वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस

वनस्पती जमीनीमधून पाणी आणि हवेतून कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साईड) वायू शोषून घेतात आणि सूर्यप्रकाशामधून ऊर्जा घेऊन या दोन साध्या अणूंचा संयोग घडवून आणून त्यातून सेंद्रिक (ऑर्गॅनिक) पदार्थांचे प्रचंड गुंतागुंतीचे अणू तयार करतात. या क्रियेमधून प्राणवायूचे विमोचन होऊन हा उपयुक्त वायू हवेत सोडला जातो आणि नव्याने तयार झालेले सेंद्रिय पदार्थ त्या वनस्पतीच्या निरनिराळ्या भागात साठवून ठेवले जातात. शाकाहारी प्राणी त्यांचे भक्षण करून आपला उदरनिर्वाह करतात आणि मांसाहारी पशू त्या प्राण्यांना गट्ट करतात. सर्वच प्राण्यांना जीवंत राहण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू आणि अन्नपदार्थ अशा प्रकारे वनस्पतींपासूनच मिळतात. कोणताही प्राणी थेट हवापाण्यापासून आपले अन्न तयार करू शकत नाही. ते सामर्थ्य फक्त वनस्पतींना मिळाले आहे.

प्राचीन काळात जेंव्हा कारखानदारी अस्तित्वात नव्हती अशा काळात माणसाचे रोजमर्राचे जीवन पूर्णपणे निसर्गावर म्हणजे वनस्पती विश्वावरच अवलंबून होते. याची जाणीव आपल्या पूर्वजांना होती. झाडांना बोलता येत नसले तरी तीही सजीवच आहेत आणि त्यांचेबद्दल कृतज्ञपणा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे हे सर्वांना समजावे आणि अधोरेखित केले जावे या हेतूने त्यांनी विविध वृक्षांना आपल्या धार्मिक परंपरांमध्ये महत्वाचे स्थान दिले. वड आणि पिंपळ हे वृक्ष आकाराने प्रचंड असतात. त्यांचे आयुष्य खूप मोठे म्हणजे शतकानुशतके असते. माणसांच्या अनेक पिढ्या त्यांच्या सावलीत सुखावतात तर त्याच्याही अनेकपटीने जास्त पक्ष्यांच्या पिढ्या या वृक्षांवर घरटी करून राहून जातात. ही झाडे सहज लागतात आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहतात. बहुतेक सर्व मंदिरांच्या परिसरात वटवृक्ष किंवा पिंपळाचे झाड किंवा दोन्हीही लावली आणि टिकवून ठेवली जातात आणि मंदिरात देवदर्शनाला जाणारे भाविक या झाडांनाही नमस्कार करतात. अशी आपली संस्कृती आहे.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत केले जाते. वडाच्या झाडाची पूजा हा या व्रतातला महत्वाचा भाग आहे. पुराणकाळामधील सावित्री या महान पतिव्रतेने प्रत्यक्ष यमाशी नम्रतापूर्वक पण सखोल तात्विक वाद घातला, अनेक प्रकारे त्याची मनधरणी केली, कोणत्याही परिस्थितीत आपल्या पतीपासून विभक्त न होण्याचा आपला हट्ट सोडला नाही आणि यमाने हरण केलेले सत्यवानाचे प्राण चातुर्याने परत मिळवले अशी कथा आहे. या गोष्टीत सावित्रीचा निर्धार, तिचे पांडित्य आणि चतुराई दिसून येते. हे नाट्य एका वडाच्या झाडाखाली घडले असावे आणि एवढाच त्याचा दूरचा संबंध या कथेशी असावा. पण आपल्या पतीला वटवृक्षासारखे दीर्घायुष्य मिळावे आणि आपले सौभाग्य अखंड रहावे अशी मनोकामना या व्रताच्या निमित्याने व्यक्त करून व़टवृक्षाचे महत्व लोकांच्या मनावर ठसवावे अशा विचाराने ही परंपरा सुरू झाली असावी.

नुकतीच वटपौर्णिमा होऊन गेली. या निमित्याने स्त्रिया वडाची पूजा करतील, त्या झाडाला दोरा गुंडाळण्यासाठी त्याला प्रदक्षिणा घालतांना त्याचा बुंधा किती रुंद आणि मजबूत आहे हे त्यांच्या लक्षात येईल, विशाल वृक्षाचा भार पेलण्यासाठी त्याचा बुंधा बळकट असणे किती आवश्यक आहे हे त्यांना कळेल, जीवनातील कर्तव्यांचा बोजा पेलण्यासाठी खंबीरपणा कसा आवश्यक आहे याचा वस्तुपाठ त्यांना मिळेल, वगैरे कल्पना कदाचित एके काळी या व्रताच्या मुळाशी असाव्यात. शहरांमध्ये मात्र वडाच्या फांदीची पूजा करणे असे एक विकृत रूप सुध्दा या व्रताला मिळाले आहे. वडाची एक लहानशी फांदी तोडून घरी आणून तिची पूजा करणा-यांना यातले काहीच मिळणार, कळणार किंवा वळणार नाही. जी फांदी स्वतःच दोन चार दिवसात सुकून नष्ट होणार आहे किंवा त्याच्याही आधी म्हणजे दुस-या दिवशीच कच-याच्या ढिगा-यात टाकून दिली जाणार आहे ती कोणाला कसला संदेश, स्फूर्ती किंवा आशीर्वाद देणार? वटपौर्णिमेच्या आधीच वडाच्या झाडांच्या फांद्या तोडून त्यांना जायबंदी केले जात आहे. ज्याच्याबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी ज्याची पूजा करायची, त्याच झाडाची या कारणासाठी काटछाट करणे हा मूळ उद्देशाचा केवढा विपर्यास आहे? सावित्रीची कथा तर आता हरवून गेली आहे. तिने यमधर्माशी कसली चर्चा केली हे क्वचितच कोणाला माहीत असेल. पतीनिधनाच्या दुर्धर प्रसंगी तिने आपला तोल सांभाळून इतका सखोल तात्विक संवाद केला ही गोष्ट कोणाला माहीतसुध्दा नसेल.

या वर्षी वटपौर्णिमेच्या पाठोपाठ जागतिक पर्यावरण दिवस येऊन गेला. तो नक्की कसा आणि कितपत साजरा गेला हे काही मला कळले नाही. कदाचित त्या दिवशी काही ठिकाणी पोपटपंची करून वृक्षांचे तोंडभर कौतुक केले गेले असेल, लेख लिहिले आणि वाचले गेले असतील. वनस्पतीविश्वाशी ज्यांची ओळख पुस्तकी ज्ञानामधून झाली आहे अशा लोकांनी यात पुढाकात घेतला असला तरी मला यात आश्चर्य वाटणार नाही. पण पूर्वीच्या काळात अशा व्रतांच्या निमित्याने माणसांच्या मनात वृक्षवल्लींबद्दल आत्मीयता निर्माण केली जात होती तसे काही केले गेले तर ते पर्यावरणासाठी खरोखर उपयुक्त ठरेल.

माझ्यासारखा वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा माणूस पुराणातल्या भाकडकथांवर कसा काय विश्वास ठेऊ शकतो? असा प्रश्न काही लोकांच्या मनात येईल. त्यामुळे माझी याबाबतची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. माणसाच्या आयुष्यात भविष्यकाळात घडणा-या घटना आधीपासून ठरलेल्या नसतात, त्यामुळे त्यांचे अचूक भाकित करता येणे अशक्य आहे, हातावरील रेषा किंवा आकाशातल्या ग्रहांच्या भ्रमणाशी त्याचा काडीमात्र संबंध नसतो, असे माझे ठाम मत आहे. सावित्रीच्या कथेमधल्या सत्यवानाचे आयुष्य अल्प असते असे भाकित त्या काळातील निष्णात ज्योतिष्यांनी केलेले असले तरीही त्याला अखेर चारशे वर्षांचे दीर्घायुष्य लाभते हा विरोधाभास आहे आणि कोणत्याही कारणाने का होईना, पण पुढे असे होणार हे जर आधीच ठरलेले असले तर मग सावित्रीच्या कथेतील हवाच निघून जाईल, तिच्या गुणांना किंवा प्रयत्नांना काही मोलच उरणार नाही.

रेड्यावर आरूढ होऊन साक्षात यमराज तिथे येतात, सत्यवानाच्या शरीरामधून अंगठ्याएवढ्या आकाराचा त्याचा प्राण काढून घेऊन ते परत जायला निघतात, हे सगळे सावित्रीच्या डोळ्यांना दिसते. त्यांच्या मागोमाग तीही तीन दिवस तीन रात्री चालत राहते, यमाशी वाद विवाद संवाद वगैरे करून त्याला शब्दात पकडते आणि सत्यवानाचे प्राण त्याच्या ताब्यातून मिळवून घेते वगैरे कथाभाग विज्ञानाच्या कसोटीवर सत्य घटना ठरू शकत नाही. लहान मुलांना गोष्टी सांगतांना काऊ, चिऊ, वाघोबा, ससुला वगैरे प्राणी माणसांसारखे वागतात आणि बोलतात असे आपण सांगतो तेंव्हा ते खरे नसते हे त्यांनाही माहीत असते, पण मनोरंजक असल्यामुळे मुले त्या गोष्टी आवडीने ऐकून घेतात. नाटक, सिनेमा पाहतांना, कादंब-या वाचतांना त्यातल्या गोष्टी काल्पनिक असतात हे आपल्याला ठाऊक असते तरीही आपण त्यात गुंगून जातो. पुराणातल्या कथासुध्दा अशाच प्रकारे लोकांना आवडाव्यात यासाठी रंजक केलेल्या असतात. ही गोष्ट सुध्दा बहुतेक लोक जाणतात. आजकाल तर यमराज आणि त्याचे वाहन असलेला रेडा हे दोघेही विनोदाचे विषय झाले आहेत आणि त्यांची यथेच्छ कुचेष्टा केली जात असते. कोणालाच त्यांचे भय वाटत नाही. तेंव्हा पुराणामधील कथांमधले अक्षर न् अक्षर सत्य आहे असा अट्टाहास न धरता त्यांचे तात्पर्य आणि त्यातून मिळणारा बोध घेणे महत्वाचे आहे. ज्या कथांमधून असा बोध व मार्गदर्शन मिळते अशाच निवडक कथा एका पिढीकडून पुढच्या पिढीला सांगितल्या गेल्यामुळे आपल्यापर्यंत आल्या आहेत आणि त्यांमध्ये असलेल्या मौलिक तत्वांमुळे त्या चिरकाल टिकून राहणार आहेत.

सावित्रीच्या कथेमधला अवास्तव भाग काढून टाकला तरीसुध्दा बरेच काही अद्भूत असे शिल्लक उरते. लाडात वाढत असलेली एक बुध्दीमान राजकन्या ज्ञानप्राप्तीचा मार्ग धरते आणि शिक्षण घेऊन शास्त्रनिपुण बनते, त्या काळात उपलब्ध असलेल्या अनेक विद्या ती संपादन करते. तिचे आईवडील या बाबतीत आडकाठी न आणता तिला प्रोत्साहन देतात. शिक्षणाद्वारे ती इतके उच्च स्थान गाठते की तिला योग्य असा पती शोधणे तिच्या पालकांच्या आवाक्याबाहेर होऊन गेल्यामुळे तिने आपला वर स्वतः शोधावा असे सुचवले जाते. या उद्देशाने देशोदेश धुंडाळल्यानंतर आंधळ्या आईवडिलांसोबत एका पर्णकुटीत राहणा-या रूपगुणसंपन्न आणि सुशिक्षित, सुसंस्कृत अशा सत्यवानाची निवड ती करते. हे स्थळ आईवडिलांना पसंत नसते. इतर काही लोकांनासुध्दा हे आवडत नाही किंवा सत्यवानाचा हेवा वाटला असेल. तो अल्पायुषी असल्याचे भाकित पसरवले जाते, पण सावित्रीचा निर्णय बदलत नाही. राजवाड्यामधील ऐशोआरामाचे जीवन सोडून ती निर्धन अवस्थेमधील पतीगृही जाते. पतीच्या नित्याच्या कामात त्याला मदत करते. जळणासाठी लाकडे गोळा करायला त्याच्यासोबत अरण्यात जाते. अपघातामुळे तो उंचावरून खाली पडून निष्चेष्ट होतो. गोंधळून न जाता धैर्याने तीन दिवस सतत प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती त्याचे प्राण वाचवते. घोर निराशेच्या अंधारात सापडलेल्या सासूसास-यांना नवी दृष्टी देऊन त्यांचे वैभव मिळवून देते. हे सगळे अलौकिक आणि दिव्य आहे. ते सगळे खरोखर असेच घडले होते की नव्हते याला माझ्या दृष्टीने फारसे महत्व नाही. सावित्रीच्या कथेमध्ये भेटणारी ही दिव्य नायिका मला अद्वितीय भासते. वर्षातून एकदा तिची कहाणी ऐकूनसुध्दा अनेकांना त्यातून नवा प्रकाश मिळण्याची शक्यता आहे.

आता आपण वटसावित्रीव्रताकडे पाहू. आपल्या पूर्वजांनी खुबीने या निमित्य सर्व महिलांना वटवृक्षाकडे आकृष्ट केले आहे. प्रचंड आकार, दीर्घायुष्य, दाट सावली वगैरेंमध्ये वटवृक्षाचे वेगळेपण आहेच. माझ्या कल्पनेनुसार पूर्वीच्या काळात गावोगावी सहज उपलब्ध असणारा हा वृक्ष एकंदरीतच वनस्पतीविश्वाचे प्रतीक मानायला हरकत नाही. मध्ययुगामध्ये अशी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली होती की स्त्रियांना घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. मंगळागौर, हरतालिका, व़टसावित्री यासारख्या व्रतांच्या निमित्याने त्यांना आपापल्या घराबाहेर पडून एकत्र जमायची संधी दिली गेली. त्यावेळी इतर महिलांवर छाप पाडण्यासाठी आणि जास्तीत जास्त चांगले दिसण्यासाठी नटणे, उंची वस्त्रे आभूषणे धारण करणे ओघानेच आले. सौंदर्यप्रदर्शनाचा हा महिलांचा आवडता भाग आज सुध्दा सर्वत्र उत्साहाने पाळला जातो असे मी परवा होऊन गेलेल्या वटपौर्णिमेला पाहिले.

पूर्वीच्या काळात घराबाहेर पडण्यासाठी नवरोबाची संमती मिळणे आवश्यक असे. ती सहजपणे मिळावी म्हणून हे सगळे त्याच्याच भल्यासाठी करत असल्याचा आव आणला गेला. म्हणजे त्याला विरोध करता येणार नाही. पुढील सात जन्म दर वेळी हाच पती मिळावा असे सांगण्यामुळे त्याचा अहंभाव जास्तच सुखावला जाईल अशी अपेक्षा होती. (अलीकडे मात्र हा आपल्यावर अन्याय असल्याची ओरड नवरोजींकडूनच विनोदी नाटकांमध्ये होऊ लागली आहे.) सावित्री आणि सत्यवान दोघेही इतके पुण्यवान होते की धार्मिक समजुतींप्रमाणे पाहता एक तर त्यांच्यासाठी स्वर्गात खास जागा राखून ठेवल्या गेल्या असतील किंवा त्यांना थेट मोक्षप्राप्ती मिळाली असेल. त्यांच्या बाबतीत पुढील सात जन्मांचा प्रश्नच नसणार. तेंव्हा हे जरा अवांतरच होते.

वटसावित्री व्रताच्या उपचाराची आखणी करतांना सगळ्या बाजूंनी अशी मोर्चेबांधणी करून झाल्यावर स्त्रियांना त्यांच्या कोंदट आणि अंधा-या माजघरातून बाहेर काढून मोकळ्या जागेतील वडाच्या विशालकाय झाडाखाली जमवण्याचे योजले गेले. ज्येष्ठ महिना तसा कडक उन्हाचाच असतो. त्यात डेरेदार वटवृक्षाची शीतल सावली जास्तच सुखकारक वाटते. शिवाय वडाच्या पारंब्यामुळे काही खेळ खेळायला मजा येते. या निमित्याने त्या भव्य वृक्षाशी जवळीक निर्माण होते, त्यांच्याबद्दल आपुलकी वाटू लागते. कळत नकळत निसर्गाशी एक नाते जोडले जाते.

पूर्वीच्या काळात वडाची पूजा केल्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकली जात असे. त्यात सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथानक आहेच, सावित्री आणि यमधर्म यांचा संवादसुध्दा असे. हिंदू धर्मशास्त्रांमधील अनेक मुद्दे यातून श्रोत्यांच्या कानावर आपसूक प़डत. पुराणामधील कथेतली सावित्री सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होती, पण मधल्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित केले गेले होते. व्रताचा भाग म्हणून अशा पोथ्यांचे श्रवण केल्यामुळे त्यातून त्यांना धर्माचे थोडे ज्ञान मिळण्याची संधी मिळायची.

"हरित अर्थकारण, तुम्ही त्त्यात आहात का ?" (Green Economy: Does it include you?) हा यंदाच्या जागतिक पर्यावरण दिवसाचा मुख्य विषय आहे. या हरित अर्थव्यवस्थेमध्ये निसर्गाला मध्यवर्ती स्थान आहे. वनसंपदा आणि कृषी या दोन्ही क्षेत्रांमध्ये वनस्पतींची काळजी घेण्यावर भर दिला आहे. माणसाच्या उपभोगाच्या हव्यासापोटी वनस्पतीविश्वाचा जो संहार होत चालला आहे त्यामुळे जागतिक पातळीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वनस्पतींचा -हास थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. सणसमारंभांच्या निमित्याने निसर्गाशी जवळीक साधण्यासारख्या ज्या चालीरीती आपल्या परंपरांमध्ये मिसळून दिल्या गेल्या आहेत त्यामधून हे काम आपसूक होत असे. पुण्य कमावणे किंवा देवाकडे काही मागणे करणे यासाठी नाही, तरी निदान आपल्याच भल्यासाठी निसर्गाकडे वळणे शहाणपणाचे आहे. मग त्यासाठी वटपौर्णिमा असो किंवा जागतिक पर्यावरणदिन असो.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

लेख आवडला. फक्त रोजमर्रा हा हिंदी शब्द सोडता पूर्ण लेख छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे लेखन पुन्हा सुरू झालेले बघून बरे वाटले! Smile
यावेळच्या जागरीक पर्यावरण दिनी पुण्यात महापौरांनी वृक्षारोपण केले, आमदार, खासदार सार्‍यांनी वृक्षारोपण केले. गेले कित्येक वर्षे मी या दिवशी वृक्षारोपण होते असेच बघत आलो आहे. पर्यावरण वगैरे विषयाशी वर्षभर काहिहि संबंध नसणारे एगाच एखादी फांदी जमिनीत खोचून त्याला 'वृक्षारोपण' वगैरे म्हणतात तेव्हा कीव येते.

असो. वटपौर्णिमेपुरते (किंवा त्यानिमित्ताने) तरी वड रहाणे गरजेचे वाटते. वडासारख्या झाडांवर (ज्याला छोटी फळे येतात आणि झाडही विस्तृत असते) अनेक पक्षांचे वसतीस्थान असते. सध्या क्वचित बघायला मिळणारे हळद्या, तांबट, नाचरा वगैरे पक्षी वडाज्वळा हमखास दिसतात, अगदी शहरांतही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडलाच, पण काही मतांबद्दल किंचित मतभेद किंवा भर आहे.

सावित्रीची कथा खरोखर सांगितली जाते तशीच असेल यावर तर अजिबातच विश्वास बसत नाही. तुम्ही केलेली मांडणी शक्य आहेच, पण खरोखर असं काही झालेलं असण्याची आवश्यकताही वाटत नाही. कोणीतरी एक कहाणी सांगितली, आणखी कोणीतरी त्यात आणखी फँटसीची फोडणी घातली, हे वाढत गेलं आणि आजची कथा अस्तित्त्वात आली असं काहीसं. एकेकाळी वटपौर्णिमा, मंगळागौर इत्यादी सणांना महत्त्व का आलं असेल हे तुम्ही लिहीलेलं आहेतच. मग त्याला थोडं "धार्मिक अधिष्ठान" देण्यासाठी ही एक कथाही जोडली. ७०च्या दशकात संतोषी मातेला जन्म दिला गेला, तसाच काहीसा प्रकार सावित्रीच्या गोष्टीबाबतही शक्य असेल असं वाटतं. (या बाबतीतलं माझं वाचन अतिशय मर्यादित आहे; जुन्या ग्रंथांमधे या गोष्टीचा उल्लेख असल्यास मला कल्पना नाही.)

स्त्रियांनी नटून, सजून बाहेर पडण्यात छाप पाडणं हा एक भाग झाला असं वाटतं. घरातल्या स्त्रियांनी उंची कपडे, दागिने घालणे याचा अर्थ पुरूष कर्तबगार आहेत, त्यांची समाजातली पत वाढणे ही गोष्टही होत असल्यामुळे (लैंगिक बाजू वगळता) पुरूषांनाही त्यात आनंदच होणार. त्याशिवाय आपण नटल्या-सजल्यामुळे, व्यवस्थित कपडे घातल्यामुळे आजही स्त्री-पुरूषांना आनंद होतो, त्या काळातही स्त्री-पुरूषांची मानसिकता या बाबतीत वेगळी असेल असं वाटत नाही.

झाडांमुळे जमिनीची धूप कमी होते. दुष्काळी हवेत वार्‍याची वादळं आल्यास जमिनीचा वरचा सुपीक थर उडून जाण्याची भीती असते. एक-दोन वर्षांच्या दुष्काळी हवेत झाडं तगून रहातात, निदान त्यांचे बुंधे, फांद्या तरी! अशा वेळी वारा-वादळं आल्यास जमिनीचा वरचा थर उडून जात नाही हा पण एक फायदा होतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुसंगतीचा विचार करता मलासुद्धा जवळपास आपल्यासारखेच वाटते. प्रत्येक क्था, लघुकथा, नाटक, कादंबर्‍या यांच्यामधील काल्पनिक गोष्टींच्या मुळाशी एकादे वास्तव बीज असते असे काहीसे ऐकले आहे, यामुळे सावित्रीच्या आख्यानाच्या मुळाशी वास्तव वाटणारी एक काल्पनिक कथा माझ्या लेखात दिली आहे.
आपण घातलेल्या मोलाच्या भरीबद्दल धन्य्वाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0