कुहू.....

एखादी कलाकृती आवडलेली असली की मनात किती खोलवर रुजते ना! कविता महाजनांच्या ‘कुहू’विषयी असंच काहीसं झालं. जेव्हा ‘कलमनामा’ साप्ताहिकासाठी ‘कुहू’चा परिचय करुन देण्याची संधी अचानक आली तेव्हा ह्याची प्रचीती आली.
अक्षरश: दोनेक तासात लेख लिहून झाला आणि १७ फेब्रुवारी २०११२ च्या अंकात प्रसिध्द झाला. तो इथे जसाच्या तसा देण्याचा मोह होत आहे. तो अत्युत्तम आहे असा माझा दावा अर्थातच नाही, पण तो मनापासून लिहिलेला आहे, एवढे नक्की....

कुहू - कविता महाजन.

भारतीय कला परस्परावलंबी आहेत. शिल्पकलेसाठी चित्रकला, चित्रकलेसाठी नृत्य, नृत्यासाठी वाद्यसंगीत, वाद्यसंगीतासाठी कंठ्यसंगीत, संगीतासाठी वाङमय, वाङमयासाठी भाषांवर प्रभुत्व... अशी ही कला-साखळी! तंत्रज्ञानाने परिपूर्ण होत रहाण्याच्या आजच्या काळात संगणकाच्या मदतीने ह्या सार्‍या कलांची ओळख करुन घेणं शक्य झालं आहे. ‘कुहू’ ही कविता महाजनांची मल्टिमिडिया कादंबरी वाचता-बघता-ऐकताना ह्याचा प्रत्यय येतो.

मूळच्या चित्रकला-प्रेमी अन कविमनाच्या कविता महाजन. ‘ब्र’ आणि ‘भिन्न’ ह्या दोन कादंबर्‍यांत शब्दांच्या माध्यमातून चित्रं साकारण्याचं कौशल्य त्यांनी अवगत केलेलं. परंतु कोणत्याही कलावंताला आपल्या मुळाकडे जाण्याची ओढ अस्वस्थ ठेवत असते. कविताताईंचंही तसंच झालं. चित्रकलेचं बाळकडू घेतलेल्या आणि तरीही नाईलाजाने त्यापासून दुरावल्याची खंत साठलेल्या त्यांच्या बेचैन मनात चित्रांकडे जाण्याची अनिवार इच्छा होती. कामाच्या निमित्ताने गावांत-आदिवासी पाड्यांत भ्रमंती केल्याने अनुभवलेला अस्सल निसर्ग मनात कायमच जागा असलेला. अशा मनोवस्थेत मुलांसाठी गोष्ट लिहिण्याच्या निमित्ताने विचार करताना मनात घर करुन राहिलेले पक्षी-जंगल-झाडे-वेली शब्दरुप घेऊ लागले. त्यांच्या साथीने चित्रेही आकार घेऊ लागली, सुरुवातीला मनातल्या मनातच! आणि मग ती कागदावर उतरवताना एकीच्या जोडीला दुसरी असं करत संगीत-अक्षरशिल्पं अशा इतर कला एकत्र येत राहिल्या, ‘कुहू’ ह्या मल्टिमिडिया कादंबरीचा जन्म झाला.

कावळ्याच्या घरट्यात जन्मलेला कोकिळेचा कुहू. जन्मापासूनच खर्‍या आई-वडिलांपासून आणि त्याचे मूळ रुप समजल्यानंतर ज्यांनी त्याला दूर लोटले त्या आई-वडिलांपासूनही दुरावलेला दु:खी कुहू. ‘ह्या जगात आपलं कुणीच नाही’ अशा विफलतेत जंगलात फिरत असतो. अशावेळी इतर पक्षी-मित्रांमुळे त्याच्या गळ्यातील अस्सल सुरांची जाणीव त्याला होते, ‘स्व’ गवसतो, एकटेपणा निघून जातो. आपल्या संगीताने समस्त जंगलाला आनंद देण्यात कुहू मग्न असतो. त्याच वेळी जंगलात अभ्यास करण्यासाठी आलेल्या समूहातील एक तरुणी, मानुषी, कुहूच्या सुरेल गाण्याने भारावते, त्याला गाण्यासाठी प्रोत्साहन देते. तिच्यासाठी गाता-गाता कुहू तिच्या प्रेमात पडतो. तिच्या असण्याने सुखावतो, नसण्याने व्याकुळतो. आणि एका टप्प्यावर आपलं ‘पक्षी’पण झुगारुन माणूस बनतो. गायनकला हरवलेल्या, रंगाने काळ्या ‘माणूस’ कुहूचा स्वीकार मानुषी करते का?

त्रिमिती मुखपृष्ठ, रंगीबेरंगी पृष्ठं, स्वत: कविता महाजनांनी काढलेली चित्रं, प्रसंगानुरुप कॅलिग्राफीतून अवतरलेले शब्द, ह्यांनी सजलेलं पुस्तक आणि ह्या सार्‍यासह जंगलातील जिवंत दृश्यं, भावपूर्ण अभिवाचन अन सुरेल संगीत ह्यांनी नटलेली डीव्हीडी! एकाचवेळी दृश्य-श्राव्य अशा निरनिराळ्या माध्यमातून साकार झालेली ही कादंबरी निव्वळ वाचणं-बघणं-ऐकणं ह्याच्या पलिकडे नेणारं ‘अनुभवणं’ ठरतं.

गारबीसारख्या अजस्त्र वेली, लांब चोचीचा खंड्या, पिवळ्याधम्मक रंगाची हळदुली, रंगीत फुलांच्या थव्यावर भिरभिरणारं नाजुका फुलपाखरु, केशरी आंब्यांची हिरवीगार आमराई, निळ्या आकाशी उडणारे हिरवे पोपट, निळ्याशार तळ्यातील गुलाबी कमळं.. असंख्य रंगांत न्हाणार्‍या जंगलात आपणही हरवून-हरखून जातो. अन त्याच जंगलात निर्माण होणारे भाव-भावनांचे कल्लोळही चित्रांवाटे आपल्या मनात उमटत राहतात. तळ्याच्या पाण्यात आपल्या डोळ्यांचा लाल रंग निरखणारा आत्ममग्न कोकीळ, त्याची वाट बघत एकटी राहिलेली कोकिळा, आपलं अंडं खाली फेकून देऊन कोकिळेनं तिचं अंडं आपल्या घरट्यात गुपचूप घातलं हे समजल्यानंतर दु:खी झालेलं कावळ्याचं जोडपं आणि त्यांनी नाकारल्याने कळवळून रडणारा कुहू.. कुहूच्या गाण्यात हरवून गेलेली मानुषी आणि तिच्यासाठी व्याकुळ झालेला खिडकीतून डोकावणारा कुहू, माणूस बनताना गाणं हरवलेल्या गळ्याने आक्रोश करणारा कुहू, फांद्या-फांद्यांवरुन साद-प्रतिसाद देणार्‍या कोकिळ-कूजनात हरवलेली मानुषी आणि कुहूच्या हृदयाचं झडप बनून राहिलेलं निळं पिस!

बाल-आवृत्ती आणि प्रौढ-आवृत्ती अशा दोन वेगवेगळ्या आवृत्त्यांची ही कादंबरी, वाचण्या-बघण्यातील उत्कंठा कायम ठेवूनही काहीशी खिन्न करणारी! प्रत्येक पानावरील मजकूर आणि त्याला साजेसं त्याच किंवा शेजारील पानावरील चित्र बघत, जंगलात फिरण्याचा अनुभव देत कथानक समजून घेत, पुढे जात रहाणं ह्यात वाचक-प्रेक्षक गुंगून-हरखून जातो. कुहूच्या प्रेमात, कुहूच्या प्रेमाच्या प्रेमात आणि प्रेमासाठी सर्वस्व गमावण्याच्या त्याच्या दु:खदायी प्रक्रियेत स्वत:ला सामावून घेतो.

चित्रा राजेन्द्र जोशी.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चांगला परिचय.
एकीकडे वाचावेसे तर वाटते मात्र पुस्तकाच्या किंमतीमुळे पुस्तक घेणे मात्र टाळले आहे Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एकीकडे वाचावेसे तर वाटते मात्र पुस्तकाच्या किंमतीमुळे पुस्तक घेणे मात्र टाळले आहे

याबद्दल कविता महाजनांनी एका संकेतस्थळावर किंमतीबद्दल खुलासा केला होता. बरीच मेहनत सर्व टीमने घेतली होती व त्यातल्या त्यात कमीत कमी किंमत त्यांनी देण्याचा प्रयत्न केला होता. हा तो दुवा येथे कविता महाजन यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

यावेळी पुण्याच्या भेटीत कुहू बघणार आहे. आवडले तर नक्की घेईन , कारण महाग साहित्यकृतीची खरेदी करताना ती आपल्या पठडीतली आहे की नाही हे बघणे मला महत्त्वाचे वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या पुस्तकाची, डीव्हीडी ची झलक कोणी एखादी चित्रफीत टाकून दाखवेल काय? किंवा जालावर उपलब्ध आहे काय?

बाल आवृत्ती मधेही काय पक्षी-मनुषी प्रेमकथा आहे का? की वेगळीच कथा आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0