'मनी'चे श्लोक

धनादेश जो ईश सर्वां जनांचा |
मुळारंभ आरंभ राजकारणाचा ||
नमूं सर्वदा धर्म तो रुपयाचा |
गमूं पंथ आनंत भ्रष्टाचाराचा ||१||

मना सज्जना लक्ष्मीपंथेचि जावे |
जेणें श्री पावे ते करा हो स्वभावे ||
जनीं वंद्य ते सर्व सोडूनि द्यावे |
जनीं निंद्य ते सर्व भावें करावे ||२||

प्रभाते मनीं दाम चिंतीत जावा |
पुढे वैखरी दाम आधी वदावा ||
सदाचार हा घोर सांडून ये तो |
जनीं तोचि तो बहु धनवंत होतो ||३||

मना वासना बेष्ट कामास येते |
मना सर्वथा वित्तबुद्धी चढवते ||
मना धर्मता नीति धरू नको हो |
मना अंतरी फार विकार राहो ||४||

मना सत्यसंकल्प सोडूनि द्यावा |
मना पापसंकल्प जीवीं धरावा ||
मना कल्पना हवी मंत्रीपदांची |
तिजोरी लुटावी बनता खजांची ||५||

जय जय ‘रुपी’वीर समर्थ...

field_vote: 
0
No votes yet