एका निनावी प्राण्याचा मृत्यू 


ज्येष्ठाची पौर्णिमा होती. चांदोबाची मुशाफिरी अात्ता कुठे सुरू झाली होती. "भेंडेकाका! इथे या." मोगूबाईंची हाळी अाली. जुन्या पिढीच्या अाणि ऐषारामी चालीरीतींच्या मोगूबाई बाळेकुंद्री सोळा साली जेव्हा पाचोद्याला अाल्या, तेव्हाही त्यांच्या मैदानी अावाजाची अाजूबाजूच्या गावोगावी ख्याती होती. त्या काळी बाई साऱ्यांच्या कौतुकाच्या होत्या. त्यांची कीर्ती मुलाबाळांच्या अाणि थोरांच्या तोंडी होती. त्याही तेव्हा मोठ्या जिज्ञासू अाणि मुमुक्षू होत्या. त्यांच्या डौलाला साजेसा मेणा दारी होता. ऋद्धिसिद्धी दासी होत्या. उष:काळी त्यांच्या अाशीर्वादासाठी सारी अाळी रांगा लावी. अाणि एका सैतानी रात्री हे सारे धुळीला मिळाले. एकाकी तारुण्याच्या धुंदीमुळे बाईंना दुर्बुद्धी झाली. त्यांच्या निम्मेशिम्मे हिवाळे पाहिलेल्या एका उफाड्याच्या ऐदी सोद्यापायी त्यांच्या काचेच्या भांड्याचा चुराचुरा झाला. त्या पोराने बाईंच्या पुंजीसुद्धा पुण्याच्या दिशेने सूंबाल्या केला, अाणि इथे बाईंच्या लौकिकाला ओहोटी अाली. बाईंच्या शीलाची जी हानी झाली की, झाडूवालाही थारा देईना. पोराटोरांची कुचेष्टा भाळी अाली. पूर्वायुष्याची सारी चिह्ने काळाच्या क्षितिजाखाली गेली. कानीच्या कुड्या गेल्या अाणि भोके राहिली. सारी दैना दैना झाली.


'मेले! मेले! धावा! धावा!' पुन्हा बाईंची किंकाळी ऐकू अाली. 'हा अालो!', काकांचा दुजोरा अाला. तेही अाता म्हातारे झाले होते. 'माझ्या चितेच्या शेणी कावेरीच्या घाटी नेण्याची अाता पाळी अाली अाहे', ही अायुष्याच्या  सांजेला सांगाव्याविना येणारी धास्ती अाताशा त्यांनाही वेडावी. कुणी सांगे की, पूर्वी त्यांचा जुना चौसोपी वाडा रौलेट् अॅक्ट्पायी माँटेग्यूसाहेबांनी स्वाहा केला होता. वाड्याच्या जोडीने काशाची मोठाली भांडी गेली. देवादिकांच्या मूर्ती गेल्या. विक्तूरिया राणीच्या शिक्क्यांची पेटीही गेली. अाता त्या गावी त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणी नाही. अाई अामांशाच्या विकाराने मेली. मोठा भाऊ होता तो नामानिराळा राहिला. गाठीला भोकाचा पैसाही नाही. विद्या नाही की युक्ती नाही. बोजा मोठा, नि चिंधी थोटी. भुकेच्या वेळेला सुपारीच्या खांडाचेही वांधे. थोबाडाचे टाळे वेंगाडावे ते कुठे? रिकाम्या पानी उठावे की कोंड्याचे मांडे खावे? दारिद्र्याची गाथा कुणाच्या कानी घालावी? सोनेनाणे नाही तो भार्या रुसे. माहेरी जाई ती येण्याची खात्री नाही. दोन्ही मोठी मुले भांगेच्या अाणि दारूच्या अाहारी गेलेली. काकांची छोटी दुहिता शालिनी बिगारीच्या मुलांसाठी हिब्रू भाषेचे क्लासेस् घेई तेंव्हा कुठे मेटाकुटीला अालेल्या त्यांच्या संसाराचा गाडा रुटूखुटू चाले. ती पोटुशी राहिली की तोही थांबे. सारी त्रेधा उडे. जाऊ द्या ते अाता. अासू किती ढाळावे अाणि कोणी पुसावे? हे घ्या काका बिगीबिगी अाले. 


बाईंच्या अारोळीने दामूही तिथे अाला. दामूमागे त्याची छोटीशी मालूदीदी अाली. मालूच्या जोडीने काळा कुलुंगा टिपू कुत्रा अाला. टिपूच्या जोडीने मिजाशी मिशांची भाटी अाली. भाटीच्या पाठीमागे टोकेरी चोचीची मैना अाली. औत्सुक्याने सारे शेजारी अाले. होमिओपॅथीवाले डॉ. कुट्टीमुनी (डी.जी.ओ. बॉम्बे) अाले. त्यांच्या शुश्रूषागृहाला भिणाऱ्या मोकाशीवैनी अाल्या. श्री. बाबासोा शेट्टी अाणि त्यांची 'भांडीवाली' सौ. निशा गुर्टू निराळे निराळे अाले. (गेल्या साली पोलिअोने मेल्यामुळे कै. बिनीवाले, पै. इमामुल्ला अाणि ख्रि. डिसोझा या तिघांना येता अाले नाही. सेनेच्या प्रीतिमेळाव्यासाठी हिं. हृ. बाळाभाई मुन्शी दिल्लीला गेलेले होते, त्यामुळे तेही नाही अाले.) नैऋत्येला पोलिसांच्या निळ्या गाडीचा भोंगा ऐकू अाला. त्यामागे दाढीमिशांचा फुगा केलेल्या शिपायांचा मोठा ताफा अाला. तोबा दाटी झाली. बाईंच्या कांगाव्याने साऱ्यांच्या चित्ती भीतीने ठिय्या दिला. चिळीमिळी झाली. कुणाला काही सुचेना. कुणाची बुद्धी चालेना. फौ. जेधे चौकोनी गाडीपुढे उभे होते ते घाईघाईने बाईंपाशी अाले. त्यांच्या अावेशापुढे कुणाला वाचा फुटेना. 



जेधे: (अावेशाने) मारा, ठोका त्याला! बाई, कुठे अाहे तो? गुंगारा दिला का त्याने?

मोगूबाई: कुणी? 

जेधे: गेला कुठे तो काळू रामोशी? त्याला फाशी देण्याची सुपारी घेणारा नावाचा सुभान्या जेधे अाहे मी! 

मोगूबाई: काळू? मी नाही बाई पाहिला त्याला! बाकी काळूचा सुगावा कुणाला लागावा? तो का खुळा अाहे? 

जेधे: आँ!? काळू इथे नाही ?! ही चेष्टा नाही ना? बाई, तुम्ही माझा पुरा मोरू केला बुवा!? 


जेध्यांच्या रागाचा पारा काही खाली येईना. 


जेधे: (क्रोधाने) रांडे, अाम्ही फुकाचे इथे अालो ते माशा मारा-

मोगूबाई: थांबा हो! उगा शिव्या का देता? मी किनी... 

जेधे: बोला ना! अाता का? तुम्ही किनी... 

मोगूबाई: मी किनी तिथे पुरोहितांच्या विहिरीमागे एका सापाची अाकृती पाहिली. 

जेधे: सापाची? 

मोगूबाई: हो! मोठ्ठ्या वेटोळ्यावेटोळ्यांचा अाहे तो. जाडाजुडा. चिचुंद्र्या खाणारा. बारा फुटी लांबीचा! त्याच्या क्रौर्याला मी भ्याले अाणि ढेबेवाडीच्या कोण्णुस्वामींचा धावा केला, ते माझ्या हाकाटीमुळे तुम्ही अाला. 

जेधे: हात्तिच्या! बारा इंची वा बारा फुटी. मी अाता इथे अाहे तेव्हा भीतीला थारासुद्धा नाही. सापाच्या बापाचाही काही तोरा नाही माझ्यापुढे. वाघिणीच्या दुधाची बासुंदी पिणारा पांडू अाहे मी. पाहूया कुठे अाहे तो सापुर्डा! या माझ्यामागे! 



सारा तांडा ईशान्येच्या वाटेने विहिरीमागे गेला. काकांनी काठीच्या टोकाने इशारा केला. सुरूच्या झाडापुढे भिंतीच्या अाडोशाला ती मोठाली वेटोळी लोकांनी पाहिली. साऱ्यांच्या ओठी अाले - 'छे! हा प्राणी सापापेक्षा निराळा अाहे.' ह्या गोंगाटाने प्राणी जागा झाला. त्वेषाने उताणा झाला. जेध्यांनी जिभेखाली थुंकी गोळा केली. शिर्डीच्या साईबाबांनी दिलेल्या रुद्राक्षाच्या माळेची स्मृती जागी केली, अाणि पिस्तुलाच्या एका गोळीने त्याची खांडोळी केली. काही उत्साही लोकांनी त्याच्या पार्थिवाला चोहोबाजूंनी मोहाच्या पानांचा वेढा दिला. जेध्यांनी विडीच्या टोकाने ज्वाला सुरू केली. तासापूर्वी जिथे त्रिकोणी डोक्याचा माजोरी प्राणी होता, तिथे अाता राखेचा ढिगारा बाकी राहिला. 'वासांसि जीर्णानि–' या कृष्णोक्तीचा हा पुरावा अाहे. 


हा प्राणी ज्या जातीचा होता, तिच्या उच्चाराची इथे अाम्हाला मुभा नाही. ती का नाही, हे चाणाक्षांच्या खात्रीने ध्यानी अाले अाहे. (ज्यांच्या ध्यानी अालेले नाही, त्या मूढांनी हा सारा उतारा पुन्हा वाचावा!) वाग्देवीने माथी दिलेल्या ह्या ओझ्यामुळे लिहिणाऱ्याच्या बोरूलाही अाता ग्लानी अाली अाहे. तेव्हा ह्या मुमूर्षू अाख्यानाची इथे इतिश्री व्हावी, ही वार्ता त्याला दिलासा देणारी नाही का? 


✵ ✵