या संकल्पनेपासून वेगळे काढता येत होते, त्या संकल्पनेची अपरिहार्यता तपासता येत होती. मात्र आधुनिक भारताचे धुरीण मात्र ही संकल्पना मोठ्या मायेने गोंजारत होते. देशप्रेम हे राष्ट्रवादापासून वेगळे काढण्याची टागोरांची धडपड चालली होती. त्यायोगे एका बौद्धिक व मानससशास्त्रीय पायावर राजकीय समाजाच्या नैसर्गिक सीमा दृढ व्हाव्यात आणि युरोपीय शैलीचा राष्ट्रवाद टाळता यावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांना युरोपमध्ये तसेच दक्षिण गोलार्धात राष्ट्रवादाची नेमकी काय गत आहे याची कल्पना होती आणि त्यांना राष्ट्रवादाची युरोपीय मांडणी कशा प्रकारे युरोपची आणि जगाची वाताहात करणार आहे याचा अंदाज आला होता.
टागोर व गांधी यांचे काही बाबतींत मतभेद असले, तरी टागोर गांधींचे मित्र व प्रशंसक होते. गांधीजींना महात्मा ही पदवी त्यांनीच प्रथम दिली आणि त्यांना आपल्या पश्चात शांतिनिकेतनची जबाबदारी घेण्याची गळही घातली. गांधीजींना शांतिनिकेतनचे विश्वस्त नेमले. गांधीजींनीही टागोरांना गुरुदेव ही पदवी दिली. त्यांनाही भारतीयत्वाची ओळख अभिजातकालात नाही तर मध्ययुगात बनली आहे हा टागोरांचा विचार पटला होता. एकोणिसाव्या शतकातील धार्मिक पुनरुत्थानाच्या ज्या चळवळी अभिजात संहितांकडे वळू पाहात होत्या त्यांना गांधीजींनी थारा दिला नाही. म्हणजे पूर्ण वेगळ्या बौद्धिक दृष्टिकोणांतून सुरू झालेला त्या दोघांचा प्रवास राष्ट्रवाद या संकल्पनेबाबत एकमेकांशी जुळत होता. ज्यांनी गांधीजींच्या समग्र वाङ्मयाचे शंभर खंड वाचले आहेत किंवा ज्यांना त्यांची तोंडओळख आहे त्यांना त्यात राष्ट्रवाद या संकल्पनेचे संदर्भ विरळा आहेत हे माहीत आहे. बहुतेक सर्व संदर्भ टीकात्मक आहेत आणि युरोपीय राष्ट्रवादापेक्षा भारतीय राष्ट्रवादाचे वेगळेपण सांगू पाहणारा आहे. गांधीजींची राष्ट्रवादाची व्याख्या ही त्यांच्या न्यायाच्या आणि समानतेच्या हक्कातून उद्भवली आहे आणि ते स्पष्टपणे म्हणतात, की सशस्त्र राष्ट्रवाद हे साम्राज्यवादाचे रूप असून तो मानवतेला शाप आहे. गांधीजींना भले राष्ट्रपिता म्हणत असोत, पण ते मुळीच खराखुरा राष्ट्रवाद मानणारे नव्हते. ते मुख्यतः कसलीही तडजोड न करणारे साम्राज्यवादविरोधी होते. त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला त्यांची ही भूमिका एखाद्या गांधीवाद्यापेक्षाही अधिक कळली होती.
२.
मी मोठंच धाडस केलं आहे. एकीकडे मी आपल्या राष्ट्रकवीच्या राष्ट्र या संकल्पनेला असलेल्या विलक्षण विरोधाकडे लक्ष वेधले आहे आणि दुसरीकडे राष्ट्रपित्याचा राष्ट्रवाद फसवा आहे असेही निदान केले आहे. कहर म्हणजे मी त्यांच्या खुन्याच्या राष्ट्रवादाचे आकलन त्याच्या काळी भरात असलेल्या समंजसपणाच्या आणि विवेकी विचारांच्या कल्पनांनुसार अस्सल असल्याचेही म्हटले आहे. मात्र कृपया हे लक्षात घ्या, की मी आधुनिक भारताच्या या दोन महान व्यक्ती देशप्रेमी नव्हत्या असे म्हटलेले नाही. ज्यांना राष्ट्रवाद आणि देशप्रेम हे एकच वाटते, त्यांच्यासाठी त्यातला फरक विशद करणे ही माझी जबाबदारी आहे. देशप्रेम ही भावनिक गुंतवणूक, जवळीक आहे. कोणतीही विशिष्ट वैचारिक भूमिका न घेता केवळ भौगोलिक क्षेत्र विचारात घेणे – हे इतर सस्तन प्राण्यांत तसेच काही पक्ष्यांत व कीटकांतही दिसून येते - हा राष्ट्रवादाचा पाया आहे. असा सीमावाद मानवी स्वभावाला धरून आहे, मग ती भावना कोणी मान्य करो वा न करो.
राष्ट्रवादाची वैचारिक भूमिका
राष्ट्रवाद ही एक विचारसरणी आहे. अगदी तो शब्द कोणत्याही वैचारिक भूमिकेशिवाय उच्चारणाऱ्यांनीही त्या धारणेचा थोडाबहुत अंगीकार केलेलाच असतो. त्याचे कारण त्यांचा संवाद राष्ट्रवाद ही वैचारिक भूमिका मानणाऱ्यांशी होत असतो व त्या शब्दाच्या उच्चाराबरोबर त्याच्या अर्थाचे परिमाणही जोडले जाते. अशा तऱ्हेने राष्ट्रवाद म्हणजे एखाद्या विचारसरणीची छटा असलेला, कुणी निव्वळ 'आपल्यातला' दिसतो म्हणून त्याला जवळ करण्याचा उत्कट, अगदी विवक्षित असा भाव बनतो. तो मुळातच अहंमन्य आणि काही अंशी भीतीपोटी परद्वेष्टा व 'बाहेरच्यां'बाबत सक्रिय विरोध असणारा असतो. तो अहंकारी, बचावात्मक असतो कारण तो मनातील सुप्त भीतींपोटी आलेला असतो. व्यक्तिकेंद्रित व्यवस्था, तंत्रज्ञानप्रचुर भांडवलशाही व्यवस्थेत बंद पडणारी किंवा अनावश्यक ठरणारी मानवी कामे, शहरीकरण, औद्योगिकीकरण यांतून आपण नगण्य किंवा आपल्याच क्षेत्रात उपरे तर ठरणार नाही अशी भीती वाढती तयार होते. असा राष्ट्रवाद दृढ होण्यामागे शहरीकरणामुळे व त्यातून होणाऱ्या विकासामुळे उखडले गेल्याची व त्यातून झालेल्या हानीची भावना असते.
या पातळीवर राष्ट्रवाद ही भरपाईची व्यवस्था ठरते. राष्ट्र या एककाद्वारे एक फसवा समाज तयार होतो. हाना आरन्ड्ट यांनी त्याला काल्पनिक समाज म्हटले होते आणि बेनेडिक्ट अॅन्डरसन यांनी त्याचे विस्तृत वर्णन केले आहे. याउलट, देशप्रेम या संकल्पनेत आपल्या देशाखेरीज इतर समाजांचे अस्तित्व गृहीत असते आणि असा देशप्रेमी समाज त्यांची योग्य ती दखल घेतो व त्यांना कधी प्राधान्यही देतो. देशप्रेमात निदान राष्ट्राच्या अपेक्षा व या समाजांच्या अपेक्षा यांत विरोधाभास असू शकतो याची अस्पष्टपणे का होईना, कल्पना असते. राष्ट्रवादाप्रमाणे देशप्रेम हे व्यक्ती व राष्ट्र यांत थेट व आदर्श नाते असते असे मानत नाही. दुसरे म्हणजे राष्ट्रवाद म्हणजे जगाचे व्यवस्थापन, इतर राष्ट्रांचे अस्तित्व, सत्ताकारण, मुत्सद्देगिरी यांतून आलेली प्रतिक्रिया असते. या अशा जगात तग धरण्यासाठी त्याच्या नियमांची माहिती असणे, त्यांच्या पालनासाठी आवश्यक कौशल्ये आणि इतर राष्ट्रांच्या संस्कृतींशी थोडाफार सलोखा आवश्यक ठरतो.
अशा तऱ्हेने, काही अंशी स्थिरता हे राष्ट्रवादाचे अपरिहार्य उपांग आहे. देशप्रेमामध्ये असे कोणतेही गृहीतक वा मागणी नसते. ती एक भावना असल्याने राष्ट्र या संकल्पनेभोवती गुंफण्याची गरज नसते. जेव्हा काही प्रसंगी शासनाची मध्यवर्ती भूमिका असते, उदाहरणार्थ, देशावर झालेला हल्ला आणि त्यातून देशप्रेमाला घातलेली साद, तेव्हा अशा मध्यवर्ती भूमिकेला केवळ तात्पुरते उपयोगमूल्य असते. तसेच राष्ट्रवादाला शासनाप्रति निष्ठा अभिप्रेत असते, तर देशप्रेमात मात्र निष्ठेच्या निरनिराळ्या पातळ्या असतात. राज्यशासन व देशभक्ती यांतील नाते लवचीक असते. काही जण आपली निष्ठा कमीअधिक मूल्य अर्पून व्यक्त करतात, काही सैन्यात भरती होऊन ती व्यक्त करतात, तर आणखी काही जणांसाठी शासन-कारभाऱ्यांना एकतर्फी विशेषाधिकार बहाल करणे हे त्याचे द्योतक असते. याचा अर्थ असाही होतो, की विशिष्ट कारणापुरते एकमत निर्माण झाले, की देशभक्ती ही लोकांना एकत्र आणते. असे एकमत हे स्थितिनुरुप व तेवढ्यापुरतेच असते. उदाहरणार्थ, साम्राज्यवादाला विरोध हा देशप्रेमातून होतोही, पण म्हणून त्यामागे एकसंध राष्ट्रनिर्मिती होऊन साम्राज्यवादी शासनकर्त्यांऐवजी देशी वसाहतीतील शासक त्यांच्यासारखेच राज्य करतील असे स्वप्न किंवा उद्दिष्ट नसते.
मध्यवर्ती शासन
थोडक्यात, राष्ट्रवादाचे गृहीतक 'शासन हे मानवी जीवनाचे, विशेषतः सार्वजनिक जीवनाचे प्रमुख अंग असते' हे होय. नवस्वतंत्र समाजांमध्ये राष्ट्रवाद सहसा हेगेलच्या राज्यशासन या संकल्पनेच्या सवंग, लोकप्रिय अशा आवृत्तीचा असतो. त्याचा आधार सर्वसाधारण शहाणपणाची संस्कृती हा असतो. देशप्रेम हे शासननिष्ठेशी जोडलेले असू किंवा नसू शकते, पण ते सहसा सभ्य समाजाच्या ढाच्याशी फटकून नसते. शासनाची भूमिका रोजच्या जगण्यात दूरस्थच असते. तिसरे म्हणजे, राष्ट्रवाद हा व्यक्तीची राष्ट्रीय ओळख सर्वोच्च मानतो, बाकी सर्व – धर्म, जात, पंथ, वंश, भाषा – यांवरील आधारित ओळख गौण असते. राष्ट्रवाद नेहमी संदर्भविरहित घोषणा वा सूत्र - जसे, 'आम्ही आधी भारतीय आहोत, मग हिंदू, मग तमिळ किंवा दलित' - मांडत असतो. कारण राष्ट्रवाद कायम मध्यवर्ती शासनाप्रतिच्या निष्ठेव्यतिरिक्त व्यक्तीच्या बाकी सर्व ओळखी दुय्यम मानतो. राष्ट्रवादाला इतर कोणतीही ओळख म्हणजे संभाव्य प्रतिस्पर्धी आणि विध्वंसक अस्तित्व वाटते.
देशप्रेमाला मात्र असे सर्वोच्च प्राधान्य अपेक्षित नसते. शासनाने सामाजिक, सांस्कृतिक गरजा भागवाव्यात, पण उलटे घडणे अपेक्षित नसते. या तीनही प्रस्तावांतून चौथा मुद्दा निघतो, तो म्हणजे - राष्ट्रवादाला काहीशी आधुनिकता अभिप्रेत असते. ती देशप्रेमाला नसते, आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे, की देशप्रेम पूर्वापार बहरत आलेले आहे. त्या दृष्टीने देशप्रेम हे राष्ट्रवादोत्तर, उत्तर आधुनिक काळाशी जुळवून घेण्यासाठी अधिक खुले आहे. देशभक्तीची अ-राष्ट्रवादी प्रारुपे बहरण्यासाठी विविध समाजांचे सहअस्तित्व व मुक्त व्यक्तिवादाचा खुलेपणाने स्वीकार यांची आवश्यकता आहे. संकल्पनेत भौगोलिक परिसीमेचे स्वरूप या अर्थाने देशभक्तीची तुलना 'घर' या संकल्पनेशी होते व त्याची सीमा देश, प्रांत, शहर किंवा खेडेही असू शकते. मात्र वस्तुस्थितीचे संपूर्ण चित्र पाहण्यासाठी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे.
एका मर्यादेपलीकडे आधुनिकता आणि व्यक्तिवाद ह्या गोष्टी राष्ट्रवादाचे कंगोरे बोथट करतात कारण मध्यमवर्गाला राष्ट्रवाद हे व्यक्तिगत स्वार्थ व समाजमान्य चंगळवादाआड येणारे निरर्थक बंधन वाटते. वस्तुस्थितीला लागलेले हे तसे नवे वळण आहे. आजच्या घडीला चीन व भारत हे सर्वाधिक राष्ट्रवादप्रवण देशांपैकी दोन देश आहेत; त्याच वेळी तेथील राज्यकर्त्यांना मात्र त्यांचे नागरिक पुरेसे राष्ट्रवादी नाहीत असे वाटते. या समाजांमध्ये आधुनिकता आणि व्यक्तिवाद यांतील काहीच परिपूर्ण नाही. पाचवा मुद्दा, राष्ट्रवाद ही विचारसरणी असल्याने त्यात सकारात्मक तथ्ये आहेत आणि राष्ट्रवाद मानणाऱ्याला त्यांचा स्वीकार करावाच लागतो. या तथ्यांची व्याख्या मात्र तशी सैल असू शकते आणि त्यात पळवाटाही असू शकतात, पण ती तथ्ये आधारभूत असतात. त्यामुळे राष्ट्रवादापासून फारकत घेतलेले, किंवा द्रोही यांना वेगळे हुडकून त्यांचा छळ करणे शक्य होते. देशप्रेम हे त्या मानाने देशातीत असते. देशभक्ताची व्यवच्छेदक लक्षणे सांगता येत नाहीत. भूप्रदेशाशी निगडित असे त्याचे रूप बदमाशांचे शेवटचे आश्रयस्थानही बनू शकते.
पुसट अस्तित्व
याचाच अर्थ असा होतो, की दक्षिण आशियामध्ये राष्ट्रवाद ही विचारसरणी बहुतेक नागरिकांत पुसटशीच आढळते. या भागात धर्म नुसते जिवंत आहेत एवढंच नाही, तर धर्माशी निगडित रूढी, परंपराही तितक्याच खोलवर रुजलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या देवादिकांची, संतांची, राक्षसांची, चेटकिणींची अर्चना करू शकता; त्याआड राष्ट्रवाद किंवा कोणतीच विचारसरणी येऊ शकत नाही. राष्ट्रवाद ही राबवण्याजोगी विचारसरणी आहे ही धारणा फारच थोड्या शहरी, सुशिक्षित, आधुनिक, जगण्याची जुनी तत्त्वे फारशी न भावणाऱ्या नागरिकांच्या ठायी आहे. यामुळेच सार्वजनिक जीवनात एकीकडे काही काळ टोकाचा, वेड्यासारखा राष्ट्रवाद आणि दुसरीकडे त्याच्या तत्त्वज्ञानाच्या गाभ्याची तितकीच मनस्वी पायमल्ली केलेली आढळते.
शेवटचा आणि सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादात मार्क्सवाद, विकासवाद, स्त्रीवाद, हिंदुत्ववाद अशा सर्व विचारसरणींत उपस्थित असलेला कडवेपणा भरपूर असतो. राष्ट्रवादाच्या गाभ्यामध्ये त्याच्या लाभार्थींप्रति चांगल्यात चांगले म्हणजे अस्वस्थता किंवा संदिग्धता, आणि वाईटात वाईट म्हणजे तुच्छता असते. लोक पुरेसे क्रांतिकारी नसल्याने उद्भवलेली हेगेलप्रणित डाव्या विचारांची अस्वस्थता आणि हिंदू लोक पुरेसे पितृसत्ताक, कडवे आणि संघटित नसण्याबद्दलची हिंदुत्ववाद्यांची तुच्छता यांत गुणात्मक फरक नाही. राष्ट्रवादी विचारसरणीचे लोक अनेक बाबींबद्दल नाखूश असतात. त्यांच्या मुख्य तक्रारी म्हणजे - एकंदरीत राष्ट्र हे पुरेसे राष्ट्रवादी नाही, ते आपल्या हिताबद्दल आणि सुरक्षेबद्दल बेपर्वा आहे, आपल्या राष्ट्रीय अपमानांचा बदला घेण्याबाबत निष्क्रीय आहे, आणि आपल्या क्षमतेप्रमाणे राष्ट्रीय प्रगती करण्याबाबत उदासीन आहे. त्यामुळे राष्ट्रवादी जितके राष्ट्र या अमूर्त संकल्पनेच्या प्रेमात असतील, तितकेच ते राष्ट्र हे ज्या खऱ्या व्यक्ती व समाजांचे बनलेले असते, त्यांचा दुस्वास करतात. अतिरेकी राष्ट्रवादी एखाद्याला राष्ट्रविरोधी ठरवून त्याच्या हात धुऊन मागे लागतात, तो याचाच परिपाक असतो.
३.
शेवटी मी पुन्हा एवढंच म्हणेन, की विसाव्या शतकातल्या दोन भारतीय उत्तुंग व्यक्तिमत्वांनी स्वातंत्र्योत्तर भारताचे जे चित्र पाहिले ते राष्ट्रवादोत्तरही होते. त्यांनी त्यांचे म्हणणे या शब्दांत मांडले नसेल, पण त्याचे कारण त्यांच्या काळी प्रचलित असलेली राजकीय संज्ञासंपत्ती मर्यादित होती. त्यांच्या काही लिखाणांवरून वरवर पाहता त्यांना राष्ट्रवादी ठरवणे शक्य होते. भारताची अधिकृत भूमिका तशीच आहे आणि ती खपून गेली आहे पण ते दोघेही अपूर्ण राष्ट्रवादी किंवा किमान वाईट राष्ट्रवादी होते. त्यांची संभावना राष्ट्रवादी अशी करणे म्हणजे भौगोलिक प्रांत या संकल्पनेची स्थानिक, धादांत खोटी देशी आवृत्ती खपवणे होय.
एक मुद्दा निकाली निघायचा राहिला आहे. जर देशप्रेम ही विचारधारापूर्व, आपल्या जैविक जडणघडणीला जवळ अशी मन:स्थिती असेल, आणि राष्ट्रवाद ही जर खरी विचारप्रणाली असेल, तर राष्ट्रवाद हा काल व अवकाश यांच्याशी अधिक निगडित असायला हवा. तथापि, राष्ट्रवादाचा गाभा हा सांस्कृतिक आणि भौगोलिक सीमांमध्ये फरसा फरक करताना दिसत नाही. कदाचित याचे कारण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात राष्ट्रवाद जेव्हा प्रबळ होता, तेव्हा युरोप दक्षिण गोलार्धात विजयी अस्तित्व राखून होता हे असेल. जर दक्षिणेत राष्ट्रवादाकडे एक सार्वत्रिक, आधुनिक तंत्रज्ञान - म्हणजे जणू एक युरोपीय जादूच, जी युरोपला त्याच्याच खेळात हरवायचे असेल, तर शिकलीच पाहिजे - अशा नजरेने पाहिले गेले नसते, तर युरोपबाहेर राष्ट्रवादाचे रूप कदाचित वेगळे झाले असते.
राष्ट्रवादाच्या प्राथमिक अवस्थेत त्याचे स्थान 'पराभूत संस्कृतींना निर्यात करण्याजोगा व त्यांनी आत्मसात करण्याजोगा सामाजिक उत्क्रांतीचा भाग' असे झाले. भारतीय राष्ट्रवादींच्या – ते निधर्मी असोत वा नसोत – सुदैवाने, मी उल्लेख केलेल्या दोन्ही विलक्षण विचारवंतांचा वाईट प्रभाव आता विरत चालला आहे. आपण आता गर्वाने राष्ट्रवादाच्या खऱ्या स्वरूपाकडे जात आहोत. अर्नेस्ट गेल्नर एकदा म्हणाले होते, की जगाच्या वेगवेगळ्या भागांत राष्ट्रवादाचे खरे, पाठ्यपुस्तकी स्वरूप पडताळून पाहण्याची गरज नसते कारण ते सगळीकडे सारखेच असते. म्हणजेच विरोधाभास असा, की राष्ट्रवादी विचार हा राष्ट्रपरत्वे वेगळा नसतो; त्याच्या व्याख्येतच तो जागतिक आहे. जागतिकीकरण हा परवलीचा शब्द बनण्याच्या कित्येक दशके आधी तो अस्तित्वात आला. अलीकडे झालेल्या ४४ देशांतील सर्वेक्षणात भारत हा सर्वाधिक राष्ट्रवादी देश आहे असे दिसून आले. भारतीय राष्ट्रवाद्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणजे ते पाकिस्तान, ग्रेट ब्रिटन, अमेरिकेपेक्षा अधिक राष्ट्रवादी आहेत. टागोर आणि गांधीजी जर आज जिवंत असते तर त्यांना हे विध्वंसाला दिलेले आवतण वाटले असते. सुदैवाने ते आता हयात नाहीत आणि त्यांच्या विरोधी मताचे असंख्य ए. क्यू. खान आणि राजा रामण्णा यांसारखे लोक संपूर्ण दक्षिण आशियामध्ये पसरले आहेत. सांस्कृतिक भूतकाळात रमणाऱ्या, भारताच्या इतिहासाबाबत अजिबात टीका न करणाऱ्या, भारताच्या भूतकाळाला त्याच्या भविष्याच्या जडणघडणीचा स्रोत म्हणून पाहणाऱ्या दोन क्षीण, मवाळ, गोंधळलेल्या स्वप्नाळू माणसांची पर्वा आहे कुणाला?
पूर्वप्रकाशन : Economic and Political Weekly, August 12, 2006 pp 3500-3504
विशेषांक प्रकार
भाषांतर उत्कृष्ट ! अभिनंदन!
भाषांतर उत्कृष्ट ! अभिनंदन! आजचे नेशन-स्टेट बरेचसे संकुचित , आणि अभिजनांच्या फायद्यासाठी राबविले जाणारे झाले आहे . त्याच्या मानवताविरोधी कृतींकडे बारीक नजर ठेवण्याची गरज आहे. अर्थात हा विचार मांडणेही "देशद्रोही" ठरविणारे लोक आहेतच. काश्मीर, नॉर्थ-ईस्ट आणि नक्षल "समस्यां" शी लढा देण्यासाठी, भारतीय मध्यमवर्गाने "मानवी हक्क" ही संकल्पनाच मोडीत काढलेली दिसते. जोपर्यंत सरकारी कृतींची त्यांना स्वतःला झळ पोचत नाही, तोपर्यंत ही राष्ट्र्रवादाची नशा रहाणारच आहे. असो!
भाषांतर उत्तम.
भाषांतर उत्तम.
अशा लेखांत निरनिराळ्या शब्दांचा, कल्पनांचा खल केलेला असतो. राष्ट्रवाद, देशप्रेम वगैरे. खूप वैचारिक प्रगल्भता असल्याशिवाय ते समजत नाही. सामान्य लोकांना उदाहरणे आणि संदेश,उपदेश समजतात.
इथे टागोर ,गांधी यांचेही किस्से आहेत. त्यांच्या विचारसरणीतही वाद आहेत म्हटलं आहे.
राष्ट्र एक नंतर इतर राज्ये म्हटलं तरी काही कल्पना लादता येत नाहीत. वैचारिक आक्रमण. आताच तमिळनाडूत 'मोदी गो ब्याक' झालं. दक्षिणेत हिंदी लादता येत नाही. जेव्हा लोकांच्या आपल्या भावनांना चूक म्हटलं जातं तेव्हा कडाडून विरोध होतो. राष्ट्रवादाची चौकट लहान करण्यात येते.