'चित्रबोध' वृत्तांतः पूर्वतयारी

३१ मे ते ३ जून पर्यंत चित्रबोध नावाची कार्यशाळा म्हणा किंवा व्याख्यानमाला म्हणा 'पालकनिती' आणि 'सुदर्शन कलामंच' यांनी संयुक्तरीत्या आयोजित केली असल्याची माहिती ऐसीअक्षरेच्या माहितगार यांनी दिली असल्याचे तुम्ही वाचले असेलच. पालक आणि शिक्षकांसाठी खुल्या असलेल्या या कार्यशाळेत लगोलग नाव नोंदवले व ही नोंदणी काही दिवसांतच भरली व अनेक उत्सुकांना नाईलाजाने नकारघंटा वाजवावी लागल्याचे कळले.
या कार्यशाळेत नाव नोंदवताना खरंतर धाकधूक होती. मी स्वतः दृश्यकला क्षेत्राच्या जवळपासही जाणारा नाही - कधी गेलो नाही. म्हणजे मला चित्र, शिल्प, रंग वगैरे आवडत नाहीत असं नाही, पण त्यातलं फार काही कळत नाही. अश्या वेळी 'चित्रबोध' मधले व्याख्याते आणि त्यांचे विषय वाचल्यावर खरंतर आपल्याला काही कळेल का? अशी भीती एकीकडे होती आणि अशी संधी दवडता कामा नये असेही वाटत होते. शेवटी नाव नोंदवलेच. 'चिंतातुर जंतू' यांनी तिथला वृत्तान्त ऐसीअक्षरेवर लिहावा असे सुचवले तेव्हा कल्पना आवडली. अर्थात इथे तिथला वृत्तांत लिहिताना काही मर्यादा आहेत. सर्वात मोठी म्हणजे माझे या क्षेत्रातले ज्ञान (खरंतर ज्ञानाचा अभाव). त्यामुळे व्याख्यात्यांचे मला किती समजेल, व त्यातले मी किती शब्दबद्ध करून इथे मांडू शकेन हे मी सांगू शकत नाही. प्रामाणिक प्रयत्न करेन इतकेच म्हणतो. दुसरी मर्यादा जर काहि व्याख्याते आपला विषय उदाहरणादाखल घेतलेल्या चित्रांद्वारे समजावतील तर तो तसा समजावणे कठीण जाणार आहे. तेव्हा या मर्यादा पूर्ण वृत्तान्तमालिकेत गृहीत धराव्यात.

दृश्यकलेच्या हा सोहळ्याला सुरवात करण्यापूर्वी मागवलेल्या अर्जांमध्ये तुमच्या 'चित्रबोध कडून काय अपेक्षा आहेत' असा प्रश्न विचारला होता. बहुदा त्यात व्यक्त केलेले प्रश्न बघून आमच्या या विषयातली नसलेली समज त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी या कार्यशाळेची पूर्वतयारी म्हणून काही दस्तऐवज पाठवले आहेत. या ठिकाणी काय अपेक्षा ठेवावी असे सांगताना तो विरोप म्हणतो:

सांगण्याचा मुद्दा एवढाच, की मुलांचा विचार थोडासा बाजूला ठेवून एक व्यक्ती म्हणून कलेच्या श्रीमंत विश्वाची, त्यातील गुंतागुंतीची, व्यापकतेची ओळख करून घेतली, त्या विश्वाचे भूत आणि वर्तमान समजून घेतले आणि त्यातून मिळणार्या आनंदाचा अनुभव घेता आला, तर हे सगळे मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावेच लागणार नाहीत. सुरुवातीला हे जड जात असल्यासारखे वाटेल; सोपे तर नक्कीच वाटणार नाही. पण कोणती चांगली गोष्ट सोपी असते? तीन दिवसांमध्ये पूर्णपणे समजण्याइतकी सोपी तर नसतेच नसते, मग तीन दिवसांमध्ये काय होऊ शकते? मला वाटते, की मनाला आणि बुद्धीला तिची ‘चव’ कळून चटक लागू शकते. एकदा का एवढे झाले, की पुढचे सगळे आपोआप होते.

शिवाय सोबत जोडलेले दस्ताइवज वाचनीय आहेत. त्यांची अगदी थोडक्यात ओळख या पूर्वतयारीच्या निमित्ताने करून देतो आहे.
पहिल्या दस्तऐवजात चित्रकलेच्या क्षेत्रातील काही जार्गन्सची ओळख करून दिली आहेत. यात अगदी थोडक्यात परंतु बरीच समजेल अश्या शब्दांत पुढील शब्दांची व्याख्या म्हणा (किंवा खरंतर तोंडओळख) करून दिली आहे: रेखाचित्र, रंगचित्र, भित्तिचित्र, गिलावाचित्र, चुनागच्चीकाम, उठावशिल्प, टेराकोटा, सिरॅमिक, लोककला, आदिवासी कला, पटचित्र, लघुचित्र, निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, पुरकचित्र, मुद्राचित्र, चिकटचित्र (collage), मोझाईक, यथार्थदर्शन (Perspective) {टिपः Perspective या इंग्रजी शब्दासाठी 'परिप्रेक्ष्य' असाही एक शब्द आहे. तो दृश्यकलेच्या संदर्भात सहसा वापरला जात नाही}, चित्ररचना, चित्रशैली, आधुनिक कला, अमूर्त कला, डिझाइन .

या प्रत्येकावर १ ते ३ परिच्छेदात माहिती दिली आहे, मात्र विस्तारभयाने इथे जसेच्या तसे देणे योग्य वाटत नाही. (शिवाय मूळ प्रत युनिकोडित नसल्याने इथे टंकन करणे क्षमतेबाहेरचे आहे) इथे केवळ दोन संज्ञांवरच्या टिपणांतील अंश देतो:
मुद्राचित्रः
छपाईतंत्र वापरून एखाद्या चित्राच्या अनेक प्रती काढता येतात हे आपल्याला ठाऊक आहे. परंतु चित्रकलेच्या क्षेत्रात 'मुद्राचित्र' या छपाईतंत्राशी संबंधित शाखेचे जरा वेगळे आहे. एखाद्या सपाट पृष्ठभागावर चित्र काढून त्याचा कागदावर छाप उमटवला की त्याला मुद्राचित्र म्हणता येते. हा पृष्ठभाग दगडाचा, लाकडाचा, धातूचा, प्लॅस्टिकचा किंवा कापडाचाही असू शकतो. त्यावर चित्र काढण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया किंवा तंत्रे असतात. कधी कोरून, कधी रासायनीक प्रक्रिया करून, कधी त्यावर काही वस्तू चिकटवून आणि वरून रंग लावून मग छाप उमटवला जातो.
मुलांकडून आपण वेगवेगळ्या भाज्यांचे काप रंगात बुडवून कागदावर छाप उमटवून घेतो, ते मुद्राचित्राचे अगदी प्राथिमक तंत्र असते. मुद्राचित्रणाला गेल्या काही शतकांचा इतिहास आहे.

अमूर्त कला : इंग्रजीतील Abstract या शब्दासाठी कलेच्या संदर्भात आपण अमूर्त हा शब्द वापरतो. याचा ढोबळ अर्थ असा सांगता येईल : जे आकार किंवा अश्या आकृत्या आपल्याला परिचित असणाऱ्या कोणत्याही आकृतीची, दृश्याची किंवा वस्तूची आठवण करून देत नाहीत. जे पाहून आपल्याला 'हे फूल आहे' किंवा 'हा ससा आहे' असे म्हणता येत नाही, त्यांना 'अमूर्त' म्हणतात. अमूर्त, चित्रकृतीमध्ये रंग, रेषा किंवा आकार शुद्ध, निव्ववळ रूपात येतात. म्हणूनच 'केवलाकार' अशीही संज्ञा त्यासाठी वापरली जाते. या केवलाकारांचे स्वतःचे एक स्वतंत्र जग या कलाकृतीमध्ये वसलेले असते. आपल्या ओळखीच्या जगाशी त्याचे काहीच नाते नसते - किंवा खरे सांगायचे तर नाते असते पण आपण ते शोधत नाही - म्हणून ते 'अमूर्त' असते. जसे संगीताचे निव्वळ स्वर, आलाप, ताना असतात तसे. ते कसलेही वर्णन करत नाहीत की गोष्ट सांगत नाहीत.
अमूर्त, कलेच्या जन्माला जेमतेम शंभर वर्षे झालेली असली तरी ही अमूर्त तत्त्वे विसाव्या शतकातील कलावंतांना अचानक सापडलेली नाहीत.
अगदी आदिकालापासून त्यांच्या खुणा आपल्याला ठिकठिकाणी आढळतात. उदाहरणार्थ, इस्लामी कलेला व्यक्तीदर्शन अमान्य असल्याने कलावंतांनी केवलाकारांचाच आधार घेतला होता. त्यांना पंधराया-सोळाया शतकातच साधलेली अत्यंत कल्पक आणि विकसित अक्षरकला भौमितिक आकारांमधून साधलेले उच्च दर्जाचे अलंकरण पाहताना विसाव्या शतकात उदयाला आलेल्या अमूर्त कलेची पूर्वसूचनाच मिळते. अनेकांना शुद्ध विज्ञानात किंवा शुद्ध गणितातही अमूर्त तत्त्व दिसते. काही वेळा हे सगळे इतके शुद्ध होते, की रसिक बुचकळ्यात पडतात. मात्र, अमूर्त चित्राला नाक मुरडणारे रसिक गायकाने केवळ षड्ज लावला तर "वा, वा! " म्हणत दाद देतात, आणि 'गणित सुंदर असतं' असे म्हणणाऱ्याला आमच्यासारखे कलाप्रेमी लोक वेड्यात काढतात, अशीही गंमत असतेच.

=======
दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये काही कलावंतांच्या लेखनातील किंवा मुलाखतींमधील अंश आहेत. अत्यंत वाचनीय विचार आहेत. पटतीलच असे नाहीत मात्र विचार जरूर करावासा वाटेल असे. मला रोचक वाटलेले काही विचार इथे देतो आहे:

सुरवातीच्या काळात निवडलेल्या वस्तूचे प्रतिचित्रण करायचे उद्देशाने मी रेखाटन करत असे. पण एकदा ते कौशल्य मिळवल्यानंतर रेषांच्या परस्परांबरोबर होणाऱ्या क्रीडेमध्ये लपलेले सौंदर्य आणि संवेदनांना आवाहन करणारे सरळ आणि वळणदार रेषांमधील गुणवैशिष्ट्य शोधायला
मी सुरवात केली. अशी लयबद्ध हालचाल करणाऱ्या रेषेच्या गुणविशेषाने माझे चित्त अधिकाधिक गुंतत गेले. रेषा गाऊ आणि नाचू शकतात हे
माझ्या लक्षात आले. ह्या रेषा अनुकरणशील नाहीत, त्या सर्जनशील आहेत...

मी देशातील सर्व गायक-वादक ऐकले आहेत. प्रत्येक नर्तक-नर्तकीची कला पाहिलेली आहे. पण किती गायक-वादकांनी किंवा नर्तकांनी माझे काम पाहिले आहे, सांगा मला! कुणीही नाही. एकदा बनारसच्या प्रसिद्ध ठुमरी-गझल गायिका गिरिजादेवी ललित कलांविषयीच्या खोसला कमिशनच्या सदस्या होत्या. माझी मुलाखत घेणाऱ्यापैकी त्या होत्या. मी म्हटले, "गिरिजादेवी, तुम्ही या समितीवर कशा आलात हे काही मला समजत नाही. गेली तीस वर्षे मी तुमचं गाणं ऐकतोय; पण तुम्ही माझं एक तरी चित्र पाहिलं आहे का? " नंतर मला वाटले, की सगळ्या कमिशनसमोर मी असे बोलायला नको होते. पण मी सगळ्या समाजाला उद्देशून बोलत होतो.

के. के. हेब्बर (१९१२-१९९६)
चित्रकार, पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव इत्यादींनी सन्मानित

... कलेचा मुख्य प्रवाह म्हणजे काय ते मलाही माहीत नाही. तो इतका विस्तीर्ण आणि वैविध्यपूर्ण असतो! आणि आपण जगाच्या केंद्रस्थानी आहोत असे प्रत्येकालाच वाटत असते. चित्रकार गोगँ जेव्हा फ्रान्स सोडून निघाला, तेव्हा त्याच्या मित्रांनी विचारले की 'पॅरिस हे जगाचं केंद्र असताना ते सोडून तू ताहितीला कशासाठी चालला आहेस? ' गोगँ उत्तरला, "जगाचं केंद्र माझ्या मेंदूत आहे. " विलक्षण उत्तर. प्रत्येक चित्रकाराला असे वाटायला हवे.

अकबर पदमसी (१९२८)
चित्रकार, मूर्तिशिल्पकार, पद्मभूषणाने सन्मानित

... लोकांना फक्त कलाच का कठीण वाटते? माणूस चंद्रावर कसा पोहोचला हे समजते त्यांना? किंवा कावळा का ओरडतो ते? किंवा कोंबडा का
आरवतो ते? मला नाही वाटत ते त्यांना समजते असे. फक्त कलेवरच यांचा हल्ला का?

अर्नवाझ (१९४५-१९८८)
चित्रकार, मूर्तिकार, कुंभकार

या व्यतिरिक्त कार्यक्रमाचे वेळापत्रकही पाठवले आहे. ३१ तारखेला दृश्यकलेची जाण, आपण आणि आपली मुले - वर्षा सहस्रबुद्धे (संध्या. 6 ते 7.30) या विषयाने चित्रबोधास सुरवात होईल.

थोडक्यात सांगायचं तर पात्रांची सिद्धता झाली आहे. उत्सूकता वाढत आहे. प्रत्यक्ष कार्यशाळा सुरू झाल्यावर (किंवा तेव्हा वेळ मिळाला नाही तर नंतर लगेच) मला जमेल तसं मी त्या तीन दिवसांवर इथे लिहावं असा मानस आहे बघूया कसं जमतंय ते.. तूर्तास त्यांनी दिलेली पूर्वतयारी करतो Smile

==
यापुढील भागातः चित्रबोध -१

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

सूचना मनावर घेतल्याबद्दल धन्यवाद. एखादी गोष्ट आपण आपल्या मुलांच्या हितासाठी करतो आहोत असं मानण्यापेक्षा 'आपण स्वतःला जितके समृद्ध करू शकू तितके अधिक चांगले पालक होऊ' या तत्त्वाशी सुसंगत असा हा दस्तऐवज दिसतो.

चित्रातल्या 'पर्स्पेक्टिव्ह'ला मराठीत यथार्थदर्शन म्हणतात हे मलाही ठाऊक नव्हतं. 'पर्स्पेक्टिव्ह'च्या तंत्रामुळे चित्र अधिक खर्‍यासारखं वाटू लागतं हे मात्र खरं. विकीपीडिआवर पाहिलं तर 'approximate representation of an image as it is seen by the eye' हा अर्थ दिसतो तो याला पूरक आहे. हेब्बरांचं म्हणणं मला रोचक वाटलं. गिरिजादेवींचं गाणं मला आवडतं आणि हेब्बरांची कलादेखील, पण एकमेकांचं मूल्यमापन करण्याची त्यांची क्षमता कशी असेल हे सांगता येणार नाही.

>>इथे तिथला वृत्तांत लिहिताना काही मर्यादा आहेत. सर्वात मोठी म्हणजे माझे या क्षेत्रातले ज्ञान (खरंतर ज्ञानाचा अभाव). त्यामुळे व्याख्यात्यांचे मला किती समजेल, व त्यातले मी किती शब्दबद्ध करून इथे मांडू शकेन हे मी सांगू शकत नाही.

कार्यशाळा अशा अनभिज्ञ लोकांसाठीच असल्यामुळे तिची परिणामकारकता तुमच्यासारख्यांच्या वृत्तांतातून चांगल्या प्रकारे उमजेल असं वाटतं. त्यामुळे पुढच्या वृत्तांताच्या प्रतीक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पार्श्वभूमी तर छान रंगली आहे. पुढचे लेख वाचायला उत्सुक आहे.

मला एक प्रश्न आहे. कदाचित या कार्यशाळेतून त्याचं उत्तर मिळू शकेल.

तंत्रज्ञानाचा आत्तापर्यंत चित्रकलेवर परिणाम होत गेलेला आहे. नुसता माध्यमांमधला बदल या अर्थाने नाही, तर कलेतील प्रवाहच बदलले. उदाहरणार्थ फोटोग्राफीच्या उदयानंतर चित्रकला अधिक अमूर्त होत गेली. तशी सध्या तांत्रिक क्रांती डिजिटल कॅमेराच्या उपलब्धतेतून आणि इंटरनेटद्वारे होत आहे. एके काळी चित्र पहायला मिळणं ही तितकीशी सोपी गोष्ट नव्हती. सध्या प्रतिमांचा स्फोट झाला आहे. यातून चित्रकलेतले काही प्रवाह बदलत आहेत का? बदलले तर कुठच्या दिशेने जातील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आतातरी भाषणे, चर्चा इत्यादींचे विषय बघता या प्रश्नांना विस्ताराने उत्तर मिळेल असे वाटत नाही. सचिन कुंडलकरच्या भाषणाच्या मुद्यांमधे "व्हॉडीयो आर्ट आणि इन्स्टॉलेशन आर्ट यांचा माझ्या कामावर झालेला परिणाम" हा एक मुद्दा आहे तो वरील प्रश्नांच्या एका मितीला (निसटता) स्पर्श करीलसे वाटते. बाकी भाषणाचे विषय माहितगारांच्या धाग्यात वाचायला मिळतीलच (दुवा वर लेखात दिलाय)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मनःपूर्वक अभिनंदन करावे ऋषिकेश यांचे या सुंदर "पूर्वतयारी" वृत्तांताबद्दल.
[बर्‍याच दिवसांनी खूप चांगले वाचायला मिळाले इथे....हे आवर्जून सांगणे क्रमप्राप्त आहे.]

"मी त्या तीन दिवसांवर इथे लिहावं असा मानस आहे बघूया कसं जमतंय ते...."

हे तुम्ही विनयाने म्हणत आहात असेच मी म्हणेन. विषयातील 'ज्ञानाचा अभाव आहे' असे वर लेखात म्हटले गेले आहे. पण ती शक्यता धूसर आहे असेच मला वाटते. तुमच्या व्यक्तिमत्वातील 'चित्रकार' तुम्हाला ते नक्की जमवून देईल याचा मला विश्वास आहे.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपक्रम! पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचतोय आणि वाट पाहतोय! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'पूर्वतयारी' वाचून प्रत्यक्ष कार्यशाळेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तुम्ही त्याविषयी सविस्तर लिहायचे ठरवले आहे हे वाचून आनंद झाला. वाट पाहते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आस्वाद घेत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

वाहवा. पुढचा लेख वाचायला उत्सूक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा भाग आवडला आणि यापुढील भागांबाबत उत्सुकता आहे हे नोंदवून...
कलेच्या आस्वादाचे असे शास्त्रशुद्ध शिक्षण घेणे ( आणि ते तसे घेता येते का) याबाबत माझ्या मनात काही मूलभूत शंका आहेत. जी.एंच्या कथांवरचे धों.वि. देशपांड्यांचे रसग्रहणात्मक पुस्तक आणि माधव आचवलांचा प्रदीर्घ लेख (हे दोन्ही जी.एंच्या कथांच्या रसग्रहणाबाबतचे दिग्गज मापदंड मानले जातात) वाचून मला जीएंची कथा अधिक समजली की माझ्या मनात अधिक गोंधळ झाला हे मला ठाऊक नाही. 'काकस्पर्श' 'धोबी घाट' हे चित्रपट मला मुळीच आवडले नाहीत. त्यांमधील सौंदर्याची मर्मस्थळे त्या क्षेत्रातील जाणकारांनी समजावून सांगितल्यानंतर तर अधिकच आवडले नाहीत. या बाबतीत पिकासोची चित्रे पाहिल्यानंतर 'जे तू चित्रात काढतोस ते जर खरोखर तुला दिसत असेल तर एखाद्या शहाण्या डॉक्टरला आपलं डोकं दाखवून का घेत नाहीस?' असे म्हणणार्‍या मित्राप्रमाणे माझी अवस्था आहे. पिकासोचे प्रत्येक चित्र पाहून थोबाडीत मारल्याप्रमाणे चेहरा करुन पुढे सरकणारा सामान्य माणूस आणि पिकासोच्या अमूर्त चित्रांतून कदाचित पिकासोलाही अभिप्रेत नसणारा अर्थ काढणारा मर्मज्ञ रसिक यांच्यात काही मूलगामी फरक आहे का हे मला ठाऊक नाही. आणि तो जर तसा असेल तर अशा प्रकारच्या 'ट्रेनिंग'ने तो दूर होतो का हेही मला ठाऊक नाही. पण असे असेल तर मग फारच सोपे झाले म्हणायचे. सौंदर्यशास्त्रातला असा 'क्रॅश कोर्स' घेऊन कुणालाही समीक्षक होता येणे हे म्हणजे दिडकीची भांग घेतली की हजार कविता सुचण्याइतकेच सोपे झाले.
असो, हे असे असण्यामागे माझ्या ज्ञानाच्या आणि वकूबाच्या मर्यादा हे कारण असणे शक्य आहे - किंबहुना ते तसेच असावे- हा आरोप होण्याआधीच तो मला मान्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

माझ्या मनातले बरेच काही तुम्ही तुम्ही लिहिले आहेत. मात्र माझा एक रसिक मित्र अनेक प्रदर्शने पाहत हिंडतो. अगदी 'पिकासो' छापही. त्याला मी एकदा विचारले होते "की काय रे तुला कळतात का रे चित्र?"
तो मला म्हणाला होता, "कळतात की नाही माहित नाही, आवडतात जरूर. आणि कलेच्या प्रान्तात प्रत्येक गोष्ट 'कळलीच' पाहिजे हा अट्टाहास नसतो. ती 'आवडावी' - तीने आपल्याही (बघणार्‍याच्या) मनात काही भाव उत्पन्न करावेत- अशी अपेक्षा जरूर असते. तुम्हा सायन्सच्या लोकांना (हा टोमणा मी दुर्लक्षित केला हेसांन) गोष्ट कळली नाहि तर ती आवडतच नाही त्यामुळे तुझे असे होत असेल पण चित्र बघत रहा आपोआप गोडी लागेल."

त्यामुळे एखाद्या गोष्टीमागचा प्रवास, इतिहास, मर्मस्थळे एखाद्याने समजावली तर ती गोष्ट कदाचित आवडू लागेल या आशेवर आहे.

सौंदर्यशास्त्रातला असा 'क्रॅश कोर्स' घेऊन कुणालाही समीक्षक होता येणे

असा माझा अजिबात उद्देश नाही. किंबहुना आयोजकांचाही तसा उद्देश नसावा. लेखात त्यांची भुमिका दिलीच आहे इथे पुन्हा उद्धृत करतो:

पण कोणती चांगली गोष्ट सोपी असते? तीन दिवसांमध्ये पूर्णपणे समजण्याइतकी सोपी तर नसतेच नसते, मग तीन दिवसांमध्ये काय होऊ शकते? मला वाटते, की मनाला आणि बुद्धीला तिची ‘चव’ कळून चटक लागू शकते.

आतापर्यंत न चाखलेल्या किंवा पूर्वग्रहाने चाखलेल्या या चवीची चटक लागावी असा किमान माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे. अर्थात तरिही मला चव आवडली नाही तर किमान माझ्याकडून मी प्रयत्न केला असे (कदाचित फसवे?) समाधान मिळेल असे वाटते.

====
शिवाय आत्ताच तिसरी अटॅचमेंट उघडली. ३१ मेच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेत वर्षा सहस्रबुद्धे यांच्या भाषणाचे मुद्दे बरेचसे तुमच्या मुद्यांना स्पर्श करतीलसे वाटते. भाषणाचा विषय इथे उद्धृत करतो:

आपल्या जीवनात हस्तकलांचे स्थान असणे किंवा नसणे म्हणजे काय, हे समजून घेणे आवश्यक आहे. जे आपल्या जीवनाचा भाग असते ते मुलांपर्यंत आपोआप झिरपते. नसेल, तर मुलेही त्यापासून वंचित राहण्याची शक्यता अधिक असते.
· कलेची जाण असणे आणि कलेचा क्लास लावणे यांमधील, किंवा कलेची जाण आणि स्पर्धा, पदके, बक्षिसे यांमधील संबंध/असंबंध तपासून पाहावा लागेल.
· ‘पाहायला’ शिकावे लागते. विविध पृष्ठभाग, माध्यमे, मिती, उजेड - अंधार, रंगरेषा यांविषयीची जाणीव आणि संवेदनशीलता जपणे-जोपासणे महत्त्वाचे असते.
· प्रत्येक मूल पुढे चित्रकार होणार नसेल, तरी सुरवातीच्या टप्प्यात त्याने चित्रातून व्यक्त होण्याचे महत्त्व ओळखणे गरजेचे असते
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पूर्वतयारी तर उत्तम झाली आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद ऋ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

फार छान सुरवात, कार्यशाळा झाल्यावर ही चर्चा / लेखमाला अजुन रंगतदार होईल.

वाचत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>कलेच्या आस्वादाचे असे शास्त्रशुद्ध शिक्षण घेणे ( आणि ते तसे घेता येते का) याबाबत माझ्या मनात काही मूलभूत शंका आहेत. जी.एंच्या कथांवरचे धों.वि. देशपांड्यांचे रसग्रहणात्मक पुस्तक आणि माधव आचवलांचा प्रदीर्घ लेख (हे दोन्ही जी.एंच्या कथांच्या रसग्रहणाबाबतचे दिग्गज मापदंड मानले जातात) वाचून मला जीएंची कथा अधिक समजली की माझ्या मनात अधिक गोंधळ झाला हे मला ठाऊक नाही.

हा तर्क पुढे नेला तर असंही म्हणता येईल की आस्वादात्मक कला (साहित्य, चित्रकला, चित्रपट, नाटक वगैरे) यांचं शिक्षण घेऊन काहीही फायदा होत नाही. असं विधान छातीठोकपणे करता येईल असं स्पष्ट चित्र प्रत्यक्षात दिसत मात्र नाही. अ‍ॅरिस्टॉटलच्या काव्यशास्त्रापासूनचा आणि भरताच्या नाट्यशास्त्रापासूनचा इतिहास असं सांगतो की कलेच्या आस्वादातून माणसाला आनंद का मिळतो याचा शोध अनेकांनी घेतलेला आहे. लिओनार्डो दा विन्चीसारखा वैज्ञानिक-कलाकार किंवा व्ही. एस. रामचंद्रनसारखे मेंदूवैज्ञानिकसुद्धा याचा शोध घेऊ पाहतात. त्यातले काही विचार तुमच्या मनाला पटतील अन् काही पटणार नाहीत. पण अशा प्रयत्नांतून काहीच हाताला लागणार नाही असा विचार काहीसा आक्रस्ताळा वाटतो. कदाचित तो चुकीच्या उदाहरणांमुळे निर्माण झालेल्या पूर्वग्रहांतून तसा झाला असण्याची शक्यता जाणवते.

>>पिकासोचे प्रत्येक चित्र पाहून थोबाडीत मारल्याप्रमाणे चेहरा करुन पुढे सरकणारा सामान्य माणूस आणि पिकासोच्या अमूर्त चित्रांतून कदाचित पिकासोलाही अभिप्रेत नसणारा अर्थ काढणारा मर्मज्ञ रसिक यांच्यात काही मूलगामी फरक आहे का हे मला ठाऊक नाही.

कलेचं किंचित शिक्षण घेतलं तर किमान हे तरी कळू शकेल की पिकासोची चित्रं अमूर्त नाहीत.

>>सौंदर्यशास्त्रातला असा 'क्रॅश कोर्स' घेऊन कुणालाही समीक्षक होता येणे हे म्हणजे दिडकीची भांग घेतली की हजार कविता सुचण्याइतकेच सोपे झाले.

हेही काहीसे आक्रस्ताळे विधान वाटते. विशेषतः धाग्यात उद्धृत केलेल्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर :

सांगण्याचा मुद्दा एवढाच, की मुलांचा विचार थोडासा बाजूला ठेवून एक व्यक्ती म्हणून कलेच्या श्रीमंत विश्वाची, त्यातील गुंतागुंतीची, व्यापकतेची ओळख करून घेतली, त्या विश्वाचे भूत आणि वर्तमान समजून घेतले आणि त्यातून मिळणार्‍या आनंदाचा अनुभव घेता आला, तर हे सगळे मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावेच लागणार नाहीत. सुरुवातीला हे जड जात असल्यासारखे वाटेल; सोपे तर नक्कीच वाटणार नाही. पण कोणती चांगली गोष्ट सोपी असते? तीन दिवसांमध्ये पूर्णपणे समजण्याइतकी सोपी तर नसतेच नसते, मग तीन दिवसांमध्ये काय होऊ शकते? मला वाटते, की मनाला आणि बुद्धीला तिची ‘चव’ कळून चटक लागू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अपेक्षित प्रतिसाद लवकर आल्याने वाट बघणे वाचले. वाईटातून पहिले चांगले घडते ते हे असे. एरवी अशा तिरक्या (म्हणजे प्रतिसादाला उपप्रतिसाद अशा) प्रतिसादांवर लिहिण्याचे काहीच कारण नाही, पण माझ्या प्रतिसादातली काही वाक्ये उचलून त्यावर टिप्पणी केली असल्याने काही स्पष्टीकरण देणे गरजेचे वाटले.
पण अशा प्रयत्नांतून काहीच हाताला लागणार नाही असा विचार काहीसा आक्रस्ताळा वाटतो. कदाचित तो चुकीच्या उदाहरणांमुळे निर्माण झालेल्या पूर्वग्रहांतून तसा झाला असण्याची शक्यता जाणवते.
काही हाताला लागेल की नाही याबाबतची शंका आणि काही हाताला लागणार नाही हा विचार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. असा विचार असेल तर त्याला आक्रस्ताळेपणा जरुर म्हणावा. शंकेला तसे म्हणण्याचे काहीच कारण नाही. कोणत्याही विधानाबाबत शंका घेणे हे एका चिकित्सक मनाचे लक्षण आहे. पुढे एखाद्या माणसाची मते त्याच्या काही पूर्वग्रहांतून जन्माला आली असावीत हे त्या माणसाला पुरेसे नव्हे तर काहीच न ओळखता म्हणणे हे आक्रस्ताळेपणाचे नाही काय?
कलेचं किंचित शिक्षण घेतलं तर किमान हे तरी कळू शकेल की पिकासोची चित्रं अमूर्त नाहीत.
हा हा.. फारच विनोदी विधान. यावर प्रतिवाद करण्याचा मोह त्या प्रतिवादाला आक्रस्ताळेपणा म्हटले जाईल या भीतीने टाळतो. एकूण आक्रस्ताळेपणा हा या चर्चाविषयातला परवलीचा शब्द दिसतो!
मुलांचा विचार थोडासा बाजूला ठेवून एक व्यक्ती म्हणून कलेच्या श्रीमंत विश्वाची, त्यातील गुंतागुंतीची, व्यापकतेची ओळख करून घेतली, त्या विश्वाचे भूत आणि वर्तमान समजून घेतले आणि त्यातून मिळणार्‍या आनंदाचा अनुभव घेता आला, तर हे सगळे मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावेच लागणार नाहीत. सुरुवातीला हे जड जात असल्यासारखे वाटेल; सोपे तर नक्कीच वाटणार नाही. पण कोणती चांगली गोष्ट सोपी असते? तीन दिवसांमध्ये पूर्णपणे समजण्याइतकी सोपी तर नसतेच नसते, मग तीन दिवसांमध्ये काय होऊ शकते? मला वाटते, की मनाला आणि बुद्धीला तिची ‘चव’ कळून चटक लागू शकते.
पुन्हा आक्रस्ताळेपणाचा आरोप स्वीकारायची तयारी ठेऊन म्हणतो की तीन दिवसांचा 'दारु कशी प्यावी?' असा एक कोर्स तयार केला तर त्यालाही वरील विधान लागू पडणार नाही काय? 'दारु' हा शब्द खटकत असेल तर त्या जागेवर 'वाईन' हा शब्द घ्या. चव कळून चटक लागणे तर त्या बाबतीतही लागू पडेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

सन्जोपराव,
मी सरळ नाव घेऊनच लिहितो आहे म्हणजे किमान तिरकसपणाचा आरोप माझ्यावर येणार नाही. तुमचा आणि जंतू यांचा संवाद वाचतो आहे. तुम्ही तुमच्या विनोदी शैलीत प्रस्तुत उपक्रमासारख्या गोष्टींच्या उपयुक्ततेबद्दल कोपरखळ्या मारल्या आहेत. आणि कुठल्याही गोष्टीच्या उपयुक्ततेबद्दल असे प्रश्न मांडणे हे योग्यच आहे. या शंका व्यक्त करताना तुमच्या काही तपशीलाच्या चुका झाल्या आहेत असं जंतूंचं म्हणणं आहे आणि प्रस्तुत उपक्रमासारख्या गोष्टींमागचा एक विस्तृत दृष्टीकोन ते दाखवत आहेत. इतःउप्पर या चर्चेला व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांचं स्वरूप येऊ नये इतकीच इच्छा इथे व्यक्त करतो. कळावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अशा काही मामल्यांमध्ये अज्ञानातला आनंद बरा असे वैयक्तिक मत असल्याने, धाग्याचा आस्वाद घेतला इतकेच म्हणतो. Smile
'सरळ तिरकसपणा' आणि 'तिरकस सरळपणा' अशा दोन विशेषणांना जन्म द्यायला हरकत नाही, असे काही धागे असतात. हा त्यापैकीच एक. त्यामुळं या विषयावरच्या पुढच्या धाग्याची वाट पाहतो... Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>कोणत्याही विधानाबाबत शंका घेणे हे एका चिकित्सक मनाचे लक्षण आहे.

अगदी बरोबर. पण खालील ठळक विधानांत शंका असेल तर ती नक्की कशाविषयी ते मला समजत नाही. "सौंदर्यशास्त्रातला असा 'क्रॅश कोर्स' घेऊन सामान्य माणसाला समीक्षक होता येणार नाही" असा ठोस शेरा मला यात दिसला. (अर्थात, माझा मराठीचा किंवा 'प्रूफ बाय काँट्राडिक्शन'चा अभ्यास किती, अशी चिकित्सक शंका यावर काढता येईलही.) शिवाय, प्रस्तुत उपक्रम हा समीक्षक बनवण्यासाठी चालवला जाणार आहे असा दावा या किंवा आधीच्या धाग्यावर दिलेल्या माहितीत कुठे आढळला नाही. त्यामुळे ही टिप्पणी इथे अवांतर वाटली. असो.

>>पिकासोचे प्रत्येक चित्र पाहून थोबाडीत मारल्याप्रमाणे चेहरा करुन पुढे सरकणारा सामान्य माणूस आणि पिकासोच्या अमूर्त चित्रांतून कदाचित पिकासोलाही अभिप्रेत नसणारा अर्थ काढणारा मर्मज्ञ रसिक यांच्यात काही मूलगामी फरक आहे का हे मला ठाऊक नाही. आणि तो जर तसा असेल तर अशा प्रकारच्या 'ट्रेनिंग'ने तो दूर होतो का हेही मला ठाऊक नाही. पण असे असेल तर मग फारच सोपे झाले म्हणायचे. सौंदर्यशास्त्रातला असा 'क्रॅश कोर्स' घेऊन कुणालाही समीक्षक होता येणे हे म्हणजे दिडकीची भांग घेतली की हजार कविता सुचण्याइतकेच सोपे झाले.

>>पुन्हा आक्रस्ताळेपणाचा आरोप स्वीकारायची तयारी ठेऊन म्हणतो की तीन दिवसांचा 'दारु कशी प्यावी?' असा एक कोर्स तयार केला तर त्यालाही वरील विधान लागू पडणार नाही काय?

पडेल आणि माझा त्याला काहीच आक्षेप नसेल. ज्याला जे शिकावंसं आणि शिकवावंसं वाटेल त्यानं ते करावं. मुद्दा कळला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझ्याकडून पूर्णविराम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आज पालकनितीकडून आलेल्या विरोपानूसारः
चित्रबोध अंतर्गत सुदर्शनकलामंचमधे दोन लघुपट दाखवले जाणार आहेत
दिनांक 1 जून रोजी संध्याकाळी - सुधीर पटवर्धनांची चित्रं आणि जेष्ठ कवी नारायण सुर्वेंचे शब्द यांनी घेतलेला मुंबई या महानगरीचा वेध आपल्यासमोर उलगडणारा 'सांचा' हा लघुपट
दिनांक 2 जून रोजी संध्याकाळी - निसर्गात जाऊन निसर्गातल्याच गोष्टी वापरून विलक्षण कल्पकतेनं शिल्पनिर्मिती करणार्या कलाकारावरचा जगावेगळा अनुभव देणारा लघुपट : रीव्हर्स आणि टाईड्स दिग्दर्शक अॅ न्डी गोल्ड्सवर्दी

सुचाना अशी की 'हे चित्रपट सर्वांसाठी खुले असतील'.

चित्रबोधच्या सहभागींना हवे तर पाहाता येतीलच पण इतरांना पाहायचे असतील तर त्यांनीही संध्याकाळी (वेळ कळलेली नाही, पण संध्याकाळी ५:३० - ६:०० नंतरच असावेत असा अंदाज) यावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!