अजिंठा


अजिंठा झाडांचा...झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला...
लेनापूर फर्दापूरच्या गावंढळ गर्दीतला...
बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला...अजिंठा

नितीन चंद्र्कांत देसाई अजिंठ्यावर चित्रपट काढताहेत म्हणजेच काहीतरी भव्यदिव्य असणार असे अजिंठाचे ट्रेलर पाहिल्या पासुन वाटायला लागले होते. त्यामुळे हा चित्रपट पहावा असे मनात होतेच. पारो आणि मे.रॉबर्ट गिल यांची प्रेमकहाणी. ना. धो महानोरांचे अजिंठा हे महाकाव्य आणि डोक्यात बसलेले अजिंठा. या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपट पाहायची हिंमत आज केली.

चित्रपटाची सुरूवात आम्ही चुकवली त्यामुळे अजिंठ्याचा शोध ब्रिटींशांना कसा लागला वगैरे दाखवले आहे का हे माहीत नाही. सुरवातीलाच एक ब्रिटिश अधिकारी हैद्राबादला, बहुधा निझामासमोर अजिंठ्याच्या लेण्याची महती सांगून रस्ता बांधण्याची परवानगी मागतो. हातोहात एक दुभाष्याही त्याला या कामी दिला जातो. १८२४ ते १८४४ या काळात हे काम पूर्ण होतं आणि या स्थळाचं अनन्यसाधारण महत्व ध्यानी घेऊन ते जतन व्हावं, संवर्धित व्हावं यादृष्टीनं कलेची जाण असलेल्या आणि तरीही मूळ सोजीर असलेल्या मेजर रॉबर्ट गिलची इकडे रवानगी होते. रॉबर्ट इथली लेणी पाहून वेडापिसा होतो. एक संस्कृत-पाली-अर्धमागधी चे जाणकार पंडित आणि निझामाने दिलेला दुभाषा ही चित्रे त्याला अधिक समजाऊन घेण्यासाठी मदत करतात. हे सर्व करताना रॉबर्ट गिलची अजिंठ्याची, इथल्या संस्कृतीशी, त्याद्वारे बुद्धाशी होणारी ओळख आणि या सर्वात त्याची मोलाची साथ देणारी, तसेच प्रेरणास्थान पारो यांची प्रेमकहाणी म्हणजे अजिंठा!
इथं पारोची भूमिका सोनाली कुलकर्णीने केलीय हे सर्वांना ठाऊक आहेच. तिला आदिवासी दाखवताना काळा रंग फासण्याची केलेली कसरत अगदी दिसून येते. तिने अभिनयाचा प्रयत्न बरा केलाय, पण तिच्या मूळ व्यक्तिरेखेतच काहीतरी उणीव असल्याचं जाणवतं. मेजर गिल, फिलीप स्कॉट वॉलेस हा अगदी त्या भूमिकेत फिट वाटतो. आपली भूमिका नीट समजून उमजून केलीय हे चांगलं जाणवतं. दुभाषी झालेल्या मनोज कोल्हटकरने आणि मेजर गिलनेच काय तो मनापासून अभिनय केलाय असं चित्रपटभर वाटत राहतं. आणि हो, आपले अविनाश नारकर राह्यलेच. मेजर गिलला बुद्धाच्या जातक कथा सांगणार्‍या पंडिताची भूमिका त्यांच्या वाट्याला आलीय. तिथे त्यांनी ओव्हरअ‍ॅक्टिंग न करून त्यांचा वावर बर्‍यापैकी सुसह्य केलाय. यावेळी नारकर बाबांची ही उणीव उभ्या आयुष्यात केसाला फणी न लावलेल्या मकरंद देशपांडेंनी इतकी भरून काढलीय की जणू हा त्यांना मिळालेला पहिलाच रोल की काय असं वाटावं.

आपलं आर्ट डायरेक्शन, सेट, स्टुडिओ यासगळ्याच्या माध्यमातून आपली निर्मिती ही भव्यदिव्यच होईल असं वाटून बहुधा नितीन देसाईंनी दिग्दर्शनाकडे दुर्लक्ष केलंय असं हा चित्रपट पाह्यल्यावर वाटतं. चित्रपटाकडे एकूणच पॅकेज म्हणून पाहताना, त्यातल्या अनेक त्रुटी प्रकर्षाने जाणवतात. मी इथे वानगीदाखल काही देतोय, जाणकार राहिलेला प्रकाश टाकतीलच.
१. चित्रपटाच्या सुरवातीस एक होळीचं गाणं दाखवण्यात येतं. त्यात ते गहू-हरभरा मुबलक प्रमाणात पिकल्याचं सांगतात. शब्द अर्थात महानोरांचेच आहेत. पण १८४५ साली अजिंठ्यातल्या आदिवासी/बंजारा समाजातले लोक गहू पिकवत असतील का असा प्रश्न येतोच येतो.
२. लगोलग मेजर गिलला एक शेतकरी एक मोठ्ठासा कॉलीफ्लॉवरचा गड्डा भेट म्हणून देताना आणि तेव्हा त्यांच्याकडे फ्लॉवरचं पीक यायचं याचा पुरावा म्हणून कॉलीफ्लॉवरचे शेतही दाखवून टाकलंय.
३. गावात लोहार आहेत, पण गावातले आदिवासी मात्र बांबूपासून तयार केलेली शस्त्रे वापरतात.
४. १८४५ साली बोगनवेलीची झाडे भारतात होती का? इथे बघावं त्या फ्रेममध्ये फुलं आहेतच, त्यात जिकडेतिकडे बोगनवेलिया बघून हा प्रश्न आल्यावाचून राहात नाही.
५. मध्येच कुठेतरी एक फुलपाखरू गिलकडून पारोकडे आणि पारोकडून गिलकडे फिरतं. हे अ‍ॅनिमेशन अक्षरश: अगदीच हास्यास्पद झालं आहे.

असो. चित्रपट बघताना डोके बाजुला ठेवायचे मान्य. पण कोणी जर आम्ही खुप रिसर्च करुन हा पिक्चर तयार करतोय असे क्लेम करत असेल तर अशा गोष्टी मला खटकतात आणि उरलेल्या पिक्चरची मजा घालवतात. सिनेमा पाहून मनात बरेचसे प्रश्न उद्भवले आणि थोडा गुगल सर्च केला असता रॉबर्ट गिलबद्दल रोचक माहिती मिळाली. त्याचा पणतू की खापरपणतू आयर्लंडमध्ये राहतो आणि २००२ मध्ये तो आपल्या पणजोबांबद्दल माहिती शोधत फिरत होता. त्या बिचार्‍याने हा चित्रपट पाहावा. अर्थात मी महानोरांचे काव्य वाचलं नाहीय, त्यामुळे मूळ कथा काय, त्यावर महाकाव्यात त्यांनी घेतलेलं काव्यात्मक स्वातंत्र्य किती आणि त्यानंतर नितीन देसाईंनी घेतलेली सिनेमॅटिक लिबर्टी कितपत हे मला माहित नाही, तरीही फारशा अपेक्षा ठेवून चित्रपट पाहायला जाऊ नये.

असा चित्रपट पाहिला की "मराठी चित्रपटांना बरे दिवस आलेत का?" अशा वागळे छाप चर्चांना मोठ्याने ओरडून नाही म्हणून उत्तर द्यावे वाटते. मराठी चित्रपटांची विषय निवड नक्कीच वेगळी असते पण एक्झीक्युशन मधे आपण कुठे तरी मागे पडतो. आपले चित्रपट बरे असतात पण त्यात अजून सुधारणांना वाव असतो. भव्यदिव्यतेच्या मागे लागून आपण चित्रपटाच्या बेसिक डीटेलिंग कडे दुर्लक्ष केलं जात आहे. गेल्या काही दिवसात पाहिलेल्या, देउळ, बालगंधर्व, शाळा, गोळाबेरीज, या चित्रपटातून हेच जाणवत आहे. चित्रपट म्हणजे छानशा लोकेशनचा लाँग शॉट, किंवा भव्य दिव्य सेट, दागिने यांचा भडिमारा असा तर आपला गैरसमज होत चाललेला नाही ना?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

साधारण रूपरेखेवरून अमेरिकन संस्कृतीतली समांतर पोकाहोंटास ची कथा आठवली. पाश्चिमात्या व तांत्रिकदृष्ट्या मागास संस्कृतींचा संघर्ष, त्यांच्या प्रतिनिधींचं एकमेकांवर प्रेम जडणं वगैरे खूप साम्यं दिसतात. त्याला अजिंठ्याच्या लेण्यांची पार्श्वभूमी दिली तर जितका सुंदर चित्रपट करता येईल तितका झालेला नाही असं समीक्षेवरून वाटलं.

मात्र काही आक्षेप तितकेसे पटले नाहीत. अमुक काळात अमुक भागात अमुक पीक येत होतं का या प्रकारचे प्रश्न मला तरी इथे महत्त्वाचे वाटत नाही. आदिवासींनी भेट दिलेली भाजी ही फ्लॉवर होती की अजिंठ्याच्या आसपास पिकणारी कंदमुळं याने कथानकात कितपत फरक पडतो? मला खात्री आहे की चित्रपट ती भेट देण्याची भावना प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची अपेक्षा असावी. त्यासाठी तिथे फ्लॉवरसदृश भाजी होती हे मानायला बहुतांश प्रेक्षक तयार असतात. या सस्पेन्शन ऑफ डिसबिलिफमुळेच तर कलाकृतीचा आनंद घेता येतो. नाही तर किती अचूक चित्रण केलं की ते अचूक म्हणावं? या प्रश्नाला अंतच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍या परिच्छेदातला सस्पेन्शन ऑफ डिसबिलिफचा मुद्दा ठीकच आहे. पण त्यातही काही तारतम्य असावेच. म्हणजे लायन किंग मधे सगळे प्राणी बोलतात हे आपण स्वीकारतोच. पण मग शिवाजी महाराजांवरच्या एखाद्या मालिकेत / चित्रपटात महाराज ऑझिंडेनला चहाला बोलावून कपबशीतून आणि टीकोझीमधून चहा सर्व्ह करायला लावत आहेत असं दाखवलं तर ते खटकणारच. आणि एखाद्या चित्रपटाबद्दल एवढा उदोउदो करून लिहिलं जातं, खूप अभ्यास करून चित्रपट बनवला आहे वगैरे बोललं जातं तेव्हा अशा ढोबळ (?) चुका नक्कीच रसभंग करतात.

मूळात या चित्रपटाकडून माझ्या तरी काही फार अपेक्षा नव्हत्याच. त्यात ते सोकुचे रंगीत रूप बघितल्यावर तर हे राम म्हणलंच मी. हा चित्रपट मी बघेन याची किंचित आशा होती ती ही आता अजून थोडी कमी झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

दुसर्‍या परिच्छेदातला सस्पेन्शन ऑफ डिसबिलिफचा मुद्दा ठीकच आहे. पण त्यातही काही तारतम्य असावेच. म्हणजे लायन किंग मधे सगळे प्राणी बोलतात हे आपण स्वीकारतोच. पण मग शिवाजी महाराजांवरच्या एखाद्या मालिकेत / चित्रपटात महाराज ऑझिंडेनला चहाला बोलावून कपबशीतून आणि टीकोझीमधून चहा सर्व्ह करायला लावत आहेत असं दाखवलं तर ते खटकणारच.
सहमत आहे. एवढेच कशाला, शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांबरोबर मिरची-भाकरी खाल्ली असे दाखवले तरी तेही खटकण्यासारखे आहे. महाराजांच्या काळात भारतात मिरची नव्हतीच! कलाकृतीला वास्तवाचे बनियन न घालता कल्पनेचे पारदर्शक सदरे घातले की त्यांमधून इतिहासाची किंचित ओघळलेली छाती आणि तिच्यावरचे कसेसेच पिकलेले ओंगळवाणे केस दिसू लागतात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

कलाकृतीला वास्तवाचे बनियन न घालता कल्पनेचे पारदर्शक सदरे घातले की त्यांमधून इतिहासाची किंचित ओघळलेली छाती आणि तिच्यावरचे कसेसेच पिकलेले ओंगळवाणे केस दिसू लागतात!

आह्हा!!!!!!!!!!!! कं लिवलंय, कं लिवलंय, _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चित्रपट पाहणार नव्हतेच

सोकु ज्युनिअर फक्त नटरंग मधे चांगली वाटली होती
प्रोमोमधूनही काळा रंग फासला आहे स्पश्ट दिसतय
स्मिता पाटील या भूमिकेत ऊत्तम शोभली असती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मला वाटते विचारबुद्धि पूर्णत: टांगून ठेवली - total suspension of disbelief - तरच हा चित्रपट पाहावासा वाटेल. ह्यात वर्णिलेली कथा कधी होऊ शकली असती हे पटण्याच्या पलीकडचे आहे.

इंग्रज अधिकारी, शिपाई, अन्य इंग्रज आणि नेटिव स्त्रिया ह्यांच्यामध्ये संबंध सर्रास असत पण ते उघडपणे मांडण्याचे धैर्य कोणी करू शकत नसे. असे उघडपणे करणारा इंग्रज त्यांच्या समाजातूनच बहिष्कृतासारखा वागवला जाई आणि खडयासारखा वगळला जाई. आसपासच्या इंग्रज समाजापासून बंड करून राहणे अशक्य होते कारण अशा इंग्रजाचे उपजीविकेचे साधनच काढून घेतले जाई आणि त्याची इंग्लंडात परत जाण्यापलीकडे त्याला पर्याय उरत नसे.

अमेरिकेमध्ये ज्याप्रमाणे आपले वरचे स्थान वापरून काळे गुलाम ठेवणारे गोरे लोक काळ्या स्त्रियांशी संबंध ठेवत पण त्याची वाच्यता होऊ देत नसत तशा प्रकारचेच संबंध हिंदुस्तानातील इंग्रजहि त्यांच्याशी सहज संपर्कात येणार्‍या आया, मेहतरणी, मेमसाहेबांना घरकामात मदत करण्यासाठी नेमलेल्या स्त्रिया अशांशी चोरूनमारून संबंध ठेवत असत पण त्यात 'रोमँटिक अँगल' नसून लैंगिक भूक शमवणे हाच हेतु असे आणि तो हेतु साध्य करणेहि अवघड नसे.

ह्या संस्थळावर रॉबर्ट गिलची खूप माहिती उपलब्ध आहे. अजिंठा सिनेमाच्या सर्व काळात फ्रान्सेस रिकर्बी नावाच्या पत्नीशी त्याचा विवाह चालू होता. फ्रान्सेस रिकर्बीबरोबर त्याचा विवाह १८४१ साली झाला आणि रॉबर्ट १८७९ मध्ये मृत्यु पावेपर्यंत ते लग्न टिकून होते. १८४२, १८४३, १८४५, १८४७ आणि १८४९ ह्या वर्षांमध्ये आपल्या प्रेमवीराला लग्नाच्या बायकोपासून घडयाळाच्या ठोक्यांच्या नियमितपणे मुले पण होत होती.

मधल्या काळात १८४५त पारोशीहि त्याचा संबंध आला होता. ती जवळच्याच भागातील महादेव कोळी जातीची होती. त्या संबंधाचे वर्णन वरील संस्थळावर 'विवाह' असे करण्यात आले आहे पण ते नाइलाजामुळेच आहे हे खाली टीप ७ मध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. (Software दुसरे काही वर्णन घेण्यास असमर्थ असल्यामुळे 'विवाह' असे वर्णन करावे लागले.) पारोला ह्यासंबंधापासून काही अपत्य झाले असल्यास त्याची नोंद नाही. हेहि तत्कालीन विक्टोरियन नीतिमत्ता संकल्पनांना धरूनच आहे कारण ती मुले काळी असणार आणि गोरा इंग्रज बाप त्यांचे पितृत्व उघड उघड कधीच मान्य करणार नाही. पारोचा मृत्यु १८५६ मध्ये झाला.

पारोच्या मृत्यूच्या पुढेमागे १८५६ मध्येच रॉबर्टने अ‍ॅन नावाच्या बाईशी संबंध ठेवले. (वरील कारणासाठीच विवाह न करताच.) ती मिश्र वंशाची असावी आणि त्यामुळे तिची मुले इंग्लंडमध्ये खपण्याइतपत गोरी असावीत आणि म्हणून ती इंग्लंडात गेलेली दिसतात. (असेहि होऊ शकत असे. काही बापांना आपल्या अनौरस संततीबाबतहि माया असे आणि त्यांना इंग्लंडात घेऊन जाणे, कमीतकमी त्यांच्यासाठी हिंदुस्तानात मृत्युपत्रात तरतूद करणे अशा गोष्टी घडत असत.)

हे सर्व इतक्या विस्ताराने लिहिण्याचे कारण असे की चित्रपटात काहीहि प्रियकर-प्रेयसी प्रकारचे गोडगोड नाते रंगविले असले तरी वस्तुस्थितीत ते पारोच्या बाजूने तारुण्यसुलभ इच्छा आणि अगतिकता, तसेच रॉबर्टच्या बाजूने सहज उपलब्ध लाभ पदरात पाडून घेणे एव्हढेच असावे कारण हेच तत्कालीन समाजस्थितीला आणि इंग्रज-नेटिव संबंधांना धरून आहे.

पारोबाबत रॉबर्टला जे काही वाटत असेल ते उघड दाखविण्याचे धैर्य त्याच्यात नव्हते ह्याचा पुरावा उपलब्ध आहे. पारो १८५६ मध्ये वारली आणि तिचे दफन अजंठयाच्या परिसरात करण्या आले आहे. कबर अजूनहि टिकून आहे असे दिसते. कबरीवर “To the memory of my beloved Paroo who died 23rd May 1856” असा लेख आहे आणि तो रॉबर्टनेच लिहून घेतला असावा. पण स्वतःचे नाव त्याखाली घालण्याचे धैर्य त्याने दाखविलेले दिसत नाही. कसे दाखविणार? त्याची सगळी अजंठा करीयर तिथेच संपली असती. त्याला कोठल्याहि मेसमध्ये प्रवेश मिळाला नसता आणि कोठल्याहि 'अ‍ॅट होम'ला त्याला कोणी बोलावले नसते. निजामानेहि त्याला हैदराबादेतून परत बोलवावे अशी मागणी इंग्रज सरकारकडे केली असती.

पारोच्या जातीत दफनाची पद्धत नसतांना तिचे ख्रिश्चन पद्धतीने दफन झाले ह्यावरून असे दिसते की तिच्या जातीने तिला बहिष्कृत केले असावे.

मायकेल एडवर्ड्सलिखित High Noon of Empire ह्या पुस्तकात असे वाचल्याचे स्मरते की हिंदुस्तानात आलेले इंग्रज आणि नेटिव स्त्रिया ह्यांच्यातील संबंध जहाजांना वाफेची इंजिने लागण्याच्या पूर्वीच्या काळात खूपच मोकळे असत कारण इंग्लंड ते हिंदुस्तान प्रवासाला ७-८ महिने लागत आणि तो प्रवास धोक्याचाहि होता. त्याकारणाने लग्नायोग्य इंग्रज मुलगी हिंदुस्तानामध्ये क्वचितच दिसत असे. नंतर १८३०च्या पुढेमागे जहाजे वाफेवर चालू लागली आणि अशा मुली हिंदुस्तानात येऊ लागल्या. (थॉमस बॅबिंग्टन मेकॉले ह्याची येथे आठवण येते. तो १८३२ मध्ये हिंदुस्तानात आला तेव्हा त्याची उपवर बहीण हॅना त्याच्याबरोबर आली आणि अपेक्षेनुसार तिला लवकरच चार्ल्स ट्रिवेल्यन हा उत्तम करीयरचा नवरा मिळाला.) ह्यामुळे उपलब्धतेमुळे आणि विक्टोरियन इंग्लंडच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रज पुरुष आणि नेटिव स्त्री ह्यांच्या संबंधाकडे पाहण्याची दृष्टि बदलली. अर्थात सर्वसामान्य सोल्जर, रेल्वेतला फोरमन, तारमास्तर प्रकारच्या इंग्रजाला त्याहि मुली मिळणे दुरापास्तच होते. नेटिव स्त्रियांचे आणि त्यांचे संबंध चालूच राहिले पण त्या संबंधांमध्ये एक नवाच चोरटेपणा दिसू लागला.

सारांश असा की सोयीसाठी निर्माण झालेल्या अशा संबंधांना बढाचढाके ग्लोरिफाय करून त्यांचे रोमिओ-ज्यूलियट बनविण्याचे प्रयत्न पटत नाहीत. "अजिंठा झाडांचा...झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला...लेनापूर फर्दापूरच्या गावंढळ गर्दीतला...बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला...अजिंठा' असले काव्यात्मक काहीच झाले नाही. झाले हेच की सत्ताधारी इंग्रजाने सहज उपलब्ध पारोचा चोरूनमारून भोग घेतला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादातील वाक्य आणि वाक्य पटले व १००% अनुमोदन!

* चित्रपटाचे पोस्टर जेव्हा पाहीले तेव्हाच एका मित्राला म्हणालो होतो एकदम फालतू! पोस्टरमध्ये जी बया ज्या पोज मध्ये उभी आहे त्या पोज चा संबध अजंठा पासून अंदाजे १००० किमी लांब असलेल्या बेल्लूरच्या मुर्तीशी आहे जीला शृंगारामध्ये मग्न कन्या असे नाव आहे व ते तेथून ढापले असावे व योगायोगाने वरील श्री निखिल यांचा लेख वाचल्यावर व तुमचा प्रतिसाद वाचल्यावर हे लक्षात आले की यांना दाखवायचे भलतेच काहीतरी आहे Smile

असो.

तसा ही चित्रपट पाहीला नसताच.. आता तर फुकट मिळाला तरी पाहीन याची देखील शुन्य शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

रॉबर्ट गिल आणि रॉबर्ट गिल अजिंठा लेण्यांमध्ये अशी वरील चित्रे थोडा शोध घेतल्यावर जालावर मिळाली. तसेच books.google.com येथे रॉबर्ट गिल हयांच्या अजिंठयामधील कामाचे वर्णन करणारी आणि १९व्या शतकात छापलेली ६ पुस्तके (पूर्ण वाचनासाठी खुली) अशी मिळाली. अर्थात त्यात कोठेच रॉबर्ट-पारो दिलखेचक कहाणीस स्थान दिलेले नाही.

(चित्रश्रेय - http://www.hadland.me.uk/gill/gill1.html)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरा छान छान पुस्तक, गोड गोड सिनेमा असे लिहा राव -- \
सोनाली कुलकर्णी आहे म्हणून तरी पहावा एकदा हा सिनेमा?:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

निखिल देशपांडे यांच्यासारखे छिद्रान्वेषी लोकं चित्रपट बघतात तोपर्यंत मराठी चित्रपटांचा उत्कर्ष होणे अशक्य आहे.

सोनाली कुलकर्णी आहे म्हणून तरी पहावा एकदा हा सिनेमा?

ही दुसरी सोनाली कुलकर्णी तुला आवडते?

आत्ताच यूट्यूबवर ट्रेलर पाहिला. सोनालीबाईंना शूटींगच्या काळात अजिंठ्याच्या बाहेरच रोज चार-सहा तास सूर्यस्नान घडवलं असतं तर तो काळा मेकप एवढा बेगडी वाटला नसता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा मिपावर दिलेला प्रतिसाद आहे तसाच इथे चिकटवते आहे.

जेव्हा निर्माता-दिग्दर्शक आम्ही खूप संशोधन केलं आहे असं जिथं तिथं सांगत असतात,काहीतरी माफक अवधान आणि व्यवधान असावं अशी प्रेक्षक म्हणून माझी अपेक्षा असते. माझ्यामते संशोधन म्हणजे त्या कलाकृतीच्या अनुषंगाने तत्कालिक सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक, भौगौलिक अभ्यास होय आणि त्यात तेव्हाचं अर्थकारणही लक्षात घ्यावयास हवं. यातलं बरंचसं या चित्रपटात झाल्याचं दिसत नाही. मूळ काव्याशी इमान राखलं आहे की नाही हे मी ते काव्य न वाचल्याने माहित नाही, पण जालावरच्या माहितीनुसार पाहिलं तर एकंदरीतच 'उरकण्याचा सोहळा' झाल्यासारखा वाटतोय.

मूळ परिचयात मला खटकलेल्या गोष्टी आल्या आहेतच, म्हणून आता ही फक्त भरः
१. चित्रपटाच्या नायिकेचं खरं नांव काय, पारो की पारू? मराठी म्हणून 'पारू' हे नांव जास्त योग्य वाटतं. गुगलवर देखील जिथं तिथं पारूच आहे. मग इथं ही 'पारो' का म्हणून? की ती गेल्यानंतर गिलला दुसरा काही उद्योग न करता देवदासासारखा भणंग भटकताना दाखवलाय म्हणून?
२. पुन्हा एकदा गुगल माहितीवरूनच मेजर गिल व पारो यांची कहाणी १८४५ ते १८५६ या काळात घडते. पण चित्रपटात हा काळ अत्यल्प दिसतो, साधारण तीन वर्षांचा. पात्रांच्या संवादांवरून किंवा प्रत्यक्ष दिसण्यावरून तरी इतक्या वर्षांचा कालावधी गेल्याचं जाणवत नाही. कालावधीवरून गिलने आपल्या आयुष्याची किती वर्षे अजिंठा चितारण्यात व्यतीत केली ते कळतं. तो काळ एकमेकांची भाषा शिकायला पुरेसा असतो, तसेच जेव्हा इतकी खपून काढलेली चित्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात, त्या मागची वेदना जास्त जाणवते. (कालावधीच्या अनुषंगाने आणखी अनेक मुद्दे येतील, पण ते नकोच. पिक्चरची पारच चिरफाड होईल)
३. चित्रपटातलं नाचकाम अगदी भारी आहे. कधी ते अगदी आदिवासींचं असावं हुबेहूब येतं, तर कधी सोनालीबाई चिकनीचमेली छापाच्या स्टेप्स घेतात.
४. बालगंधर्वनंतर अजिंठा बघितल्यानंतर देसाई म्हणजे पोषाखी भव्यदिव्यच असायला पाहिजे हे नक्की झालं. १९च्या शतकात आदिवासी बायका जरीकाठी साड्या नेसतात, त्याही सफाईदार कशिदाकाम केलेल्या. पुरूष अंगभर बंडी-धोतर घालतात, बायकांच्याकडेही लांबलचक साड्या आहेत, पण त्या नेसण्याची ढब मात्र रँपवरच्या ललनांची आहे. दोन हात पदर वार्‍यावर उडायला सोडून कमरेभोवती आवश्यक तितकंच गुंडाळलंय. ते कमी का म्हणून वेगवेगळ्या ब्लाऊजची फॅशन पण आहे. अगदी कंचुकीछापा (टुयूब)पासून हॉल्टरनेक, वन शोल्डर्स व स्लीव्हलेस पर्यंत सगळं काही आहे. आणखी छिद्रान्वेषीपणा करायचा तर साड्या जरीकाठी गढवाल कॉटन, जरीकाठी हैद्राबाद (बहुतेक मंगलगिरी) कॉटन आणि राहिलेल्या प्रिंटेड्+एम्ब्रॉयडरी सिल्क आहेत.
५. जी कथा कपड्यांची तीच दागिन्यांची. लोहारलोक शस्त्रं तयार करत नाहीत म्हणजे सगळ्यांना ऑक्सडाईज्ड दागिने बनवाय्च्या कामाला जुंपलेले दिसतात. आजही लमाणांपासून पारध्यांपर्यंत सर्वच स्त्रिया दागिने घालतात, पण ते वेगळ्याच धाटणीचे, फॅशन अ‍ॅक्सेसरीज नाही! जैत रे जैत मधले अस्सल ठाकर लोक कुठे आणि हे अजिंठ्यातले तथाकथित आदिवासी कुठे?
६. बोगनवेलियाच्याच काय, इतर पानाफुलांचा इतका भडिमार केला आहे, की एके ठिकाणी ती एका कापडामागे कपडे बदलते, त्यालाही वरून पानं-फुलं चिकटवली आहेत. या वर्षीच्या मार्चमध्ये वेरूळ लेणी पाहायला गेले होते. सगळी झाडे निष्पर्ण होती. नाही म्हणायला पांगिर्‍याची लाल भडक फुले आणि एखादुसरं पान तेवढं दिसलं. दोनशे वर्षांपूर्वी अजिंठ्याचं इतकं तापमान नसलं, तरी होळीच्या मोसमात अगदी एनचांटिंग केरलाटाईप्स तरी नसावं. दाखवायचंच असेल तर वैराण वाळवंटातदेखील सौंदर्य असतं, फक्त ते दाखवण्याची हातोटी हवी.
७.देसाईंच्याच 'राजा शिवछत्रपती' मध्ये भली मोठी फौज म्हणून वीस-पंचवीसजण दाखवले जातात, पण सिनेमात मात्र बगळ्यांचा उल्लेख असलेल्या गाण्यात अजिंठ्याच्या परिसरात बगळे स्थलांतरित होऊन येतात की कायसेसे वाटावे.
८. गिलच्या पेंटिंग्जसोबतच त्याचं छायाचित्रणावरतीही प्रभुत्व होतं. याचा उल्लेख शेवटी एका पाटीवर येतो. तो तिच्या प्रेमात वेडा झाला वगैरे ठीक आहे, पण त्याचं एकूण कार्य दुर्लक्षिलं गेल्यासारखं मला वाटलं. म्हणजे सिनेमात एक कथा फक्त दिसते, सत्य जाणून घ्यायचं असेल तर गुगल करा असं थोडक्यात म्हणणं दिसतं.
९. आपला सिनेमा परदेशी चित्रपटमहोत्सवात दिसेलच असं आपल्या निर्माते-दिग्दर्शकांना का वाटतं> आणि जर वाटतं, तर तितकी मेहनत घेऊन सत्याशी कमीत कमी फारकत घेतलेला सिनेमा का बरे काढत नाहीत? जरी सिनेमात फक्त प्रेमकहाणी दाखवायची असली, तरी मेजर गिलने अजिंठ्यासाठी जे केलं, ते स्मरता त्याच्या व्यक्तिरेखेवर अन्याय केला आहे असं वाटतं.

त्यातल्या त्यात भारतीय तत्वज्ञान नारकरांच्या मुखी चांगलं वदवलंय, आणि मेजर-दुभाष्या यांची कामं चांगली झाली आहेत, अजिंठ्याचे सेट्स बहुतेक खास उभारले असावेत, ते चांगले झाले आहेत एवढंच दु:खातलं सुख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

अरविंद कोल्हटकरांनी नाहीतरी सुरवात केलीच आहे. त्या मुद्यांच्या अनुषंगाने:

१. http://ekaresources.com/wp-content/uploads/2010/08/udaipur-1.pdf या दुव्यावर काही फोटोज आहेत. तिथे मेजर गिल किंवा पारू(पारो नाही) या नावाने शोध घेतला असता मद्रासच्या रेकॉर्डांमध्ये गिलच्या इंडियातल्या बायकांचा उल्लेख आहे असं दिसतं. ही दुसरी बाई अ‍ॅन नक्की कोण होती याबद्दल मतांतरे आहेत. ती स्पॅनिश,अँग्लो-इंडियन किंवा सिंधी असू शकते. तिच्यापासून झालेली मुलगी पोटदुखीने आजारी असल्याची माहिती मद्रासला नोंदवली होती.
२. http://archiver.rootsweb.ancestry.com/th/read/INDIA/2002-02/1013608780 इथे लिहिल्याप्रमाणे Colman McLaughlin या अ‍ॅनचा पणतू होता असा दावा केला आहे, आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे अ‍ॅनसोबतच्या लग्नाचं सर्टिफिकेटही उपलब्ध असावं.
३. माझा वरच्या प्रतिक्रियेतला कालावधीचा मुद्दा. १८२४ ला पारूबाई किमान ६-७ वर्षांची असलेली दाखवलीय. म्हणजे १८४५ साली २७ आणि १८५६ साली ३८च्या दरम्यान तिचं वय असावं. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे तिला रॉबर्टची भाषा येत नाही त्यामुळे तिचं गर्भारपण ती त्याला सांगू शकत नाही. दहा वर्षांत एवढ्या मोठ्या कार्याचां प्रेरणास्थान असलेल्या पारोची भाषा मेजरला समजत नाही इतका तो 'ढ' होता का? आणि बरंच काहीबाही जे मुद्दाम लिहिण्याची गरज नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

छ्या बॉ निदे! कै च्या कै अपेक्षा तुझ्या!
आता आपल्याकडे सिल्कच्या भरजरी साड्या, 'शिवलेले' ब्लाऊज वगैरे रामायणापासून होते हे आपण 'रामायण' नावाच्या सुप्रसिद्ध मालिकेत बघितले आहेच. तेव्हा शिवण्याची कला भारतात तीनेकहजार वर्षे जूनी असावी (ती हल्ली भारतात आली हा पाश्चात्य प्रचाराकडे डोळेझाक कर बघु). तेव्हा हे आक्षेप नोंदवून कलासृष्टीच्या चिरंतन आणि अभ्यसपूर्ण चित्रपटांचा घोर अपमान केल्याबद्दल निदे (दांपत्याचा)णिषेध! Wink

अवांतरः शिवाजी महाराजांनी कपातून काहि पेय का पिऊ नये? एखाद्या इंग्रज अधिकार्‍याने भेट म्हणून कप दिला नसेलच असे सांगता येत नाही.
अतिअवांतरः संडे स्टार्स खिलवून गुप्त झाल्यानंतर ऐसीवर पुन्हा लिहिते झालात हे ही या चित्रपटाचे थोडके यश नाही Wink -- स्वागत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!