(जळ्ळी मेली) कुटुंबसंस्था उर्फ आमच्या सिनेप्रेमाची चित्तरकथा

भारतीय सिनेमाला शंभर वर्षं पूर्ण झाली आहेत म्हणून भारतीय सिनेमाविषयीचं आपलं उतू जाणारं प्रेम जाहीर करणारे उदंड लेख आता ठिकठिकाणी येऊ लागले आहेत.* आमच्या मनात मात्र हे प्रेम कधी निर्माणच होऊ शकलं नाही आणि त्याचं कारण भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबव्यवस्था होती. ते कसं हे सांगणारा हा (हृद्य वगैरे असण्याचा अजिबात दावा न करणारा) लेख.

टीप : प्रस्तुत लेखातल्या घटना किंवा व्यक्ती यांचा वास्तवातल्या घटना किंवा व्यक्ती यांच्याशी दुरान्वयानंही संबंध नाही. तसा तो आढळला तर जळ्ळी मेली कुटुंबव्यवस्था कशी घरोघरी सारखीच आहे याचा परिप्रेक्ष्य मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे एवढंच म्हणता येईल. हा योगायोग असेलही कदाचित, किंवा नसेलही. पण असो.

आमच्या लहानपणी घडलेल्या आणि आमच्या मनावर खोल परिणाम करणाऱ्या अनेक क्लेशदायक घटनांमध्ये चित्रपटविषयक अशी पहिली घटना ही ‘पाकीजा’ या चित्रपटाशी निगडीत आहे. मीनाकुमारीच्या मृत्यूनंतर सुपरहिट झालेल्या या सिनेमाला आमचं कुटुंब आम्हाला घेऊन गेलं होतं. चित्रपटाचं चित्रीकरण वर्षानुवर्ष चालून त्या दरम्यान म्हाताऱ्या झालेल्या आणि ते लपवण्यासाठी भडक मेकअप वगैरे केल्यामुळे आणि त्यात सिनेमा रंगीत असल्यामुळे अधिकच भेसूर दिसणाऱ्या मीनाकुमारीला पाहून आम्ही रडून गोंधळ घातला. मग आम्हाला चित्रपटगृहाच्या बाहेर (अर्थात कुणाच्यातरी कडेवर) पिटाळण्यात आलं. आज अनेकजण या चित्रपटाविषयी जे स्मरणरंजन करत असतात ते पाहता लोकप्रिय स्मरणरम्य चित्रपटाची छीथू करणं या बाबतीत आमच्या पाळण्यातले पाय या प्रसंगात लोकांना दिसले असं म्हणता येईल.

यानंतरची आठवण याहून अधिक क्लेशदायक आहे. आमच्या लहानपणी गाजलेला आणखी एक सिनेमा म्हणजे ‘शोले’. त्यातले खटकेबाज संवाद, जय-वीरू-गब्बर-ठाकूर यांची जुगलबंदी, मोठ्या पडद्यावरची चित्तथरारक साहसी दृश्यं आणि नाण्याचा स्टिरीओफोनिक आवाज वगैरे (त्याला ‘टेकिंग’असं म्हणतात ही आमच्या सिनेज्ञानात तेव्हा पडलेली भर) असं सगळं आमच्या परिसरात असं काही गाजत होतं की ज्याचं नाव ते. अखेर एक दिवस ‘शोले’ पाहायला आमचं कुटुंब गेलंच. पण हाय रे कर्मा! आमच्या मातोश्रींनी सिनेमाविषयी काहीबाही आधीच ऐकलं होतं त्यामुळे आम्हाला मधोमध बसवून आमच्या शेजारची जागा त्यांनी आणि एका मावशीनं शिताफीनं पटकावली होती. समोर कुठलाही किंचितसा हिंसेचा प्रसंग आला की लगेच आमची माय किंवा मावशी आमचे विस्फारलेले डोळे घट्ट झाकत असे (आणि अर्थात हेलनचा डान्ससुद्धा आम्ही डोळे झाकल्या अवस्थेत ऐकला)!

हेलनच्या डान्सवरून आठवलं. ‘बायांनो नवरे सांभाळा’ नावाच्या चित्रपटाला आमचं कुटुंब बहुधा गेलं होतं. चित्रपटाची सुरुवात ही बलात्काराच्या दृश्यानं होते. ते पाहून आमच्या बालमनावर वाईट परिणाम होऊ नयेत म्हणून आमचं ‘दूध-भात-भेंडीची भाजी’छाप कुटुंब चक्क सिनेमा टाकून उठून गेलं. स्त्री-पुरुष संबंधांतल्या विविध काळ्या-पांढऱ्या-करड्या पैलूंच्या मनोज्ञ दर्शनाला असा अडसर घालून त्याविषयीची आमची ज्ञानलालसासुद्धा अशा रीतीनं अकाळी खुडण्याचे अघोरी प्रयत्न आमच्या नशीबी आले.

हेच पुढे विविध वेळी दृग्गोचर झालं. म्हणजे आमच्याहून वयानं मोठी, शिंगं फुटलेली आणि म्हणून आम्हाला आदर्शवत वाटणारी आमच्या आजूबाजूची सर्व तरुण मुलंमुली ‘भूल गया सबकुछ... ज्युली आय लव्ह यू’, ‘ना कुछ तेरे बसमे’ ‘माय हार्ट इज बिटींग’ वगैरे गाणी दिवसभर आळवत होती. ते पाहून हे ‘ज्युली’ प्रकरण काय आहे याविषयी आमच्या मनात बालसुलभ कुतूहल दाटून आलं. आमच्या गोंडस बालरुपाचे गालगुच्चे घेण्यात पुढाकार घेणाऱ्या आमच्या ओळखीतल्या एका उफाड्याच्या मुलीला ‘त्या सिनेमाला मला घेऊन चल नं’ अशी गळ आम्ही घातली, तर ‘अय्या इतक्यात नाय काय, तू अजून लहान आहेस’ असं काहीतरी चीत्कारून ती जोरात आमचे गालगुच्चे घेऊ लागली. पण तिचेच गाल इतके लाल झाले होते की यात काहीतरी लाल नसून उलट काळंबेरं आहे हे आमच्या चाणाक्ष मनानं तेव्हा हेरून ठेवलं. अखेर सिनेमा मात्र पाहायला मिळाला नाही तो नाहीच.

त्याच सुमाराला आलेला आणखी एक 'तसला' सिनेमा म्हणजे बॉबी. आमच्या आळीतल्या एका कॉलेजतरुणाला तो आपल्या सवंगड्यांसोबत पाहण्याची अनिवार्य इच्छा झाली होती, पण ‘चांगल्या घरातल्या मुलांनी “असले” सिनेमे अजिबात पाहायचे नाहीत’ अशी त्याच्या आईनं त्याला सक्त ताकीद दिली होती. हा आमच्या बालहृदयावर कोरलेला आणि कुटुंबसंस्थेविषयीचा आणखी एक प्रसंग.

आणि ही कुटुंबसंस्था केवळ मुलांनाच नाही तर जगातल्या आबालवृद्धांना छळत असते हे आमच्या लवकरच लक्षात आलं. आमच्या आसपासच्या आमच्याहून मोठ्या वयाच्या मुलांचे वर दिलेले दाखले आमच्यासमोर होतेच, पण आमच्या आजोबांनादेखील याचे फटके बसत. सिनेमामाध्यम अगदी नवं होतं त्या काळात आमचे आजोबा लहानाचे मोठे झाले होते. ल्युमिए बंधूंच्या सिनेमाच्या काळात, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी, समोर घडतंय ते प्रत्यक्ष नसून खोटं आहे हे विसरून जाऊन आगगाडी स्टेशनात येण्याचं दृश्य पाहून जसे लोक भिऊन पळून जात, तद्वत आमचे आजोबा (आरामात जागेवर बसून, अर्थात, कारण ते पुणेरी!) ‘हाण तिच्यायला’ वगैरे ओरडून मारामारी करणाऱ्या नायकाला प्रोत्साहन देत असत. त्यामुळे मारामारी करणारा नायक असणारे सिनेमे त्यांना बंद झाले. किंवा ‘सासुरवाशीण’ की तसल्या नावाच्या कुठल्या तरी सिनेमातल्या गायीसारख्या (म्हणजे दिसायला नाही, तर स्वभावानं गरीब गायीसारख्या) नायिकेला ‘अगं बसून काय राहिलीस पुळचटासारखी? त्या **** सासूला उलट उत्तर दे की!’ असं काहीतरी म्हटल्यामुळे कौटुंबिक सिनेमे पण त्यांना बंद झाले. थोडक्यात, ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी’ वगैरे शब्द दात ओठ खात, शिरा ताणून म्हणावे या आमच्या संस्कृतीमागे आजोबांना घरात मिळालेल्या वागणुकीचा आमच्या कोवळ्या मनावर झालेला आघात कारणीभूत आहे.

तर मग आमच्या या वाढीच्या वयात आम्ही कुटुंबाबरोबर कोणते सिनेमे पाहायला गेलो? एक तर सगळ्या पौराणिक सिनेमांचा रतीब आम्हाला असायचा (म्हणजे भक्त प्रल्हाद नव्हे बरं!); नाहीतर मग भालजी पेंढारकरांच्या ‘शूर आम्ही सरदार’ छाप ऐतिहासिक सिनेमांचं दार आम्हाला खुलं असायचं. आता खोटं का बोला? त्यात जयश्री गडकर किंवा हंसा वाडकर असत त्या आम्हाला आवडत. पण भाऊ-बहीण यांच्यात प्रेमसंबंध दाखवले आहेत आणि तमाशातली गाणी आहेत म्हणून ‘सांगत्ये ऐका’ आम्हाला निषिद्ध होता. द्वयर्थी संवादांमुळे दादा कोंडके वर्ज्य होते. आणि मग बाकी ‘श्यामची आई’, ‘संत तुकाराम’ वगैरे ‘सुवर्णकाळ’ छाप सिनेमे आमच्या राशीला बसले होते आणि आमचा कर्दनकाळ बनले होते.

हे कमी पडलं म्हणून की काय राजश्री प्रोडक्शनचे सिनेमे आमच्याकडे चालत असत. ‘स्वामी’मध्ये शबाना लग्नाआधी उगीच ‘पल भर में ये क्या हो गया’ वगैरे म्हणते खरी, पण शेवटी लग्न झाल्यावर नवऱ्याशी एकनिष्ठ राहते. शिवाय ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’ वगैरे. म्हणजे आमचा ओढा हेलनकडे नाहीतर गेला बाजार ‘रात अकेली है’ मधल्या तनुजाकडे वगैरे पण आमच्या नशीबी मेल्या विद्या सिन्हा नाही तर झरीना वहाब! आमचा ओढा अमिताभच्या ‘पहले उसकी साईन लेके आ जिसने मेरा बाप...’ वगैरेकडे आणि आम्हाला पाहायला लागायचा तो जन्मात कधी उन्हातसुद्धा न बसलेला ‘बाबू मोशाय’ वगैरे उगीच स्टाईल मारणारा राजेश खन्ना! अगदी भयस्वप्न म्हणता येईल असा तो काळ होता.

त्यात उगीच अधेमध्ये उदाहरणार्थ गुलजारची वगैरे फोडणी असे. म्हणजे एक तर ऐन आणीबाणीच्या काळात इंदिराबाईंविषयी बनवलेला सिनेमा बघून आपला उदारमतवाद दाखवणारे आमचे संघिष्ट कुटुंबीय, त्यात संजीवकुमार वगैरेची प्रगल्भ अदाकारी; मग काय, आम्हाला प्रगल्भ बनवण्यासाठी सेफ म्हणून आम्हाला असल्या कंटाळवाण्या सिनेमांना नेलं जायचं. पण अर्थात ‘मौसम’मध्ये दुसरी शर्मिला वेश्या होते म्हणून मग तो नाही. पण ‘अमर प्रेम’मध्ये सगळं लहान मुलावरच्या प्रेमाच्या सायीच्या दुधात न्हाऊन निघालेलं असल्यामुळे ते ‘सेफ’, असलं काहीतरी अजब तर्कशास्त्र असायचं. आमच्या मर्जीला काही किंमत न देता बघणं भाग पडलेले हे असले संस्कारू सिनेमे मग आम्हाला मोठेपणी कसे आवडतील?

त्यामुळे मग आमच्या आमच्या पद्धतीनं आम्ही गुपचूप सिनेमे बघणं सुरु केलं. म्हणजे एकीकडे ग्रेस केली, इनग्रिड बर्गमन नाहीतर जॅनेट ली वगैरे बाया डोळे भरून पाहायला मिळतात आणि शिवाय मेंदूला मुंग्या आणणारा थरार असा हिचकॉक पाहा, नाहीतर कुरोसावाचा ‘सेवन सामुराई’ नाहीतर ‘हिडन फोर्ट्रेस’ पाहून ‘शोले’चे उट्टे काढ अशी आमची सिनेकारकीर्द सुरू झाली आणि मग काही आम्ही मागे वळून पाहिलं नाही.

थोडक्यात काय, तर या कुटुंबसंस्थेनं आमच्या आवडीनिवडीचा पार खिमा केला आणि आमच्या बालमनाला क्लेश दिले. असा हा आमचा बालपणीचा सुखाचा नसलेला काळ होता. मग त्यावर उतार म्हणून आम्ही पाश्चिमात्य सिनेमाच्या कृपेनं बरंच काही पाहिलं आणि ज्याला त्याला ‘फुस्स यात काय विशेष!’ असं म्हणण्याचा अधिकार कमावला. असो. थोडक्यात काय, तर हिंदी सिनेमापेक्षा परकीय सिनेमानं आमचं सर्व बाबतीत अधिक पोषण केलं आणि याचं खापर तथाकथित सुसंस्कृत भारतीय कुटुंबसंस्थेवर आम्ही फोडतो.

आता सांगा भारतीय सिनेमाला १०० वर्षं झाली म्हणून आम्ही का छाती फुगवून किंवा मन उलून येऊन बोलावं? आणि आमच्या आजच्या स्थितीला आमच्या लहानपणचा हा सगळा क्लेश जबाबदार आहे असं फ्रॉईडीअन विधान मग त्यामुळे आम्ही केलं तर त्यात काय बरं चूक आहे?

* श्रेय अव्हेर :
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12912643.cms
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=223965:...

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

मीनाकुमारीच्या मृत्यूनंतर सुपरहिट झालेल्या या सिनेमाला आमचं कुटुंब आम्हाला घेऊन गेलं होतं.
अखेर एक दिवस ‘शोले’ पाहायला आमचं कुटुंब गेलंच.

वानगीदाखल दोनच वाक्यं टाकली. तुम्ही विवाहसंस्थेचा बळी (त्यात पुन्हा बालविवाहाचे बळी) आहात. उगाच समीक्षकी अवतार धारण करून कुटुंबसंस्थेला धोपटण्यात अर्थ नाही. Wink कारण कुटुंबसंस्था वेगळी आणि 'आमचं कुटुंब' वायलं...! Wink

एग-जॅक्टली हेच म्हणणार होते. जंतू यांचा बालविवाह झालेला असल्या कारणाने ते कौटुंबिक सिनेमा आणि सिरीयल्सचा विरोधात आहेत. शेवटी काय ज्याचे जळे त्यालाच कळे असं काही म्हणणार होते, तर श्रावणने बिंग फोडले.

असो. लेख अगदी मजेशीर झालेला आहे. खरं तर अशा विनोदाला आम्ही लोळून लोळून हसायचोच ... अगदी असे, ROFLROFLROFL पण चिंतातुर जंतूंच्या या करूण कहाणीला विनोद समजून हसायचे तर त्यांच्या मनास यातना होतील म्हणून फक्त उच्चभ्रू, समीक्षकी मंदस्मित करून "सहमत आहे" म्हणते.

आमच्या बालपणाची कहाणी मात्र थोडी वेगळी होती. आमचे पिताश्री, स्वतःच्या लहान वयात कधीतरी देवाचा सिनेमा आहे असं म्हणून "दिल एक मंदीर" बघणार्‍यातले होते. असं असल्यामुळे आम्हाला बालवयात सिनेमा दाखवलाच जात नसे. पुस्तकं मात्र हवी ती वाचली. (त्यातही कोण ते "मर्दानी सौंदर्या"चं वर्णन करणार्‍या कादंबर्‍या/गोष्टी वाचताना माझा डोळा लागत असे आणि आशू कानजी वगैरे कधी दृष्टोत्पत्तीस पडलेच नाहीत. असो.) तर मुद्दा हा की आमचे पिताश्रीच 'बाप' असल्यामुळे चांगले असोत वाईट आमच्यावर संस्कार झालेच नाहीत. अमर प्रेम नामक सिनेमा तसा लहानपणी पाहिला होता. त्यातली गाणी ऐकून आठवतात आणि दृष्य कोणतं आठवत होतं तर ओमप्रकाश पाणीपुरीत चपटीतलं पाणी भरून खातो ते! असली दृष्य आमच्याकडेतरी सेन्सॉर झाली नाहीत. अंमळ शिंग फुटल्यावर मात्र मुघल-ए-आझम पहाताना "ही सुंदर स्त्री त्या भुसनळ्याच्या प्रेमात का पडली?" (बहुदा ढ असावी किंवा पैशाची लालूच ... हे वाक्य गिळलं होतं.) किंवा तुमच्या "आवडत्या" "'पाकीजा'मधली मीनाकुमारी कोणत्या अँगलने सुंदर दिसते?" असे प्रश्न ऐकून आमच्या पिताश्रींना योग्य निर्णय घेतल्याचा आनंद झाला असावा.

भारतीय सिनेमाची १०० वर्ष झाली याचा आनंद मानायचाच असेल तर यासाठी मानावा, गेली १०० वर्ष तरी चांगला सिनेमा बघावा अशी अपेक्षा निदान काही भारतीय तरी करतात. आणि मग अधूनमधून हरिश्चंद्राची फ्याक्टरी, वगैरे चांगले सिनेमे येतात की! फार बुवा अपेक्षा तुमच्या!!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सदर लेख वाचला पण प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे कुठे हसू आले नाही. हा लेख आम्ही 'ओतावि' या सदरात घातला आहे. फक्त गालगुच्चे घेण्याचा प्रकार रोचक (हल्ली हा शब्द फारच पापुलर) वाटला. आमचे एवढे भाग्य लहानपणीही नव्हते आणि आता या दुसर्‍या 'लहानपणीही' नाही.
आमच्या कुटंबात फारच मोकळाढाकळेपणा होता. कॉलेजात गेल्यावर खुद्द पिताश्रीच, 'काय हे, तू अजून सिगरेट ओढत नाहीस?' अशी पृच्छा करीत. कदाचित कुठलीच बंधने न घातल्यामुळे आम्ही बंधनात राहिलो आपखुशीने.

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

१. आशू कानजी नव्हे हो "आशू रावजी आणि दिनू कानडे" - वाचनाच्या अतिव प्रेमामुळे एकेकाळी आमच्या हाती ही पुस्तकेपण लागली. वाचनाची आवड आणि प्रचंड उत्सुकता यामुळे त्यांची बरीच पुस्तके वाचली मग तोचतोचपणा जाणवून कंटाळा आला. असो.

२. भुसनळया हा शब्द सुपरलाईक करण्यात आला आहे.

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

हेलनच्या डान्सवरून आठवलं. ‘बायांनो नवरे सांभाळा’ नावाच्या चित्रपटाला आमचं कुटुंब बहुधा गेलं होतं. चित्रपटाची सुरुवात ही बलात्काराच्या दृश्यानं होते. ते पाहून आमच्या बालमनावर वाईट परिणाम होऊ नयेत म्हणून आमचं ‘दूध-भात-भेंडीची भाजी’छाप कुटुंब चक्क सिनेमा टाकून उठून गेलं. स्त्री-पुरुष संबंधांतल्या विविध काळ्या-पांढऱ्या-करड्या पैलूंच्या मनोज्ञ दर्शनाला असा अडसर घालून त्याविषयीची आमची ज्ञानलालसासुद्धा अशा रीतीनं अकाळी खुडण्याचे अघोरी प्रयत्न आमच्या नशीबी आले.

'कळ्यांचे नि:श्वास' हे शीर्षक या लेखाला शोभून दिसावं Smile

बाकी इथेही फक्त एकाच मराठी चित्रपटाचा उल्लेख करून मराठी अस्मितेकडे पाठ फिरवल्याबद्दल चिंजंचा निषेध!

हे असे दूध-भात-भेंडीची भाजी छाप कुटुंब सगळ्यांनाच कसे काय मिळते कुणास ठाऊक?
आमच्याकडे तर थेटरात जावून जास्त पिच्चरं बघणे हेच चूक मानत, वर्षातून एखाद-दुसर्‍याच्यावर थेटरात पिच्चर पाहणा होत नसे. घरातही दूरदर्शनशिवाय दुसरं काही चॅनल नसायचं आणि दूरदर्शनच्या बारीक गाळणीतून फिल्टर होवूनही चुकून एखादं 'रोचक' दृष्य आलंच तर लग्गेच टिव्ही डायरेक्ट बंद व्हायचा. असो. परावलंबी जीवन होतं तेव्हा.

पुढे शिकायला पुण्यात आल्यावर, वय १७ ते १८ च्या मधे होते तेव्हा (केवळ चुंबन दृष्यामुळे) 'A' दर्जा असलेला इंग्रजी सिनेमा पाहिला आणि एकदाचे आपण आपल्याला हवे ते पिच्चरं बघायला मोकळे झालोय याचा आनंद झाला Wink

एवढं सगळं लिहिल्यावर लेख मजेशीर आहे हे वेगळं सांगायची गरज नाही.

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

समीक्षक या जातीविषयी (अर्थातच पुलंनी) म्हटले आहे की त्यांच्या इंद्रियांवर एक न उघडणारे झाकण बसवलेले असते. अकारण वैताग आणि कडवटपणा अशा आठ्या घेऊन ही जमात वावरत असते. असे काहीसे म्हटलेले आहे. त्यामुळे पाकीजा, आंधी, शोले ला उतारा म्हणून बर्गमन, कुरुसावा हे अगदी पटले. चरचरीत मिसळीचा एक घास घ्यायचा आणि 'शी! हे काय खाणं आहे? त्यापेक्षा इटालियन खाल्लेलं बरं!' असं म्हणत मिनरल वॉटरचा घोट घेत उठायचं, 'शब-ए-इंतजार आखिर, कब होगी मुक्तसर भी' हे काय काव्य आहे? त्यापेक्षा पेले दू त्रां चे काव्य बघा, नसिरुद्दिन शाह काय अ‍ॅक्टर आहे? त्यापेक्षा फेडेलेलो क्वात्रोची चा अभिनय बघा हे अगदी म्हणजे अगदीच पटले. पानतंबाखू खाऊन शेजारच्या धुळीत एक चरचरीत पिचकारी टाकत 'तू छत पर आजा गोरिये' वर दिलीपकुमारची उडणारी जुल्फे बघताना जोडीदाराला एक धसमुसळी टाळी देणार्‍या आमच्यासारख्यी गावठी लोकांना तर हे फारच पटले. तूर्त अशा लेखांकडे आम्ही पातळ, पारदर्शक कागदात गुंडाळलेल्या महाग मिठाईकडे फाटक्या, मळकट कपड्यातल्या पोराने काचेला नाक लावून बघावे तसे बघत आहोत....

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हाहाहा! खरंय!

बिपिन कार्यकर्ते

बिना काचोळीने उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
नटी पाहू ना ऊघडे
त्याले तोंड म्हनूं नहीं

नही खुनाने चाललं
पिच्चर त्यां म्हनूं नहीं
नहीं करी बोंबाबोंब
मूजिक त्यां म्हनूं नहीं

सुरा बंदूकीवांचून
क्लायमॅक्स म्हनूं नहीं
नहीं उघडं दर्सन
गरम सेक्स म्हनूं नहीं

न दाखवी अर्धपोटीं
आर्टफिल्मा म्हनूं नहीं
ग्लिसरीनी कमी पडे
मेलोड्रामा म्हनूं नहीं

आमटीत नही पानी
सिरियल ती म्हनूं नहीं
मसाल्यात कमती होई
"एकता" ती म्हनूं नहीं

गळा सोडी बच्चनजीचा
तीले रेखा म्हनूं नहीं
जीले नहीं फुटे पान्हा
ती "निरूपा" म्हनूं नहीं

हिर्वीण पळता ना लागे
त्याले धाप म्हनूं नहीं
जो ना जत्रेत हरवी
त्याले बाप म्हनूं नहीं

मेलोड्रामी अंमळ कमी
त्याले सूड म्हनूं नहीं
सेक्सी-खुनीं तोकडवाणा
बॉलीवूड म्हनूं नहीं

"टॉकी" पाह्ता मनी येई
त्यासी किंतु म्हनूं नहीं
फरांसिसी भजनी लागे
त्याले जंतू म्हनूं नहीं

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मुसु रॉक्स!
सन्जोप रावही रॉक्स!!
स्मिता. टू रॉक्स!!!
(आठाळ राखुंड्यांनी (श्रेय ज्यांचे असेल त्यांना) उगाच येथे या तिघांना मी दगड म्हटलं आहे असला भलता अर्थ काढू नये. तसा अर्थ ज्यांना भासतो आहे त्यांनी रॉक डान्स करत बसावं, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करूच.)
काय तो एक बालविवाह, काय त्याचे दुष्परिणाम आणि त्या दुष्परिणामांचे किती ते तवंग! Wink

आजोबा-नातू जोडगळीने मिळून थेटरात सिनेमे का बरे पाहीले नाहीत हे कोडे उलगडले नाही.

प्रस्तुत लेखातल्या घटना किंवा व्यक्ती यांचा वास्तवातल्या घटना किंवा व्यक्ती यांच्याशी दुरान्वयानंही संबंध नाही.

आमचं ‘दूध-भात-भेंडीची भाजी’छाप कुटुंब...

हं!

असो चालायचेच. प्रघात आहे. ('खाण्याची आवडः रोज शिक्रण पाहिजे. कारण शेवटी आम्ही भटेंच. त्याला काय करणार?' - पु.ल.)

(तरी बरे, परवाच - आणि तेही याच संकेतस्थळावर - कोणत्यातरी व्यक्तिचित्राखाली त्यातील उत्सवमूर्ती सीकेपी असल्याचा उल्लेख असायलाच हवा का, म्हणून कोणीतरी ओरडत होते. असो हेही चालायचेच.)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

Smile मजा आहे!

बाकी 'घुसळकुमारी' (खरंतर सौभाग्यवती) चा पिंजरा चा उल्लेख अ(ना)वधानाने राहिला की काय?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घुसळकुमारी हा शब्द प्रचंड आवडला आहे. तिला टीव्हीवर पाहूनही धडकीच भरायची. मग केबल वगैरे आली.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्या जीवनप्रवासातले एक-दोन मैलाचे दगड सांगायचे राहिलेच. त्यांपैकी पहिला म्हणजे पौराणिक सिनेमांच्या रतीबातला एक रत्तल होता. 'जय संतोषी माँ' नावाचा भयाण सुपरहिट्ट चित्रपट पाहायला आमचे कुटुंबीय* गेले होते. त्यातली कानन कौशल, अनिता गुहा वगैरे 'ड' दर्जाची मंडळी आणि जोडीला 'मदद करो...' म्हणून किंचाळणार्‍या उषाताई म्हणजे अगदी कहर होता. डोळे झाकून (न) पाहिलेला 'शोले' आणि अजिबातच न पाहिलेला 'दीवार' ज्या वर्षी झळकले त्याच वर्षी आमच्या राशीला आलेल्या ह्या माताहारी नंतर अनेक रात्री आमच्या स्वप्नांत थयथयाट करत आणि आम्ही किंचाळत जागे होत असू. त्या मानसिक आघाताचा परिणाम म्हणून आम्ही नास्तिक झालो. पूर्वी किमान परीक्षेला जाताना तरी आम्हाला देवादिकांची आठवण होत असे, पण यानंतर मात्र कानाला खडा.

दुसरा मैलाचा दगड म्हणजे विनोदी चित्रपट. दादा कोंडक्यांचे रांगडे विनोद आमच्याकडे वर्ज्य असले तरीही राजा परांजपे आणि पु.लंचे दूधभात विनोद आमच्याकडे चालत असत. त्याचा एक फायदा म्हणजे आमच्या आवडत्या चित्रा-रेखा आम्हाला पाहायला मिळत. दीदी व्हायच्या आधीची सुलोचनासुद्धा आम्हाला 'मोलकरीण'वगैरेमध्ये पाहायला मिळे. एकंदरीत, अशा काही मराठी नायिका म्हणजे आमच्या सिनेवैशाखातली एकमेव हिरवळ होत्या. पण हाय रे दैवा! लवकरच कुंकवाच्या करंट्या आशा काळे यांचा भाग्योदय झाला आणि आमच्या कुटुंबियांना त्यांची 'बळं कशाला गाते मी अंगाई' छाप रडगाणी प्रिय झाली. आमचं (आणि कुटुंबसंस्थेचं) नशीब त्यातल्या त्यात एवढंच, की प्रत्यक्ष आयुष्यात गालगुच्चे घेणार्‍या उपरोल्लेखित काहीजणी असल्यामुळे आम्ही स्त्रीद्वेष्टे झालो नाही. नाहीतर त्याचं खापरसुद्धा कुटुंबसंस्थेवर फुटलं असतं.

* छिद्रान्वेषी (आणि इतर बर्‍याच काही अन्वेषी असणार्‍या) मोडकांसारख्या समीक्षकी चिंतातुर जंतूंसाठी हा बदल करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आमचं (आणि कुटुंबसंस्थेचं) नशीब त्यातल्या त्यात एवढंच, की प्रत्यक्ष आयुष्यात गालगुच्चे घेणार्‍या उपरोल्लेखित काहीजणी असल्यामुळे आम्ही स्त्रीद्वेष्टे झालो नाही.

दुर्दैव हो दुर्दैव... कळ्ळं आम्हाला, गालगुच्चे!
जाऊ द्या... जितकं मागं वळून पाहाल तितका त्रास होईल. हाईंडसाईट ईज परफेक्ट सायन्स, बट रेअर्ली कमिंग इनटू एक्झीस्टन्स! Wink

चूक तुमचीच आहे. तुम्ही अंमळ लवकरच जन्माला आलात. माझ्या माहितीतली अनेक लहान मुलं 'चमचम करता', 'व्हॉल्यूम कम कर', 'मुन्नी बदनाम हुई' वगैरे गाणी ऐकत, यूट्यूबवर बघत मोठी होत आहेत. पोरांचं रडं आवरण्यासाठी ही आणि असली (असली म्हणजे तसलीच नव्हे, असली, खरी) गाणी रामबाण उपाय असल्याचं त्यांचे पालक, आजी-आजोबा अगदी कौतुकाने फोनवर, भेटल्यावर सांगतात. आता हीच मंडळी 'नि:शब्द' वगैरे पाहून अमिताभला चळ लागला आहे असं ऐकवतात, पण तो भाग निराळा.

'गोमू संगतीनं' गाणं आठवत नाही तेव्हापासून माहित आहे. पण त्यांतला "नाच" पाहिला आणि माझ्या लहानपणी यूट्यूब वगैरे नसण्याचा आनंद झाला. तेच का ते काशीनाथ घाणेकर ज्यांना त्यांच्या काळात जनता हँडसम म्हणायची? राजवाड्यांचं गतकाळातलं वैभवही हजार वर्षांनंतर दिसतं तर या हँडसमनेसच्या हातबाँबांचं सौंदर्य दहा-बारा (का काय जी असतील ती) वर्षांत एवढं का ढासळतं?

आता नंदनने "चुनरी संभाल तेरी उडी उडी जाय"ची फीत यूट्यूबवर पहावी.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही उल्लेख केला त्यामुळे मी सुद्धा गोमू संगतीने यू ट्युबवर पहिल्यांदाच पाहिले.

त्यापेक्षा आम्ही इयत्ता पाचवी मध्ये याच गाण्यावर बसवलेले कोळीनॄत्य कितीतरी चांगले होते.

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

तुमची शाळा बरीच पुढारलेली म्हणायची!
आमच्या शाळेत असल्या प्रकारची कोणतीही गाणी, ज्यात कुठेही स्त्री-पुरूष युतीचा दुरान्वयही लावता येईल अशा गाण्यांवर सेन्सॉरची गदा येत असे. त्यातल्या त्यात इंग्लिश गाणी वापरण्याची सोय होती, कारण शिक्षकांनाच त्यातले शब्द समजत नसत. अर्थात या कोणत्याही प्रकारच्या नाचकामात आमचा समावेश नसायचा ही पण एक खुषखबर आहेच.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>> आता नंदनने "चुनरी संभाल तेरी उडी उडी जाय"ची फीत यूट्यूबवर पहावी.
--- तपशीलात किंचित चूक झालीय का? 'ओढनी ओढू तो उडे उडी जाय'च्या व्हिडिओची सर 'चुनरी संभाल गोरी'ला नाही असं आमचं प्रामाणिक मत आहे Smile

हेच ते हेच ते! स्वारी, अंमळ गल्लती से मिश्टेक हो गया.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>चूक तुमचीच आहे. तुम्ही अंमळ लवकरच जन्माला आलात. माझ्या माहितीतली अनेक लहान मुलं 'चमचम करता', 'व्हॉल्यूम कम कर', 'मुन्नी बदनाम हुई' वगैरे गाणी ऐकत, यूट्यूबवर बघत मोठी होत आहेत.

जळ्ळ्या मेल्या कुटुंबसंस्थेत होरपळलेल्या आमच्या पिढीतल्या अनेकांचं बलिदान आणि अहोरात्र कष्ट त्यामागे आहेत हे विसरू नये. आम्ही आमच्या मुलाबाळांना गोविंदा-करिश्मा कपूरच्या नाचगाण्यांवर पोसलं आणि आमच्या माधुरीला धक-धक गर्ल बनू दिलं म्हणून आजच्या नातवंडांना हे सोन्याचे दिवस दिसत आहेत बरं. खरं तर या नव्या युगाचे स्वातंत्र्यसैनिक म्हणून आम्हाला आता पेन्शन मिळालं पाहिजे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे भारी प्रकरण वाचायचंच राहून गेलं!

लेख वाचूनच लेखकाला भारतीय संस्कृतीविषयी तिटकारा आहे हे स्पष्ट दिसून येतं. इतरांच्या कर्तृत्वाचे ढोल वाजवून म्हणायचं की छ्या, आपल्याकडे असलं काही होतंच नाही, ही खास विचारजंती विचारसरणी जंतूंसारख्यांकडून अपेक्षितच होती. पण ते करतानाही याचा दोष पुन्हा भारतीय संस्कृतीच्या दुसऱ्या महत्त्वाच्या आधारस्तंभावर - कुटुंबव्यवस्थेवर - ढकललेला आहे, याचं आम्ही जाहीर लांच्छन करतो.

हे विसरू नका की भारतीय कुटुंबसंस्थेने चित्रसाहित्यात अत्यंत मोलाची भर घातलेली आहे. वहिनीची साडी, वन्संच्या पाटल्या, जाऊबाईंचा जोर वगैरे हृद्य विषयांना स्पर्श करण्याची तरी तुमच्या कुरोसावा-का-कोण-तो ची हिम्मत झाली का? सासूदेखील कधीतरी सून होती बहुधा मधले कच्च्या फणसासारखे वरून काटेरी आणि आतून कडवट असलेले संबंध, मानापमानांच्या वेगवेगळ्या पद्धती, बिछडे हुए भाई छाप चित्रपटांतून येणारं मुलं हरवण्याच्या धोक्याबद्दल जत्रांविषयी प्रबोधन - ही भारतीय कुटुंबसंस्थेतूनच आलेली व भारतीय चित्रपटात प्रतीत झालेली चित्रविश्वाची मर्मबंधातली ठेव आहे. या ठेवीचा परतावा मोठा आहे. ही भरघोस व्याज देणारी आपलीच मालमत्ता सोडून परक्यांच्या हिरवळीकडे बघत ती लांबून किती हिरवी दिसते असं म्हणत जिभल्या चाटणं हेच विचारजंतांचं व्यवच्छेदक लक्षण!

आम्हाला लहानपणी "उत्सव" आणि अगदी कॉलेजला जाण्याची वेळ आली तरी आई-वडीलांनी आधी पाहिल्यामुळे "बॉम्बे" पाहण्यास कितीतरी वर्षे बंदी होती.

व्हिसीआर १२ तासासाठी भाड्याने आणून त्यावर एका रात्रीत तीन सिनेमे बर्‍याच वेळा पाहिले पण तो व्हिसीआर कधी वडिलांच्या मित्राकडून आणला गेला तर त्याबरोबर एखाद्या इंग्रजी सिनेमाची कॅसेट आणली जात असे आणि ते मोठ्यांसाठीच असतात असे कारण सांगून वडिल आणि त्यांचा मित्र बाहेर सिनेमा पाहात असताना आम्हाला आतल्या खोलीत बसवले जात असे. थोडी जास्त अक्कल आली आणि ब्लू फिल्म नामक प्रकार बद्दल ऐकले तेव्हा सर्व इंग्रजी शिणेमे हे निळ्या चित्रफिती असतात असा बरीच वर्षे आमचा समज होता.

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

या टीकाकार लेखकूंबाबत एक प्रश्न पडला आहे. तुम्ही किंवा तुमचे आई-वडील कोणी फोटोग्राफर होते का? सतत का हो असे निगेटीव्ह बोलता?

----
आम्ही चर्चा करणारे ... चर्चिल!

फोटॉग्रफीचा निगेटिवशीच संबंध असला पाहिजे, असेच काही नाही. 'डिजिटल' वगैरे अगदीच आजकालची गोष्ट झाली, म्हणून सोडून द्या, पण 'पोलरॉइड'ची शक्यता लक्षात घेतली आहेत काय? म्हणजे थेट पॉज़िटिव ते पॉज़िटिव, शिवाय 'असे पुन्हा होणे नाही' (नो कॉपीज़) टाइप्स?

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

(अ)ज्ञानसंवर्धन फक्त चित्रपटांतूनच केल्यामुळे पोलरॉईड कॅमेरे फक्त स्मृतीभ्रंश झालेले लोकं वापरतात असा समज होता.

----
आम्ही चर्चा करणारे ... चर्चिल!

पोलरॉईड कॅमेरे फक्त स्मृतीभ्रंश झालेले लोकं वापरतात असा समज होता.

कोणत्या सिनेमात होते असे बुवा?

यावरून आठवले. कोणत्यातरी एका पिच्चरमध्ये श्रीमंत बापाने (अमरीश पुरी) आपल्या फॉरेनहून शिकून परत येणार्‍या दिवट्यासाठी भेट म्हणून खास 'सिंगापूर एअरपोर्टवरून विकत घेतलेला डिजिटल फ्लॉपी कॅमेरा' (फ्लॉपीवरील आघात दाखवला आहे तस्साच उच्चारायचा.) आणलेला असतो. आणि त्यातील 'सिंगापूर विमानतळावरून विकत घेतलेला' ही बाब कंटाळा येईपर्यंत ऐकवली जाते. बहुधा त्याशिवाय पोराच्या मनावर ठसत नसावे.

('डिजिटल फ्लॉपी कॅमेरा' = सोनी मॅविका. अर्थात, 'धिस पार्ट ऑफ द मूवी स्पॉन्सर्ड बाय सोनी', हे सुज्ञांस सांगणे बहुधा नलगे. कदाचित सिंगापूर चांगी विमानतळाचा सहयोग असणेही अशक्य नसावे.)

त्या आख्ख्या पिच्चरमधली, 'बेटे, मैं तुम्हारे लिए सिंगापूर एअरपोर्ट से डिजिटल फ्लॉपी कॅमेरा लाया हूं' (शब्दांची चूभूद्याघ्या.) म्हणताना गळलेली ग्यालनभर लाळ तेवढी लक्षात आहे. उर्वरित पिच्चर स्मृतिभ्रंशात जमा आहे.

(त्या पिच्चरमध्ये ऐश्वर्या राय होती, यावर केवळ आमची उत्तमर्धांगिनी सांगते, म्हणून विश्वास ठेवायचा. अन्यथा, काही म्हणून काही आठवत नाही. नाही म्हणायला, पिच्चरमध्ये कुठेतरी आलोक नाथ होता, एवढे अंधुकसे आठवतेय. एक अत्यंत अविस्मरणीय, ज्याच्या कानफटात मारावीशी वाटते, असे व्यक्तिमत्व - असे कसे विसरता येईल? असो.)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

कोणत्या सिनेमात होते असे बुवा?

Memento आणि त्याची भ्रष्ट, भारतीय नक्कल गजनी.

कृपया 'बेटे, मैं तुम्हारे लिए सिंगापूर एअरपोर्ट से डिजिटल फ्लॉपी कॅमेरा लाया हूं' या पिक्चरचं नाव सांगावं. अशा नावांपासूनही आम्ही लांब रहाण्याचा प्रयत्न करू. आलोक नाथ बद्दल तुमची मतं फारच सौम्य आहेत. तुम्ही बहुदा बडजात्यांचा 'विवाह' हा सिनेमा पाहिलेला नसावा. (ज्यांनी हा चित्रपट पाहिलेला नाही त्यांनी कृपया माझ्यावर बहिष्कार टाकू नये. मला हा चित्रपट जबरदस्तीने दाखवण्यात आला होता.)

----
आम्ही चर्चा करणारे ... चर्चिल!

कृपया 'बेटे, मैं तुम्हारे लिए सिंगापूर एअरपोर्ट से डिजिटल फ्लॉपी कॅमेरा लाया हूं' या पिक्चरचं नाव सांगावं.

बहुधा 'ताल' असावे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

ROFLROFL
घुसळकुमारी काय कच्च्या फणसासारखे वरुन काटेरी व आतून कडवट नाती काय किंवा "एक अत्यंत अविस्मरणीय, ज्याच्या कानफटात मारावीशी वाटते, असे व्यक्तिमत्व " काय - लेख तर आवडलाच पण प्रतिसादांनीही बहार आणली.

त्या काळी (म्हणजे एप्रिल 2012मध्ये) चिंजं हा आयडी कोणी दुसरी व्यक्ती चालवत असे का?

*********
आलं का आलं आलं?

चला, मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला कोणीतरी मूषकवीर तयार झाला हे पाहून आम्हालाही थोडं स्फुरण चढलं.

चिंजंच्या बाबतीत असं म्हणता येईल की अनुराव के इष्क ने निकम्मा कर दिया, वरना आदमी बडा काम का था!

'त्या काळी जंतू कोणते द्रव्य प्राशन करीत असत?' असा प्रश्न उपस्थित करावा अशी भारदस्तक अ‍ॅपची सुचवणी.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्या वेळी ओतावि वाटलेल्या या धाग्याच्या पुनर्वाचनानंतर खळखळून हंसू आले, हे का झाले असावे बरे ?
अगदी लहान असताना, एका सुट्टीत ,मोठ्या चुलतबहिणींनी त्यांच्या मैत्रिणींबरोबर आम्हाला 'झनक झनक पायल बाजे' या चित्रपटास कडेवरुन नेले. (माझ्या आईचा विरोध पत्करुन) तोंडात खाऊ असल्यामुळे आम्ही मुकाट्याने ती चलतचित्रे बघत होतो. पण तोंड रिकामे व्हायला आणि 'घुसळकुमारी' पडद्यावर यायला एकच गांठ पडल्याने, 'ए, तिची पिपी दिसतीये बघ' असे बेंबीच्या देठापासून ओरडल्याने, तो किस्सा आमच्या घरच्यांना दोन दिवस पुरला. 'मुलाची नजर थेटरांत दिसते', ही नवीन म्हण तेंव्हापासून जन्माला आली.

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !