Skip to main content

सांजभयीच्या छाया - ५

धनबादच्या आधी वेटर पुन्हा जेवणाची ऑर्डर विचारायला आलेला होता.
मामीने बरंच काही सोबत आणलेलं. तेव्हां जेवणाची ऑर्डर दिली नाही.

रात्री साडेनऊ वाजता धनबाद आलं. मला थोडंसं खाली उतरावंसं वाटत होतं. पण मामीने अजिबात उतरू दिलं नाही. मी प्रचंड वैतागले. आई पण असंच करते, मामीही तशीच. पण मामीला तसंच सोडून मी खाली उतरून पाय मोकळे केले. सिग्नल बदलतानाच पुन्हा येऊन बसले. मामी हाका मारत होती. खूप धास्तावली होती.

"सलोनी, पुन्हा असं काही करशील तर बघ "
" अगं रिलॅक्स ! इतकं काय टेण्शन घ्यायचंय ? मी लहान आहे का ?"
" तेच तर टेण्शन आहे. तुझी जबाबदारी माझ्यावर आहे "
" कम ऑन मामी. काही होत नाही "
" तुला शपथ आहे. मला न सांगता असं पुन्हा काही करायचं नाही "
" बरं बाई ! तसं तर तसं "

मामीने बोलता बोलता भात, मासे सगळं केळीच्या पानात मांडलं होतं.
ताक छान पैकी छोट्या मातीच्या मटक्यात तोंड झाकून आणलेलं. पापडाचा चुरा, लोणचं. मामीची पोतडी संपतच नव्हती.

मला हसायला आलं.
" अगं मामी, पाहुणे येणार आहेत का जेवायला ? आपण दोघीच तर आहोत. सगळं नको काढूस. संपणार नाही"
" असू दे. जातं आपोआप गप्पांच्यात "

आणि खरंच गप्पा मारताना जेवण गेलं. नेहमी इतके सारे पदार्थ कधीच जमले नसते खायला. पण वातावरण बदललं की पोटाला तड लागेपर्यंत जेवण जातं.
आता झोपणं अवघडच होतं. इतकं पोट गच्च झाल्यावर आडवं होणं शक्यच नाही.

मामी नशीबवान.
तिचे डोळे पेंगायला लागले होते.
थोड्याच वेळात डाराडूर झोपली.

मी पडदे बाजूला करून बाहेर बघू लागले.
स्टेशन यायचं. एक मिनिटासाठी ट्रेन थांबायची. काही स्टेशनची नावं वाचण्यात मी यशस्वी व्हायचे.
काहींची नावं माझी बोगी थांबेल तिथे नसायची.

गोमोह नावाचे स्टेशन आले रात्री कधीतरी. चहा - कॉफी घ्यावी असा मोह होत होता.
पण मामीने नुकतीच शपथ घातली होती.
बरंच झालं. नाहीतर पित्त वाढलं असतं.

बसल्या बसल्या झोप लागायची. गाडी थांबली की चाळवायची.
पहाटेचे तीन वाजत आले होते. ट्रेन थांबल्याने जाग आली.
गया जंक्शन !
गया नावाचे जंकशन Proud

समोरच बुक स्टॉल होता. झटकन उतरून एक पुस्तक घेतलं. सोबत रेल्वे टाईमटेबल पण.

सकाळी साडेसहाला मुगलसराय येणार होतं.
मी उतरणारच होते. पण चहावाला डब्यात चढला. दोन कप घेऊन ठेवले आणि मामीला उठवलं.
तिचं ब्रश वगैरे सगळे सोपस्कार झाले. तोपर्यंत चहा थंड झाला.
पहिला चहा थंडगार बरा नाही वाटत.
तसाच ठेवून दिला.
मिर्झापूरला कॉफी वाला आला.
बरं वाटलं

दोघी फ्रेश झालो.

आजचा दिवस संपूर्ण ट्रेन मधेच काढायचा होता.
मामीला तिच्या लव्ह स्टोरीबद्दल छेडलं. तर मस्त लाजली ती.
आढेवेढे घेत सांगायला तयार झाली.
ही कितवी तरी वेळ असेल तिच्याकडून ऐकायची.

पण प्रत्येक वेळी लाजणं तसंच आणि आढेवेढे घेणंही.
मामीने जादूई पोतडीतून कुरकुरीत निमकी काढली. बघूनच तोंडाला पाणी सुटलं. अजिबात नियंत्रण राहीलं नाही.
आता निमकीसोबत चहा पाहीजेच.

अलाहाबाद रेल्वे स्टेशनमधे गाडी घुसताना मी मामीची परवानगी घेऊन चहासाठी उतरले.
कुल्हडचा चहा आणि निमकी.
तासभर सहजच गेला.

मामीची आवरा आवर सुरू झाली हे बघून मी हिंदी कादंबरी वाचायला सुरूवात केली.
वापसी
गुलशन नंदाची कादंबरी. पॉकेट बुक्स साईज असल्याने डोळ्याला त्रास होत होता.
पण पकड घेणारी कथा होती.
६० च्या दशकातल्या सिनेमासारखी.
कदाचित या कथेवर निघालेलाही असेल एखादा चित्रपट.

दोन तासात निम्म पुस्तक संपवलं.
भूकेची जाणीव झाली. पण कडकडून नव्हती लागली.
जेवण स्कीपच करावं असा विचार होता.
मामीने पोतडी काढली होती .
चनाचूर !

काही खरं नाही.
चना , फरसाण नमकीन म्हटल्यावर इनो घ्यावा लागणार.
मामीने जिन्नस पण असे आणले होते की जीभेला लालूच सुटत होती.
आता कसलं आलंय जेवण ?

पण मामीने लुची ( बंगाली पुरी) आणि छोलर दाल (चना डाळ) असा बेत आणलेला होता. पॅकिंग अगदी जोरदार होतं. खराब होईल म्हणून ते संपवावे लागले.
मामीने पुन्हा ताणून दिली.
मनात हेवा करत मग पार्थोला फोन लावायचा प्रयत्न केला. पण धावत्या गाडीतून फोन लागत नव्हते.
ऋतूचा नंबर माझ्याकडून गहाळ झालेला होता.
खरं म्हणजे रागातच डिलीट केले होते फोन नंबर, मेसेजेस . सगळंच.

पुस्तक वाचत पडले.
रात्रीची न झालेली झोप आता मला ताब्यात घेऊ पाहत होती.
कधी डोळा लागला समजलंच नाही.
जाग आली तेव्हां बाहेर अंधार होता.
मामी अजून झोपलेलीच होती.
तिला उठवलं तर म्हणाली
"खूप गाढ झोपलेलीस तू म्हणून नाही उठवलं. जेवायचं की नाही ? आठ वाजलेत रात्रीचे "
मी खूणेनेच नको म्हटलं.

आता ही रात्र गेली की कालका येईल पहाटे.
गाडी राईट टाईम होती. उशीर झाला असता तर पुढची ट्रेन मिस झाली असती. मग एखादी कॅब घेऊन जावं लागलं असतं.

कालकाला पोहोचलो तेव्हां पलिकडच्या फलाटावर देखणी फुलराणी आमची वाट बघत होती.
हा प्रवास किती रोमांचकारी आहे!
आराधना तली शर्मिला डोळ्यासमोर आली. माझी खिडकी रस्त्याकडे असावी. म्हणजे कुणी राजेश खन्ना उघड्या जीपमधून "मेरे सपानों की रानी" गाणं माझ्यासाठी म्हणत असेल तर मला दिसायला पाहीजी ना ?
एकदा ती खात्री झाली की मग नजर फिरवता येते ..

पण आपलं नशीबच फाटलेलं. दरीच्या बाजूची खिडकी मिळाली.
रस्ता पण जाम झालेला सकाळी सकाळी.
गाडी हलली मात्र..

निसर्गसौंदर्याची उधळण होत राहिली. मन हरखून गेलं.
देवभूमीमे आपका स्वागत है
या पाटीमुळे स्वर्गात प्रवेश केल्यासारखं वाटून गेलं.

एकदाचा प्रवास संपला.
रेल्वे स्टेशनवर मुखर्जी अंकल स्वतः आले होते.
सामान एका जीप मधे टाकून आम्ही त्यांच्या कारमधून त्यांच्या बंगलीवर आलो.
तीच ती बंगली.
चढणीवरची.
मी तर हरखून गेले.

आता ओढ आशीला बघायची होती.
दुर्गापूरला शेवटची दहा बारा वर्षांची पाहिली होती. आता मोठी झाली असेल.
मला सलोनी दीदी म्हणायची.
हे माझं आजीने ठेवलेलं नाव. इकडे आजोळी याच नावाने बोलवतात.

आशी बाहुलीसारखी होती.
तिला बघायला मी घरात शिरले.

थक्कच झाले.
कसलं सुंदर सजवलं होतं घर.
मुखर्जी अंकलना मनातल्या मनात मानलं. किती तरी कलात्मक वस्तू होत्या.
दारातून शिरल्यावर समोर एक खोड भिंतीला उभं केलं होतं. त्यातून नकली पानं फुलं डोकावत होती.
एक धबधबा होता.
मन प्रसन्न होईल अशा वस्तूंची रेलचैल होती.

अधून मधून फेंगशुईचाही वावर होता. हे आंटीचं काम असणार.

आशीची खोली वर असणार हा अंदाज अजिबात चुकला नाही.
मी धावतच वर गेले.

बंगाली पद्धतीचा पलंग होता. चारही बाजूनी मच्छरदाणी फ्रेमला बांधलेली होती.
आशी झोपलेली होती !

मी येणार हे तिला माहिती नव्हतं का ?
काही तरी चुकतंय असं मन सांगू लागलं.
आजवर ते कधीच खोटं बोललेलं नव्हतं

क्रमशः

Node read time
4 minutes
4 minutes