लहानपण देगा देवा!

हल्लीच एका लग्नसमारंभाला गेलो होतो. चकचकीत पॉलिश केलेल्या आकर्षक चेह-याची आणि नखशिखांत नटलेल्या सुबक बांध्याची एक मुलगी तिथं भेटली. ओळख असल्यासारखी इकडचं तिकडचं बोलत राहिली. पण मला ओळखच पटेना. माझा मेंदू संपावर गेल्यासारखा ढिम्म बसून राहिला. शेवटी मी हिय्या करून त्या सुगंधित सुकन्येला विचारलं, ‘मुली, नाव काय तुझं?’

तर ती म्हणाली, ‘उर्वशी शृंगारपुरे.’

आता शृंगार-पुरे या चपखल आडनावाची ही मुलगी मला यापूर्वी कुठे भेटली होती हेच माझ्या ध्यानात येईना. तसंच उर्वशी नावाची अप्सरा पौराणिक वाङ्मयाबाहेर कधीही दिसली नव्हती हेसुद्धा नक्की. काहीतरी घोटाळा होत होता खास. मी तिला भलताच कोणीतरी वाटलो होतो की काय? पण माझ्या मेंदूच्या एका खात्याला हे नाव आठवत नसलं तरी दुस-या एका डिपार्टमेंटला हा चेहरा प्राचीन काळी कुठेतरी पाहिलाय असं वाटत राहिलं. इतक्यात टय़ूब पेटली. चेह-याची ओळख पटली. तारा मारणे! मी तातडीनं विचारलं, ‘शाळेत आमच्या वर्गामध्ये तारा मारणे नावाची एक मुलगी होती. तू बरीचशी तिच्याचसारखी दिसतेस. तिची तू धाकटी बहीण की मुलगी?’

ती मुरका मारत म्हणाली, ‘मीच तारा मारणे. लग्नात नाव बदललं.’

देवाशप्पथ सांगतो, मी तीन ताड उडालो. मग लक्षात आलं की स्त्रिया आपलं वय मुद्दाम कमी करून सांगतात अशी अफवा पसरलेली असली तरी मुळात बायकांचं वय हल्ली तीन-चार वर्षातून एखादंच वर्ष वाढतं. खात्री पटत नसेल तर कोणत्याही सांस्कृतिक समारंभात सावधपणे नजर फिरवा. या उलट आम्हा पुरुषांकडे पहा. कोणाच्या पोटाचं किलगड झालंय, कोणाच्या भाळी चंद्रकोर उगवलीय, तर कोणाच्या माथ्यावर कापसाचं पिक तरारलंय. चेह-यावरून तर प्रत्येक महाभागाचं वय शेंबडय़ा पोरानंही अचूक ओळखावं. पण आमच्या वर्गभगिनी अजूनही दीदी किंवा आँटी हे स्टेटस राखून आहेत. आमच्या घरीही हाच मामला आहे.

बायकोच्या मैत्रिणी माझ्या डोक्यावरच्या सुतरफेणीकडे पाहून तिला विचारतात, ‘अय्या! तू अजूनही वडिलांना सोबत आणतेस? नव-याला बघायचं होतं ग तुझ्या एकदा.’ असो! देव या सगळ्या कन्यारत्नांचं आणि त्यांच्या ब्यूटी पार्लरवाल्यांचं भलं करो. मी तारा-कम-उर्वशीबरोबर टेलिफोन नंबरांची देवाणघेवाण केली. आता महिन्यातून किमान एकदा आम्ही एकमेकांची ख्यालीखुशाली विचारतो.

शाळा सोडून अनेक पावसाळे लोटले. पण ज्यांच्यासोबत संस्कारक्षम बालपणातली दहा-बारा वर्ष काढली त्यांच्याशी नंतर संपर्क ठेवला नाही ही माझी सर्वात मोठी गफलत. ती मान्य केलीच पाहिजे. ‘गेलेलं आयुष्य परत मिळालं तर तुम्ही ते कसं जगाल?’ हा प्रश्न हटकून सुप्रसिद्ध लोकांना उतारवयात विचारला जातो. आणि ‘या जन्मी जसं व्यतीत केलं तसंच ते पुन्हा जगेन’ हे उत्तर हमखास येतं. पण आपण सुप्रसिद्ध वगैरे नसल्यामुळे खरं सांगायला हरकत नाही. ‘पुन्हा चान्स मिळाला तर या आयुष्यात केलेल्या घोडचुका रिपीट करणार नाही’ हे खाजगीत मान्य करण्यात संकोच कसला? आधी शिक्षण, नंतर नोकरी, मग संसार वगरेत गुंतलो होतो अशा लंगडय़ा सबबी देऊन स्वत:चं समाधान करण्यात काही अर्थ नाही.

गेल्या वर्षीच्या झिणझिणत्या हिवाळ्यात मी एकदा माझाच गाल कुरवाळत डेंटिस्टच्या क्लिनिकमधून बाहेर पडत होतो. एक तरतरीत गृहस्थ त्याच दिशेनं येत होता. मला बघून लगेच थांबला. मला वाटलं की त्याच्या बुटाची लेस सुटली म्हणून तो वाटेत अचानक थांबला असावा. माझे बूट अनेकदा अशी गंमत करतात. लगेच थांबून परत बांधली नाही तर तीच लेस पायाखाली येऊन कपाळमोक्ष होण्याचा चान्स असतो. पण तो वाकला नाही. उलट माझ्याकडे पाहून प्रसन्नपणे ओळखीचं हसला. मी अजूनही पूर्वीइतकाच बावळट असल्यामुळे त्याला ओळखलं नाही. ते त्याच्या लक्षात येताच तो म्हणाला, ‘मी अक्षय राजवाडे.’

मग आम्ही भर रस्त्यातच पन्नास वर्षाचा धावता आढावा घेतला. मेडिकलच्या एका ब्रँचचा सुपर-स्पेशालिस्ट होऊन अक्षय अमेरिकेत स्थायिक झाला होता. तो ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होता तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरात मी एकदा ‘सतरा रात्री अठरा दिवस अनलिमिटेड अमेरिका’ टाइपच्या टूरमधून गेलो होतो. माहीत असतं तर मी सहज त्याला भेटू शकलो असतो. चूक माझीच होती. अक्षयने सातासमुद्रापलिकडे राहूनही नाशिक-पुणे-मुंबई त्रिकोणातल्या डझनभर वर्गबंधूभगिनींशी वर्षानुवर्ष संपर्क राखला होता. मुंबईत राहणा-या मला मात्र भविष्यकाळाकडे पळत असताना भूतकाळाचा विसर पडला होता. बोलता बोलता किती वेळ गेला ते कळलंच नाही. अधूनमधून अक्षय हातातल्या बाटलीतलं बर्फाळ मिनरल वॉटर पित होता. हिवाळा असला तरी मुंबईचा असल्यामुळे आणि उभा जन्म अमेरिकेतल्या अतिशीतल वातावरणात काढल्यामुळे अक्षयला तहान लागणं स्वाभाविक होतं. घरी गाळून उकळून शुद्ध केलेलं पाणी अमेरिकेतल्या भारतीय वंशाच्या खास जनतेला मानवत नाही. सीलबंद बाटलीच हवी असते. भारतातलं मिनरल वॉटर म्हणजे बोअरवेलचं प्रक्रिया न केलेलं पाणी असू शकतं ही महत्त्वाची बातमी मी त्याच्यापासून कटाक्षानं दडवून ठेवली.

बाटली रिकामी झाल्यावर अक्षयनं माझा टेलिफोन नंबर घेतला आणि अमेरिकेत परतल्यावर अगत्यानं फोन करून दहा-पंधरा मित्र-मैत्रिणींचे त्याला माहीत असलेले नंबर मला वाचून दाखवले. अर्ध जग फिरून माझ्या कानात शिरलेले ते नंबर टिपून घेताना मी घोटाळा करायचा तो केलाच. त्यामुळे नंतरच्या दहा दिवसात मी अनेक अपरिचित सज्जनांना मनस्ताप दिला. महेंद्र फणसळकरच्या नावासमोरचा नंबर फिरवून माझं नाव सांगितल्यावर एका भल्या गृहस्थानं ‘कितनी बार बोला, कारलोन नही चाहिये.’ असं दरडावून फोन आपटला. फक्त सुनील कदमचा नंबर बरोबर निघाला. एकमेकांचं तोंडी आत्मचरित्र ऐकून झाल्यानंतर त्यानं त्याच वर्गबंधूंचे फोन नंबर परत परत सांगितले. मग मात्र सर्वाशी अचूक संपर्क झाला.

आता रविवारी सकाळी फोनवरून मनसोक्त बातचीत करतो. शाळेतल्या आठवणींना उजाळा देतो. सगळ्यांना मस्तपैकी लहान झाल्यासारखं वाटतं. इतकं की उर्वशी शृंगारपुरेनं आमच्या स्नेहसंमेलनात आवर्जून सांगितलं, ‘मला उर्वशी न म्हणता तुम्ही सगळ्यांनी तारा याच नावानं हाक मारा.’ केसांच्या दोन वेण्या बांधून, युनिफॉर्मचा स्कर्ट घालून, पाठीवर दप्तर घेऊन शाळेत निघाल्यासारखं वाटतं. लहानपण देगा देवा अशी वेगळी प्रार्थना करण्याची मग गरजच उरत नाही.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्तच!

आमच्या पिढीची ह्या फेसबुकामुळे फार सोय झाली आहे. ह्या फेसबुकामुळे सर्व जुने मित्र, जवळ जवळ १५-२० वर्षांनंतर संपर्कात येऊ शकलो.
२१ वर्षांनंतर १०वी च्या बॅचचे गेट टुगेदर फक्त ह्या फेसबुकामुळेच शक्य झाले होते. पण ते नव्हते तेव्हाही भारतातल्या सर्व मित्रांच्या संपर्कात होतो मी तुमच्या मित्राप्रमाणे.

असो, खरच लहानपण देगा देवा असे वाटुन गेले, जुन्या आठावणींना उजाळा मिळून.

- (मनाने अजुनही 'बालिश'च असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त अनुभव.

>शाळेतल्या आठवणींना उजाळा देतो. सगळ्यांना मस्तपैकी लहान झाल्यासारखं वाटतं.
तुमचं शालेय जीवन चांगलं होत म्हणायचं!, आमच्या शाळांमधले जुने मित्र भेटले की जुने हिशोब सोडवित बसतात, तेही मस्तच असतं म्हणा. Smile

हा लेख पण "एक किस्सा - दगड आणि खड्डे" प्रमाणेच रंजक आहे, अर्थात ह्यात विनोदी असे काही नाही, पण (निदान) मला हा लेख मस्त वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रंजक लेखन आहे..
शाळा-कॉलेजे-आधीचा/चे जॉब -बस/ट्रेनमधले सहकारी, नातेवाईक वगैरे अनेक परिचित बनतात. त्यातील अनेकांची अपेक्षा असते की कितीही वर्षांनी समोर आलं तरी याने आपल्याला ओळखावं. बदल हा इतका स्थायी आहे की तो प्रत्येकात झालेला असतो. अशावेळी मी सरळ "नाही ओळखलं बॉ" असं सांगून टाकतो.

मला प्रश्न असा पडतो की त्यांच्याप्रमाणे माझ्यातही बदल झालाय, मग ते मला कसं काय ओळखतात? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त कुरकुरित लेख !
आम्हाला मात्र चे.पु. चा फारसा उपयोग नाही जुन्या मैत्रिणींना शोधायला. कारण बदललेली आडनावे माहीत नाहीत !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0