अमेरिकेचा पंधरा ऑगस्ट - संस्कार आणि सोहळ्याचा अनोखा मिलाफ

आमच्याकडे, टेक्सासात अमेरिकेचा पंधरा ऑगस्ट असतो तेव्हा खूप उन्हाळा असतो. खूप ऊन, उकाडा असल्यावर मी सकाळी लवकर उठते, आणि जोरजोरात एसी लावून, पंखा माझ्या दिशेला फिरवून ट्रेडमिलवर हळूहळू चालत व्यायाम केल्याचं नाटक करते. एकदा भांडवलशाही स्वीकारली की खर्च करणं आणि एकदा विकत घेतलेल्या वस्तूसाठी आणखी खर्च करणं भागच आहे. ट्रेडमिल आली की धावायचे, चालायचे, जॉगायचे बूट, आणि कपडे हे सगळं पाहिजेच. शिवाय तिथे पाण्याची स्वतंत्र बाटली 'प्राईम डे'साठी राखून ठेवली होती. लेख प्रकाशित करेस्तोवर ती घरी आली आहेच. ज्या देशात नवभांडवलशाही हा धर्म आहे आणि नेहमीच्या, रिटेलमध्ये मिळणाऱ्या धर्मांना तत्त्वतः काहीही स्थान नाही, त्या देशात उधळेपणा ही देशभक्तीच असते.

माझ्या संस्कारी मनाला हे मनापासून पटत नाही. मी संघाच्या संस्कारात वाढलेली आहे. आता (नव)भांडवलशाही स्वीकारली म्हणून माझं मूळ बदलत नाही. देश बदलला म्हणून माझं कलम दुसऱ्या मुळावर केलं असं होत नाही. माझी शुभ्र, स्वच्छ, निरोगी मुळं कायमच संघाच्या रंगात रंगलेली राहतील. माझ्या वडलांनी मला शिकवलेलं आहे, संस्कार नको असेल तर सोहळाही करू नये. नाही, खरं तर हे त्यांनी मला थेट शिकवलं नाही. बाबा हे माझ्या चुलतभावाला सांगत होते, आणि मी तिथेच होते म्हणून मी ते ऐकलं. थेट, बटबटीतपणे बोलणं बाबांच्या स्वभावात नव्हतं, पण चुलतभावानं संस्कार आणि पर्यायानं धर्माला चाट दिल्यामुळे बाबांना हे म्हणावं लागलं. पाचवीमध्ये असताना मी हे वाक्य वडलांकडून ऐकलं, आणि माझ्या मनावर हे वाक्य कोरलं गेलं आहे. संस्कार नसेल तर सोहळाही करू नये.

आजवर मी अमेरिकेच्या पंधरा ऑगस्टला झेंडावंदन केलं नव्हतं. पांढरे कपडे घालून, माझ्यासारख्या इतर सर्वसाधारण लोकांप्रमाणे पंधरा ऑगस्टचे संस्कार आणि सोहळा दोन्हींना चाट दिली होती. ह्या वर्षी मात्र मी वडलांच्या स्मृतीला आणि संघवादी संस्कारांना जागून एका मित्राकडे जायचं ठरवलं. (या निष्पाप इसमाचं नाव जाहीर करून मी त्याला उघडं पाडणार नाही. असं कुणाचं जाहीररीत्या नाव घेऊन त्यांच्याबद्दल बोलणं माझ्या संघी संस्कारांत बसत नाही.) वडलांचा आणखी एक संस्कार होता की फोनवर फार बोलायचं नाही; फोन कुणी का केला असेना. "आज मैत्रिणीनं फोन केला म्हणून तू पंधरा मिनीटं फोनवर बोलत बसलीस; उद्या ती तुझ्याकडून हीच अपेक्षा ठेवेल. आणि मुख्य म्हणजे फोन गप्पा मारण्यासाठी नसतो. गप्पा मारायच्या असतील तर तिच्या घरी जाऊन गप्पा मार." म्हणून मी पाऊण तास गाडीत आणि अडीच तास विमानात बसून मित्राकडे गेले. फोनवर किती गप्पा मारणार याला मर्यादा नकोत का!

अमेरिकेच्या पंधरा ऑगस्टला मी सकाळी लवकर उठले. स्वच्छ, पांढरी शॉर्ट्स घातली. स्वच्छ निळा-लाल बनियन घातला. अमेरिकी आणि टेक्सासी झेंड्याचे रंग सारखेच आहेत. त्यामुळे कॅलिफोर्नियात अमेरिकेचा पंधरा ऑगस्ट साजरा केला तरीही टेक्सासशी प्रतारणा केल्यासारखं मला वाटलं नाही. त्यामुळे मला खूपच्च अमेरिकन झाल्यासारखं वाटलं म्हणून मी केस विंचरले. केस जरा जास्तच वाढले होते, पण तिकडे, मित्राच्या गावात फार उन्हाळा नसल्यामुळे मला ते जाणवलं नाही. तरीही पुढच्या वेळेस स्वतःच केस न कापता, भांडवलशाहीनुसार बाहेरच केस कापायचे आणि अमेरिकी पद्धतीनुसार स्थानिक कुठल्या दुकानात न जाता मोठ्या चेनमध्ये जाऊनच केस कापायचे असं ठरवलं. झेंडावंदन करण्याची फार काही सोय नव्हती याचा मान राखून किमान पैसे खर्च करायचं ठरवल्यामुळे मला जरा बरं वाटलं.

हा मित्र निष्पाप असला तरी फारसा निरागस नाही. अमेरिकेचा पंधरा ऑगस्ट असला आणि माझ्यापेक्षा बरीच जास्त वर्षं तो अमेरिकेत असला तरी तो लवकर उठला नाही. अमेरिकी संस्कारांमध्ये तो आपला भारतीयपणा विसरला आहे, याची मी नोंद घेतली. आम्ही जेव्हा अमेरिकी पंधरा ऑगस्ट साजरा करायला बाहेर पडलो तेव्हा त्यानं करडा टीशर्ट आणि काळी शॉर्ट्स घातली आहे याची मी नोंद घेतली. किमान त्याची गाडी तरी पांढरी आहे. अमेरिकेत गाडी म्हणजे आपल्या शरीरावरच्या आवरणाचा एक भागच. शिवाय अमेरिकेत गाडी चालवणं म्हणजे भारतात घरात शिरताना चप्पल काढण्यासारखंच. त्यामुळे त्याच्या काळ्या, अशुभ वस्त्रप्रावरणांकडे मी दुर्लक्ष केलं. माझ्या संघी संस्कारांमध्ये खरं तर काळे कपडे बसत नाहीत. आमच्या एका ओळखीच्यांच्या एका मुलीसाठी एका मुलाला वडलांनी परस्पर नकार दिला होता कारण बाबांना भेटायला तो मुलगा काळे कपडे घालून आला होता. ही अतिशयोक्ती नाही, आईशप्पथ! संघात काळे कपडे चालत नाहीत; वडीलधाऱ्यांना भेटायला जाताना तर काळे कपडे घालणं म्हणजे त्यांचा अपमानच. (नंतर मी ह्या मित्राला जमेल तितक्या सभ्यपणे त्याचे संस्कार तपासून घेण्याची विनंती केली.)

अमेरिकी रीतीनुसार आम्ही बाहेर जेवलो आणि नंतर एका बीचकडे निघालो. गाडी पार्क करून बीचकडे चालत जात असताना रस्त्यात फार्मर्स मार्केट लागलं. तिथे रसरसीत भाज्या, वेगवेगळी फळं आणि तऱ्हेतऱ्हेच्या बेऱ्या विकायला होत्या. तिथल्या एका टर्किश विक्रेत्यानं मला त्याच्याकडच्या पदार्थांचा स्वाद घेण्याचीही विनंती केली. टर्किश म्हणजे 'आपल्यां'तले नाहीत, त्यांचं अन्न कसं खायचं, असा प्रश्न मला पडला असता; आधीच अमेरिकी आकाराचा अल्पोपहार केल्यामुळे पोट तुडुंब भरलेलं होतं, ही सबब कामी आली. फार्मर्स मार्केटात एक कॉफीचं दुकानही होतं. तिथे फ्रेंच बोलणारे दोन लोक होते. तिथे थांबून मित्रानं त्यांना फार्मर्स मार्केटाबद्दल विचारलं. "दर मंगळवारी भरतं हे", असं त्यांतल्या हँडसम पुरुषानं आम्हांला सांगितलं. "मी पुढच्या मंगळवारी इथे वेळ काढून येईन, तेव्हा इथे फार गर्दीही नसेल. कॉफीही इथेच घेईन," असं कायतरी मित्र म्हणाला.
"त्याला कॉफीबद्दल आणखी काही विचार ना!" मी मित्राला म्हणाले.
"पण मला नकोय आणखी कॉफी. आपण स्टारबक्समध्ये घेतली की आत्ताच. तुझ्या हातात कपही आहे."
मी ताबडतोब हातातला कप पाठीमागे लपवला. आणि त्या कॉफीवाल्याकडे बघून हसले. "छान वास येतोय कॉफीचा!"
तो थोडा वेळ कॉफीबद्दल काही तरी बोलला. मित्रानं मग त्याला कॉफी कुठून येते, ते विचारलं. त्यांची सप्लाय चेन बिघडली आहे का, असे काही प्रश्न त्याला होते.

कॉफीवाला उंच, शिडशिडीत आणि दाढीचे खुंट किंचित वाढलेले. कॉफीची पोती तोच उचलत असणार. त्याच्या घट्ट टीशर्टातून ते दिसत होतं. त्याच्या कपाळावर थोड्या सुरकुत्या होत्या. उन्हात काम करून त्याच्या चेहऱ्यावर राप चढला होता. बोलताना त्याच्या दाढीवर सूर्याचे किरण थेट पडत होते. त्यातले पांढरे केस उन्हात चमकत होते. डोक्यावरचे भुरे केस विरळ होत चाललेत याकडे लक्षच जात नव्हतं. पण त्यामुळेही तो किती रूबाबदार दिसत होता!

"तुझं लक्ष त्या म्हाताऱ्याकडे आहे का?" मित्रानं मला विचारलं. "असं काही नाही रे. तू उगाच काहीही अर्थ काढू नकोस", असं मी त्याला आणि स्वतःलाही बजावलं. वडलांनी माझ्यावर संघाचे संस्कार केले आहेत; परपुरुषाकडे अशा नजरेनं बघू नये. आणि तो काही म्हातारा म्हणण्यासारखा नव्हता. थोडा मोठा असेल आमच्यापेक्षा एवढंच. आम्ही आधीच स्टारबक्सात कॉफी प्यायलेली होती. चांगली अमेरिका आहे, भांडवलशाही आहे, तर जवळचं स्टारबक्स सोडून अशा अनोळखी ठिकाणी कसली कॉफी प्यायची! भलतंच काय तरी या मित्राचं! "पुढच्या वेळेस तो आहे का ते सांग मला." हे सगळं माझ्या मनात झालं का खरंच?

आता मात्र खरा पंधरा ऑगस्ट साजरा करायला आम्ही बीचवर गेलो. तिथे मोठ्यानं गाणीबजावणी सुरू होती. पुरुष‌वर्ग आपले सहाबंद दाखवत होता. स्त्रीवर्ग आपले उरोज तेवढे झाकून होता. सगळ्यांनी पंधरा ऑगस्टसाठी व्यवस्थित तयारीनिशी गणवेश घातले होते. गेलं वर्षभर कुणी डाएट केला असेल, कुणी व्यायाम केला असेल, कुणी सर्जरी करवून घेतली असेल. पण पंधरा ऑगस्टसाठी सगळे व्यवस्थित तयार झाले होते. कुणी बीचवर व्हॉलीबॉल खेळत होते, कुणी पोहत होते, कुणी वाळून सूर्यस्नान करत होते. सगळेच आपापल्या वकुबानुसार, मात्र राष्ट्रीय परंपरेचा मान राखत देशाचा पंधरा ऑगस्ट साजरा करत होते.

बीच

मला जरा आश्चर्यच वाटलं की मित्र आजूबाजूला फार बघत नव्हता. तो मला बंदरात अडकलेल्या कंटेनरांबद्दल सांगत होता. त्यामुळे दुकानांत वस्तू उपलब्ध नाहीत; त्या कॉफीवाल्यालाही खूप उचापती करूनच त्याला हवी ती कॉफी मिळते याचं स्पष्टीकरण तो देत होता. समोर, आजूबाजूला, मागे, पुढे सगळीकडे एवढ्या तरुण, कमी कपड्यांतल्या स्त्रिया दिसत असताना ह्याला बंदरात अडकलेले कंटेनर आठवत होते हे बघून मला आश्चर्यच वाटत होतं. पण तो संस्कारी आहे याबद्दल हायसंही वाटलं.

तेव्हा समोर एक आजी दिसल्या. त्या साडी नेसून, जाकीट घालून आणि ठसठशीत कुंकू लावून आल्या होत्या. आजोबाही बुशशर्ट आणि फुलपँट घालून आले होते. आजींच्या तरुण कुटुंबियांनीही शरीर पूर्णपणे झाकलं होतं. मित्रानं याकडे लक्ष वेधून घेतलं. "बीचवर एक 'हेना टॅटू आर्टिस्ट' आहे, तशी एक 'बिंदी आर्टिस्ट'ही सापडेल", अशी आशा त्याला होती. असं कुणी ह्या बीचवर असेल-नसेल तरीही आजीच कशा ह्या देशप्रेमी, शरीरप्रदर्शनाच्या गर्दीत अगदी ठासून उठून दिसत आहेत, याबद्दल आम्ही दोघंही असोशीनं बोललो.

बीचवर एक नारळपाणीवालाही होता. समुद्र आहे आणि नारळपाणी नाही, असं शक्यच नाही. ही शहाळीही अगदी अमेरिकी पद्धतीनं नटून आली होती. सगळ्या शहाळ्यांचा वरचा हिरवा थर गायब झाला होता. सगळ्या बाजूंनी ती शहाळी ताशीव, घडीव, अष्टकोनी केली होती. कुणीही जाडगेलं, बुटकं, लांबुळकं वाटत नव्हतं. सगळ्यांचा आकार अगदी फॅक्टरीतून काढल्यासारखा एकसमान होता. जणू ही शहाळी आता डिस्कोमधून आली आहेत असा त्यांच्यावर एक स्टँप मारला होता. नारळपाणीवाल्यानं आम्हांला हाक मारली. बीचवर जाऊन नारळपाण्याला नाही कसं म्हणायचं! मित्र नाही म्हणत होता. मी त्याला समजावायचा प्रयत्न केला. समुद्रकिनारा आणि नारळ यांचं महत्त्व त्याला नव्हतंच. माझ्या आग्रहाखातर त्यानं होकार दिला.

आम्ही एकच नारळ घेतला. नारळपाणीवाल्याच्या जोडीदारानं आम्हांला आतल्या बाजूला बोलावलं. "हे पाहा, इथे काही समारंभ करायलाही जागा आहे. बारशी, वाढदिवस, ॲनि‌व्हर्सऱ्या, असे सगळ्या प्रकारचे कौटुंबिक समारंभ आम्ही आयोजित करतो. तुमच्या कामाच्या काही पार्ट्याही इथे करायच्या असतील तर तसंही करता येईल. नारळपाणी ही आमची खासियत आहेच. शिवाय आमची ही जागा बीचपासूनही जवळ आहे. कौटुंबिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आम्ही ही जागा भाड्यानं देतो."

मित्रानं आधी मला नारळपाणी प्यायला दिलं. आम्ही नारळपाणी पितपित आत गेलो. ५०-७५ लोकांसाठी जागा पुरेशी होती. मग मी माझी स्ट्रॉ काढून त्याला शहाळं दिलं. "कागदी स्ट्रॉमुळे चव विचित्र लागत्ये, पण पाणी गोड आहे ना?" त्यानंही ते मान्य केलं. थोडं पाणी पिऊन पुन्हा मला शहाळं दिलं आणि प्लास्टिकच्या स्ट्राँचा तुटवडा नाही, हेही मला सांगितलं. मग हे लोक कागदी स्ट्रॉ देऊन चव का खराब करत असतील याचा विचार आम्ही केला नाही. शहाळ्यातलं पाणी संपल्यावर त्यानं चमच्याच्या मापाचं खुरपं काढलं आणि खोबरं खरवडायला सुरुवात केली.

"आमच्या ह्या जागेत अजून कुणी लग्नसमारंभ केलेला नाही. त्याची तयारी अजून आम्ही केलेली नाही; पण तेही करायचा आमचा विचार आहे," नारळवाल्याचा मित्र म्हणाला. तोवर शहाळ्यातलं खोबरं खरवडून झालं होतं, त्यानं ते शहाळं मित्राच्या हातात दिलं.

"कुठून आणता तुम्ही ही शहाळी?" मित्राला गप्पा मारायच्या होत्या. "थायलंडमधून आणल्येत," नारळपाणीवाल्याच्या मित्रानं सांगितलं. शहाळी थायलंडमधून अमेरिकेत आणायला काय यातायात करावी लागते, याच्या गप्पा मी ऐकल्या नाहीत. आमच्या तिर्रीला आवडतं ते डबाबंद चिकन आणि मासेही थायलंडमधून येतात. तिच्या आठवणीत मी तिथे पसरलेल्या प्लास्टिकच्या गवताची पाती किती टोकदार आहेत, याची चपला काढून चाचपणी करत राहिले.

पिवळं घर

आम्ही थोडे पुढे जाऊन बीचच्या आतल्या बाजूची घरं बघायचं ठरवलं. "अगदी इटलीतल्या गावांमध्ये फिरल्यासारखं वाटतंय इथे. तू गेल्येस का कधी इटलीला?" मी नकारार्थी मान हलवली. छोट्या गल्ल्या, दुमजली छोटी घरं, आजूबाजूला अगदी छोटीशी मोकळी जागा, दोन फूट उंचीची कंपाऊंड वॉल, सगळं सिमेंटचं बांधकाम, घरांना वेगवेगळे रंग हे सगळं बघून मला मात्र भारतातीच आठवण झाली. गॅलऱ्यांमध्ये कपडे वाळत घातलेले नव्हते. मित्र म्हणाला, "हे लोक काही इथे राहणारे नसणार. हे सगळे सुट्टीसाठी आलेले असणार." एका घराच्या वरच्या मजल्यावरून जोरजोरात आवाज येत होते. ते लोक पिझ्झाच का मागवला, तोच सगळ्यात लवकर मिळेल, अशी काही जोरदार चर्चा सुरू होती. एका पांढऱ्या घरातून गांजा फुंकल्याचा वास येत होता. "यांचा सोहळा भलताच रंगला आहे," मित्र जोरात हसत म्हणाला. मी काही न म्हणता फक्त घराच्या पत्त्याचा फोटो काढला.

झांजिबार

आमच्या टेक्सासात सकाळी लवकर उठून मुलांची 'बाईक मिरवणूक' आयोजित केली होती. लहान मुलं कॉलनीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपापल्या सायकलींवर जाणार; आणि मिरवणुकीचं नेतृत्व करायला एक आगीचा बंब बोलावला होता. मग दुसऱ्या टोकाला बाग आणि मोकळी जागा आहे, तिथे एक बर्फाच्या गोळ्यांची गाडी आणि एक टाकोचा ट्रक बोलावला होता. सगळ्यांनी कौटुंबिक वातावरणाचा आनंद अगदी सुनियोजित पद्धतीनं घेतला. ही मिरवणूक आमच्या घरांवरून न जाता, शेजारच्या रस्त्यावरून गेली म्हणून माझी शेजारीण खट्टूही झाली होती. पण "मलाही मिरवणूक बघता आली नाही, तेव्हा आपण ती पुढच्या वर्षी बघू," असं म्हणून मी तिचं सांत्वन केलं.

"ही घरं खूप सुंदर आहे. तू इथेच का नाही घर घेतलंस?" मी न राहवून मित्राला विचारलं. देशभक्ती, स्वातंत्र्य, संस्कार, सोहळा सगळ्याचंच सुंदर दर्शन मला त्या बीचवर घडत होतं. "अगं हा भाग राहायला फार सेफ नाही," तो म्हणाला.

संध्याकाळी आम्ही दुसऱ्या बीचवर गेलो. तिथे बीचसाठी बसकुरं विकणारे लोकही होते. किंमती जरा चढ्या वाटल्या, पण मला त्याचं काही वाटलं नाही. आम्ही एक मोठं, झेंड्याचे रंग असलेलं बसकूर विकत घेतलं. मित्रानं मला पैसे देऊ दिले नाहीत. आम्ही तीन तास तिथे बसलो आणि अंधार पडल्यावर फटाके बघितले. डोळ्यांचं पारणं फिटलं. फटाक्यांच्या आतिषबाजीतही त्यांनी झेंड्याचे रंग बेमालूम मिसळले होते. मग घरी येऊन आम्ही स्थानिक बातम्यांमध्ये पुन्हा एकदा फटाके बघितले. राष्ट्रीय बातम्यांमध्ये तर न्यूयॉर्कचे फटाके दाखवले म्हणतात. तेव्हा आम्ही जेवायला बाहेर गेल्यामुळे ते बघायचे राहिले.

कुठल्याही बीचवर कुणीही काळे कपडे घातले नव्हते. कुणी झेंड्याच्या रंगाचे कपडे घातले होते, कुणी चपला, कुणी झेंड्याची टोपी घातली होती. कुणीही आपले संस्कार विसरून सोहळा करत नव्हते. संघाचे संस्कार सगळीकडे पसरलेले आहेत, वैश्विक आहेत, याला आणखी काय पुरावा हवा!

wish you were here

आणि हे सगळं अनुभवण्यासाठी तुम्ही इथेच असायला पाहिजे. Wish you were here!

(फोटोंचं श्रेय - निष्पाप मित्र आणि मी)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अरे संस्कार संस्कार
जसे पाय वाळुवर
आधी पायाला चटके
तेंव्हा नारळपाणी गार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बीचवर जाऊन स्वातंत्र्यदिन? मित्रासोबत? देखण्या परपुरुषाकडे पाहणे? म्हणजे व्राँग साईडने, विना हेल्मेट अति वेगाने जाणे, आणि पि.यु.शी पण नाही.. किती चलाने काढायची तुमच्यावर?

..असो.

राष्ट्रगीताच्या वेळी उभे तरी राहिला होतात का? आणि नमस्ते सदा म्हटले का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मित्रासोबत? देखण्या परपुरुषाकडे पाहणे?

ह्याबद्दल मित्राला काही आक्षेप नव्हता. तसा तो स्वभावानं गरीब आहे; पण तरीही आक्षेप नव्हता हे नक्की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्या संघसंस्काराची अशी टर उडवत हुर्रेबाजी केल्याने आमच्या आत्मिक संवेदना दुखावल्या आहेत. परदेशात जाऊन आमच्या वीररसयुक्त प्रखर आणि तेजपुंज राष्टप्रेमाची अवहेलना करणार असाल तर सहन करणार नाही. आमच्या हिंदूंच्या प्रतिकांबद्दल उच्चशिक्षित अभिजनांनी असं अनादरयुक्त लिखाण केले जाणार असेल तर हिंदू बहुजनांनी जायचं कोणाकडे? आत्ता कुठे बहुजन हिंदू (कोकणस्थ बहुजन वगळता) फुर्रोगामी गाढ झोपेतून जागा झाला आहे. तथापि या लेखनाचा आम्ही झाईर णिशेढ करतो. Wink

(ता. क. ४ जूलैला स्वातंत्र्य दिनाप्रित्यर्थ अजूनही अमेरिकेतील खेडोपाड्यात, चौकाचौकांत गरमागरम जिलेब्या तयार करून विकतात का हो?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

फोटो छान आलेत. स्वातंत्र्यदिन अगदी नंदनवनात साजरा केल्यासारखा वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0