फ्युचर शॉक!

"ढीपू, काय आश्चर्य! किती वर्षानी भेटत आहेस.... वीस वर्ष तरी झाले असतील... कॉलेजमध्ये असताना... हे काय तुझ्या हातात पिस्तूल...?"

"मी तुला ठार मारण्यासाठी आलोय." ढीपूचे उत्तर, "तेही तुझ्याच लेखी संमतीने.."

"तू काय बोलतोस, कशाबद्दल बोलतोस... काही समजत नाही."

"तुला आठवत नाही का कॉलेजच्या हॉस्टेलवर गप्पा मारत असताना शंभर वेळा तरी तू बोलला असशील... मी कधीतरी कम्युनिस्ट पक्ष सोडून दुसर्‍या कुठल्याही पक्षात गेल्यास गोळी घालून मला ठार करा. आज तू तृणमूल कॉंग्रेस पक्षाचा आमदार आहेस. पक्ष बदललास. तुझी तत्वनिष्ठा ढासळली. त्यामुळे तुला आता मरावे लागेल."

" वेडा की खुळा!... वीस वर्षापूर्वीची गोष्ट... तू आज उकरून काढत आहेस.... मी त्यावेळी तरुण होतो..... आयडियालिस्टिक होतो..... एवढ्याशा कारणावरून माझ्यावर गोळी...."

" कारण क्षुल्लक नाही... अत्यंत गंभीरपणे, प्रामाणिकपणे, जबाबदारीने, राजीखुशीने, कुठलेही नशापाणी न करता तू ते विधान केला होतास. तसे तू लिहूनही दिला होतास. त्यावर चार साक्षिदारांच्या सह्या आहेत. आता तू ते नाकारू शकत नाहीस. ... हे कसले तरी तुझ्याविरुद्धचे कुभांड आहे असे म्हणण्यापूर्वी अजून एक गोष्ट लक्षात ठेव. अलिकडेच तुझ्या पक्षाने बहुमताच्या जोरावर एक कायदा पास करून घेतला आहे. त्या कायद्यानुसार कुठलिही व्यक्ती इच्छामरणाविषयीचा उल्लेख मृत्युपत्रात केलेला असल्यास त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. भविष्यात कधीतरी तु्झ्यात बुद्धीभ्रंशाची लक्षणं दिसल्यास तुला मारून टाकण्यात यावे अशा मजकूराचा इच्छापत्र लिहू शकतोस. व त्याची अंमलबजावणी तुझ्या पक्षाचे सरकार नक्कीच करेल. भविष्याऐवजी तू तूझ्या भूतकाळात उल्लेख केलेल्या इच्छेस मान देऊन तुला आता का मारू नये?"

"मी... मी... तुझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच देऊ शकतो." आमदार ओरडला, "मला थोडासा वेळ दे."

ढीपू पिस्तुलावरील पकड घट्ट करून चाप ओढून आमदारावर ऱोखून धरला. "तुला काय सांगायचे ते पटकन सांग. मला वेळ नाही..."

--------- ----- ------- ----------

आमदाराकडे सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. परंतु तत्पूर्वी आपण यासंबंधी एक मूलभूत प्रश्न विचारू शकतो. स्वत:विषयीचे भविष्यकाळातील निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला कुणी बहाल केला? कदाचित याचे उत्तर असे असू शकेल:

आपण आपल्यासंबंधी भूतकाळात शेकड्यानी निर्णय घेतलेले आहेत. वर्तमानातील आजच्या घडीतील निर्णय घेण्यास आपल्याला कुणीही अडवू शकत नाही. त्यामुळे भविष्याकाळातील स्वत:संबंधीचे निर्णय घेतल्यास बिघडले कुठे? उदाहरणार्थ, घरासाठी कर्ज, कारलोन, इत्यादी घेताना भविष्यकाळात आम्ही घेतलेले कर्ज हप्त्या-हप्त्याने फेडू अशी हमी देत असतो. पेन्शन प्लॅन वा विमासंरक्षणासाठी सहीनिशी संमती देत प्रिमियम भरत असतो. मरेपर्यंत नसले तरी काही निर्दिष्ट कालावधीसाठी आपण दिलेली हमी स्वीकारार्ह ठरते. व तो निर्णय आपल्यावर बंधनकारक असतो. प्रतिज्ञा पत्र, हमी पत्र, कुलमुखत्यारपत्र इत्यादी प्रकारच्या कागदपत्रावर भविष्यातील निर्णयप्रक्रियेशी संबंधित गोष्टीविषयी बिनदिक्कतपणे सह्या करत असतो. या नंतरच्या काळात आपली मानसिक स्थिती काय असेल वा बदलत्या परिस्थितीत आपण घेतलेला त्या वेळचा निर्णय आपल्याला गोत्यात तर आणणार नाही ना याची फिकीरही आपल्याला नसते.

आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करणे आपले कर्तव्य आहे. जरी भविष्यातील आपली स्थिती - गती, आपले विचार, आपल्या नीतीमत्तेच्या कल्पना, बदलल्या तरी या कर्तव्यात किंचितही कसूर करता येत नाही. अनेक जण ऐन तारुण्यात मी अमुक अमुक केल्यास मला फासावर लटकवा असे बिनदिक्कतपणे चारचौघात बढाया मारत असतात. जरी भावनेच्या भरात ते असे काही बरळत असले तरी त्यात मोठ्या प्रमाणात प्रामाणिकतेचा अंश असतो. शिवाय आपण स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याच्या वयात आलेलो आहोत हेही जगाला दाखविण्याची खुमखुमी असते. त्यामुळे अशा प्रकारची आचरट विधानं करताना भविष्यात काय वाढून ठेवले असेल याची अजिबात कल्पना त्यांनाही नसती व ऐकणाऱ्यांनाही नसती. त्यामुळे असे विधान करणार्‍यांना त्या विधानापोटी वेठीस धरणे सयुक्तिक ठरणार नाही.

अगदीच खून न करता वीस वर्षापूर्वीची आपली राजकीय मतं बदलणार्‍याला शिक्षा द्यायला हवी, यात काही चूक आहे का? वीस वर्षापूर्वी लग्नाच्या बोहल्य़ावर चढताना नववधूला दिलेली आश्वासनं न पाळल्यास समाज शिक्षा देतोच की. त्याच न्यायाने तत्वनिष्ठा बदलल्यास शिक्षा का नाही?

तत्वनिष्ठा आणि विवाहबंधन यात फरक आहे. विवाहबंधन तोडताना बायको - मुलं यांचा विचार करावा लागतो. इतक्या सहजासहजी त्या जबाबदारीतून मुक्त होता येत नाही. तसा प्रयत्न केल्यास इतरांना क्लेश होतो, त्रास होतो. व हे समाजाला मान्य होणार नाही. परंतु राजकीय तत्वनिष्ठा वा धार्मिक मतं बदलल्यास त्यातून इतर कुणालाही इजा होत नाही. ती सर्वस्वी वैयक्तिक मतं असतात. व ही मतं बदलत गेल्यामुळे आपण कुठल्याही प्रकारच्या कराराचा भंग करत नाही.

एक मात्र खरे की आपण जेव्हा भविष्यातील कालखंडासाठी एखादा निर्णय घेत असतो तेव्हा आपली मानसिक स्थिती त्या निर्दिष्ट कालखंडात कशी असेल याची अजिबात कल्पना आपल्याला नसते. त्याचा अंदाजही आपण करू शकत नाही. आपण सतत बदलत असतो. आपले विचारं, आपली मतं बदलत असतात. आजचे आपण उद्या नसतो. त्यामुळे आपल्या वतीने घेतलेले भविष्यासाठीचे निर्णय आपल्यासाठी नसून त्या बदलत गेलेल्या दुसर्‍याच कुठल्यातरी व्यक्तीसाठी आहे की काय असे वाटू लागते. त्यामुळे तो निर्णय आपल्यावर बंधनकारक ठरत नाही.

हेच जर खरे असेल तर मृत्युपत्रांची वा इच्छापत्रांची अंमलबजावणी कशी करायची? मुळात असल्या कागदपत्रात भविष्यात जेव्हा आपल्या बुद्धीवर आपला ताबा नसतो त्यासाठी नेमके काय काय करावे याची माहिती व बंधनकारक सूचना असतात. त्यासाठीचा निर्णय 'आता'चा बुद्धीने विकलांग झालेल्यानी न घेता भूतकाळातील जबाबदार व्यक्तीने घेतल्या आहेत व त्या अत्यंत योग्य आहेत, हेच ती कागदपत्रं सूचित करत असतात. म्हणूनच मृत्युपत्र कितीही वेळा बदलण्याची मुभा असते.

आमदाराचे ढीपूला देण्यात येणार्‍या उत्तरात हे सर्व मुद्दे यायला हव्यात. हा तार्किक विचार ढीपूला समजावून द्यायला हवे.

परंतु हे उत्तर ऐकून ढीपू पिस्तूलच्या चापावरील पकड सैल करतो की घट्ट करतो हा एक अत्यंत वेगळा विषय ठरेल.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

ढिपू हे नाव आवडले Wink
बाकी रोचक चर्चाविषय आणि त्याहून रोचक मांडणी आहे. तुर्तास घाईत आहे. नंतर वेळ मिळताच विस्ताराने लिहितो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कुणाला इजा होते का, कराराचा भंग होतो का वगैरे गोष्टी कायदा आणि न्यायाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. पण मतपरिवर्तन होणं यात मूलतः काहीच गैर नाही; किंबहुना मानवी आयुष्यात अशा मतस्वातंत्र्याला जागा असायला हवी. लग्न केलं तरी घटस्फोट घेता येतो इथपासून ते अभिजित देशपांडे यांचं 'एक होता कारसेवक' किंवा सम्राट अशोकानं उपरती होऊन बौद्धधर्म स्वीकारणं यांसारख्या अनेक उदाहरणांतून हे सिद्ध होईल. 'सिगारेट पिणं हे आरोग्याला हानिकारक आहे' अशासारखे वैधानिक इशारे असोत किंवा जाहिराती असोत; मतपरिवर्तन करण्यासाठी त्यांचं आयोजन असतं. माझं मत बदलण्याचा प्रयत्न करण्याचा हक्क (विशिष्ट मर्यादेत) इतरांना असावा आणि मत बदलायचं की नाही हा अंतिम हक्क मला असावा (अर्थात, त्याच्या कायदेशीर परिणामांची जबाबदारी घेणं हे ओघानं आलंच). थोडक्यात, मत बदलण्याचं स्वातंत्र्य हे मूलतः संकल्पस्वातंत्र्य (फ्री विल) आणि विचारस्वातंत्र्याशी संबंधित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||