प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक आणि विस्तव वल्ल्यायण - एक परिचय

कांदा संस्थान - भारताची अग्नि ५ ही चाचणी यशस्वी होणार याचे भाकित तीन महिन्यांपूर्वीच मी केले होते असे जाहीर करून प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक यांनी संस्थानात खळबळ माजवलेली आहे. प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा हा वृत्तांत.

"माझ्याकडे इमेल्स आहेत. आमच्या मित्रांना पाठवलेल्या." पुरावा म्हणून हातातले प्रिंटाउट फडफडवत प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक म्हणाले. "त्यात मी स्पष्टपणे लिहिलंय" आपला चष्मा लावत ते वाचायला लागले.
'मग, विस्तव पेटणार का पाच?'
"हे माझ्या मित्राने विचारलेलं आहे. त्यावर माझं उत्तर आहे,"
'हो.'
"विस्तव म्हणजे अग्नि आणि पाचचा स्पष्ट उल्लेख आहेच! या इमेलवर तारखा आहेत १४ जानेवारी २०१२ च्या." पुन्हा त्यांनी प्रिंटाउट फडकावले. त्यांच्या चेहेऱ्यावर विजयाचा आनंद ओसंडून वाहताना स्पष्ट दिसत होता.
चं. पी. कर्तक हे व्यवसायाने न्हावी, पण त्या विषयात त्यांनी के. श. संभारकर नापिकविद्यालयातून डॉक्टरेट मिळवली. 'कानावरचे केस कायमचे काढण्याचे कट्टर उपाय' या विषयावर त्यांचा प्रबंध होता. तिथेच काही काळ त्यांनी प्राध्यापकी करून 'पुराणकालातील क्षौरकर्मयंत्रे' या विषयावर संशोधन केले होते. या संशोधनानिमित्त संस्कृतमधली जुनी ग्रंथसंपदा अभ्यासण्यासाठी त्यांनी अलिकडच्या काळात जर्मनीलाही भेट दिली. (तेव्हापासून ते संस्कृताभ्यासक जर्मनांप्रमाणेच प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक असे नाव लावतात अशी माहिती चहापानात एका विद्यार्थ्याकडून मिळाली.)

पण त्यांचा ओढा सुरूवातीपासूनच आध्यात्माकडे होता. अन्नमय शरीरावरचे केस काढण्याचा लवकरच कंटाळा आला. एखादा कुशल न्हावी जसा भोचकपणे गिऱ्हाइकाच्या भानगडींमध्ये शिरतो तसं सूक्ष्मात शिरण्याचा त्यांनी ध्यास घेतला. मग त्यांनी रिकाम्या वेळात तुंबड्या लावण्याऐवजी ध्यान लावायला सुरूवात केली. त्यांच्या मते अन्नमय शरीर हे केवळ बाह्य आवरण असते. एखाद्या न्हाव्याच्या धोपटीसारखे. त्याच्या आत वस्तरामय, कातरीमय, कंगवामय शरीरे असतात, तशीच आपल्या शरीराच्या आतही अनेक शरीरे असतात. त्यांवर अन्नमय शरीराची बंधने नसतात. ध्यान लावण्याच्या कामी त्यांना काही जिवलग सन्मित्रांची बहुमोल मदत झाली. त्यांनी प्रा. कर्तकांना विस्तव आणि काही पुराणकालीन वल्लींच्या सहाय्याने सूक्ष्मात जाऊन ही शरीरं विलग करण्याचे तंत्र शिकवले.

"विस्तव हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. माझ्या 'विस्तव वल्ल्यायण' या पुस्तकात मी त्याविषयी लिहिलेलं आहे. ते मुळापासून वाचावं ही विनंती करतो."

ही विस्तव-वल्ली साधना सुरू केल्यावर त्यांच्या लक्षात आले की डोळे मिटले की शरीराची धोपटी उघडून आतली शरीरे बाहेर येऊ शकतात. सुरूवातीला त्यांना साधना साधायला थोडे कष्ट पडले. कधी कधी ही सगळी बाहेर आलेली शरीरे आत परत भरून ठेवायला त्रास झाला. त्यांच्या 'विस्तव-वल्ल्यायण'मध्ये त्यांनी एकदा दाढीचा-ब्रशरूपी शरीर बाहेरच राहिल्याने आयत्यावेळी कसा गोंधळ झाला होता याचा गमतीदार किस्सा सांगितलेला आहे. पण नंतर सवयीने ते व्यवस्थित जमू लागले.

"आपण नेहमी जे शरीर वापरतो ते वस्तरामय शरीर असते. जैविक चैतन्याचे ते प्रतीक आहे. वस्तरा हा शब्दच मुळात विस्तव किंवा अग्निवरून आलेला आहे. अग्नि म्हणजे प्राणज्योती. भौतिक जीवनाशी वस्तऱ्याचा संबंध उघड आहे. वस्तु, वास्तु, विस्तव, वस्त्र, वस्ती व वनस्पती या चराचराशी संबंधित असलेल्या सर्व शब्दांचे वस्तऱ्याशी साधर्म्य आहे हा योगायोग म्हणाल काय?" त्यांनी उलटा सवाल केला.

परंतु वस्तरामय शरीराला स्थळकाळाच्या भौतिक मर्यादा असतात. मात्र विस्तव-वल्लींच्या सहाय्याने समाधी अवस्थेत तासन् तास घालवल्यानंतर त्यांना तुरटीमय शरीर बाहेर काढता आले. तुरटी जशी क्षणात पाण्यात विरघळते आणि पाणी स्वच्छ करते तसे हे त्यांचे शरीर वातावरणात अनंतापर्यंत क्षणात पोचू शकते असा त्यांना शोध लागला. त्याच सुमाराला त्यांना भारतीय शास्त्रज्ञांनी जाहीर केलेल्या अग्नि प्रक्षेपणास्त्राच्या मोहिमेविषयी कुतूहल निर्माण झाले.

"इस्रोने आत्ता या अग्नि क्षेपणास्त्राची चाचणी केलेली असली तरी हे ज्ञान आमच्याकडे हजारो वर्षे आहे. विस्तव वल्ल्यायणमध्ये मी ज्या अनलास्त्राचा उल्लेख केला आहे तेच हे अग्नि क्षेपणास्त्र. विस्तव या शब्दाचा ग्रामीण उच्चार इस्तू. इस्रो आणि अग्नि क्षेपणास्र यांच्या अर्थ आणि शब्दसाधर्म्याचा अन्योन्य संबंध तुमच्या लक्षात आलाच असेलच. आपल्या पुराणातलं ज्ञानच आपण पुन्हा शोधून काढतो आहोत इतकंच."

१४ जानेवारी २०१२ च्या रात्री त्यांच्या दुकानात पाच विस्तव पेटले. त्या समाधीअवस्थेत प्रा. कर्तकांनी आपले तुरटीमय शरीर बाहेर काढले आणि भविष्यकाळात विरघळू दिले. ते क्षणार्धात तीन महिने पुढे आले.

"मी दुसऱ्या दिवशी माझ्या मित्रांना लिहिलेल्या इमेलमध्ये या अनुभवाचं बारकाव्यांसहित वर्णन केलेलं आहे" हातातल्या प्रिंटाउट्समधून कागद शोधून काढून ते वाचू लागले.

'माझं तुरटीमय शरीर मुक्त केल्यावर मला हवेत तरंगल्याचा भास झाला. मी थोडा पुढे गेल्यानंतर मला एक प्रचंड खांबाप्रमाणे आकृती दिसली. काही काळ मी तिच्या आसपास फिरून तिचं निरीक्षण केलं. ती खूपच प्रचंड होती. मग अचानक आसमंतात हादरे बसल्याचं जाणवलं. मोठ्ठे घरघरीचे आवाज यायला लागले. कुठेतरी आग लागल्याचं जाणवलं. मोठ्ठा प्रकाश पडला. आसमंतात धूर धूर झाला. मी त्या खांबाला घट्ट चिकटून होतो. तो खांब हळूहळू वर जात असल्याचं मला जाणवलं. मीदेखील वर गेलो. मग काही काळाने अंधार झाला. मी वातावरणाच्या बाहेर आल्यामुळे मला श्वास घ्यायला जड व्हायला लागलं. कोणीतरी खालती खेचत असल्याचा भास झाला. थोड्यावेळाने मात्र खाली आलो. त्यानंतर आठवतंय ते अनेकांचे आनंदाने चित्कारण्याचे, हसण्याचे आणि टाळ्या वाजवण्याचे आवाज....'

"यात मी प्रचंड आकार, खांबाप्रमाणे दिसणं, बसणारे हादरे, घरघर, आग, प्रकाश, धूर, वर जाणं, वातावरणाच्या बाहेर जाणं, गुरुत्वाकर्षणाने खाली येणं आणि शास्त्रज्ञांच्या टाळ्यांचे आवाज - अर्थातच योजनेचं यश - हे सगळं तीन महिन्यापूर्वीच पाहिलं. या ११ पॉइंट्सपैकी ११ प्रत्यक्ष घटनेशी तंतोतंत जुळतात!" हातातले कागद समोरच्या टेबलावर ठेवत ताठ मानेने ते म्हणाले.

आमच्या वार्ताहराने नंतर अन्यत्र चौकशी केली असता एक रोचक माहिती कळली. १४ जानेवारी २०१२ च्या रात्री प्रा. कर्तकांच्या दुकानाच्या परिसरात एका कचरापेटीला कोणीतरी आग लावली होती. तिथे असलेला पोलिस हवालदार बघायला गेल्यावर आग लावणारा घाबरून विजेच्या खांबावर वरवर चढायला लागला. त्याला तंबी देण्याऐवजी त्याला खाली कसं आणायचं हाच प्रश्न पडला. शेवटी कसंबसं त्याला उतरवल्यावर आसपास जमलेल्या अनेकांनी हवालदाराचं कौतुक करून टाळ्या वाजवल्या. अर्थात यात काही विशेष गुन्हा न घडल्याने या घटनेची सरकारदरबारी कसलीही नोंद नाही. तेव्हा तिचा इथे संबंध कसा हाही प्रश्न उपस्थित होतोच.

field_vote: 
3.4
Your rating: None Average: 3.4 (5 votes)

प्रतिक्रिया

शेवटच्या परिच्छेदात प्राध्यापक महोदयांचे नाव चुकल्यामुळे लेख वास्तवाच्या अधिक जवळ गेला आहे. Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वस्तु, वास्तु, विस्तव, वस्त्र, वस्ती व वनस्पती या चराचराशी संबंधित असलेल्या सर्व शब्दांचे वस्तऱ्याशी साधर्म्य आहे हा योगायोग म्हणाल काय?

बस्तीबद्दल प्रा.डॉ.श्री.चं.पी. कर्तक यांचे काय मत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१४ जानेवारी २०१२ च्या रात्री त्यांच्या दुकानात पाच विस्तव पेटले. त्या समाधीअवस्थेत प्रा. कर्तकांनी आपले तुरटीमय शरीर बाहेर काढले आणि भविष्यकाळात विरघळू दिले. ते क्षणार्धात तीन महिने पुढे आले.

याच पद्धतीने ते भुतकाळात जाउन त्यांनी रामायणातील केशकर्तन सामुग्रीचा काळ तपासला होता. त्यांच्या या अलौकिक पद्धतीमुळे ते पुरोगामी पाखंड्यांचे कर्तनकाळ म्हणुन नावारुपाला आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कर्तक डॉक्टरांचा XXX असो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!