चिंता

असाच आणखी एक प्रवास.

रस्त्यावरचं गाव.
नेहमीप्रमाणे मला उशीर झाला आहे.
माझं काम कधी वेळेत संपत नाही - कारण चर्चेत एकातून एक मुद्दे निघत राहतात.
ते तितकेच महत्त्वाचे असतात.
त्यावर बोलत राहतो आम्ही.

पण आत्ता या उशीराबद्दल मला फार चिंता नाही.
इथं काही मीटिंग वगैरे नाही.
तर दोन तीन घरांत आम्ही जाणार आहोत.
नुकतीच एक माहिती गोळा केली आहे आमच्या टीमने.
ती काही घरांत जाऊन, तिथल्या लोकांशी बोलून आणि नंतर (आमच्या हाती असलेल्या) त्या घराच्या माहितीशी पडताळून पहायची आहे.
म्हटलं तर एकदम सोपं काम - म्हटलं तर अवघड.

पुढची मोटरसायकल थांबते. आमची गाडीही थांबते.
आणखी दोघंजण आमची वाट पहात उभे आहेत.
नमस्कार- चमत्कार होतात.
मी त्यांच्या मागे चालायला लागते.
वाटेत उन्हातान्हात निवांत बसलेले लोक आमच्याकडे पाहताहेत.
पोरं मागोमाग येतात आमच्या.
बाया आपापसात बोलायला लागतात.
एक घर दिसतं.
वाकून आत प्रवेश करावा लागणार इतका बुटका दरवाजा.
"मॅडम, हे विधवा कुटुंबप्रमुख स्त्रीचं घर आहे." - माझा सहकारी सांगतो.

माहिती गोळा करताना स्त्रियांची माहिती काळजीपूर्वक गोळा केली गेली आहे ना, स्त्रियांना काही अडचण आलेली नाही ना, पुढच्या प्रक्रियेत त्यांनी सहभागी होण्याचं महत्त्त्व - असं काहीबाही मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यामुळं स्त्रियांचे बचत गट आणि व्यक्तिशः स्त्रियांशी बोलणं हा माझा एक मुद्दा आहे या प्रवासातला.

आम्ही आत शिरतो.
एक सतरंजी अंथरलेली आहे.
लाल रंगांची ती सतरंजी बहुतेक नवी असावी इतकी स्वच्छ आहे.
"आम्हाला उशीर झाला का? तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागली का?" मी बोलायला सुरुवात करते.
"नाही, नाही. या ना. तुमची वाट बघत होतो. ही सतरंजी तुमच्यासाठीच अंथरली आहे." - अगदी डावीकडे बसलेली स्त्री सांगते.

ती स्त्री असेल जेमतेम पंचेचाळीशीची.
तिच्या डाव्या बगलेत एक पोरगी लाजत बसली आहे. ती असेल दोन एक वर्षांची.
उजवीकडे त्यापेक्षा लहान एक पोर.
त्या पोराचा हात पकडून बसलेली एक तरुण स्त्री.
त्या तरुणीच्या पाठीवर हात ठेवून बसलेली आणखी एक स्त्री. तीही पन्नाशीच्या आसपासची.

घर एका खोलीचं. पक्क्या - की कच्च्या? - विटांवर सिमेंटचा गिलावा आहे. वरती पत्रा आहे.
त्या एकाच खोलीला थोडा आडोसा आहे - त्याच्या पल्याड बहुतेक स्वैपाक होत असणार.
घरात काही सामान दिसत नाही फारसं. अगदी गरीब कुटुंब असावं - असा मी मनाशी अंदाज बांधते.
क्षणार्धात मी परत त्या स्त्रियांकडे वळते.

त्या तिघींचेही चेहरे दमलेले आहेत.
नीट पाहिल्यावर कळतं की ती दमणूक नाही तर दु:खाची खूण आहे.
ती मधली तरुण स्त्री एकदम ओक्साबोक्शी रडायला लागते.
तिच्या दोन्ही बाजूला बसलेल्या स्त्रिया तिच्या पाठीवरुन हात फिरवतात.
मी चमकते - कारण तोवर मला जाणवलं आहे की माझ्यासमोर बसलेल्या तिन्ही स्त्रिया विधवा आहेत.

बोलणं होतं .
या तरूण स्त्रीचा नवरा दहा दिवसांपूर्वी अपघातात जागच्या जागी मरण पावला आहे.
मोटरसायकलची धडक.
कोणी दिली?
माहिती नाही.
यांना बातमी कळॅपर्यंत जीव गेलेला होता.
पोलीसांत तक्रार नोंदवली का?
नाही.
कुठं काम करत होता?
असाच कुठंतरी - यांना कुणालाच माहिती नाही.

ही तरुण मुलगी पंचवीस एक वर्षांची असेल.
शाळेत ती कधीच गेली नाही - कारण तिचे वडील तिच्या लहानपणीच वारले आणि आई खडी फोडून (रस्त्यावर टाकली जाणारी खडी फोडणं) पोटाला कमावून आणत असे. धाकट्या भावाला सांभाळायचे काम ती करत असे.

तो धाकटा भाऊ अगदीच लहान आहे - दहा एक वर्षांचा. तो शाळेत जातो आहे सध्या.
तो पण न हसता बसला आहे.
या तरूणं स्त्रीला दोन लेकरं आहेत - वर मी उल्लेख केलेली ती दोन - एक मुलगी आणि दुसरा मुलगा.

डावीकडे बसलेली त्या तरूण स्त्रीची सासू आहे. तीही विधवा आहे.
तिच्या शेजारी आणखी एक दहा-बारा वर्षांचा मुलगा दरम्यान येऊन बसला आहे.
तो तिच्या मुलीचा मुलगा आहे.
त्या मुलाचे आई-वडील - म्हणजे सासूची मुलगी आणि जावई दोघंही मरणं पावले आहेत.
या घरात आता तीन निरक्षर असलेल्या विधवा स्त्रिया आहेत; दोन पाचवीत शिकणारे मुलगे आहेत; एक दोन वर्षांची मुलगी आहे आणि एक दहा महिन्यांच बाळ आहे.

शेती आहे?
हो.
किती?
माहिती नाही.
अर्धा एक एकर असेल.
पाण्याची काही सोय?
नाही. पाऊस येईल तितकीच सोय.
शेती कोण करायचं?
तो अपघातात नुकताच गेलेला मुलगा.
काय होत त्या जमिनीत?
पोटापुरतं काहीसं.

बाकी उत्पन्नाचं साधन?
काही नाही.
काही कागदपत्रं आहेत का घरात?
काही नाही.
रेशन कार्ड?
नाही.
मृत्यूचा दाखला?
नाही.
काही शिवणकाम वगैरे येत?
नाही.

तरुणीची आई अजून खडी फोडायला जाते आणि तिच्या आणि तिच्या मुलाच्या पोटासाठी कमावते.
तिच्याकडे काही कागदपत्र?
नाही.
आधार कार्डाची काहीतरी प्रक्रिया झालेली आहे - पण हातात काहीच नाही.
दारिद्र्यरेषेचं कार्ड नाही का?
होतं - पण ते रद्द झालं.
कधी रद्द झालं?
माहिती नाही.
का रद्द झालं?
माहिती नाही.
दोघी-तिघींपैकी कुणी बचत गटात आहे का?
नाही.

इथं जवळपास कुणी इतर नातेवाईक, भावकीतले लोक आहेत का?
नाही.
होते ते पोराच्या मरणानंतर भेटायला आले होते, पण गेले ते लगेच.
त्यांनाही पोट आहे त्यांच!

मला काही सुचत नाही काय बोलायचं ते.
सोबतच्या एका सरकारी कर्मचा-याला मी विधवा पेन्शन योजनेत काय करता येईल ते पाहायला सांगते.
तो नाव लिहून घेतो त्या तरूण स्त्रीचं आणि तिच्या सासूचं.
पण़ पुढे काही होईल का?
मला उगीच त्या कुटुंबाला खोटी आशा दाखवायची नाही.
सांत्वन तरी काय करायचं?

हे आता काय खाणार?
हे कसे जगणार?
यांच्या घरात फक्त शिकणारी ही दोन मुलं.
ती कधी मोठी होणार?
कधी कमावणार?
त्यांना आपल्या सध्याच्या शाळेत शिकता येईल का?
तोवर हे सगळे काय करणार?
यांच्यासाठी काय करता येईल?
काही करता येईल की नाही?

आम्ही उठतो.

ती तरूण स्त्री म्हणते, "ताई, आणखी एक नाव लिहायचं आहे यादीत."
मी तिच्याकडे चमकून पाहते.
ती सांगते, "पोटात पोर आहे माझ्या. त्याचं नाव आत्ताच लिहिता येईल का?"

तिची चिंता संपणारी नाही.. ती अशीच धगधगत राहणार ...

पूर्वप्रसिद्धी

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

घरातली व्यक्ती जाते आणि सोबत कुटुंबाचीही चिता पेटते. विझेल कि नाही उत्तर देता येणं अशक्य. इथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा रोल किती महत्वाचा आहे याची पुसटशी कल्पनाहि येते. या गोष्टींचा त्रास त्यांना किती होतो हे समोरच्याला कळणं महाकठीण कर्म. Sympathy आणि Empathy या 'कस्टमर रिलेशन्स' मधे शिकलेल्या गोष्टी, रोजच्या व्यवहारात वापरणं किती कठीण याचा प्रत्यय येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवघड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माडगूळकरांच्या कथेत की कादंबरीत 'माणसे जगायला बाहेर पडली' हे वाक्य वाचल्यानंतर पडल्यासारखा मनावर एक ओरखडा उमटतो हे वाचून. चटका लावणारे लेखन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

+१. प्रगतीकडे प्रवास चालू असताना मागे वळून 'खूप अंतर चालून आलो' असं म्हणत असतानाच पुढे 'अजूनही बरंच शिल्लक आहे' हे जाणवून देणारा लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे फार त्रासदायक आहे. पुढे काय झाले?

Sad अजुन काही बोलले तर प्रमाणविपर्यास होतो, भारताला बट्टा लावायचे काम नाही अश्या धमक्या मिळतात. मधल्या मधे राजकारणी सोकावतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विरोचन, अनेक गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्यांचा व्यवहारात उपयोग करणं शक्य होत नाही हेच दिसत!!
मन, अवघड तर आहेच ...
सन्जोप राव, अशा किती घटना, किती प्रसंग आजुबाजूला घडत असतात, ...याची काही गणती नाही.
सहज,ही घटना अगदी अलिकडची आहे. योग्य तो पाठपुरावा केल्यावर काही काळानेच तुमच्या 'पुढे काय झाले?' या प्रश्नाचे उत्तर देता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेकदा असे वाचायचे नाही ठरवतो.. पण वाचतो
वाचले तर वाचले, आता विचार करायचा नाही ठरवतो .. पण विचार येतातच
विचार आले तर आले, आता वाईट वाटून घ्यायचं नाहि ठरवतो.. पण नकळत वाईट वाटू लागते
बरं वाईट वाटते तर वाटते, असहाय वाटून घ्यायचं नाही असं ठरवतो.. पण छे! असं वाचलं की असहायच वाटते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एकंदरीत निराशाजनक परिस्थिती दिसतेय. वाचून काळजात कालवाकालव झाली. पण दु:खाची गोष्ट अशी की ही कालवाकालव फार टिकत नाही, थोड्या वेळातच हे विसरून रोजची कामं सुरू होतात.
-----------------------------------

अवांतरः शेवट वाचून काही वर्षांपूर्वी पाहिलेलं पण मनावर परिणाम करून गेलेलं एक दृष्य आठवलं. बंगलोरातल्या एका मोठ्या मॉलसमोरच्या फूटपाथवर एक १६-१७ वर्षाची (त्यापेक्षा कमी असेल पण जास्त नाही) मुलगी अतिशय जीर्ण-विदीर्ण परिस्थितीत भीक मागत बसली होती. तिच्या मांडीवर एक बाळ होतं आणि पोटात दुसरं! एकदम मनात आलं की यापैके एक तरी मूल तिचं स्वेच्छेने असेल का? ती बिचारी शून्यात नजर लावून फक्त एक हात मागण्याकरता पुढे पसरून बसली होती. तिला बघून एकदम मनात चर्र काहीसं झालं आणि आपली सो कॉल्ड १-२ रुपायचीही 'मदत' न करता मी तशीच विचारात पुढे निघून गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

प्रतिक्रिया काय द्यावी हे ही समजत नाही. द्यावी का न द्यावी असाच प्रश्न पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राजेश, 'अजून बरंच शिल्लक आहे' असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे यात काही शंका नाही.

ऋषिकेश, हे अपरिहार्य आहे एका अर्थी. नुसतं वाचून,पाहून,ऐकून आपल्याला इतकं हतबल वाटतं - मग ते जगणा-यांची काय अवस्था होत असेल याची आपण कल्पना करु शकतो.

स्मिता, 'परदु:ख शीतल' या न्यायाने आपण अशा घटना विसरुन जातो - पण त्या पूर्ण विसरल्या जातात असंही होत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्रासदायक.
असलं काही माझ्या कामाचा भाग नाही हे चांगलच आहे.
नाहीतर हे असं सारखं सारखं पहायला लागलं असतं तर आउट झालं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars