‘अंतरीचे धावे’ - भानू काळे

हा लेख गेल्या वर्षी लोकसत्ता-लोकरंग-पुस्तकाचे पान ह्या सदरात प्रसिध्द झाला होता. त्याची लिंक सापडत नसल्याने तोच लेख इथे जसाच्या तसा देत आहे.
हे वाचून तुमच्या मनात येईल (साहजिकच आहे म्हणा!) की ‘काय हे! तेच ते आणि तेच ते’.... पण, वाचक-मित्रहो, सध्या नवीन वाचन-लिखाणावर बर्‍याच मर्यादा आल्या आहेत. कारण? अर्थातच, कार्यालयीन काम! त्यामुळे येणारी अस्वस्थता घालवण्याचा हा एक उपाय!
ह्याची लिंक सापडवून देण्यात माहीतगार मदत करतील (मागच्याप्रमाणे) अशी आशा आहे.


‘अंतरीचे धावे’ - भानू काळे (मौज प्रकाशन - पृष्ठे:२३३ - किंमत: रु.२००)

दुसर्‍याला सांगावेसे वाटणारे आपल्या मनातील भाव आपण किती काळपर्यंत अंतर्मनातच रोखून, साठवून ठेवू शकतो? थोडीशी वाट जरी सापडली तरी ते उसळ्या मारत बाहेर प्रकटतातच. अशावेळी कुणी कुंचल्याने रंगीत फटकारे मारून, कुणी सुरांच्या साथीने, तर कुणी थेट शब्दांवाटे त्यांना मोकळं करतं. कला कोणतीही असो, उत्कट आविष्कार प्रेक्षकाला-श्रोत्याला-वाचकाला आकर्षित करतो. निर्मितीचा आनंद कलाकाराइतकाच आस्वादकालाही मिळतो!
भानू काळे ह्यांनी लिहिलेलं ‘अंतरीचे धावे’ हे पुस्तक वाचताना ह्याचा प्रत्यय येतो. चांगल्या साहित्याच्या वाचनासाठी वाचकांची अभिरुची घडवण्याचं ध्येय डोळ्यांसमोर ठेवून गेली सोळा वर्षं ‘अंतर्नाद’ मासिक नियमितपणे आणि वेळेवर वाचकांपर्यंत पोचवण्याचं काम ते करत आहेत.

‘अंतर्नाद’ ची दशकपूर्ती: थोडे प्रकट चिंतन’ ह्या लेखात त्यांनी साहित्याविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘साहित्यासारखा मानवी जीवन अपरंपार समृध्द करणारा आणि त्याच वेळी एक अनिर्वचनीय आनंद देणारा महान ठेवा’ सांभाळण्याच्या ओढीतून ‘वाचकांना वाचायला भरपूर सवड देणार्‍या मासिकासारख्या पोषक माध्यमाची’ त्यांनी जाणीवपूर्वक निवड केली आहे.
दर महिन्याच्या अंक-निर्मितीच्या काळात एकाचवेळी व्यवस्थापकीय-संपादकीय कौशल्यं वापरत असताना, निरनिराळी पुस्तके-मासिके वाचल्यानंतर त्यातील मर्मस्थाने उलगडताना, लेखकांना लिहितं करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करताना, एखाद्या प्रसंगाच्या निमित्ताने अथवा प्रवासात समाजमन न्याहाळताना, त्यांना नवनवीन काही दिसत-सुचत रहातं. पुस्तकाच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे ‘आत दडलेला लेखक’ त्यांना लिहिण्याला उद्युक्त करतो. अशावेळी अंतरात दाटून येणार्‍या भावनांना वाट दाखवण्यासाठी लिहिलेले आणि ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिध्द झालेले तेहतीस लेख ह्या पुस्तकात एकत्रित केले आहेत. ह्या लेखांमध्ये विविधता आहे. जसं की, पुस्तक-परिचय, व्यक्तिचित्रे, इतिहास-कालीन घटनाविशेष, माहितीपर, अनुभव-चित्रण, प्रासंगिक, इ.

चरित्रात्मक पुस्तकाच्या परिचयातून झालेले व्यक्तिचित्रण वाचताना जगप्रसिध्द भारतीय व्यक्तींची ‘माणूस’ म्हणून होणारी ओळख वाचकाला एकाचवेळी संपन्न करते आणि काहीसे अस्वस्थदेखील!
‘प्रकाशाची सावली’ ह्या अनुवादित कादंबरीची सविस्तर ओळख ‘महात्मादेखील माणूस असतो’ ह्या पहिल्या लेखात करून दिली आहे. महात्मा गांधींची तत्त्वनिष्ठा त्यांच्यातील पित्याला स्वत:च्या मुलापासून, हरीलालपासून कसे दूर राखते हे वाचताना आपलाही जीव हळहळत राहतो. विशेषत: गांधीजी आणि कस्तुरबा प्रवास करत असताना कटनी रेल्वेस्थानकावरील प्रसंग वाचून डोळे पाणावतात.
त्याचप्रमाणे लालबहादूर शास्त्रींची आजच्या काळाशी जणू विसंगत वाटणारी सात्त्विकता (शास्त्रीजी: एक सात्त्विक, समंजस, समन्वयवादी नेता), डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ह्यांची जाज्वल्य आत्मनिष्ठा (‘ज्ञानकोशकार केतकर: आत्मनिष्ठा, कार्यनिष्ठा, समाजनिष्ठा’) आणि त्यांचे मृत्यू मनाला चटका लावतात.
रुसी लालांनी संवाद आणि डायर्‍यांतील नोंदी ह्यांवर आधारित `The Joy of Achievement: Conversations with JRD Tata' हे पुस्तक लिहिले. त्याविषयीच्या लेखात (‘जे. आर. डी. टाटा: यशप्राप्तीतला निखळ आनंद’) आपल्या व्यावसायिक जीवनासाठी जेआरडींनी स्वीकारलेली पाच मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्यातून जे. आर. डीं.ची व्यावसायिक जीवननिष्ठा अधोरेखित होतेच. शिवाय ह्या तत्त्वांचा पाठपुरावा करणे आजच्या जागतिकीकरणाच्या काळातही अत्यावश्यक असल्याचे जाणवते.
‘रविंद्रनाथ: एक सौंदर्ययात्री’ लेखातील गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर आणि म.गांधी ह्यांच्या भेटीची कहाणी मुळातूनच वाचायला हवी. लेखकाला व्यक्तिश: भावलेला गुरुवर्य रविंद्रनाथ टागोरांचा गुणविशेष, सौंदर्यपूजन आपल्याही मनावर जादू करतो.
‘असेन मी, नसेन मी!’ ह्यातून आरपार भेटणार्‍या शांताबाई शेळके, ‘शूल आणि अरुण भाटिया’ ह्यातून भेटणारे, प्रशासनातील भ्रष्टाचाराविरुध्द लढा देणारे पुण्याचे वादग्रस्त कलेक्टर अरुण भाटिया, भारतीय विदेशसेवेतील ज्ञानेश्वर मुळे ह्यांनी गाठ घालून दिलेला ‘जपान मारुती’ ही व्यक्तीचित्रणेदेखील उल्लेखनीय आहेत.

ऐतिहासिक क्षण जागवणार्‍या ‘ब्रायटनची छत्री’, ‘इलेक्ट्रिक टेलिग्राफने आम्हांला वाचवले’, ‘एका मंतरलेल्या क्षणाची आठवण’, ‘असाही एक भारत-भाग्यविधाता’ ह्या लेखांमुळे स्वातंत्र्यपूर्व इतिहासकालीन घटनांविषयीचे आपले कुतूहल जागे होते. ‘अतिरेक्यांच्या तावडीत पंचेचाळीस दिवस’ लेखातील काश्मिरच्या वाखलू पती-पत्नीचा अनुभव वाचताना नकळत आपला श्वास रोखला जातो.
काही लेखांत देश-विदेशातील मासिके-नियतकालिकांची (इंडिया टुडे, रीडर्स डायजेस्ट) माहिती सविस्तर मांडली आहे. त्यातून उलगडणारा त्यांचा जन्म ते आजवरचा यशस्वी प्रवास, देशी-विदेशी वाचनसंस्कृतीविषयक वैशिष्ट्यांसह वाचणे मनोरंजक आणि माहितीपूर्ण ठरते. ‘मासिक चालवणे हे पूर्णवेळेचे काम आहे’ ही खूणगाठ लेखकाने मनाशी पक्की बांधलेली असल्याने ह्या माहितीतील वेगळेपण जाणवते.

आजच्या दाहक वास्तवाचं चित्रण करणारे ‘पन्नासावा स्वातंत्र्यदिन’, ‘बाजारू संस्कृतीच्या विळख्यात’, ‘प्रत्यक्षाहुनि प्रतिमा अद्भुत’ असे काही लेख, त्याचप्रमाणे ‘दोन अनुभव: शारदेच्या उपासकांसाठी’, ‘नवी आध्यात्मिकता’, ‘कमी बोला-जास्त ऐका’, ‘फुकाचे मुखी बोलता काय वाचे’ हे लेख आपल्याला अंतर्मुख करतात.
‘जगण्याचे बळ वाढवणारा श्वास’, ‘सामाजिक कार्य: माणूसपण जोपासणारा एक स्रोत’, ‘एक संध्याकाळ बेस्ट सेलरच्या सहवासात’ हे लेख आपल्यातील आशावादाला बळकटी देतात.

वाचनाचा अनुभव व्यक्तिसापेक्ष असतो. व्यक्तीच्या जडणघडणीचा परिणाम जसा त्याच्या व्यक्त होण्यावर होत असतो तसाच तो त्याच्या आवडीनिवडींवरदेखील होतो. हे जरी खरे मानले तरी जगण्यातला खरा आनंद नक्की कशाकशात असतो? लेखन-वाचनात की अनुभवांतून थेट शिकण्यात की दुसर्‍यांकडून समजून घेण्यात? ह्या प्रत्येक गोष्टीत आनंद आहे ह्याचा प्रत्यय ह्या पुस्तकाच्या वाचनाने येतो. आपल्या नजरेचा आवाका वाढवण्याचं काम हे लेख करतात.

ह्या पुस्तकाची जाणवलेली काही वैशिष्ट्ये. इंग्रजी उध्दृते लिहिताना त्यातील इंग्रजी उच्चारांसह लिहिलेली मराठी भाषांतरे, सर्व काही थोडक्यात आणि चटपटीत करण्याच्या मोहात न अडकता दिलेली लेखांची लांबलचक आणि अर्थपूर्ण शीर्षके. काही लेखांची तत्कालिकता लक्षात घेऊन लेखाच्या शेवटी लिहिलेल्या, अलिकडील परिस्थिती दर्शवणार्‍या तळटीपा!
‘अंतर्नाद’च्या सभासदांना पुन:प्रत्ययाचा आनंद देत आणि नवीन अथवा सभासद नसलेल्या वाचकांना नव्याने माहिती करून देत हे लेख कोणताही आव न आणता, एकीकडे समाज-प्रबोधनाचं कार्य रंजक पध्दतीने करतात.
नियतकालिकासाठी लिहिलेले आणि तत्कालिन-विशेष असलेले लेख पुस्तकाच्या निमित्ताने एकत्र केलेले आहेत. ह्या लेखांमध्ये एकच एक आशयसूत्र नाही. मात्र त्यांच्या अभिव्यक्तीतील अस्सलपणा आपल्या मनाला थेट भिडतो.
ते वाचल्यानंतर मनावर उमटणारा ठसा असतो, सामाजिक बांधिलकी जपणार्‍या लेखक-संपादकाचा आणि वाचकाला सतर्कपणे जगण्यासाठी भान जागवण्याचे आवाहन करणार्‍या सुजाण-जागरुक नागरिकाचा!

चित्रा राजेन्द्र जोशी.

ईमेल: chitrarjoshi@gmail.com

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

भानू काळेंचं 'अंतर्नाद'साठीचं योगदान मोठं आहे हे खरेच.. खुद्द त्यांच्या लेखांच संकलन वाचायलाच हवं असं वाटलं..
लायब्ररीत पुस्तक दिसलं तर नक्की वाचेन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चित्रा,

हा तुझ्या लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा दुवा

एका अप्रतिम पुस्तकाचे तू सुरेख रसग्रहण केले आहेस.
अंतर्नादमुळे भानू काळे सर्वांना माहिती आहेतच. पण 'अंतरीचे धावे' हे पुस्तक मुळातूनच वाचावे असे आहे.
बुकगंगा या साईटवर या पुस्तकाची काही पाने वाचता येतात. हा तो दुवा

अवांतर : अंतर्नाद २००६ मधे दिवाळी अंकात प्रकाशित झालेली उत्कृष्ट पुस्तकांची यादी

एका सुरेख पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकसत्ताची ही लिंक.

लेख वाचून प्रतिक्रिया सवडीने देते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.