चतुर उपाय
'काॅर्न टिक्की' तराफा डागडुजीसाठी दिल्याने सिंधुआज्जींना विमानप्रवास करणे क्रमप्राप्त होते. त्या सुयोग्य वेळेत विमानतळावर आल्या, आणि सुरक्षारक्षकांची तपासणी करून आपल्या विवक्षित फाटकाजवळ पोहोचल्या.
तिथे अंमळ गर्दी होती आणि कोणाचाही पायपोस कोणाच्याही हातात नव्हता. तीनचार रांगा आपापसात पंधरा अंशांचा कोन करून निर्माण झाल्या होत्या. विद्युल्लतापात होताना जैसे भडभुंजे लाह्या भाजतात तसा एकच कलकलाट जाहला होता.
"सबूर!" सिंधुआज्जींनी सर्वांना दटावले. "काय झालं? तुमची गाऱ्हाणी मला सांगा," त्या कनवाळूपणे म्हणाल्या.
"आम्ही इथे आधीच आलो होतो. हे लोक लाऊंजमध्ये पुख्खा झोडून टूथपिक चघळत येतात आणि आमच्यापुढे जाऊ पाहतात," आठ वर्षांचा एक मुलगा सात्विक संतापाने म्हणाला.
"आम्ही लाऊंजमध्ये जाऊन वेळेचा सदुपयोग करतो. उगाच फाटकापाशी येऊन कालापव्यय करत नाही!" पासष्ट वर्षांची एक मुलगी तेवढ्याच सात्विक संतापाने उत्तरली.
"आम्ही दमूनभागून, गणवेश घालून, काम करत असतो पण हे प्रवासी आमचा पाणउतारा करतात, दूषणे देतात," विमानकंपनीचे कर्मचारी भावूक होत्साता म्हणाले.
"याचं कारण एकच - नियमांचं वैविध्य. काहींना वाटतं की फास्ट फाॅरवर्ड करणं महत्त्वाचं. काहींना वाटतं की फाटकापाशी लवकर येणं महत्त्वाचं. आणि याला उपाय एकच - रॅन्डमाईझ करणं!"
"म्हणजे नेमकं कसं सिंधुआज्जी? जरा सविस्तर व्यक्त व्हा," अचानक अवतीर्ण झालेले विमानाचे सहकप्तान म्हणाले.
"कोण इथे कधी पोहोचलं, कोणता वर्ग आहे, सोबत आबालवृद्ध आहेत का, अशा निकषांऐवजी सर्वांना एकच निकष लावायचा. आणि त्या निकषाची पूर्वतयारी करायची संधी कोणालाही नसल्यामुळे सपाट क्रीडा क्षेत्र होईल."
केबिन क्रूच्या मदतीने सिंधुआज्जींनी जवळच्या स्टारबक्समधून बऱ्याच खुर्च्या मागवल्या. त्या एका रांगेत, आलटूनपालटून पूर्वाभिमुख आणि पश्चिमाभिमुख अशा रचल्या. सर्व प्रवाशांना रांगेत उभे केले. आणि मग सिंधुआज्जी गाऊ लागल्या "ओप्पा गङ्गनम स्टाईल!"
गाणे थांबले तसे सुट्ट्यांवरून परतणारे लोक, व्यावसायिक, विद्यार्थी, हवाई यजमानिणी, हौसे-नवसे-गवसे सर्वजण एकमेकांना ढकलत खुर्च्या शोधू लागले. ज्यांना खुर्ची प्राप्त झाली ते महदाश्चर्याने व परमानंदाने हसू लागले. ज्यांना खुर्ची मिळाली नाही त्यांना काही क्षण माफक खेद झाला.
सिंधुआज्जींच्या सूचनेबरहुकुम काही जणांनी खुर्च्या उचलून भिंतीपाशी ठेवल्या. बाद झालेले प्रवासी तेथे स्थानापन्न झाले. आपल्या खुर्च्या परत घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्टारबक्सच्या कर्मचाऱ्यांना कोणीच दाद दिली नाही.
खेळ पुन्हा सुरू झाला. सिंधुआज्जींनी नवीन गाणे सुरू केले, "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी". पुन्हा खुर्च्यांसाठी अहमहमिका झाली. गाणं संपल्यावर आणखी काही खुर्च्या भिंतीपाशी नेण्यात आल्या, आणि या फेरीत बाद झालेले प्रवासी आधी बाद झालेल्या प्रवाशांच्या पुढे जाऊन बसले.
अशा पद्धतीने, सिंधुआज्जींनी प्रवाशांची योजनाबद्ध रांग निर्माण केली. अखेरीस तासाभराने सर्व प्रवासी आपापल्या खुर्च्यांमधून उठून उभे राहिले, आणि गुण्यागोविंदाने आणि कर्कटकगोविंदाने विमानात गेले.
सिंधुआज्जी स्वतःशीच हसल्या. थर्ड वेव्ह काॅफीच्या व्यवस्थापकाकडून त्यांनी ठरवलेली रक्कम प्राप्त केली, आणि मग विमानाकडे कूच केले.
त्यापेक्षासुद्धा…
…सिंधुआज्जी singing “ओप्पा गङ्गनम स्टाईल!” would be a sight for sore eyes!
(अतिअवांतर: सिंधुआज्जींनी “ओप्पा गङ्गनम स्टाईल!” हे सदाशिवपेठी accentमध्ये गायले असावे काय? कारण, त्याच्या पुढचेच गाणे “ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी हे आहे! (वास्तविक, त्या (“ऋणानुबंधाच्या”च्या) ठिकाणी “नरवर कृष्णासमाऽऽऽआऽआन” अधिक शोभले असते, परंतु, तो personal preferenceचा मामला झाला. चालायचेच.))
बाकी, गुण्यागोविंदाने-कर्कटकगोविंदाने वगैरे ठीक आहे.
स्टारबक्सची दया येईल असं कधी वाटलं नव्हतं ;-)
याची किल्ली…
थर्ड वेव्ह कॉफीच्या व्यवस्थापकाकडून त्यांनी ठरवलेली रक्कम प्राप्त केली
यात असावी, असे वाटते. (साला पहले से ही कुछ सेटिंग था, लगता।)
“हवाई यजमानिणी”…
…शब्द (म्हटले तर) आवडला. (पूर्वीच्या “हवाई सुंदरी”पेक्षा निश्चितच कमी सेक्सिस्ट आहे.)
((म्हटले तर) अशासाठी, की, “यजमान” हा मुळात “यज्ञ करणारा” (किंवा, खरे तर, “ज्याच्या नावाने/ज्याला फलप्राप्ती व्हावी, म्हणून यज्ञ केला जातो, तो”) (मराठीत: यज्ञाचा beneficiary) अशा अर्थाचा शब्द आहे. उडत्या विमानात जर यज्ञबिज्ञ करू लागले, तर मग कल्याणच! (अर्थात, मोदी है, तो (साला कुछ भी) मुमकिन है, त्यामुळे... असो.)
(अर्थात, “उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म” अशा अर्थाने यज्ञ घेता येईलच, परंतु, त्यालासुद्धा दोन (संभाव्य) आक्षेप आहेत. एक म्हणजे, विमानातले जेवण हे यज्ञकर्म वगैरे जाणण्याच्या लायकीचे सामान्यतः कधीच नसते. दुसरे म्हणजे, समजा तसे जरी जाणले, तरीसुद्धा, त्या हिशेबाने मग खाणारे प्रवासी हे “यजमान” होणार नाहीत काय?))
त्यापेक्षा, अलीकडील (किंवा, हुसैनकडीलसुद्धा चालेल!) प्रथेस अनुसरून, “उड्डाण परिचारिका” म्हटले तर?
स्टारबक्सची दया येईल असं कधी…
स्टारबक्सची दया येईल असं कधी वाटलं नव्हतं ;-)