आजचा सुधारक – मे २०१२

अरुण टिकेकर यांच्या ‘तारतम्य’मधला मध्यमवर्गात घडलेल्या बदलांविषयीचा ‘मध्यमवर्ग : स्वप्न आणि काळजी’ या शीर्षकाचा उतारा ‘आजचा सुधारक’च्या मे अंकाच्या मुखपृष्ठावर आहे. प्रदीप पुरंदरे यांची ‘पाणी मागतात... च्यायला’ ही कविता या अंकात वाचायला मिळते. (‘लोकसत्ता’मधल्या वाचावे नेट-के मध्ये पुरंदरे यांची आणि त्यांच्या ‘जागल्या’ या ब्लॉगची दखल नुकतीच घेण्यात आली होती. ही कविता त्या ब्लॉगवरून पुनर्प्रकाशित केलेली आहे.) ‘पैसा’ ही संकल्पना आपल्याला कशी जाणवते याविषयी दिवाकर मोहोनी यांनी जी लेखमाला चालू केली आहे तिचा दुसरा भाग या अंकात आहे. अधिकाधिक उत्पादन आणि सर्वांना रोजगार या औद्योगिक क्रांतीमधून आलेल्या सामाजिक मूल्यांमुळे काय बदल झाले याचा उहापोह या लेखात आहे. ‘नैतिक वास्तववाद्यांच्या शोधात’ हा लेख म्हणजे ‘न्यूयॉर्क टाईम्स’ मधले स्तंभलेखक डेव्हिड ब्रूक्स यांच्या ‘Sam Spade at Starbucks’ या लेखाचा मथितार्थ आहे. सामाजिक कार्यात सहभाग घेण्याच्या भावनेनं प्रेरित पण राजकारणाची नावड असणाऱ्या उत्साही तरुणांना डॅशिएल हॅमेट ('मॉल्टीज फाल्कन') आणि रेमंड चँडलर यांच्या डिटेक्टिव्हकथा वाचायचा आणि त्यातल्या न्वार नायकांचा अभ्यास करायचा सल्ला देणारा हा लेख रोचक शैलीत आणि वास्तववादी दृष्टिकोनातून लिहिलेला आहे. नंदा खरे यांचा ‘होम्स ते हॅनिबल’ हा इंग्रजी डिटेक्टिव्हकथांवरचा लेख याच धाग्याला पुढे नेतो. बदलतं समाजवास्तव आणि त्या काळात लिहिल्या गेलेल्या डिटेक्टिव्हकथा असा प्रवास, अगदी ‘सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’ किंवा CSI, ‘गर्ल विथ अ ड्रॅगन टॅटू’पर्यंत हा लेख रेखतो.

अमेरिकेतल्या टी पार्टीच्या प्रभावामुळे घेतल्या गेलेल्या आर्थिक निर्णयांच्या दुष्परिणामांविषयी ‘अमेरिकेची दिवाळखोरी’ हा श्रीनिवास खांदेवाले यांचा लेख या अंकात वाचायला मिळतो. सुनीती देव यांचा ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी लिव्ह-इन रिलेशनशिप मंडळ’ हा लेख विचारप्रवर्तक आहे. अरविंद गोडबोले यांनी काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या मंडळाविषयीच्या काही बातम्यांचा आणि त्या अनुषंगानं आलेल्या प्रतिक्रियांचा त्याला आधार आहे.

प्रभाकर नानावटी यांच्या ‘मानवी अस्तित्व’ ह्या लेखमालेअंतर्गत परग्रहावरच्या जीवसृष्टीच्या शोधाविषयी या अंकात विवेचन आहे. 'इंडियन एक्सप्रेस'चे संपादक शेखर गुप्ता यांनी गेल्या वर्षी ‘सिंगापूर फँटसी’ हा लेख लिहिला होता. त्याचा सटीप वृत्तान्तदेखील ‘सिंगापूर आणि टी-ट्वेंटी वृत्ती’ या लेखात वाचायला मिळेल.

कारागृहातल्या महिला कैद्यांच्या छळणूकीविषयी ‘हिंदू’ या दैनिकात ३ एप्रिल रोजी दिव्या त्रिवेदी यांचा लेख आला होता. त्याविषयीचं अनुराधा मोहनी यांचं संकलन या अंकात आहे. कृष्णवर्णीय स्त्रियांच्या दु:खाची पातळी ही गोऱ्या स्त्रियांच्या दु:खाहून कशी वेगळी होती आणि त्याचा संबंध आपल्याकडच्या दलित स्त्रीशी कसा लागतो हे श्रीनिवास हेमाडे यांच्या ‘ही स्त्री कोण’ या लेखमालेच्या ताज्या भागात टिपलेलं आहे. शशिकांत हुमणे यांचं ‘भगवद्गीता राष्ट्रीय ग्रंथ होऊ शकत नाही’ ह्या शीर्षकाचं पत्र हा या महिन्याच्या पत्रव्यवहारातला रोचक भाग म्हणता येईल. गंगाधर रघुनाथ जोशी यांचं हिंदू धर्मातल्या धर्मनिरपेक्षतेविषयीचं पत्रदेखील या अनुषंगानं वाचनीय आहे.

१ - अधिक माहितीसाठी पाहा :
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11546506.cms
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11621210.cms
http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/11669988.cms

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्रभाकर नानावटी यांच्या ‘मानवी अस्तित्व’ ह्या लेखमालेअंतर्गत परग्रहावरच्या जीवसृष्टीच्या शोधाविषयी या अंकात विवेचन आहे.

हे प्रभाकर नानावटी आपल्या ऐसी अक्षरेचे सभासद आहेत. त्यांचा हा लेख छान आहे.

सुनीती देव यांचा ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी लिव्ह-इन रिलेशनशिप मंडळ’ हा लेख विचारप्रवर्तक आहे.

हा खरच लेख सुंदर आहे.अनेक व्यावहारिक बाबींचा विचार यात केला आहे.

एकूण आजचा सुधारकचा हा परिचय चांगला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

श्री. प्रभाकर नानवटी यांचे अभिनंदन!
अंक माझ्याकडे नसला तरी श्री. नानावटी यांचा लेख वाचायला आवडेल. शक्य असल्यास (प्रकाशकाचा प्रताधिकार भंग होणार नसल्यास)तो लेख इथेही प्रकाशित करावा अशी श्री. नानावटी यांना विनंती करतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!