नास्तिकतेच्या पलीकडे
(नुकतीच सेवाग्राम येथे नास्तिक परिषद पार पडली. आयोजक मित्रांनी या परिषदेत विचार मांडायची मला संधी दिली. त्यावेळेला मी अतिशय थोडक्यात पाच ते सात मुद्दे मांडले होते. या टिपणात त्यांचा विस्तार करून मांडत आहे.)
आपण नास्तिक परिषदेसाठी गांधीजींचा सेवाग्राम परिसर निवडून मान्य केले आहे की पददलित आणि शोषितांच्या हक्कासाठी लढताना, अल्पसंख्याकांच्या सन्मानासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी करताना आणि समग्र समतेची मागणी करण्यासाठी नास्तिक असण्याची गरज नाही. गांधीजी १००% ईश्वर मानत होते. त्यांनी प्रथम ईश्वराला सत्य मानले आणि नंतर सत्याला ईश्वर मानले. सत्य, जे पूर्णत्वाने कधीच माझ्या हाती लागणार नाही, याची कल्पना असतानाही, त्याची साधना करताना कितीही त्रास सहन करावा लागला, तरीही तो मी सहन करेन. याचे कारण त्यातून मला विवेकाचे अधिकाधिक स्पष्ट दर्शन होईल. मी अधिकाधिक पूर्ण, उन्नत आणि शुद्ध होत जाईन. असा त्यांचा सत्य नावाचा ईश्वर होता. विवेकाचे अधिकाधिक स्पष्ट दर्शन होणे, अधिक पूर्ण, उन्नत आणि शुद्ध होणे याला कुठलीही फुटपट्टी, मोजमाप नाही किंवा विज्ञानाचा आधारही नाही. यासाठी आपल्याला आपलाच आधार घ्यावा लागतो. म्हणजे मीच माझ्याशी खोलवर प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहून तपासत राहणे असते. यांना आपण विवेक म्हणा किंवा अंतरात्मा! निर्णय तुमचा असतो. मात्र ही कृती आणि त्या अनुषंगाने येणारे निर्णय हे पूर्णपणे व्यक्तिगत, तुमचे एकट्याचेच असतात.
आस्तिक किंवा नास्तिक असणे या आपल्या व्यक्तिगत धारणा आहेत. त्यावर निखळ तात्त्विक चर्चा करणे समजू शकतो. मात्र त्यांना सार्वजनिक रूप देणे धोकादायक होईल. महाराष्ट्रात फक्त घरोघरी गणपती येत असे. मात्र प्रतिक्रियेतून गणपतीला सार्वजनिक स्वरूप दिले गेले. आता आजची गणेशोत्सवांची स्थिती कौतुकास्पद आहे असे आस्तिकसुद्धा बोलणे कठीण आहे. मात्र आस्तिक संघटित स्वरूपात सार्वजनिक होतात म्हणून नास्तिकांनी का होऊ नये असा प्रश्न विचारला तर प्रतिक्रियात्मक झाल्याने दोघांमध्ये फरक काय, असा दुसरा प्रश्न तयार होतो. मूलतः प्रतिक्रियात्मक वागणे हे साकल्याने विचार करून वागण्याचे लक्षण नसते.
आपण आपल्या व्यक्तिगत भावना, दैनंदिन जीवन आणि आपली मूल्ये यांचा ताळमेळ कसा जोडायचा? यासाठी दोन गोष्टी सांगतो. आपण त्यातून अर्थ काढू शकता. आंध्रचे कार्यकर्ते गोपराजू रामचंद्र राव म्हणजे गोरा हे कठोर नास्तिक गांधीवादी होते. १९३०च्या आसपास ते गावोगावी जाऊन नास्तिकतेचा प्रचार करत. गांधीजींप्रमाणेच ते आंतरजातीय विवाहाचे कट्टर पुरस्कार होते. त्यांनी आपल्या मुलीचा विवाह दलित तरुणाशी करायचे ठरवले. निर्णय गांधींना कळविला. गांधीजींचे पत्र आले की लग्न आश्रमात होईल. आपल्या विवाह विधींमध्ये ईश्वराचे नाव असल्याने आम्ही आश्रमात विवाह करू शकत नाही असं गोरांनी सांगितल्यावर गांधीजी म्हणाले ‘एवढेच ना! ईश्वराचे नाव काढून टाकू तेथे सत्य हा शब्द वापरू.’ गोरांनी गांधींच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्याला प्रस्तावना किशोरलाल मश्रूवालांची आहे. किशोरलाल मश्रूवालांनी गोरा आणि गांधींमध्ये साम्य काय आहे हा प्रश्न तयार करून एक वेगळी संकल्पना मांडली. अत्यावश्यक धार्मिकता. समाज परिवर्तन करण्याचे काम तळमळीने करणाऱ्या कार्यकर्त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे समाज बदलावा अशी इच्छा असते. पण त्यासाठी कुठलाही शास्त्रीय आधार नसतो किंवा कुठलीही हमी नसते. किंबहुना त्याच्या इच्छेप्रमाणे बदल होत नसतो तरीही तो कार्यकर्ता काम करत असतो. समाजाला अधिक सुसंस्कृत, सभ्य आणि उन्नत करणे हे आपल्या जीवनाचे तो श्रेयस मानतो. मनुष्य असे का करतो? याला किशोरलाल मश्रूवालांनी ‘अत्यावश्यक धार्मिकता’ म्हटलेले आहे. गांधी आणि गोरा संबंधांमध्ये गांधींची सर्वसमावेशी आस्तिकता आणि गोरांची कठोर नास्तिकता गौण होते. तर त्यांच्या संवादात त्यांची मानवी मूल्यांसाठीची तळमळ आणि त्यांच्या समाज परिवर्तनाच्या प्रेरणा यांना प्राधान्य मिळते.
दुसरे उदाहरण माझ्या संदर्भातले आहे. मध्यंतरी ईदच्या जवळपास नागपुरात धार्मिक दंगा झाला. सर्वत्र मुस्लिम भयग्रस्त होते. ईद साजरी कशी करणार याची चिंता होती. या भयभीत वातावरणात आपण हस्तक्षेप करायला हवा असे वाटले. वर्ध्यातील सर्व संघटनांच्या मित्रांनी कार्यक्रम ठरवला की ईदच्या दिवशी ईदगाहवर जाऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा द्यायच्या. ईश्वराची आराधना भयमुक्त वातावरणात होते असे आम्ही मानतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत, ही त्यामागची भूमिका होती. या नियोजनादरम्यान साहित्य-कलाक्षेत्रातील माझ्या जवळच्या दोन मित्रांना मी म्हटले की आपण लेखक-कलावंतांचे पत्रक काढू आणि या कार्यक्रमाला पाठिंबा देऊ. जमल्यास आपण लेखक-कलावंत म्हणून कार्यक्रमाला हजर राहू. सहसा जनरल शांततेचा संदेश पसरवणे यासारख्या पत्रकांवर सह्या करणे सोपे असते. विशिष्ट भूमिका घ्यायची म्हणजे सध्याच्या वातावरणात व्यावसायिक मर्यादा येतात हे मी समजू शकतो. मित्रांनी व्यावसायिक मर्यादा मांडल्या असत्या तर मला चालले असते. दोघेही म्हणाले की आम्ही नास्तिक असल्याने हे काम करू शकत नाही. आम्ही आजपर्यंत देवळात नाही गेलो तर मशिदीत कसे जाणार. माझे म्हणणे होते की आस्तिक व्यक्तीला त्याच्या ईश्वराची आराधना भयमुक्त वातावरणात करण्याचा हक्क आहे हे नास्तिकांनीसुद्धा मांडायला हवे. मित्रांना ते मान्य झाले नाही. तर प्रश्न असा आहे की आपले प्राधान्य कशाला आहे? खाजगी भावनांना गोंजारून व्यापक मानवी मूल्यांना दूर करायचे की मानवी मूल्यांच्या श्रेष्ठतेसाठी आपल्या व्यक्तिगत भावनांना थोडी मुरड घालायची? अर्थात परत हा निर्णय व्यक्तिगतच आहे. मात्र एक प्रतिक्रिया देता येईल की मानवी मूल्यांना दुय्यम महत्त्व देणारा असाल तर माझ्या दृष्टीने तुमच्या आस्तिक किंवा नास्तिक असण्याला काहीही अर्थ राहत नाही.
आपल्या विचारांच्या प्रसाराचा मार्ग कोणता? यावर गंभीरपणे विचार होताना दिसत नाही. वाद खेळणे, खंडन मंडन करून चीतपट करणे हे शाब्दिक कुस्तीचे प्रकार आहेत. त्यात जिंकणाऱ्याला आनंद मिळतो. मात्र हरणारा तुमच्या विचाराचा होतो का? तो तुमचे ऐकून स्वतःच्या विचारात बदल करू इच्छितो की स्वतःला बंद करून घेतो? याबद्दल आपण आज तरी गंभीरपणे विचार करायला हवा. याचे कारण तंत्रज्ञानातून फोफावलेली समाजमाध्यमे आता अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली आहेत; मात्र बहुतेकांची मानसिकता अजूनही जुनाटच आहे. अशा स्थितीत आपली भूमिका मतपरिवर्तनाची, हृदयपरिवर्तनाची असायला हवी, अन्यथा आपल्या धारदार लेखनातून शत्रूनिर्मिती मुबलक होईल. आपली भाषा कशी हवी? हृदयपरिवर्तन करण्यासाठी विचार कसे मांडावेत? सर्व विचारांतील हिणकस बाजूला करून सकस आपल्याबरोबर कसे घ्यावे? हे आजच्या काळात शिकणे अत्यंत गरजेचे आहे. आपण सर्व नास्तिक मंडळी आहात हे मला माहीत असूनही माझी विनंती आहे की आपल्या भूमिका जाहीरपणे मांडण्यापूर्वी गांधी, विनोबा आणि साने गुरुजी यांचे धर्म आणि संस्कृतीविषयक लिखाण वाचणे गरजेचे आहे.
आपण आजच्या प्रस्थापित प्रवाहांच्या विरोधी असल्याने आपला विचार पसरत नाही अशी भावना प्रस्थापितविरोधी विचारांमध्ये रूढ असते. इतिहासात डोकावले तर हे विधान बौद्ध ते मार्क्सवाद या कोणत्याच विचारांना लागू होत नाही. त्यांचे विचार त्यांच्या काळात नवीनच होते. प्रस्थापितांच्या विरोधीच होते. मात्र ते जनसामान्यांनी स्वीकारण्यापूर्वी त्यांच्यात या विचारांनी भारावलेले हजारो श्रमण ते कॉम्रेड या नावांचे कार्यकर्ते तयार झाले. असे का झाले याचा विचार व्हायला हवा. जे विचार आता रूढ नाहीत ते स्वप्नवत आहेत. मात्र तीच खरी मूल्ये आणि जीवनसरणी आहे. मानवी जीवनाचे सार्थक त्यातच आहे. ही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात आणि या स्वप्नांच्या दिशेने प्रवास करताना माणूस आणि समाज अधिक प्रगल्भ होत जातो हे मांडले गेले. मनुष्यप्राणी आणि इतर प्राणी यांत अनेक फरक म्हणता येतील. आताच्या संदर्भातील फरक म्हणजे मनुष्यप्राणी जे नाही ते तार्किक पद्धतीने रचत जातो. कल्पना करतो. त्या कल्पनाविश्वात रमतो. त्या कल्पनाविश्वाच्या मागे धावतो. मनुष्य जेव्हा अंधश्रद्धेच्या मागे धावतो तेव्हा आपण सरसकट टीका करतो. मात्र समतेच्या क्रांतीची स्वप्ने पाहात आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्याचे आपण गुणगान करतो. खरे तर दोघेही जे नाही त्याच्याच मागे असतात. मात्र फरक मूल्ये आणि अत्यावश्यक धार्मिकतेतून येतो. थोडक्यात मानवाला कायम जे नाही – ते आहे, ते होणार हे समजून त्यात रममाण होण्यात फार रस आहे. नास्तिकतेमध्ये जे नाही – ते नाही म्हटले जाते आणि विचार तेथेच थांबतो. एखादा विचार पसरवायला स्वप्ने रचण्याची कल्पकता आणि सर्जकता लागते. नास्तिकतेने आपला विचार पसरण्यासाठी ही साधने स्वतःच्याच विचाराने बंद केलेली आहेत. परिणामत: हा विचार व्यक्तिगत बनतो आणि मुख्य म्हणजे ती विचारसरणी बनू शकत नाही. त्यामुळे तुम्ही नास्तिक असूनही भांडवलशाहीचे समर्थक, क्रूर शोषक, कडवे धार्मिक आणि कडवे हिंसक असू शकता. आत्ता जे नास्तिक आहेत ते सर्वस्वी भिन्न आणि परस्परविरोधी विचारसरणीमध्ये विभागलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मार्क्सवाद आणि गांधीवाद या विचारसरणी वेगळ्या असल्या तरी त्यांच्या स्वप्नांचे श्रेयस एक असल्याने त्या परस्परविरोधी नाहीत हे विसरून चालणार नाही.
आता आजच्या संदर्भात कोणालाही मानवी मूल्यांची जपणूक करायची असेल, त्यांचे संवर्धन करायचे असेल, त्यांचा प्रसार करायचा असेल तर त्याला आपला धर्म सांगावा लागेल असे माझे मत आहे. आजची परिस्थितीच तशी आहे. ती का निर्माण झाली याची चर्चा नंतर कधी तरी करायलाच हवी. मात्र आजची वस्तुस्थिती नाकारणे चुकीचे होईल. आपल्यापैकी जन्माने हिंदू असणाऱ्यांना अडचण येणार नाही. आस्तिक आणि नास्तिक दर्शनांना हिंदू धर्मात मान्यता आहे. बुद्धालाही अवतार मानलेले आहे. मी हिंदू आहे असे सांगून आपल्याला पटलेला मूल्यसंवर्धनाचा आशय मांडल्यास तो हिंदू विचारच होतो, ही हिंदू धर्मातली उत्तम सोय आहे. मात्र तो आशय रणनीती म्हणून नव्हे तर आचरणातून आणि मनापासून मांडावा लागतो तरच समाज स्वीकारतो हा इथला इतिहास आहे.
शेवटचा मुद्दा. समजा आपल्यापैकी कोणी विचारले की आपण आस्तिक आहात की नास्तिक ते तरी सांगा. तर माझे उत्तर असेल मी सांगणार नाही. तो माझा खाजगी मामला आहे.

*****************************************
विजय तांबे
9869019727 / vtambe@gmail.com
*****************************************
(पूर्वप्रसिद्धी : ‘सर्वंकष’ जानेवारी-मार्च २०२६)
तुम्ही कोणत्या प्रकारचे नास्तिक आहात?
6 प्रकारच्या नास्तिकतेवर भाष्य करणारा हा व्हिडिओ उत्तम आहे.
https://youtu.be/IqXhJTZYMSw?si=dIsyprwyGunlfACR