भीखाराम

शिव गावातून बाहेर पडताना प्रदीप शर्मा म्हणाले, “आता तुम्हाला भीखारामच्या ताब्यात दिलं, की मग मला काही काळजी नाही.”

“कोण आहेत हे गृहस्थ?” मी कुतुहलानं विचारलं

एव्हाना माझ्या पंचवीस प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यामुळं असेल, ते नुसतेच हसले. मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता – विशेषत: २००६ च्या पुराची कहाणी ऐकता ऐकता आम्ही कधी कनासरला येऊन पोचलो ते कळलच नाही. तिथे एक उंचेपुरे गृहस्थ उभे होते. पस्तीशीच्या आसपास त्यांच वय असेल. त्यांचा वेष आधुनिक होता. खादीच्या जाकिटाआड लपलेल्या कपडयांची इस्त्री विस्कटलेली नव्हती. मिशांमुळे त्यांच्या चेह-याला एक प्रकारची उग्रता आलेली होती. केस काहीसे तपकिरी रंगाकडे झुकणारे, दात पान-तंबाखुचे सेवन जगजाहीर करणारे. पण ते हसले तेंव्हा त्यांचा चेहरा एकदम सौम्य होऊन गेला.

ग्रामपंचायतीचे कार्यालय चांगले सजवलेले होते. वेगवेगळ्या योजनांची माहिती देणारे फलक होते. कार्यालयात अजिबात धूळ नव्हती. ’चहा येतोच आहे’ अस भीखाराम म्हणाले तेव्हा ’आता अर्ध्या तासाची निश्चिंती’ अस मी मनात म्हटलं! पण अक्षरश: तिस-या मिनिटाला चहा आला. मी जरा आश्चर्याने पाहिलं तेव्हा भीखाराम माझ्याकडेच पहात होते. “सगळ नियोजन नीट केलय मॅडम, काही काळजी करू नका” अस ते म्हणाले तेव्हा मी जरा खजील झाले.

’संध्याकाळी कार्यालयातच राहायला या’ भीखारामच्या आमंत्रणावर सगळ्यांचे चेहरे विचारमग्न झाले. “इथ नसेल आवडत तर माझ्या घरी चला राहायला.” भीखाराम म्हणाले. आणि हसत पुढे म्हणाले, “मी काही तुमची राजेशाही बडदास्त नाही ठेवू शकणार, पण माझ्या परीने मी चांगली करेन सोय.” त्यांच्या या खुलाशावर मी काहीतरी मोघम बोलले आणि आम्ही ’गोरसियों का तला’ या आमच्या गावाच्या दिशेने निघालो.

भीखारामला मी ’जी’ वगैरे जोडत नाही, कारण या परिसरात ’राम’ हे ’राव’ सारख वापरलं जात. बाजीराव येथे असते (पहिला किंवा दुसराही!) तर त्यांच नाव बाजीराम असलं असत इकडे. सगळे पुरूष ’राम’ आणि सगळया स्त्रिया ’देवी’. मला पुढच्या दोन दिवसांत संगाराम, मग्गाराम, चेनीराम, हिराराम, नग्गाराम .. असे असंख्य ’राम’ भेटले. तुलसीदेवी, गवरादेवी (गौरा नाही, ’गवरा’च!), लालीदेवी अशा अनेक ’देवी’ही भेटल्या.

गावात उतरल्यावर भीखारामने लोकांना बोलवायला सुरूवात केली. इकडची गावही मजेदार. म्हणजे २५० घरांच हे गाव सुमारे सात ते आठ किलोमीटरच्या परिसरात वसलेलं आहे. चार पाच घरांची किंवा अगदी एक दोन घरांचीही छोटी वस्ती – त्याला ’ढाणी’ म्हणतात. ’भाटी की ढाणी’, ’भिल ढाणी’ अशी त्यांची नावे कोणती कुटंबे तिथे राहतात ते जगजाहीर करतात. भिल ढाणी अर्थात जरा मोठी आहे – अंदाजे पन्नास एक घरांची. घर म्हणजे मातीच्या चार पाच वेगवेगळ्या छोट्या खोल्या. एक खोली अन्न शिजवायची, एक झोपायची, एक धान्य साठवणीची (ज्यात फक्त बाजरी दिसली सगळ्या घरांत) अशी त्याची स्पष्ट विभागणी. अंगणभर कलिंगडं वाळवायला पसरलेली. त्याच्या बिया विकणे हा पैसा कमवायचा एक मार्ग. शेळ्या घरटी किमान दोन ते तीन. कोंबडया मात्र अजिबात दिसल्या नाहीत. जाटांच्या घरात एक तरी गाय असतेच, भिल्लांकडे मात्र गाय नाही. लेकरं मात्र भरपूर. सात आठ लेकरे असणा-या किमान चाळीस स्त्रिया मला त्या दोन दिवसांत भेटल्या. आणि ही संख्या आहे जिवंत असणा-या लेकरांची. पंचवीस तिशीतच त्या बाया किती वेळा बाळंतपणाच्या चक्रातून गेल्या असतील याचा आपण अंदाज त्यावरून बांधू शकतो.

भीखाराम लोकांना बोलवत होते, तोवर मी वही आणि पेन काढल. भीखारामच नाव लिहिताना आपण चुकीच लिहित नाही ना, अशी शंका मनात आली. म्हणून देवनागरीत माझ्या वहीत लिहिलेलं नाव मी भीखारामना दाखवलं. “मॅडम, मी सांगतो तुम्हाला तस लिहा” अस म्हणत Bheekharam असं स्पेलिंग त्यांनी मला सांगितल. “माझा सेल नंबरही लिहा” असं म्हणत त्यांनी मला त्यांचा नंबर दिला. “तुम्हाला नाही लागणार कधी माझा नंबर; पण मी तुम्हाला कधी फोन केला तर तुम्ही फोन बंद करू नये न उचलताच म्हणून ही खबरदारी घेतोय” अस म्हणताना भीखाराम मिस्किलपणे हसत होते.

मला या माणसाबद्दल तोवर ब-यापैकी कुतूहल वाटायला लागलं होतं. लोक जमा होईपर्यंत आम्ही रस्त्यावर उभं राहून गप्पा मारायला लागलो. भीखाराम खरे तर कनासर ग्रामपंचायतीचे सचिव (ग्रामसेवकांचे हे नवे नाव!) आणि गोरसियों का तला गाव येते काश्मिर (हो! तुम्ही बरोबर वाचलेत!) ग्रामपंचायतीत. पण काश्मिर ग्रामपंचायतीचे सचिव काही महिन्यांपूर्वी निवृत्त झाले आहेत आणि सध्या भीखाराम दोन ग्रामपंचायतींचे काम पाहतात.

भीखाराम उंडू गावचे रहिवासी. “तुम्ही किती शिकला आहात?” या माझ्या सहका-याच्या थेट प्रश्नावर भीखाराम हसले. “ती एक कहाणी आहे” अस ते म्हणाले.

लहानपणापासून भीखारामला खूप शिकायच होत, पण घरात आणि गावात त्याच कोणाला काही विशेष अप्रूप नव्हत! मग दहावी तर पन्नास किलोमीटर अंतरावरच्या शिव गावात (जे तालुक्याचे मुख्यालय आहे) केली. बाडमेर हे जिल्ह्याचे ठिकाण आणखी पन्नास साठ किलोमीटर पुढे. पण चांगले शिकायचे तर जोधपुरला गेले पाहिजे असे भीखारामना वाटले. जोधपुर पडते साधारणपणॆ दीडशे किलोमीटर. म्हणजे घरापासून दूर, रोजचे जेवण काही घरून येण्याची शक्यता नव्हती.

जोधपुरला गेल्यावर कॉलेजचा प्रवेश वगैरे तर झाला, पण राहण्याची आणि जेवणाची सोय काही होईना. खोलीचे भाडे सातशे आठशे रूपये – ते आणायचे कोठून? घरातून काही पैसे मिळण्याची शक्यता नव्हती. पोटापाण्याचाही प्रश्न होता.

भीखाराम सांगतात, “आता तुम्ही शहरातले लोक टीका कराल माझ्या वागण्यावर. पण मी सरळ एका मोकळ्या जागेवर अतिक्रमण केलं. साधी झोपडी बांधली स्वत:च आणि राहायला लागलो. सार्वजनिक नळावर आंघोळीची आणि पिण्याच्या पाण्याची सोय झाली. जे शहर गरीबांना जागा देत नाही, त्या शहरात गरीबांना स्वत:साठी अशीच जागा निर्माण करायला लागते मॅडम, मग भले तुमचा कायदा काहीही सांगो. मी कायदा मोडत होतो हे मला कळत होते, पण माझा हेतू चांगला होता, हे तुम्हीही मान्य कराल.”

“राहायची सोय झाली, पण जगायला अन्नही तर लागते. सकाळचे कॉलेज आटोपले की दुपारी मी एका फॅक्टरीत कामाला जायला लागलो. फॅक्टरी कसली म्हणा; दगड फोडायचे काम करत होतो मी तिकडे. आमच्या भागात दगड मिळत नाही, बाहेरून येतो तो. मोठा दगड असतो, तो फोडून त्याचे छोटे चौकोनी तुकडे करायचे, जे मग घर बांधायला वापरले जातात. लहानपणापासून मी ते काम केलेले असल्याने मला ते माहिती होते. माझे तिथले काम बघून काही खाजगी ठेकेदारही मला कामाला बोलवायला लागले. अशा रीतीने कॉलेज करून मी महिन्याला हजार बाराशे कमवायला लागलो. माझा माझा खर्च भागवून घरीही थोडेफार पैसे द्यायला लागलो. अस करत करत राज्यशास्त्र विषयात एम. ए. पूर्ण केलं.”

“मग गावात कसे काय परत आलात?” आमच्यातल्या आणखी एकाचा प्रश्न.

“एवढया शिक्षणावर काही चांगली नोकरी शहरात मिळाली नसती. आणखी शिकायचे तोवर इथल्या प्रथेप्रमाणे लग्न झालं होतं माझं – जबाबदारी वाढतेच ना लग्नानंतर. थोडीफार शेती आहे, ती बघणं पण गरजेच होत. तेवढ्यात ही ग्रामसेवकाची जागा निघाली. काम तर कोठेही करावे लागणारच, मग आपल्या लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाल्यावर मग मी ती घेतलीच. पैसे बियसे काही दिले नाहीत हं मी या नोकरीसाठी. माझ्या शिक्षणाच्या बळावर मला मिळाली ती. मी इथलाच आहे, त्यामुळे लोकांच्या अडचणी मला माहिती आहेत. आमचे लोक अडाणी आहेत, त्यांनी बाहेरचे जग पाहिलेले नाही. शासनाच्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतही नाहीत. मी काही फुकट काम करत नाही , शासन मला पगार देते – पण माझ्या लोकांना माझ्या शिकण्याचा उपयोग होतो. मलाही बरे पडते.” भीखारामच्या उत्तराने आम्हाला अंतर्मुख केले.

पुढचे दोन दिवस भीखाराम आमच्याबरोबर होते – खरे तर आम्ही त्यांच्याबरोबर होतो. गावातल्या लोकांबरोबर आम्ही पुष्कळ बोललो, त्यांचे जगणे समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला – त्यात भीखारामची आम्हाला खूप मदत झाली.

असे अनेक कार्यक्षम, प्रामाणिक, साधे, समंजस, आपल्या समाजावर प्रेम असणारे, मदतीस तयार असणारे, सुशिक्षित आणि सुसंस्कृत भीखाराम आज अदृश्यपणे काम करत आहेत. संघर्षातून पुढे आल्यावरही त्यांच्यात कसल्याही प्रकारचा कडवटपणा नाही. आपल्याकडे जे नाही त्याची त्यांना जाणीव आहे, पण आपल्या ताकदीवर त्यांचा विश्वासही आहे. आपली शक्ती कशी वापरायची याची त्यांनी विचारपूर्वक एक रणनीती बनवली आहे. ते लाचार नाहीत पण उद्धटही नाहीत. ते सहनशील आहेत पण त्यामुळे आपले शोषण होणार नाही इतकी काळजी ते घेतात. ते काही संत महात्मा नाहीत, त्यांनाही त्यांचा स्वार्थ आणि परमार्थ साधायचा आहे. त्यांनाही राग-लोभ असणारच. पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांपेक्षा ते एक पाऊल नक्कीच पुढे आहेत. प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता तिच्यावर त्यांनी मात केलेली आहे.

भीखारामसारख्या माणसांना भेटल्यावर मनाला एक प्रकारची उभारी येते. 'All is not Well’ हे जरी खर असलं तरी ‘All is not over YET’ असा एक दिलासाही मिळतो!

पूर्वप्रसिद्धी

field_vote: 
2.75
Your rating: None Average: 2.8 (4 votes)

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे छानच आहे.

संघर्षातून पुढे आल्यावरही त्यांच्यात कसल्याही प्रकारचा कडवटपणा नाही.

हे विशेष वाटले.
मात्र अतिवासतैंचे लेख वाचले की जसे नेहमी होते तसं फार विचारात मात्र टाकलं नाही या लेखाने

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखाला आटोपशीर हे विशेषण लावावे की नको, असा प्रश्न पडला. उत्तम रेझ्यूमे झाला आहे. आता व्यक्तिचित्र पूर्ण करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम रेझ्यूमे झाला आहे. आता व्यक्तिचित्र पूर्ण करा.
असेच म्हणतो.
अवांतरः रणनीती =?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

छोटेखानी लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारतात अनेक गावं,खेडी आहेत. तिथे ग्रामसेवक व अजुन काय काय पदे असतील ती सगळी भरली गेली आहेत की बर्‍याच रिक्त जागा आहेत? म्हणजे असे अजुन भीखाराम आपल्या गावी पुन्हा जाउ शकतील किंबहुना शहरात जे लोक आयुष्य "ढकलत" आहेत त्यांना हा करियर ऑप्शन आहे का? म्हणजे आपल्यापेक्षा एक पाऊल नक्की पुढे आहे म्हणता ते कसे? जर भीखाराम त्या गावचाच नसता, तिथे उपलब्ध असलेले पद मिळाले नसते तर तो किती पावले मागे अथवा पुढे असता? शिवाय हे मागे पुढे असणे मोजायचेच असेल तर त्याला एक काही तरी चौकट हवी. शहरात राहून कार्यक्षेत्र ग्रामीण विभाग असणार्‍या आतिवासताई देखील भीखारामपेक्षा कमी का समजायच्या?

एखादा भीखाराम हुशार म्हणावा (उपलब्ध संधी व स्वताचे आयुष्य सांगड घातली) की नशीबवान म्हणायचा (गावातच त्याचे भागेल अशी नोकरी-जोडधंदा जमून गेले) की वा वा शहरातुन गावाकडे गेला म्हणून कौतुक करुन विषय संपवायचा?

शक्य असल्यास आजवरच्या ज्या व्यक्तीरेखा आल्या आहेत त्यांना परत एकदा भेटवा, त्याचे तेव्हाचे व आजचे आयुष्य, त्यांचे संघर्ष, त्यातले बदल (यश-अपयश) त्या त्या वेळी लेखात उपस्थित केलेल्या प्रश्नाची काही उत्तरे असल्यास.. फार आवडेल.

एकीकडे कुठेतरी आत वाईट वाटते पण त्याच वेळी हे लेख केवळ डोक्याला त्रास म्हणून येणार असतील तर वाचावे का असा प्रश्न पडतो.

किंबहुना हॉलीवूडमधे जसे काही सिनेमे भारतातील हलाखीची अवस्थाच दाखवून..... असा आक्षेप ह्या लेखमालेवर होउ शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना हॉलीवूडमधे जसे काही सिनेमे भारतातील हलाखीची अवस्थाच दाखवून..... असा आक्षेप ह्या लेखमालेवर होउ शकतो.

आईच्या अंगावर पिण्यार्‍या मुलाचं चित्रण पॉर्नोग्राफी या लेबलाखाली मोडत नाही. तद्वत ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखिकेला एक भीखाराम भेटला, आणि त्याची कहाणी त्यांनी येथे प्रस्तुत केली. ती कहाणी स्फूर्तिदायक आहे, त्यातून बोध घेण्यासारखी, अनुकरणीय आहे, की शहरातील परिस्थितीचे विदारक चित्रण म्हणून डिप्रेसिंग (मराठी?) आहे, की एखाद्या माणसाचे जमून जाण्यामागील निव्वळ योगायोगाची निदर्शक (आणि म्हणूनच अनुकरणाच्या दृष्टीने उपयोगशून्य) आहे, हा एक मुद्दा आहेच. तूर्तास त्यात शिरू इच्छीत नाही. प्रस्तुत चर्चेच्या सोयीकरिता ही कहाणी स्फूर्तिदायक आहे, असे मानून चालू.

तरीही एक प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. लेखिकेला एक भीखाराम काय तो भेटला, आणि त्याची (वरील गृहीतकाप्रमाणे) अत्यंत स्फूर्तिदायक अशी कहाणी लेखिकेने आपल्यासमोर मांडली. इथवर सर्व ठीक, उत्तम! पण त्यापुढे,

असे अनेक कार्यक्षम, प्रामाणिक, साधे, समंजस, आपल्या समाजावर प्रेम असणारे, मदतीस तयार असणारे, सुशिक्षित आणि सुसंस्कृत भीखाराम आज अदृश्यपणे काम करत आहेत.

हा निष्कर्ष त्या एका भीखारामवरून एक्स्ट्रापोलेशनने कसा काय निघू शकला, ते कळले नाही, आणि त्यामुळे पटलेही नाही. या निष्कर्षाप्रत येण्याकरिता अशा अनेक भीखाराम-क्लोनांचा विदा गोळा केला होता काय? शक्य असल्यास त्यांच्या नावांची यादी (पिनकोडासहित पत्त्यासह) येथे देता येईल काय? (पिनकोडासहित पत्ता अशासाठी, की त्यांची भौगोलिक वाटणी साधारणतः कशी आहे, कोणत्या भागांत अतिरिक्त भीखाराम आहेत तर कोणत्या भागांत आणखी भीखाराम चालू शकतील, याचा साधारण अंदाज यावा. कोण जाणे, भीखारामांच्या समान वाटपाकरिता काही योजना आखण्यासाठी पुढेमागे कोणास असा विदा उपयुक्तही ठरू शकेल.)

पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांपेक्षा ते एक पाऊल नक्कीच पुढे आहेत. प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता तिच्यावर त्यांनी मात केलेली आहे.

हे वाचून खूप दु:ख झाले. हेवाही वाटला. आपले आजवरचे आयुष्य व्यर्थ आहे, असेही वाटून गेले. आमच्या नशिबाने आम्हाला प्रतिकूल परिस्थिती अशी आलीच नाही कधी! शाळेत असताना तीर्थरूपांचे घर आणि पुढे कॉलेजातही वसतिगृह या दोन अडचणींमुळे अतिक्रमण करून झोपडी बांधायची संधी मिळाली नाही. तीर्थरूपांचे घरी आणि वसतिगृहातही न्हाणीघर आणि पाणीपुरवठा असल्याकारणाने सार्वजनिक नळावरील आंघोळ आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा लाभ घेऊ शकलो नाही. बरे, मुन्शिपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास करावा म्हटले, तर घरात आणि वसतिगृहातही एक तर लख्ख वीज होती, आणि ती नसायची तेव्हा मुन्शिपाल्टीच्या दिव्याचीही नसायची. पुढे लग्नही अंमळ उशिराच झाल्याकारणाने लहान वयात जबाबदारी वगैरे आली नाही. आता वाटते, तेव्हा हे सारे करावयास पाहिजे होते. फुकट एक पाऊल मागे राहिलो. योग्य वयात योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्याने नुकसान झाले. लुळीपांगळी श्रीमंती नाही तरी मध्यमवर्गीय दुबळेपणाचा बळी ठरलो, आणि (एक पाऊल का होईना, पण) मागे राहिलो. पण आता खूप उशीर झाला आहे. गेलेली वेळ थोडीच पुन्हा परत येते?

निदान पुढच्या पिढ्यांकरिता तरी आता योग्य मार्गदर्शन उपलब्ध झालेले आहे, एवढाच काय तो दिलासा आहे.

Good night, everybody!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद वाचून वक्रोक्ती का काय म्हणतात तस वाटल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिचित्रण ! आणि यथार्थही.
>>>असे अनेक कार्यक्षम, प्रामाणिक, साधे, समंजस, आपल्या समाजावर प्रेम असणारे, मदतीस तयार असणारे, सुशिक्षित आणि सुसंस्कृत भीखाराम आज अदृश्यपणे काम करत आहेत.<<<
खरे आहे. अगदी तंतोतन्त भीखाराम जरी नाही तरी यापैकी बरीच गुण्वैशिष्ट्ये असणारे लोक समजात भेटतात. म्हणूनच आमचा चांगुलपणावरचा विश्वास अजून टिकून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छावी राजावत..

बॉलिवूडमधील अभिनेत्री किंवा मॉडेल शोभावी अशी ३० वषीर्य छावी राजावत जयपूरपासून ३० किमी अंतरावर असलेल्या सोडा गावाची सरपंच आहे. विशेष म्हणजे तिने एमबीएपर्यंतचे शिक्षण घेतले असून, भारती-टेलि व्हेंचर्समधील आपले वरिष्ठ व्यवस्थापकीय पद सोडून ती इथे आली आहे. दारिद्य हटवून विकास साधण्यासाठी समाज कशाप्रकारे हातभार लावू शकतो यावर ११ व्या इन्फो-पॉवर्टी वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये चर्चासत्रात छावीने आपले विचार मांडले होते..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...............................................................
माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी

नक्कीच प्रेरणादायी! अजून विस्ताराने मात्र यायला हवे आहे. कामाबद्दल, अडचणींबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0