दुर्बोधता

मला जे लिहायचं अाहे त्यासाठी वेगळा धागा काढणं श्रेयस्कर वाटलं. ग्रेस 'दुर्बोध' होते की नव्हते यावर जो काथ्याकूट झाला, त्यात मला अाणखी भर घालायची नाही. पण 'ग्रेस सर्वसाधारणपणे दुर्बोध समजले जात होते' यावर फारसं दुमत होऊ नये.

माझ्या मते एखाद्या भाषेत दुर्बोध कविता, दुर्बोध कादंबऱ्या, दुर्बोध शास्त्रचर्चा, दुर्बोध अध्यात्म हे सगळं असणं हे अप्रत्यक्षपणे त्या भाषेच्या श्रीमंतीचं लक्षण अाहे. अशा प्रकारचं लिखाण वाचणं कटकटीचं असणार हे मान्य, अाणि मुद्दाम कुणी इरेला पडून दुर्बोध लिहावं असंही मी म्हणणार नाही. पण ज्या भाषेतलं सगळंच लिखाण सोपं, सहज समजण्यासारखं अाहे त्या भाषेतल्या वाङ्मयात फार 'खोल' पाणी कुठे नसणार असा ढोबळ तर्क करता येतो.

मॅकॉलेनं (वेगळ्या संदर्भात वापरलेलं) एक उदाहरण देतो: तो म्हणतो की लंडनमध्ये दहा हजार चोर अाहेत, ही फार वाईट गोष्ट अाहे. पण इतकी चोरी तिथे चालते याचाच अर्थ लंडनमधली एकूण संपत्ती गडगंज असणार असा होतो, अाणि ही गोष्ट लंडनला नक्कीच भूषणास्पद अाहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

दुर्बोधता, वैचित्र्य, कलाप्रकारांचं वैविध्य हे भाषेच्या वापराच्या व्याप्तीचे मानदंड आहेत हा वेगळ्या प्रकारचा विचार आहे. 'इट टेक्स ऑल काइंड्स टु मेक द वर्ल्ड' असं म्हटलं जातंच. त्याच धर्तीवर असं म्हणता येतं की जर पुरेसं वैविध्य दिसत नसेल तर ते जग कोतं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'इट टेक्स ऑल काइंड्स टु मेक द वर्ल्ड' असं म्हटलं जातंच.

याविरुद्ध, 'इट डज़ नॉट टेक ऑल काइंड्ज़; वी जस्ट हॅपन टू हॅव ऑल काइंड्ज़' असाही एक मतप्रवाह आहे.

त्याच धर्तीवर असं म्हणता येतं की जर पुरेसं वैविध्य दिसत नसेल तर ते जग कोतं आहे.

त्याच धर्तीवर असेही म्हणता येते, की या जगातील वैविध्य हे या जगाच्या पूर्णत्वाचे (कोतेपणाच्या विरुद्धार्थी) लक्षण नसून निव्वळ योगायोग आहे.

('जगाच्या पूर्णत्वा'ची नेमकी व्याख्या काय? 'जगात आहेत ते सर्व प्रकार जगात आहेत, म्हणजे जग संपूर्ण आहे' ही व्याख्या काहीशी चक्रीय वाटत नाही काय? कारण त्या व्याख्येने सध्या जगात आहेत त्यांपैकी निम्मे प्रकार जरी जगात कधीही नसते, तरी जग संपूर्णच राहिले असते. किंवा आणखीही जर काही प्रकार निर्माण झाले, तरी या व्याख्येने जग पूर्णच राहील. वगैरे वगैरे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही ऍब्सोल्यूट व्याप्ती आणि रिलेटिव्ह व्याप्ती यामध्ये गल्लत करत आहात. ते केलं की चक्रीयतेचा भास होणारच. वर्ल्ड या शब्दातून सर्व विश्व असा भास होत असला तरी प्रत्यक्षात भाषा अ, भाषा ब अशी विश्वं असतात. त्यांची एकमेकांत तुलना करता येते. मग चिपलकट्टींनी मांडलेले मानदंड व्याप्ती मोजण्यासाठी उपयुक्त ठरतात. एका विश्वाची व दुसऱ्या विश्वाची तुलना करून आणि 'अ विश्वात जे दिसतं ते ब विश्वात का बरं दिसत नाही?' असा प्रश्न विचारता येतो. त्याची जी कारणपरंपरा मिळेल त्यात योगायोग हे एक कारण असू शकतं. पण तेच कारण असेल असं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ग्रेस सर्वसाधारणपणे दुर्बोध समजले जात होते' यावर फारसं दुमत होऊ नये.
दुर्दैवाने मी ती चर्चा संपूर्ण नाही वाचू शकलो, पण वरील वाक्यावरुन ग्रेस यांच्याबद्दल (विविध टप्प्यांवर वाचले असल्यामुळे) थोडे सांगता येईल.

प्रथमतः ग्रेस अनाकलनीय आहेत असे मत झाले
त्यानंतर ग्रेस आकलनास कठीण आहेत
मग ग्रेस - वाहवा.... पण मला कळाले ते बरोबर आहे ना?
आज - ग्रेस गेले... पण सुगंध दरवळत ठेवून गेले. गहन आणि अनाकलनीय खोली असलेल्या कविता निर्माण करणं म्हणजे एक विलक्षण प्रतिभाच लागते. असेच अनाकलनीय विश्व जीएंचे अनेकांना वाटत असते. मला तर अजूनही कधी कधी वाटते.

असो , दुर्बोध हा शब्द हेटाळणीच्या स्वरुपात वापरला जातो की नाही माहिती नाही. पण दुर्बोध पेक्षा अनाकलनीय किंवा आकळण्यास कठीण हा शब्द जास्त योग्य वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"लेचीपेची श्रीमंती आणि धट्टीकट्टी गरिबी" हे रूपक भाषेला लागू होते. (बहुधा प्राध्यापक अशोक रा. केळकरांनी वापरले होते. त्यावर पूर्ण निबंध लिहिला होता.)

कधीकधी असे दिसते : शब्दांचेच वैविध्य असले, तर भाषाप्रयोग "श्रीमंत" वाटतो. पण वापरताना अर्थाचे कंगोरे नसले, तर अर्थ पोचवण्यात भाषा प्रभावी वाटत नाही. (लेचीपेची श्रीमंती). येथे काही पंतवाङ्मयाचे उदाहरण देता येईल. उत्तरकालीन संस्कृत वाङ्मयातही शब्दश्रीमंत अर्थदरिद्री रचनांचा सुकाळ होता. गुळगुळीत पेक्षा वाईट बुळबुळीत होऊन अर्थ सटकायला लागला तर रचना दुर्बोध होऊ लागते.

कधीकधी उलटही दिसते : शब्दांचे भांडार त्या मानाने मर्यादित असते, पण अर्थ थेट आणि जोरकस रीत्या सांगितला असतो. उदाहरणासाठी संत रामदास - शब्दभांडार ज्ञानेश्वर वगैरेंपेक्षा मर्यादित, पण थेट अर्थ पोचवण्यात प्रभावी.

परंतु श्रीमंत शब्दभांडार लेचेपेचे असले पाहिजे, असा निराशावाद नको. प्रचंड भांडारातील शब्दार्थांचे कंगोरे वैविध्यपूर्ण असले, तर कितीतरी वेगवेगळे अर्थ थेट सांगितले जाऊ शकतात.

- - -
हा प्रतिसाद लेखाशी सौम्य असहमती दर्शवतो. अगतिकतेबाबत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लंडनमध्ये दहा हजार चोर आहेत, ही फार वाईट गोष्ट आहे. पण इतकी चोरी तिथे चालते याचाच अर्थ लंडनमधली एकूण संपत्ती गडगंज असणार असा होतो, आणि ही गोष्ट लंडनला नक्कीच भूषणास्पद आहे.

मला अनेकदा डोकेदुखी होते. ही फार वाईट गोष्ट आहे. पण इतकी डोकेदुखी होते, याचाच अर्थ मला भरपूर डोके आहे असा होतो, आणि ही गोष्ट मला नक्कीच भूषणास्पद आहे. असो.

दुसर्‍या बाजूने विचार करून पाहू. मला प्रत्यक्षात भरपूर डोके आहे की नाही, याची मला कल्पना नाही. पण वादाच्या सोयीकरिता (मला भरपूर डोके) आहे, असे धरून चालू. पण असे भरपूर डोके असण्यासाठी डोकेदुखी ही आवश्यक बाब नाही. समजा मला कधीही डोकेदुखी होत नसेल, तर याचा अर्थ मला अजिबात डोके नाही, असा होऊ नये. (फार फार तर मी अतिशय सुदैवी आहे, असा अर्थ व्हावा, आणि ही गोष्ट माझ्याकरिता नक्कीच चांगली आहे.) किंवा, मला अनेकदा अर्धशिशी होत असेल, आणि ती नेहमी एकाच बाजूला होत असेल, तर मला उरलेले अर्धे डोकेच नाही, असाही अर्थ होऊ नये.

तिसरी गोष्ट. चोर असणे हे आजूबाजूच्या संपत्तीचे कितपत द्योतक आहे, याबाबत साशंक आहे. 'चोरी चालणे' हे जर कशाचे द्योतक असलेच, तर ते चोराच्या अगतिकतेचे आणि/किंवा चौर्याच्या मानसिकतेचे (ही जी काही चीज असेल ती) आणि/किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अभावाचे असावे; आजूबाजूच्या समृद्धीशी अथवा समृद्धीच्या अभावाशी त्याचा थेट संबंध आवश्यक नसावा, अशी शंका आहे. (बिनडोक माणसांना डोकेदुखी होत नसावी काय?)

समृद्धी नसेल, अतिशय हलाखीची परिस्थिती असेल, तरीही अतिअगतिकतेच्या परिस्थितीत लोक जे काही थोडेफार आहे तेसुद्धा एकमेकांकडून चोरतील, असे वाटते. शिवाय, भुरट्या चोरीकरिता ज्याचे घरी चोरी व्हायची, तो गडगंज श्रीमंत असण्याची फारशी आवश्यकता नसावी. माझे पाकीट मारले जाण्यासाठी माझ्या खिशात मुळात पाकीट असणे आवश्यक आहे, हे खरे आहे. परंतु त्यापलीकडे, त्या पाकिटात दहा रुपये आहेत, की दहा हजार, याने फरक पडू नये, किंवा माझे पाकीट मारले गेले त्याअर्थी माझ्याकडे गडगंज संपत्ती आहे, असाही निष्कर्ष कोणी काढू नये. कारण त्या न्यायाने, मुंबईच्या लोकलमध्ये रोज कितीतरी पाकिटे मारली जात असतील नि रोज कितीतरी खिसे कापले जात असतील. म्हणून 'लोकलमधील प्रवाशांच्या अंगावर एकंदरीत गडगंज संपत्ती असते, आणि समस्त मुंबईकर लोकलप्रवाशांना ही गोष्ट नक्कीच भूषणास्पद आहे', असे विधान कोणी करावे काय? किंबहुना ज्यांच्या अंगावर भरपूर संपत्ती असते, ते बहुधा लोकलने प्रवास करत नसावेत, स्वतःच्या स्वतंत्र गाडीतून जात असावेत, आणि त्या कारणाने त्यांचा खिसा कापला जाण्याचे अथवा पाकीट मारले जाण्याचे प्रमाण अत्यल्प असावे - म्हणजेच, वरील तर्काने जायचे, तर त्यांच्या अठराविश्वे दारिद्र्याचे ते द्योतक असावे - अशी अटकळ आहे.

तर एकंदरीत, भुरट्यांवरून समृद्धीबाबत आडाखे बांधण्यामागचे धोके हे असे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0