चित्रबोध - ३

याआधी:
भाग - १
भाग - २
==========================
भाग - ३


ही दृश्यकलेची जाण मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावे लागेल?


हा प्रश्न मी लेखमालेच्या शेवटी घेतला असला तरी याचा समावेश चित्रबोधाच्या सुरवातीच्या व्याख्यानात होता. माझ्या मते हे व्याख्यान शेवटचे ठेवले असते तर अधिक फायदेशीर वाटले असते. असो.
मुळात या विषयाच्या व्याख्यात्या 'वर्षा सहस्रबुद्धे' यांचे मुलांसोबत काम अनेक वर्षांचे आहे. त्यांच्या अनुभवांवर आधारित हे व्याख्यान मला आवडले. त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले की असा काही 'फॉर्म्युला' नाही की ज्यामुळे मुलांना दृश्यकलांची आवड लागेल. किंबहुना मुलांना कोणत्याही कलेची आवड लावता येईल अस ठोस फॉर्म्युला नाही. मुले शाळेतील अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, शिक्षक-पालकांनी शिकवायचा प्रयत्न केलेल्या गोष्टींपेक्षा अधिक 'मोठ्यांसारखे' वागून बघण्यातून शिकतात. आपले पालक, घरातील इतर मोठ्या व्यक्ती फावल्या वेळात काय करतात याचे मुले बारीक निरीक्षण करत असतात आणि त्यातून त्यांच्याही सवयी, आवडी घडत असतात. याचा अर्थ आई-वडील चित्रे काढत बसले किंवा पुस्तके वाचत बसले म्हणजे लगेच मुले करतील असे नव्हे. मात्र 'असेही करता येते' या एका पर्यायाची नोंद मुलांच्या मनामध्ये होते आणि मग जेव्हा मुले स्वतःच्या आवडीचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात तेव्हा या पर्यायांची त्यांना खूप मदत होते. तेव्हा दृश्यकलेत आवड लागावी याचा प्रयत्न करण्यापेक्षा दृश्यकलेकडे बघणे आनंददायी असू शकते इतपत मुलांपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे.
दुसरे असे की मुले काय बघतात यावर पालकांनी सजग असणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या. त्यांनी उदाहरणादाखल काही दृश्ये दाखवली. जसे काही चित्रपटांच्या उत्तान जाहिरातींचे पोस्टर्स, भरजरी पोशाखात 'नटलेल्या' नवरदेवाने केलेली दुकानाची जाहिरात, 'शुभेच्छुकांची होर्डिंग्ज' वगैरे वगैरे. हे दाखवावे लागत नाही. मुले बघत असतात. याव्यतिरिक्त चित्र म्हणावीत असे आकार बालभारती वगैरे पुस्तकात काढलेली रेखाटने असतात. व त्यांचा दर्जा हा 'तितपतच' असतो. अशावेळी मुलांच्या डोळ्यांना काही 'वेगळे' अनुभवच मिळत नसतील तर ते त्यांच्या चित्रातून, लेखनातून किंवा कोणत्याही अभिव्यक्त होण्याच्या माध्यमातून उमटणार कसे?
वर्षाताईंनी या बाबतीत भारतीय शहरांत अतिशय चिंताजनक परिस्थिती असल्याचे सांगितले. इथे पालक विकांताला विरंगुळा म्हणून एकतर घरी झोपतात, टीव्ही बघतात आणि मॉलमध्ये भटकतात. क्वचित एखादा 'हिट' सिनेमा, हॉटेलातले जेवण वगैरे म्हणजे विरंगुळ्याची परमावधी. वर्षातून एकदा 'प्लान' केलेले आउटिंग हाच काय तो मुलांच्या शहरबाह्य जगाशी आलेला संबंध. त्यामुळे मुलांचे चित्रविषय, चित्र-दृश्य म्हणजे काय याची समज, एकूणच अनुभव फारच संकुचित राहतात. याउलट भारतीय खेड्यातील चित्र आशादायक आहे. याचे कारण त्यांच्याच शब्दात सांगायचे तर "त्यात मुलांची काय चूक. रोज वेगवेगळी आणि समोर रांगोळी काढताना बघणारे डोळे आणि रोज उंबऱ्यावरच्या त्याच रांगोळीचा स्टिकर बघणारे डोळे यांच्या जाणिवांमध्ये फरक हा असायचाच! "

दुसरी गोष्ट कार्टून दाखवणे बंद करणे कितपत शक्य आहे माहीत नाही मात्र ते कमी करावे असेही त्यांनी सुचवले. त्यातून त्यांनी प्रत्यक्ष न बघितलेल्या परकीय कल्पना, प्राणी विकृत (डिस्टॉर्टेड) प्रतिमांच्या रूपात समोर येतात आणि मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होतो.


दृश्यकलांच्या स्पर्धा, परीक्षा असाव्यात का? त्याचे मुलांवर कसे परिणाम होतात?


याबद्दल वर्षाताई विस्ताराने बोलल्या. त्याचा मथितार्थ सांगायचा तर दृश्यकलांच्या स्पर्धा, परीक्षा, क्लास वगैरे शालेय वयात हानिकारक असू शकतात. त्यांनी सांगितले की शाळांमध्ये चालणार एक प्रकार 'चित्राचा विषय देणे' हा मुलांच्या कल्पनाशक्तीला, अभिव्यक्तीला घातक आहे. त्या मुलांना ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी, ठराविकच साधने वापरून, ठराविकच विषयांवर चित्रे काढायला लावल्यावर त्यांच्या अभिव्यक्तीचा पुरता संकोच होतोच. आणि उरलेला संकोच अमुक एक चित्र 'असेच' असले पाहिजे, अश्याच रंगात असले पाहिजे या 'कंडिशनिंग' मुळे होते. एखाद्या छोट्याने त्रिकोणी फळ निळ्या रंगात रंगवले आणि त्याला 'आंबा' म्हटले तर ते 'चूक' होते. ठराविक प्रकारची पाने, झाडे, घरे, मनुष्याकृती, 'देखावे' वगैरे शिक्षणातून केवळ साचेबद्ध कसब तयार होते. कलेचे शिक्षण मिळत नाही. त्यांनी 'क्लासच्या मुलांची आणि क्लास न लावलेल्या विषय न दिलेल्या मुलांची चित्रे तुलनेसाठी दाखवली. त्यातून क्लासमधील चित्रांचा 'तोचतोपणा', साचेबद्धता आणि आपणहून काढलेल्या चित्रांतील 'जिवंतपणा' सहज दिसून आला.

'प्रशिक्षित' चित्र

एका स्पर्धेत पहिल्या आलेल्या मुलांचे चित्र बघा. हे चित्र 'सुबक' आहे. त्यातील आकार ओळखू येत आहेत. 'स्पर्धेला दिलेल्या विषयाशी ते साधर्म्य राखते आहे. मात्र ते अत्यंत साचेबद्ध आहे. 'बॉर्डर' करणे, पट्टीचा वापर, ठराविक आकारातील झाडे, मान्यताप्राप्त रंगसंगती, अगदी ठराविक प्रकारच्या (बालभारती-छाप) मनुष्याकृती आदी सारी 'छापील' वैशिष्ट्ये इथे दिसावीत. माझ्याकडे त्यांनी दिलेल्यासारखी 'जिवंत' चित्रे जालावर पटकन मिळत नसल्याने इथे देता येणार नाहीत. पण सांगायचा मुद्दा वरील चित्राने स्पष्ट व्हावा.

याव्यतिरिक्त 'स्पर्धा'मधले धोके त्यांनी सांगितले. एकतर स्पर्धेला का घालायचं याची पालकांनी दिलेली काही उत्तरे ऐकवली "अहो त्या निमित्ताने तो 'काहीतरी' शिकेल", "हल्लीचे युग हे स्पर्धेचे आहे त्यात 'टिकायचे' असेल तर चित्र कसे हुबेहूब काढता यायला हवे", "त्यानिमित्ताने किमान 'मिकी' काढायला शिकेल". "प्रोत्साहन नको का? ":)
त्यात स्पर्धेचे ठिकाण, वेळ, जागा मुलांना 'हवे तसे' चित्र काढायला सोयीची असेलच असे नाही. त्यात ते 'विषयाचे बंधन' आहेच. त्याहून वाईट म्हणजे तुम्ही त्या चित्रांमध्ये तुलना करणार. तीन मुलांना तथाकथित 'प्रोत्साहन' देण्यासाठी बाकी ९७ मुलांना हतोत्साहित करणार. आपल्याला 'चित्र काढता येत नाही' अशी चमत्कारिक भावना यातून मुलांमध्ये रुजते. याहून एक धोका सांगण्यासाठी त्यांनी एक प्रयोग सांगितला.
एकदा प्रयोग म्हणून एकाच वयाच्या मुलांचे दोन गट पाडले. दोन्ही गटांना चित्राचे विषय दिले नाहीत मात्र एका गटाला चित्र काढल्यावर एक चॉकलेट मिळेल असे सांगितले. दोन्ही गटातील मुलांनी मनसोक्त चित्रे काढली. एका गटातील मुलांना चित्र काढल्यावर चॉकलेट देण्यात आले. काही दिवसांनी पुन्हा त्याच गटांना बोलावले व अजून एकदा चित्र काढण्यास सांगण्यात आले. मात्र यावेळी कोणत्याही गटाला चॉकलेट देण्याचे सांगण्यात आले नाही. ज्या गटाला गेल्यावेळी चॉकलेट दिले नव्हते त्यांनी त्याच उत्साहाने चित्रे काढायला सुरवात केली तर दुसऱ्या गटातला उत्साह तर कमी झालाच त्यांनी चित्र 'उरकले'. तेव्हा काही मिळेल या आमिषामुळे चित्र काढायला एक बाह्य-उद्देश मिळू लागतो आणि तो न मिळाल्यास चित्र काढणे बंद होण्याचा धोका निर्माण होतो.

याही व्यतिरिक्त काही मुद्द्यांवर वर्षाताई बोलल्या. त्यांचे भाषण एकुणात छान झाले व श्रोत्यांना आवडले.


एकुणात चित्रबोधचे वातावरण कसे होते? व्याख्यानांशिवाय इथे इतर कोणत्या अॅक्टीव्हीटीज होत्या का?


चित्रबोधचे एकूण वातावरण उत्साहाचे व उत्सुकतेने भारलेले होते. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संथांमध्ये काम करणारे शिक्षक उपस्थित होते. अगदी विदर्भापासून सिंधुदुर्गापर्यंतच्या शिक्षकांचा यात समावेश होतो. यातील उत्तम गोष्ट म्हणजे या व्याख्यानमालेतील काही व्याख्याते तीनही दिवस प्रेक्षकांना प्रश्न विचारण्यासाठी उपलब्ध होते. दर व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे होतच पण काही व्यक्ती सभाधीट नसतात याची दखल घेऊन व्याख्यात्यांना नंतर भेटणे व प्रश्न विचारणे सुकर झाले होते. याशिवाय माधुरी पुरंदरे व प्रमोद काळे यांचे प्रत्येक व्याख्याना आधी सादर होणारे उतारे, कविता यांची आवर्जून वाट पाहिली जात होती.
सुदर्शनच्या बेसमेंटमध्ये भरपूर चित्रविषयक पुस्तके उपलब्ध करून दिली होती शिवाय अनेक प्रसिद्ध चित्रांच्या प्रतिमा टांगल्या होत्या. दुपारच्या २-३ तासांच्या वेळात व्याख्यात्यांबरोबरच्या अनौपचारिक गप्पा आणि या पुस्तकांच्या खजिन्याचा आनंद सगळेच लुटत होते.
रोज संध्याकाळी एक डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली. प्रत्येक डॉक्युमेंट्री उत्तम होती. व्याख्यानादरम्यान दाखवण्यात आलेली 'ग्लास' असो किंवा चित्रबोध-२ मध्ये उल्लेखिलेली 'साचा'!

मला चित्रबोधमधून काय कळले? काही कळले का?

चित्रबोधने जे उद्दिष्ट ठेवले होते ते पूर्ण झाले होते असे वाटते. इथे श्रोत्याला या क्षेत्राची 'चव' जाणवली. आता कोणतीही नवी चव म्हटली की ती डेव्हलप करणे आलेच. त्यामुळे त्या चवीला असेच न विसरता, ती (बघण्याच्या) सरावाने 'डेव्हलप'करून चवीचा आस्वाद घेणे आवडेल असे वाटण्यापर्यंत माझी प्रगती (खरंतर सुरवात) झाली आहे.

(समाप्त)

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

>>माझ्याकडे त्यांनी दिलेल्यासारखी 'जिवंत' चित्रे जालावर पटकन मिळत नसल्याने इथे देता येणार नाहीत.

हे चालेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कार्यशाळेची सांगोपांग माहिती दिली आहे. धन्यवाद.

या वेळचे कार्यशाळेतले काही मुद्दे पटलेले नाहीत.

चित्र-दृश्य म्हणजे काय याची समज, एकूणच अनुभव फारच संकुचित राहतात. याउलट भारतीय खेड्यातील चित्र आशादायक आहे. याचे कारण त्यांच्याच शब्दात सांगायचे तर "त्यात मुलांची काय चूक. रोज वेगवेगळी आणि समोर रांगोळी काढताना बघणारे डोळे आणि रोज उंबऱ्यावरच्या त्याच रांगोळीचा स्टिकर बघणारे डोळे यांच्या जाणिवांमध्ये फरक हा असायचाच! "

शहरात अनुभवांचे वैविध्य नसते, असे मला काही पटत नाही. खेडेगावात आंगणात रांगोळ्या दिसतात, तर शहरात ट्रकच्या मागे काढलेली लोककला मोठ्या प्रमाणात दिसते.

कार्टून ... त्यातून त्यांनी प्रत्यक्ष न बघितलेल्या परकीय कल्पना, प्राणी विकृत (डिस्टॉर्टेड) प्रतिमांच्या रूपात समोर येतात आणि मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होतो.

???
या दुव्यावरील गोंड चित्रकलेतले प्राणी बघावेत. (दुवा)
किवा येथे वारली चित्रकलेतल्या आकृत्या :

(विकिपीडियावरून प्रत-अधिकारमुक्त चित्र)
प्राणीपक्ष्यांचे शैलीबद्ध "विकृत" आकार बघितल्यामुळे फारसा काही तोटा होतो, हे मला अमान्य आहे.

त्याचा मथितार्थ सांगायचा तर दृश्यकलांच्या स्पर्धा, परीक्षा, क्लास वगैरे शालेय वयात हानिकारक असू शकतात. ... त्या मुलांना ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी, ठराविकच साधने वापरून, ठराविकच विषयांवर चित्रे काढायला लावल्यावर त्यांच्या अभिव्यक्तीचा पुरता संकोच होतोच.

आधीच शाळांमध्ये अभिव्यक्ति-कलांकडे दुर्लक्ष केले जाते. वरील विचारधारेने तर शाळेतून "चित्रकले"चे उच्चाटनच होईल. कारण शाळेत चित्रकलेला जागा हवी तर "ठराविक" तास वेळापत्रकात नोंदवावा लागेल. शिक्षकाकडून काही सुचवण्या हव्या असतील, तर शिक्षकाला माहीत असलेली साधने वर्गात वापरण्यावर भर असणार... जणू काही शिक्षकाला ठाऊक असलेली अभिव्यक्ती अनुभवल्यामुळे अन्य प्रकारची अभिव्यक्ती कुंठित होते! शिक्षक फ्रेंच शिकवतो, म्हणून पुढे विद्यार्थ्याला हवी असून इटालियनमध्ये अभिव्यक्ती करता येणार नाही?

प्रशिक्षित चित्र

मला येथे दिलेले प्रशिक्षित चित्र आवडले. साचेबद्ध आकृती आणि रचना असलेली वारली चित्रे मला आवडतात, तसेच हेसुद्धा आवडले. येथे अभिव्यक्ती त्या चित्रातील कथानकाची आहे.

---

ऋषिकेश यांचे पुन्हा आभार मानतो. त्यांच्या लिखाणामुळे मलाही कार्यशाळेत सहभाग घेता आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वप्रथम माझ्या सदोष/काहिसा वेगळा अर्थ प्रतीत करणार्‍या वाक्य रचनेचा दोष स्वीकारतो. अर्थात वृत्तान्तात माझी मते जाणीवपूर्वक टाळली आहेत - निदान तसा प्रयत्न केला आहे. तरी माझ्या वाक्य रचनेचा दोष मुळ व्याख्यात्याच्या नावावर खपवायचा नसल्याने व्याख्याताची मते वेगळ्या शब्दात मांडायचा प्रयत्न करतो Smile

शहरी अनुभवापेक्षा ग्रामिण अनुभव 'थोर' किंवा चांगले असे प्रस्तूत व्याख्यात्याला म्हणायचे नव्हते. तर शहरी अनुभवांत येणारा तोच तो पणा किंवा एकाच प्रकारची व बर्‍याच अंशी छापील दृश्ये बघून यालाच चित्रकला म्हणतात असा जो समज मुलांमधे पसरतो त्यासंबंधी हे वाक्य होते. आणि मग 'तशी' चित्रे काढता येत नाहीत म्हणून मुले चित्रे काढेनाशी तरी होतात किंवा मग इतर प्रकारच्या चित्रांना नावे तरी ठेऊ लागतात (हे ही मोठ्यांच्याच अनुकरणातून).
दुसरे असे की ग्रामिण जीवनात विविध पक्षी, झाडे, विविध लँडस्केप्स यांचाही अनुभव मुले घेत असतात. शिवाय ग्रामिण मुलांना कलेची विविध रूपे सहज उपलब्ध असतात, त्यामुळे अश्याच प्रकारची चित्रेच 'खरी चित्रे' असा समज तिथे निर्माण होण्यास वाव कमी असतो. त्यामुळे त्या मुलांच्या 'जाणिवा' अधिक विकसीत असतात अश्या अर्थाचे ते भाषण होते (नेमके शब्द विसरलो. हा मला समजलेला मथितार्थ आहे)

प्राणीपक्ष्यांचे शैलीबद्ध "विकृत" आकार बघितल्यामुळे फारसा काही तोटा होतो, हे मला अमान्य आहे

इथे त्या न बघितलेल्या / अस्तित्त्वात नसलेल्या प्राण्यांबद्दल बोलत होत्या. त्यांनी 'मिकी' मुळे मुलांच्या मनुष्याकृतीत कसे फरक पडले आहेत हे दाखवणारी काहि चित्रे दाखवत हा मुद्दा मांडला होता.

मुळ व्याख्यानात एकीकडे स्लाईड्स वर विविध चित्रे दाखवली जात होती ज्यामुळे मुद्दे स्पष्ट होत होते. त्याचे रुपांतर इथे शब्दांत मांडताना माझे शब्द खुजे पडले असावेत.

आता, माझी टिप्पणी:

जणू काही शिक्षकाला ठाऊक असलेली अभिव्यक्ती अनुभवल्यामुळे अन्य प्रकारची अभिव्यक्ती कुंठित होते!

बाकी शाळा/क्लास बद्दल माझ्याच नाते वाईकांचे एक उदाहरण देतो. माझ्या परिचितांकडील एका लहानग्याने शाळेत आंब्याचे चित्र काढले होते. खरेतर त्याला क्लास लावला होता. त्याबरहुकूम त्याने आंबा काढला. त्यात आंब्याचे नाक उजवीकडे काढले तर शाळेतल्या पुस्तकात ते डावीकडे होते. शाळेतील शिक्षिकांनी त्याने काधलेले चित्र 'चूक' आहे असा शेरा देऊन त्याला चित्र 'बरोबर' करून आणायला सांगितले. तो क्लास लावायच्या आधी त्याने काढलेली चित्रे मी पाहिली आहेत. त्यात त्याच्या भोवतालच्या / त्याच्या अनुभवविश्वाचे प्रतिबिंब असे. हल्ली काढलेल्या चित्रात डोंगर-नद्या-उतरत्या छपरांचि घरे वगैरे 'साचेबद्ध' चित्रे तो काढू लागला आहे. शिक्षकाला ठाऊक असलेली अभिव्यक्ती शिकताना जर शिक्षक मुलांच्या अभिव्यक्तीचा संकोच करत असेल (जे इथे सर्रास होताना दिसते आहे) तर मला त्यांच्या आक्षेपात तथ्य दिसते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चित्रबोधने जे उद्दिष्ट ठेवले होते ते पूर्ण झाले होते असे वाटते. इथे श्रोत्याला या क्षेत्राची 'चव' जाणवली.

या लेखमालेविषयीदेखील हेच म्हणावंसं वाटतं. या कार्यशाळेचं सार काढून ते ऐसीच्या वाचकांपर्यंत सादर केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.

मुले शाळेतील अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, शिक्षक-पालकांनी शिकवायचा प्रयत्न केलेल्या गोष्टींपेक्षा अधिक 'मोठ्यांसारखे' वागून बघण्यातून शिकतात. आपले पालक, घरातील इतर मोठ्या व्यक्ती फावल्या वेळात काय करतात याचे मुले बारीक निरीक्षण करत असतात आणि त्यातून त्यांच्याही सवयी, आवडी घडत असतात.

याला जोरदार +१. पालक स्वतः रंगां-आकारां-पोतां कडे आकर्षित होताना, त्यांतून आनंद होताना, त्यांकडे बघून थक्क होताना दिसणं हे सगळ्यात महत्त्वाचं. मात्र शहरी जीवनात हे कुठेतरी हरवून बसलो आहोत, आणि गावातल्या जीवनात ते कुठेतरी आहे हे तितकंसं पटत नाही.

सुबक चित्रकला आणि मुक्त चित्रकला यातला फरक तुम्ही दिलेलं चित्र आणि चिंतातुर जंतूंनी दिलेलं चित्र, यांतून अगदी स्पष्ट होतो.

स्पर्धा, वर्ग नसावेत हे पूर्णपणे पटत नाही. नृत्य करण्यासाठी अवकाशावर बंधनंच असू नयेत असं म्हणण्यासारखं हे झालं. चित्र काढण्यामागे स्पर्धात्मक किंवा ध्येय गाठण्याचा हेतू असू नये हा अधिक व्यापक विचार पटतो. म्हणजे पुरेशी मोकळीक, स्वातंत्र्य मिळून उन्मुक्त नाचायला मोठा मंच असेल तर तो पुरेसा ठरावा. मग तो चार भिंतींनी (बाजूच्या तीन आणि वरची एक Smile ) सामावलेला का असेना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>ऋषिकेश यांचे पुन्हा आभार मानतो. त्यांच्या लिखाणामुळे मलाही कार्यशाळेत सहभाग घेता आला.

असेच म्हणते.
स्पर्धा नि वर्गांच्या बाबतीत - त्याचं स्वरूप इतकं साचेबद्ध असू नये, हे ठीक. पण ते होते म्हणून मला चित्रकलेची थोडीफार तरी आवड / ओळख झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>शहरात अनुभवांचे वैविध्य नसते, असे मला काही पटत नाही. खेडेगावात आंगणात रांगोळ्या दिसतात, तर शहरात ट्रकच्या मागे काढलेली लोककला मोठ्या प्रमाणात दिसते.

मला वाटतं की वैविध्य नाही असा मुद्दा नव्हता, तर शहरांतले सुजाण पालक मुलाला क्लास वगैरे लावून ठोकळेबाज विषयांवरची ठोकळेबाज चित्रं काढायची सवय लावतात. त्यामुळे आपल्या दृश्य-परिसराविषयीच्या मोकळ्या अभिव्यक्तीला मूल मुकतं असा होता.

>>प्राणीपक्ष्यांचे शैलीबद्ध "विकृत" आकार बघितल्यामुळे फारसा काही तोटा होतो, हे मला अमान्य आहे.

सहमत. इथेदेखील मुद्दा इतका सरसकट नसून विशिष्ट आकारांच्या लादलं जाण्यामुळे मुलांच्या अभिव्यक्तीत त्यांच्या होणार्‍या प्राबल्याविषयी होता - म्हणजे मिकी माऊस किंवा डोरेमॉन वगैरेंचे साचेबद्ध आकार प्रबळ होतात, पण मुलाला दिसणारा उंदीर किंवा मांजर त्याला हवा तसा चितारण्याला तो स्वतंत्र असतो हे बिंबवलं जात नाही.

क्लास किंवा प्रशिक्षित चित्राविषयीचा मुद्दा हादेखील आपल्याकडच्या परिस्थितीशी निगडित होता - म्हणजे परीक्षेत मार्क मिळवण्याच्या दृष्टीनं घोकंपट्टी करून घेणार्‍या इतर विषयांच्या वर्गांप्रमाणे इथेदेखील तीच तीच चित्रं तशाच पद्धतीनं गिरवली जातात आणि व्यक्तिगत अभिव्यक्तीला मज्जाव केला जातो. त्यामुळे मुलातली उपजत निर्मितीक्षमता जोपासली जाण्याऐवजी हरवते. याशिवाय आधुनिक कलाविचार आणि पारंपरिक कलाविचार यांतला महत्त्वाचा फरक म्हणजे आधुनिकतेत आलेली व्यक्तिकेंद्री वृत्ती. वारली चित्रकलेसारख्या परंपरा सामूहिक होत्या (त्यात चित्रकारांची नावं गौण असत). आताचं जग मात्र तसं नाही. व्यक्तीला काय वाटतं आणि तिनं कसं अभिव्यक्त व्हावं याचं स्वातंत्र्य तिला उपलब्ध असावं आणि मग त्या स्वातंत्र्यातून व्यक्तिसापेक्ष मोकळी अभिव्यक्ती व्हावी अशी आता निर्मितीक्षम क्षेत्रांत अपेक्षा आहे. इतर विषयांप्रमाणे कलेबाबतसुद्धा हे तत्त्व मुलांत भिनणं महत्त्वाचं आहे. पण आपल्याकडचे क्लासेस त्यावर भर देण्यापेक्षा एकसारखी चित्रं काढण्याचे कारखाने असल्यासारखं काम करतात. त्यात स्वतंत्र विचार आणि अभिव्यक्तीला स्थान नसतं. ते घातक आहे असा मुद्दा होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अधिक नेमक्या शब्दांत मांडल्याबद्दल आभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सविस्तर माहितीबद्दल पुन्हा एकदा आभार ऋषिकेश. विचार करायला, समजून घ्यायला अनेक नवीन मुद्दे मिळाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या लेखमालेमुळे माझाही फायदा झाला. चित्रकलेचे तास, शिक्षक आणि शाळेतून लादलेल्या स्पर्धा यांच्यामुळे चित्रकलेबद्दल तिटकाराच होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद ऋ.

कलास्वाद व कलाअभ्यास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अशी शिबीरे, व्याख्याने इ अधुन मधुन फाईन ट्युनिंग करता उत्तम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वप्रथम मेघना भुस्कुटेचे आभार कारण तिने मला लिंक दिली नसती तर इतके सुंदर लेखन वाचायचे राहून गेले असते. सुरेख! काही महत्वाचे प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आणि त्यावरची चर्चाही वाचता आली. काही विषयांवर मते व्यक्त करायची आहेत ती नंतर करीनच पण सध्या मला माहिती हवी आहे ती या कार्यशाळेसंदर्भात. कधी,कुठे झाली? पुन्हा होणार आहे का? वगैरे. आधीच याबद्दल लिहिले असेल तर कृपया त्याची लिक द्यावी.
धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखन आवडल्याचे कळवल्याबद्द्ल आभार!

सदर कार्यशाळा ३१मे ते ३ जून दरम्यान पुण्यात सुदर्शन कलामंच येथे झाली.
यासंबंधीची माहिती माहितगार यांनी इथे दिली आहे.
शिवाय पूर्वतयारीसंबंधीचा धागा इथे बघता येईल.

अशाच धर्तीचा कार्यक्रम अनेकदा, अन्य शहरांत व्हायला हवा अशी सुचना अनेक उपस्थितांनी केली आहे. पालकनिती परिवार किंवा सुदर्शन कलामंच यांपैकी कोणीही अजूनतरी तशी घोषणा केल्याचे ऐकण्यात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दोन्ही लिंक्स वाचतेय. धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी या आधी दिलेली प्रतिक्रिया मला दिसत नाहिये.

कार्यशाळेच्या अधिक तपशिलासंदर्भात मी विचारले होते. कधी, कुठे झाली वगैरे.

लेखमाला उत्कृष्ट आहे.

ओह दिसली. सॉरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच सुंदर लेखमाला आहे.

चित्रकलेच्या वर्गांबद्दलचे मुद्दे एकदम पटले. "साचा" बुकमार्कवून ठेवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.