प्रतिबिंबांची वलये

१.
दोन घडी बनलो नचिकेता
प्रेषय मां यमाय म्हटलो मी
पुन्हा नकोचा संभ्रम होता
संभ्रमात दशके जगलो मी
चित्र पाहण्यात दंगलेलो
भंगिमेत पुरता फसलो मी
दोन दिसांचा आहे मेळा
जगाकडे पाहुन हसलो मी
मधेच ही वावटळ धुमसली
विरले सगळे मग विरलो मी
२.
मघाचपासुन वाऱ्याची नुसती भणभण
त्यात मला गावेना माझे उच्चारण
अवसादाचे रंग भरुन गेली दशके
खिन्न पिढीचे हसणे सुध्दा निष्कारण
इतिहासाचे थोटुक धुमसत पडलेले
हवा फुंकणाऱ्यांना कर की पाचारण
किती दिवस ही लपाछपी हे सोंग तरी
खोटा उगला दिवस अरे मग खोटा म्हण
ती साध्या गोष्टींतून विणते अर्थ नवा
मी उगाच कोरत बसलेलो कण अन कण
३.
एक प्रार्थना ओठांमधुनी निघत राहिली
काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली
कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली
जुन्या ऋतूंची साद घेउनी पाउस आला
गेली वर्षे नभातुनी मग गळत राहिली
कुणा न दिसली मूक अरण्यातली पानगळ
त्या दु:खाची गाज दूरवर घुमत राहिली
फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा
दिवस मास वर्षांची शकले पडत राहिली.
४.
उत्तररात्र पुन्हा रस्त्यावर एकांडी
कलंडून गेलेली मरणाची हाळी
लांबलांब रुतलेले औदासिन्य जुने
रीतभात सांभाळत उरलेले बाकी
थोर तुझे कारुण्य – एवढे अस्फुट का
बहुताना दरकार अगा फुंकर साधी
एखादाच कुणी जागा नसता येथे
झोप जशी साऱ्यांवर अंताची ग्लानी
हे अरण्य वळणावळणाने गप्प उभे
जाण बनत ओझे रस्ता दाखवणारी
५.
जगणे विणता येते का
पाणी धरता येते का
म्हणतात जिला निद्रा ती
डोळे मिटता येते का
आहे माझेच परंतू
माझे म्हणता येते का
जगण्याची ढब बेढंगी
जगता जगता येते का
लय बनण्याआधी पाहू
निश्चल बनता येते का
म्हणतोस जगाशी खेटू
परता निजता येते का..
६.
हसण्यात तुझ्या संभ्रम संभ्रम वेल्हाळी गा
माझ्यात उभे घनबन अवघे धुंडाळी गा
माणूस जसा वैराण बरड काटेराची
आभाळ जसे दो-दिवसांची कागाळी गा
चालला उतू हा काळ असा चौबाजूंनी
वार्यात कागदी जीव तुझा सांभाळी गा