'एलियन' विरुद्ध 'प्रोमेथियस' (भाग २)

भाग १

(विस्तारभय आणि रहस्यभेदाच्या भीतीनं इथे गोष्ट फारशी सांगितलेली नाही. दोन्ही सिनेमात कोणते समान घटक आहेत आणि काय फरक आहेत याचं मुख्यत: वर्णन केलेलं आहे. त्यामुळे सिनेमा पाहायच्या आधीही लेख वाचायला हरकत नसावी.)

एलियनशी साम्यं : एलियनप्रमाणे इथेही काळीकुट्ट प्रतिसृष्टी ही चित्रपटाच्या एकंदर भावविश्वाशी सुसंबद्ध आहे. ३-डी तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा इतर ‘बिग बजेट’ चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. तुमच्या डोळ्यांत सारखं काहीतरी खुपसत ठेवण्याचे किंवा सतत कॅमेरा हलवत ठेवून तुम्हाला भोवळ आणण्याचे आचरट चाळे इथे नाहीत. एलियनला जशी ‘रो विरुद्ध वेड’ची पार्श्वभूमी होती तशी इथेसुद्धा अमेरिकेत खदखदत असणाऱ्या एका घटकाची पार्श्वभूमी आहे. ‘क्रिएशनिझम’ म्हणजे ‘पृथ्वीवरची मानवसृष्टी निर्माण होण्यामागे उत्क्रांतीपेक्षा बाह्य घटक कारणीभूत होते आणि ते बाह्य घटक म्हणजे देव’ या वादग्रस्त दृष्टिकोनाचा इथे संदर्भ आहे. या देवांच्या शोधात बाहेर पडण्याची प्रेरणा ही एका धनाढ्य कॉर्पोरेशनची आहे. नवी भूमी पादाक्रांत करण्याची ‘इस्ट इंडिया कंपनी’सदृश आस हे एलियनमध्ये पितृसत्ताक मानवी संस्कृतीचं स्वरूप म्हणून दिसतं. पुरुषप्रधान, भांडवलवादी (नफेखोर) कॉर्पोरेट संस्कृती हादेखील पितृसत्ताक जीवनपद्धतीचा एक भाग मानला जाऊ शकतो. प्रोमेथियसमधली मानवजात एक मूल या नात्यानं आकाशातल्या आपल्या बापाचा शोध घेते आहे हेसुद्धा पितृसत्ताक दृष्टिकोनातून मग पाहता येईल. हा प्रीक्वेल असल्यामुळे यातून अखेर भयावह आणि बीभत्स एलियनच्या निर्मितीमागचं रहस्य स्पष्ट होणार हेदेखील प्रेक्षकांना माहीत आहे. चित्रपटाचं वातावरण पाहता देवांच्या शोधातून दानव हाती लागण्याचा हा प्रकार आनंददायी नसणार हेसुद्धा स्पष्ट आहे.

एलियन आणि रिडली स्कॉटच्या इतर चित्रपटांत दिसलेले काही घटक इथेदेखील आहेत. पाश्चात्य संगीताचा वैशिष्ट्यपूर्ण वापर ही स्कॉटची एक खासियत इथेही दिसते. सतत अ‍ॅक्शन आणि छोटेछोटे संघर्ष दाखवत अखेरच्या मोठ्या संघर्षाच्या उत्कर्षबिंदूकडे जायच्या हॉलिवूड संकेतापेक्षा इथे संथपणे कथानक पुढे जात राहतं. कथानकात पुष्कळ गुंतागुंत आहे. उदाहरणार्थ, पहिला प्रसंग नक्की काय आहे हे कथानकात कुठे समजावून सांगितलेलं नाही. कथानकातले काही टप्पे पार पडल्यानंतर आतापावेतो दिसलेल्या थोड्या बिंदूंची जोडणी करून मग ते काय होतं ते लक्षात येतं. थोडक्यात, निर्बुद्ध अ‍ॅक्शन फिल्मपेक्षा अधिक काहीतरी स्कॉटला करायचं आहे हे अशा गोष्टींतून दिसतं.

एलियनमध्ये नायकाऐवजी नायिका केंद्रस्थानी आहे हे लगेच लक्षात येत नाही. त्या काळात तर ते नवंच होतं. इथेदेखील ते हळूहळू स्पष्ट होतं. देवांच्या शोधमोहिमेवर निघालेल्या अंतराळयानातल्या अनेक व्यक्तिरेखा हळूहळू कळत जातात आणि त्यांपैकी एक नायिका म्हणून सावकाश उभी ठाकते.

आता काही महत्त्वाचे फरक पाहू. प्रोमेथियस ही हॉररपट असण्यापेक्षा विज्ञान-काल्पनिका आहे हा लक्षात येणारा पहिला फरक आहे. एलियनलादेखील काहीजण विज्ञान-काल्पनिका मानतात. पण प्रेक्षकाला खुर्चीवर खिळवून ठेवत भिववायचा हेतू एलियनमध्ये प्रमुख आहे हे स्पष्ट आहे. याउलट 'विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून मानवासमोर नैतिक प्रश्न उभे ठाकतात' हे विज्ञान-काल्पनिकेचं प्रमुख लक्षण मानलं तर ते रिडली स्कॉटच्याच ‘ब्लेड रनर’मध्ये जितकं स्पष्ट आहे तितकं ते एलियनमध्ये नाही. प्रोमेथियसमध्ये ते बऱ्यापैकी स्पष्ट दिसतं. एलियनमध्ये परग्रहावरच्या जीवसृष्टीशी प्रथम संपर्क एवढाच मुद्दा आहे; तर प्रोमेथियसमध्ये ही जीवसृष्टी साधीसुधी नसून मानवजात निर्माण करणारी आहे. त्यामुळे प्रोमेथियस अधिक महत्त्वाकांक्षी आणि अधिक रोमॅन्टिक (किमान आरंभी) वाटते.

जन्मदात्याचा मृत्यू चुकून होणं किंवा करावा लागणं हा पाश्चात्य मिथकातला एक महत्त्वाचा घटक आहे. स्कॉटच्या चित्रपटांत तो निरनिराळ्या स्वरुपांत येतो. एलियनमध्ये तो बीभत्स स्वरुपात येऊन पुरुषांच्या पौरुषालाच आव्हान देतो तेव्हा पितृसत्ताक संस्कृतीवर एक हल्ला म्हणून तो पाहता येतो. इथेदेखील त्याचा संदर्भ आहे आणि तो अनेक पातळ्यांवर आहे. ज्या देवांच्या शोधात ही मोहीम आलेली असते ते देव मेलेले असावेत असं सुरुवातीला दिसून येतं. मोहिमेत सहभागी डेव्हिड या यंत्रमानवामुळे याला एक वेगळी मिती प्राप्त होते. याचा बाप अर्थात मानव आहे. मानवजात ज्याप्रमाणे आपल्या जन्मदात्यांचा माग काढते आहे तसा डेव्हिड आपल्या जन्मदात्याची (म्हणजे मोहिमेवरच्या इतर मानवांची) स्वप्नं वाचत असतो. त्याला सिनेमे पाहायला आवडतात. 'लॉरेन्स ऑफ अरेबिया' त्याचा आवडता चित्रपट आहे. म्हणजे नवनव्या भूमी पादाक्रांत करण्याची पितृसत्ताक आस यानं आपल्या बापाकडून उचलली आहे. रहस्यभेद सुरू चित्रपटात एका कळीच्या प्रसंगात मात्र तो मोहिमेवरच्या मानवांचा, म्हणजे आपल्या जन्मदात्यांचा घात करतो. रहस्यभेद संपला.

नायिकेचं श्रद्धाळू ख्रिस्ती असणं हा कथानकातला आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. नायिका आणि तिचा नवरा हे दोघेही क्रिएशनिस्ट शास्त्रज्ञ या नात्यानं मोहिमेत आहेत. त्यामुळे एखाद्या पवित्र मोहिमेवर निघाल्यासारखी नायिका इथे दिसते. तिला मूल होऊ शकत नाही हा कथानकातला आणखी एक स्तर आहे. एलियनमधल्या नायिकेपेक्षा हे खूप वेगळं आहे, कारण त्यातली रिप्ली ही व्यक्तिरेखा (मांजराविषयी ममत्व सोडता) कोणतेच पारंपरिक स्त्रीसुलभ गुणधर्म घेऊन येत नाही. याउलट इथली नायिका आपल्याला मूल होऊ शकत नाही या वास्तवानं त्रासलेली आहे. पण हळूहळू हे स्पष्ट होऊ लागतं की श्रद्धाळू, पारंपरिक स्त्री ही आपली ओळख तिनं पुसण्याची आवश्यकता आहे. तिच्या श्रद्धेत असणारी आकाशातल्या बापाविषयीची संकल्पना आणि या परग्रहावरचं वास्तव यात फार मोठा फरक आहे, आपली श्रद्धा भेदल्याशिवाय, म्हणजेच एक प्रकारे बापाचा खून केल्याशिवाय ती वास्तवाला सामोरी जाऊ शकत नाही. एका आक्रस्ताळी बीभत्स प्रसंगात तर स्त्रीत्व नाकारण्याच्या तिच्या क्षमतेची कसोटीच घेतली जाते. थोडक्यात, एलियनमधल्या नायिकेहून (सुरुवातीला) वेगळी भासणारी इथली स्त्री व्यक्तिरेखा जोवर एलियनमधल्या नायिकेप्रमाणे लढाऊ स्त्रीवादी होत नाही आणि (आकाशातला दयाळू) पिता - (प्रेमी) पती - (वांच्छित) पुत्र या वेढ्यातून बाहेर पडत नाही तोवर ती नायिका म्हणून उभी राहू शकत नाही. म्हणजे अशा अर्थानंदेखील हा एलियनचा प्रीक्वेल आहे असं म्हणता येईल.

मोठं बजेट, नेत्रदीपक ३-डी आणि थोडं तत्त्वचिंतन यांना घुसळून स्कॉटला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सादर करायचा होता असं एकंदरीत दिसतं. मग त्यात तो कितपत यशस्वी होतो? चित्रपटाचं कथानक हे मुळात अतिशय गोंधळलेलं वाटतं. म्हणजे वर उल्लेख केलेले घटक जरी त्यात असले तरी त्यांना पातळ करणारे पुष्कळ जोडघटक त्यात कोंबले आहेत. एकीकडे एलियनचा प्रीक्वेल असल्यामुळे येणारा दबाव आणि दुसरीकडे काहीतरी वेगळं करून दाखवायची उर्मी यातून ही कोंबाकोंबी उद्भवली असावी. शास्त्र आणि श्रद्धा यांच्यातला संघर्ष हा असा एक घटक आहे. विशुद्ध ज्ञानार्जन आणि धंदेवाईक दृष्टी यांच्यातला तिढा हा आणखी एक घटक दिसतो. प्रोमेथियसच्या कथेतला ख्रिस्तपूर्व मिथकाचा संदर्भ आणि ख्रिस्ती धर्मसंदर्भ यांच्यातही सिनेमा गोंधळलेला वाटतो. अशा गोष्टींमुळे सिनेमाला एकसंध अर्थपूर्ण आकार येत नाही. परग्रहावरचंच नाही, तर एकंदर मानवी अस्तित्वच भयावह आहे असं काहीतरी या सर्वातून म्हणायचं असावं, पण ते पुरेसं भयावह होत नाही अन् परिणामकारकही.

अशा सर्व सैद्धांतिक प्रश्नांना सोडून देऊन त्याऐवजी निव्वळ थरार घेण्याचा आनंद लुटावा तर त्यातदेखील सिनेमा मार खातो. एलियनमध्ये जितक्या परिणामकारकपणे ‘काहीतरी भयानक होणार’ अशा भीतीनं प्रेक्षकाला कुरतडत ठेवलं जातं त्याचा अंशदेखील इथे जाणवत नाही. १९७९मध्ये जगावेगळं काहीतरी करून ठेवलेल्या स्कॉटला इथे मात्र इकडून तिकडून अनेक गोष्टी उसन्या घेऊन मुळात नवीन नसलेल्या गोष्टीत एक उसनं अवसान भरावं लागतं. कदाचित मध्ये इतकी वर्षं उलटली आहेत की तसा थरार पुन्हा निर्माण करायला काहीतरी वेगळं करावं लागेल. स्कॉटच्या चाहत्यांना हे फार त्रासदायक होत असणार.

आणि तरीही सिनेमातले काही भाग चांगले घडवले आहेत. मायकेल फासबेंडरचा डेव्हिड हा यंत्रमानव (Android) ही त्यातली एक गोष्ट म्हणता येईल. माणसं आणि सिनेमे पाहूनपाहून स्वत:ला घडवू पाहणारा हा यंत्रमानव सिनेमात थोडा हलकाफुलका परिणाम साधतो. ज्याला ‘मेंदू’ आहे, पण ‘मन’ किंवा ‘भावना’ नाहीत असा हा डेव्हिड कथानकाच्या गरजेनुसार वागत असतानाही आपला आत्मशोध चालू ठेवतो. कळीच्या प्रसंगांत त्यानं घेतलेले निर्णय प्रेक्षकाच्या मनात घर करून जाऊ शकतात. तो आणि नायिका यांच्या नात्याला (‘ब्लेड रनर’ प्रमाणे) अधिक वाव मिळता तर चित्रपट अधिक परिणामकारक होता असं वाटतं. सिनेमाचा ‘look’ हा हॉलिवूडच्या चकचकीत गुळगुळीत ३-डी प्रतिमांपेक्षा अधिक गडद आणि गंभीर आहे आणि म्हणून अधिक आशयघन वाटतो. एकंदरीत ‘नॅशनल फिल्म रजिस्ट्री’मध्ये जाईल अशा चित्रपटाची अपेक्षा न ठेवता त्याउलट एक फसलेला प्रयोग पाहतो आहोत याची जाणीव ठेवून पाहायला हरकत नाही.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

लेखातल्या विचारांशी सहमत आहे.

मी एलियन पाहिलेला नाही. प्रीक्वेल आधी पाहून आठवड्याने सीक्वेल बघेन अशी सध्या लक्षणं आहेत. त्यामुळे एलियनसंदर्भात आलेल्या स्पष्टीकरणाबद्दल सध्या काही बोलत नाही. चित्रपटातलं मुख्य पात्र कोण असेल हे बराच वेळ समजत नाही. मुख्य म्हणजे ज्या दोन व्यक्ती प्रमुख व्यक्तीरेखा म्हणून घडायला लागतात त्यातल्या पुरूषाचा केलेला घात पहाता पुन्हा कोण कोणाला नियंत्रित करतं, आपलीच निर्मिती आपल्याला वरचढ ठरू शकते का, इ. प्रश्न पडतात. डेव्हीडशी झालेल्या संवादातून ते अधिक स्पष्ट होतात. त्याच्या जोडीला येणारे धार्मिकतेचे संदर्भ, काही प्रमाणात नफेखोर भांडवलदार आणि शास्त्रीय संशोधन यांच्यातली दरी, तेढ, संघर्षाचे संदर्भ नकोसे वाटले. विशेषतः भांडवलदार आणि शुद्ध संशोधन यांच्या संघर्षाचा शेवट नको तेवढा रोमँटीक वाटला.

कदाचित एलियनचा सीक्वेल आणि प्रॉमिथियसचा सीक्वेल बनवून मानव आणि यंत्रमानव यांच्यातला संघर्ष आणि त्यांचं नातं अशी एखादी प्रभावी गोष्ट बनवता यावी. सिनेमात मायकल फासबेंडर आणि चार्लिझ थेरॉन यांची पात्र फारच परिणामकारक वाटली.

खासगी संवादात म्हटल्याप्रमाणे, या चित्रपटाचा त्रिमिती खेळ पाहून किंचित वैतागच आला. दोन-दोन चष्मे डोळ्यावर घालण्याची गैरसोय सहन करण्याएवढी सुंदर त्रिमितीय दृष्य चित्रपटात आहेत असं वाटलं नाही. अगदी सुरूवातीच्या प्रसंगात आणि इतर मोजक्या दोन-तीन प्रसंगांव्यतिरिक्त त्रिमितीचा उपयोग करून घेतल्याचं दिसलं नाही. त्रिमितीचा उपयोग म्हणजे फक्त भयप्रद दृष्य असा नाही. पण सावल्यांच्या खेळातही त्रिमितीचा सुरेख वापर करता येतो. यापुढे प्रॉमिथियस त्रिमितीत पहाणार असाल तर शक्य असल्यास चष्मेवाल्यांनी कॉन्टॅक्ट लेन्सेस घालून जावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जर बघायची वेळ आली तर ह्या धाग्याची मदत होईल.

एकंदर निवडणूकीच्या वर्षात तयार केलेला राजकीय भाष्य असलेला चित्रपट म्हणावा काय? "लिबरल मिडीया" मधे ह्या सिनेमाचे परीक्षण तश्या पद्धतीने केले गेले आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकांताला प्रीक्वेल (याला पुर्वार्ध म्हणणे योग्य ठरेल का?) डाऊनलोडवला अपण त्यात आवाजच गायब आहे Sad आता विकांताला पुन्हा दुसरी फाईल शोधणे आले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>एकंदर निवडणूकीच्या वर्षात तयार केलेला राजकीय भाष्य असलेला चित्रपट म्हणावा काय? <<

तसं वाटत नाही. भांडवलदार आणि ख्रिस्ती श्रद्धाळू यांच्या स्वार्थामुळे मानवजात संकटात सापडते हे मात्र दाखवलेलं आहे. म्हणजे रिडली स्कॉटच्या आस्था डेमोक्रॅट पक्षाच्या दिशेनं आहेत असं म्हणता येईल, पण हे हॉलिवूडमध्ये बर्‍याच जणांच्या बाबतीत खरं म्हणता येईल. त्यामुळे त्यात निवडणुकीसाठी विशेष असं काही असावं असं वाटलं नाही.

>>"लिबरल मिडीया" मधे ह्या सिनेमाचे परीक्षण तश्या पद्धतीने केले गेले आहे काय?<<

मी जेवढं वाचलं त्यात तरी नाही, पण मी फारशी परीक्षणं वाचलेली नाहीत त्यामुळे ते माझ्या वाचनात आलेलं नसण्याची शक्यताही आहे.

>>अगदी सुरूवातीच्या प्रसंगात आणि इतर मोजक्या दोन-तीन प्रसंगांव्यतिरिक्त त्रिमितीचा उपयोग करून घेतल्याचं दिसलं नाही. त्रिमितीचा उपयोग म्हणजे फक्त भयप्रद दृष्य असा नाही. पण सावल्यांच्या खेळातही त्रिमितीचा सुरेख वापर करता येतो. <<

सहमत, पण सध्याच्या ३-डी लाटेतले बरेचसे चित्रपट पाहायला खूप त्रासदायक असतात. त्यांचा ३-डीचा वापर फार बालिश आणि कृतक* वाटतो. 'प्रोमेथियस'मध्ये ३-डीचा वापर आशयाला विशेष उल्लेखनीय उठाव देणारा नसला तरी त्या मानानं सहज वाटला. उभ्या केलेल्या परग्रहावरच्या कृत्रिम देखाव्यात खोलीचा आभास उत्पन्न करण्याइतपत किंवा गडद गुहेचा गडदपणा अधिक तीव्र करण्याइतपत असा इथला ३-डीचा वापर हा अधिक सुखद आणि आशयाशी सुसंगत वाटला.

* - हिंदी सिनेमा रंगीत झाल्यावर नायक-नायिकेला भडक गुलाबी मेकप करून हिमालयाच्या निसर्गरम्य कुशीत उड्या मारायला पाठवायची फॅशन आपल्याकडे आली होती. ती जशी कृतक वाटते, तसंच काहीसं हे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण सध्याच्या ३-डी लाटेतले बरेचसे चित्रपट पाहायला खूप त्रासदायक असतात. त्यांचा ३-डीचा वापर फार बालिश आणि कृतक वाटतो.

नितांत सहमत. त्यातले वेगळेपण केव्हाच संपले आहे.
हल्ली आलेल्या बहुतांश अ‍ॅनिमेटेड (कार्टुन टाईप) चित्रपटांत तर फक्त पैसे उकळण्यासाठी थ्रीडी करतात की काय असे वाटावे इतके प्राथमिक आणि बालिश थ्रीडी दिसते.

अवांतरः एकतर ते थ्रीडी गॉगल्स सांभाळत चित्रपट पहायचाच मुळात कंटाळा येतो. त्या गॉगल्सपेक्षा वेगळा विचार करता येणार नाही का?
प्रेक्षक आणि पडद्याच्या मधे थ्रीडी भिंगाचा थर/स्क्रीन/पडदा उभारावा असा विचार येत होता, मात्र त्यामुळे प्रत्येक अंतरावरच्या, कोनातल्या प्रेक्षकाला कदाचित तितकेच स्वच्छ दिसणार नाही असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चितांतुर काका काय ग्रेट परिक्षण आहे हो. मी तुमची इतर परिक्षणंही वाचली. एकेक परिक्षण एज्युकेशन आहे एज्युकेशन. नतमस्तक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

'एलियन' पाहिला. प्रॉमिथियसमधे त्रिमितीचा फार वापर केला नाही ही तक्रार मागे घेते.
पहिल्या धाग्याशिवाय सगळे संदर्भ निश्चितच लागले नसते. त्या काळाचे संदर्भ फारसे लागले नसतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण ज्यांनी पहिला नसेल त्यांनी तो आज आवर्जुन पहावा अशी परिस्थिती नाही कारण त्या संकल्पनेचा विवीध अ‍ॅक्शन चित्रपटात चाऔन चाउन चोथा सुधा उरलेला नाही. आजच्या जमान्यात इतका लांबलचक चित्रपट आवर्जुन बघावा इतका सुरेख तो अजिबात वाटत नाही. आम्हा हाउसच लै चित्रपट पहायची म्हणून पाहुन घेतला.

आता हा प्रोमिथिअस पण पहाणे आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मोठं बजेट, नेत्रदीपक ३-डी आणि थोडं तत्त्वचिंतन यांना घुसळून स्कॉटला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सादर करायचा होता असं एकंदरीत दिसतं. मग त्यात तो कितपत यशस्वी होतो? चित्रपटाचं कथानक हे मुळात अतिशय गोंधळलेलं वाटतं. म्हणजे वर उल्लेख केलेले घटक जरी त्यात असले तरी त्यांना पातळ करणारे पुष्कळ जोडघटक त्यात कोंबले आहेत. एकीकडे एलियनचा प्रीक्वेल असल्यामुळे येणारा दबाव आणि दुसरीकडे काहीतरी वेगळं करून दाखवायची उर्मी यातून ही कोंबाकोंबी उद्भवली असावी. शास्त्र आणि श्रद्धा यांच्यातला संघर्ष हा असा एक घटक आहे. विशुद्ध ज्ञानार्जन आणि धंदेवाईक दृष्टी यांच्यातला तिढा हा आणखी एक घटक दिसतो. प्रोमेथियसच्या कथेतला ख्रिस्तपूर्व मिथकाचा संदर्भ आणि ख्रिस्ती धर्मसंदर्भ यांच्यातही सिनेमा गोंधळलेला वाटतो. अशा गोष्टींमुळे सिनेमाला एकसंध अर्थपूर्ण आकार येत नाही. परग्रहावरचंच नाही, तर एकंदर मानवी अस्तित्वच भयावह आहे असं काहीतरी या सर्वातून म्हणायचं असावं, पण ते पुरेसं भयावह होत नाही अन् परिणामकारकही.

चित्रपट पाहून असेच वाटले, प्रोमेथियस म्हणजे डेव्हिड का नायिका हे मला स्पष्ट झाले नाही, आणि मेरेडिथपण यंत्रमानव असावी अशी शंका आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0