ऑफ डॉग्ज् ॲन्ड मेन

१९५०च्या दशकाचा उत्तरार्ध हा अमेरिकन समाजासाठी मोठा रोमहर्षक काळ असला पाहिजे (अर्थात, असं कुठल्याही एका काळाच्या तुकड्याबद्दल म्हणता येईल. वानगीदाखल पाहा : 'It was the best of times, it was the worst of times!'). दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर, अमेरिकेचं महासत्ता म्हणून स्थान प्रस्थापित झालं होतं. ज्या युरोपियन राष्ट्रांकडे एकेकाळी, एक मोठा वर्ग, पितृभूमी आणि पुण्यभूमी म्हणून पाहत असे – त्यांच्या पुनरुत्थानाची जबाबदारी 'मार्शल प्लॅन'मार्फत ह्या नवीन दमाच्या देशानं स्वीकारली होती. युद्धोत्तर काळातील स्थैर्य आणि औद्योगिक क्षेत्रातील समृद्धीमुळे लोकसंख्या वेगानं वाढत होती ('बेबी बूमर' म्हणून ओळखली जाणारी पिढी, साधारण याच काळात, म्हणजे १९४६ ते १९६४च्या सुमारास जन्मली) – आणि जर्मनीतली दळणवळणाची प्रगती डोळ्यांसमोर ठेवून हजारो मैलांचे फ्रीवे (कुठलाही रहदारीचा सिग्नल नसणारे महामार्ग) देशभर बांधले जात होते. 'जी. आय. बिल' आणि कमी व्याजदरांच्या कर्जांची उपलब्धता, यांमुळे उपनगरांमध्ये स्वतंत्र घरांची मागणी सतत वर्धिष्णू होती. वाढती लोकसंख्या 'जा जरा पश्चिमेकडे' हा मंत्र उरी बाळगून मिडवेस्ट, आणि दाटीवाटीच्या ईशान्य आणि पूर्व किनाऱ्यांपासून दूर, देशभर पसरत होती (१९६२ साली, दीडेकशे वर्षांत प्रथमच, कॅलिफोर्नियानं न्यूयॉर्क राज्याला लोकसंख्येत मागे टाकून 'सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य' हे स्थान पटकावलं). स्वतंत्र घर, पोरांसोबत सॉफ्टबॉल खेळायला छोटेखानी अंगण, पोर्चमध्ये गाडी, घरात आधुनिक उपकरणं, टीव्हीवर 'Leave It to Beaver' किंवा 'Father Knows Best'सारखे गोड कार्यक्रम आणि हौसेने, नवनवीन पदार्थ रांधणारी मर्यादशील सुगृहिणी ह्या 'अमेरिकन ड्रीम'ची आवृत्ती, एका मोठ्या वर्गासाठी, प्रत्यक्षात उतरली होती. सांस्कृतिकदृष्ट्या, कृष्णवर्णीय लोकसंख्येच्या शहरी स्थलांतराला महायुद्धांमुळे मिळालेल्या गतीतून प्रथम Rhythm and blues (R&B) आणि काही वर्षांनी 'रॉक अँड रोल'सारख्या अनेक संगीतप्रवाहांतील वैशिष्ट्यांना सामावून घेत पुढे जाणारं नव्या दमाचं संगीत लोकप्रिय होत होतं. प्रथमच "तरुणाई"च्या हातात थोडा पैसा खेळू लागला होता आणि अजस्र आकार धारण करू पाहणाऱ्या अमेरिकन भांडवलशाही विपणनव्यवस्थेला गिऱ्हाईक म्हणून 'टीनएजर' हा नवीन वयोगट सापडला होता.
अर्थात, अधिक खोलवर पाहिल्यास ह्या सुबक चित्रापलीकडचं अधिक व्यामिश्र वास्तव स्पष्ट होतं. वरपांगी दिसणाऱ्या ह्या सुखचित्रावर शीतयुद्धातून कधीही उद्भवू शकणाऱ्या अणुबॉम्बहल्ल्याची दाट छाया होती. असा हल्ला झाला तर काय करायचं, याच्या ड्रिल्स शाळांतून तेव्हा नियमितपणे होत असत. कृष्णवर्णीय सैनिक मोठ्या संख्येनं दुसऱ्या महायुद्धात स्वातंत्र्य आणि समता ह्या ध्येयांसाठी लढले; मात्र युद्धभूमीवरून घरी परतल्यावर त्यांना तत्कालीन अमेरिकन समाजातलं दुय्यम स्थान निमूटपणे स्वीकारावं लागत होतं. १९५४ सालच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या 'Brown v. Board of Education' ह्या निर्णयानं मात्र परिस्थिती बदलू लागली होती. पन्नासच्या दशकाच्या उत्तरार्धात, ह्या 'सेपरेट बट एक्वल' अन्याय्य धोरणाच्या विरोधातल्या चळवळीला, रोझा पार्कसारख्या एकांड्या शिलेदारापासून सुरुवात होऊन, 'सिट-इन'सारख्या सामूहिक निषेधाचीही जोड मिळू लागली होती. स्त्रियांचं कुटुंबातलं स्थान हे प्रामुख्यानं चूल-मूल सांभाळणं आणि संध्याकाळी दमूनभागून घरी परतणाऱ्या कुटुंबप्रमुखाची 'लाजुनि-मनोमनी-उगीच-धुंद-राहते' मोडात प्रतीक्षा करणं इतपतच मर्यादित होतं. (डायॅन कीटन ह्या अलीकडे निधन झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने, 'Then Again' ह्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात, आपल्या आईला 'मिसेस लॉस एंजेलिस' ह्या सौंदर्यस्पर्धेत १९५५ साली भाग घेतल्यावर; स्वयंपाक, जेवणाचं टेबल नीट मांडणं, फुलांची आकर्षक रचना करता येणं, वैयक्तिक टापटीप, पलंगावर उशा-चादरी नीट रचता येणं (bed making), काटकसरीनं कौटुंबिक जमाखर्च हाताळता येणं ह्या निकषांवर गुण दिले गेले, असं नोंदवून ठेवलं आहे).
दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेल्या पिढीला तेव्हाची जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, एकंदरीत हलाखी आणि मंदी यांचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता. परिणामी, आपल्या पालकांच्या पिढीच्या सावध नैतिकतेचा आणि बंदिस्त, नियमबद्ध आणि गुदमरून टाकणाऱ्या चौकटीचा त्यांना जाच होऊ लागला नसता तरच नवल. साठच्या दशकातला बीटल्सचा आणि हिप्पी उपसंस्कृतीचा (subculture) उदय अद्याप दूर असला तरी त्यांची 'बीट जनरेशन'च्या मार्फत चाहूल लागली होती. तीच गोष्ट पर्यावरणाच्या ऱ्हासाची: १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या 'सायलेंट स्प्रिंग' ह्या रेचल कार्सनच्या पुस्तकानं आधुनिक पर्यावरण चळवळीची मुहूर्तमेढ रोवली असली, तरी वाढत्या आणि बेसुमार औद्योगिकीकरणाचे परिणाम तोवर दृग्गोचर होऊ लागले होते.
'सावध! ऐका पुढल्या हाका' हा इशारा काळाच्या आधी देणारी जी मोजकी नावं होती, त्यांत जॉन स्टाईनबेकचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. स्टाईनबेक अर्थातच, 'ऑफ माईस अँड मेन' (१९३७), 'द ग्रेप्स ऑफ रॅथ' (१९३९) आणि 'कॅनरी रो' (१९४५) यांसारख्या १९२०-३० च्या दशकांतील प्रदीर्घ मंदीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या आणि प्रामुख्यानं मध्य कॅलिफोर्नियाच्या मॉन्टरे-सलिनस ह्या (सॅन फ्रान्सिस्को शहराच्या दक्षिणेकडील किनारपट्टी) भागात घडणाऱ्या कादंबऱ्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. स्टाईनबेक ज्या मोठ्या संकल्पना (थीम) आपल्या लेखनातून हाताळतो; त्यांना ह्या भागातलं वातावरण, मिश्र स्पॅनिश-भाषक वस्ती आणि तद्दन शहरी सॅन फ्रान्सिस्कोच्या तुलनेनं निवांत, सुशेगात जगणं ह्या स्थानिक बारकाव्यांची किनार आहे.
१९५०च्या दशकाच्या उत्तरार्धात स्टाईनबेकचं वय साठीकडे झुकलं होतं. भोवंडून टाकणाऱ्या बदलांच्या वेगामुळे, अनेक वर्षं कॅलिफोर्निया राज्याबाहेर आणि देशाबाहेर काढल्यामुळे, आणि कदाचित वाढत्या वयामुळे – आपली नाळ ह्या भूभागापासून तुटली तर नाही, ह्या शंकेनं स्टाईनबेकला ग्रासलं होतं. यावर उपाय म्हणून, १९६० सालच्या सप्टेंबर महिन्यात त्यानं सॅग हार्बर, ह्या न्यूयॉर्क राज्याच्या सुदूरपूर्वेपासून सुरुवात करून जमेल तितकी अमेरिका रोड ट्रिपद्वारे पालथी घालण्याचा बेत आखला. सोबतीला केवळ त्याचा 'चार्ली' नावाचा, फ्रेंच पूडल जातीचा कुत्रा आणि 'रोसिनान्ते' ह्या डॉन किहोतेच्या घोड्याचं नाव दिलेला पिक-अप ट्रक!
—
मुळात असला प्रवास करण्याची निकड भासणं हे लेखकाच्या जिवंतपणाचं लक्षण मानता येईल. सकस लिहिण्यासाठी लेखकाला वेगवेगळे अनुभव स्वत:च घ्यायला हवेत का, याचं उत्तर तितकंसं सरळसोट नाही. जोसेफ कॉनरॅडने, त्याच्या ऐन तारुण्यात, तत्कालीन बेल्जियन काँगोत काही काळ घालवला नसता, तर 'हार्ट ऑफ डार्कनेस' ह्या कादंबरीत त्या भागाचं जे प्रत्ययकारी चित्रण उतरलं आहे – ते तसं उतरलं असतं का? मात्र त्याच वेळी अगदी लहान गावी राहून, वैश्विक संकल्पनांना हात घालणारा फॉकनर किंवा स्वित्झर्लंडमधल्या एका लहान शहरात, अलम दुनियेपासून फटकून एकटी राहणारी आणि गुंतागुंतीच्या, लोकप्रिय कादंबऱ्या लिहिणारी पॅट्रिशिया हायस्मिथ अशी दुसऱ्या टोकाचीही उदाहरणं आहेत. तेव्हा, अर्थातच हे व्यक्तिसापेक्ष झालं. निघण्यापूर्वी एका जवळच्या मित्राला लिहिलेल्या पत्रात, स्टाईनबेकची ह्या रोड ट्रिपमागची भूमिका स्पष्ट होते: “In the fall – right after Labor Day – I’m going to learn about my own country. I’ve lost the flavor and taste and sound of it. It’s been years since I have seen it. Soooo! I’m buying a pick-up truck with a small apartment on it… I just want to look and listen. What I’ll get, I need badly – a re-knowledge of my own country, of its speeches, its views, its attitudes and its changes. It’s long overdue – very long.”
—
ह्या प्रवासातून जन्मलेलं आणि १९६२ साली प्रसिद्ध झालेलं 'Travels with Charley: In search of America' हे रूढ अर्थानं प्रवासवर्णन नाही. (मात्र फोमोमिश्रित कुतूहल शमवण्यासाठी ह्या धर्तीचे तारीखवार नकाशे हौशी संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.)
वर उल्लेखल्याप्रमाणे 'to look and listen' ह्या हेतूंनी प्रवासाला निघालेल्या स्टाईनबेकला मेन राज्यात पहिली अडचण आली. साधारणपणे, स्थानिक जनतेचा कानोसा एखाद्या त्रयस्थाला घ्यायचा असेल तर लोक जिथे मोकळेपणानं वावरतात अशा ठिकाणी जाऊन दूरस्थ निरीक्षण करणं किंवा जमल्यास, एखाद्या व्यक्तीला बोलतं करणं हा एक हमखास मार्ग असतो. तत्कालीन अमेरिकेत अशा जागा म्हणजे स्थानिक बार किंवा चर्च! पण 'न्यू इंग्लंड' ह्या अमेरिकेच्या ईशान्य कोपऱ्यातील भाग तेव्हाही विशेष धार्मिक नव्हता आणि काही गावं इतकी लहान होती, की तिथे स्थानिक बारही नव्हते. भरीस भर, म्हणून टिपिकल न्यू इंग्लंडर हा मितभाषी, पटकन बोलता न होणारा म्हणून प्रसिद्ध. तेव्हा हा बेत पूर्णांशानं तडीस गेला नाही तरी फॉल कलर्सची उधळण पाहत आणि स्थानिक रेडिओ स्टेशनं ऐकत हा प्रवास सुरू होतो.
ऑक्टोबर महिन्यात, आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात स्टाईनबेकनं या बदलांवर भाष्य केलं आहे. प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात जी दृश्यं दिसली, त्यांची संगती लावण्याचा हा पहिला प्रयत्न म्हणता येईल. स्थानिक वृत्तपत्रं जे काम पूर्वी करत असत (बाजारभाव, कार्यक्रमांची माहिती, अगदी गावपातळीवर घडणाऱ्या सामाजिक घडामोडी इ.), ते आता रेडिओ स्टेशनं करू लागली होती. रस्त्याकडेचे छोटेखानी स्टॉल जाऊन त्यांची जागा भडक, kitsch सुव्हेनिअर विकणाऱ्या मोठमोठ्या दुकानांनी आणि मॉल्सनी घेतली होती.
न्यू इंग्लंड आणि मिडवेस्ट ह्या भागांत स्टाईनबेकचा प्रवास सुरू असताना, भरमसाठ वेगानं जाणारे हायवे आणि त्यांच्याभोवती निर्माण झालेली चारचाकीकेंद्रित बाजारपेठ कितीही टाळायची म्हटली, तरी पूर्णत: टाळणं अवघड होतं.
"American cities are like badger holes, ringed with trash – all of them – surrounded by piles of wrecked and rusting automobiles, and almost smothered with rubbish. Everything we use comes in boxes, cartons, bins, the so-called packaging we love so much. The mountains of things we throw away are much greater than the things we use. In this, if in no other way, we can see the wild and reckless exuberance of our production, and waste seems to be the index. Driving along I thought how in France or Italy every item of these thrown-out things would have been saved and used for something."
पुस्तकाचा एकंदरीत सूर हा चिडचिडा, 'गेले ते दिन गेले' छापाचा आहे, अशी एखाद्याची यावरून समजूत होऊ शकते. प्रत्यक्षात, तसं नाही. स्थळ, काळ, भेटलेली माणसं आणि त्या त्या वेळची मन:स्थिती ह्यांचं प्रतिबिंब ह्या पुस्तकात उमटलेलं आहे ('आठवणींचा आणि अनुभवांचा कोलाज' ही घासून गुळगुळीत झालेली उपमा इथे कटाक्षानं टाळली आहे – आणि हे टाळणं, कटाक्षानं अधोरेखित केलं आहे, हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात यावं!)
काही ठिकाणी, प्रवासवर्णनाचं बेअरिंग सोडून स्टाईनबेक, वेळोवेळी भेटलेल्या माणसांबद्दल लिहितो. आडमार्गाच्या रस्त्यांवरून, न्यूयॉर्क राज्याची नंबरप्लेट असणाऱ्या गाडीतून, एकट्यानं प्रवास करणारा माणूस म्हणून त्याच्याकडे लोक किंचित संशयाने, पण बहुतांशी 'कोणी करे हेवा!' ह्या दृष्टीनं पाहतात (पुढे, एक समाज आणि राष्ट्र म्हणून अमेरिकेला एकत्र बांधून ठेवणाऱ्या बाबी कोणत्या यावर प्रकट चिंतन करताना, ही प्रवासाची आणि नवीन अनुभव घेण्याची ओढ, हा एक सामायिक घटक तो नोंदवतो). अशा एकांड्या प्रवासात, त्याच्या सोबत असलेल्या चार्ली ह्या फ्रेंच पूडल कुत्र्यामुळे, अनोळखी लोकही संवाद साधायला उत्सुक असतात.
ह्या संवादांचं, पुस्तकातलं पुनर्लेखन, हे एखाद्या गोळीबंद लघुकथेची आठवण करून देणारं आहे. ते मग मेन राज्यात, बटाट्याच्या शेतांवर काम करण्यासाठी, कॅनडातून दरवर्षी स्थलांतर करणाऱ्या भल्यामोठ्या कुटुंबाच्या, आबदार वयोवृद्ध प्रमुखाशी असोत वा लुईझियानात राईड दिलेल्या एका उद्धट, उघडउघड वर्णद्वेषी माणसासोबत.
नजर ठरणार नाही इतपत संसिद्ध, विस्तीर्ण भुई (पु. शि. रेग्यांची क्षमा मागून) असणारी पश्चिम अमेरिका आणि दाटीवाटीची पूर्व अमेरिका; यांच्यातली मिसिसिपी नदी ही सीमारेषा मानली जाते. खरं तर, मिड-वेस्ट मागे टाकून, मोन्टाना आणि डकोटा राज्यांत आल्यावर, स्टाईनबेकच्या लेखणीचा बदललेला सूर, ठळकपणे जाणवतो. (हे एका अर्थी, नैसर्गिक आहे. ‘सवाना हायपोथिसिस’ किंवा 'बायोफिलिया'सारखे काही सिद्धांत याची सांगड उत्क्रांतीवादी मानसशास्त्राशी घालतात. ते जरी सिद्ध करणं अवघड असलं, तरी क्षितिजापर्यंत धान्यानं भरलेली जमीन आणि दुथडी वाहणाऱ्या नद्या ह्यांसारखी दृश्यं आपल्या मनावरचा ताण कमी करतात, हे जवळपास प्रत्येकानेच अनुभवलं असेल.)
मोन्टानासारख्या विरळ लोकवस्तीच्या, निसर्गसौंदर्यानं नटलेल्या राज्याच्या आपण प्रेमात आहोत, अशी विरळ कबुली स्टाईनबेककडून मिळते. आयडाहोचं चिंचोळं पॅनहँडल मागे टाकून, दक्षिण ओरेगनमधल्या रेडवूड वृक्षांच्या प्रदेशातल्या गाढ, हिरव्या शांततेचं वर्णन तो अशा हळुवारपणे करतो:
“I stayed two days close to the bodies of the giants, and there were no trippers, no chattering troupes with cameras. There's a cathedral hush here. Perhaps the thick soft bark absorbs sound and creates a silence. The trees rise straight up to zenith; there is no horizon. The dawn comes early and remains dawn until the sun is high. Then the green fernlike foliage so far up strains the sunlight to a green gold and distributes it in shafts or rather in stripes of light and shade. After the sun passes zenith it is afternoon and quickly evening with a whispering dusk as long as was the morning.
Thus time and the ordinary divisions of the day are changed. To me dawn and dusk are quiet times, and here in the redwoods nearly the whole of daylight is a quiet time. Birds move in the dim light or flash like sparks through the stripes of sun, but they make little sound. Underfoot is a mattress of needles deposited for over two thousand years. No sound of footsteps can be heard on this thick blanket. To me there's a remote and cloistered feeling here. One holds back speech for fear of disturbing something – what? From my earliest childhood I've felt that something was going on in the groves, something of which I was not a part. And if I had forgotten the feeling, I soon got it back.”
कॅलिफोर्नियात बालपण आणि तारुण्य गेल्यामुळे रेडवूड आणि सिकोया ह्या वृक्षांशी स्टाईनबेक अतिशय जवळून परिचित होता (I have had lifelong association with these things. (Odd that the word "trees" does not apply.) I can accept them and their power and their age because I was early exposed to them.) मात्र त्याच वेळी, ह्या वृक्षांशी बालपणापासून तोंडओळख नसेल तर त्यांची भव्यता अंगावर येणारी वाटू शकते, याचंही त्याला भान आहे (पुढे कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल पुस्तकात चर्चा करतानाही, त्याचा दृष्टिकोन, विरोधी गटातील व्यक्तीला 'रेसिस्ट' म्हणून हिणवण्याऐवजी, त्या व्यक्तीच्या संगोपनात असलेल्या फरकावर लक्ष केंद्रित करण्याइतपत उदारमतवादी आहे).
—
स्टाईनबेकचं कॅलिफोर्नियात अनेक वर्षांनी परतणं हे गुंतागुंतीचं प्रकरण आहे. डकोटा-मोन्टाना-पॅसिफिक नॉर्थवेस्ट हा भुलवून टाकणारा सृष्टिवैविध्याचा भाग मागे टाकून, तो आता जुन्या खुणा शोधत, आपल्या सॅन फ्रान्सिस्कोनजीकच्या सलिनास व्हॅलीत परतला आहे. १९६०ची केनेडी वि. निक्सन निवडणूक आता अगदी जवळ आली आहे, आणि त्याच्या कट्टर रिपब्लिकन बहिणींशी, कितीही निग्रहानं राजकारणावरून चर्चा करायची नाही असं त्यानं ठरवलं, तरी रोज एकमेकांना 'तू कम्युनिस्ट आहेस!' किंवा 'तू चेंगीझ खान शोभतेस!', असं सुनावण्याच्या पातळीवर जाणारे कडवट वाद होत आहेत. अनेक टेकड्या भुईसपाट होऊन, तिथे जुन्या मॉन्टरेची वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य परंपरा नजरेआड करून, हुबेहूब एकासारखी एक घरं पाडली जात आहेत. स्टाईनबेकचे जुने मित्र त्यांच्या आयुष्यात स्थिरावले आहेत आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यापलीकडे, आता त्यांच्यात गप्पा मारण्याचे फारसे विषय उरलेले नाहीत. "You can't go home again because home has ceased to exist except in the mothballs of memory" ह्या कटू, पण अपरिहार्य निष्कर्षाला येऊन जड अंत:करणानं स्टाईनबेक आपल्या लाडक्या मॉन्टरेचा निरोप घेतो, ते थँक्सगिव्हिंगची सुटी आपल्या सासरच्या नातेवाईकांसोबत घालवण्यासाठी.
स्टाईनबेकच्या महत्त्वाकांक्षी रोड ट्रिपचा जवळपास निम्मा भाग बाकी आहे – पण टेक्ससमध्ये मित्र आणि नातेवाईकांसोबत काही काळ मजेत घालवल्यावर, पुढे दक्षिणेतल्या राज्यांतून प्रवास करताना आपल्यासमोर काय वाढून ठेवलं आहे, याची चांगलीच कल्पना त्याला होती. शेजारच्या लुईझियाना राज्यातल्या, न्यू ऑर्लिन्स शहरातल्या एका शाळेत, डिसेग्रगेशनचं – म्हणजे श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय मुलं एकाच वर्गात शिकतील – हे धोरण राबवलं जात होतं. त्याला होणारा कडव्या विरोधाचं नेतृत्व, त्या शाळेत आपली मुलं असणाऱ्या, काही श्वेतवर्णीय मध्यमवयीन महिला करत होत्या. शाळा सुरू व्हायच्या वेळेवर, रोज त्या शाळेबाहेर उभ्या राहत आणि आत जाणाऱ्या, भेदरलेल्या कृष्णवर्णीय मुलामुलींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत. हा तमाशा पहायला दिवसेंदिवस अधिक गर्दी जमू लागली, आणि वृत्तपत्रांत आणि बातम्यांत ह्या चमूतील, अधिक आक्रमक उपगटाला 'चीअरलीडर' हे अभिधानही मिळालं.
हे सगळं चक्षुर्वैसत्यं पाहण्यातली विचित्र उत्सुकता कबूल करून स्टाईनबेक न्यू ऑर्लिन्सकडे कूच करतो. आपली न्यूयॉर्क राज्याची नंबरप्लेट असणारी, आणि राहण्याखाण्याची सोय असल्यानं एरवीही वेगळी दिसणारी गाडी ह्या गर्दीत ठळकपणे उठून दिसणार, म्हणून शहरानजीकच्या एका पार्किंग लॉटमध्ये तो दाखल झाल्यावर, तिथला मदतनीस गाडीजवळ येऊन म्हणतो, "ओह, तुमच्या गाडीत कुत्रा आहे होय! मला वाटलं की कुणी भलामोठा काळा माणूस (big old ni**er) बसलाय!" (हाच विनोद दक्षिणेतल्या राज्यांतील त्याच्या पुढच्या प्रवासात, कधी पेट्रोल भरताना किंवा क्वचित गाडीत झोपायचा कंटाळा आला, म्हणून रात्रीपुरतं हॉटेल शोधताना, अनेकदा ऐकायला मिळाला. याला, निराळ्या संदर्भात, 'बनॅलिटी ऑफ इव्हिल' म्हणता येईल!).
डिसेग्रगेशनविरोधातल्या या चीअरलीडर्सचं स्टाईनबेकनं केलेलं वर्णन मुळातून वाचायला हवं :
"A shrill, grating voice rang out. The yelling was not in chorus. Each took a turn and at the end of each the crowd broke into howls and roars and whistles of applause. This is what they had come to see and hear.
No newspaper had printed the words these women shouted. It was indicated that they were indelicate, some even said obscene. On television the sound track was made to blur or had crowd noises cut in to cover. But now I heard the words, bestial and filthy and degenerate. In a long and unprotected life I have seen and heard the vomitings of demoniac humans before. Why then did these screams fill me with a shocked and sickened sorrow?
The words written down are dirty, carefully and selectedly filthy. But there was something far worse, here than dirt, a kind of frightening witches' Sabbath (दरवर्षी, एका मध्यरात्री, चेटकिणी सैतानाला भेटतात, ही समजूत). Here was no spontaneous cry of anger, of insane rage.
Perhaps that is what made me sick with weary nausea. Here was no principle good or bad, no direction. These blowzy women with their little hats and their clippings hungered for attention. They wanted to be admired. They simpered in happy, almost innocent triumph when they were applauded. Theirs was the demented cruelty of egocentric children, and somehow this made their insensate beastliness much more heartbreaking. These were not mothers, not even women. They were crazy actors playing to a crazy audience."
(यातलं शेवटचं वाक्य, 'They were crazy actors playing to a crazy audience', सध्याच्या अमेरिकेतल्या, 'लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार' स्थितीला किती समर्पकपणे लागू पडतं, नाही!)
—
शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवून टाकणाऱ्या ह्या रोड ट्रिपच्या अखेरच्या टप्प्यात, स्टाईनबेकला घराचे वेध लागतात. सुमारे अडीच-तीन महिने प्रवासात घेतलेल्या अनुभवांची, मनावर उमटलेल्या प्रतिमांची काहीएक संगती लावायचा प्रयत्न सुरू होतो. आधुनिक शोधांमुळे आणि औद्योगिकीकरणामुळे गरिबीतून बाहेर पडलेला एक मोठा वर्ग आणि दुसरीकडे त्याचे प्रदूषण, वाहतूककोंडी यांसारखे जाणवू लागलेले दुष्परिणाम; ह्या खंडप्राय देशातल्या वेगवेगळ्या गट-उपगटांत, एक 'अमेरिकन' म्हणून बळकट, समान धागा आहे याची वेळोवेळी 'जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत' ह्या जातकुळीची झालेली जाणीव आणि दक्षिणेतल्या उघडउघड वर्णद्वेषी माणसांशी झालेल्या भेटीत उडालेले खटके असोत वा आपली मुळं रुजावीत याची अजिबात असोशी नसणारं ट्रेलर पार्कमधलं कुटुंब असो – 'कुठून येतात हे असले लोक?' असा पडलेला प्रश्न – ह्यांतल्या अंगभूत विरोधाभासाला तो शरण जातो. (इथे, नखशिखांत अमेरिकन असणाऱ्या वॉल्ट विटमनच्या "Do I contradict myself? Very well, I do!" ह्या ओळीची आठवण होणं अपरिहार्य!)
एक माणूस म्हणून वेगवेगळे अनुभव ग्रहण करण्याच्या आपल्या क्षमतेच्या तोकडेपणाची आणि तिला असलेल्या स्थळ-काळ-संगोपन ह्या मर्यादांची तो कबुली देतो – आणि ह्या दीर्घ प्रवासाच्या शेवटी, ज्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा सारा खटाटोप केला; त्यांची सरळसोट, नेटकी उत्तरं शक्य नाहीत ह्या उपनिषदांसारख्या 'नेति, नेति!' निष्कर्षाला येऊन पोचतो.
—
ह्या प्रवासाच्या आणि पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर, आजच्या अमेरिकेकडे पाहिलं की काय दिसतं, हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल.
स्टाईनबेकच्या प्रवासातून वाचकासमोर तत्कालीन अमेरिकेचं, व्यामिश्र चित्र उभं राहतं – पण 'ट्रॅव्हल्स विथ चार्ली', हे वर म्हटल्याप्रमाणे, वाचकाला कुठलंही सुलभ, कृतिप्रवण उत्तर देत नाही. काही दिवसांपूर्वी, एका निंद्य गोळीबाराच्या घटनेत दुर्दैवानं मृत्युमुखी पडलेल्या दुसऱ्या चार्लीचा प्रवास, हा याच्या बरोबर उलट होता. जटिल समस्यांचं सुलभीकरण, एका गटाला साऱ्या समस्यांसाठी दोषी ठरवणं, चकचकीत वेष्टणात सादर केलेली अर्धसत्यं आणि धडधडीत खोटी विधानं, या साऱ्यांचा रोख समूहउन्मादाला खतपाणी घालण्याकडे होता. २०२४च्या निवडणुकीत तरुण मुलांचा कल ट्रम्पकडे (आधीच्या निवडणुकांच्या तुलनेनं अधिक) झुकण्यामागे अनेक कारणं होती (महागाई, बायडेनच्या कारकीर्दीबद्दलचा असंतोष इ.); पण ह्या प्रकारचा प्रतिगामी प्रचार हे त्यांपैकी महत्त्वाचं एक.
ज्या १९५०च्या दशकाचा स्टाईनबेकनं लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न आपल्या पुस्तकाद्वारे केला, त्या काळातल्या, काल्पनिक युटोपियाची भुरळ अमेरिकेतल्या एका मोठ्या तरुणवर्गाला पुन्हा पडलेली दिसून येते. हॅरिसन बटकर हा 'कॅन्सस सिटी चीफ्स' ह्या अमेरिकन फुटबॉल टीमचा खेळाडू. त्यानं एका खासगी, कॅथलिक कॉलेजच्या पदवीदान समारंभाच्या प्रसंगी केलेलं भाषण हे, या संदर्भात, प्रातिनिधिक मानता येईल. त्यात त्याने, आपली पत्नी, आई झाल्यानंतरच तिचं खरं आयुष्य सुरू झालं असा दावा केला आणि उपस्थित पदवीधर मुलींना, भावी करिअरपेक्षा लग्न आणि मूल यांच्यात अधिक रस असला पाहिजे, असा उपदेश केला. त्याव्यतिरिक्त कोव्हिड लस, प्राईड मंथ म्हणजे 'डेडली सिन', गर्भपाताला कुठल्याही परिस्थितीत विरोध इ. नेहमीचे यशस्वी कलाकार होतेच. थोडक्यात सर्व सत्ता गोऱ्या, स्ट्रेट पुरुषांच्या हाती असताना आणि त्यांना आपलं पौरुष बेमुर्वतपणे सिद्ध करण्याची (unapologetic masculinity) पदोपदी संधी मिळत असणाऱ्या काळात अमेरिकेला घेऊन जाणं, म्हणजेच तिचं जुनं वैभव पुनर्प्रस्थापित करणं (मागा!). आणि, ह्या स्वरूपाच्या विधानांची वारंवारिता इतकी वाढली आहे की, त्याविरोधात उमटणाऱ्या प्रतिक्रियाही सुन्न, बोथट होत चालल्या आहेत. उदाहरणार्थ, देशभरातील 'यंग रिपब्लिकन्स' ह्या १८ ते ४० वयोगटातील, रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आपापसातील, अलीकडेच उघडकीस आलेली ही चर्चा पहा.

ह्या मागची कारणं अनेक असू शकतात :
कदाचित मानवी स्वभावात [Fight-or-flight responseसारखे आदिम निर्णय घेणारा मेंदूचा एक भाग (Limbic System) आणि त्याला कधीमधी काबूत ठेवणारा – स्मृती, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या गुंतागुंतीच्या बाबींवर नियंत्रण घेणारा – दुसरा भाग (Prefrontal Cortex) यांच्यातला सनातन लढा];
कदाचित उत्क्रांतीत [भटक्या, शिकारी टोळ्यांच्या टप्प्यातली (hunter-gatherer), जे जे आपल्या टोळीबाहेरचे, आपल्याहून निराळे दिसणारे, खाण्यापिण्याच्या वेगळ्या सवयी असणारे, वेगळी भाषा बोलणारे वा वेगळ्या जातिधर्माचे आहेत; ते सारे धोकादायक ही खोलवर रुजलेली जाणीव];
कदाचित उपलब्ध संसाधनं (resources) जतन करण्याच्या आपल्या शारीरिक व मानसिक जडणघडणीच्या कलात [एका मर्यादेपलीकडे वजन कमी करायला किती त्रास होतो हे आपल्यापैकी बहुतेकांनी अनुभवलं असेल. अगदी शारीरिक हालचालीचं प्रमाण वाढवलं तरी एका मर्यादेपलीकडे त्याद्वारे जाळल्या जाणाऱ्या कॅलऱ्या समप्रमाणात वाढत नाहीत (The Exercise Paradox). मानसिक बँडविड्थचंही तसंच काही असेल का? कुणीतरी आपल्यासाठी निर्णय परस्पर घेत आहे (मग तो परमेश्वर असो, हुकूमशहा असो वा टूर ऑपरेटर!), यातून 'चला, एक कटकट टळली!' असा सुटकेचा नि:श्वास सोडणारे लोक पाहिले, की तसं वाटू लागतं खरं!]
आणि नक्कीच आधुनिक जीवनशैलीत [आता इंटरनेट सर्वदूर पोहोचण्याच्या आणि कृत्रिम प्रज्ञेच्या क्षमतेची चाहूल लागण्याच्या काळात, सामान्य माणसाच्या अवधानावरची व्यवधानं इतकी वाढली आहेत की त्या कोलाहलात जटिल, अस्पष्ट, व्यामिश्रतेपेक्षा सुलभ, काळी-पांढरी विभागणी अधिक आकर्षक वाटावी यात नवल नाही.]
—
'ट्रॅव्हल्स विथ चार्ली' हे निर्दोष पुस्तक नाही. लेखनाचा ओघ वेळोवेळी कमीअधिक होतो ('Antifiction' हा त्यामागचा हेतू असेल, असं वाटत नाही). सेग्रगेशनच्या वर्णद्वेषी धोरणाबद्दल स्टाईनबेकचं मत काय आहे, हे उघड असलं तरी ते पुरेशा जोरकसपणे व्यक्त होत नाही, असा आक्षेपही अनेकांनी घेतला आहे. मात्र, एका खंडप्राय राष्ट्राला आपल्या महासत्तापदाची चुणूक दिसू लागली असताना, त्या देशापुढची आव्हानं काय होती आणि समाजमनाचा कल काय होता, हे जाणून घ्यायचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. वरील काही परिच्छेदांत म्हटल्याप्रमाणे, त्या दशकाचं निर्जंतुकीकरण करून त्याला आकर्षक वेष्टणात विकण्याचे परिणाम काय आहेत, ते आता पुरेसं स्पष्ट होऊ लागलं आहे. अशा परिस्थितीत, 'ट्रॅव्हल्स विथ चार्ली'सारख्या प्रयत्नांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होतं.

आवडली पुस्तकाची ओळख
त्या काळातल्या, लेखकाला आलेल्या अनुभवांच्या वर्णनाची नुसती झलक वाचुनही, ते पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. अमेरिका हा इतका सुंदर निसर्गाने नटलेला देश आहे की जर अमेरिकेतच रहात असतो, तर रिटायर झाल्यावर उरलेली वर्षं, हा देश आणि माणसं जवळुन पहाण्यात नक्कीच गेलो असतो. टुरिस्ट म्हणुन असं काही बघायला मिळण्याची सुतराम शक्यता नाही. एका चांगल्या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल आभार नंदनभाऊ!
शेवटची, तुम्ही दिलेली रिपब्लिकनांची आपापसातली चर्चा धक्कादायक आहे!