जागतिक तापमानवाढ सर्वेक्षणाचे निकाल
१.
३० जुलॆ २०२४ची वायनाडची भूस्खलनाची दुर्घटना असो किंवा अलीकडेच अमेरिकेत फ्लोरिडाच्या किनाऱ्याला थडकलेलं वादळ मिल्टन असो, सगळी माध्यमं आणि लोकही खडबडून जागे होतात; मग तापमानवाढ आणि त्याच्या घातक परिणामांची चर्चा होते. तापमानवाढ थांबवण्यासाठी काय काय केलं पाहिजे, अशा तीव्र आपत्तींना तोंड देण्यासाठी कसं सज्ज असले पाहिजे, वगैरे बरेच विषय महत्त्वाचे वाटू लागतात. पण परत थोड्याच दिवसांत सगळं विसरून आपापल्या कामाला लागतात. खरं तर जागतिक तापमानवाढ हा सगळ्यांवरच परिणाम करणारा व सगळेच कमी-अधिक प्रमाणात जबाबदार असणारा असा सर्वसमावेशक आणि म्हणूनच जटिल विषय आहे. सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला, वाढती अर्थव्यवस्था असणारा, भारत हा जगातला तिसरा सगळ्यांत जास्त कार्बन उत्सर्जित करणारा देश आहे. जागतिक तापमानवाढीच्या तीव्र परिणामांना तोंड देणारा एक मोठा देश म्हणून भारताची या विषयात खूप मोठी भूमिका आहे. जेव्हा आपण भारताला आजच्या सगळ्यांत जास्त कार्बन उत्सर्जित करणाऱ्या देशांपैकी एक म्हणतो त्याचवेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ऐतिहासिक उत्सर्जनात किंवा दर माणशी उत्सर्जनात आपण अजूनही खूप मागे आहोत. इतर विकसित युरोपियन किंवा उत्तर अमेरिकन देश नेट झिरो किंवा कोल फेज आउट१ ह्या गोष्टी करू शकतात. परंतु २०%पेक्षा जास्त लोक दारिद्र्यरेषेखाली२ असलेल्या आपल्यासारख्या देशाचे प्राधान्यक्रम वेगळे असणं स्वाभाविक आहे. तापमानवाढीच्या परिणामांची वाढती तीव्रता लक्षात घेतल्यास अजूनच बिकट चित्र दिसेल, तापमानवाढीच्या तीव्र परिणामांनुसार वर्गवारी केल्यास भारत हा जगात सातव्या क्रमांकाचा देश आहे३. थोडक्यात, भारताला एकाचवेळी तापमानवाढ थांबवण्यासाठी (mitigation) आणि त्याच्या तीव्र परिणामांना तोंड देण्यासाठीची सज्जता (adaptation) ह्या दोन्हीवरती काम करायचे आहे तेही आर्थिक आणि ऊर्जेच्या गरजांकडे दुर्लक्ष न करता.
जगात, विविध देशांच्या संदर्भात जे चालतं तेच भारताअंतर्गतही होत आहे – जे लोक ह्या सर्व समस्येला जास्त जबाबदार आहेत (अधिक उत्पन्न गटातले लोक) त्यांना ह्याच्या परिणामांची कमी झळ बसते; तर जे अगदी कमी जबाबदार आहेत त्यांना जास्त त्रास होतो. उष्णतेच्या लाटेचं उदाहरण घेऊन आपण हे समजून घेऊ. ४० अंश सेल्सियसच्या वर तापमान असतानाही बाहेर काम करावे लागणारे लोक (बहुतेक कष्टकरी वर्ग) किती उत्सर्जन करत असतील? तसेच जागतिक पातळीवर आपण आपले कमी असणारे ऐतिहासिक किंवा दर माणशी उत्सर्जन दाखवून जे फायदे मिळवतो त्यातले किती गरजूंपर्यंत पोहोचतात. उदाहरणार्थ, भारत हा Voluntary Carbon Markets मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पुरवठादार देश आहे, पण सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हर्मेंट या संस्थेच्या अहवालानुसार ह्यात बऱ्यापैकी लबाडी चालते४. एवढं वाचल्यावर सगळीच परिस्थिती वाईट आहे आणि आपल काही खरं नाही असं वाटेल.
ह्याची एक बाजू अशी पण आहे की ही सगळी परिस्थितीच एक नवी संधी आहे. आताच्या सगळ्या गोष्टींचा पुनर्विचार आणि पुनर्मांडणी करून नव्या पर्यावरणपूरक आणि न्याय्य जीवनशैली स्वीकारण्याची नवी संधी. हे असं आदर्श प्रत्यक्षात उतरण्यासाठी पहिली पायरी आहे लोकांमधली जागरूकता आणि लोकसहभाग. सामान्य लोकांत ह्याबद्दल किती महिती आहे आणि त्यांचा वेगवेगळ्या पातळींवर चाललेल्या सरकारी, बिगर सरकारी आणि वैयक्तिक उपाययोजना किंवा धोरण ठरवण्यात सहभाग किती आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही मार्च २०२४ मध्ये एक सर्वेक्षण घेतले. त्याचे निकाल इथे देत आहोत.
२.
सर्वप्रथम सर्वेक्षणात भाग घेतलेल्या लोकांची सर्वसाधारण माहिती घेऊ. सर्वेक्षणात एकूण ३१६ लोकांनी भाग घेतला. सर्वेक्षणात भाग घेतलेले बहुतेक (८०%+) लोक हे समाजातल्या एका गटातले आहेत – सुशिक्षित, मध्यमवर्गीय, शहरांत राहणारे. त्यामुळे सर्वेक्षणातून निघणारे सगळे निष्कर्ष हे ह्या गटाचे असून सर्व समाजाचे नाहीत ही एक बाब नोंदवून ठेवू. वयोगटाचा विचार केला तर ६७% लोक हे चाळिशीपुढचे आहेत तर ३०% लोक २०-४० या वयोगटातले आहेत. स्त्रिया आणि पुरुषांनी साधारणपणे समान प्रमाणात सर्वेक्षणात भाग घेतला.
२.१
सर्वेक्षणात भाग घेतलेल्या जवळजवळ सगळ्याच लोकांना जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलाबद्दल किमान ऐकून तरी माहिती आहे (९९.७%). परंतु बहुतांश लोक (५३.३%) म्हणतात की त्यांना संकल्पना माहीत आहे परंतु सर्व तपशील माहीत नाहीत. ३७.९% लोक म्हणतात की त्यांना बरीच माहिती आहे. हे निष्कर्ष २०२२ मध्ये येल प्रोग्राम ऑन क्लायमेट चेंज आणि सी-वॉटर यांनी भारतात घेतलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणाहून निराळे आहेत५. त्या सर्वेक्षणातून असं दिसलं की ५४% लोक म्हणतात की, त्यांना जागतिक तापमानवाढीबद्दल खूप कमी माहिती आहे किंवा त्यांनी त्याबद्द्ल ऐकलेलंच नाही. पण त्याच सर्वेक्षणात जेव्हा लोकांना थोडक्यात जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलाबद्दल माहिती दिली तर ८४% लोकांनी जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱ्या हवामानबदलाला दुजोरा दिला. त्यामूळे आपण एक नक्की म्हणू शकतो की बहुतेक सगळ्याच लोकांना ह्या विषयाबद्दल काहीएक माहिती नक्की आहे.
२.२
सर्वेक्षणात पुढचा प्रश्न लोकांच्या माहितीचे स्रोत काय आहेत हा होता. सर्वांत जास्त लोकांनी (८४.४%) सांगितलं की मासिकं किंवा वर्तमानपत्रातील लेखांतून त्यांना जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलाबद्दल माहिती मिळते. सोशल मिडिया हा दुसऱ्या क्रमांकाचा (६५.८%) आणि टीव्हीवरचे कार्यक्रम तिसऱ्या क्रमांकाचा (६५.८%) स्रोत आहे. ३०%पेक्षा कमी लोकांनी इतर पर्यायही (पुस्तकं, वैज्ञानिक शोधनिबंध, चित्रपट आणि पॉडकास्ट) त्यांचे स्रोत म्हणून निवडले. वैयक्तिक अनुभव असा आहे की वर्तमानपत्रं आणि मासिकांमध्ये ह्या विषयावर फारच कमी लेख असतात आणि लोकांचा सोशल मिडिया किंवा टीव्हीचा तुलनात्मक अधिक वापर असतो. तरीही ८४.४% लोकांना वर्तमानपत्रातले किंवा मासिकातले लेख हे स्रोत वाटतात. कदाचित सोशल मिडियावर वर्तमानपत्र किंवा मासिकांएवढे पण ह्या विषयावर चर्चा होत नसावी, किंवा माहितीचे स्रोत असा सोशल मिडियाबद्दल भरवसा लोकांना वाटत नाही. कारण काहीही असो, जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलाबद्दल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर वर्तमानपत्रं आणि/किंवा मासिकांतून अजून लिहिलं गेलं पाहिजे.
२.३
पुढचा प्रश्न जागतिक तापमानवाढीशी संबंधित धोक्यांबद्दल होता. निम्म्याधिक लोकांनी (७०%+) उष्णतेच्या लाटा, हिमनद्या आणि बर्फ वितळणं, दुष्काळ, समुद्राच्या पातळीत वाढ, अतिवृष्टी आणि पूर ह्या धोक्यांचा जागतिक तापमानवाढीशी संबंध आहे असं सांगितलं; आणि ४०% पेक्षा अधिक लोकांनी गारपीट, चक्रीवादळ आणि शीतलहरींचाही धोका जागतिक तापमानवाढीमुळे वाढतो असं बरोबर सांगितलं. खरं तर जागतिक तापमनवाढीमुळे सर्वच हवामानविषयक (वेदर) धोक्यांची तीव्रता वाढते. काही लोक असं म्हणतात की जागतिक तापमानवाढ होण्यापूर्वीही ह्या वातावरणीय घटना नैसर्गिकरीत्या होतच होत्या ना; मग त्यांना तापमानवाढीबरोबर का जोडायचे! एक चांगली उपमा अलिकडेच वाचली कर्तिक बालागुरू६ ह्यांनी सांगितलेली – जागतिक तापमानवाढ म्हणजे आपण असे म्हणू की पृथ्वीची रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली आहे, रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे रोग होत नाहीत पण त्यातून संसर्ग होण्याची शक्यता वाढते आणि रोगांचे परिणाम जास्त तीव्र होतात. तसंच जगतिक तापमनवाढीमुळे सर्वच हवामानविषयक (वेदर) धोक्यांची तीव्रता आणि वारंवारिता वाढते. ह्या हवामानविषयक दिलेल्या पर्यायांबरोबरच लोकांनी स्वतःहून जैवविविधता घटते, महागाई वाढते, अन्नधान्य तुटवडा होतो, पाण्याची टंचाई होते, विस्थापन आणि स्थलांतर वाढतं, संसर्गजन्य रोग वाढतात इत्यादी सामाजिक आणि आर्थिक धोकेही आवर्जून नोंदवले. थोडक्यात लोकांना जागतिक तापमानवाढीशी संबंधित धोक्यांबद्दल बऱ्यापैकी अंदाज आहे.
२.४
आयपीसीसी आणि भारत सरकारनं प्रसिद्ध केलेल्या तापमानवाढ-संबंधित अहवालांबद्दल दोन प्रश्न ह्या सर्वेक्षणात विचारले होते. सर्व सहा अहवाल अर्ध्याधिक लोकांना ऐकूनही माहीत नाहीत. भारत सरकारचा अहवाल फक्त ३% (१०) लोकांनी वाचला आहे; तर बाकीचे अहवाल दहाहून कमी लोकांनी वाचले आहेत. हे थोडं अपेक्षित होतंच. सर्वसामान्य लोकांनी हे अहवाल वाचले असण्याची शक्यता कमी असणं स्वाभाविक आहे. ह्या सगळ्याच अहवालांमध्ये तापमानवाढीसंबंधित महत्त्वाच्या माहितीचं संकलन आहे; हे अहवाल अतिशय विश्वसनीय स्रोत आहेत. याबद्दल वर्तमानपत्रं किंवा नियतकालिकांमध्ये सोप्या शब्दांत लिहिलं गेलं पाहिजे जेणेकरून लोकांना ह्या अहवालांबद्दल किमान काही माहिती मिळेल.
आयपीसीसी म्हणजे इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही सगळ्या राष्ट्रांची मिळून युनायटेड नेशन्स अंतर्गत स्थापन झालेली एक आंतररष्ट्रीय संस्था७. ह्या संस्थेत जगभरातले तज्ज्ञ एकत्र येऊन दर पाचेक वर्षानी काही अहवाल प्रकाशित करतात. ते हे असेसमेंट रिपोर्ट्स. आता ह्या अहवालांची सहावी फेरी झाली. सहाव्या फेरीतला पहिला रिपोर्ट क्लायमेट चेंज २०२१: फिजिकल सायन्स बेसिस८. ह्या अहवालात १४००० वैज्ञानिक शोधनिबंधाच्या आधारे हे सांगितलं आहे की अलीकडे झालेले वातावरणातले बदल हे तीव्र, सर्वदूर आणि खूप वेगाने झालेले आहेत. जागतिक तापमानवाढीच्या ह्या अभूतपूर्व वेगाला मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहे. क्लायमेट चेंज २०२२: इंपॅक्ट, ॲडॅप्टेशन ॲण्ड व्हलनरेबिलिटी९ ह्या आयपीसीसीच्या दुसऱ्या अहवालात हवामानबदलामुळे मानवांवर आणि निसर्गावर झालेले परिणाम संकलित केले आहेत. तिसरा अहवाल क्लायमेट चेंज २०२२: मिटीगेशन ओफ क्लायमेट चेंज१० हा हवामानबदलाचा वेग कमी करण्यासाठी काय उपाय अवलंबले पहिजेत ह्याबद्दल आहे. क्लायमेट चेंज २०२३: सिंथेसिस रिपोर्ट११ मध्ये तीनही अहवलांचे सार एकत्र केलं आहे. ह्या सगळ्या अहवालांतून तीन महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत –
- मानवी हस्तक्षेपामुळे अभूतपूर्व हवामानबदल होत आहेत.
- हे बदल मानवजातीसाठी आणि पूर्ण पृथ्वीसाठीच मोठा धोका निर्माण करत आहेत.
- तापमानवाढ थांबवण्यासाठी लवकरात लवकर कृती केली पाहिजे.
कार्बनडाय ॲक्साइड, मिथेन इत्यादी वायूंमुळे सरासरी जागतिक तापमानवाढ होते. परंतु ही वाढ आणि त्यामुळे होणारे हवामानबदल हे अतिशय असमानरीत्या वितरीत होतात. कोणत्याही प्रदेशावर होणारे हवामानबदल हे जागतिक कार्बन उत्सर्जनाबरोबर प्रादेशिक प्रदूषण आणि जमीन वापरांतील बदल ह्यावरही अवलंबून असतात. त्यामुळे एखाद्या प्रदेशावर होणारे हवामानबदल समजून घ्यायचे असतील तर त्यांचा प्रादेशिक अभ्यास केला पाहिजे. भारतात होणारे हवामानबदल समजून घेण्यासाठी भारत सरकारच्या अधिपत्याखाली जलवायू मंत्रालयाने असेसमेंट ऑफ क्लायमेट चेंज ओव्हर इंडिअन रिजन१२ नावाचा अहवाल २०२० साली पहिल्यांदाच प्रकाशित केला. भारतात आतापर्यंत झालेले आणि येणाऱ्या काळात होऊ घातलेले प्रादेशिक हवामानबदल ह्या अहवालात संकलित केले आहेत. ह्या अहवालानुसार विसाव्या शतकाच्या मध्यापासून भारतातही सरासरी तापमानात वाढ, पर्जन्यमान कमी होणं, उष्णतेची लाट व अतिवृष्टी यांचं प्रमाण वाढणं, दुष्काळ, समुद्रपातळीत वाढ आणि वादळांची तीव्रता वाढणं इत्यादी हवामानबदलाचे परिणाम नोंदवले गेले आहेत. येणाऱ्या काळातही हे बदल होतच राहतील आणि कार्बन उत्सर्जनाची पातळी कमी झाली नाही तर ह्या बदलांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
२.५
जागतिक हवामानबदलाला मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहे का आणि जागतिक तापमानवाढीमुळे तुमच्या प्रदेशावर होऊ घातलेल्या परिणामांची काळजी वाटते का, या पुढच्या दोन प्रश्नांना बहुतांश लोकांनी (अनुक्रमे ९२.५% आणि ९३.२%) हो उत्तर दिलं आहे. सोशल मिडिया आणि चुकीची माहिती (मिसइनफोरमेशन) यांच्या जमान्यात मानवी हस्तक्षेपामुळे हवामानबदल होतो, हे थोतांड / खोटं आहे अशी माहिती पसरवली जात असूनही लोकांना हवामानबदल होतोय हे पटतंय ही एक समाधानाची बाब आहे. कदाचित लोकांना बदल जाणवत असतील, विशेषतः तापमानातले बदल. ह्या सर्वेक्षणात भाग घेतलेले बहुतेक लोक हे शहरांत राहणारे आहेत. त्यांना तर प्रादेशिक हवामानबदल अधिक शहरीकरणामुळे होणारी तापमानवाढ असे दुहेरी परिणाम अनुभवाला येत असणार. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात१3 असं दिसून आलं आहे की भारतातली शहरं सरासरी ०.५३ अंश सेल्सिअस प्रति दशक ह्या वेगानं गरम होत आहेत. त्यातलं सरासरी ६०% योगदान हे शहरीकरणाचं आहे. ही समस्या सगळीकडेच तीव्र होत आहे. अलीकडेच तमिळनाडू सरकारनं उष्णतेच्या लाटांना राज्यस्तरीय नैसर्गिक आपत्ती घोषित केलं आहे१८.
३
३.१
लोकांना हवामानबदलाच्या परिणामांची काळजी वाटते; आणि ह्या बदलांना आपला हस्तक्षेप कारणीभूत आहे असं वाटतं. मग हे थांबवण्याबद्दल किंवा ह्यावर मात करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांबद्दल लोकांना काय वाटतं हे समजून घेण्यासाठी पुढचे चार प्रश्न विचारले होते. जागतिक तापमानवाढ थांबवण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी – ह्याला आपण एकत्रितपणे हवामानबदलावरचे उपाय म्हणू – कोणी कृती करावी ह्या प्रश्नाचं उत्तर बहुतेकांनी व्यक्ती, सरकार, स्वयंसेवी संस्था, खाजगी कंपन्या असे सगळेच पर्याय निवडून दिले. तर दोघांनी आंतरराष्ट्रीय संस्थाही सुचवल्या. दोनच लोकांनी कोणाच्याच हातात नाही आणि परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असं नकारात्मक उत्तर दिलं. सगळ्यांनी वैयक्तिक कृती करणं गरजेचं आहेच. खरा प्रश्न आहे कोण जास्त जबाबदारी घेऊन मोठ्या प्रमाणात धोरणं ठरवून अधिक प्रभावी उपाय करू शकतात, याचा विचार व्हायला हवा. ह्याचं चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर भारत सरकारचं सौरऊर्जेसंबंधित धोरण. सौरऊर्जेचे फायदे लोकांना आधीपासून माहीत आहेत पण विविध सरकारी धोरणांमुळे गेल्या ९-१० वर्षांत सौरऊर्जेतून तयार केलेल्या विजेत ३० पटीने वाढ झाली१४. परंतु भारतात सरकार किंवा खाजगी कंपन्या इतरही सगळ्याच बाबतींत हव्या तितक्या कृतीशील दिसत नाहीत. त्यांना (सरकार आणि खाजगी कंपन्याना) कृती करायला भाग पाडणं हे, मला वाटतं, लोकांचं सगळ्यांत महत्त्वाचं काम आहे. ह्या आघाडीवर काळजी वाटावी अशी स्थिती आहे.
३.२
हवामानबदलावर उपाय करण्यासाठी तुमच्या भागात चालवले जाणारे सरकारी किंवा बिगर-सरकारी उपक्रम माहीत आहेत का आणि त्यांची यादी करा, ह्या प्रश्नाला फक्त १६१ लोकांनी उत्तर दिलं. त्यातही ९१ लोकांनी लोकांनी सांगितलं की असे कोणतेही उपक्रम त्यांच्या भागात होत नाहीत किंवा त्यांना माहीत नाहीत. ३० लोकांनी स्वयंसेवी सामाजिक संस्थांची नावं दिली, १० लोकांनी सरकारी उपक्रमांची/धोरणांची नावं दिली, आणि ३० लोकांनी त्यांना माहीत असलेले उपाय – वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतुकीचा वापर – सांगितले. ज्या सामाजिक संस्थांची नावं लोकांनी दिली त्यांतल्या बहुतेक संस्था पुण्यातल्या आहेत; उदाहरणार्थ, समुचित, जिवितनदी, जिविधा, इकोलोजिकल सोसायटी, वेताळ टेकडी बचाओ (संस्था?), ओइकोस, प्रयास, वसुंधरा अभियान, निसर्ग सेवक इत्यादी. पुण्याबाहेरच्या मानवलोक आणि ग्रामपरी या दोनच संस्था लोकांनी नोंदवल्या. सरकारी उपक्रमांमध्ये ठिबक सिंचन, सोलर आणि ईव्हीला सरकारतर्फे दिलं जाणारं अनुदान, कचरा विलगीकरण आणि व्यवस्थापन हे नोंदवले गेले. म्हणजे सर्वेक्षणात भाग घेतलेल्या लोकांपैकी फक्त ४० लोक (~१०%) हवामानबदलावरच्या उपायांशी संबंधित उपक्रमांशी निगडित (माहिती आहे किंवा कृती करत आहेत) आहेत. हे आकडे दर्शवतात की जरी बहुतांश लोकांना हवामानबदलाची काळजी वाटत असली, हे मानवी हस्तक्षेपामुळे होत हे कळत असलं तरी सामूहिकरीत्या कृती करण्यात आपण खूपच मागे आहोत.
३.३
हवामानबदलावरील उपाय माहीत आहेत काय असा एक प्रश्न सर्वेक्षणात होता. ह्या प्रश्नाला फक्त १२ लोकांनी नाही असे उत्तर दिले तर १९८ लोकांनी काही ना काही उपाय सुचवले. झाडं लावणं अशा साध्या आणि सुप्रसिद्ध उपायापासून कार्बन क्रेडिट्स आणि कार्बन कॅप्चर पर्यंत भरपूर उपाय लोकांनी सुचवले. सगळ्यांत जास्त नोंदवला गेलेला उपाय Reduce, Recycle, Reuse किंवा वेगळ्या शब्दांत शाश्वत जीवनशैली हा होता. त्यानंतर दुसरा क्रमांक झाडं लावणं ह्या उपायाचा आहे. खाली लोकांनी सुचवलेल्या उपायांची यादी देत आहे, कंसात किती लोकांनी तो उपाय सुचवला तो आकडा दिला आहे -
- Reduce, Recycle, Reuse (८१)
- झाडं लावणं (७८)
- जंगल, नद्या, समुद्र, टेकड्या, पाणी, जैवविविधता इत्यादी नैसर्गिक गोष्टींचे संवर्धन (३९)
- सोलर, पवनचक्क्या इत्यादी अपारंपरिक स्रोत, कोळश्याचा कमीतकमी वापर वगैरे ऊर्जेसंबंधित उपाय (३६)
- इलेक्ट्रिक वाहनं, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वगैरे वाहतुकीसंबंधित उपाय (३०)
- प्लास्टिकचा कमीतकमी वापर (२९)
- कचरा व्यवस्थापन (११)
- पर्यावरणाविषयी कायदे आणि नियम करणे व त्यांची अंमलबजावणी (८)
- लोकशिक्षण आणि लोकचळवळी (६)
- जैविक शेती (५)
- कार्बन कॅप्चर (४)
- कार्बन क्रेडिट्स (३)
- शहरांचे अधिक चांगले नियोजन व आराखडे (२)
- विकासाच्या व आधुनिक जीवनशैली संकल्पनेचा पुनर्विचार (१)
- इमारती आणि इतर पायभूत सुविधांमधे शाश्वत पद्धतींचा वापर (१)
हवामानबदलासारख्या क्लिष्ट प्रश्न एका अक्सीर उपायातून सुटेल असं नाही. त्यामुळे सगळेच उपाय उपयुक्त आणि महत्त्वाचे आहेत. पण हा क्लिष्ट प्रश्न निर्माण व्हायला जसं आपली सध्याची व्यवस्था कारणीभूत आहे तर उपायही तसेच व्यवस्थेवर परिणाम करणारे असे हवेत. बहुतांश लोकांनी सांगितलेले उपाय हे वैयक्तिक कृतीच्या स्वरूपाचे आहेत. वैयक्तिक कृतीला शेवटी मर्यादा येतात. उदाहरणार्थ, कोबल्ट हा धातू खूप इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधे वपरला जातो. कोबाल्टच्या १ टन खनिजावर प्रक्रिया करून फक्त १.२ किलो शुद्ध धातू मिळतो; पण १ टन टाकाऊ मोबाईल उपकरणांतून ६३ किलो शुद्ध कोबाल्ट मिळवता येतो. त्यासाठी योग्य ई-कचरा पुनर्वापर सुविधा हव्यात. भारतातील उपलब्ध ई-कचरा पुनर्वापर सुविधांची एकत्रित क्षमता ११ लाख टन प्रतिवर्ष आहे तर निर्माण होणारा ई-कचरा २२ लाख टन प्रतिवर्ष इतका आहे१९. एकूणच कचरा व्यवस्थापनात पुनर्वापर (Recycle) खूप महत्त्वाचा आहे पण भारतात पुनर्वापर करण्यासाठी लागणाऱ्या सुविधांची (recycling facility) कमतरता आहे. बऱ्याच लोकांनी झाडं लावणं हा उपाय लिहिला आहे. निसंदिग्धपणे हा उपाय आहेच, परंतु शहरात जागेच्या आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे वैयक्तिक कृती करताना त्यालाही मर्यादा येतात. तीच बाब निसर्गसंवर्धनाबद्दल; २०२३ डिसेंबरमध्ये सरकारनं फॉरेस्ट (कॉनझर्वेशन) अमेंडमेंट बिल २०२३ नावाचा कायदा पास केला. ह्या कायद्यानं आधीचा फॉरेस्ट (कॉनझर्वेशन) ॲक्ट १९८० अधिक दुबळा केला गेला. जंगल असलेल्या जमिनी वेगवेगळ्या विकास कामांसाठी बळकावणं सोपं झालं आहे, असं ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे१५.
हवामानबदलाला कारणीभूत सगळ्यांत महत्त्वाचा घटक कार्बन डायाऑक्साइड आहे; म्हणून कार्बन फुटप्रिंट कमी केलं पाहिजे, हे लोकांच्या मनावर नेहमीच बिंबवलं जातं. बहुतांश लोकांचे प्रतिसाद ह्याच प्रकारात मोडणारे वाटले. ह्यातली मेख अशी की अप्रत्यक्षपणे, हा वैयक्तिक प्रश्न आहे, सगळेच सारख्या प्रमाणात जबाबदार आहेत असं भासवलं जातं. परंतु ते तसं नाहीये. मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्यासाठी आपण सगळ्यांनीच सामूहिक कृतींवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. सरकार आणि मोठे खाजगी उद्योग यांची ही जास्त मोठी जबाबदारी आहे. त्यांना कृती करायला भाग पाडणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे. जास्तीत जास्त लोकांनी ह्या सामूहिक कृतीत तर्कशुद्ध पद्धतीनं भाग घेण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ६ लोकांनीच लोकशिक्षण आणि लोकचळवळीचा उल्लेख केला; योग्य नियम आणि कायदे केले पहिजेत आणि पाळले गेले पाहिजेत असं ८ लोकांनी नमूद केलं. ह्या विषयावर एकमेकांशी बोलणं, योग्य माहिती घेणं, सामूहिकरीत्या आपल्या परिसरातल्या हवामानबदलाचे प्रश्न समजून घेणं आणि आपल्या लोकप्रतिनिधींना योग्य उपाय करण्यासाठी पटवणं, भाग पाडणं हेही अतिशय महत्त्वाचं आहे. पुण्यात अशा प्रकारचे काम डॉ. प्रियदर्शिनी कर्वे त्यांच्या Citizens of Sustainable City नावाच्या गटाद्वारे करतात. मोठ्या प्रमाणात जुन्या अपायकारक गोष्टी बदलायच्या असतील तर नवीन, अधिक चांगलं डिझाईन असलेले कल्पक उपाय शोधले गेले पाहिजेत. कार्बन कर आणि कार्बन क्रेडिट्स या आणि अशा योजना जागतिक पातळीवर, विशेषतः विकसित देशांमध्ये जोर धरून आहेत. भारतातही लवकरच ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात चालतील. ह्या योजनांचा मूळ उद्देश जे प्रदूषण करत आहेत, त्यांनी न करणाऱ्यांना आर्थिक मोबदला दिला पाहिजे हा आहे. हा उद्देश सफल होण्यासाठीसुद्धा जागरूक लोकसहभाग महत्त्वाचा आहे.
उपायांच्या बाबतींत एका महत्त्वाच्या गोष्टीची नोंद करावीशी वाटते; ती म्हणजे हवामानबदलाला तोंड देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपायांबद्दल कुणीच उल्लेखही केला नाही. बदलत्या हवामानाच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी प्रत्येक शहरात / गावात त्या-त्या भागातले धोके ओळखून आपत्कालीन यंत्रणा किंवा उपाय केले पाहिजेत. उदाहरणार्थ उष्ण्तेच्या लाटेची समस्या सोलापूरसारख्या शहरात तीव्र आहे. १९७५-२०२२ या कालावधीत उष्णतेच्या लाटेची तीव्रता दरवर्षी ८.७ तास या वेगाने वाढले२०. त्यामुळे ह्या प्रश्नावर सोलापुरात सर्वोच्च प्राधान्य देवून तातडीने काम करण्याची गरज आहे. प्रत्येक ठिकाणचे हवामानसंबंधित धोके वेगवेगळे असतात ते ओळखून त्यानुसार उपाय योजले पाहिजेत. असाच अजून एक अनुल्लेखित उपाय म्हणजे आर्थिक गुंतवणूक. गुंतवणूक करताना मिळणाऱ्या परताव्याबरोबरच त्यातून होणाऱ्या प्रदूषणाचाही आपण विचार केला पाहिजे. जगातील मोजक्या अतिश्रीमंत लोकांची जीवनशैली जागतिक कार्बन उत्सर्जनात मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेच पण त्यांची गुंतवणूक अजूनही जास्त घातक आहे१६. अजून एक पूर्णपणे दुर्लक्षित उपाय (?) म्हणजे भू-अभियांत्रिकी. वेगवेगळ्या प्रकारे तापमानवाढ कमी करण्यासाठी किंवा हवेतला कार्बन शोषून घेण्यासाठी कृत्रिम मोठे उपाय – उदाहरणार्थ, वातावरणाच्या वरच्या भागात सल्फर डायॉक्साइड फवारणं – सुचवले जात आहेत. ह्या उपायांबद्द्ल अजूनही पुरेशी खात्री नाहीये, त्यांचे जगाच्या वेगवेगळ्या भागात काही दुष्परिणामही संभवतात पण काही अतिउत्साही, बदमाश लोक एकूणच परिस्थितीचा फायदा घ्यायला पुढे सरसावत आहेत१७. भारतात असे प्रकार ऎकण्यात आले नाहीत तरी ह्या गोष्टींचीही माहिती हवी.
३.४
ज्या लोकांनी उपायांची यादी दिली त्यांतले जवळपास सगळेच लोक (२४ लोक सोडून) त्यांनी लिहिलेला एकतरी उपाय अंमलात आणतात. बहुसंख्य लोकांना (९२.४%) भारतावर होऊ शकणारे हवामानबदलाचे परिणाम जाणून घ्यायचे आहेत. ह्या गोष्टी मात्र अशादायक वाटतात.
सारांश
ह्या सर्वेक्षणाचं थोडक्यात सार म्हणजे बहुतांश लोकांना हवामानबदल काय आहे ह्याचा काही एक अंदाज आहे, थोडीफार माहिती आहे, त्यामुळे होणाऱ्या परिणामांची काळजीही वाटते, कृतीही करायची आहे परंतु, ह्या क्लिष्ट प्रश्नावर काम करण्यासाठी तेवढंच जागरूक होऊन, तर्कशुद्ध वैज्ञानिक पद्धतीने सामूहिक प्रयत्न काय केले पाहिजेत ह्याविषयी पूर्ण माहिती नाही. त्यासाठी अजून जास्त लोकजागरणाची आणि लोकसहभागाची आवश्यकता आहे.
संदर्भ -
- https://www.thehindu.com/opinion/lead/sunset-for-the-uks-coal-fired-pow…
- https://en.wikipedia.org/wiki/Poverty_in_India
- https://wri-india.org/blog/differential-vulnerability-and-its-importanc…
- https://www.cseindia.org/discredited-the-voluntary-carbon-market-in-ind…
- https://climatecommunication.yale.edu/publications/climate-change-in-th…
- https://justtwothings.substack.com/p/12-october-2024-weather-law
- https://en.wikipedia.org/wiki/Intergovernmental_Panel_on_Climate_Change
- https://www.ipcc.ch/report/sixth-assessment-report-working-group-i/
- https://www.ipcc.ch/report/sixth-assessment-report-working-group-ii/
- https://www.ipcc.ch/report/sixth-assessment-report-working-group-3/
- https://www.ipcc.ch/report/sixth-assessment-report-cycle/
- https://link.springer.com/book/10.1007/978-981-15-4327-2
- https://www.nature.com/articles/s44284-024-00074-0#Sec1
- https://energy.economictimes.indiatimes.com/news/renewable/india-adds-r…
- https://www.downtoearth.org.in/forests/why-forest-conservation-amendmen…
- https://www.oxfam.org/en/press-releases/billionaires-emit-more-carbon-p…
- https://spectrum.ieee.org/solar-geoengineering-2669008650
- https://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/tn-declares-heatwave-…
- https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0956053X21001148#s01…
- https://solapurcorporation.gov.in/current_act/Solapur%20Climate%20Actio…
संपादन - ३_१४ विक्षिप्त अदिती
हवामान badal3
हवामान बदल, पृथ्वी चे नैसर्गिक चक्र मानवी ऍक्टिव्हिटी मुळे बदलत आहे हे त्रिवार सत्य आहे.
रसायनिक खत, कीटक नाशक ह्यांचा वापर ह्या मुळे पुढील काहीच वर्षात पृथ्वी वरील माती नपिक होईल कोणतीच वनस्पती ह्या धर्तीवर जगू शकणार नाही.
तापमाम प्रचंड वाढेल AC पण थंड हवा देऊ शकणार नाही.
शुद्ध पाण्याचे कोणतेच source अस्तित्वात राहणार नाहीत.
विनाश नक्की होणार पण फक्त जीव सृष्टी चा.
पृथ्वीचा विनाश करण्या इतकी power माणसात कधीच येणार नाही.
अनेक रोग जंतू antibiotics ला फाट्यावर मारत आहेत ही सुरुवात आहे.
Tb, किंवा असे अनेक रोग औषधना फाट्यावर मारत आहेत.
आणि माणूस मीच शक्तिमान अशी स्वप्न बघत आहे