भारताची "अग्नि"परिक्षा (भाग-१)

भारताची "अग्नि"परिक्षा (भाग-१)
मूळ लेखक: रॉबर्ट काप्लान
स्वैर अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)

१९ एप्रिल रोजी भारताने लांब पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी करून सध्याच्या सुरक्षा परिषदेतील इतर सभासदांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या "पंक्ती"ला बसायचा सन्मान मिळविला! अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनविण्याची क्षमता फक्त पाचच राष्ट्रात आजपर्यंत होती: अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, आणि चीन. आता आपण सहावे असे राष्ट्र झालेलो आहोत. (शिवाय नेहमीप्रमाणे "इस्रायल" हे नांव कंसात असतेच, खरे-खोटे देव जाणे!)

परवा यशस्वी चांचणी केलेले प्रक्षेपणास्त्राला अग्नि-५ या नावाने ओळखले जाते! या आधी आग्नि-१ ते अग्नि-४ अशा संज्ञांच्या चार प्रक्षेपणास्त्रांची चांचणी करण्यात आलेली आहे. या सर्व प्रकारच्या प्रक्षेपणास्त्रांची थोडक्यात माहिती या लेखाच्या दुसर्‍या भागात तक्ता-१ मध्ये दिलेली असून विस्तृत माहितीसाठीचे दुवे तक्ता-२ खाली दिलेले आहेत.

या यशस्वी चांचणीवर अनेक देशांच्या सरकारांतर्फे तसेच प्रसारमाध्यमांतर्फे वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी Stratfor या नियतकालिकातील भारत चीन यांच्यातील कडवी स्पर्धा हा रॉबर्ट काप्लान यांचा लेख उल्लेखनीय वाटला म्हणून त्या लेखाचा स्वैर अनुवाद खाली देत आहे.

चीनच्या बीजिंग व शांघाई शहरावर अण्वस्त्र हल्ला करू शकणार्‍या आपल्या लांब पल्ल्याच्या अग्नि-५ या प्रक्षेपणास्त्राच्या भारताच्या यशस्वी चांचणीनंतर भारत व चीन यांच्यामधील एक नवी सत्तास्पर्धा प्रकाशझोतात आलेली आहे. हे दोन देश एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि संपन्न संस्कृती या दृष्टीने आशिया खंडातील प्रमुख देश आहेत.

ही स्पर्धा केवळ अत्युच्च तंत्रज्ञान आणि भौगोलिक राजकारणावर (geopolitical) आधारित असून त्यातून या दोन महासत्तांमधील स्पर्धेत पायाभूत विसंगती आहे हे दिसून येते. आजवर या दोन मोठ्या राष्ट्रांच्या भौगोलिक विस्ताराच्या सीमा कधीच एकमेकांना ओलांडत नव्हत्या किंवा त्यांच्यात कुठल्याही तर्‍हेचा वाद नव्हता. ५० वर्षांपूर्वी हिमालयाच्या सीमारेषेवर मर्यादित लढाई झाली असली तरी तिच्यामागे पूर्वापार चालत आलेला ऐतिहासिक किंवा वांशिक खुन्नस नव्हता.

भारत आणि चीन यांच्यामधील भौगोलिकदृष्ट्या लक्षवेधक गोष्ट म्हणजे त्यांच्यामधील हिमालयाची अभेद्य भिंत! बुद्ध धर्माचा प्रसार जरी भारतामधून चीनमध्ये झालेला असला तरी तो श्रीलंका व म्यांमारमार्गे दक्षिण चीनच्या युनान प्रांतामधून झाला. (नकाशा पहा) एरवी या दोन देशात सांस्कृतिक अशी देवाणघेवाण अपवादानेच झालेली आहे.

पश्चिमेकडील काश्मीरपासून ते पूर्वेकडील अरुणाचलप्रदेशपर्यंतच्या सीमा आखणीवरून दोन्ही देशात तणाव असला तरी या नव्याने सुरू झालेल्या स्पर्धेच्या मुळाशी हा सीमावाद आहे असे वाटत नाहीं. या नव्या स्पर्धेच्या कारणाचे मूळ आहे शस्त्रास्त्रांबाबतच्या नव्या तंत्रज्ञानामुळे या दोन देशांतील प्रत्यक्ष अंतर बदलले नसले तरी "परिणामकारक" अंतर अचानक कमी झाले हे आहे.

तिबेटच्या विमानतळावरील चिनी लढाऊ जेट विमाने भारतावर हल्ले करू शकतात हे खरेच आहे. भारतीय उपग्रहसुद्धा अंतराळातून चीनवर पाळत ठेऊन असतात. या खेरीज हिंदी महासागरात चीन अनेक ठिकाणी अद्ययावत बंदरे विकसित करीत असताना भारत आपल्या नौदलाच्या लढाऊ नौका दक्षिण चिनी समुद्रात पाठवू लागला आहे. म्हणजेच भारत व चीन एकमेकांचे दक्षतापूर्वक निरीक्षण करीत आहेत.दिल्ली आणि बीजिंग येथील युद्धाचे डावपेच आखणारे विशेषज्ञ आता संपूर्ण आशियाखंडाचे नकाशे उलगडून बसले आहेत. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि वेगात लष्करीकरण करत असलेले हे दोन आशियाई देश एकमेकांच्या प्रभावक्षेत्रांवर अतिक्रमण करीत आहेत हे अगदी स्पष्टपणे दिसत आहे. आणि ही प्रभावक्षेत्रे पूर्वी कधीही नव्हती इतकी आता स्पष्ट, रेखीवपणे दिसू लागली आहेत.

केनया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यांमार येथील बंदरविकासाच्या प्रकल्पांतून चीनच्या आर्थिक प्रभावक्षेत्राची होत असलेली वाढ त्या देशाच्या हिंदी महासागर क्षेत्रातल्या वाढत्या प्रभावाची द्योतक आहे आणि याचीही भारताला चिंता आहे.

ही तेढ त्यांच्या प्रचंड लोकसंख्येमुळे आणि युरोप-आशियाच्या नकाशावरील त्यांच्या परस्पर भौगिलिक स्थानामुळे निर्माण झालेली असून त्यात भावनेच्या पोटतिडिकेचा लवलेशही नाहीं. या दृष्टिकोनातून पाहिल्यास भारत-चीन स्पर्धेची तूलना अमेरिका-रशियाच्या शीतयुद्धकालीन भावनारहित स्पर्धेशी करता येईल.

भारत-चीनमधील त्यामानाने काबूत ठेवलेल्या स्पर्धेबद्दलचे निराळेपण तिची तूलना भारत-पाकिस्तान स्पर्धेबरोबर केल्यास लक्षात येईल. भारतातील भरपूर लोकसंख्या असलेले गंगा नदीचे खोरे पाकिस्तानच्या भरपूर लोकसंख्या असलेल्या सिंधू नदीच्या खोर्‍यापासून केवळ ५०० किमीवर आहे. अशा तर्‍हेची जी भौगोलिक जवळीक भारत-पाकिस्तान स्पर्धेत दिसते ती भारत-चीन स्पर्धेत नाहीं. धार्मिक घटकामुळे जणू भारत-पाकिस्तान स्पर्धेच्या आगीत तेल घातल्यासारखे होते. उत्तर भारताच्या इतिहासातील भारतावर केलेल्या मुस्लिम चढायांतून पाकिस्तानचा एका आधुनिक अवताराच्या रूपात पुनर्जन्म झालेला आहे असा समज पाकिस्तानात आहे. त्यात भारतीय उपखंडाच्या फाळणीच्यावेळी झालेल्या रक्तपातामुळे ही स्पर्धा आणखीच उत्कट आणि भावनावश बनली आहे.

भारत-चीन स्पर्धेत अशा तर्‍हेची अनेक शतके चाललेली भावनोत्कटता नसल्यामुळे या स्पर्धेमुळे धोरण आखणारे दिल्लीतील उच्चभ्रू लोक एका बाजूने खुष आहेत कारण चीनसारख्या एक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर असलेल्या राष्ट्राबरोबर भारताची तूलना करण्यात येऊ लागल्यामुळे भारताची शान वाढली आहे असे त्यांना वाटते. आधी भारताबरोबर नेहमी दरिद्री आणि अराजकतेने बजबजलेल्या पाकिस्तानचे नाव जोडलेले असायचे. भारतीय उच्चभ्रूंच्या मनात चीनबद्दल झपाटल्याची भावना आहे. त्या मानाने चीनच्या उच्चभ्रूंना भारताचे इतके महत्व वाटत नाहीं. हे सहाजीकही आहे कारण ही स्पर्धा दोन तोडीच्या राष्ट्रांमधील स्पर्धा आहे व त्यात कमी ताकतीच्या राष्ट्राला बलवान राष्ट्राबद्दल झापटल्यासारखे वाटतेच. ग्रीस व तुर्कस्तानमध्ये अशाच तर्‍हेची असमान स्पर्धा आहे.

भारताच्या संदर्भात चीनची स्वाभाविक, अंगभूत ताकत ही केवळ चीनची भक्कम आर्थिक कुवत किंवा जास्त कार्यक्षम चिनी सरकार नसून त्यात भूगोलाचाही अंतर्भाव होतो. वंशाने "हान" जातीची बहुसंख्य चिनी प्रजा चीनच्या शुष्क पठारी भागात वसलेल्या आणि "हान" नसलेल्या अल्पसंख्य चिनी प्रजेने वेढलेली आहे. त्यात आतला (Inner) मंगोलिया, उइघूर तुर्क आणि तिबेट येथील जनतेचा समावेश होतो. त्याचबरोबर चीन सध्या आपल्या सीमेवरील त्याला धोकादायक वाटणार्‍या राष्ट्रांबरोबरचे तंटे सोडविण्याच्या मागे आहे आणि म्हणूनच चिनी सरकारने अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेवर नियंत्रण रहावे म्हणून या (हान नसलेल्या) अल्पसंख्यांकाना चीनमध्ये सामावून घेतले आहे.

या उलट केवळ अस्थिर, अस्वस्थ पाकिस्तानच नव्हे तर नेपाळ, बांगलादेश यासारख्या कमजोर राष्ट्रांबरोबरच्या खूप लांबीच्या आणि असुरक्षित अशा सीमांचा भारताला उपद्रव आहे. कारण या राष्ट्रांकडून भारताला निर्वासितांच्या रूपाने उपद्रव होतो. या खेरीज पूर्व आणि मध्य भारतात माओवादी नक्षली बंडाळीची डोकेदुखीही आहेच. परिणामत: भारत आपल्या नौसेनेद्वारे हिंदी महासागरात जरी आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत असला व चीनविरुद्ध एक तर्‍हेची तटबंदी उभी करत असला तरी भारतीय लष्कराला वर उल्लेखलेल्या देशांबरोबरच अंतर्गत समस्यांमुळे एक तर्‍हेची बंधने आहेतच.

नेपाळ, बांगलादेश, म्यांमार आणि श्रीलंका या देशावरील प्रभावासाठी चीन आणि भारत आपापसात एक प्रकारे खेळत असतातच. तसे पाहिल्यास हे सर्व देश भारतीय उपखंडात मोडतात म्हणजेच चीन आपला संघर्ष भारताच्या अंगणात आणू पहात आहे.

अफगाणिस्तानचे भवितव्य ज्याप्रमाणे भारताच्या दृष्टीने एक निर्णायक कसोटी ठरणार आहे त्याचप्रमाणे उत्तर कोरियाचे भवितव्य हे चीनसाठी निर्णायक कसोटी ठरणार आहे. हे दोन्ही देश भारताच्या आणि चीनच्या शक्तीला आणि साधनसंपत्तीला एक प्रकारची सततची गळतीच आहेत. पण इथे भारताची अफगाणिस्तानबरोबर सीमा नसल्यामुळे तो सुदैवी आहे. या उलट चीन आणि उत्तर कोरिया यांच्यात सामायिक सीमारेषा आहे. अमेरिकेने सैन्य बाहेर काढल्यावर जो हलकल्लोळ अफगाणिस्तानात माजेल त्याचा भारतावर कमी परिणाम होईल पण उत्तर कोरियाच्या सत्तेचा गुंता सोडविताना चीनवर प्रचंड परिणाम होईल कारण कोट्यावधी निर्वासित चीनच्या मांचूरिया भागात घुसण्याची शक्यता आहे.

२०३०च्या सुमारास भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होईल पण भारतीय लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण चीनपेक्षा जास्त असेल. त्यामुळे भारताचे भवितव्य जास्त उज्ज्वल वाटते. भारताची लोकशाही कितीही अकार्यक्षम असली तरी तिला मूलभूत कायदेशीर "औरसपणा"च्या समस्येला तोंड द्यावे लागत नाहीं. पण चिनी सरकार हुकुमशाही मार्गाने सत्तेवर आलेले असल्यामुळे चीनला औरसपणाच्या मूलभूत समस्यांना तोड द्यावे लागू शकेल.

शेवटी प्रश्न रहातो तिबेटचा. भारत आणि चीन यांच्यातील टक्कर हिमालय पर्वताच्या सीमेवर भिडली आहे व त्यात तिबेट भारतीय उपखंडाच्या सीमेवर एकाद्या धक्काशोषकासारखा (buffer, shock-absorber) उभा आहे. त्याचा भौगोलिक फायदा भारताला मिळतो.

चीनचा तिबेटवरील प्रभाव कमी झाल्यास त्याचा भौगिलिक आणि राजकीय फायदा भारताला मिळेल. भारताने तिबेटच्या दलाई लामाला राजाश्रय दिलेला आहे. तिबेटमधील चीनविरोधी उघड असंतोष चीनच्या दृष्टीने गैरसोयीचा आहे तर त्याचा भारताला फायदा आहे. जर चीनला तिबेटमध्ये गंभीर उठावाला तोंड द्यावे लागले तर भारताचा तेथील प्रभाव दिसू येण्याइतका सुधारेल. थोडक्यात चीन आज जरी जास्त मोठी सत्ता वाटत असला तरी या स्पर्धेत भारताच्या बाजूनेसुद्धा अनेक अनुकूल घटक आहेत.

भारत आणि अमेरिका आज औपचारिक रीत्या मित्रराष्ट्रे नाहींत. समाजवादकडे झुकणारे आणि राष्ट्रवादी असलेले भारतीय राजकीय नेतृत्व असे कधीही होऊ देणार नाहीं. पण युरोप आणि आशियाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या हिंदी महासागराच्या किनार्‍यावरील भारताच्या स्थानामुळे भारताची लष्करी आणि आर्थिक वाढ अमेरिकेच्या दृष्टीने फायद्याची ठरते कारण भारत चीनला प्रतिशह देऊ शकतो. आज अमेरिका पश्चिम गोलार्धात एक प्रभावी महासत्ता आहे आणि म्हणूनच पूर्व गोलार्धात दुसर्‍या एकाद्या महासत्तेचा उदय तिला नको आहे. भारत चीनला तोडीस तोड बनल्यास एक जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या डोक्यावरील बोजा कमी होईल व ही एक भारत-चीन स्पर्धेतील जमेची गोष्ट आहे! (पुढील मजकूर भाग-२ मध्ये दिलेला आहे.)

Stratforवर प्रसिद्ध झालेला मूळ इंग्लिश लेख खालील दुव्यावर वाचता येईल:
http://www.stratfor.com/analysis/india-china-rivalry-robert-d-kaplan?utm...

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

ऐसी अक्षरेवर लेखकाचं स्वागत.

लेख वाचला. आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या सामान्यज्ञानाला/सर्वमान्य असलेल्या विश्वासांना तडा जाईल अशी विधानं त्यात आढळली नाहीत. आशियातल्या भू-राजकीय (जिओपोलिटिकल) सर्वमान्य सत्याचंच दर्शन त्यात आहे. मात्र, भारत आणि चीन या देशांची "ही प्रभावक्षेत्रे पूर्वी कधीही नव्हती इतकी आता स्पष्ट, रेखीवपणे दिसू लागली आहेत." हे मात्र विशेष वाटलं.

असेच तुमचे लेख यावेत ही सदिच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ऐसी अक्षरेवर स्वागत!
अनुवाद चांगला झाला आहे. देशोदेशींच्या लेखकांचे दृष्टीकोन आमच्यापर्यंत असेच चिकाटीने पोचवण्याचे हे उत्तम कार्य चालु राहो ही सदिच्छा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुधीर काका,

नेहमीप्रमाणेच तुमचा हाही लेख सुंदरच झाला आहे. Smile

माझी थोडी मते:

अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनविण्याची क्षमता फक्त पाचच राष्ट्रात आजपर्यंत होती: अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, आणि चीन. आता आपण सहावे असे राष्ट्र झालेलो आहोत. (शिवाय नेहमीप्रमाणे "इस्रायल" हे नांव कंसात असतेच, खरे-खोटे देव जाणे!)

याचे एकमेव कारण अमेरिका समजले जाते. कारण अमेरिकेकडे जी जी क्षेपणास्त्रे आहे ती ती सर्व इस्त्रायल केव्हाही उभी करु शकते. अमेरिकेचे इस्त्रायलप्रेम जगापासून लपून राहिलेले नाहियेच. पण इस्त्रायल एक ना एक दिवस अमेरिकेला प्रचंड अडचणीत आणणार आहे हे नक्की.

दुसरे असे की अमेरिका ही सध्या स्वतः आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे भारताला चीनच्या विरोधात समर्थपणे उभी करण्यात असमर्थ आहे. सध्या केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात या तत्त्वावर अमेरिका सध्या भारताला नाचवायचा प्रयत्न करतो आहे. पण भारताच्या अर्थतज्ज्ञांनी अलिकडेच एफडीआय ची गुंतवणूक कधी नव्हे तेवढी सोपी करुन अमेरिकेला एक प्रकारचा इशाराच दिला आहे की भारतातली गुंतवणुक आर्थिक झाली तरच भारत तुमचा मित्र असेन. या पार्श्वभूमीवर अमेरिका भारतीय कंपन्यांकडून व्हिसाची अवास्तव फी, आयटी कंपन्यांवर दबाव व नवे कर यांच्याद्वारे पैसा मिळवण्याच्या मागे लागला आहे तर अशा गोष्टींना आळा बसावा असा भारताचा छुपा हेतू असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रभावक्षेत्र म्हणजे नक्की काय? आसपास अशी प्रभावक्षेत्र असण्याचा काय फायदा असतो? ही राखण्यासाठी देशांचा प्रचंड खर्च होतो. साधारण अंदाज - जीडीपीच्या साधारण एक टक्का. (भारताचं संरक्षण बजेट जीडीपीच्या २.३% आहे, तेव्हा त्यातलं पाव ते निम्मं या कारणासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या जात असावं असा अंदाज) हा पैसा वसूल कसा होतो? की यात फायद्यापेक्षा तोटा वाचवणं हा उद्देश असतो? यामागच्या अर्थकारणाविषयी जाणून घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रभावक्षेत्राचे मह्त्वः- आर्थिक्,सामरिक्,राजकिय्/प्रशासकिय

प्रभावक्षेत्राची विविध रुपे:- (किम्वा प्रबहवक्षेत्र असणे म्हणजे कसे संबंध असणे?)
१. प्रत्यक्ष तळ्,सैन्याचा वावर, (उदा:- चीन्-म्यानमार, अमेरिका-क्यानडा, भारत्-भूतान्/सिक्किम व अल्पांशाने बांग्लादेश व लंकाही)
२.राजकारणावर/राज्यकर्त्यांवर अदृश्य पकड (चीन्-म्यानमार्,अमेरिका- अरबी देश, इस्राइल - अमेरिका)
३.तंत्रज्ञानाची जिम्मेदारी वाहवणे व हेरगिरी(भारत -अफगाणिस्तान, पूर्वीचे ब्रिटन्-अमेरिका,महायुध्ह कालीन जर्मनी-इटाली, भारत-लंका)
इतरही अनेक असतील. माझ्या अल्पआकलनानुसार व सुचतील तशी टंकतोय.
४.अमेरिकेचे प्रभावक्षेत्र आहे तसे. आख्ख्या अरबी देशांचे एकत्रित सैन्य नसेल इतके सैन्य(नुसते नाविकदलही) एकट्या अमेरिकेचे आखाताच्या आसपास आहे.
५.आर्थिक गुंत व त्यायोगे हुकुमत(अमेरिकेचे ह्या अर्थाने प्रभावक्षेत्र निम्मे जग आहे.)

प्रभावक्षेत्राचा फायदा:-
१.मोक्याची जागा. प्रतिस्पर्ध्यावर हवे तेव्हा हल्ले करायची धमकी.(साठीच्या दशकात अमेरिकेच्या "अंगणात" कम्युनिस्ट क्यूबामध्ये संहारक क्षेपणास्त्रे उभी करुन यु एस एस आर ने अमेरिकेच्या उरात धडकी भरवली होती. बूच मारली होती.सामान्य अमेरिकन्स कधी नव्हे ते इतके घाबरे घुबरे झाले होते. )
२.संरक्षण (पश्चिमेला अरबी देशांलगत एडनच्या आखातापासून ते इंडोनेशियाच्या जवळ मल्लाक्काच्या सामुद्रधुनीपर्यंत भारतीय नौदलाचा वावर आहे. वेळ पडल्यास पिवळ्या समुद्रातून येणारे कोअणतेही शत्रू नौदल, व्यापार भारत आपल्या किनार्‍यास येण्यापूर्वीच रोखू/झेलू शकतो )
३.आयसोलेशन्/दूरवरची लढाई :- आपल्या भागात प्रत्यक्ष युद्ध होण्याऐवजी शत्रूच्या मुलुखात , न जमल्यास तिसर्‍याच्याच भूमीवर युद्ध खेळायचे. ह्याने युद्धातील होणारा "विनाश" टळतो झालीच तर फक्त "हानी/नुकसान" होते. मुख्य भूभाग सुरक्षित राहतो. ह्यामध्ये अमेरिका भलतीच वाकबगार आहे. मागच्या शतकभरात सर्वाधिक युद्धे करणार्‍या व जिंकलेल्या देशांपैकी हा एक देश आहे. पण ह्याच्या मुख्या भूमीला इतरांच्या मानाने नगण्य हानी पोचली आहे. युद्धात मनुष्यबळ अन पैसा जाणारच, ते ह्यांनी गमावले काही प्रमाणात पण भूभाग कधीच बेचिराख होउ दिला नाही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भरभराटिस पोचलेल्या आख्ख्या युरोपचा विशेषतः जर्मनी,रशिया,ब्रिटन,पोलंड ह्यांचा व पूर्वेकडे जपानचा विध्वंस झाला. कारण युद्धाला वापरली गेलेली भूमी त्यांची होती. अमेरिकेने मात्र त्यामानाने युद्धकाळातही मौज केली.
सध्या भारत - पाकचे परत्यक्ष युद्ध अफगाणिस्तानच्या भूमिवर सुरु आहे. भारत-चीनची तुलनेने रक्तहिन चढाओढ ही नेपाळ्,श्रीलंका इथे सुरु आहे.
४. आर्थिक favor:- खानी, इतर नैसर्गिक स्त्रोत्,मनुष्य बळ ह्यांचा प्रत्यक्ष किम्वा अप्रत्यक्ष access असणे. रशियाला आजही काही पूर्व युरोपीय देशांत असा access आहे. अमेरिका तर आर्थिक गुंत निर्माण व सगल्यांना एकमेकांशी जोडून स्वतःच्या हिताचे जागतिकीकरण करत आहे. ऑस्ट्रेलिया काय जर्मनी-फ्रान्स-ब्रिटन्-जपान काय सगळेच असे ना तसे अमेरिकेत गुंतलेले आहेत. एका अर्थाने थोड्याफार प्रमाणात ही अमेरिकेची प्रभावक्षेत्रे आहेत. आफ्रिकेतील काही देश म्हणजे चीनचे प्रभावक्षेत्र बनू पहात आहे.

प्रभावक्षेत्र भलतेच असंतुलित झाले तर एखादा हिटलर सहजगत्या* आसपासची राष्ट्रे घशात घालतो. त्याच्या आसपासच्या प्रभावक्षेत्रात ग्रीस्,ऑस्ट्रिया,युगोस्लाविया,पोलंड ही कुणी म्हणजे कुणीच स्वतंत्र उरली नाहित. दिली धमकी, केला हल्ला अन घेतला देश असे उद्योग त्यानं केले. हे तो का करु शकला? बर्‍यापैकी लष्करी सामर्थ्य तर होतच, पण नाझी जर्मनीचं प्रभावक्षेत्रही विस्तारत होतं. जर्मनांना अनुकूल असा काहीएक वर्ग ह्या सर्व ठिकाणी प्रशासकीय सेवेत्,राजकारणात होता. मग भलेही तो त्यांच्या भीतीनं गाळण उडालेल्या पैकी असो, त्यांच्या वैभावानं/सामर्थ्यानं दिपून गेलेला असो किंवा निव्वळ स्वतःच्या स्वर्थासाठी का असेना त्यांना अनुकूल भूमिका घेणारा असो.
कित्येक मोक्याच्या जागा हिटलरने आधीच बळकावल्या होत्या. त्याचं (शाद्बिक आर्थाने, जसेच्या तसे) "प्रभावक्षेत्र" विस्तारले होते. उदा:- र्‍हाइनलँड हा निर्लष्करी करण्यात आलेला व उत्पन्न फ्रान्सला देण्याचे कबूल केलेला जर्मनी-फ्रान्स सीमेजवळील भूभाग थेट त्याने ताब्यात घेतला. हा भूपट्टा लष्करी दृष्ट्या महत्वाचा ठरणारच पण त्याशिवाय त्यात कित्येक खनिजांच्या खाणीही होत्या. खाणी आल्या म्हणजे युद्धसामुग्रीचा कच्चा माल आला. लढायची ताकद वाढली. शांतता काळात हाच कच्च्चा माल विकासकामाचे स्वस्तातले भांडवल ठरतो.
सध्या म्यानमार्,उत्तर कोरिया हे देश सरळसरळ चीनच्या प्रभावक्षेत्रात आहेत. त्यांचा favor हा चीनला मिळतो. भरपूर खनिजे मिळतात. ही एक बाब.
दुसरी गोष्ट म्हणजे मोक्याच्या जागा मिळवणे. उत्तर कोरिया, म्यानमार ह्यांच्यातही लष्करी प्रभाव कायम ठेवल्याने जवळच्याच जपान्,तैवान,दक्षिण कोरिया,विएतनाम ह्यांच्यावर वचक ठेवता येतो. जमल्यास कधीमधी दादागिरी करता येते. अगदिच वेळ पडली तर थेट ह्यांची नाकेबंदी करून एखाद्या देशाला उपासमारीची धमकी देता येते.
पाकिस्तानमध्ये चीन ग्वादार बंदर उभारत आहे. त्यांनी जाहिर करो न करो, व्यूहात्मक दृष्टीने त्याचा ते भारताविरुद्ध दबावतंत्रात वापर करणार हे नक्की. तिथून भारताच्या पश्चिम किनारपट्टिला विशेषतः मुंबै व इतर महत्वाच्या बंदरांना कधीही हानी पोचवायची हूल उठवता येते. ह्याचा फायदा टेबलावरील वाटाघाटित करुन घेता येतो. वाटाघाटी म्हणजे "वाटा आपल्याकडे अन् घाटा भारताकडे" असे ते आरामात करु शकतात.
उत्तर म्हणून मग भारत चबाहर बंदर इराण मध्ये विकसित करु लागतो.म्हणजेच आमची पश्चिम किनारपट्टी व त्याला लागून असलेला अरबी समुद्र हे आमचे "प्रभावक्षेत्र" आहे असे भारत म्हणू शकतो.
वेळेअभावी इतकेच. परतल्यावर सविस्तर टंकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अतिशय मुद्देसूद मांडणी. सगळीच राष्ट्रं इतरांना आपल्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न करतात हे दिसतं आहे. या सर्व भू-राजकीय बाबतीतली मुरब्बी मंडळी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नेमलेली असावीत, व त्यांना प्रशिक्षणही दिलं जात असावं. आपल्यासारख्यांनी या महाकाय बुद्धीबळाच्या खेळाकडे अचंब्याने बघावं आणि कुठच्यातरी हत्तीच्या पायदळी तुडवलं न जाण्याची आशा बाळगावी, इतकंच रहातं.

प्रभावक्षेत्रांबाबतच्या चढाओढीच्या काही रंजक कथा सांगाव्यात ही विनंती.

राजेश

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोरी, धागा फार दिवसानंतर आत्ताच पाहिला.
या सर्व भू-राजकीय बाबतीतली मुरब्बी मंडळी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नेमलेली असावीत,
हो. they are paid professionals. अगदि ह्यांना अनुकूल मिडिया प्रोपागेंडा करण्यापासून सर्व प्रकारची लॉजिस्टिक्स ह्यांच्याकडे व ह्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडे उपलब्ध असतात.
व त्यांना प्रशिक्षणही दिलं जात असावं.
आयड्या नाही. पण कित्येक धुरंधर हे उपजतच अशा कारवाया करणारे पटाइत म्हणून पुढं आलेत. (त्यांना पुढे संधी देण्यात आली.)

आपल्यासारख्यांनी या महाकाय बुद्धीबळाच्या खेळाकडे अचंब्याने बघावं आणि कुठच्यातरी हत्तीच्या पायदळी तुडवलं न जाण्याची आशा बाळगावी, इतकंच रहातं.

अगदि अगदि. मोजक्या शब्दांत नेमकं मांडलय.

प्रभावक्षेत्रांबाबतच्या चढाओढीच्या काही रंजक कथा सांगाव्यात ही विनंती.
इथे इतर तज्ञ आहेतच; तेच अधिक लिहू शकतील. माझ्याकडे इतका स्टॉक नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दुसर्‍या भागाच्या प्रतिक्षेत आहोत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!